21 April 2019

News Flash

अ‍ॅक्सेसरिजचा ट्रेण्ड

कोणतीही फॅशन करताना फक्त कपडे महत्त्वाचे नसतात तर त्याबरोबरच दागिने, पर्स, बेल्ट, घडय़ाळं, चपला हे सगळं महत्त्वाचं असतं.

दिवाळी आणि लग्नसमारंभामध्ये मिरवायला सगळ्यांनाच आवडतं.

तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com
कोणतीही फॅशन करताना फक्त कपडे महत्त्वाचे नसतात तर त्याबरोबरच दागिने, पर्स, बेल्ट, घडय़ाळं, चपला हे सगळं महत्त्वाचं असतं. त्या सगळ्यांनी मिळून तुमचा लूक पूर्ण होतो.

दिवाळी आणि लग्नसमारंभामध्ये मिरवायला सगळ्यांनाच आवडतं. मिरवणं म्हणजे काहीतरी नवीन, हटके आणि ट्रेण्डमध्ये असलेले कपडे आणि दागिने घालणं. अशा वेळी कपडय़ांसोबत योग्य आणि फॅशनेबल अ‍ॅक्सेसरीज फार महत्त्वाच्या असतात. कारण कितीही छान कपडे असले तरी त्यावर घातलेली अ‍ॅक्सेसरी चुकली तर पूर्ण लुक फसतो. आजच्या तरुणाईचा कल स्मार्ट, आरामदायी, वेगवेगळ्या प्रसंगी वापरता येईल अशा अ‍ॅक्सेसरीजकडे आहे. तरुणांना नेहमीच काहीतरी हटके, नवीन हवं असतं. म्हणून दरवर्षी बाजारात अनेक नवीन प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज दाखल होतात. यंदा कोणत्या अ‍ॅक्सेसरीजचा बोलबाला आहेत ते बघूयात.

कानातले : दोन्ही कानात दागिने घालणे ही अगदी आधीपासून चालत आलेली पद्धत आहे. पण दोन्ही कानात दागिने घातलेच पाहिजेत ही रीत आता मोडीत निघाली आहे. अनेक शोमध्ये फॅशन रॅम्पवर मॉडेलच्या फक्त एकाच कानात इयररिंग्ज घातलेल्या बघायला मिळतात. आता फक्त एका कानात इयरिरग्ज घालायची फॅशन आहे. त्यामुळे बिनधास्त तुम्हाला आवडलं तर एकाच कानात दागिने घाला. त्याखेरीज इअरिरग्जच्या फॅशनमध्ये पुन्हा ९०चा काळ परत आल्याचं दिसून येत आहे. ९०च्या दशकातील प्रसिद्ध हूप्स अर्थात मोठय़ा मेटलच्या िरगा पुन्हा फॅशनमध्ये आल्या आहेत. हे हूप्स ट्रेडिशनल ते वेस्टर्न अशा कोणत्याही आऊटफिटवर तुम्ही घालू शकता. यंदा असमान आकाराच्या इअरिरग्ज बाजारात आल्याचे दिसत आहे.

नेकपीस : नेकपीसमध्ये गेल्या काही वर्षांपासून चोकरला खूप पसंती आहे. साधे बारीक, काळे चोकर अनेकांनी स्टाइल स्टेटमेंटस म्हणून मिरवले. हेच स्टाइल स्टेटमेंट यंदा अजून एका वरच्या पातळीवर बाजारात आले आहे. सुंदर खडय़ांचे, मेटलचे चोकर फॅशनमध्ये आले आहेत. हे चोकर एकदम क्लासी दिसतात. आणि हे कोणत्याही प्रकारच्या आऊटफिटवर सहज जातात. यासोबतच चंकी नेकपीसही ट्रेण्डिंग आहेत. सिल्व्हर रंगाचे हे चंकी नेकपीस साध्याशा ड्रेसला वेगळाच लुक आणतात. आणि ही ज्वेलरी योग्य काळजी घेतली तर लवकर खराबही होत नाही. इयररिंग्जच्या असमान आकारांप्रमाणे नेकपीसच्या आकारामधेही असमान नेकपीस दिसून आले.

चंकी आणि सिल्वर ज्वेलरी : रोजच्या जीवनात बेसिक ज्वेलरी वापरून आपल्याला फॅशनेबल आणि हटके लुक हवा असतो. आणि म्हणूनच अनेक ब्रॅण्ड्सनी चंकी तसंच आणि सिल्व्हर ज्वेलरी बाजारात आणली आहे. या ब्रॅण्डअंतर्गत तुम्हाला नोजिरग, खुडी, नेकपीस, कानातले, अंगठी, कंबरपट्टा असं सगळंच तुम्हाला बघायला मिळेल. त्याशिवाय जुने ट्रेडिशनल मोटीफ, डिझाइन नवीन लुकमध्ये मिळतात. यामुळे इंडोवेस्टर्न अशी ही ज्वेलरी तुम्ही ट्रेडिशनल, वेस्टर्न अगदी जीन्स, वनपीस अशा सगळ्याच आऊटफिटवर घालू शकता. याखेरीज लोकल ते ग्लोबल अशा बाजारपेठेमध्ये चंकी ज्वेलरीचा ट्रेण्ड काही महिन्यांपासून खूप आहे. ही चंकी ज्वेलरी लवकर खराब होत नाही. ती सगळ्या प्रकारातही  उपलब्ध आहे. आणि तिच्या किमतीही तरुणांना पॉकेटफ्रेंडली आहेत. त्यामुळे तरुणवर्ग रोज या ज्वेलरीचा वापर करतो.

प्लॅटिनम ज्वेलरी : आताची तरुण पिढी आकाराने लहान असलेली ज्वेलरी वापरते. रोजच्या जीवनात किंवा अगदी मोठय़ा कार्यक्रमालाही तरुण पिढी सोन्याऐवजी इतर धातूंच्या ज्वेलरीला प्राधान्य देते. प्लॅटिनम ज्वेलरीमध्ये बाजारात प्लॅटिनम लव बॅण्डस्, अंगठी, ब्रेसलेट, हेवी, नाजूक असे नेकपीस, कानातले, छोटे डिझायनर पेण्डंट असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. ही ज्वेलरी कोणत्याही आऊटफिटवर आणि कोणत्याही कार्यक्रमाला सहज घालता येते.

कापडी ज्वेलरी : कापडापासून बनवलेली ज्वेलरी हा प्रकार तसा नवीन नाही. पण ही ज्वेलरी तशी जास्त ट्रेण्डमध्येही येत नाही. पण हाच ट्रेण्ड बदलण्यासाठी आणि इकोफ्रेंडली ज्वेलरीचा पर्याय म्हणून अनेक ब्रॅण्डस्नी बाजारात कापडी ज्वेलरी आणली आहे. ब्रॅण्डच्या कलेक्शनमध्ये खास खणापासून बनवलेले नेकपीस, चोकर, तर कापडाचे आणि त्यावर हाताने रंगवलेले इयरिरग्ज असं सगळं आहे. ही ज्वेलरी तुम्ही पारंपरिक तसंच इंडो वेस्टर्न आऊटफिटवर घालू शकता. याखेरीज अनेक ऑनलाइन शॉिपग साइटवर तुम्हाला सिल्क धाग्यांचे आणि कापडाचे, वेगवेगळ्या फुलांचे डिझाइन असलेले नेकपीस, बांगडय़ा, कानातले असं उपलब्ध आहे.

बॅग्ज : बॅग्जमध्ये फनी पॅक्स् हा बॅगचा प्रकार बघायला मिळत आहे. या छोटय़ाशा बॅगा तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. वेगवेगळ्या आकारांतल्या या बॅग्ज तुम्ही तुमच्या आऊटफिटनुसार निवडू शकता. यासोबतच छोटय़ा बॅकपॅक, हॅण्डबॅग, िस्लग बॅगही ट्रेण्डिंग आहेत. आणि या बॅग्जमध्ये जास्तीत जास्त पेस्टल रंगाच्या शेड फॅशनमध्ये आहेत. काही फॅशन डिझायनरच्या शोजमध्ये सुंदर क्लचेसचा वापर दिसला. त्यामुळे  सुंदर भरजरी ड्रेसवर वेगवेगळे खडे, सिक्वेन्स, एम्ब्रॉयडरी एम्ब्लिशमेंट केलेले क्लच बाजारात आले आहेत. हे क्लचेस तुम्ही कोणत्यही पारंपरिक, जड अशा आऊटफिटवर कॅरी करू शकता.

बेल्ट्स : साडीवर आपण नाजूक कंबरपट्टा घालतो. परंतु साडीवर लेदर, फर, कापडाचे असे वेगवेगळे बेल्टही घालू शकतो. कंबरपट्टय़ासारखे असे वेगवेगळे बेल्ट साडीवर घालून बघायला काहीच हरकत नाही. मुलींच्या बेल्टचा आकार हा जास्तीत जास्त लहानच असतो पण आता मोठय़ा आकाराचे बेल्ट्स ट्रेण्डिंग आहेत. बेल्ट्सचा वापर स्कर्ट आणि टॉप, साडी, कुर्ती, गाऊन आणि वनपीस अशा वेस्टर्न कपडय़ांवरही नक्कीच करून बघा.

स्मार्ट वॉच : खरं तर स्मार्ट वॉच ही काही तशी नवीन संकल्पना नाही. आज बाजारात मिळणारी स्मार्ट वॉच  युनिसेक्स अर्थात मुलगे आणि मुली अशा दोघांसाठी डिझाइन केलेली आहेत. काही कंपन्यांनी फक्त मुलींसाठीसुद्धा खास स्मार्ट घडय़ाळं आणली आहेत. कारण बाजारातील घडय़ाळं युनिसेक्स असतात त्यामुळे मुलींना ती प्रत्येक आऊटफिटवर घालता येतातच असं नाही. स्नो व्हाइट, रोझ गोल्ड आणि ब्लू सॅफिअर ही घडय़ाळं मुलींच्या हातावर परफेक्ट बसतील आणि कूल लुक दिसेल अशी आहेत. बॉडी गोल्ड मेटॅलिक आणि पट्टा बारीक लेदरचा असा लुक असणारी घडय़ाळं मुली कोणत्याही ड्रेसवर सहज कॅरी करू शकतात. स्मार्ट घडय़ाळामुळे अनेक  प्रॉब्लेम सहज सुटले आहेत. स्मार्ट घडय़ाळावर आपण कॉल घेऊ किंवा करू शकतो, त्यावर मेसेज बघायची आणि पाठवायची सोय आहे. त्यामुळे कधीही वेळप्रसंगीही कोणीही घडय़ाळाचा योग्य वापर करू शकतात. याखेरीज अशा स्मार्ट घडय़ाळामध्ये फिटनेसविषयक कॅलरी काऊंटर, स्टेप काऊंटर असं सगळंच आहे. या सगळ्या गोष्टीमुळे अशी स्मार्ट घडय़ाळं स्टायलिश लुकसोबत हव्या त्या वेळी मदतीला येणारी अशी आहेत.

आय वेअर : आयवेअर म्हणजेड चष्म्यामध्ये टॉरटॉइज शेलची फ्रेम असणारा चष्मा, क्लीअर व्हाइट फ्रेम चष्मा, ब्लॅक रीम्ड फ्रेम चष्मा, गोल्ड मेटल वेअरफ्रेम ग्लास अशा चष्म्याच्या फ्रेम ट्रेण्डिंग आहेत. चष्म्याच्या शेपमध्ये चौकोनी, गोल, अ‍ॅव्हिएटर शेप, ओवर साइज हे ट्रेण्िंडग आहेत. सनग्लासेसमध्ये गोल, चौकोनी, कॅट आय आकाराचे रेट्रो सनग्लासेस, ट्रान्स्परंट सनग्लासेस, लाल, नारंगी, पिवळ्या रंगाची शेड असणाऱ्या सनग्लासेस ट्रेण्डिंग आहेत.

फुटवेअर : रोजच्या जीवनातही कपडे, मेकअप, वेगवेगळ्या ज्वेलरीसोबतच पायतली चप्पलदेखील तेवढीच महत्त्वाची असते. मुलांसाठी फूटवेअरमध्ये जास्त पर्याय नसले तरी मुलींसाठी भरपूर पर्याय असतात. आता शक्यतो हिल्स जास्त वापरल्या जात नाहीत. हिल्सला फाइट द्यायला मस्त फ्लॅट चप्पल बाजारात आल्या आहेत. आणि त्यातूनही फ्लॅट चप्पलमध्ये कोल्हापुरी चपलेचा बोलबाला आहे. आधी कोल्हापुरी चप्पल टिपिकल तपकिरी (ब्राऊन) रंगामध्ये येत होत्या. पण आता त्या अगदी पिवळ्या, हिरव्या रंगापासून ते काळ्या, जांभळ्या रंगापर्यंत उपलब्ध आहेत. आणि त्यावर लावलेल्या गोंडय़ांची तर शानच वेगळी आहे. या गोंडय़ांमुळे कोल्हापुरी चपलेला हटके लुक मिळतो. या चप्पल कोणत्याही पारंपरिक कपडय़ांवर छान दिसतातच पण या सोबतच त्या वेस्टर्न आऊटफिटवरसुद्धा खुलून दिसतात. एखाद्या जीन्स आणि टॉप किंवा मग वन पीसवर कोल्हापुरी चप्पल घालून बघा, तुम्हाला नक्कीच हटके लुक मिळेल. या सोबतच प्लॅटफॉर्म हिल्सचाही ट्रेण्ड आहे. ७० आणि ९० सालच्या काळात वापरले जाणारे हे हिल्स पुन्हा ट्रेण्डमध्ये आले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनचे शूज आणि सॅन्डल्स बाजारात आले आहेत.

First Published on October 26, 2018 1:03 am

Web Title: diwali special fashion accessories