08 August 2020

News Flash

वादळांची ‘ताप’वाढ!

एरवी शांत असलेला अरबी समुद्र गेल्या काही वर्षांत वादळी होऊ लागला आहे. तापमानवाढीचा फटका पश्चिम किनारपट्टीला बसत आहे.

चक्रीवादळ ही वाढत्या तापमानाशी संबंधित नैसर्गिक आपत्ती येत्या काळात वारंवार उद्भवण्याची शक्यता शास्त्रज्ञ वर्तवत आहेत.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

एरवी शांत असलेला अरबी समुद्र गेल्या काही वर्षांत वादळी होऊ लागला आहे. तापमानवाढीचा फटका पश्चिम किनारपट्टीला बसत आहे. चक्रीवादळ ही वाढत्या तापमानाशी संबंधित नैसर्गिक आपत्ती येत्या काळात वारंवार उद्भवण्याची शक्यता शास्त्रज्ञ वर्तवत आहेत. तापमानवाढीमुळे येणारी चक्रीवादळं आणि चक्रीवादळांच्या विध्वंसाचा ताप या चक्रात आपण अडकण्याची चिन्हं आहेत.

महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला असला तरी, वादळं आपल्यापासून कायमच दूर राहिली. पश्चिम बंगाल आणि गुजरातला ज्या प्रमाणात चक्रीवादळं झोडपून काढतात, तेवढा परिणाम कधीही महाराष्ट्रावर झाला नाही. त्यामुळेच ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं आपल्याला एवढं कौतुक! खरं तर या वादळाचा वेग पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला नुकत्याच धडकलेल्या अम्फान वादळाच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी होता. ‘निसर्ग’चा वेग ताशी ११० ते १२० किलोमीटर एवढा होता, तर अम्फानच्या वाऱ्यांचा वेग ताशी २६० किलोमीटर एवढा प्रचंड होता. त्यामुळे निसर्ग तसं सौम्यच म्हणायला हवं. पण तरीही त्याचा फटका किनारपट्टीला बसलाच. या फटक्यांची सवय आता आपण करून घ्यायला हवी. कारण, तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रात अशी वादळी स्थिती निर्माण होण्याचं प्रमाण येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे आणि त्याला कारण आहे अरबी समुद्राचं वाढतं तापमान!

चक्रीवादळं ही नेहमी उष्णतेशी संबंधित असतात. वाढत्या उष्णतेमुळे हवेचं बाष्पीभवन होतं आणि ती वरच्या दिशेने जाते आणि त्यामुळे समुद्राच्या पृष्ठभागालगत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं. त्यानंतर वरच्या भागातले वारे चक्राकार गतीने या क्षेत्रात शिरू लागतात आणि चक्रीवादळ निर्माण होतं. त्यामुळे उष्णता आणि चक्रीवादळांचा थेट संबंध आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते सांगतात, ‘देशाच्या पूर्व किनारपट्टीच्या तुलनेत पश्चिम किनारपट्टीवर वादळं निर्माण होण्याचं प्रमाण कमी आहे. पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांचे परिणाम अनेकदा बंगालच्या उपसागरातल्या स्थितीवर होतात. त्या वादळांमुळे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराकडे सरकून तिथे वादळं निर्माण होतात. शिवाय तिथलं पृष्ठीय तापमानही (सरफेस टेम्परेचर) अधिक आहे. त्यामुळे चक्रीवादळांची तीव्रता वाढते आणि प्रचंड प्रमाणात नासधूस होते.

अरबी समुद्रातली स्थिती बंगालच्या उपसागरापेक्षा वेगळी आहे. इथलं तापमान तुलनेने कमी आहे. शिवाय इथे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आणि त्याच वेळी हवेच्या वरच्या थरात पश्चिमेकडे वाहणारे वारे अधिक शक्तिशाली असतील, तर वादळाची तीव्रता कमी होत जाते आणि त्याचा पुढे सरकण्याचा वेग मंदावत जातो. तसं झालं नाही, तरी वादळाला दिशा देणाऱ्या वाऱ्यांमुळे (स्टिअरिंग फोर्स) हे कमी दाबाचं क्षेत्र सामान्यपणे आखाती देशांकडे किंवा गुजरातकडे सरकतं. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ही स्थिती होती आणि त्यामुळे महाराष्ट्राची किनारपट्टी वादळांपासून बरीच सुरक्षित राहिली. वादळं आली, तरी ती फारशी तीव्र नसत. पण येत्या काळात यात बदल होण्याची शक्यता आहे.’ शुभांगी यांच्या मते ‘गेल्या पाच वर्षांत अरबी समुद्रातल्या चक्रीवादळांची संख्या वाढली आहे आणि भविष्यातही ती वाढण्याची शक्यता आहे. जागतिक तापमानवाढ हे त्यामागचं कारण आहे. वाढत्या तापमानामुळे अरबी समुद्रातल्या वादळी हालचालींत वाढ होण्याची शक्यता आहे.’

पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांच्या मते, ‘अरबी समुद्रात गेल्या १२ वर्षांपासून चक्रीवादळं येत आहेत. एकंदर जगभरातच चक्रीवादळांची संख्या वाढत आहे. हे सर्व हवामान बदलाचे चटके आहेत. याचं मुख्य कारण कर्बउत्सर्जन हे आहे. हवा, जंगलं आणि समुद्र कर्ब शोषून घेतात. त्यामुळे समुद्रात कर्बआम्ल अ‍ॅसिड तयार होतं. समुद्राचं आम्लीकरण आणि पर्यायाने तापमान वाढत चालंल आहे. जगभरात एकूण ७०० ठिकाणी समुद्रातला प्राणवायू नष्ट झाला आहे. त्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे आणि त्यामुळेच चक्रीवादळांचं प्रमाणही वाढलं आहे. येत्या काळात २०० किमी वेग असलेल्या वादळांना तोंड देण्यासाठी आपल्याला तयार राहावं लागणार आहे. आपल्याकडे बांधकामं करताना चक्रीवादळांचा धोका विचारात घेतला जात नाहीत. त्यामुळे या आपत्तीतही तग धरतील अशा प्रकारची बांधकामं करावी लागतील. महाराष्ट्राला आपली किनारपट्टी वाचवायची असेल, तर खारफुटी जपली पाहिजे, ती अधिकाधिक वाढेल, याची काळजी घेतली पाहिजे. खारफुटी ही आपण राहात असलेला भूभाग आणि समुद्र यांच्यातली भिंत आहे. तिचं रक्षण केलं, तरच ती आपलं अशा चक्रीवादळांपासून रक्षण करेल. जिथे खारफुटी असते, त्या भागांत चक्रीवादळामुळे होणारं नुकसान मर्यादित राहिल्याची उदाहरणं आहेत. आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी साहित्य खरेदीला प्राधान्य दिलं जातं. पण तेवढं पुरेसं नाही. प्रशिक्षण आणि लोकसहभागाकडेही लक्ष द्यायला हवं. सरकार केवळ तात्पुरत्या उपायांवर भर देतं. दीर्घकालीन उपायांचा विचार केला जात नाही. त्यामुळे हानी वरचेवर वाढत जाते.’

या संदर्भात पर्यावरण अभ्यासक अभिजीत घोरपडे सांगतात, ‘उत्तर गोलार्धातली वादळं प्रामुख्याने उत्तरेला आणि दक्षिण गोलार्धातली वादळं दक्षिणेला सरकतात. त्यामागे पृथ्वीच्या परिवलनासह अन्यही काही कारणं असतात. अरबी समुद्रात पाच किलोमीटरच्या वरच्या भागातल्या वाऱ्याचा प्रवाह हा पूर्वेकडून पश्चिमेकडे असा असतो. त्यामुळे वादळ पश्चिमेकडे जाण्याचीही शक्यता असते. थोडक्यात, अरबी समुद्रात निर्माण होणारी वादळं एकतर उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे सरकतात. पश्चिमेकडे गेली तर ती ओमानच्या किनारपट्टीला धडकतात आणि उत्तरेकडे गेली तर गुजरात किंवा काही वेळा कराचीला जाऊन धडकतात. परिणामी मुंबईच्या किनाऱ्यांवर वादळं अपवादात्मक स्थितीतंच येतात.’ १९९० पासून अरबी समुद्रातल्या चक्रीवादळांत वाढ होऊ लागल्याचं मत भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहापात्रा यांनी नुकतंच व्यक्त केलं होतं आणि त्याचा संबंध हवामान बदलांशी असल्याची शक्यता काही अभ्यासांत वर्तवण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.

‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज’ने (आयपीसीसी) गतवर्षी प्रसिद्ध केलेल्या अहवालातही या संदर्भातला इशारा दिला आहे. हवामानबदलांमुळे मुंबईसारख्या किनाऱ्यालगतच्या आणि दाट लोकवस्तीच्या शहराला मोठा फटका बसण्याची शक्यता त्यात वर्तविण्यात आली आहे. चक्रीवादळांच्या वेगानुसार त्यांची वर्गवारी केली जाते. ‘निसर्ग’सारखं पहिल्या वर्गातलं वादळ हे सौम्य स्वरूपातलं असतं. येत्या काळात चौथ्या आणि पाचव्या वर्गवारीतली वादळं वाढण्याची भीतीही या अहवालात व्यक्त करण्यात आली होती. चौथ्या वर्गवारीतल्या वादळाचा वेग हा ताशी २०९ ते २५१ किलोमीटर एवढा असतो, तर पाचव्या वर्गवारीतल्या वादळात ताशी २५२ किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने वारे वाहतात. अशा स्वरूपाची वादळं निर्माण झाल्यास होणारी अपरिमित हानी टाळण्यासाठी सज्ज राहाणं आवश्यक ठरणार आहे.

चक्रीवादळात समुद्राला उधाण आलेलं असतं. उंच लाटा उसळत असतात. शहरातील सांडपाणी व्यवस्थेची दुरवस्था, नगर रचनेतल्या त्रुटी आणि जागा दिसेल तिथे केलेली बांधकामं इत्यादी घटकांमुळे चक्रीवादळ आल्यानंतर होणाऱ्या हानीत आणखी भर पडते. अम्फान आणि निसर्ग या दोन्हीमध्ये तापमानवाढ हे महत्त्वाचं कारण ठरल्याचं मत पुण्यातल्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी’च्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. अम्फानच्या वेळी बंगालच्या उपसागरातलं तापमान हे ३० ते ३३ अंश सेल्शियस होतं तर ‘निसर्ग’च्या वेळी अरबी समुद्राचं तापमान ३० ते ३२ अंश सेल्शियस होतं. अरबी समुद्रात मोसमी पाऊस येऊन गेल्यानंतरच्या काळात निर्माण होणाऱ्या वादळांत वाढ झाल्याचं गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. तशीच स्थिती यापुढे मान्सूनपूर्व काळातही उद्भवण्याच्या शक्यता ही संस्था तपासून पाहत आहे.

अरबी समुद्राच्या पाण्याचं तापमान सामान्यपणे कमी असतं. त्यामुळे इथे शक्यतो चक्रीवादळं निर्माण होत नाहीत आणि झाली, तरी त्यांची तीव्रता फारशी नसते. बंगालच्या उपसागराच्या तुलनेत हा समुद्र शांत असतो. गेल्या काही वर्षांत मात्र अरबी समुद्रातल्या वादळी हालचालींत वाढ झाली आहे. ‘वायू’, ‘हिक्का’, ‘क्यार’, ‘महा’, ‘पवन’ अशी अनेक वादळं या भागात निर्माण झाली. परिणामी तापमानवाढ आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वादळांचा फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला यापुढेही वारंवार बसण्याची भीती व्यक्त होत आहे. याआधी २०१४मध्ये मान्सूनोत्तर काळात निलोफर चक्रीवादळ निर्माण झालं होतं. २०१५मध्ये मेघ चक्रीवादळ आलं आणि २०१९मध्ये क्यार आणि महा चक्रीवादळांचा फटका बसला. थोडक्यात, गेल्या काही वर्षांत अरबी समुद्रात येणारी वादळं वाढली आहेत आणि काही वेळा त्यांची तीव्रताही वाढल्याची निरिक्षणं नोंदवण्यात आली आहेत. तज्ज्ञांच्या मते पर्जन्यमानातली वाढ, समुद्राची वाढती पातळी आणि कमी दाबाच्या क्षेत्राचं अल्पावधीत चक्रीवादळात होणारं रूपांतर हे हवामान बदलांचे परिणाम आहेत. अम्फान चक्रीवादळाच्या वेळी कमी दाबाच्या क्षेत्राचं अवघ्या १८ तासांत चक्रीवादळात रूपांतर झालं होतं. जगभरात येणाऱ्या चक्रीवादळांचा विचार करता भारताला वेढून असलेल्या अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात येणाऱ्या चक्रीवादळांचं प्रमाण अवघं सात टक्के आहे. मात्र या भागात लोकसंख्येची घनता प्रचंड असल्यामुळे इथे चक्रीवादळांमुळे होणारा विध्वंस अन्य ठिकाणी होणाऱ्या विध्वंसापेक्षा कितीतरी जास्त असतो.

हा प्रश्न काही केवळ भारतापुरता मर्यादित नाही. जगभरातल्या घडामोडींचा हा परिणाम आहे. जागतिक तापमान वाढीवर आपण एकटे काही उपाय करून शकत नाही. पण किमान त्यामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी तरी निश्चितच तयार राहू शकतो. प्रदूषण कमी राहावं म्हणून आपल्याकडून होता होईल तेवढे प्रयत्न करावे लागतील. डोंगर, झाडं, नद्या, नैसर्गिक नाले, खारफुटी यांच्यावर घाला म्हणजे अधिकाधिक विध्वंसाला आमंत्रण आहे. नैसर्गिक रचनेतला प्रत्येक फेरबदल या विध्वंसात भर घालतो. त्यामुळे विकासकामांसाठी डोंगर सपाट करणं, अर्निबध वृक्षतोड, नद्यांवरची अतिक्रमणं, नैसर्गिक नाले बुजवणं, खारफुटींची कत्तल करणं, त्यावर राडारोडा टाकणं बंद करावं लागेल.

आजवर आपल्यासमोर केवळ मुसळधार पावसाचंच आव्हान होतं. पण त्यात जर चक्रीवादळासाख्या शक्तिशाली आव्हानाची भर पडणार असेल आणि ती दर पावसाळ्यात येणार असतील तर मात्र आपल्याला त्या दृष्टीनेही सज्ज राहावं लागेल. आपल्या आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ात मोठे फेरबदल करावे लागतील. मुंबई आणि परिसरात तर नगररचना हा शब्द उच्चारावा, अशी स्थितीच नाही. शहरं अस्ताव्यस्त वाढली आहेत. समुद्र, नद्या, जंगलांत शिरली आहेत. पण यापुढे इमारती बांधताना या संकटाचा विचारही व्हायला हवा.

मुंबईतल्या गगनचुंबी इमारती वर्षांगणिक वाढत आहेत, या इमारती अशा संकटाला तोंड देण्यासाठी सक्षम आहेत का, हे तपासून पाहावं लागेल. पर्यावरणविषयक शक्य ते सर्व नियम गुंडाळून ठेवणाऱ्या आपल्या व्यवस्थेत त्या तशा असण्याची शक्यता धूसरच आहे. चक्रीवादळ, भूकंप, वीज यांना तोंड देण्यासाठी जे-जे नियम आहेत, ते सर्व पाळले गेले आहेत की नाहीत, याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. किमान नव्या बांधकामांना परवानग्या देताना तरी ही बांधकामं चक्रीवादळात टिकून राहातील या दृष्टीने रचना करणं आवश्यक आहे. चक्रीवादळांचा सर्वात मोठा धोक हा किनाऱ्यांवर वसलेल्या कोळीवाडय़ांना आहे. शहरांनी वेढलेल्या या कोळीवाडय़ांचा पुनर्विकास करताना या सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतील. वस्त्या समुद्रात, खाडय़ांत घुसणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. किनाऱ्यालगतच्या मुंबईसारख्या शहरांची दर पावसात काय दुरवस्था होते, हे आपण पाहातोच. त्यात भविष्यात चक्रीवादळाची भर पडली, तर काय अवस्था होईल, याची कल्पना येऊ शकते. येत्या काळात तापमानवाढीमुळे चक्रीवादळं आणि चक्रीवादळांमुळे होणाऱ्या विध्वंसाचा ताप वाढत जाणार असेल, तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आतापासूनच शक्य ते सर्व प्रयत्न करावे लागतील!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 1:31 am

Web Title: cyclone increasing temperature nisarga cyclonecoverstory dd70
Next Stories
1 टाळेबंदीचे चक्रव्यूह भेदताना..
2 स्वयंशिस्तच सोडवेल कोविडकोंडी
3 कव्हरस्टोरी : मनोरंजन उद्योगाला ओटीटीची लस!
Just Now!
X