11 December 2017

News Flash

इतरांचं स्वातंत्र्यही तेवढंच महत्त्वाचं

आपल्या जीवनातल्या कृती, विचार, बोलणं त्यावर आपलं नियंत्रण असणं म्हणजे स्वातंत्र्य.

डॉ. हेमचंद्र प्रधान | Updated: August 11, 2017 10:12 PM

डॉ. हेमचंद्र प्रधान

मी स्वातंत्र्य या कल्पनेकडे बघतो ते वैज्ञानिकाच्या नजरेतून. वैज्ञानिकाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद. मला बुद्धीनिष्ठ पुरावे आणि युक्तिवाद याशिवाय दुसरं काही प्रमाण घेताच येणार नाही. स्वातंत्र्याची चर्चा करताना त्याचा ऐहिक जीवनावर कसा परिणाम होतो याचाच विचार होणार आहे. स्वातंत्र्याची संकल्पना आपण नेहमी सामाजिक, राजकीय अंगाने विचारात घेतो, ऐहिक अंगाने विचारात घेत नाही.

आपल्या जीवनातल्या कृती, विचार, बोलणं त्यावर आपलं नियंत्रण असणं म्हणजे स्वातंत्र्य. याचा विचार आपण व्यक्ती तसंच समष्टी अशा दोन स्तरांवर करू शकतो. समष्टी म्हणजे राष्ट्र स्तरावर आपण स्वातंत्र्य या संकल्पनेचा विचार प्रथम करू. राष्ट्र ही कल्पना नैसर्गिक नाही. ती भौगोलिक- राजकीय आहे. ती सर्वानी मान्य केलेली असते. विसाव्या शतकात बऱ्याच राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला १९४७ साली ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे कायदे, आपला कारभार, आपले भविष्याविषयीचे निर्णय आपणच घेऊ लागलो. आपले कायदे आपल्या हातात आले.  स्वातंत्र्य हे सर्वात महत्त्वाचं मूल्य आहे असं मला वाटतं. कारण गुलामाला चांगली वागणूक दिली तरी ती गुलामीच, म्हणून स्वातंत्र्यासाठीचा आपला लढा महत्वाचा होता. आपल्याला सुदैवाने असं नेतृत्व मिळालं की, ज्याला स्वातंत्र्याचा खरा आधुनिक अर्थ नीट समजलेला होता. त्यामुळे आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी शासनपद्धती निवडली त्यात प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य अनुभवता येईल असं आपण ठरवलं. त्या दृष्टीने राज्यघटना तयार केली गेली. गांधी, नेहरू, आंबेडकर या तिघांनाही त्यांचं महत्त्वाचं श्रेय द्यायला हवं. हे तिघे नसते तर आपल्याकडे लोकशाही आलीच असती असं नाही. आपण लोकशाही स्वीकारली कारण आपल्याला देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचं वाटलं.

आपल्याला माहीत होतं की, लोकशाही परिपूर्ण नसते. आपण ती अमलात आणतो तेव्हा ती कोणत्या तऱ्हेची आणायची हा प्रश्न असतो. आपण ठरवलं की, ती प्रातिनिधिक असेल. आपण प्रतिनिधी निवडून देऊ आणि ते कारभार करतील, पण त्या प्रतिनिधींच्या मर्यादा असतात. ही जी निवडणूक प्रक्रिया आहे, तिच्याही मर्यादा आहेत. त्या अनेक वर्षांनंतर उघड झाल्या आहेत. पण तरीही लोकशाहीला पर्याय नाही. ती जास्त परिणामकारक कशी होईल हे आपण बघू शकतो, पण ती टाकून देणं हा काही पर्याय असू शकत नाही. मला हे अतिशय महत्त्वाचं वाटतं की लोकशाही प्रक्रियेत आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तीन तत्त्वं महत्वाची मानली आहेत. आपलं स्वातंत्र्य जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच इतरांचंही स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. त्यांनाही मान, प्रतिष्ठा आदर द्यायला हवा. ते व्हायला हवं त्यासाठी अनेक प्रयत्न होतात. काही लोकप्रतिनिधी, व्यक्ती, समुदाय इतरांच्या स्वातंत्र्याला धोका पोहोचेल असं वर्तन करतात. त्याविरुद्ध समाजाने सतत काही तरी करायला लागतं. त्या दृष्टीने प्रसारमाध्यमं, नागरी समाज आणि न्यायालयं अतिशय महत्त्वाची असतात. त्या दृष्टीने आपल्याकडे आपण कितीही म्हटलं तरी बऱ्यापैकी स्थिती आहे. काही वेळा झुंडशाही बघतो ती अतिशय अयोग्य आहे. त्या लोकांना लक्षातही येत नाही की, आपण इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच करतो आहोत. इतरांची मतं आपल्याशी जुळणारी नसली तरी ती ऐकायलाच पाहिजेत. त्यांचा आदर करायलाच पाहिजे. हा भाग अनेक लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे झुंडशाही दिसते. तिच्या विरोधात लोक आवाज उठवताना दिसतात, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, पण कधी कधी असं वाटतं की, देशाच्या राजकीय सत्तेचाच नकळत पाठिंबा, उत्तेजन त्यांना मिळतं आहे का? तर तसं व्हायला नको. मानवी हक्कांच्या बाबतीत आपल्या देशाचा अलीकडे नंबर खूप खाली गेलेला आहे. त्याची आपल्याला थोडी काळजी करायलाच पाहिजे. हे झालं राजकीय पातळीवर.

दुसरीकडे मला असं वाटतं की, स्वातंत्र्याचा विचार व्यक्तीच्या पातळीवरसुद्धा व्हायला हवा. आपल्याला प्रत्येकाला राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य आवश्यक असतं, पण त्याचबरोबर आर्थिक आणि सामाजिक पातळीवर स्वातंत्र्याचा विचार व्हायला हवा. आर्थिक अशा अर्थाने की, गरीब माणूस फारसा स्वतंत्र नसतो. त्याची उपासमार होत असेल तर इतर मानवीय गोष्टी ज्या आपण चांगल्या करू शकतो त्या करायची संधी त्याला कधीच मिळणार नाहीत. त्याला स्वत:च्या मुलाला शिक्षण द्यायच्या संधीदेखील मिळणार नाहीत. असा सगळा प्रकार असताना तो स्वतंत्र आहे, असं म्हणता येणार नाही. काही लोकांना गरिबीमुळे किंवा इतर काही कारणांमुळे सतत मानसिक दडपण असतं. विशेष करून स्त्रियांच्या बाबतीत अशी दडपणं खूप असतात. स्त्री-स्वातंत्र्याचा घोष केला तरी आपल्याला माहिती आहे की, याबाबतीत आपण आणखी खूपच पुढे जायला पाहिजे आहे. तसंच वैयक्तिक, मानसिक आणि काही अंशी सामाजिक पातळीचं आहे. जातिसंस्थेचं जे दडपण असतं त्यामुळे लोक मोकळेपणाने परजातीत लग्न करू शकत नाही. जातपंचायत किंवा अशा गोष्टी असतात, त्यातून सामाजिक बंधनं येतातच. ती आपला सामाजिक संकोच करणारी असतात. या दृष्टीने आपल्याला खूपच पुढे जायला हवं. वैयक्तिक पातळीवर भीती असणं ही गोष्टसुद्धा स्वातंत्र्याचा संकोच दाखवते. भीती ही स्वातंत्र्याचा शत्रू आहे आणि निर्भयता हा स्वातंत्र्याचा मित्र आहे. त्या दृष्टीने विकसित होण्याची प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीला उपलब्ध असली पाहिजे. त्या अर्थाने, स्वातंत्र्य ही सतत विकसित होत जाणारी प्रक्रिया आहे. आज मी स्वतंत्र आहे, त्यापेक्षा उद्या मी जास्त स्वतंत्र असू शकतो, कारण माझी विचार करण्याची शक्तीसुद्धा जास्त प्रगत होत जाणार आहे. त्यामुळे मी जसा स्वत: स्वतंत्र होणार आहे तसा इतरांना स्वतंत्र होण्यासाठीदेखील मदत करणार आहे. त्या दृष्टीने आपल्याकडे काही चांगली पावलं उचलली गेली आहेत. उदा लिंगसमानता. या मुद्दय़ावर आपल्याकडे ५० वर्षांपूर्वी जी स्थिती होती, त्यापेक्षा चांगली स्थिती आज आहे. स्त्रिया स्वतंत्रपणे आणि ताठ मानेने जगू शकतात. त्या मोठमोठय़ा पदांवर काम करत आहेत. स्त्री शिक्षणाचा प्रसार झाला आहे. शिक्षणाचा हक्क हा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येकाला पाहिजे ते शिकण्याचा, कमी शिकण्याचा हक्क आला. माहितीचा अधिकार आपल्याकडे आला. स्वातंत्र्याचा लांब पल्ल्याचा जो लढा आहे, त्याचाच तो भाग आहे. तसंच आरोग्याचा हक्कही कधी तरी यावा असं मला वाटतं, कारण त्याबाबतीत आपल्याकडे खूप विषमता आहे. ज्याच्याकडे साधन संपत्ती आहे, त्याच्याकडची आरोग्य सुविधा आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडची आरोग्य सुविधा यात प्रचंड तफावत आहे. ती तफावत दूर व्हायला पाहिजे. त्या दृष्टीने आरोग्याचा हक्क ही संकल्पना पुढे नेण्यासाठीचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.

स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते, स्वैराचार नाही. जबाबदारी म्हणजे आपल्या अधिकारांचा ज्यामुळे संकोच होईल अशा गोष्टी दूर व्हाव्याशा किंवा कराव्याशा वाटतात. हा आपल्या जबाबदारीचा भाग आहे. यासाठी एकंदर समाजामध्ये जागरूक राहणं महत्त्वाच आहेच, त्याचबरोबर आपल्याला तशी संधी मिळत असेल तर ती इतरांनाही मिळावी यासाठी प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं, कारण हा संबंध समाज स्वतंत्र होण्याचा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे फक्त स्वत:चाच विचार न करता सगळ्यांना स्वतंत्र व्हायची संधी मिळेल या दृष्टीने विचार करायचा. स्वत:च्या दृष्टीनेच फक्त जागरूक असणं हे थोडं नकारात्मक झालं, पण समाजाच्या दृष्टीने विचार करायचा हे सकारात्मक झालं. या दोन्ही दृष्टीने समाजातल्या विकसित, सुशिक्षित घटकांनी विचार करायला हवा आहे. त्यांची ही जबाबदारी आहे असं मला वाटतं. स्वातंत्र्याबरोबर ही जबाबदारीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तसंच हेही लक्षात घ्यायला हवं की, अनेक वेळेला स्वातंत्र्य म्हणजे हवेत उडी घेणं नाही. आपल्याला हवेत उडी घेता येत नाही, पण ती घ्यायची असेल तर विमान मात्र उडवता येतं. म्हणजे आपल्या कल्पना लक्षात घेऊन पुढे जात राहणं हासुद्धा स्वातंत्र्याचा भाग असू शकतो.

डॉ. हेमचंद्र प्रधान

(शब्दांकन : वैशाली चिटणीस)

First Published on August 11, 2017 10:12 pm

Web Title: author hemchandra pradhan special article on independence day 2017