23 February 2019

News Flash

दसरा विशेष : ट्रेण्ड  दागिन्यांचा..

एखादा सण जवळ आला की चर्चा रंगू लागते ती पेहराव कोणता करायचा याची. एकदा पेहराव ठरला की पुढच्या गोष्टी ठरवता येतात.

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

भारतीयांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये सोनं-चांदी प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे सणासुदीला सोन्या-चांदीचे दागिने घालणं आलंच. या दागिन्यांचे ट्रेण्ड ग्राहकांच्या आवडीनिवडीप्रमाणे सतत बदलत असतात

एखादा सण जवळ आला की चर्चा रंगू लागते ती पेहराव कोणता करायचा याची. एकदा पेहराव ठरला की पुढच्या गोष्टी ठरवता येतात. या यादीत दागिने, केशरचना, टिकली, नेलपेंट असं सगळं येतं. पण सगळ्यात पहिल्या क्रमांकावर असतात दागिने! जे कपडे घालणार त्यानुसार दागिन्यांची निवड होते. दरवर्षी भारतीय परंपरेनुसार दसऱ्याला सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी होते. दरवर्षी नित्यनियमाने या दिवशी खरेदी करणारेही असतात. दरवर्षी अशा ग्राहकांना काही तरी नवीन हवं असत. म्हणूनच यंदा सोन्या-चांदीच्या दागिन्यांमध्ये नवीन काय आहे याबद्दल जाणून घेऊ या.

बाजारात नवीन काय आहे, कोणत्या डिझाइनला जास्त मागणी आहे अशा प्रश्नांची उत्तरं जे हे दागिने घडवतात तेच देऊ शकतात. म्हणूनच यंदा काय ट्रेण्डिंग असेल हे जाणून घेण्यासाठी वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या आदित्य पेठे यांना बोलतं केलं. ‘ग्राहकांचा कल कितीही झालं तरी पारंपरिक दागिन्यांकडे असतो; परंतु त्यातही त्यांना नवीन काही तरी अपेक्षा असते. आम्ही पारंपरिक दागिन्यांना थोडा वेगळा लुक देऊन दागिने तयार केले आहेत आणि गेल्या वर्षीपासून अशाच ज्वेलरीचा ट्रेण्ड आहे. उदाहरणार्थ, ठुशी या प्रसिद्ध पारंपरिक दागिन्यामध्ये आम्ही थोडासाच बदल करून तो पुन्हा बाजारात आणला आणि हा बदल लोकांना आवडला. या वर्षी लोकांचा कल वजनाला हलक्या असणाऱ्या दागिन्यांकडे आहे. सोन्या-चांदीच्या मार्केटमध्ये आता दोन प्रकारचे सीजन झाले आहेत.

एक म्हणजे आयुष्यातील महत्त्वाच्या वेळी केली जाणारी खरेदी. यामध्ये अर्थातच लग्न समारंभ आलाच. अशा वेळी मोठय़ा प्रमाणात पारंपरिक, वजनाने जड आणि किंमतही जास्त असलेल्या दागिन्यांची खरेदी होते. याखेरीज लग्नाचा पन्नासावा वाढदिवस, दुसऱ्या देशात शिकायला जाणं, लग्नानंतरचा पहिला सण अशा वेळीही सोन्या-चांदीची खरेदी करतात. बाकीच्या वेळी काही खास कारण नसतानाही खरेदी केली जाते. त्यात ग्राहकांचा कल पूर्णपणे वजनाने हलक्या आणि किमतीनेही कमी असणाऱ्या दागिन्यांकडे असतो. हजारो रुपयांचा मोठा हार घेऊन तो नुसता लॉकरमध्येच ठेवायचा तर काय फायदा, असा विचार लोक करतात. आणि त्यामुळेच लोकांचा कल वजनाला हलक्या असणाऱ्या दागिन्यांकडे असतो. परंतु तरीही मंगळसूत्राच्या ट्रेण्डमध्ये लोकांचा कल गेल्या काही महिन्यांपासून हेवी मंगळसूत्राकडे आहे. यामागे कदाचित टीव्ही सीरियल, सिनेमे यांचा प्रभाव असावा.

रोज घालता येईल अशा वजनाने हलक्या दागिन्यांमध्ये यामध्ये पेंण्डट, ब्रेसलेट्स, अंगठय़ा, कानातले अशा गोष्टी खूप विकल्या जातात.

आताच्या तरुणांनाही दागिने घालायला आवडतं, पण त्यातही त्यांना काही तरी नवीन हवं असतंच. आताची पिढी मिक्स अ‍ॅण्ड मॅच, फ्यूजन काय करता येईल, घालता येईल हे बघते. याबद्दल आदित्य पेठे सांगतात, ‘तरुण पिढीला मिक्स अ‍ॅण्ड मॅच केलेले दागिने खूप आवडतात. आपल्याकडचा खास दागिना, पायातलं पंजण दोन्ही पायांत घालतात, पण अँकलेट एकाच पायात घालतात. पूर्वी बाजूबंद पारंपरिक पेहरावावर घातला जात होता, पण तोही आताची तरुण पिढी वेस्टर्न कपडय़ांवरही घालते, फक्त त्यांना डिझाईन मात्र नाजूक हवं असतं. स्टेटमेट दागिन्यांकडे तरुणाईचा कल आहे, त्यांना एका वेळी जास्त दागिने घालायला आवडत नाही. त्यामुळे एखादं पेंण्डट, बाजूबंद, ब्रेसलेट असं घातलं जातं. टिपिकल डिझाइन असलेले दागिने खरं तर मोठय़ा प्रमाणावर विकले जात नाहीत. छोटय़ा डिझायनर अंगठय़ा, नोज पिन्स, बिंदी अशा रोज वापरता येतील, पार्टी वगैरेलाही घालता येतील अशा गोष्टी नेहमीच ट्रेण्डमध्ये असतात. आणि त्यामुळे ग्राहकांना काही महिन्यांतच नवनवीन डिझाइन बघायला मिळतात.’

यंदा वजनाने हलक्या दागिन्यांचाच ट्रेण्ड आहे असं मत पी.एन.जी. ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ व्यक्त करतात. ‘या वर्षांच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांचा सोने-चांदी विकत घेण्याकडे चांगला कल आहे. तरुणांमध्येही सोने-चांदी यामध्ये गुंतवणूक आणि खरेदी याकडे ओढ आहे. ग्राहकांचा कल हा वजनाला हलक्या असलेल्या दागिन्यांसोबतच डिझायनर दागिन्यांकडे आहे. लोकांना कोणत्याही कार्यक्रमांना सहज वापरता येतील अशी डिझाइन्स हवी असतात. नेकपीसमध्ये फिलिगिरी वर्क, ओरिगामी वर्क, टेम्पल दागिने सगळ्यात जास्त ट्रेण्डमध्ये आहेत. आता मिक्स अ‍ॅण्ड मॅचचा जमाना आहे. त्यामुळे एखाद्या दागिन्याच्या डिझाइनमध्ये तुम्हाला अनेक कलाकुसर एकत्रित सापडतील. आकर्षक आणि वजनाने हलके दागिनेच आणखी काही काळ तरी ट्रेण्डमध्ये राहणार आहेत. सणाला, लग्नाला आणि आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी हेवीवेट दागिनेच लोक घेतात.’ दसरा झाला की दिवाळी हा मोठा सण येतो आणि दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त असतात. अशा वेळी लोक मोठी खरेदी करतात. यासाठी खास लोक दागिने स्वत डिझाइनही करून घ्यायला तयार असतात असं ते सांगतात. ‘कपडय़ांना मॅचिंग असेही दागिने लोक सध्या घेत आहेत. फक्त काही कार्यक्रमांसाठीच दागिने मर्यादित राहिलेले नाहीत. वर्षभर वापरता येतील असे दागिने लोक घेत आहेत. सध्या चांदीचे अँकलेट्स ट्रेण्डमध्ये आहेत. कारण सोन्याचे अँकलेट्स आपल्याकडे वापरात नाहीत. यासोबतच जुन्या प्रकारचे हार पुन्हा फॅशनमध्ये आलेले आहेत. लोक वाकी, बाजूबंद हे दागिने पुन्हा वापरू लागले आहेत. दागिन्यांमध्ये डिझाइनचं महत्त्व वाढलेलं आहे. लोक कस्टमाइज दागिने तयार करून घ्यायलाही तयार आहेत.’

सोन्या-चांदीप्रमाणे हिऱ्यांनाही तेवढंच महत्त्व आलं आहे. सोन्या-चांदीपेक्षाही हिऱ्यांच्या दागिन्यांकडे लोक जास्त वळत आहेत. खरं तर हिऱ्यांच्या दागिन्यांमध्येच स्त्री-पुरुष दोघांसाठी सहज डिझाइन उपलब्ध असतात. लोकांचा हिऱ्यांच्या दागिन्यांकडचा कल बघून अनेक मोठे ज्वेलर्सही हिऱ्यांचे दागिने तयार करायला लागले आहेत. याबद्दल तनिष्क ज्वेलर्सकडून सोनं आणि हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये काय ट्रेण्डिंग आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. यंदाच्या वर्षांत लोकांचा कल नैसर्गिक दिसण्याकडे आहे.  पारंपरिक डिझाइन उदारणार्थ रेड स्टोन किंवा डायमंड, टेम्पल डिझाइन, वेगवेगळ्या हेरिटेज आर्किटेक्चर आकार असलेले डिझाइन कानातले, बांगडय़ा आणि नेकपीस ट्रेडिंग आहेत. हे दागिने साडी, लेहेंगा, पतियाला अशा कोणत्याही कपडय़ांवर सुंदर दिसतात. आताच्या स्त्रीला पारंपरिक आणि मॉर्डन असं फ्यूजन असलेले पण भारतीय दिसणारे दागिने आवडतात. या वर्षी फ्लोरल डिझाइनलाही मागणी आहे. फ्लोरल डिझाइन असलेल्या बांगडय़ा, कानातले, अंगठय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. हिऱ्यांच्या दागिन्यांकडे लोकांची ओढ पाहून सराफही हिऱ्यांचे दागिने बनवू लागले आहेत असं आदित्य पेठे सांगतात. त्यांच्या मते, ‘‘बाजारात इतर कोणतेही धातू आले तरी सोन्याची खरेदी होणारच. पण इतर धातूंनाही तेवढं महत्त्व आलेलं आहे, म्हणूनच आम्ही एझारा हा नवीन ब्रॅण्ड सुरू केला आहे. याअंतर्गत आम्ही चांदी आणि फॅशनमध्ये असलेले धातू, हिरे यांचं फ्यूजन केलेलं आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये ब्रेसलेट, कानातले, नोज रिंग, अंगठय़ा हे ट्रेण्डमध्ये आहेत. सोबतच ५०-५० ग्रॅम्सचे हिरे, सिंगल कॅरेटचा हिरा ट्रेण्डमध्ये आहे. याची किंमत जास्त असली तरीही हे दागिने तुम्ही रोज घालू शकता.’’ हिऱ्यांच्या दागिन्यांबद्दल गाडगीळ सांगतात ‘‘हिऱ्यांच्या दागिन्यांची बाजारपेठ मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. रोजच्या वापरातील दागिन्यांसाठीच यांचा वापर होतो, ब्रायडल दागिने, हिऱ्यांचे दागिने रोज वापरले जात नाहीत. पार्टीवेअर, इव्हिनिंग वेअर वर घालण्यासाठी डिझायनर अंगठय़ा, नाजूक कानातले, पेंडटला जास्त मागणी आहे. हिरे आणि व्हाइट गोल्ड, माणिक, पाचू यांचं कॉम्बिनेशन खूप ट्रेडिंगमध्ये आहेत. मंगळसूत्राच्या वाटय़ाही लोक आता हिऱ्यांमध्ये करून घेऊ लागले आहेत. नथ पूर्वी नवग्रहांची असायची पण आता तिथेही लोक हिऱ्यांना पसंती देत आहेत.’’

एकंदरीत आपल्या बदललेल्या जीवनशैलीप्रमाणे सोनं, चांदी आणि हिऱ्यांसारखे मौल्यवान धातूही आपला आकार, लुक बदलत आहेत.

वेगवेगळ्या धातूंना पसंती

भारतीयांची सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आवड कधीच कमी होणार नाही. पण या सोबतच प्लॅटिनमचे दागिनेही ट्रेण्डमध्ये आहेत. प्लॅटिनम दागिन्यांमध्ये वेिडग बॅण्डस, कडे, अंगठय़ा, नेकपीस, बांगडय़ा ट्रेण्डमध्ये आहेत. भेट देण्याकरिता, प्री वेडिंग गिफ्ट्स म्हणून प्लॅटिनमची खरेदी केली जाते. प्लॅटिनम धातू, पाचू आणि माणिक, वेगवेळ्या रंगाचे हिरे हे कॉम्बिनेशन मोठय़ा प्रमाणात दिसून येते. प्लॅटिनमप्रमाणे मोत्याचे, वुडन बीड्सचे, मानवी आकाराचे पॅचेस असलेले, ऑक्सिडाइज्ड, वेगवेगळ्या नैसर्गिक खडय़ांचे दागिनेही बाजारात आहे. असे दागिनेही वेगवेगळ्या सणांना, पार्टीत घालतात. ते रोजच्या वापरातही असतात. यामध्ये मुखत्वे स्टेटमेंट नेकपीस, कानातले, कपल अंगठय़ा, अँकलेटस, ब्रेसलेट ट्रेण्डिंग आहेत.

response.lokprabha@expressindia.com

First Published on October 12, 2018 1:14 am

Web Title: article about trend jewelry