खरेदी न आवडणारी व्यक्ती शंभरात एखादी सापडेल. अनेकांसाठी खरेदी म्हणजे उत्सव, सोहळाच असतो. कलाकारांसाठी शॉपिंग म्हणजे काय, त्यांच्या लेखी शॉपिंगचा आनंद नेमका काय हे ते त्यांच्याच शब्दांत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसोक्त खरेदीचा आनंद

मला शॉपिंग करायला खूप आवडतं. शूज, बॅग्स, कपडे या वस्तू घेण्यासाठी मी खूप पैसे खर्च करते. विशिष्ट निमित्ताने खरेदी करायला जाऊ असं माझं होत नाही किंवा सणाच्या निमित्ताने खरेदी करू या हा उत्साहही माझ्यात नसतो. मला वाटत असेल तेव्हा मी खरेदीला जाणं पसंत करते. शूटिंग, पुरस्कार सोहळे, कार्यक्रम या निमित्ताने परदेशात जाणं होत असतं. अशा वेळी भारतात जे ब्रॅण्ड मिळत नाही अशा ब्रॅण्डच्या वस्तू परदेशात खरेदी केल्या जातात. मी जेव्हा ठरवते की, आज माझ्याकडे वेळ, पैसा आणि एनर्जी असं तिन्ही आहे, खरेदीसाठी जाऊ या; तेव्हाच नेमकं मला मनासारखं काहीही मिळत नाही. मग मी काहीच खरेदी न करता तशीच परत येते. पण, ज्या वेळी मला खरंच काही तरी विकत घ्यायचं असतं आणि तेव्हा मी ठरवते की, तेवढं घेऊन लगेच परत यायचं; अशा वेळी मला एकेक गोष्ट आवडत जाते आणि मी ते खरेदी करत बसते. असं माझ्या बाबतीत नेहमी घडत असतं. म्हणूनच मी आता ‘गो विथ द फ्लो’ असंच करायचंच ठरवलंय. अ‍ॅक्सेसरीजही आवडते. पण, फार बटबटीत आवडत नाही. एकच स्टेटमेंट पीस आवडतो. मग ते कानातले असो किंवा गळ्यातलं. कॉस्मॅटिक्स हे खूप महत्त्वाचं असतं. तुमचा चेहरा जर यूएसपी असेल तर तुम्हाला चांगले प्रॉडक्ट वापरलेच पाहिजेत. थोडे महाग असतील तरी चालतील पण, त्याचा दर्जा चांगलाच हवा. त्यामुळे कॉस्मॅटिक्सची खरेदी करताना काळजी घ्यावी लागते. खरेदी करताना मला कोणाचीही सोबत लागत नाही. मला एकटं जाणं जास्त आवडतं. सोबत असलेल्या व्यक्तीला लवकर जायचं, भूक लागलीय, कंटाळा आलाय, माझ्यासाठी थांबावं लागतंय हे काहीही मला आवडत नाही. एकटं असलं की मी मला हवा तेवढा वेळ घेते आणि मनसोक्त खरेदी करते. बॅगमध्ये मला मोठय़ा बॅग जास्त आवडतात. कारण त्यात बरंच सामान राहतं. कामानिमित्त ठिकठिकाणी जावं लागत असल्यामुळे माझ्यासोबत सामानही पुष्कळ असतं. ते सगळं बॅगमध्ये नीट ठेवता आलं पाहिजे, या हेतूने मोठय़ा बॅगला मी जास्त प्राधान्य देते. भारतीय पेहरावापेक्षा वेस्टर्न कपडय़ांची खरेदी करायला मी जास्त उत्सुक असते. कारण भारतीय पेहरावाची खरेदी केली की त्यावर ज्वेलरी, अ‍ॅक्सेसरीज असं सगळंच बघावं लागतं. त्यासाठी पुरेसा वेळ हवा आणि या खरेदीसाठी डोकंही शांत हवं. कधी कधी मी बराच वेळ खरेदी करत असते तर कधी कधी मला जे हवं ते पटकन मिळतं आणि ते घेऊन मी पुढच्या दुकानात जाते. मनसोक्त खरेदीचा आनंद मिळाला पाहिजे.
सई ताम्हणकर

समाधान मिळायला हवं
सण किंवा विशिष्ट समारंभामुळे खरेदीनिमित्त मिळतं. विशेषत: दिवाळी, दसरा, गणपती, गुढीपाडवा या सणांमुळे जी खरेदी केली जाते ती पारंपरिक पेहरावासाठी केली जाते. वर्षभर आपण कॅज्युअल कपडय़ांमध्ये असतो. अशा सणांमुळे पारंपरिक कपडय़ांची खरेदी करणं म्हणजे माझ्यासाठी आनंद असतो. मीही या सणांच्या काळात सगळे दिवस पारंपरिक पेहरावात राहण्याचा प्रयत्न करतो. कुर्ता, शेरवानी, पठाणी असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि रंगाचे कपडे खरेदी करण्याकडे माझा कल असतो. याशिवाय मला कपडे, शूज आणि ग्लेअर्स यांच्या खरेदीसाठी मी कधीही तयार असतो. या तिन्हीचं माझ्याकडे बरंच कलेक्शन आहे. कोणत्याही मॉलमध्ये गेलो तर माझं लक्ष सगळ्यात आधी शूज सेक्शनकडेच जातं. त्यात मला हवं असलेल्या ब्रॅण्डचे शूज असतील तर उत्तमच. शूजच्या बाबतीत मी ब्रॅण्डचा नेहमी विचार करतो. कारण शूज दीर्घकाळ टिकायला हवेत. शिवाय पायाला आरामदायीही वाटलं पाहिजे. म्हणून शूज घेताना मी काळजी घेतो. जीन्सच्या बाबतीतही मी ब्रॅण्ड तपासून घेतो. कापड, शिलाई या सगळ्या गोष्टी ब्रॅण्डेड जीन्समध्ये हमखास चांगल्याच मिळतात. खरेदीच्या वेळी माझ्यासोबत कोणी असेल तर माझी हरकत नसते पण, मी एकटाच असलो तर खरेदी जास्त एन्जॉय करतो. दुसरं कोणी सोबत असलं तर नकळत का होईना त्याच्या आवडीचा थोडा विचार होतो. अशा वेळी माझा गोंधळ होतो. नेमकं हेच मला टाळायचं असतं. म्हणून मी एकटा जाणं पसंत करतो. आवडीनिवडीबाबत मी अतिदक्ष नसतो. हेच हवं, तेच नको असं माझं नसतं. एखादी गोष्ट आवडली तर मी पटकन घेऊन पुढे जातो. काही वेळा काही न घेताही दुकानाबाहेर पडलोय. मनासारखं मिळेस्तोवर थांबण्याचेही काही किस्से घडलेत. मुळात खरेदी झाल्यानंतर एक प्रकारचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसायला हवं. ते जास्त महत्त्वाचं असतं.
विकास पाटील

वर्षांतून फक्त चारदा खरेदी
खरेदी करणं हे आवडत नाही असं म्हणणारे फार कमी असतील असं मला वाटतं. खरेदी करतानाचा आनंद गमवू नये असाच असतो. मला तरी खरेदी करणं खूप आवडतं. काही जण घरातून बाहेर पडताना खरेदीचं रीतसर प्लॅनिंग करतात. पण, मला असं प्लॅनिंग करून खरेदीला जाणं फारसं रुचत नाही. त्यामुळे मी कधीच खरेदीचं प्लॅनिंग करत नाही. मुळात खरेदी ठरवून करण्यासारखी गोष्टच नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मला खरेदी करायला आवडत असलं तरी मी दर दहापंधरा दिवसांनी खरेदी करायला जात नाही. वर्षांतून तीन ते चार वेळा मी नवीन गोष्टी विकत घेतो. पण, तेव्हा एकदमच भरपूर खरेदी करतो. कपडे, शूज आणि ग्लेअर्स या तीन गोष्टींकडे माझं जास्त लक्ष असतं. बाजारात गेल्यावर या तीन गोष्टी घेण्यावरच माझा जास्त भर असतो. या तिन्ही गोष्टींमध्ये हरतऱ्हेचं वैविध्य मिळतं. ब्रॅण्ड, डिझाइन, मटेरिअल, स्टाइल अशा सगळ्यात विविध प्रकार बघायला मिळतात. त्यामुळे या तीन गोष्टी मला जास्त खुणावतात. खरेदी मस्त एन्जॉय करता आली पाहिजे. त्यासाठी कोणी सोबत असलं तर गप्पाटप्पा मारत आणखी मजा येते. माझ्यासोबत खरेदीसाठी अनेकदा माझी बायको असते. मला एकटय़ाला खरेदीसाठी जायला आवडत नाही. गॅजेट्सची तर मला प्रचंड आवड आहे. त्यातही मोबाइल फोनची क्रेझ आहे. पण, शॉपिंग तिनेक महिन्यांनी करत असलो तरी एखादा मोबाइल विकत घेतला की तो बराच काळ मी वापरतो. प्रत्येक खरेदीला गॅजेट घेतोच असं नाही. कामानिमित्त, कार्यक्रमांसाठी पुष्कळदा परदेशात जाणं होत असतं. पण, ठरावीक देशातून ठरावीक वस्तू विकत घ्यायलाच हवी असं मला वाटत नाही. कारण आता बऱ्यापैकी सगळेच ब्रॅण्ड भारतात मिळतात. त्यामुळे परदेशातून ठरवून अशी मी खरेदी करत नाही. माझ्यासोबत येणाऱ्या व्यक्तीला खरेदी करताना कंटाळा येत नाही. कारण मी फार वेळ घेत नाही. मला माहीत असतं मला काय हवं ते. त्यामुळे मी ते घेतो आणि दुकानातून बाहेर पडतो.- स्वप्निल जोशी

 

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrities talking about their shopping experience in festival
First published on: 23-10-2015 at 01:46 IST