विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

एकीकडे मंदीसदृश वातावरण आणि दुसरीकडे सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असतानाही, सोन्याच्या मागणीवर मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत येणाऱ्या सणवारी तसंच लग्नसराईत सुवर्णालंकारांची खरेदी वाढेल आणि वार्षिक सरासरी गाठली जाईल, असा विश्वास बाजारात व्यक्त होत आहे.

सोने हा भारतीयांसाठी केवळ एक मौल्यवान धातू नाही. त्यांच्या लेखी कधी ते प्रतिष्ठेचे प्रतीक असते, कधी गुंतवणुकीचे साधन असते, काही वेळा त्याला भावनिक पदर असतात, तर कधी त्याच्याकडे आर्थिक संकटातील आधार म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच त्याच्या दरातील चढ-उतारांचे पडसाद जेवढे जागतिक अर्थकारणात उमटतात, तेवढेच बहुसंख्य भारतीयांच्या जीवनातही उमटतात. वर्षांचे नऊ महिने उलटले आहेत आणि या काळात सोन्याच्या दराचा आलेख सतत वर-खाली होत राहिला आहे. या वर्षी १ जानेवारी रोजी तोळ्याला ३१ हजार ६५० रुपयांवर असलेले सोने आता ३९ हजार रुपयांचा टप्पा ओलांडून पुन्हा ३७-३८ हजारांच्या आसपास आले आहे. वर्षभरात एवढे चढ-उतार पार करूनही आणि मंदीसदृश वातावरणाच्या झळा सोसूनही सोने चमकतच राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यांतील सोने खरेदी गतवर्षीच्या तुलनेत अधिकच होती. तिसऱ्या तिमाहीत त्यात घसरण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तुलनेने कमी झालेले दर आणि सण-लग्नसराईच्या पाश्र्वभूमीवर शेवटच्या तीन महिन्यांत मागणीतील घट भरून निघेल आणि विक्रीची वार्षिक सरासरी गाठली जाईल, असा विश्वास बाजारात व्यक्त केला जात आहे.

‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालानुसार वर्षांच्या पूर्वार्धात सोन्याच्या जगभरातील मागणीचे प्रमाण हे गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक आहे. भारताचा विचार करता जानेवारी ते मार्च २०१९ या तीन महिन्यांच्या काळात सुवर्णालंकारांच्या मागणीत घट झाली. फेब्रुवारीमध्ये सोन्याने ३३ हजार ५०० रुपये प्रति तोळा एवढा दर गाठला होता. तो मार्चमध्ये ३२ हजार रुपयांपर्यंत घटला आणि मेमध्ये अक्षय्य तृतीयेच्या सुमारास ३१ हजार ५०० पर्यंत खाली आला. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला ग्राहकांनी काही प्रमाणात सोने खरेदी केले. या अहवालानुसार या मुहूर्तावर पश्चिम आणि दक्षिण भारतात झालेल्या खरेदीचे प्रमाण मोठे होते. सुरुवातीच्या काही महिन्यांत लग्नसराई आणि सणवारांमुळे सुवर्णालंकार खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे मागणीत वाढ झाली. मात्र, लग्नसराई संपली आणि पावसाळा तोंडावर असताना सोन्याच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाली. त्याचा परिणाम मागणीवर झाला. मागणीत प्रचंड घट झाली. डॉलरची किंमत वधारली आणि परिणामी सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या. २० जूनपर्यंत ३३ हजार ५०० रुपये प्रति तोळा असलेले सोन्याचे दर नंतर ३४ हजार सहा रुपयांपर्यंत पोहोचले. सोने खरेदीकडे पाठ फिरवलेल्या ग्राहकांना खरेदीसाठी उद्युक्त करण्याच्या प्रयत्नात व्यापाऱ्यांनी घडणावळीवर सवलती जाहीर करण्यासारख्या विविध क्लृप्त्या आजमावून पाहिल्या, मात्र त्यांना यश आले नाही.

अशा परिस्थितीत जुलैमधील अर्थसंकल्पात सोन्यावरील सीमा शुल्क सरकार कमी करेल आणि त्यामुळे सोन्याचे दर आवाक्यात येतील, अशी आशा ग्राहकांना होती. मात्र त्याउलट सोन्यावरील सीमा शुल्क २.५ टक्क्यांनी वाढवण्यात आले. आधी १० टक्के असलेले हे शुल्क १२.५ टक्क्यांवर पोहोचले आणि ग्राहकांच्या आशा धुळीला मिळाल्या. या करवाढीमुळे सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गतवर्षी ९५ टन सोन्याची तस्करी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाढलेला कर चुकवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात तस्करी केली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस दराने उच्चांक गाठला असला, तरी संपूर्ण तिमाहीचा विचार करता मागणी गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिकच होती. २०१८च्या दुसऱ्या तिमाहीत १४९.९ टन सोन्याची विक्री झाली होती, तर २०१९मध्ये हेच प्रमाण १६८.६ टनांवर पोहोचले. ज्यांच्या दृष्टीने ही दरवाढीची सुरुवात होती, त्यांनी पुढील लाभांवर नजर ठेवून सोने खरेदी सुरू केली, तर इतरांनी दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत सोने खरेदी लांबणीवर टाकली.

दरवाढीचे पडसाद खऱ्या अर्थाने तिसऱ्या तिमाहीत उमटू लागले. जूनमध्ये ३४ हजारच्या आसपास असलेले सोन्याचे दर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत वेगाने वाढत गेले. जुलैमध्ये ३४ ते ३५ हजारांच्या आसपास असलेले सोने वधारत २९ ऑगस्टला ३९ हजार ७२ रुपयांवर पोहोचले. सप्टेंबरमध्ये दर हळूहळू कमी होत गेले आणि ३७ ते ३८ हजारांच्या दरम्यान आले. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने या तिसऱ्या तिमाहीचा अहवाल अद्याप जाहीर केला नसला, तरी या तिमाहीत सोन्याला असलेली मागणी घसरल्याचा अंदाज वर्तवला आहे. सोने खरेदीत जगात भारत चीनसह अग्रस्थानी आहे. भारतातील सोन्याच्या एकूण खरेदीपैकी दोनतृतीयांश खरेदी ग्रामीण भागांतून केली जाते. तेथील ग्राहक प्रामुख्याने दागिने खरेदी करतो. सोन्याच्या किमती वधारल्या की हा ग्राहक खरेदी थांबवतो. सध्याच्या वाढत्या किमतींच्या पाश्र्वभूमीवर या ग्राहकाने सोने खरेदीत हात आखडता घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याचे दर साधारण १० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे मागणीत घट झाली असून त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होण्याची शक्यता, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने वर्तवली आहे.

तिसऱ्या तिमाहीत झालेली घसरण चौथ्या म्हणजेच शेवटच्या तिमाहीत भरून निघेल, असा अंदाज कौन्सिलने वर्तवला आहे. ऑगस्टच्या तुलनेत दर काहीसे कमी झाले आहेत, त्यामुळे बाजारपेठेला थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वर्षांअखेरीस सोन्याची खरेदी ७५० ते ८५० टनांच्या दरम्यान पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गतवर्षी भारतात ७६०.४ टन सोने खरेदी करण्यात आले आणि गेल्या १० वर्षांतील सोने खरेदीची सरासरी ८३८ टन एवढी आहे. दरवर्षी साधारण ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान सोन्याच्या खरेदीत वाढ होते. दसरा, दिवाळीसारखे सण आणि त्यामागोमाग सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे ग्राहक मोठय़ा प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी करतात. जून ते ऑगस्टदरम्यान झालेली दरवाढ ऑक्टोबपर्यंत ग्राहकांच्या पचनी पडेल आणि शेवटच्या तिमाहीत मोठय़ा प्रमाणात सोने खरेदी होऊन वार्षिक सरासरी गाठली जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाव वाढले की ग्राहक घरातील जुने सुवर्णालंकार तसंच सोन्याच्या इतर वस्तूंची विक्री करतात. सध्याच्या भाववाढीच्या पाश्र्वभूमीवर असे जुने सोने बाजारात येण्याची आणि त्यामुळे सोन्यातील व्यवहार वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

अहवालानुसार याच कालावधीत चीनमधील सोन्याच्या मागणीत गेल्या सलग तीन तिमाहींमध्ये घसरण झाली आहे. जूनमध्ये भारतातील सोने खरेदी १३ टक्क्यांनी वाढली. या तिमाहीत २१३.२ टन सोने खरेदी केले गेले. त्यामुळे डिसेंबर २०१३च्या तिमाहीनंतर प्रथमच भारत चीनला मागे टाकत सोने खरेदीत प्रथम स्थानी पोहोचला. अमेरिका, आखाती देश आणि तुर्कस्तानातील सोन्याच्या मागणीतही पहिल्या दोन तिमाहीत तुलनात्मक वाढ नोंदवली गेली.

सोन्याचे बार आणि नाणी खरेदी करण्याचे प्रमाण पहिल्या सहामाहीत जगातील बहुतेक देशांत घसरले. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोन्याची नाणी आणि बार खरेदी करणाऱ्यांच्या प्रमाणात जगभरात १२ टक्के घट झाली. त्यापैकी जवळपास दोनतृतीयांश घट चीनमध्ये नोंदवली गेली. असे असताना भारतात मात्र हा पर्याय स्वीकारणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. नाणी-बार खरेदी करणाऱ्यांच्या प्रमाणात पहिल्या दोन तिमाहींत १३ टक्के वाढ झाली. येत्या काही महिन्यांत सोन्याच्या दरात तोळ्यामागे साधारण एक ते दोन हजार रुपयांनी घट होईल आणि त्यानंतर ते बराच काळ स्थिर राहतील, अशी शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवत आहेत.

‘जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी फेडरेशन’चे अध्यक्ष नितीन खंडेलवाल सांगतात, ‘गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दरातील चढ-उतारांमुळे दागिन्यांच्या मागणीत मोठी घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत दागिने खरेदी जवळपास ५० टक्के कमी झाली आहे. मात्र आता सणांचा कालावधी सुरू झाला आहे. दसरा, दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर लग्नसराईचा काळ सुरू होईल. त्यामुळे त्या काळातही सोन्याची मागणी सध्याच्या तुलनेत वाढेल. मंदीच्या पाश्र्वभूमीवर सोन्यातील गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे. मंदीच्या संकटांतून तरून जाण्यासाठी प्रत्येकाने आपल्या एकूण आर्थिक गुंतवणुकीपैकी २५ टक्के गुंतवणूक सोन्यात करणे आवश्यक आहे.’

थोडक्यात देशातील आर्थिक क्षेत्राला मंदीसदृश वातावरण भेडसावत असताना आणि सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असतानाही, सोन्याला असलेल्या मागणीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. मंदीतील सर्वात सुरक्षित ठेव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्याला आजही तेवढीच मागणी आहे. मात्र सोन्याचे बार, नाणी, पेपर गोल्ड किंवा गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा दागिने घेण्यात भारतीयांना असलेले स्वारस्य आजही तुलनेने अधिक आहे. मंदीसदृश वातावरणात अर्थव्यवस्थेला अनेक प्रश्नांनी ग्रासलेले असतानाही सोन्याची झळाळी कायम राहिली आहे.