21 April 2019

News Flash

फॅशनेबल शॉपिंग

सणासुदीला फॅशनेबल दिसायचं तर आत्ता काय ट्रेण्डमध्ये आहे ते आपल्याला माहीत असायला हवं

यंदा कोणते रंग, कापड, एम्ब्रॉयडरी, प्रिंट, गारमेंट्स किंवा सिलोव्हेट्स ट्रेण्डमध्ये आहेत ते बघूयात.

तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com
सणासुदीला फॅशनेबल दिसायचं तर आत्ता काय ट्रेण्डमध्ये आहे ते आपल्याला माहीत असायला हवं; तरच हटके शॉपिंग करता येईल.

दिवाळीत आणि लग्नसराईमध्ये मिरवण्यासाठी शॉपिंग करायला निघाला आहात?  मग यंदा कोणते रंग, कापड, एम्ब्रॉयडरी, प्रिंट, गारमेंट्स किंवा सिलोव्हेट्स ट्रेण्डमध्ये आहेत ते बघूयात.

रंग : फॅशनमधला महत्त्वाचा घटक म्हणजे रंग. रंगामुळे फॅशन फसते किंवा खूपच उठावदार होऊ शकते. लाइट रंगाच्या कलर पॅलेटपासून ते डार्क रंगापर्यंत सगळेच रंग बाजारात आहेत. लाइट रंगामध्ये यंदा गुलाबी, तपकिरी, पोपटी, चंदेरी, निळा असे अनेक रंग ट्रेण्डमध्ये आहेत. तर डार्क रंगांमध्ये प्रामुख्याने काळा, चॉकलेटी, लाल, सोनेरी, मेहंदी असे रंग ट्रेण्डमध्ये आहेत. आपण कपडे निवडताना किंवा घालताना नेहमी कॉन्ट्रास्ट रंगांची निवड करतो. पण यंदा एकसारखे रंगच ट्रेण्डमध्ये आहेत. उदाहरणार्थ टॉप लाइट हिरवा किंवा पोपटी रंगाचा असेल तर त्यावर डार्क हिरव्या रंगाचा स्कर्ट घालू शकता. अर्थात एकाच रंगाच्या डार्क आणि लाइट शेड घालून ट्रेण्डी लुक मिळवता येईल. सणासुदीला शक्यतो काळ्या रंगाचे कपडे टाळले जातात. पण यंदा ब्लॅक इज ट्रेण्डी. यंदा पारंपरिक कपडय़ांवर काळ्या रंगाची जादू आहे.

एम्ब्रॉयडरी : यंदा एम्ब्रॉयडरी केलेले कपडे तसे कमी बघायला मिळत आहेत. जी एम्ब्रॉयडरी दिसते आहे ती हलकी आहे. कारण यंदा जड नाही तर हलक्या, सुटसुटीत एम्ब्रॉयडरीचा ट्रेण्ड आहे.  लाइट थ्रेड वर्क आणि हलके जरीवर्क जास्त ट्रेण्डमध्ये आहे. जरीवर्कसह छोटे मणी, सिक्वेन्स आणि टॅसलचं कामही बघायला मिळतं आहे. यंदा एम्ब्रॉयडरीऐवजी जास्तीत जास्त वापर टॅसलचा होत आहे. सध्या टॅसलचा ट्रेण्ड आहे. गारमेंटपासून ते बॅग्ज, ज्वेलरी आणि फुटवेअपर्यंत सगळीकडे या टॅसलचा वापर दिसतोय.

प्रिंट : प्रिंटमुळे कपडय़ांना नवीन लुक मिळतो. मोठय़ा बोल्ड प्रिंटपासून ते अगदी लहान बुट्टीमुळेसुद्धा कपडय़ांचा चेहरामोहरा बदलतो. यंदा सगळ्या साइजच्या प्रिंट दिसत आहेत. अ‍ॅनिमल प्रिंट, पांढऱ्या रंगावर प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या प्रिंट, मानवी आकृत्या, फुलं, पानांच्या प्रिंट बाजारात बघायला मिळतील.  काही अंशी मधुबनी पेंटिंग आणि पारंपरिक हॅण्ड ब्लॉग प्रिंटसुद्धा बघायला मिळत आहेत. त्यामुळे यंदा  प्रिंट ट्रेण्डमध्ये आहेत.

गारमेंट्स किंवा सिलोव्हेट्स :  रंग, प्रिंट, एम्ब्रॉयडरी या सगळ्यांचा मेळ आपल्याला गारमेंट्सवर बघायला मिळतो. गारमेंट्समध्ये  सहसा साइड कट, फ्रंट कट हे दोनच कट्स आपल्याला माहीत असतात. परंतु यंदा स्लीव्ह्जवर कट्स, क्रॉस कट्स, क्रॉप  टॉपला ऑफ फ्रंट कट्सपासून बॉटम्सला खालच्या बाजूला कट्स असे अनेक कट्स ट्रेण्डमध्ये आहेत. कट्ससोबतच लेअिरगसुद्धा बघायला मिळत आहे. लेदर, नेट, टिशू फ्रॅब्रिकचे जॅकेट्स ट्रेण्डमध्ये आहेत. स्लीव्ह्जमध्ये बलून स्लीव्ह्ज, लाँग, थ्रीफोर्थ, कफ्तानी स्टाइल, ट्रम्पेट, किमोनो, लेग ऑफ मटन, बिशप, बेल अशा स्लीव्ह्जचा बोलबाला आहे. त्यामुळे यंदा स्लीव्ह्जमध्ये अनेक ट्रेण्ड आहेत. ओव्हरसाइझ गारमेंट्सचा ट्रेण्ड या वर्षीही आहे. अंगाला चिकटून राहणाऱ्या अनकम्फर्टेबल कपडय़ांपेक्षा सुटसुटीत काहीशी ओवरसाइझ गारमेंट्स यंदाही बाजारात बघायला मिळणार आहेत. यासोबतच या वर्षी सणासुदीला, लग्नसराईमध्ये मिक्स अ‍ॅण्ड मॅचचा ट्रेण्ड असणार आहे. ब्लाऊजच्या ऐवजी साडीवर क्रॉप टॉप, लाँग ब्लाऊज, जॅकेट ब्लाऊज, लाँग कुर्त्यांवर स्कर्ट, ए लाईन फॉर्मल पॅन्टवर फ्रंट कट कुत्रे हे मिक्स मॅचचे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत. या सगळ्याप्रमाणेच वर्षांनुवर्षे चालत आलेले लेहेंगा चोली, अनारकली ड्रेस, जम्प सूट हेसुद्धा ट्रेण्डमध्ये आहेतच. बघा मग या सगळ्यामधलं तुम्हाला काय आवडतं.

कापड / फॅब्रिक –  तरुणांना आकर्षति करणारे फॅब्रिक म्हणजे जॉर्जेट, शिफॉन. हे तर ट्रेण्डमध्ये आहेतच, पण यंदा खादी, कॉटन, मलमल, लिनन असे मोस्ट कम्फर्टेबल कापडही ट्रेण्डमध्ये आहेत. याखेरीज बोक्रेड, शायनी मटेरियल, नेट, सिल्कसुद्धा काही अंशी ट्रेण्डमध्ये आहे.

या सगळ्याबरोबरच बाजारात कोणते आउटफिट्स आलेत हे बघूयात.

इंडियन गाऊन्स

गाऊन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळे वेस्टर्न लॉन्ग ड्रेस, रेड काप्रेटवरची फॅशनच आठवते. पण या वर्षी रोजच्या वापरातही साधे वेस्टर्न वनपीस आणि गाऊन ट्रेण्डमध्ये आहेत. मग त्याबरोबरच पारंपरिक गाऊन बाजारात नसतील असं कसं होईल? बाजारात पारंपरिक गाऊनही इंडियन गाऊन्स या नावाने उपलब्ध आहेत. आणि हे गाऊन्स सर्व वयोगटाच्या पसंतीला उतरलेले आहेत. गाऊन्समध्ये कॉटन, बोक्रेड, शाइनी मटेरियल, नेट  या कापडासोबतच  सिल्कचे वेगवेगळे प्रकार, खादी, कांजीवरम, आणि अगदी वेल्वेटसारखा लुक देणारे कापड फॅशन कलेक्शनमध्ये आले आहे. या गाऊन्सवर केली जाणारी एम्ब्रॉयडरी हे खास आकर्षण असतं. अशा गाऊन्सवर काही खास ज्वेलरी घालण्याचीही गरज भासत नाही. हे इंडियन गाऊन्स वेगवेगळ्या सिलोव्हेट्स आणि रंगांमध्ये बाजारात आहेत.

वेस्टर्न टॉप, स्ट्रेट पॅन्टस : स्ट्रेट पॅन्ट हा पलाझोचाच छोटा प्रकार आहे. स्ट्रेट पॅन्ट्स आणि वेस्टर्न टॉपही ट्रेण्डमध्ये आहेत. स्ट्रेट पॅन्ट्सवर तुम्ही पारंपरिक प्रिंट असलेला टॉप, तसंच क्रॉप टॉप घालू शकता. त्यावर लाँग किंवा शॉर्ट जॅकेट्स घालून हटके लुक मिळवू शकता. त्याबरोबरच वेगळं काही हवं असेल तर टॉप आणि स्ट्रेट पॅन्ट्सवर तुम्ही ओढणीही वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करू शकता.

टॉप आणि स्कर्ट

फेस्टिव्हल सिझनमध्ये स्कर्ट हमखास घातले जातात. पारंपरिक स्कर्टवर वेस्टर्न टॉप किंवा वेस्टर्न स्कर्टवर पारंपरिक टॉप असं कॉम्बिनेशन घालू शकता. पारंपरिक प्रिंट किंवा कापडापासून बनवलेला स्कर्ट आणि त्यावर केप, शर्ट, ऑफशर्ट टॉप, कोल्ड स्लीव्ह टॉप घालू शकता. आणि वेस्टर्न प्लेन स्कर्टवर फ्रंट कट टॉप, ब्लाऊज, टी-शर्ट घालू शकता. या दोन्ही लुकवर नेकपीस, जॅकेट्स, स्टोल, ओढणी वापरू शकता.

पलाझो आणि कुर्ती

फेस्टिव्हल सीजन असला तरी आपलं ऑफिस, कॉलेज किंवा इतर अनेक कामं सुरूच असतात. अशा वेळी आपल्याला पारंपरिक कपडे तर घालायचे असतात, पण त्यासोबतच प्रवास करताना, धावपळ करताना आरामदायी होतील असेच कपडे हवे असतात. यासाठी ट्रेण्डमध्ये असणारी  पलाझो आणि कुर्ती किंवा टॉप तुम्ही घालू शकता. साधी ब्राइट रंगाची पलाझो आणि त्यावर फ्रंट कट कुर्ती, स्ट्रेट कट कुर्ती,  शॉर्ट कुर्ती, असमान हेमलाइन असलेली कुर्ती सध्या ट्रेण्डमध्ये आहे. अशाच प्रकारे पारंपरिकरीत्या विणलेल्या कपडय़ांपासून बनवलेल्या पलाझो पॅन्ट्स, साडीपासून बनवलेल्या पलाझोवर तुम्ही वेस्टर्न टॉप घालू शकता. वेस्टर्न टॉपमध्ये क्रॉप टॉप, वेस्टर्न शर्ट, प्लेन टी-शर्ट, केप असे अप्पर गारमेंटस घालू शकता. अशा स्टाइलवर तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी बोल्ड नेकपीस, मोठे कानातले घालून लुक पूर्ण करू शकता.

पारंपरिक पेहराव

पारंपरिक कपडे म्हटलं की साडी आलीच. साडीमध्ये जसे अनेक प्रकार आहेत तसेच साडी नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत. आणि यंदा त्या प्रकारात अनेक वेगवेगळे प्रयोग फॅशन डिझायनर्सनी केलेले बघायला मिळत आहेत. साडी नेसणं म्हणजे खरं तर एक मोठं कापड अंगाभोवती सौंदर्यपूर्ण रीतीने गुंडाळणं. या ड्रेिपग स्टाइलमध्ये तुम्ही थोडा जरी बदल केलात तरी तुम्हाला नवीन लुक सहज मिळू शकतो. फॅशन सायकल पुन्हा फिरून जुन्या काळातील फॅशनकडे वळतेच. फक्त जुनी फॅशन नव्याने येताना त्यात नवीन काहीतरी नवीन घटक असतो. अशा प्रकारे साडीमध्येही ८० आणि ९० च्या दशकातील ट्रेण्ड पुन्हा आला आहे त्यामुळे ‘एटीज अ‍ॅण्ड नायटीज ट्रेण्ड इज बॅक’ असं आपण नक्कीच म्हणू शकतो. त्या काळातील सिल्कच्या साडय़ांना थोडा नवीन टच देऊन अनेक डिझायनर्सनी त्या बाजारात आणल्या आहेत. सिल्कची साडी म्हटलं की हेवी आणि शायनी कापड, ब्राइट रंग असं डोळ्यासमोर येतं. पण आताचा फॅशननुसार थोडी कमी शाइन असलेलं सिल्क, आणि स्काय ब्लू, पोपटी रंग, पिंक असे ट्रेण्डमध्ये असणारे रंग फॅशनमध्ये आहेत. पूर्ण साडीपेक्षा फक्त साडीच्या पदरावर सिल्कची बॉर्डर असलेल्या साडय़ा या सणासुदीला ट्रेण्डमध्ये असणार आहेत.

पंजाबी ड्रेस : साडीनंतर पंजाबी ड्रेस, अनारकली ड्रेस, कुर्ती लेगिंग अशाच आऊटफिटला पसंती असते. यामध्ये बेसिक पटियाला सलवार  आणि त्यावर घातली जाणारी शॉर्ट कुर्ती किंवा कमीज नेहमीच ट्रेण्डमध्ये असते. पण यंदा हीच पटियाला सलवार वेगळ्या रूपात म्हणजेच धोती पॅन्ट्सच्या रूपाने बाजारात आली आहे. धोती पॅन्ट्सची फॅशन काही वर्षांपूर्वी होती. आता तीच फॅशन परंतु थोडा हटके लुक घेऊन पुन्हा ट्रेण्डमध्ये आली आहे. या धोती पॅन्ट्सवरती तुम्ही क्रॉप ट्रॅडिशनल टॉप, कुर्ती, केप, फ्रंट आणि साइड कट कुर्ती घालू शकता. याखेरीज नेहमीप्रमाणे लेगिंग्सवर शॉर्ट लेंग्थ ते अगदी अँकल लेंग्थपर्यंतची कुर्तीही ट्रेण्डमध्ये आहे. कुर्ती आणि स्ट्रेट पॅन्ट्सचा पर्यायही वापरून बघायला हरकत नाही.

ब्लाऊजचा जुनाच लुक : फॅशन सायकलनुसार जुन्या काळातील ब्लाऊजची फॅशन पुन्हा आली आहे. काही वर्षांपूर्वी कॉलर ब्लाऊजची चलती होती, आता पुन्हा कॉलर ब्लाऊज ट्रेण्डमध्ये आला आहे.  यामध्ये तुम्हाला शर्ट कॉलर ब्लाऊज, चायनीज किंवा स्टॅण्ड कॉलर ब्लाऊज, पीटरपॅन कॉलर ब्लाऊज हे ट्रेण्डमध्ये आहेत. या सोबतच ब्लाऊजमध्ये केप अ‍ॅटॅचमेंटही दिसत आहे. त्यामुळे तुम्ही ब्लाऊज म्हणून केप टॉपही वापरू शकता. ब्लाऊजची लांबीसुद्धा पूर्वीप्रमाणे मोठी दिसू लागली आहे.

First Published on October 26, 2018 1:04 am

Web Title: diwali special fashionable shopping