29 September 2020

News Flash

मंदिरसमूहांच्या देशा…

कंबोडियाची ओळख हीच मुळी पुरातत्त्व स्थापत्यासाठी आहे.

जगातील सर्वात मोठा असा हिंदू मंदिरांचा समूह ही जगात कंबोडियाची ओळख आहे.

आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com
पर्यटन विशेष – भव्य दिव्य वास्तू
कंबोडिया हा जगाच्या नकाशावरचा छोटासा देश प्रसिद्ध आहे, तो तिथे असलेल्या अंकोरवट आणि अंकोर थाम या हिंदूू मंदिरसमूहांसाठी. स्थापत्यकलेचं अनोखं वैभव असलेली इथली मंदिरं पाहण्यासाठी पर्यटक इथे मोठय़ा संख्येने येतात. हा देश अतिशय पर्यटनस्नेही आहे, हे त्याचं आणखी एक वैशिष्टय़.

कंबोडियाची ओळख हीच मुळी पुरातत्त्व स्थापत्यासाठी आहे. जगातील सर्वात मोठा असा िहदू मंदिरांचा समूह ही जगात कंबोडियाची ओळख आहे. इतिहास काळात भारतातील विविध संस्कृती, शिल्पकला, धर्म यांचा प्रवास वेगवेगळ्या कारणांनी भारताबाहेर अनेक देशांमध्ये झाला. आग्नेय अशियात बौद्ध आणि िहदू संस्कृतीचे तत्त्वज्ञान खूपच मोठय़ा प्रमाणात विस्तारले आहे. अगदी येथील सर्वच देशांमध्ये रामायणाच्यादेखील अनेक आवृत्त्या पाहावयास मिळतात. अर्थातच तेथे त्या त्या काळात प्रबळ असणाऱ्या राजवटींनी केलेल्या स्थापत्य प्रयोगात तत्कालीन धर्माच्या प्रभावाचे प्रत्यंतर येते. अचंबित व्हावे अशा वास्तू उभारल्या गेल्या. जेथे ज्या धर्माचा, विचारसरणीचा प्रभाव अधिक तेथे त्या धर्माची, विचारसरणीची स्थापत्यकला विकसित होत गेली. ब्रह्मदेश म्हणजेच म्यानमार आणि थायलंड या देशांच्या सीमांना लागून असलेला कंबोडिया त्यांपकीच एक. एका बाजूने समुद्र आणि व्हिएतनाम, लाओस, थायलंड या देशांच्या सीमा असलेला हा देश. तेथे असलेल्या अंकोरवट आणि अंकोर थाम या मंदिरसमूहांमुळे जगामध्ये प्रसिद्ध आहे. इतिहासकाळातील भव्यदिव्य अशा वास्तूंचा वारसा या देशाला लाभला आहे.

विस्ताराने तसा हा देश अगदीच छोटा. पण तेथील या वारसास्थळांमुळे आज जगभरातील पर्यटकांचा तेथे ओघ असतो. फूनान, चेन-ला आणि ख्मेर अशा राजघराण्यांची येथे प्रदीर्घकाळ सत्ता होती. येथील िहदू धर्माच्या विस्ताराच्या अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार इसवी सनाच्या पहिल्या शतकात भारतातून कौंडिण्य नावाची एक व्यक्ती कंबुज म्हणजे आत्ताच्या कंबोडियाला गेली, तेथील नागवंशीय राजकन्या सोमा हिच्याशी त्याचा विवाह झाला. मेकाँग नदीच्या खोऱ्यात या व्यक्तीने राजधानी स्थापली. प्राचीन फूनान हे िहदू राज्य म्हणजे या कौंडिण्याचे राज्य असे समजले जाते. अशाच आणखीन एका कौंडिण्याची कथादेखील सांगितली जाते. इतिहास काळातील चिनी प्रवाशांच्या वर्णनातून या देशातील एकंदरीत परिस्थितीची उकल होते. इसवी सनाच्या दहाव्या शतकात येथे ख्मेर राजवट कार्यरत होती. जयवर्मा दुसरा याची ही राजवट चांगलीच भरभराट झालेली होती. पुढे चार शतकांपर्यंत ही सुबत्ता या ठिकाणी नांदत होती. अर्थात विविध कलांना त्या काळात आश्रय मिळाला. भव्य मंदिरे, स्थापत्यकला, शिल्पकला यांचे अनेक आविष्कार येथे घडत गेले. त्याचेच प्रत्यंतर आजही उत्तम स्थितीत असलेल्या अंकोरवट

या सर्वात मोठय़ा िहदू मंदिरसमूहाकडे पाहिल्यानंतर येते.

नॉम पेन्ह आणि सिएम रिप ही या देशातील दोन महत्त्वाची ठिकाणे. नॉम पेन्ह हे राजधानीचे ठिकाण म्हणून त्याला महत्त्व आहे, पण सिएम रिप हे केवळ आणि केवळ पुरातन वास्तुस्थापत्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. पदोपदी मंदिर स्थापत्याचे अनेक कलाविष्कार येथे पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी छोटीछोटी अशी मंदिरे येथे आहेत. सर्वसाधारण पर्यटकांमध्ये अंकोरवट आणि ता प्रोम या दोन मंदिरसमूहाचे आकर्षण असते. पण येथे त्याशिवायदेखील अनेक छोटे छोटे मंदिरसमूह आहेत. किमान पाच तरी समूह येथे आवर्जून पाहावेत असे आहेत.

मुख्य मंदिरसमूह म्हणजे अंकोरवट. हे एकच मंदिर आहे. सुमारे ५१० एकर परिसरात वसलेले हे मंदिर एका नजरेत पूर्णपणे जाणवतदेखील नाही, इतका त्याचा विस्तार आहे. एखाद्या तळ्यासदृश असलेले तीन खंदक आणि भरभक्कम तटबंदी ओलांडून गेल्यावर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो. हे मंदिर मूलत: विष्णूचे. ख्मेर राजा दुसरा सूर्यवर्मा (इसवी सन १११३ ते ११८१) याने हे मंदिर बांधले. विष्णूचे निवासस्थान मेरू पर्वत, त्याची रचना या मंदिराच्या स्थापत्यामध्ये दिसते. मुख्य मंदिराचा कळस सर्वात उंच असून इतर चार मंदिरांचे कळस येथे दिसतात. या मंदिरात काहीशा मोकळ्या अशा जागेत विष्णूची मूर्ती आहे. येथे मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वी विष्णूची मूर्ती मुख्य ठिकाणी गाभाऱ्यात होती, पण जयवर्मा सातवा याच्या कालावधीत ती हटवून बुद्धाची मूर्ती स्थापन करण्यात आली. पण आजही ही विष्णूची मूर्ती एका स्वतंत्र ठिकाणी स्थापलेली दिसते. त्याच्या मागेदेखील बरीच मोकळी जागा आहे. आठ हात असणारी ही विष्णू मूर्ती आवर्जून पाहावी.

मंदिरात प्रवेश करताना प्रत्येक तटबंदीनंतर बरीच मोकळी जागा आहे. विशेष म्हणजे या मंदिरांच्या कळसाच्या आतून वपर्यंत जाण्याची सुविधा आहे. काही ठिकाणी त्यासाठी लोखंडी शिडय़ांचे बांधकाम केले आहे. मूळ पायऱ्या अतिशय खडय़ा चढाच्या असून त्या कालौघात झिजल्या आहेत. मंदिरात अनेक िभतींवर अनेक शिल्पे कोरलेली दिसतात. एके ठिकाणी तर एका व्हरांडय़ाच्या िभतीवर युद्धाचे प्रसंग कोरले आहेत. मंदिरप्रवेशाच्या वाटेवर अनेक ठिकाणी समुद्रमंथनाची शिल्पे अगदी सहजपणे दिसून येतात. अतिशय दिमाखदार अशी ही शिल्पे पाहून एकूणच या संकल्पनेचे तेथील राजवटींना असलेले आकर्षण जाणवते. किमान अर्धा-पाऊण दिवस तरी या मंदिर परिसरात घालवावा लागेल, इतका त्याचा विस्तार भव्य आहे. सर्वधर्मियांमध्ये जगातील  सर्वात मोठे प्रार्थना स्थळ म्हणून याचा उल्लेख केला जातो.

याशिवाय येथे जे इतर मंदिरसमूह आहेत त्यातील महत्त्वाचे म्हणजे ता प्रोम आणि अंकोरथाम. त्यापकी ता प्रोम जवळपास भग्नावस्थेतच आहेत. पूर्णपणे वडाच्या झाडांच्या मुळांनी हे वेढलेले आहे. त्यापकी वरचा बराचसा भाग कोसळला आहे, मात्र खालील भाग आजही टिकून आहे. त्याचे कारण हे त्याला वेढलेल्या वडाच्या मुळांच्या जंजाळात आहे. उद्या ही मुळे उखडून काढायचे ठरवले तर उरलेले मंदिरदेखील कोसळू शकते. हा मंदिर समूह असा वडाच्या मुळांनी वेढला जाण्यामागचे कारण म्हणजे तो पूर्णत: दुर्लक्षित होता. सुमारे ४०० वष्रे हा सारा परिसर जवळपास विस्मृतीतच गेला होता. फ्रेंच जीवशास्त्रज्ञ ऑरी माऊ हा या परिसरात वनस्पती अभ्यासासाठी, संशोधनासाठी फिरत होता. तेव्हा त्याला या मंदिरांचा शोध लागला. पुढे मग स्थानिकांच्या मदतीने ही मंदिरे प्रकाशात आली. वर्षांनुवष्रे या झाडांच्या मुळांनी या मंदिरांना जखडल्यामुळे आज ही अवस्था दिसून येते. मात्र त्यामुळे यांचे पर्यटनमूल्यदेखील खूप वाढले आहे.

याशिवाय तिसरा मंदिर समूह म्हणजे अंकोर थाम. सम्राट जयवर्माच्या कालावधीतले हा मंदिर समूह. विशेष म्हणजे येथे इतर नक्षीकाम फारसे केलेले नाही. मात्र अनेक मानवी मुद्रा कोरलेल्या शिल्पांचा वापर करण्यात आला आहे. हेच काय ते तेथील कोरीवकाम. सुमारे नऊ चौरस किलोमीटर परिसराला तटबंदी करून त्या राजाने जणू काही त्याची राजधानीच वसवली आहे असे येथे म्हणता येईल. या मंदिराला बयोन मंदिर असेदेखील म्हणतात. ख्मेर सम्राट सातवा जयवर्मा याने हे मंदिर बांधले आहे. हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अंकोरथामला प्रवेश करण्यासाठीदेखील खंदक ओलांडावे लागतात. येथेदेखील दगडी तटबंदी आहे. समुद्रमंथनाची शिल्पेदेखील आहेत. तर या मानवी चेहऱ्यांची रचना अवलोकितेश्वराला समíपत केल्याचे सांगितले जाते. एकूण ३७ मानवी चेहरे या ठिकाणी कोरलेले दिसतात. त्या सर्वाचे हावभाव हे वेगवेगळे आहेत. हे चेहरे राजा जयवर्माचे की अवलोकितेश्वराचे यावर वाद असू शकतो, पण या चेहऱ्यांचा वापर करून मंदिरांची रचना करणे, त्याला एक वेगळा उठाव देणे हे नक्कीच वेगळेपण म्हणता येईल.

या परिसरातील काही मंदिरं तर पूर्णत: मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. पुरातत्त्ववेत्त्यांनी येथे केलेल्या उत्खननातून त्यांचे अस्तित्व दिसून आले आहे. अशा काही मंदिरांच्या बाहेर पूर्वीचे मंदिर आणि आताचे मंदिर अशी छायाचित्रे पाहायला मिळतात.

नेहमीच्या पर्यटनात अंकोरवट, बयोन आणि ता प्रोम पाहिले जाते. याशिवाय तेथे अनेक छोटे छोटे मंदिर समूह आहेत. सिएम रिपमध्ये सुमारे पाचशे तरी मंदिरं आहेत. सिएम रिप हे अगदीच छोटंसं शहर आहे. किंबहुना आजच्या शहराच्या परिभाषेत ते आणखीनच छोटं होईल. पण तेथे असणारा पर्यटकांचा ओघ इतका प्रचंड आहे की त्या लहानशा शहरात सुमारे ५० पंचतारांकित हॉटेल्स आहेत. एकूणच हे शहर पर्यटनावर जगणारे आहे असे म्हणता येईल.

महत्त्वाचे म्हणजे हा पिटुकला देश पूर्णपणे पर्यटकस्नेही आहे. जगभरातील विविध भाषांमधील मार्गदर्शक येथे अगदी सहज मिळतात. इतकेच नाही तर येथील पर्यटन विभागाने काही अतिशय चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अंकोरवट हे एका नजेरत मावतच नाही. पण त्याचा एकूण विस्तार कळावा, त्याची भव्यता जाणवावी या उद्देशाने येथे एक हॉट एअर बलून पर्यटनाची सुविधा आहे. त्यामधून अंकोरवट मंदिरावरून जाताना त्या संपूर्ण परिसराची व्याप्ती, भव्यता डोळे दिपवणारी असते.

या प्रत्यक्ष पुरातन वास्तूंबरोबरच आणखी एका ठिकाणी आवर्जून भेट द्यावी. ती म्हणजे येथील राष्ट्रीय संग्रहालय. या ठिकाणी या देशातील उत्खननात सापडलेली असंख्य शिल्पे, पुरावस्तू ठेवण्यात आल्या आहेत. ते पाहिल्यावर एकूणच या देशाच्या पुरातत्त्वीय श्रीमंतीची जाणीव होते.

एकूणच सिएम रिप म्हणजे िहदू मंदिरांची खाणच म्हणावी लागेल. त्या काळातील राजवटींनी बांधलेली मंदिरं, सिएम रिप नदीच्या किनारी असणारा अनेक शिविलग कोरलेला डोंगर, विष्णूच्या मूर्ती, काही ठिकाणी बुद्धाच्या मूर्ती हे सारं आपल्याला थेट इतिहासकाळात घेऊन जातं. जणूकाही आजच्या काळाचा विसरच पडावं असं हे प्राचीन वैभव आहे. त्यांची स्थापत्यरचना, त्यावेळची सांपत्तिक स्थिती, राजकीय व्यवस्था अशा अनेक बाबींबद्दल असंख्य प्रश्न पडतात. काहींची उत्तरं मिळतात, काहींची नाही.

येथील पुरातन स्थापत्याबरोबरच आणखीन एक आकर्षण म्हणजे टोन्ले सॅप लेकमध्ये असणारं तरंगतं खेडं. व्हिएतनाम युद्धानंतर तेथील निर्वासितांच्या वास्तव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी या युद्ध निर्वासितांनी छोटय़ा छोटय़ा बोटींमध्ये या तलावात मुक्काम ठोकला. पाहता पाहता तेथे आता एक तरंगतं खेडंच वसलं आहे. त्यांच्या शाळा, प्रार्थना घरं, बाजारहाट हे सारं काही त्या तरंगत्या खेडय़ातच सुरू झाले आहे. हे तरंगते खेडे कंबोडियाच्या भेटीत आवर्जून पाहावे असे आहे.

एकूणच या छोटय़ाशा देशातील भटकंती आपल्याला प्राचीन वारसास्थळांची सफर तर घडवतेच, पण आधुनिक काळातील युद्धांचे परिणाम देखील दाखवते.

कसे जावे? केव्हा जावे?

कंबोडियाला जाण्यासाठी बँकॉक येथून विमान बदलून जावे लागते. सिएम रिप येथे विमानतळ आहे, राहण्याची उत्तम सोय आहे. तसेच थायलंड या देशाशी जमिनीवरून याची सीमा जोडलेली असल्याने तेथून रस्त्याने पाच-सहा तासांत पोहोचता येते. कंबोडियाचे पुरातन स्थापत्य अगदी मनसोक्त पाहायचे असेल तर किमान पाच दिवस तरी हातात हवेत. येथे जाण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी उत्तम.

(सर्व छायाचित्रे : आत्माराम परब)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 1:03 am

Web Title: cambodia temples nation
Next Stories
1 पिरॅमिडस्
2 वाहिन्यांच्या निवडीत केबलचालकांचा अडथळा!
3 अर्थ नव्हे निवडणूक ‘संकल्प’
Just Now!
X