12 July 2020

News Flash

२०१६ कसे जाईल?

गुरू त्याच्या परममित्राबरोबर म्हणजेच चंद्राबरोबर सूर्याची रास असलेल्या सिंहामध्ये असेल.

२०१५ प्रमाणेच नव्या वर्षांतही बऱ्या-वाईट घडामोडींचं चक्र सुरू राहील का? राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर राजकीय बदल दिसून येतील का? नेमकं कसं असेल २०१६? अशा अनेक प्रश्नांतून नवीन वर्षांत काय दडलंय सांगणारा हा लेख.

वर्षांच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर २०१५ या दिवशी मुठीतली वाळू घरंगळत जाते तसा तो दिवस घरंगळत जाईल आणि ते वर्ष संपेल. कॅलेंडर बदलेल आणि आपल्या सगळ्यांसमोर येईल, एक नवं वर्ष. आणखी एक नवं वर्ष. घडय़ाळाचे काटे २०१६ या वर्षांत पदार्पण करतील. आकाशातील ग्रहताऱ्यांच्या स्थितीनुसार असं असेल पुढचं वर्ष..
गुरू त्याच्या परममित्राबरोबर म्हणजेच चंद्राबरोबर सूर्याची रास असलेल्या सिंहामध्ये असेल. हा गुरूचा चांदी योग आहे. तर राहू त्याचा मित्र असलेल्या बुधाच्या राशीत कन्येबरोबर असेल. मंगळ शुक्राच्या राशीत तुळेबरोबर असेल तर शनी त्याचा कट्टर शत्रू असलेल्या मंगळाच्या गृही म्हणजेच वृश्चिकाचा मित्र शुक्राबरोबर असेल. सूर्य गुरुगृही धनूमध्ये असेल तर बुध त्याची मित्ररास असलेल्या शनीच्या गृही मकरेमध्ये तर केतू गुरूमध्ये मीनबरोबर असेल.
या सगळ्यामुळे वर्षांची सुरुवात सुखद होईल.
वर्षांची सुरुवात तरी चांगली होईल असं ग्रहस्थितीवरून दिसतं आहे, पण जसजसे दिवस जातील तसतशी परिस्थिती बदलत जाईल. ८ एप्रिल २०१६ पर्यंत असणाऱ्या संवत २०७२ चा राजा शनी आणि मंत्री मंगळ आहेत. या संवत्सराचं नाव आहे कीलक. नफेबाजी, दरवाढ आणि काही राजकारण्यांचा मिळणारा फायदा याबरोबरच हे संवत्सर रोगराई, शोक, अस्वस्थता यासाठी तसेच नव्या सुधारणांमुळे वाढणारा खर्च, दहशतवादामुळे बदलणारी राजकीय गणितं या सगळ्यासाठी ओळखलं जाईल. ८ एप्रिल २०१६ पासून शुक्र राजा आणि बुध मंत्री असलेल्या सौम्य मानाच्या २०७३ या संवत्सराची सुरुवात होत आहे. पण शुक्रवार २२ एप्रिल २०१६ ७/१९ ला म्हणजेच चत्र शुक्ल १५ ला साधारण संवत्सराचा प्रवेश होईल. त्याचा प्रमुख सूर्य असेल.
या संवत्सराचा राजा असलेल्या शुक्राशी संबंधित व्यापारामध्ये वाढ होईल. तर बुध मंत्री असल्यामुळे नोकरशाहीचं अप्रत्यक्ष नियंत्रण वाढेल. विरोधक तसेच शत्रूंना दाबून टाकण्यासाठी नवनव्या योजना तयार केल्या जातील. विरोधकांना त्रास दिला जाईल. बौद्धिक क्षमता तसेच वाणीशी संबंधित क्षेत्रांचा विकास होईल. मूठभर लोक चन करतील तर उर्वरित जनता तोडक्यामोडक्या साधनसामग्रीतून कसाबसा चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न करेल.
शनिच्या सस्येश पुर्वधान्येशमुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण होईल. युद्धे होतील. दहशतवादी कारवाया डोकं वर काढतील. सरकारी पातळीवर मोठे घोटाळे होतील. लोकांच्या पशांचा मोठय़ा प्रमाणावर दुरुपयोग होईल. शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची सरकारची इच्छा जरूर असेल पण प्रत्यक्षात सरकार काही करण्यात अपयशी ठरेल. नवनवे कर जनतेचं कंबरडं मोडतील. सामाजिक पातळीवर वेगवेगळे वाद होतील, आंदोलनं होतील. अन्नधान्याची नासाडी होईल. रोगराईच्या साथी येतील.
गुरू पश्चिम धान्येशमध्ये असल्यामुळे शुभ समारंभ, मंगलकार्याचं प्रमाण वाढेल. धनधान्यांचं उत्पादन वाढेल.
राजकुमार बुध मेघेशमध्ये असल्यामुळे मंगल उत्सव तसेच आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये वाढ होईल. साहित्यिक तसेच ज्योतिषांचं महत्त्व वाढेल. आधी अवृष्टी आणि मग अतिवृष्टी यामुळे जनतेच्या त्रासात भर पडेल.
रसेशमध्ये असलेल्या चंद्रामुळे भोगविलास तसेच पर्यटनामध्ये वाढ होईल. रसदार पदार्थाचे उत्पन्न वाढेल. गूळ, साखर, तेल यांचे दर कमी होऊ शकतात. सुगंधी द्रव्यांच्या व्यापारात चांगली वाढ होईल.
सूर्यपुत्र शनी निरसेश असल्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तूंबरोबरच स्टील, लोखंड, टीन, जस्त, शिसं, चामडं महाग होईल.
मंगल फलेश असल्यामुळे जीवितहानी, लाल रंगाच्या फळांचं कमी उत्पादन, रोगराईचा त्रास संभवतो.
शनी धनेश असल्यामुळे बाजारातून पसा जणू काही नाहीसा होईल. समाजातला अभिजात आणि समृद्ध असलेला वर्ग अनेक गोष्टींमुळे त्रासलेला असेल. पशाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी बिकट होतील. पशाच्या अभावी व्यापारी हवालदिल होतील. पशाअभावी बडे लोक संकटात येतील.
बुध दुग्रेश असल्यामुळे राज्य आणि राष्ट्र यांच्यामधले संबंध तणावाचे, कटकटीचे असतील.
या वर्षी राजकीय गोंधळ वाढतील, अशी शक्यता आहे. सरकार अनेक नवनव्या सुधारणा जाहीर करेल, पण त्या निदान या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये तरी प्रत्यक्षात येताना दिसणार नाहीत. हे वर्ष राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच दिलेली आश्वासनं कशी विसरली जातात याचं उदाहरण ठरेल. या वर्षी वेगवेगळ्या आंदोलनांचा जोर वाढेल. सत्ताधारी घोषणाबाजीचा नको इतका कहर करतील. वादग्रस्त विधानं करण्यात अतिशय खालची पातळी गाठली जाईल. त्यामुळे वाद वाढतील. केंद्रातलं भाजप सरकार आणि राज्यांमधली भाजपेतर सरकारं यांच्यामध्ये वाढता संघर्ष असेल. केंद्र सरकारच्या आडमुठय़ा भूमिकांमुळे विरोधी पक्ष अधिक आक्रमक होईल. सरकारविरोधी वातावरण असेल. या वर्षभरात राजकीय पातळीवर अनेक चुका होतील. सरकारी तिजोरी भरण्यासाठी सरकार जी पावलं उचलेल, त्यामुळे सामान्य जनतेवरचा बोजा वाढेल. मोठमोठी आश्वासनं दिली जातील, पण त्यातून लोकांच्या हातात निदान या वर्षी तरी काहीच पडणार नाही. मोठे नेते किंवा बडय़ा व्यक्तींच्या मृत्यूची या वर्षी शक्यता आहे. मंगळात असलेल्या शनीमुळे राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये िहसाचाराची शक्यता आहे. राजकीय संधिसाधूपणाचं या वर्षी उघडंवागडं दर्शन होईल. या वर्षीही मोठय़ा नेत्यांना कोणतेही मानसन्मान मिळणार नाहीत. समाजामध्ये मोठय़ा नेत्यांचा नाही तर उपटसुंभ नेत्यांचा दबदबा वाढेल.
पाश्चात्य देश तसेच पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, इराण, सीरिया इत्यादी मुस्लीम देशांमध्ये दहशतवादाचं भयंकर स्वरूप अनुभवाला येईल. या देशांमध्ये या संपूर्ण वर्षभर मोठय़ा जीवितहानीची शक्यता दिसते आहे. विकसित देशांचा हेकेखोरपणा वाढेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवाद वाढेल. विकसित देशांमध्ये स्वार्थासाठीचा संघर्ष वाढलेला दिसेल.
या वर्षीही नसíगक आपत्तींमुळे मोठं नुकसान संभवत आहे. भूकंप, त्सुनामी किंवा पुराचा धोका या वर्षीही दिसतो आहे. जमीन किंवा डोंगर भूस्खलनामुळे घरं कोसळल्याच्या, जमीनदोस्त झाल्याच्या घटना या वर्षीही घडतील. कुठे कुठे ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या घटना घडण्याचीही शक्यता आहे. या वर्षी पीक उत्तम येईल, पण कीड पडल्यामुळे, नीट साठवण न झाल्यामुळे खराब होऊन धान्याची नासाडी होण्याचेही संकेत मिळत आहेत.
आíथक पातळीवर हे वर्ष सगळ्यांसाठीच तणावपूर्ण असण्याची शक्यता आहे. बाजारपेठेत गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा पशाची मोठय़ा प्रमाणावर कमतरता जाणवेल. त्यामुळे एकुणातच पशाची आवक-जावक कमी असेल. पशाच्या अभावी कित्येक मोठय़ा योजना पुढे जाऊ शकणार नाहीत किंवा काही काळासाठी स्थगित होतील. घरबांधणी व्यवसायाला हे वर्ष भयंकर हलाखीचं जाईल. त्यामुळे हे वर्ष बिल्डरांसाठी फारसं चांगलं जाणार नाही. नवे प्रकल्प या वर्षी पूर्णत्वाला जाणार नाहीत. हे वर्ष बिल्डरांचा उरलासुरला घाम काढणारं ठरण्याची शक्यता आहे. त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळणार नाही. त्यामुळे बिल्डर वर्गात नाराजी, निराशा असेल. व्यापारी लोकांनाही हे वर्ष खडतर जाण्याची शक्यता आहे. भारतात गुंतवणुकीसाठी नवीन क्षेत्रं उपलब्ध होतील. गुंतवणुकीच्या क्षेत्रात थोडाफार फायदा मिळण्याची शक्यता दिसते आहे. आयात-निर्यातीत मात्र वाढ होण्याची शक्यता दिसते आहे. पण परदेशी चलनाबाबत गंभीर परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे बाजारपेठेत चिंतेचं वातावरण असेल. रुपयाच्या बाबतीत सतत नाटय़मय चढउतार होण्याच्या शक्यता आहेत. लग्नस्थान व्ययात असल्यामुळे खूप ठिकाणी दुष्काळ असेल तर पूर्वेकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता दिसते आहे. खरिपाचं पीक कमी असेल तर रब्बीचं पीक चांगलं येईल, पण नंतर नसíगक संकटं, कीड यामुळे त्या पिकाचं नुकसान संभवतं. व्यापारी हैराण असतील तर जनता त्रस्त असेल. बँकिंग क्षेत्रासाठी हे वर्ष एखाद्या दु:स्वप्नासारखं असेल. मोठमोठय़ा कॉर्पोरेट कंपन्या, उद्योग अडचणीत सापडलेले दिसतील. अर्थात विकसित देशांच्या तुलनेत भारताची स्थिती खूपच चांगली असेल.
शेअर बाजारासाठी हे वर्ष नाटय़मय असेल. काही शेअर घसरतील, पण कित्येक मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सचे दर चांगलेच चढतील अशी शक्यता स्पष्ट दिसते आहे. काही शेअर्सचे दर कित्येक पटींनी वाढतील. टेक्सटाइल, हॉटेल, पर्यटन, लाइट्स, अ‍ॅक्सेसरीज, एन्टरटेन्मेंट, डीटीएच या क्षेत्रांचे शेअर्स चढे राहतील. साखर तसेच ऊर्जेच्या क्षेत्रात शेअर्सचे दर खूप खाली जातील, पण ते नंतर पुढच्या काही वर्षांसाठी खूप वर जाण्याची शक्यता आहे. ऊर्जा क्षेत्रासाठी नवनव्या घोषणा केल्या जातील. जगभरात सगळीकडेच नवनवे ऊर्जास्रोत शोधले जातील. पाश्चात्य देश तेलावरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे त्या क्षेत्रातल्या नव्या व्यापाऱ्यांचा फायदा होईल. जुन्या व्यापाऱ्यांसाठी अस्तित्वाची लढाई लढणं अवघड होऊन बसेल.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यंदा सोन्याचे भाव जबरदस्त खाली उतरतील. सोन्याचे दर अक्षरश: जमीनदोस्त होऊन डॉलरच्या तुलनेत सगळ्यात तळाच्या पायरीवर येतील. पण भारतीय बाजारपेठेत रुपयाचे उतरते दर सोन्याला किरकोळ का होईना पण सहारा देतील. २०१६ च्या शेवटी किंवा २०१७ च्या सुरुवातीला सोन्याला तेजीचा थोडा आधार मिळेल खरा, पण चांगली गुंतवणूक या निकषामधून काही वर्षांसाठी तरी सोनं बाजूला जाणार आहे हे यापुढच्या काळातलं वास्तव आहे.

अरविंद केजरीवाल :
lp18दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म १६ ऑगस्ट १९६८ या दिवशी रात्री ११ वाजून २६ मिनिटांनी हरियाणातील हिसार या ठिकाणी झाला. ही माहिती बरोबर असेल तर त्यांची जन्मकुंडली पुढीलप्रमाणे आहे.
केजरीवाल यांची जन्मरास आणि लग्न हे दोन्ही वृषभ आहे. पराक्रम स्थानात असलेला मंगळ त्यांना अधिकाधिक पराक्रमी बनवत आहे. तर सूर्य स्वगृही असून सुखस्थानी बुध, गुरू आणि दैत्यगुरू शुक्रदेव यांच्यासमवेत आल्यामुळे एक महायुतीच तयार झाली आहे. पंचममध्ये केतू आणि एकादशमध्ये राहू गतिमान आहेत. सगळ्या ग्रहांच्या केतू आणि राहू यांचा मध्य आल्याने केजरीवाल यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पाचा योगही निर्माण होत आहे. सुखस्थानातील स्वगृही असणारा सूर्य केजरीवाल यांना प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमा मिळवून देतो.
या काळात केजरीवाल लाभेश गुरूची महादशा अनुभवत आहे. हा उत्तम काळ आहे. पण यांच्या कुंडलीमधील लाभेश गुरूचे स्थान आठवे आहे. त्यामुळे विरोधाभास आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व या दोन्ही गोष्टी हातात हात घालून येतात. गुरूमधील शुक्राच्या अंतर्दशेमुळे सुरुवातीला त्यांना सत्ता मिळाली; पण शनीच्या प्रत्यंतर दशेमुळे फक्त ४९ दिवसांमध्येच ती सत्ता गेली. त्यानंतर सूर्याच्या अंतर्दशेमुळे त्यांना पुन्हा सत्ता मिळाली.
१७ डिसेंबर २०१५ पासून यांच्या कुंडलीमध्ये गुरूच्या महादशेतील मित्र आणि पराक्रमी चंद्राच्या अंतर्दशेचा आरंभ होत आहे. केजरीवाल यांच्या आयुष्यातला हा मैलाचा दगड असेल. हा त्यांच्या आयुष्यातील उत्कृष्ट काळ म्हणून सिद्ध होईल. विरोधी आणि कारस्थानांवर मात करत केजरीवाल २०१६ मध्ये हिऱ्याप्रमाणे चमकतील. पण अष्टमेशच्या महादशेमुळे २०१६ मध्ये अरविंद केजरीवाल यांना आरोग्यसंबंधित गुप्त शत्रू किंवा त्याच्या कारस्थानांपासून सतर्क राहावं लागेल.
नरेंद्र मोदी
lp19पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७ डिसेंबर १९५० चा आहे. त्यांची जन्मवेळ दुपारी १२. जन्मस्थळ गुजरातमधलं मेहसाणा इथलं वडनगर. हे तपशील बरोबर असतील तर त्यांची कुंडली पुढीलप्रमाणे आहे-
मोदी यांच्या कुंडलीत लग्नात लग्नेश मंगळ, भाग्येश चंद्र, शनी कर्मस्थानी पराक्रमेश आणि सुखेश, शुक्रासोबत सप्तमेश आणि व्ययेश, पंचमस्थानी असलेला राहू शत्रू सूर्याच्या घरात, आणि स्वगृही एकादशात असणारा बुध, सूर्य आणि केतूसोबत विराजमान आहे.
स्वग्रही असणारा मंगळ त्यांना अतिशय साहसी, उत्साही, मेहनती आणि सक्रिय बनवत आहे. मंगळासोबतच भाग्येश चंद्र हातात हात घालून आलेले असल्यामुळे त्यांना विचारशीलता आणि मौलिकता प्रदान करत आहेत. पण मंगळ सहाव्या स्थानाचाही स्वामी असल्याने यांना जीवनात अनेकदा विरोधक आणि कारस्थानांचा सामना करावा लागेल. शनीची मूळ त्रिकोण रास कुंभ, केंद्रात आहे. दुसऱ्यांना त्रास देणारा ग्रह म्हणून शनीची ओळख आहे. पण यांच्या कुंडलीत शनी अत्यंत प्रभावशाली ग्रहाच्या रूपात स्वत:चं स्थान निश्चित करत आहे. ही स्थिती त्यांना हुशार, चतुर, बुद्धिवान, कूटनीती, योग आणि अध्यात्म यांची थोडी माहिती असल्यामुळे मुरब्बी राजकारण्याच्या रूपात प्रस्थापित करते. कर्माच्या स्थानी असलेला शनी लवकर हार न मानणाऱ्या राजनेता म्हणून त्यांची ओळख प्रस्थापित करत आहे. कर्मस्थानी असणाऱ्या शुक्राची युतीमुळे शक्तिशाली राजयोग यांच्या कुंडलीत निर्माण झाला आहे.
नरेंद्र मोदी यांना जानेवारी २०११ पासून भाग्येश चंद्राची महादशा सुरू आहे. हा काळ त्यांच्या जीवनातील सगळ्यात उत्कृष्ट काळ आहे. मात्र एप्रिल २०१५ पासून आरंभ शनीचे दृष्टीमुळे त्यांना असंख्य संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या बोलण्यातील कठोरपणा आणि निर्णयात दिसणाऱ्या अस्पष्टतेचा आभास कठीण परिस्थितींना जन्म देत आहे. अशा परिस्थितीमुळे एखाद्या चतुर व्यक्तीच्या षड्यंत्रांना ते बळी पडू शकतात. ग्रहयोग आंदोलन, टीकांना जन्म देऊन त्यांची मानहानी करण्याचाही प्रयत्न करू शकतो. असं असलं तरी स्वगृही असलेला मंगळ आणि भाग्येश चंद्र ही जोडी अशा कठीण प्रसंगांचा निश्चित सामना करेलच. पण यादरम्यान एखाद्या सहकाऱ्याच्या चुकीच्या योजनेमुळे किंवा एखाद्या चुकीमुळे त्यांच्यावर उत्तर देण्याची वेळ येईल. एखादी व्यक्ती किंवा काही व्यक्तींमार्फत संकटं निर्माण केली जातील. पण २२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत संकटं असली तरी त्यांना सुखाचा अनुभव घेता येईल. पण मोदींसाठी २०१६ हे वर्ष साधं-सोपं नसेल. २२ फेब्रुवारी २०१६ ते २० मार्च २०१६ या कालावधीत पंतप्रधान आणि त्यांच्या सल्लागारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता दिसून येईल. एखाद्या खास किंवा जुन्या मित्राच्या काही विचित्र कारस्थानांमुळे ते अस्वस्थ होऊ शकतात. २० मार्च २०१६ ते ७ मे २०१६ पर्यंतचा काळ भावनिकदृष्टय़ा चढ-उतारांचा असेल. ७ मे २०१६ ते १० जून २०१६ या काळात एका मोठय़ा संकटाची सुरुवात होईल. नरेंद्र मोदी सहजतेने या सगळ्याचा सामना करतील. १० जून २०१६ ते ६ सप्टेंबर २०१६ हा काळ कूटनीतींचा असेल. ६ सप्टेंबर ते २२ नोव्हेंबर २०१६ या काळात सल्लागार, मित्र, सहकारी किंवा नव्या सहकाऱ्याकडून लाभ होईल.
मित्रपरिवार आणि विरोधकांशी होणारे वाद झेलणे हे मोदींसमोरील २०१६ या वर्षांतील सर्वात मोठे आव्हान असेल. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. देश आणि जगातील अहिंसेचं वातावरण त्यांना अस्वस्थ करेल. त्यांना त्यांच्या आरोग्याबाबतही जागरूक राहावं लागेल. असं सगळं असूनही विचारक, सुधारक आणि नवी दृष्टी देणारा नेता अशी मोदींची प्रतिमा टिकून राहील.

अमित शहा :
lp20भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ या दिवशी दुपारी साधारण १२ च्या सुमारास मुंबईमध्ये झाला. हे तपशील बरोबर असतील तर त्यांची कुंडली पुढीलप्रमाणे आहे.
अमित शहा यांची रास मेष आणि लग्न धनू आहे. पराक्रमी शनी स्वगृही राहून कूटनीती आणि युक्त्यांमध्ये शहा यांना माहीर बनवत आहेत; त्याच वेळी केतू लग्नस्थानात बसून राजनैतिक बळही प्रदान करत आहे. दैत्य गुरू शुक्र भाग्यस्थानी राहून त्यांना ऐश्वर्य प्रदान करत आहे. तर सूर्य लाभस्थानी राहून कुलदीपक योग बनवत आहे. याचबरोबर मित्र बुधच्या उपस्थितीमुळे बुद्धादित्य या राजयोगाने सन्मानित करून गादीचा वारस बनवत आहे. याच योगामुळे त्यांना अनेकदा सरकारी आणि उच्च राजनैतिक पदे मिळाली आहेत.
पण, २ नोव्हेंबर २०१४ संध्याकाळपासून शहा यांना पुढील अडीच वर्षांत शनीच्या छोटय़ा संकटांना सामोरं जावं लागत आहे. धनेश आणि पराक्रमेश अशा शनीच्या संकटांमुळे शहा यांच्या करिअरवर दिल्ली आणि बिहारच्या निवडणुकांचा अतिशय वाईट परिणाम झाला आहे. २०१६ मध्ये ही परिस्थिती आणखी बिकट होईल. ६ डिसेंबर २०१५ या दिवशी अमित शहा यांच्या लग्नेश आणि सुखेश गुरूच्या महादशेची सुरुवात झाली आहे. पण, गुरू यांच्या कुंडलीत सहाव्या स्थानात असल्यामुळे त्यांचं नुकसान करत आहे त्याच वेळी त्यांच्या लोकप्रियतेवरही गंभीर परिणाम करत आहेत. येणाऱ्या काळात त्यांच्यातील लहानसहान कमतरता वाढवून दाखवल्या जातील आणि दाखवत त्यांच्यावरील विश्वासाला तडा जाऊ शकतो. त्यातूनच पक्षातील आणि पक्षाबाहेरील विरोधकांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे.

लालू यादव :
lp21बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता पक्षाचे सुप्रीमो लालू यादव यांचा जन्म ११ जून १९४७ या दिवशी दुपारी १२ वाजता बिहारच्या गोपालगंज येथे झाला. हे तपशील बरोबर असतील तर त्यांची कुंडली पुढीलप्रमाणे आहे.
लालू यादव यांची रास कुंभ आणि लग्न सिंह आहे. स्वगृही असलेला मंगळ यांना भाग्यवान बनवत आहे तर कर्मस्थानातील राहूची उपस्थिती त्यांना राजकारणातील उत्तम खेळाडू बनवत आहे. दहाव्या स्थानातील सूर्याची उपस्थिती त्यांना कुलदीपक योग प्रदान करत असून ते त्यांच्या कुळाचं नाव मोठे करणारे आहेत. त्यासह शुक्राची उपस्थिती एक उत्तम योग निर्माण करत आहे. पण, सहाव्या स्थानाचा मालक असणारा शनीची व्यय स्थानी असणारी उपस्थिती यांचं आयुष्य कष्टदायी करणारी आहे. या काळात ते कर्मेश आणि पराक्रमी शुक्राच्या महादशेत२८ ऑगस्ट २०१५ पासून असलेली राहूची अंतर्दशा अनुभवत आहेत. हा काळ त्यांच्यासाठी फलदायी आहे. २०१६ हा ग्रहयोग विरोधकांना त्रास देत त्यांची राजनैतिक महत्त्व अधोरेखित करेल. वर्षांच्या मध्यावर त्यांना त्यांच्याच पक्षातील किंवा युतीतील काही बारीकसारीक तणावांना सामोरे जावे लागेल. पण, राजकारणात मुरलेले लालू यादव या सगळ्याचा सामना शिताफीने करतील.

नितीश कुमार :
lp22बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जन्म १ मार्च १९५१ चा आहे. त्यांची जन्मवेळ दुपारी १ वाजून २० मिनिटे. जन्मस्थळ बिहारमधील भक्तीअरपूर. हे तपशील बरोबर असतील तर त्यांची कुंडली पुढीलप्रमाणे आहे.
नितीश कुमार यांची रास वृश्चिक आणि लग्न मिथुन आहे. कर्मस्थानी असलेल्या मंगळामुळे त्यांना कुलदीपक योगाने सन्मानित केलं जातंय; तर शुक्रच्या उपस्थितीमुळे राजयोग प्राप्त होत आहे. भाग्यस्थानात गुरूची उपस्थिती त्यांना प्रबळ भाग्याचा स्वामी बनवत आहे तर सूर्य आणि बुध यांची युती बुद्धादित्य हा राजयोग निर्माण करून त्यांना मुख्यमंत्रिपद प्रदान करत आहे. नितीश कुमार या काळात शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या चरणात आहेत. भाग्येश शनीच्या साडेसातीचा मध्य त्यांचा प्रभाव वाढण्यास कारणीभूत ठरला आहे. नितीश सध्या भाग्यस्थानी असलेल्या राहूच्या महादशेमधील गुरूची अंतर्दशा अनुभवत आहेत. हा मध्यमरूपी उत्तम काळ आहे. २५ फेब्रुवारी २०१६ पासून सुरू होणारे चंद्राचे प्रत्यंतर त्यांच्या प्रभावात वृद्धी होऊन राजकारणातील विरोधकांची चिंता वाढवेल. तसंच त्यांची प्रतिमा उंचावेल. येणाऱ्या वर्षांत ते विरोधी पक्षाच्या एकतेचे प्रणेते होऊ शकतात. १० ऑगस्टपासून सुरू होणारी राहूची प्रत्यंतर दशा त्यांना ताणतणावामुळे अस्वस्थ करेल.
आनंद जोहरी -response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 2:20 am

Web Title: astrology predictions of 2016
टॅग Astrology,Horoscope
Next Stories
1 टॅरो वार्षिक भविष्य २०१६
2 परिक्रमा कर्दळीवनाची
3 श्रीदत्त संप्रदायातील परंपरा
Just Now!
X