06 July 2020

News Flash

परदेशी पदार्थाची दिवाळी

दिवाळी चवदार करणार्या अनोख्या रेसिपी.

यंदाच्या दिवाळीत पाहुण्यांना फराळाबरोबरच काही हटके पदार्थ खाऊ घाला.

विवेक फडणीस – response.lokprabha@expressindia.com
यंदाच्या दिवाळीत पाहुण्यांना फराळाबरोबरच काही हटके पदार्थ करून खिलवायचे आहेत? तर मग या काही ग्रीक, इटालियन, रेसिपीज खास तुमच्यासाठी. या रेसिपीज तुमची दिवाळी एकदम चवदार करतील.

ग्रीक पोटॅटो स्किन्स

साहित्य :

बटाटे – ४-५ मोठे, नीट धुतलेले

तेल – अर्धा कप

ऑलिव्ह ऑइल – थोडंसं

फेटा चीज किंवा पनीर – १५० ग्रॅम

उन्हात वाळवलेले टोमॅटो – १/३ कप बारीक चिरून (ऑलिव्ह ऑइलमध्ये बुडवून ठेवा)

ताजी ओरगानोची (ओव्याची) पाने – २ टेबल स्पून

ऑलिव्हची फळे – अर्धा कप. बिया काढून बारीक चिरलेली

फ्लॉवर – १५० ग्रॅम (बारीक चिरून शिजवलेला)

फरसबी – १५० ग्रॅम (बारीक चिरून  शिजवलेली)

अंडी – ३ पूर्ण उकडलेली

(ऐच्छिक- चालत असल्यास)

मीठ – चवीप्रमाणे

मिरपूड – चवीप्रमाणे

कृती :

ओव्हन २३० डिग्री सेल्सिअसला गरम करा. सगळ्या बटाटय़ांना फोर्कने (काटा चमचा) छिद्रपाडा. ओव्हनमध्ये निदान ५० मिनिटं भाजा. बटाटे पूर्णपणे भाजले गेल्यावर बाहेर काढून ठेवा. ते तुम्हाला हाताळता येतील इतके थंड करा.

बटाटे उभे कापा. त्यामधील गर काढून पोकळी करा. एका पॅनमध्ये चीज/पनीर आणि भाज्या एकत्र स्मॅश करा. (उकडलेलं अंडं घेतलं असल्यास बारीक चिरून घाला) त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घालून एकत्र करून बाजूला ठेवून द्या.

ओव्हनचं तापमान २५० डिग्री सेल्सियसपर्यंत वाढवून कोरलेले बटाटे उलट करून १०-१५ मिनिटं (कुरकुरीत होईपर्यंत) ओव्हनमध्ये बेक करा. नंतर वरील तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये चमच्याने भरून ५ मिनिटं बेक करून ‘ग्रीक पोटॅटो स्किन्स’ गरमगरम सव्‍‌र्ह करा.

टीप : नॉन-व्हेज खात असल्यास भरण्याच्या मिश्रणात मटण, चिकन किंवा मासा शिजवून बारीक करून घातला तरी चालेल. बटाटाच वापरला पाहिजे असे नाही.

ग्रीक झुकिनी पाय – (कोलोकिथोपिटा)

साहित्य :

झुकिनी – ३-४ मध्यम आकाराचे, सोलून तुकडे केलेले

पातीचा कांदा – २-३ काडय़ा बारीक चिरलेला

कांदे – २ मध्यम चौकोनी तुकडे कापलेले

कोिथबीर – अर्धा कप बारीक चिरलेली

पुदिना – अर्धा कप बारीक चिरलेला

फेटा चीज किंवा पनीर – ५०० ग्रॅम कुस्करलेलं

अंडी -३

ऑलिव्ह ऑइल – १/४ कप आणि पॅन ग्रीज करण्यासाठी थोडं जास्त

ब्रेड क्रम्ब्स – अर्धा कप आणि थोडे पॅन डिस्टगसाठी

मीठ – चवीप्रमाणे

मिरपूड – चवीप्रमाणे

कृती :

ओव्हन २०० डिग्री सेल्सिअसला गरम करा. एका गाळणीमध्ये झुकिनीचे तुकडे ठेवून त्यावर थोडंसं मीठ भुरभुरवा. वर एक बशी ठेवून वर थोडंसं वजन ठेवून साधारण अर्धा तास ठेवून जास्तीचं पाणी काढून टाका.

पॅनमध्ये थोडं तेल घालून कांदा आणि पातीचा कांदा लाल होईपर्यंत परतून घ्या. नंतर गॅस बंद करून एका मोठय़ा भांडय़ात सर्व जिन्नस नीट एकत्र करा. एका पसरट बेकिंग बोलमध्ये तळाला तेल पसरा आणि त्यावर थोडेसे ब्रेड क्रम्ब्स भुरभुरवा. वरील मिश्रण बेकिंग बोलमध्ये नीट पसरून भरा. त्यावर परत ब्रेड क्रम्ब्स घाला.

नंतर २०० डिग्री सेल्सिअसला ओव्हनमध्ये ३० ते ४० मिनिटं किंवा वरचा थर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वर झाकण न ठेवता बेक करा.

थोडंसं थंड करून लहान तुकडे करून सव्‍‌र्ह करा.

बेस्ट स्पॅनिश ऑम्लेट – (टॉर्टलिा)

साहित्य :

बटाटा – १ साल काढून गार पाण्यात बुडवलेला

अंडी – २

कांदा – १ बारीक उभा (जुलियन) चिरलेला

तेल – १ कप (व्हर्जनि ऑलिव्ह ऑइल किंवा रोजच्या वापरातले)

कृती :

प्रथम बटाटय़ाचे पातळ गोल काप करा. एका रुमालावर ठेवून झटकून थोडे कोरडे करून घ्या. त्यावर मीठ पसरून नीट चोळून घ्या. एका मोठय़ा पसरट भांडय़ात भरपूर तेल घाला आणि मंद आचेवर गरम करा. गरम झाल्यावर त्यामध्ये बटाटे पसरून ठेवा. गरज पडल्यास बटाटे बुडतील एवढे तेल घाला. निदान २० मिनिटं शिजवा. बटाटे एखादे वेळेस फुटतील पण हरकत नाही. एकीकडे एका भांडय़ात अंडं फोडून मीठ आणि मिरपूड घालून नीट बीट करून ठेवा. एका वेगळ्या पॅनमध्ये कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा. तो गाळून त्यामधील तेल काढून टाकून अंडय़ामध्ये घाला. बटाटे २० मिनिटे तळून झाल्यावर एका गाळणीवर काढून सर्व तेल काढून टाका (हे तेल परत वापरण्यास हरकत नाही).

थोडा वेळ गेल्यावर बटाटे अंडय़ामध्ये घालून एकत्र करा. साधारण २० मिनिटानंतर बटाटे तळलेल्या पॅनमध्ये मंद आचेवर अंडय़ाचे मिश्रण ओता. साधारणपणे  ६ ते ८ मिनिटे प्रत्येक बाजू शिजवून घ्या. जेव्हा एक बाजू नीट शिजेल तेव्हा वर ताटली ठेवून पटकन उलटून घ्या आणि दुसरी बाजू शिजवून घ्या. नंतर एका प्लेटमध्ये काढून सव्‍‌र्ह करा. खाण्याच्या आधी थांबून थोडं गार होऊ द्या.

स्पॅनिश गझपॅचो – (कोल्ड सूप) अंडालुझ

साहित्य:

टॉमॅटो – ६ – ७ मध्यम आकाराचे (पिकलेले)

लांबट ढोबळी मिरची – १

पांढरा कांदा – अर्धा छोटा

लसूण – १ पाकळी

एक्स्ट्रा व्हर्जनि ऑलिव्ह ऑइल – १/४ कप

रेड किंवा व्हाइट व्हिनेगर – १ चमचा

मीठ – चवीप्रमाणे

टॉिपगसाठी – ऐच्छिक. काकडीचे काप, हिरव्या सफरचंदाचे काप, कांद्याचे काप, ढोबळी मिरचीचे काप, तळलेले पावाचे तुकडे किंवा उकडलेली अंडी.

कृती :

सगळ्या भाज्या नीट धुवून आणि सुकवून घ्या.

टॉमॅटोचे ४ तुकडे करून मिक्सर / ब्लेंडरमध्ये टाका.

ढोबळी मिरच्या कापून त्यामधील बिया आणि मधला भाग काढून मिक्सर / ब्लेंडरमध्ये घाला.

लसणाची पाकळी सोलून दोन तीन तुकडे करून मिक्सर / ब्लेंडरमध्ये घाला.

कांद्याचेदेखील थोडे तुकडे करून मिक्सर / ब्लेंडरमध्ये घाला.

काकडी सोलून अर्धी कापून तिचे २-४ तुकडे करून मिक्सर / ब्लेंडरमध्ये घाला. उरलेली अर्धी काकडी बारीक काप करून ठेवून द्या.

हाय स्पीडवर भाज्या ब्लेंड करून त्यांची छान प्युरी बनवून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ आणि व्हिनेगर घाला आणि एकदम हळू ब्लेंड करा. चाखून बघून दोन्हीचंही प्रमाण सेट करा. ब्लेंड करता करता त्यामध्ये हळू हळू ऑलिव्ह ऑईल घाला. परत एकदा मीठ आणि व्हिनेगर अ‍ॅडजस्ट करा. जर जास्त घट्ट वाटलं तर थोडं गार पाणी घाला.

फ्रीजमध्ये ठेवून एकदम गार सव्‍‌र्ह करा. त्यावर वर दिलेली किंवा काही इतर सुचल्यास हवी तेवढी टॉिपग्ज घाला.

किलगड – पुदिना गझपॅचो – (कोल्ड सूप)

साहित्य :

टोमॅटो – ३ छान पिकलेले, नीट धुवून मोठे मोठे तुकडे केलेले

हिरवी ढोबळी मिरची – साधारण ३ इंच नीट धुऊन मोठे तुकडे कापलेले.

लसूण – १ पाकळी

कांदा – अर्धा मोठे तुकडे कापलेला

किलगड – १ अर्धा कप सर्व बिया काढून तुकडे केलेले. (जितकं जास्त गोड तितकं जास्त छान)

एक्स्ट्रा व्हर्जनि ऑलिव्ह ऑइल – १/४ कप

रेड किंवा व्हाइट वाइन व्हिनेगर – १ चमचा

मीठ – चवीप्रमाणे

ताजी पुदिन्याची पाने – १ वाटी

कृती :

टोमॅटो, कांदा, लसूण अणि मिरची ब्लेंडरमध्ये नीट ब्लेंड करून प्युरी बनवा. नंतर बारीक जाळीतून नीट गाळून घ्या. फक्त बिया आणि साल वर शिल्लक राहिली पाहिजेत. गाळलेला रस परत ब्लेंडरमध्ये घालून त्यामध्ये किलगडाचे तुकडे घाला. परत नीट ब्लेंड करा. व्हिनेगर घाला. मीठ घालून चव आपल्या आवडीप्रमाणे करून घ्या. नंतर एकदम हळू स्पीडवर ब्लेंडर सुरू ठेवून त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घाला. नंतर चव घेऊन गरज असल्यास मीठ आणि व्हिनेगर परत अ‍ॅडजस्ट करा. नंतर २-४ तुकडे बर्फाचे घालून जरा वितळू द्या. शेवटी त्यामध्ये पुदिन्याची पाने घालून ब्लेंड करून एकदा चाखून बघा. एकदम थंड करून वर पुदिन्याची पाने, किलगडाचे आणि / किंवा लाल ढोबळी मिरचीचे तुकडे घालून एकदम गार सव्‍‌र्ह करा.

ग्रीक स्टाइल झटपट पिटा पिझा

साहित्य :

सॉससाठी –

टॉमॅटो केचप – १ टेबलस्पून

टॉमॅटो ज्यूस – १०० ग्रॅम

फ्रेश बेसिल – १ टेबलस्पून किंवा

वाळवलेले बेसिल – १ चमचा

चिली पेपर – अर्धा (ऐच्छिक)

सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बीट करून त्याचा सॉस करून घ्या.

पिटा पिझ्झासाठी –

पिटा ब्रेड – ३ – ४

मोझरेला चीज – २०० ग्रॅम

फेटा चीज – २०० ग्रॅम कुस्करलेले

टॉमॅटो – २ पिकलेला, गोल कापलेला

हिरवी ढोबळी मिरची – १ बारीक कापलेली

कांदा – अर्धा बारीक उभा चिरलेला

ऑलिव्ह – ८ – १० बिया काढून चिरलेली

कृती :

१८० – १९० डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करून ठेवा.

एका बेकिंग ट्रे मध्ये बेकिंग पेपर ठेवून त्यावर पिटा ब्रेड ठेवा. त्यावर सॉस पसरवा. नंतर मोझरेला चीज पसरवा. नंतर त्यावर टॉमॅटो आणि कांद्याचे काप पसरा. वरून कुस्करलेले फेटा चीज घालून वर ऑलिव्हचे तुकडे पसरा.

पिटा पिझ्झा आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये १० मिनिटे किंवा चीज गोल्डन होईपर्यंत तसंच बबली होइपर्यंत ठेवा.

गरम गरम सव्‍‌र्ह करा.

ग्रीक श्रिम्प सागानाकी – (गारीडास सागानाकी)

साहित्य :

कोलंबी – १२ मध्यम आकाराच्या (नीट सोलून साफ केलेल्या)

टॉमॅटो – ४ पिकलेले बारीक चिरलेले

कांदा – १ बारीक चिरलेला

चिली फ्लेक्स – चवीप्रमाणे

पातीचे कांदे – २ बारीक चिरलेले

लसूण – २ पाकळ्या बारीक चिरलेल्या

अ‍ॅपल साइडर – ६० मि.लि.

कोिथबीर – २ टेबलस्पून बारीक चिरलेली

फेटा चीज – २०० ग्रॅम कुस्करलेले किंवा बारीक क्युब्स कापलेले.

ऑलिव्ह ऑइल – गरजेपुरतं

मीठ – चवीप्रमाणे

मिरपूड – चवीप्रमाणे

कृती : टॉमॅटो जाळीवर ठेवून जास्तीचं पाणी काढून टाका.

एका पॅनमध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल मध्यम आंचेवर गरम करून त्यामध्ये कांदे साधारण बदामी होईपर्यंत परतून घ्या. नंतर लसूण, चिली फ्लेक्स, मीठ आणि मिरपूड घालून १ – २ मिनिटे परतून घ्या. वर टॉमॅटो घालून झाकण ठेवून साधारणपणे ५ मिनिटे मंद आंचेवर उकळू द्या. थोडंसं घट्ट होऊ द्या.

कोलंबीला मीठ आणि मिरपूड नीट चोळून ठेवा. एका मोठय़ा पॅनमधे ३ – ४ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल मध्यम आंचेवर गरम करा. त्यामधे कोलंबी घालून दोन्ही बाजूंनी नीट परतून घ्या. नंतर अ‍ॅपल साइडर घालून उकळून घ्या. त्यानंतर कोलंबीच्या पॅनमध्ये तयार केलेलं सॉस घालून वर फेटा चीज घालून झाकण ठेवून चीज थोडंसं वितळेपर्यंत उकळू द्या. वर कोिथबीर घालून गरम गरम सर्व करा.

इटालियन स्टाइल झटपट पिटा पिझा

साहित्य :

सॉससाठी –

टॉमॅटो केचप – १ टेबलस्पून

टॉमॅटो ज्युस – १०० ग्रॅम

फ्रेश बेसिल – १ टेबलस्पून किंवा

वाळवलेले बेसिल – १ चमचा

मगज – २ चमचे

चिली पेपर – अर्धा (ऐच्छिक)

सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बीट करून त्याच सॉस करून घ्या. चाखून बघून सीझिनगचं प्रमाण अ‍ॅडजेस्ट करून घ्या.

पिटा पिझ्झासाठी –

पिटा ब्रेड – ३-४

मोझरेला चीज – ३५० – ४०० ग्रॅम

पिकलेला टॉमॅटो – १ गोल कापलेला

पेस्टो – ४ टेबल स्पून (लसूण, मगज अणि मोझरेला चीज एकत्र करून थोडेसे ऑलिव्ह ऑइल घालून वाटून घ्यावे)

रॉकेटची पाने – थोडीशी (न मिळाल्यास बेबी स्पिनॅच, पार्सले किंवा कोिथबीर वापरावी)

कृती :

ओव्हन १८० – १९० डिग्री सेंटिग्रेड प्री हीट करून घ्या बेकिंग ट्रेमध्ये खाली बेकिंग पेपर घालून वर पिटा ब्रेड्स ठेवा. प्रत्येक पिटावर २ टेबल स्पून टॉमॅटोचे सॉस घालून वर मोझरेला चीज किसून घाला. त्याच्यावर १ चमचा पेस्टो घालून वर टॉमॅटोचे काप पसरवून पुन्हा वर मोझरेला चीज किसून घाला.

आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये १० मिनिटे ठेवून चीज गोल्डन होऊन छान बुडबुडे येऊ द्या.

पिझा ओव्हनमधून काढून वर रॉकेटची पाने घालून सव्‍‌र्ह करा.

इटालियन पेकोरिनो फ्लॅन्स विथ टॉमॅटो सॉस – (पेकोरिनो टोर्टास कॉन सालसा डी पोमोडोरो)

साहित्य :

ऑलिव्ह ऑइल – पाव कप

लसूण – ६ पाकळ्या एकदम बारीक चिरलेल्या.

टॉमॅटो – ४ मोठे (साल काढून हाताने क्रश केलेले)

खडे मीठ – चवीप्रमाणे

काळीमिरी पावडर – चवीप्रमाणे

बेसिलची पाने – ७-८ मोठी कापून तुकडे केलेली

लोणी – ग्रीजिंगसाठी

क्रीम – दाट सव्वादोन कप

प्रोसेस्ड चीज – पावणेदोन कप किसलेले

अंडी – ६ किंवा

दूध – २० मि.लि.

उकळतं पाणी – बेकिंगसाठी

कृती :

एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण २-३ मिनिटं परतून घ्या. नंतर टॉमॅटो घालून त्यावर मीठ आणि मिरपूड घाला. साधारण १०-१२ मिनिटं परता. थोडं घट्ट झाल्यावर बेसिलची पान घालून ५ मिनिटं शिजवा. पॅन गरम ठेवा.

ओव्हन सुमारे १७० डिग्री से.ला गरम करा. पोस्रेलिनची बेकिंग करण्याची ६ छोटी भांडी ग्रीज करून बाजूला ठेवून द्या.

एका काचेच्या भांडय़ात दूध तसंच अंडी नीट फेटून घ्या. त्यामध्ये क्रीम, चीज, मीठ आणि मिरपूड घालून नीट एकजीव होईपर्यंत ढवळा. नंतर ग्रीज केलेल्या भांडय़ांमध्ये ओता. सर्व भांडी बेकिंग ट्रेमध्ये ठेवा आणि ती अर्धी बुडतील एवढं उकळतं पाणी ओता. नंतर ओव्हनमधे ठेवून बेक करा. मिश्रण थोडंसं फुगीर होइल आणि गोल्डन ब्राऊन होइल. बनवलेलं पसरट डिशमध्ये घ्या. त्यावर बेक केलेले एक एक फ्लॅन घाला आणि सव्‍‌र्ह करा.

स्पॅनिश क्रेमा कटालाना – (पुिडग)

साहित्य :

कॉर्न स्टार्च – २ टेबलस्पून

दूध – २ कप

िलबाची साल – १ मोठा तुकडा (झेस्ट नाही)

संत्र्याची साल – १ मोठा तुकडा (झेस्ट नाही)

दालचिनी – १ काठी (२ इंच)

अंडय़ांचे बलक – ५

पिठी साखर – अर्धा कप

साखर – वर कॅरॅमल लेयरसाठी

अंजीर, स्ट्रॉबेरीसारखी फळ गाíनशसाठी

कृती :

एका भांडय़ात दूध घेऊन िलबू आणि संत्र्याची साल आणि दालचिनी घालून हळूहळू उकळवा.

थोडय़ाशा पाण्यामध्ये कॉर्न स्टार्च घालून विरघळवून ठेवा.

दूध गरम होत असताना दुसऱ्या भांडय़ात अंडय़ाचे बलक आणि पिठीसाखर यांचं मिश्रण बनवा त्यानंतर पाण्यात विरघळवलेला कॉर्न स्टार्च घालून एक चमचाभर गरम दूध घाला.

दुधाखालील गॅस मंद करून अंडय़ाचे मिश्रण हळूहळू घाला. अंडय़ाचं स्क्रॅम्बल होणार नाही याची काळजी घ्या. एकदम मंद आचेवर मिश्रण गरम करून थोडं घट्ट करून घ्या. गॅस बंद करून गार होऊ द्या. नंतर फ्रिजमध्ये ठेवून नीट सेट होऊ द्या. सव्‍‌र्ह करण्याआधी त्यावर पातळ थर साखर पसरवा आणि किचन ब्लो टॉर्च वापरून ते कॅरॅमलाइज करा. जर ब्लो टॉर्च नसेल तर एका पॅनमध्ये साखर कॅरॅमलाइझ करून वर ओता आणि त्याचा पातळ पापुद्रा होऊ द्या. वर ताजी, आवडणारी फळं (ऐच्छिक) घालून सव्‍‌र्ह करा.

इटालियन क्रॉस्टिनी विथ लेमल

साहित्य :

िलबू – १

बसिलची पाने – २ ते ३

रिकोटा चीज – अर्धा कप (१२५ ग्रॅम)

चीज स्प्रेड – १२५ ग्रॅम

लांब पावाची लादी – साधारण अर्धा इंच जाडीचे काप कापलेला

ऑलिव्ह ऑइल – पावाचा तुकडा भिजवण्यासाठी

वॉलनट-पेअर टॉिपग :

पेअर किंवा लाल सफरचंद – १ (पातळ स्लाइस केलेले)

अक्रोड – २ अर्धा टेबल स्पून (थोडेसे भाजून बारीक तुकडे केलेले)

मध – २ टेबल स्पून

(पेअर किंवा सफरचंदाचे दोन तुकडे प्रत्येक पावाच्या स्लाइसवर ठेवा. त्यावर मध घालून वर अक्रोड पसरा)

कृती :

ओव्हन २३० डिग्री से. पर्यंत गरम करा.

िलबाचे झेस्ट साधारण १ चमचा घ्या. मिक्सर / ब्लेंडरमध्ये घाला. त्यावर बेसिलची पाने बारीक कापून घाला. वर रिकोटा चीज, चीज स्प्रेड. मीठ आणि मिरपूड घालून नीट एकत्र करून घ्या.

एका पसरट बेकिंग ट्रेमध्ये पावाचे तुकडे पसरून पाच-सहा मिनिटे साधारण हलके ब्राऊन होईपर्यंत बेक करा. ट्रे ओव्हनमधून काढून त्यावर तयार केलेले टॉिपग नीट पसरून सव्‍‌र्ह करा.

हेल्दी अ‍ॅपल कॅरॅमल नाचोज

साहित्य :

सफरचंदं- ५ स्लाइस कापलेली

दही – अर्धा कप

पीनट बटर – अर्धा कप

डार्क चॉकलेट चिप्स – १/४ कप

साखर – कॅरॅमल बनवण्यासाठी

व्हॅनिला इसेन्स – १ चमचा

कृति :

सफरचंदाचे पातळ काप करा. िलबाचा रस आणि पाणी यामध्ये बुडवून ठेवा म्हणजे ते काळे होणार नाहीत. दह्य़ामध्ये व्हॅनिला इसेन्स घाला आणि एका आइसिंग बॅगमध्ये भरून ठेवा. तसेच पीनट बटरदेखील एका आइसिंग बॅगमध्ये भरा. एका पॅनमध्ये साखर गरम करून तिचे कॅरॅमल बनवा. डार्क चॉकलेटचे एकदम बारीक तुकडे करा. एका सìव्हग डिशमध्ये सफरचंदाच्या फोडी नीट पसरून ठेवा. त्यावर कॅरॅमल पसरा. नंतर बॅगमधून दही आणि पीनट बटर घाला. सर्वात शेवटी त्यावर चॉकलेटचे तुकडे पसरा आणि वर दालचिनी पावडर पसरून सव्‍‌र्ह करा.

इटालियन अ‍ॅपल – ब्रेड डिलाइट

साहित्य :

पाव – स्लाइस न केलेला.

लाल सफरचंद – अर्धा पातळ स्लाइस केलेले

हिरवा सफरचंद – अर्धा पातळ स्लाइस केलेल

चीज स्प्रेड – गरजेपुरतं

साखर – १ टेबलस्पून

बटर – २ छोटे पातळ स्लाइस

व्हॅनिला आइस्क्रीम – १ स्कूप

कृती :

ओव्हन १७० डि. से. ला प्री हीट करून घ्या.

पावाचा साधारणपणे दीड ते दोन इंच जाडीचा स्लाइस कापा. त्यामधे कडेने थोडीशी जागा सोडून साधारण अध्र्या जाडीपर्यंत सुरीने कापा. पावाचा तुकडा पडणार नाही, याची काळजी घ्या. नंतर वरून पाव हाताने दाबून त्यामध्ये एक चौकोनी खड्डा तयार करा. त्यामध्ये थोडेसे चीज स्प्रेड लावा, वर कापलेल्या सफरचंदाचे तुकडे एक लाल – एक हिरवे असे लावून पूर्णपणे भरून टाका.

त्यावर नीट सगळीकडे साखर भुरभुरवा. नंतर वर लोण्याचे २ पातळ छोटे तुकडे ठेवा.

नंतर पाव ओव्हनमध्ये साधारण १०-१५ मिनिटे (पाव थोडा ब्राऊन होइपर्यंत) ठेवून ओव्हनमधून काढून त्यावर एक स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम घालून गरम असतानाच सव्‍‌र्ह करा.

मश्रूम सॅण्डविच –  विथ नट्स अ‍ॅण्ड रेसिन्स

साहित्य :

मश्रुम फििलग

बटण मश्रुम – १४० ग्रॅम (स्वच्छ धुऊन कापलेली)

पांढरा कांदा – अर्धा स्लाइस केलेला

मगज – २ चमचे

बेदाणे – २ चमचे

अ‍ॅपल साइडर व्हिनेगर – २ चमचे

मीठ – चवीप्रमाणे

सॅण्डविचसाठी

बर्गर बन्स – २

लाल मुळ्याची पाने – सìव्हगसाठी

कृती :

एका पॅनमध्ये एकदम मंद आंचेवर पांढरे कांदे गरम करून त्यातील पाणी काढून टाका आणि मऊ करून घ्या.

त्यामधे अ‍ॅपल साइडर व्हिनेगर घालून त्यामध्ये मगज, बेदाणे घाला. नंतर मश्रुम घालून गॅस थोडा मोठा करून शिजवून घ्या. मश्रुम गोल्डन ब्राऊन व्हायला लागतील. मग वर चवीप्रमाणे मीठ घालून गॅस बंद करा.

बर्गर बन मध्ये कापून त्यामध्ये वरील सारण भरा. त्यामध्ये लाल मुळ्याची पाने घालून गरम असताना सव्‍‌र्ह करा.

स्पॅनिश मधातील तळलेली वांगी

साहित्य :

लहान वांगी – २-३

दूध – गरजेपुरते

मीठ – चवीप्रमाणे

मिरपूड – चवीप्रमाणे

मदा – १ कप

तेल – (ऑलिव्ह ऑइल वापरल्यास चांगले) तळण्यासाठी

मध किंवा मोलॅसिस (काकवी) वरून घालण्यासाठी

कृती :

वांग्याचे आपल्या आवडीप्रमाणे गोल किंवा ज्युलियन काप कापून घ्या. एका पसरट भांडय़ामध्ये वांग्याचे काप पसरून ते बुडतील इतके दूध घाला. थोडंसं मीठदेखील घाला. साधारण एक तास बुडवून ठेवा म्हणजे कडवटपणा असेल तर निघून जाईल.

मद्यामध्ये मीठ आणि मिरपूड घालून नीट एकत्र करून घ्या. वांग्याचे काप नीट निथळून घ्या. नंतर मद्यामध्ये घोळून तेलामधे डीप फ्राय करून घ्या. तेल नीट निथळवून टिश्यू पेपरवर ठेवून तेल निथळू द्या. वर थोडंसं मीठ भुरभुरवा.

वरून मध किंवा मिलॅसिस घालून सव्‍‌र्ह करा.

स्पॅनिश खारवलेल्या माशाच्या क्रॉकेट्स

साहित्य :

खारवलेले मासे – १/४ किलो

छोटे कांदे (श्ॉलॉट) – ३ छोटे डाइससारखे कापलेले

मदा – ४ टेबलस्पून

जायफळ – चिमूटभर

होल दूध – ३ कप रूमच्या तापमानाला आलेले

लोणी – ३ टेबलस्पून

ऑलिव्ह ऑईल (एक्स्ट्रा व्हर्जनि) –

२ – ३ कप

मीठ – चवीप्रमाणे

काळी मिरी – चवीप्रमाणे

अंडी – २ – ३ फेटून घेतलेली

ब्रेड क्रम्ब्स – २ कप

कृती :

खारवलेल्या माशाचे पदार्थ करताना प्रथम मासे २४ तास थंड पाण्यात बुडवून ठेवावेत. निदान ५ – ६ वेळा पाणी बदलावे.

भिजवलेले माशाचे बारीक तुकडे करून घ्या. काळजीपूर्वक सर्व काटे काढून टाका.

एका पॅनमध्ये २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घेऊन गरम करा. त्यामध्ये कांदा घालून छान लाल होईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यामध्ये श्रेडेड मासा आणि काळी मिरी घालून थोडावेळ परतून घ्या. गॅस बंद करून पॅन बाजूला ठेवून द्या.

बेचामेल सॉस बनवण्यासाठी – प्रथम मदा नीट चाळून घ्या म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. एका मोठय़ा पॅनमध्ये मंद आचेवर लोणी वितळवा. ते थोडंसं ब्राऊन होऊ द्या. मग त्यामध्ये चाळलेला मदा घालून नीट एकत्र करा. याला रॉक्स (मदा आणि फॅटचं मिश्रण) असं म्हणतात. रॉक्स सारखं ढवळत राहून छान ब्राऊन होऊन गोळा होईपर्यंत शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये एक कप दूध घालून नीट व्हिस्क करा. एक कप नीट मिसळल्यावर आणखी दोन कप मिसळून व्हिस्क करून आणखी ५ मिनिटे शिजवा. डोव्ह घट्ट झाल्यावर त्यामधे खाऱ्या माशाचं मिश्रण घाला आणि नीट एकत्र  करा. गॅस बंद करून थंड करा आणि एक रात्र फ्रीजमध्ये ठेवा.

दुसऱ्या दिवशी त्याचे छोटे छोटे गोल किंवा उभट गोळे करा. फेटलेल्या अंडय़ामधे नीट बुडवून नंतर ब्रेड क्रम्ब्समधे घोळवून तेलामध्ये डीप फ्राय करून घ्या. स्पॅनिश क्रोकेट्स किंवा फ्रिटर्स तयार आहेत.

इटालियन सप्लिअल टेलिफोनो

साहित्य :

कांदा – १ बारीक चिरलेला

लसूण – १ मोठी पाकळी बारीक चिरलेली

ओव्याची पानं – २

लाल द्राक्षाचा रस – १०० मि.लि. (द्राक्षासव वापरल्यास उत्तम)

पसाटा – ४०० ग्रॅम (टॉमॅटो शिजवून तो गाळून त्याची प्युरी करा)

ब्राऊन राइस – २०० ग्रॅम (१ तास आधी पाण्यात भिजवून ठेवावा)

व्हेजिटॅबल स्टॉक – २०० मि.लि.

बटर – १ गोळा

पाम्रेसान चीज – १० ग्रॅम  किसलेले

मोझरेला चीज – १२५ ग्रॅम किसलेले

अंडे – १

मदा – ५० ग्रॅम

ब्रेड क्रम्ब्स – १०० ग्रॅम

तेल – (ऑलिव्ह ऑइल वापरल्यास चांगले) तळण्यासाठी

एकत्र भाज्या – १५० ग्रॅम (फ्लॉवर, फरसबी, गाजर, ब्रोकोली, कोबी  सर्व भाज्या एकदम बारीक चिरलेल्या)

किंवा

मटण खिमा – १५० ग्रॅम

किंवा

चिकन खिमा – १५० ग्रॅम

कृती :

एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामधे कांदा नीट लाल होइपर्यंत परतून घ्या. नंतर एकत्र भाज्या (किंवा खिमा) आणि ओव्याची पानं घालून नीट शिजेपर्यंत परता. त्यामध्ये द्राक्षाचा रस घालून तो निम्मा होईपर्यंत उकळा. नंतर पसाटा घालून साधरण २० मिनिटे मंद आंचेवर गरम करा. त्यामध्ये ब्राऊन राइस घालून नीट शिजवा. साधारण कोरडं होईपर्यंत. नंतर थोडा व्हेजिटेबल स्टॉक घाला आणि पुन्हा शिजवा. थोडा थोडा स्टॉक घालून भात जवळजवळ पूर्ण शिजवा. (थोडासा कच्चा ठेवा)

गॅस बंद करून त्यामध्ये बटर आणि पाम्रेसान चीज घालून नीट मिसळा.

एका पसरट भांडय़ामध्ये काढून वर फिल्म लावून थंड करा. नंतर रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून नीट सेट होऊ द्या. मोझरेला चीजच्या १२ सारख्या आकाराच्या पट्टय़ा कापा. भाताचे १२ सारखे भाग करा. भाताचा एक भाग हातावर पसरून त्यामध्ये मोझरेला चीज ठेवून साधारण लांबट आकाराचे गोळे (सप्ली) तयार करा.

एका पॅनमध्ये तेल साधरण १८० डिग्री से. पर्यंत गरम करून घ्या. एका भांडय़ात अंडं फेटून घ्या. एका ताटलीत मदा घ्या. एका ताटलीत ब्रेड क्रम्ब्स घ्या. भाताचे सप्ली प्रथम मद्यामध्ये घोळवा नंतर अंडय़ामधे बुडवून शेवटी ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून छान डीप फ्राय करा आणि टिश्यूवर काढून ठेवा. गरम गरम सव्‍‌र्ह करा. म्हणजे मध्ये चीज एकदम ज्युसी मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2018 1:05 am

Web Title: diwali special non indian food
Next Stories
1 फॅशनेबल शॉपिंग
2 अ‍ॅक्सेसरिजचा ट्रेण्ड
3 दिवाळीसाठी दागिने
Just Now!
X