18 January 2019

News Flash

महाराष्ट्रातील संभाव्य रामसर स्थळे

इराणमधील रामसर शहरात १९७१ साली भरलेल्या ‘कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स’ या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते.

या कृती आराखडय़ात मान्य केल्याप्रमाणे प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले.

२०१२ पासून महाराष्ट्र शासनाच्या विचारांतर्गत असलेल्या संभाव्य रामसर स्थळांपकी एकाही स्थळाला अजून रामसर दर्जा मिळालेला नाही.

इराणमधील रामसर शहरात १९७१ साली भरलेल्या ‘कन्व्हेन्शन ऑन वेटलॅण्ड्स’ या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते. याच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले.

या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चर्चेद्वारा महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रत्येक देशाने राष्ट्रीय स्तरावर करावयाच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला. हा कृती आराखडा नंतर १९७५ मध्ये झालेल्या दुसऱ्या परिषदेत संमत करण्यात आला.

या कृती आराखडय़ात मान्य केल्याप्रमाणे प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. अशा स्थळांचे त्या देशाने योग्य प्रकारे संवर्धन करावे तसेच तेथील जैवविविधतेचा पर्यावरणपूरक वापर करावा असे स्वीकारण्यात आले. या आराखडय़ात ‘पाणथळ जागेची’ व्याख्यासुद्धा करण्यात आली. पाणथळ जागेच्या व्याख्येत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मदाने, खाडय़ा, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा यात समावेश केला जातो. त्यात वाहते तसेच शांत पाणी असलेली पाणस्थळे, बारमाही तसेच हंगामी पाणथळीच्या जागांचा समावेश केला जातो. समुद्री पाणथळीच्या जागांसाठी (खाऱ्या पाण्याची सरोवरे, समुद्रकिनाऱ्यावरील भरती-ओहोटीच्या जागा इ.) ओहोटीच्या वेळेस एकूण खोली सहा मीटरपेक्षा अधिक नसावी हा नियम करण्यात आला. भारताने १९८२ मध्ये रामसर करारावर सही केली.

९ ‘रामसर’ मान्यतेचे निकष :

रामसर परिषदेत ‘रामसर स्थळ’ घोषित करण्यासाठी एकूण नऊ जागतिक निकष वा मापदंड मंजूर करण्यात आले आहेत. पहिला निकष हा नसíगक वा अर्ध-नसíगक पण दुर्मीळ प्रकारातील पाणथळ जागा असावी. उदाहरणार्थ, बुलडाणा जिल्ह्य़ातील लोणारचे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले असून त्यात खारे पाणी आढळते. जगात अशी सरोवरे फार कमी आहेत. दुसरा निकष हा त्या ठिकाणी आढळणाऱ्या संकटग्रस्त वन्यजीवांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करतो. तिसरा निकष त्या विशिष्ट जैवभौगोलिक प्रदेशातील वनस्पती व वन्यजीवांच्या संवर्धनासाठी असलेले महत्त्व अधोरेखित करतो. चौथा निकष वनस्पती व वन्यजीवांच्या जीवनचक्रातील त्या पाणथळीचे महत्त्व (जसे स्थलांतरादरम्यान) विचारात घेतो. पाचवा व सहावा निकष पक्ष्यांसंबंधी असून यामध्ये २० हजार पाणपक्ष्यांचा आढळ वा एखाद्या पक्षी प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का पक्ष्यांचा आढळ असणे जरुरी मानले गेले आहे. सातवा व आठवा निकष स्थानिक मत्स्य प्रजातींचा आढळ व त्या पाणथळीचे महत्त्व यावर आधारित आहे. शेवटच्या नवव्या निकषात पक्षी सोडून इतर वन्यजीव प्रजातीच्या जागतिक संख्येच्या एक टक्का सदस्यांचा आढळ असणे जरुरीचे मानले गेले आहे.

राज्यातील संभाव्य रामसर जागा

रामसर मान्यतेच्या नऊ निकषांनुसार विचार केला तर महाराष्ट्रातील अनेक पाणथळीच्या जागा पात्र ठरतात. २००८ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा प्रकाशित ‘पोटेंशिअल अँड एक्झििस्टग रामसर साइट्स इन इंडिया’ या ग्रंथात जायकवाडी पक्षी अभयारण्य (जि. औरंगाबाद), वेंगुर्ला रॉक्स (बन्र्ट आयलंड), माहूल शिवडीची खाडी (मुंबई), नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (जि. नाशिक), ठाण्याची खाडी (ठाणे-मुंबई) या पाणथळ जागांचा समावेश होता, पण त्यानंतर पक्षिमित्रांची संख्या वाढली व अनेक पाणथळींवर आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. आता पुन्हा एकदा आपण रामसर निकषांचा विचार केला तर उजनीचे धरण (भिगवण) (जि. पुणे-सोलापूर), हतनूर धरण (जि. जळगाव), नवेगावबांध (जि. गोंदिया), लोणार सरोवर (जि. बुलडाणा) या स्थळांचासुद्धा संभाव्य स्थळांच्या यादीत समावेश होतो. विशेष म्हणजे लोणार सोडून इतर सर्व जागा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व बर्डलाइफ इंटरनॅशनलद्वारा महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्रे (इम्पर्ॉटट बर्ड एरिया) म्हणून घोषित केलेल्या आहेत.

जायकवाडी पक्षी अभयारण्य

औरंगाबाद जिल्ह्य़ात पठण तालुक्यात असलेले जायकवाडीचे प्रचंड धरण १९७५ मध्ये गोदावरी नदीच्या पात्रावर बांधण्यात आले. इथे नसíगक उंच-सखल भाग नसल्यामुळे हे धरण सपाट भागातच पसरलेले आहे. साहजिकच तेथे ५५ किमी. लांब आणि २७ किमी. रुंद असा प्रचंड जलाशय तयार झाला आहे. १९८६ साली जायकवाडी पक्षी अभयारण्य घोषित करण्यात आले. याच जलाशयाला ‘नाथसागर’ असेसुद्धा नाव दिले गेले आहे. या ठिकाणी ५० हजाराहून अधिक पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. तसेच दहा हजारांपेक्षा अधिक करकरा क्रौंच दिसून आले होते. हजारो अग्निपंख (रोहित), इतर अनेक प्रकारची रहिवासी तसेच स्थलांतरित बदके व चिखलपायटे पक्षी येथे आढळून येतात. स्थानिक पक्षी अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी यांनी या ठिकाणी २१३ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. धरणाच्या आजूबाजूला असलेल्या गावांतील शेतकरी अनधिकृतपणे धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपसा करतात तसेच उन्हाळ्यात धरणाच्या कोरडय़ा पडलेल्या पात्रात गाळपेरा पद्धतीचे पीक घेतात.

२०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात जायकवाडी रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले होते. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी पक्षी महोत्सव चालू करण्यात आला आहे.

माहूल-शिवडीची खाडी (मुंबई)

ट्रॉम्बे व माहूल-शिवडीच्या खाडीतील दलदली अरबी समुद्राला मिळालेल्या आहेत. एकंदरीत हा पट्टा भरती-ओहोटीच्या दलदलीचा भाग (inter-tidal mudflat) आहे. जमिनीकडील बाजूला सर्वत्र कांदळवने (mangroves) पसरलेली आहेत. एकूण विस्तार १० किमी. लांबी आणि तीन किमी. रुंदी असलेला हा दलदलीचा पट्टा उत्तर गोलार्धातून स्थलांतर करून येणाऱ्या हजारो पक्ष्यांचे हिवाळी आश्रयस्थान बनतो. त्यात विशेष करून चिखलपायटय़ा पक्ष्यांचा समावेश असतो. कच्छच्या रणातून आणि मध्य पूर्वेतून स्थलांतर करून येणारे हजारो छोटे रोहित येथे जवळपास सहा महिन्यांसाठी आश्रयाला येतात. येथे मोठय़ा प्रमाणात औद्योगिक रसायनांचे प्रदूषण असूनसुद्धा पक्षी येथे येतात व मुक्काम करतात हे आश्चर्यच होय. या ठिकाणी १५ ते २२ हजार छोटय़ा रोहित पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. सोबत हजारो चिखलपायटे (waders) पक्षी असतातच. येथे स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांची एकूण संख्या ५० हजार असावी असे अनुमान केले जाते.

२०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात माहूल-शिवडीची खाडी रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले होते. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा ‘फ्लेिमगो फेस्टिवल’ (महोत्सव)चे आयोजन करण्यात येते. या दलदलीपासून नव्या मुंबईला जोडणारा ‘मुंबई ट्रान्स हार्बर िलक’ असा प्रचंड पूल बांधण्यात येणार असून त्यामुळे दलदली नष्ट झाल्या तर रोहित पक्षी येथे येण्याचे थांबतील अशी भीती व्यक्त केली जाते.

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य

नाशिक जिल्ह्यातील निफाडजवळ असलेले नांदूर मध्यमेश्वर म्हणजे गोदावरी व कडवा नद्यांच्या संगमावर बांधलेल्या धरणामुळे तयार झालेला विशाल जलाशय होय. १९०७-१९१३ दरम्यान येथे बंधारा बांधला गेला होता. गेल्या एक शतकात गाळ साचून तसेच वनस्पतींची वाढ होऊन या ठिकाणी पक्ष्यांसाठी उत्कृष्ट असा अधिवास निर्माण झाला. अर्थातच अशी पाणथळ जागा हजारो पक्ष्यांना आकर्षति करते. दत्ताजी उगावकरांनी या ठिकाणी २३० पक्षी प्रजातींची नोंद केली आहे. दर वर्षी या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांची संख्या २० हजारांहून अधिक असते. २०१३ मध्ये या ठिकाणी अडीच हजार करकरा क्रौंच आढळून आले होते.

२०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात नांदूर मध्यमेश्वर रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले होते.

ठाण्याची खाडी (ठाणे-मुंबई)

ठाणे खाडीचा पूर्व किनारा ठाणे व नवी मुंबई जिल्ह्यांमध्ये येतो, तर पश्चिम भाग बृहन्मुंबई जिल्ह्य़ात येतो. उल्हास नदीचे गोडे पाणी ठाणे खाडीला येऊन मिळते. तसेच या तिन्ही जिल्ह्य़ांचे सांडपाणी उल्हास नदी तसेच ठाणे खाडीत येऊन मिळते. अर्थात त्यामुळे ठाण्याच्या खाडीतील पाणी खूप प्रदूषित झाले आहे. खाडीच्या भोवती कांदळवने तसेच मिठागरे आहेत.

ठाण्याची खाडी हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांनी गजबजते. या ठिकाणी एक लाख पक्षी आसरा घेऊ शकतात. विशेषकरून हजारोंच्या संख्येत स्थलांतर करून येणारे छोटे व मोठे रोहित इथले मुख्य व महत्त्वाचे आकर्षण ठरते. सोबतच हजारोंच्या संख्येत येणारे चिखलपायटे (waders) पक्षी जसे छोटा टिलवा (Little Stint) व समुद्री कुरय (Gulls). पक्षी अभ्यासकांनी या ठिकाणी १७९ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद केली आहे.

२००४ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा ठाणे खाडीला महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्र घोषित करण्यात आले. २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात ठाणे खाडीचा रामसर स्थळ म्हणून सहभाग केलेला नव्हता. २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाने ठाणे खाडीला ‘फ्लेिमगो अभयारण्य’ म्हणून मान्यता दिली. त्यामुळे ठाणे खाडीच्या संवर्धनाचा मार्ग सुकर झाला. पूर्वी खाडीत मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांना आता कांदळवन विभाग ‘बर्ड गाइड’ म्हणून प्रशिक्षण देत असून होडीत बसून पक्षीनिरीक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक स्थानिक कोळी कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहेच, सोबतच सर्वाना ठाणे खाडीतील पक्षिवैभव अनुभवणे शक्य झाले आहे. २०१६ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा ठाणे खाडीला रामसर दर्जा मिळावा म्हणून निवेदन देण्यात आले आहे.

उजनी जलाशय (पुणे, सोलापूर)

पुणे आणि सोलापूर जिल्ह्य़ांच्या सीमेवरील भिगवणजवळ भीमा नदीवर १९८० मध्ये बांधल्या गेलेल्या उजनीच्या धरणाचा उद्देश आजूबाजूच्या प्रदेशातील शेतीला पाणीपुरवठा करणे हा होता. आजूबाजूचा परिसर कमी पावसाचा व निमदुष्काळी होता.

आता उजनी जलाशय हजारो पक्ष्यांचे माहेरघर झाले आहे. हजारो स्थलांतरित पक्षी येथे हिवाळा व्यतीत करण्यासाठी येतात. भिगवणजवळच्या भादलवाडीला रंगीत करकोच्यांचे सारंगागार आहे. पक्षी अभ्यासकांनी या ठिकाणी १६० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. दुर्दैवाने आजूबाजूच्या परिसरातील शेतीपद्धतीत झपाटय़ाने झालेल्या बदलामुळे (वाढलेली ऊस लागवड) अनेकदा जलाशयातून जादा पाण्याचा उपसा होतो. असे घडते तेव्हा रंगीत करकोच्याची वीण अयशस्वी होते. उन्हाळ्यात जलाशयाचे पाणी आटले की अनेक बेटे तयार होतात. अशा बेटांवर शेकडो पाणपक्षी वीण करतात.

हा संपूर्ण जलाशय पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात उजनीला रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले होते. २०१६ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा उजनीच्या जलाशयाला महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली. उजनी जलाशयाला पक्षी अभयारण्य तसेच रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळावी अशी अनेक वर्षांपासूनची पक्षी अभ्यासकांची मागणी आहे.

हतनूर धरण (जि. जळगाव)

तापी आणि पूर्णा नद्यांच्या संगमावर बांधल्या गेलेल्या धरणामुळे हतनूर जलाशय निर्माण झाला. हा जलाशय जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात आहे. गेल्या काही दशकांत या जलाशयात साचलेला गाळ व वाढलेल्या वनस्पतींमुळे या जलाशयात अनेक दलदलीचे प्रदेश, छोटी बेटे आणि उथळ डबकी तयार झाली आहेत.

वर्षभर येथे भरपूर पक्षी असले तरी हिवाळ्यात त्यात हजारो स्थलांतरित पक्ष्यांची भर पडते. या ठिकाणी पक्षी अभ्यासकांनी २६१ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. गेल्या काही वर्षांपासून येथे नियमित पाणपक्षी गणना केली जाते. फेब्रुवारी २०१३ मध्ये चातक निसर्ग संवर्धन संस्था व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा केल्या गेलेल्या पक्षिगणनेत एकूण ३१ हजार १२८ पक्ष्यांची मोजदाद केली गेली. त्यानंतर दर वर्षी वीस हजारपेक्षा जास्त पक्ष्यांची येथे नोंद केली जात आहे.

२०१६ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा हतनूरच्या जलाशयाला महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली, तसेच रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाला पत्र पाठविण्यात आले. हतनूर जलाशयाला पक्षी अभयारण्य तसेच रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळावी यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्था पाठपुरावा करीत आहे.

नवेगाव बांध (जि. गोंदिया)

नवेगाव राष्ट्रीय उद्यान भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या दक्षिणेला वसलेले आहे. राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेला नवेगाव बांध हा जलाशय इटियाडोह नदीवर बांधलेल्या बांधामुळे तयार झाला आहे. जलाशय उद्यानाच्या घनदाट जंगलाने वेढलेला आहे. ३०० वर्षांपूर्वी बांधलेला हा जलाशय आता पक्ष्यांसाठी उत्कृष्ट अधिवास झाला आहे. दर वर्षी हिवाळ्यात हजारो पक्षी येथे स्थलांतर करून मुक्कामाला येतात. दुर्दैवाने येथील पाणपक्ष्यांची गणना चांगल्या प्रकारे झालेली नाही. त्यामुळे पाणपक्ष्यांच्या संख्येची विशेष आकडेवारी उपलब्ध नाही. वन विभागाने प्रकाशित केलेल्या पक्षिसूचीमध्ये २०९ प्रजातींच्या पक्ष्यांचा अंतर्भाव आहे.

२०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सादर केलेल्या अहवालात नवेगाव बांध रामसर स्थळ म्हणून प्रस्तावित करण्याचे घोषित केले. पण नंतर नवेगाव बांधच्या प्रस्तावात कुठे तरी अडचण आल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले होते.

लोणार (जि. बुलडाणा)

बुलडाणा जिल्ह्य़ातील लोणारजवळ असलेले हे खाऱ्या पाण्याचे सरोवर अंदाजे सहा लक्ष वर्षांपूर्वी झालेल्या प्रचंड उल्कापाताने निर्माण झाले असावे असे मानले जाते. त्याच्या या निर्मितेचे तसेच खाऱ्या पाण्यामुळे वेगळेपण व महत्त्व आहे. तसेच या ठिकाणी एक आगळीवेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अंडाकृती असलेल्या सरोवराचा व्यास १.२ किलोमीटर असून सभोवती जंगलाने आच्छादलेल्या छोटय़ा टेकडय़ा आहेत. इथल्या जंगलाचा प्रकार म्हणजे शुष्क झुडपी जंगल असून त्यात बऱ्याच प्रमाणात सागवानसुद्धा आहे. या परिसरात पक्षितज्ज्ञांनी ११० पक्षी प्रजातींची नोंद केली आहे. सरोवरातील पाणी खारे असून त्यात विविध प्रकारची लवणे तसेच सोडा आढळतो. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावली की सोडय़ाचे उत्पादन केले जाते.

परिसरात स्थापत्यशास्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या साठ वास्तू आहेत. त्यात यादवकालीन तसेच हेमाडपंथी मंदिरांचा समावेश आहे. विशेष प्रसिद्ध असलेली लोणासुर व दैत्यसुदन यांची दोन मंदिरे आहेत. २००० मध्ये लोणार वन्यजीव अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. पुढे २०१६ मध्ये लोणार सरोवराचा अभयारण्यात समावेश करण्यात आला. आता अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ३.६६ चौ.किमी. आहे.

वेंगुर्ला रॉक्स (बन्र्ट आयलंड)

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वेंगुर्ला बंदराच्या पश्चिमेला अरबी समुद्रात १४ किलोमीटर अंतरावर असलेला द्वीपसमूह होय. या द्वीपसमूहात २० छोटेखानी बेटे आहेत. ही बेटे ओसाड असून येथे केवळ गवत उगवते. १९९८ मध्ये या ठिकाणी हेन्झ लेनर या पक्षितज्ज्ञाने २५ हजार सुरय पक्षी बघितल्याचा उल्लेख केला आहे. त्यात अंदाजे १५ हजार सुरय पक्ष्यांची घरटी असावीत असे अनुमान त्याने लावले होते. तसेच डॉ. सतीश पांडे यांनी अंदाजे १८ हजार इंडियन एडिबल स्विफ्टलेट पाहिल्याचे नोंदवले आहे. या बेटांवरील खडकाळ व अंधाऱ्या गुहांमध्ये इंडियन एडिबल स्विफ्टलेट या पाकोळ्यांची मोठय़ा प्रमाणावर वीण होते. या पाकोळ्यांच्या घरटय़ापासून सूप बनविले जाते. त्यामुळे त्यांच्या घरटय़ांची तस्करी होत असे. भाऊ काटदरे व इतरांच्या प्रयत्नांमुळे पाकोळ्यांच्या अंडय़ांची व घरटय़ांची तस्करी थांबली आहे.

प्रयत्नांची गरज

विशेष म्हणजे लोणार सोडून इतर सर्व जागा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व बर्डलाइफ इंटरनॅशनलद्वारा महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्रे (इम्पर्ॉटट बर्ड एरिया) म्हणून घोषित केलेल्या आहेत. महाराष्ट्र वन विभागाने या पाणथळ जागांना रामसर दर्जा मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२०१२ पासून सहा वर्षांत महाराष्ट्र शासनाच्या विचारांतर्गत असलेल्या संभाव्य रामसर स्थळांपकी एकाही स्थळाला अजून रामसर दर्जा मिळालेला नाही. पक्षिमित्रांनी पुढाकार घेऊन वन विभाग, महाराष्ट्र शासन व पर्यावरण मंत्रालय, नवी दिल्ली यांना याबाबत पत्रे पाठवून विनंती करावी. बी.एन.एच.एस.ने याबाबत पुढाकार घेतला आहेच. स्थानिक व राज्यस्तरीय प्रसारमाध्यमांनी याबाबत बातम्या देऊन जनतेचे तसेच पक्षिमित्रांचे उद्बोधन करावे. या  ठिकाणी विविध कार्यक्रम घेऊन या महत्त्वपूर्ण पाणथळ जागांना नेहमी बातम्यांच्या प्रकाशझोतात ठेवावे. महाराष्ट्रात ही रामसर स्थळे घोषित झाली तर ती आपल्याला तसेच महाराष्ट्राला भूषणावह बातमी ठरेल व या स्थळांना जागतिक पातळीवर मान्यता, प्रसिद्धी व आíथक पाठबळ मिळेल यात वाद नाही.
डॉ. राजू कसंबे – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 2, 2018 1:05 am

Web Title: convention on wetlands