15 December 2019

News Flash

दसरा विशेष : सोन्याचा सोस

भारतात दागिन्यांकडे हौसमौजेबरोबरच अडीनडीला हमखास उपयोगी पडणारा घटक या दृष्टीनेदेखील पाहिले जाते.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

दसरा-दिवाळीसारखे सण म्हणजे आपल्यासाठी शब्दश: ‘सुवर्ण’संधीच.. पण जागतिक सुवर्ण परिषदेने अलीकडेच सोन्याच्या उलाढालीसंदर्भातला या वर्षीचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार आपण सोने खरेदीत आघाडीवर असलो तरी त्यात फार वाढ होताना दिसत नाही.

भारतीयांसाठी सोनं खरेदी म्हणजे अगदी पर्वणीच. कधी मुहूर्ताची खरेदी म्हणून, सणासुदीला मिरवण्यासाठी, तर कधी लग्नसमारंभासाठी असं सतत काही ना काही कारणाने भारतीय ग्राहक सोन्याची खरेदी करतच असतो. अर्थातच सोन्याच्या मागणीमध्ये भारत पहिल्या क्रमांकाचा ग्राहक आहे, तर चीन दुसऱ्या क्रमांकावर. भारतीयांच्या सोने खरेदीमागे एक महत्त्वाचा पलू असतो तो म्हणजे गुंतवणूक. पण त्याची ही गुंतवणूक चोख सोन्यापेक्षा दागिन्यांमध्येच अधिक असते. त्यामुळेच जगातील दागिन्यांच्या एकूण मागणीच्या एक चतुर्थाश दागिने भारतात तयार होतात. २०१७ मध्ये जगभरात २१८२.१० टन सोन्याच्या दागिन्यांची उलाढाल झाली होती. तर त्याच काळात भारतात ५९४.१० टन दागिन्यांची उलाढाल झाली होती. भारतात दागिन्यांकडे हौसमौजेबरोबरच अडीनडीला हमखास उपयोगी पडणारा घटक या दृष्टीनेदेखील पाहिले जाते. तर काही वेळा केवळ गुंतवणूक म्हणूनदेखील सोने खरेदीकडे भारतीयांचा कल राहिला आहे. पण त्याला निमित्त असते ते मुख्यत: साडेतीन मुहूर्ताचे. दसरा आणि दिवाळी या दोन्ही सणांच्या निमित्ताने सोने बाजार ग्राहकांकडे मोठय़ा अपेक्षेने पाहत असतो. जगभरातील सोन्याच्या व्यवहाराचे विश्लेषण करणारा अहवाल जागतिक सुवर्ण परिषद दर वर्षी प्रसिद्ध करत असते. या वर्षीचा अहवालही परिषदेने गेल्या महिन्यात जाहीर केला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या अहवालातील काही महत्त्वाच्या आकडेवारीचा आढावा घेणे इष्ट ठरेल.

एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत जगभरात ५१०.३० टन सोन्याची उलाढाल झाली आहे. मागील वर्षी याच काळातील उलाढालीपेक्षा ही उलाढाल दोन टक्क्यांनी कमी आहे (५१९.४ टन). तर भारताने २०१८ दुसऱ्या तिमाहीत १४७.९ टन सोने वापरले, ते मागील वर्षी याच काळातील वापरापेक्षा आठ टक्क्यांनी कमी आहे (१६१ टन).  दागिन्यांच्या वापराबाबत तर भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पण गेल्या सात वर्षांचा विचार केल्यास ही मागणी थोडी कमी झाली असली तरी २०१६ पेक्षा २०१७ च्या मागणीत १८ टक्क्यांची वाढ दिसून येते. २०१० साली भारतात ६६१.७०  टन सोने दागिन्यांसाठी वापरले गेले, तर २०१६ मध्ये ५०४.५  टन (हा सात वर्षांतील सर्वात कमी आकडा आहे), तर २०१७ मध्ये यात १८ टक्क्यांची वाढ होऊन ५९४.१० टक्के सोने दागिन्यांसाठी वापरण्यात आले.

पण याच वेळी देशात केवळ गुंतवणुकीसाठी म्हणून गोल्ड बार आणि नाणी वापरण्याचे प्रमाण गेल्या सात वर्षांत निम्म्यावर आले आहे. २०१० मध्ये ३४०.१  टनाची उलाढाल गोल्ड बार आणि नाण्यांमध्ये झाली होती, २०१५ मध्ये ती प्रथमच दोनशे टनांच्या खाली म्हणजे १९४.१० टन झाली, तर  २०१६ मध्ये १६१.६ टनावर येऊन २०१७ मध्ये त्यात पाच टक्के वाढ होऊन १६९.३ टन इतकी उलाढाल झाली. गोल्ड बार आणि नाणी यामध्ये या वर्षी दुसऱ्या तिमाहीतील गुंतवणूक (६२.६ टन) मागील वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा (६९.५ टन) सात टनाने वाढली आहे.

सोने हे आभूषण म्हणून आणि गरज पडली तर गुंतवणूक अशी भारतीयांची मानसिकता असल्यामुळे दागिन्यांच्या मागणीत सातत्य असले तरी आपल्याकडे गोल्ड बॅक्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेड फंड) सारख्या गुंतवणुकीला मात्र प्रतिसाद नसतो. मागच्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत याचे प्रमाण ६२.५ टन होते, ते या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत निम्म्यापर्यंत घसरून ३३.८ टनावर आले आहे.

थोडक्यात सोन्याच्या वापराबाबत आपण आजही आघाडीवर असलो तरी त्यामध्ये फार मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसत नाही. साधारण २०१४-१५ मध्ये यात काही प्रमाणात घटच झाली आहे. मात्र गुंतवणूक म्हणून चोख सोन्याच्या व्यवहारात बराच फरक पडला आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर सोने व्यापारी याकडे कसे पाहतात, आणि येणाऱ्या सणांच्या तोंडावर सोने बाजार कसा असेल हे पाहणे गरजेचे ठरेल. ‘जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी फेडरेशन’ या भारतातील संघटनेचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल सांगतात की, सध्या बाजाराला गिऱ्हाईकांची अपेक्षा आहे. सरकारने शेतमालाला किमान दर जाहीर केले असले तरी यंदाच्या सुगीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या खिशात पसे आले तरच बाजाराला चालना मिळेल. व्यापाऱ्यांनी उत्पादकांकडून दागिने खरेदी मोठय़ा प्रमाणावर केली आहे. पण त्यांच्या शेवटच्या ग्राहकाकडे पसे नसतील तर तो बाजाराकडे फिरकणार नाही. शेतमालाला योग्य भाव, तसेच बोनस आदी प्रक्रियेतून सर्वसामान्यांकडे पसे आले नाहीत तर सोने खरेदीला फटका बसू शकतो. मुहूर्ताच्या सोने खरेदीचा कल फारसा बदलण्याची चिन्हं नसतात. ती खरेदी होतच असते. पण त्यातून फार मोठी उलाढाल होत नाही असे खंडेलवाल करतात. त्याचबरोबर गेल्या वर्षीपासून आकारण्यात येणारा जीएसटी आता बाजारपेठेच्या पचनी पडला आहे. पण बाजाराला चालना मिळण्यासाठी सर्वसामान्यांकडे पसा येणे गरजेचे असल्याचे खंडेलवाल सांगतात. अन्यथा उत्पादकांची देणी फेडणे व्यापाऱ्यांना शक्य होणार नाही आणि बाजाराला एक प्रकारे खीळ बसेल.

भारतीयांच्या सोन्याच्या सोसामुळे आपल्याकडे प्रचंड मोठय़ा प्रमाणात सोने गुंतून पडते आणि दरवर्षी मोठय़ा प्रमाणात सोने आयात करावे लागते. हे गुंतून पडलेले सोने वापरात यावे यासाठी मॉनिटायझेशन योजना सरकारने जाहीर केली होती. पण नितीन खंडेलवाल सांगतात की, त्यांनी जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी फेडरेशनतर्फे या योजनेत व्यापाऱ्यांना सामील करून घेण्याची सूचना सरकारला केली होती. पण सरकारने त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. परिणामी या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे ते नमूद करतात. त्याबद्दलदेखील सरकारने योग्य ती पावले उचलली तर आपली सोने आयात कमी होईल असा विश्वास खंडेलवाल व्यक्त करतात.

विश्व सुवर्ण परिषदेचा अहवाल आणि बाजारातील सद्य:स्थितीचे हे चित्रण आहे. सोन्याच्या या एकंदरीत परिस्थितीबद्दल विश्लेषण करताना अर्थतज्ज्ञ मंगेश सोमण सांगतात, ‘भारतातील सोन्याची मागणी कमी होणे, हा एक दीर्घकालीन प्रवाह आहे. त्यामागे वाढती आíथक साक्षरता, इतर गुंतवणूक साधनांचा प्रसार, सरकारकडून सोन्याच्या खरेदीदारांमधली पारदर्शकता वाढवण्यासाठी उचलली गेलेली पावले- जसे पॅन कार्डाची आवश्यकता, हे सारे घटक आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा कल स्वागतार्ह आहे.’

सध्या देशातील बाजारपेठांची परिस्थिती नाजूक आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगलीच घसरण झालेली आहे. त्याच वेळी जागतिक बाजारात व्यापार युद्धाचे सावटदेखील आहे. या परिस्थितीत सोन्याच्या बाजाराची परिस्थिती नेमकी कशी असेल आणि सर्वसामान्यांनी सोन्याकडे गुंतवणूक म्हणून कसे पाहावे याचे विश्लेषण या प्रसंगी गरजेचे ठरते. यासंदर्भात मंगेश सोमण सांगतात, ‘जागतिक वित्तीय बाजारांमध्ये जोखमीचे घटक वाढले की काही गुंतवणूकदार सुरक्षिततेच्या शोधात सोन्याकडे वळतात आणि सोन्याच्या किमती वाढतात, असा सर्वसाधारण ठोकताळा आहे. अलीकडच्या काळात मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमती नरमलेल्या आहेत आणि ते गृहितक सध्या लागू पडत नाहीये. डॉलर वेगाने वधारणे, हे त्याचे कारण असू शकेल. अशा परिस्थितीत आगामी काळात सोन्याच्या किमती वाढतीलच, अशी खात्री देता येणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्याच्या बाबतीत सावध राहणेच योग्य ठरेल. इतर गुंतवणूक साधने वापरल्यानंतर एकंदर पोर्टफोलिओच्या पाच ते दहा टक्के रक्कम सोन्याच्या बॉण्डमध्ये गुंतवायला हरकत नाही. पण त्याहून मोठी गुंतवणूक सोन्यामध्ये करणे धोक्याचे ठरू शकेल.’

सोन्यामध्ये मोठय़ा गुंतवणुकीबाबत तसेही आपण फारसे प्रसिद्ध नाही आहोत. पण एकंदरीत आपल्याकडील कल पाहिल्यास सणासुदीचा काळ आणि लग्नसराई आली की आपल्याकडे सोन्याच्या मागणीत वाढ होतेच. तशी वाढ येत्या तिमाहीत होईल का हे या सणासुदीच्या काळात पाहणे महत्त्वाचे ठरेल.

response.lokprabha@expressindia.com

First Published on October 12, 2018 1:12 am

Web Title: article about while buying gold
Just Now!
X