आज ऑनलाइन शॉपिंग मोठय़ा शहरांपुरतंच मर्यादित असलं तरी पुढच्या दहा वर्षांत सगळ्या पातळ्यांवर त्यात भरीव वाढ होण्याची शक्यता आहे. या गृहितकावरच आजच्या सगळ्या वेबपोर्टल्सची धोरणांची आखणी दिसून येते.

सणासुदीची चाहूल लागते ती बाजारपेठा सजायला लागल्यावर. पण आताच्या डिजिटल जमान्यात ही चाहूल लागते ती इंटरनेटच्या महाजालावर आणि तीदेखील नेहमीच्या बाजारपेठा सजण्याआधीच. मेलवरून आकर्षक ऑफर्सचा धडाका सुरू होतो. आपण कधी पाहिलेही नाही की, नावही ऐकले नाही अशा कैक पोर्टल्सवरून शेकडो स्किम्सचा भडिमार होऊ लागतो. अशा वेळी कधी ऑनलाइन शॉपिंगच्या नादाला न लागणारा ग्राहकदेखील कुतूहलापोटी एखादी वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरू शकत नाही. खरं तर विकत घ्यायची प्रत्येक वस्तू हातात घेऊन, चिकित्सा करून, शक्य असेल तर भावात घासाघासी करून घेण्याची एक सार्वत्रिक मानसिकता असते. ऑनलाइन शॉपिंगमध्ये यातलं काहीचं नसतं. पण तरीदेखील आज ही मानसिकता बदलून ऑनलाइनला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. एकूण बाजारपेठेतला त्यांचा टक्का वाढतच चालला आहे.

गेल्या एकदोन वर्षांत ईशॉपिंगचा बोलबाला इतका वाढलाय की अनेक छोटय़ामोठय़ा व्यापाऱ्यांनी त्याचा धसका घेतल्याचे दिसते. पण मग खरेच का ऑनलाइन शॉपिंगने आपल्याकडे इतका मोठा फरक घडवला आहे? ऑनलाइन शॉपिंगबाबत विचार करताना बहुतांश वेळा त्यांच्या ग्राहक संख्येचा खूप गवगवा केला जातो. अमुक दशलक्ष ग्राहक, अमुक इतक्या शहरांत विस्तार असं उच्चरवात सांगितलं जातं. पण मुळात संपूर्ण किरकोळ बाजारपेठेत ऑनलाइनचा वाटा नेमका किती आहे, त्याचा आपल्या एकंदरीत किरकोळ बाजारपेठेवर नेमका काय परिणाम झाला आहे, हे पाहणंदेखील रंजक ठरेल. आणि त्यातूनच ऑनलाइन मार्केटची भविष्यातील दिशा स्पष्ट होते.

ढोबळ आकडेवारीनुसार सध्या जे चित्र दिसते त्यानुसार देशभरातील ऑनलाइन किरकोळ बाजारपेठ अजूनही बाल्यावस्थेतच आहे. देशातील किरकोळ बाजारपेठेशी निगडित ऑनलाइनची टक्केवारी ही तुलनेन खूपच कमी आहे. यावर भाष्य करताना ईबे इंडिया या वेब पोर्टलचे विक्री सेवा विभागाचे संचालक पंकज उके सांगतात की, आज आपल्या देशातील किरकोळ बाजारपेठ ही आठ बिलिअन डॉलर्स इतकी आहे. आणि त्यामध्ये ऑनलाइनचा वाटा हा फार फार तर ०.७ टक्के इतकाच आहे. २०२० पर्यंत ही बाजारपेठ ४० बिलिअन डॉलर्सचा टप्पा पार करील असं तज्ज्ञांकडून सांगितले जातं. मात्र त्या वेळीदेखील एकूण किरकोळ व्यापार बाजारपेठेच्या तुलनेत ऑनलाइनचा वाटा हा दोन आकडी टप्पा पार करील का, याची आता तरी खात्री देता येणार नाही. थोडक्यात सांगायचं तर, आपण सध्या हिमनगाचे टोक पाहत आहोत.

अर्थात ऑनलाइन किरकोळ बाजारपेठेची ही परिस्थिती असतानादेखील आज सर्वच ऑनलाइन शॉपिंग सुविधा पुरविणारे पोर्टल्स ज्या आक्रमक पद्धतीने बाजारात उतरत आहेत त्यामागचं नेमकं काय कोडं आहे? यावर्षी ऑनलाइन शॉपिंगवर सवलती मिळणार नाहीत अशा स्वरूपाच्या एका बातमीने मागच्याच महिन्यात अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण गेल्या १५ दिवसांत ज्या पद्धतीने सर्वच छोटय़ामोठय़ा वेब पोर्टल्सनी सवलतींचा जो काही भडीमार केला आहे तो पाहता, ग्राहकदेखील गुदमरून गेला आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे या साऱ्या ऑफर्सची माहिती प्रस्तावित ग्राहकांपर्यंत पोहचावी यासाठी ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन जाहिरात माध्यमांचा (वर्तमानपत्रे, टीव्ही, होर्डिग्ज इ.) वापर खूप मोठय़ा प्रमाणात करण्यात आला आहे. टॅमने (टेलिव्हिजन माध्यमांचा अभ्यास करणारी एजन्सी) प्रसारित केलेल्या एका आकडेवारीनुसार सप्टेंबर २०१५ रोजी संपलेल्या तिमाहीत टीव्ही माध्यमातील जाहिरातींसाठी देशातील आघाडीच्या ऑनलाइन पोर्टल्सनी खर्च केलेली रक्कम ३०० कोटी रुपयांहून अधिक आहे. यामध्ये अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा यांचा समावेश तर आहेच, पण ओएलएक्स, क्विकरसारख्या सेकंड मार्केटचादेखील समावेश आहे. अर्थातच अनेक छोटय़ा पोर्टल्सचा यात समावेश नाही. लाइमरोड या वेबपोर्टलने मात्र जाहिरातीसाठी फेसबुकसारख्या माध्यमांवर बरीच मोठी रक्कम खर्च केली आहे. आणि ही आकडेवारी सणासुदीचा मोसम सुरू होण्याआधीची आहे. गेल्या २० दिवसांत तर जाहिरातींचा भडीमार इतका वाढला आहे की, जणू काही जाहिरात युद्धच सुरू झालंय की काय असे वाटावे.

किरकोळ बाजारपेठेतला ऑनलाइनचा वाटा एक टक्कादेखील नसताना आणि अजून त्यांना खूप मोठा पल्ला गाठायचा असतानादेखील आज अत्यंत आक्रमकपणे मार्केटिंग होताना दिसतंय. या सर्वाचा विक्रीवर होणारा नेमका परिणाम काय आणि कसा आहे, हे या पोर्टल्सवरून विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचा कल पाहिल्यावर लक्षात येते.

बे इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१४ मध्ये कॅमेरा, चष्मा, घडय़ाळ, ऑडिओ व होम एंटरटेन्मेंट, दागिने आणि एलईडी व एलसीडी टेलिव्हिजन्स या उत्पादनांकडे ग्राहकांचा कल दिसून आला होता. तर २०१५चा आजवरचा कल हा कपडे व अ‍ॅक्सेसरीज, फिटनेस व स्पोर्ट्स साहित्य, सुगंधी द्रव्ये, किचन व डायनिंग आणि घरगुती उपकरणे याकडे आहे. नुकत्याच फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोबाइलने खूप मोठी बाजी मारल्याचे चित्र आहे. तर अ‍ॅमेझॉनच्या तीन दिवसांच्या सेलमध्ये घरगुती व स्वयंपाकगृहातील उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फॅशन संबधित उत्पादने, लहान मुलांचे विशेषत: बेबी प्रोडक्ट आणि भेटवस्तूंना मोठा प्रतिसाद होता. तर दुसरीकडे एकच एक प्रकारचे उत्पादन असणाऱ्या ऑनलाइन वेब पोर्टल्सवरदेखील याच उत्पादन गटातील वस्तूंचा समावेश दिसून येतो. लाइमरोडसारख्या फॅशनसंबंधित पोर्टलवरदेखील इथनिक मेला सुरू होता आणि सणासुदीच्या मोसमामुळे त्यांना त्याचा मोठा फायदा मिळत आहे.

lp11थोडक्यात काय, तर आपल्या पारंपरिक सणांच्या उत्साहाचा लाभ सध्या या ऑनलाइन बाजारपेठेच्या विस्ताराला होताना दिसत आहे आणि प्रामुख्याने हा सारा भर शहरी भागावर आहे. एखाद्या उत्पादनाची खरेदी सुविधा केवळ एकाच वेब पोर्टलवर असेल, तर काही त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगचा विस्तार छोटय़ा शहरातदेखील होताना दिसत आहे, पण हे प्रमाण तसं कमी आहे. ऑनलाइन शॉपिंगमध्ये सध्या देशात दिल्लीचा पहिला क्रमांक आहे, तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर. महाराष्ट्रात पुणे</span>, नागपूर, नाशिक या शहरांची आघाडी आहे आणि यामध्ये सर्वाधिक वाटा असणारा ग्राहकवर्ग हा ३५ च्या खालील वयोगटातील आहे. २५ वर्षांच्या खालील वयोगटातील ग्राहकाच्या खरेदीत लॅपटॉप्स, मोबाइल्स, घडय़ाळे, ऑडिओ व होम एन्टरटेन्मेंट या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा समावेश असल्याचे इबे इंडियाचे निरीक्षण आहे, तर ३५ च्या पुढचा वर्ग घरगुती उपकरणे, लाइफस्टाइल अशा उत्पादनांना प्राधान्य देतो.

थोडक्यात काय, तर एकंदरीतच ऑनलाइन मार्केटमध्ये खरेदीचा कल हा जीवनावश्यक वस्तूंपेक्षा हाती चार अधिक पैसे खुळखुळू लागल्यावर खरेदी केल्या जाणाऱ्या उत्पादनांकडे झुकणारा अधिक दिसून येतो. म्हणजेच ज्याला आपण डिस्पोजेबल इन्कम म्हणून संबोधतो तो भाग. महत्त्वाचे म्हणजे हा सारा कल आहे तो प्रामुख्याने ब्रॅण्डेड उत्पादनांकडे. ज्या ब्रॅण्डवर ग्राहकांचा आधीच विश्वास आहे, फक्त त्यांना योग्य भावात (म्हणजे स्वस्तात) आणि योग्य प्रकारे ते उत्पादन मिळवून देणाऱ्या पोर्टलचा आधार घेतला जातो, तर एखादं पोर्टल स्वत: प्रयत्न करून नॉनब्रॅण्डेड उत्पादनांना ज्या पद्धतीने सादर करते, त्यामुळे त्यांनादेखील ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय. सध्या तरी ऑनलाइन बाजारपेठेचा सार भर हा मोठय़ा शहरांमध्ये सर्वाधिक आहे. म्हणजेच सध्या तरी हे मार्केट बदलत्या जीवनशैलीच्या आधारावरच भराऱ्या मारताना दिसत आहे.

याची पुष्टी करणाऱ्या दोन महत्त्वाच्या मोठय़ा घटनांची दखलदेखील येथे घ्यावी लागेल. आदित्य बिर्ला ग्रुपने नुकतेच सुरू केलेलं ऑनलाइन फॅशन स्टोअर आणि रिलायन्सचं येऊ घातलेलं फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक्स ईस्टोअर. या दोघांचीही तयारी ही बाजारपेठीय कल पाहून त्यानुसारच आहे. त्यात सध्या तरी फार मोठा बदल दिसत नाही. देशातील दोन मोठय़ा उद्योग समूहांची ही तयारी पाहता पुढील काही वर्षांत ऑनलाइन बाजारपेठेत घमासान लढाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच वेगात अन्य काही मोठय़ा उद्योगसमूहांनी त्यात उडी घेतली तरी नवल वाटणार नाही.

अर्थात आज जरी बहुतांश कल हे जीवनशैलीच्या बदलाशी निगडित असले तरी त्याचा वापर करणारा जो ग्राहकवर्ग आहे, तो मुख्यत: तरुण आहे. भविष्यात याच वर्गाकडे खर्च करण्याची शक्ती अधिक असणार आहे. आज जर हा मोठा ग्राहकवर्ग ऑनलाइन व्यवस्थेवर विसंबून असेल तरी भविष्यात तो त्याच्या जीवनावश्यक वस्तूंसाठीदेखील याच ऑनलाइन व्यवस्थेचा आधार नक्कीच घेणार आणि येथेच ऑनलाइन किरकोळ बाजारपेठं ही भरभराटीला येणार आहे. त्यातदेखील सर्वात महत्त्वाचा घटक असणार आहे तो मोबाइल मार्केटिंगचा. आज एकजात सर्व पोर्टल्सवर मोबाइल अ‍ॅपद्वारे करण्यात येणाऱ्या खरेदीवर विशेष सवलत दिली जाते. लाइमरोडच्या संस्थापक सीईओ सुची मुखर्जी सांगतात की, पुढील वर्षभरात २३६ दशलक्ष मोबाइलधारक असतील असे अहवाल येत आहेत. हाच ऑनलाइन बाजारपेठेसाठी सर्वात योग्य काळ असेल, असे त्या नमूद करतात.

त्यामुळे आजची ही स्पर्धा, जाहिरातबाजी, स्कीम्सचा मारा हे सारं या पाचदहा वर्षांनंतरच्या भविष्यावर नजर ठेवून सुरू आहे. कारण बाजारपेठ काबीज करायची असेल तर सर्वात महत्त्वाचे आहे ते आजपासूनच बाजारात टिकून राहणं. त्यासाठी गरज आहे ती भांडवल ओतण्याची, ग्राहकाचा विश्वास टिकवण्याची, ग्राहक टिकवून ठेवण्याची. आपला प्रस्तावित ग्राहक ओळखून त्याची इत्थंभूत माहिती ठेवण्याची. ज्याला बाजारपेठीय संज्ञेत बिग डेटा असे संबोधले जाते. या पायावरच ऑनलाइन मार्केटची सारी भिस्त असणार आहे, सध्याच्या आक्रमकतेचं गणित यात दडलेलं आहे.

रिटेल एक्स्पोर्टची संकल्पना रुजतेय

निर्यात ही संकल्पना आपल्याकडे प्रामुख्याने मोठय़ा उद्योजकांशी निगडित आहे. कंटेनरच्या कंटेनर भरून मालाची निर्यात हा ट्रेंड त्यात दिसतो. अनेक कागदपत्रांची, परवान्यांची आणि करांची पूर्तता हा त्यातला अपरिहार्य भाग. त्यामुळे किरकोळ बाजाराची व्याप्ती बहुतांशपणे देशांतर्गतच मर्यादित राहताना दिसते. पण गेल्या काही वर्षांत किरकोळ बाजारातील व्यापारीदेखील अगदी विनासायास निर्यातीत बाजी मारत आहेत. कॉमर्स हा त्यामागचा एक महत्त्वाचा घटक म्हणावा लागेल. बे इंडिया या वेब पोर्टलचे विक्री सेवा विभागाचे संचालक पंकज उके सांगतात, ‘‘आमच्या वेबपोर्टलवर सुमारे ६० हजार विक्रेते त्यांची उत्पादने विकतात. त्यापैकी तब्बल २० हजार विक्रेते हे निर्यातीत सहभागी झालेले आहेत. मोठय़ा उत्पादकांपुरते मर्यादित असलेला निर्यातीचा व्यापाराचा किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेनेदेखील रिटेल एक्स्पोर्ट या संकल्पनेला मान्यता दिली आहे. आम्ही आमच्या इच्छुक विक्रेत्यांना प्रशिक्षणदेखील देतो.’’ अर्थातच या उत्पादकांनी विदेशी बाजारपेठेची संधी मिळाली आहे. शॉपिंगच्या या सुविधेमुळे देशातील निर्यातीला एक वेगळी दिशा मिळाली आहे असे म्हणता येईल.

पूरक व्यवसायांची भरभराट

देशातील ईकॉमर्सच्या वाढत्या विस्तारामुळे त्याच्याशी संबधित अनेक पूरक व्यवसायांनी देखील विविध सुविधांची खैरात सुरू केली आहे. मुख्यत: सेवा क्षेत्राला या ईव्यापाराचा सर्वाधिक फायदा मिळत आहे. त्यामुळे हा फायदा आणखीन कसा वाढवता येईल याकडे यापुढील काळात या पूरक व्यावसायिकांचे लक्ष राहणार आहे. बे इंडियाने देशभरातील तब्बल दहा हजार पिनकोड कव्हर केले आहेत, तर अ‍ॅमेझॉनने १९ हजार. अर्थातच या सर्वासाठी कुरिअर सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. पण त्यातदेखील व्हॅल्यू अ‍ॅडिशन असणे महत्त्वाचे ठरते. नुकतीच ब्ल्यू डार्टने सुरू केलेली लॉकर सव्‍‌र्हिस हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी केलेली वस्तू दुकानातून तुमच्या दारात येईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला सूचना देणारे संदेश येत असतात. पण नेमके तुम्ही आलेली वस्तू स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर उपलब्ध नसाल तर अडचण येऊ शकते. कॉमर्सच्या घरपोच सुविधेतला हा मोठा अडथळा आहे. एका सर्वेक्षणानुसार घरपोच वस्तू देण्याच्या सेवेमध्ये १५ ते १८ टक्क्याने त्रुटी आढळल्या आहेत. या अडचणीवर मात करण्यासाठी खास ईकॉमर्सद्वारे येणाऱ्या कुरिअर्ससाठी ही विशेष लॉकर्स सुविधा ब्ल्यू डार्टने सध्या गुरगावमध्ये सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ब्ल्यू डार्टसारख्या मोठय़ा कंपनीचा २५ टक्के व्यवसाय हा ईकॉमर्समधूनच होत आहे. भविष्यात अशा सेवेची गरज प्रत्येक कुरिअर कंपनीला भासणार आहे हे वाढत्या ईकॉमर्समुळे अधोरेखित होत आहे.

असाच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिग डेटा बँकिंगसाठी स्टोअरेज सुविधा पुरवणे. कॉमर्सचा वाढत्या विस्तारात बिग डेटा (ग्राहकांच्या आवडीनिवडीची र्सवकष माहिती) हा कळीचा घटक आहे. आपला प्रस्तावित ग्राहक नेमके काय अपेक्षित करतो हे त्यातून ठरवणे, त्यानुसार धोरण आखणे आणि त्या ग्राहकापर्यंत आपली माहिती नेमकी (फायदेशीर व्यवसाय होईल अशी) पोहोचवणे हाच तर ईकॉमर्सचा पाया आहे. देशातील स्टोअरेजच्या वाढत्या मागणीसाठी अनेक कंपन्या सरसावल्या आहेत. ईएमसी आणि डेलमधील एकत्रिकरणाकडे देखील या दृष्टीने पाहावे लागेल. अर्थात यामध्ये खूप मोठा वाटा ईकॉमर्सचा असल्यामुळे नुकताच मागील वर्षी डेल आणि फ्लिपकार्टचा करार झाला आहे. तर केवळ बिग डेटा बँकिंगचेच काम करणाऱ्या अनेक कंपन्यादेखील कार्यरत आहेत. त्यांनादेखील अशा प्रकारच्या स्टोअरेज सुविधांची गरज भासणार आहे. थोडक्यात काय तर अनेक पूरक व्यवसायांनादेखील अनेक संधी प्राप्त होत आहेत.