12 December 2017

News Flash

तुम्ही दुसऱ्याला त्याचं स्वातंत्र्य देता का?

खरं तर आपला देश स्वतंत्र होताना त्यावेळच्या लोकांनी जे काही केलं त्यात आता आपलीही

डॉ. माधव रेगे | Updated: August 11, 2017 10:07 PM

डॉ. माधव रेगे

खरं सांगायचं तर स्वातंत्र्य हा शब्दच मला कळत नाही. कारण आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. लोक स्वत:चं अस्तित्व निसर्गापेक्षा वेगळं मानतात म्हणून स्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण होतो. माणूस निसर्गाचा भाग आहे असं म्हटल्यावर त्याने निसर्गाप्रमाणे चालणं हे त्यात आलंच. त्याप्रमाणे तुम्ही नाही चाललात तर तुमचा नाश होणार हेही तेवढंच ठरलेलं आहे. आज आपण जे सगळं अनैसर्गिक पद्धतीने जगतो आहोत त्याचे परिणाम दिसताहेतच. त्यामुळे निसर्गाचा भाग असण्यातून आपण बाहेर पडलो तर त्याला स्वातंत्र्य म्हणायचं का हा एक पहिला प्रश्न आहे. ही संकल्पना कुठे सुरू झाली याचा विचार केला तर असं लक्षात येतं की तुम्हाला जे करायचं आहे ते करायला मिळालं नाही तर स्वातंत्र्य नाही, असं आपण म्हणतो. पण मग ते नेमकं काय आहे याचाही विचार झाला पाहिजे. आपण अप्पलपोटीपणे, स्वार्थासाठी स्वत:ला जगवणे किंवा स्वत:ची प्रगती जास्त करणे या संकल्पनेतूनच हा संघर्ष तयार होतो.

आपण एक साधं उदाहरण घेऊ. माणूस या प्रजातीकडून निसर्गाला काय अपेक्षित आहे तर त्याने थोडं चालायला पाहिजे, अन्न शोधायला पाहिजे. पाणी शोधायला पाहिजे, निवारा शोधायला पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक त्या हालचाली त्याने करायला पाहिजेत. निसर्गात जे मिळतं ते खायला पाहिजे. आज काय दिसतं तर इतकी वर्षे निसर्गाबरोबर जोडून घेऊन, उत्क्रांती होत होत माणूस जगत आला आहे. पण आज त्याचं काय चाललंय तर ते नातं तोडायचं आणि आपण काहीतरी वेगळं करायचं. याउलट तुम्ही जर सगळे प्राणी बघितले, तर काय दिसतं तर वाघ किंवा सिंह आहे, त्याला िपजऱ्यात ठेवलं आणि त्याच्यासमोर बर्गर, बकरं आणि काहीतरी ठेवलं तर तो कोणत्याही परिस्थितीत बर्गर खाणार नाही. तो सहसा त्याच्या नैसर्गिक सवयींच्या बाहेर येत नाही. अनैसर्गिक वागत नाही. माणसं वगरे तो स्वत: जखमी झाला तरच खातो. अन्यथा तो प्राणीच खातो. त्याला हवं तसं वागायचं स्वातंत्र्य नाही का, तो नैसर्गिक सवयींच्या बाहेर येऊ शकत नाही का, तर तसं अजिबात नाही. पण तो निसर्गाबरोबर राहतो. तेच आपण टाळतोय.

बऱ्याच वेळा स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार का अशीही चर्चा होते. पण कशाला स्वैराचार म्हणायचं, ते मला कळत नाही. मी माझ्यासाठी स्वातंत्र्याची अशी व्याख्या करतो की जे दुसऱ्याला पूर्णपणे द्यायची माझी तयारी आहे ते स्वातंत्र्य. दुसऱ्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा मला त्रास होणार नसेल तर ते स्वातंत्र्य. जे आपण दुसऱ्याला देऊ शकत नाही त्याला आपण स्वातंत्र्य नाही म्हणू शकत. कारण मग आपण आपल्या कल्पना लादतोय कुणावर तरी, असं होऊ शकतं. मला वाटेल ते मी करणार आणि दुसऱ्याला मात्र ते करू देणार नाही असं जेव्हा होतं तेव्हा स्वातंत्र्य हा विषय सुरू होतो. निसर्गाचा आपण विचार करायला लागतो तेव्हा दिसतं की कळपात राहणारे प्राणी कळपातून फुटून स्वतंत्र होऊन बाहेर पडलेत असं होताना दिसत नाही. मुळात त्यांना स्वातंत्र्य द्यावं लागत नाही, तर ते ते घेतात. त्यांना पळायचं असेल, मस्ती करायची असेल तर ते ती करतात. तसंच अमक्या प्राण्याने तमक्या प्राण्याला गुलाम केलंय, तो त्याला काम करायला लावतो आणि स्वत: बसून राहिलाय असं होत नाही. गुलाम करण्याची वृत्ती कुठून येते, तर इतरांपेक्षा माझ्याकडे जास्त पाहिजे आणि त्यासाठी मी काही करणार नाही ही वृत्ती चालू होते तेव्हा आपण निसर्गापासून लांब जायला लागतो. आपण निसर्गाच्या विरोधात जायला लागतो तेव्हा मग पारतंत्र्य वगरे सगळ्या कल्पना येतात. त्याचे दुष्परिणाम येतात. स्वातंत्र्य या विषयाची आपण चर्चा करतो तेव्हा त्याचे दुष्परिणाम शोधतो असं माझं ठाम मत आहे. पण याचा अर्थ मी गुलामगिरीचं समर्थन करतोय असं नाही. मी असं म्हणतोय की नैसर्गिकरीत्या तुम्हाला जेवढं स्वातंत्र्य उपलब्ध आहे तेवढं तुम्ही वापरायला पाहिजे. त्याच्यापलीकडे नाही वापरायला पाहिजे.

आपण दुसऱ्यालाही जे मनमोकळेपणाने देऊ शकतो ते स्वातंत्र्य असं आपण ठरवलं तर अडचणी होणार नाहीत. बाकी त्याला वैचारिक स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य वगरे फाटे भरपूर फुटू शकतात, मुळात हे सगळं आलं कुठून, तर माणसाने ही स्वत:ची निसर्गापासून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून हे सगळे कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तयार होतात. पण आपण जितके निसर्गाच्या जवळ जाऊ तितकी स्वातंत्र्य ही कल्पना विरघळून जाईल. त्याच्यावर विचार करायची गरज लागणार नाही. मग आपण स्वातंत्र्यासाठी प्रतीकात्मक जे करतो, ते करायची गरज लागणार नाही.  लोक स्वातंत्र्यदिन आला की त्या दिवशी एकदम वेगळ्या पद्धतीने वागतात आणि इतर वेळी वेगळ्या पद्धतीने वागतात.

खरं तर आपला देश स्वतंत्र होताना त्यावेळच्या लोकांनी जे काही केलं त्यात आता आपलीही जबाबदारी आहे. ती आपण पाळली पाहिजे. आपलं वैचारिक, धार्मिक स्वातंत्र्य याबद्दल आपण बोलतो, पण यापलीकडेही आपल्याला कचरा करायचा, रस्त्यावर कचरा टाकायचा अधिकार आहे का, वेडय़ावाकडय़ा पद्धतीने गाडय़ा चालवण्याचा, नियम तोडण्याचा अधिकार आहे का याबाबत लोक स्वातंत्र्याचा विचार करत नाहीत. फक्त अचानक काही गोष्टीत त्यांना स्वातंत्र्य सुचतं. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते हे लोक लक्षात घेत नाहीत. आणि ती पाळायची तुमची तयारी नसेल तर तुम्हाला स्वातंत्र्याबद्दल बोलायचा हक्क निर्माणच होत नाही. पहिल्यांदा ती पाळावी. देशभक्तीही पाळावी. पण देशभक्ती म्हणजे तुम्ही अजिबातच कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचाराला थारा न देणे, आपण आपलं काम लौकर होण्यासाठी पैसे न घेणे आणि दुसऱ्यालाही आपलं काम वेगाने करण्यासाठी पैसे न देणे हे दोन्ही महत्त्वाचं आहे. कुठे हे होताना दिसत असेल तर त्या विरोधात आवाज उठवणे या तिन्ही गोष्टी त्यात अध्याहृत आहेत.

माणसाने त्याच्या बुद्धीचा वापर वेगळ्या कारणांसाठी केला. बहुतेक वेळा तुम्हाला दिसेल की एखाद्या कुटुंबात जेव्हा जास्त मुलं असतात तेव्हा त्यांची टिकून राहण्यासाठी (सव्‍‌र्हायव्हल) आपापसात स्पर्धा असते किंवा जास्तीत जास्त संसाधनं स्वत:कडे ओढून घ्यायची स्पर्धा असते. इतर सगळ्या प्रजाती नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत. विशेष प्रयत्न करून त्यांना जगवावं लागतं आहे, तर मनुष्याला कसं नियंत्रित करायचं हा प्रश्न आहे. हे जेव्हा झालं तेव्हा निसर्ग माणसाच्या गरजा तेवढय़ा पुरवायला अपुरा पडायला लागला. त्याने मग निसर्गाकडून ओरबाडून घ्यायला सुरुवात केली. मग नंतर आपापसात स्पर्धा सुरू झाली. अशा स्पर्धेसाठी कोणताही प्राणी आपली बुद्धी वापरतोच. दोन प्राणी समजा मारलेलं भक्ष्य खाण्यासाठी मारमारी करतात, तेवढय़ा प्रमाणावर ते होतंच कारण टिकेल तो जगेल (सव्‍‌र्हायव्हल ऑफ फिटेस्ट) हा भाग त्यात आहे. त्यात टिकण्यासाठी माणसाने बुद्धीचा वापर सुरू केला. क्लृप्त्या, कपटं केली. निसर्गाने माणसाला शक्ती कमी दिली आणि बुद्धी दिली. तो हाताने बोकड, किंवा कोंबडी पकडून खाऊ शकत नाही. त्यासाठी तो बुद्धीचा वापर करतो. प्रत्यक्षात एखाद्या जंगली प्राण्याला आणि माणसाला एकत्र सोडलं तर माणूस त्याच्याबरोबरची लढाई कधीच जिंकू शकणार नाही. कधी तरी निसर्गाची चूक होते त्यातून काहीतरी तयार होतं तसाच माणूस तयार झाला आणि तो स्वत:च निसर्गाच्या विरुद्ध जायला लागला. त्यामुळे हा निसर्गाला झालेला एक प्रकारचा कॅन्सर आहे आणि तो आता नियंत्रणाच्या बाहेर गेलाय असं आपल्याला म्हणता येईल. इतर सगळ्या प्रजाती नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत आणि माणूस तेवढा अमर्याद वाढतो आहे. तोच एक प्रकारचा कॅन्सर आहे आणि तोच आता निसर्गाशी झगडा करतो आहे. ज्याच्या पोटातून तो आला त्याच्याच विरोधात तो उभा राहतो आहे. म्हणजे त्याच्या स्वातंत्र्याच्या कल्पना या निसर्गाच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. काहीही असो, मोठय़ा प्रमाणावरची यांत्रिकी शेती असो किंवा रासायनिक खतांचा वापर असो, आपण निसर्गाला त्रासच देतो. मग मला हवं ते खत वापरण्याचं मला स्वातंत्र्य आहे की नाही असा विचित्र प्रश्न निर्माण होतो. आता एवढी लोकसंख्या वाढली आहेत तर यांत्रिक  शेती करणं भाग आहे. अन्यथा शेतकऱ्यांना स्वत:चं पोट भरणं शक्य नाही. शिवाय यांत्रिक शेती करायचं त्यांचं स्वातंत्र्य आहेच. पण मग त्याचे दुष्परिणामही असतात. निसर्गावरही असतात. मानवी शरीर ही सतत चालत असलेली एक रासायनिक प्रक्रिया आहे. त्याला स्वत्व त्याच्या बुद्धीमुळे आलं. तो स्वत:चं अस्तित्व मानायला लागला. तिथे प्रश्न सुरू होतो असं आपण म्हणू शकतो. नाहीतर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही. एका प्रचंड मोठय़ा वैश्विक प्रक्रियेचा आपण भाग आहोत. ती जर लंबकासारखी चालते असं आपण म्हणतो. ती एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अखंड चालणारी प्रक्रिया आहे. हा विचार थोडा केल्यानंतर जीवनाला काही अर्थ नाही असं वाटायला लागतं.

मला स्वत:ला असं कधीच वाटलं नाही की मी विचार करण्याच्या पारतंत्र्यात आहे. समजा मला काही एक धार्मिक गोष्ट माझ्या घरात बसून करायची असेल तर त्याला कुणाचीच आडकाठी नसते. असं तुम्हाला कुठे दिसणार नाही की वाघ म्हणतोय की मी हरीण खातो तर इतरांनीही हरीणच खाल्लं पाहिजे. पण मी जे करतो ते तुम्ही केलं पाहिजे हे फक्त माणसांमध्येच आहे. असं वागणं हा निसर्गाचा भाग नाही. माझी जीवनपद्धती मी शांतपणे पाळत असेन आणि ते जर नैसर्गिक असेल, असं सगळ्यांनी केलं तर संघर्ष कुठेच होणार नाही. लोकांना सत्तेची हाव असते. मी सांगतो ते खूप लोक ऐकतात हे त्यांना आवडतं. लोकांना असेच नेते लागतात. स्वतंत्र विचार करण्याची तयारी नसते. सांगितलेली गोष्ट कोणताही निकष न लावता आपण गिळतो. तिथे वैचारिक गुलामगिरीची सुरुवात होते. पण जर आपण निसर्गाची आपल्याकडून काय अपेक्षा आहे, हा एकच निकष लावला, तर स्वातंत्र्य हा विषय पूर्ण कालबा जातो. मी हे स्वातंत्र्य दुसऱ्याला देऊ शकतो का, देतो का हा विचार केला पाहिजे. त्यामुळे माझ्या दृष्टीने स्वातंत्र्याचे दोनच निकष- निसर्गाची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे आणि जे स्वातंत्र्य तुम्ही स्वत:साठी जे मागताय ते तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता का, हे प्रश्न स्वत:ला विचारा. त्याचं उत्तरच तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेची उत्तरं देईल.

डॉ. माधव रेगे

(शब्दांकन : वैशाली चिटणीस)

First Published on August 11, 2017 10:07 pm

Web Title: dr madhav rege special article on independence day 2017