News Flash

पाण्यासाठी नंग्या तलवारी (कोल्हापूर)

बिंदू चौकात टँकरचे पाणी मिळण्यासाठी हाणामारी झाली.

पाण्यासाठी नंग्या तलवारी (कोल्हापूर)

11-lp-droughtदुष्काळ पाण्याचा आणि सरकारी दूरदृष्टीचा
पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन केलेली पायपीट, विहिरींचा तळ शोधताना गमावलेले जीव, कोरडी  पडलेली तळी- नद्या- धरणं, तहानलेली माणसं-गुरं-ढोरं, करपलेली जमीन.. जीवघेण्या दुष्काळाने राज्याची कशी दैना उडालेली आहे, याचे ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी टिपलेले जळजळीत वास्तव-
सुहास सरदेशमुख, एजाजहुसेन मुजावर, दयानंद लिपारे, अविनाश पाटील, चंद्रशेखर बोबडे

एरवी सुजलाम् सुफलाम् म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ात पाण्यासाठी रस्त्यावर उतरून हाणामारी करायची वेळ लोकांवर आली आहे. या पाणीबाणीचे जराही गांभीर्य सरकारला नाही.

जलवैभवाची मनसोक्त उधळण करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्य़ाला प्रथमच तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने जलसंघर्ष उफाळला आहे. किती? करवीरनगरीच्या ऐतिहासिक बिंदू चौकात टँकरचे पाणी मिळण्यासाठी नंग्या तलवारी घेऊन हाणामारी झाली, तीन लाख लोकसंख्येच्या औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजीत प्रथम नागरिक, नगराध्यक्षा, अतिरिक्त मुख्याधिकारी यांना संतप्त महिलांनी धक्काबुक्की केली, गावोगावी ग्रामपंचायतींवर मोच्रे काढून सरपंचांना फैलावर घेतले जात आहे. जिल्ह्य़ात एकीकडे पाणीटंचाईवरून संघर्ष सुरू असताना पंचगंगा नदी आत्यंतिक प्रदूषित झाल्याने पर्यावरणमंत्र्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. एकीकडे पाणी मिळविण्यासाठी संघर्ष तर दुसरीकडे दूषित पाण्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न अशा कोंडीत कोल्हापूर जिल्हा सापडला आहे.

पश्चिम घाटाचे नसíगक वरदान लाभलेला कोल्हापूर जिल्हा बारमाही सुजलाम् सुफलाम् असतो. डोंगर दऱ्यांमध्ये होणाऱ्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा यासह डझनभर नद्या दुथडी भरून वाहतात आणि पुढे त्यांचा संगम कृष्णा नदीत होतो. या नद्यांमध्ये बारमाही जलसंचय असतो. राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण आणि डझनभर मोठय़ा तलावांची उभारणी करून आपल्या संस्थानांत सदैव पाणी खेळतं राहील याची तजवीज करून ठेवली. काळम्मावाडी धरणासह अन्य मध्यम-लहान धरणांमुळे जलवैभव नांदू लागले. यंदा मात्र अस्मानी संकट ओढवले.

सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने प्रथमच पाणीटंचाईच्या तीव्र झळा करवीरनगरीसह अवघ्या जिल्ह्य़ाला बसू लागल्या आहेत. कोल्हापुरात दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. कोल्हापूरनंतर मोठे शहर असलेल्या इचलकरंजीत कृष्णानदीची पातळी खालावल्याने पाच दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. जिल्ह्य़ाच्या पूर्वेकडील डोंगराळ-वनविभाग असलेल्या भागातील पाण्याचे स्रोत आटण्याच्या मार्गावर आहेत, तर बरेचशे कोरडेठाक पडले आहेत. जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात तलावांची संख्या पुष्कळ आहे. पण तेथेही पाण्याचा टिपूस उरलेला नाही. अनेक तलाव तर पहिल्यांदाच पाण्याशिवाय पाहायला मिळत आहेत. परिणामी जिल्ह्य़ामध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे.

पाणीपुरवठय़ामध्ये कपात करावी लागली आहे. स्वाभाविकच जिल्ह्य़ाला प्रथमच टँकरवाडय़ाचे स्वरूप येऊ लागले आहे. करवीरनगरीत पाणीपुरवठय़ात कपात झाल्याने पाणी मिळण्यासाठी नागरिक गुद्दय़ावर येताहेत. बिंदू चौकात नंग्या तलवारी घेऊन परस्परांच्या अंगावर धावून जाण्याचा बाका प्रसंग ओढवला होता. टँकर आल्यानंतर गल्लीबोळात भांडणांना ऊत आला आहे. इचलकरंजीच्या नगराध्यक्षांना महिलांनी धक्काबुक्की केल्याने दुकानांच्या आश्रयाला जावे लागले. नगरसेवकांना खुलेआम प्रश्न विचारून भंडावून सोडले जात आहे. पाण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बेअब्रू होत असताना पाणी नियोजनही फसले आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे विनियोग होणे अपेक्षित असताना त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचा तिळपापड होत आहे.

पाणीपुरवठा करताना कोल्हापूर महापालिकेचा हलगर्जीपणा लख्खपणे उठून दिसत आहे. शहराला दररोज १२० एम. एल. डी. (१२ कोटी लिटर) पाण्याचा उपसा केला जात असला तरी त्यातील चार कोटी लिटर पाणी गळतीद्वारा वापराविना वाहून जात आहे. करवीरनगरीला मुख्यत्वे करून पाणीपुरवठा होतो तो पंचगंगा नदीतून. उपसा केल्यानंतर पाणी मुख्य जलवाहिनीद्वारे जलशुद्धीकरण केंद्राकडे आणले जाते. ही जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटली आहे. अनेक व्हॉल्वमधून अहोरात्र पाणी वाहून जाते, पाण्याच्या टाक्यांना गळती आहे, अनेक ठिकाणची गळती शोधूनही सापडत नाही. परिणामी शहराला पाणीपुरवठा कमी होत असल्याने पाणीकपात करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहर, उपनगरातील लोकांना झगडावे लागत आहे. दररोज शे-पाचशे मोजून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. हीच गोष्ट वस्त्रनगरी इचलकरंजीतही आहे. दररोज ४५ एम. एल. डी. पाण्याचा उपसा करूनही प्रचंड आणि सातत्याने होणाऱ्या गळतीमुळे नागरिकांच्या नळाला पुरेसे पाणी मिळत नाही. कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली आहे तर पंचगंगा नदी प्रदूषणामुळे विषासमान बनली असल्याने तिचा पाणीपुरवठा करता येत नाही अशा दुहेरी कात्रीत हे औद्योगिक शहर सापडले आहे. पाच दिवसांतून एकदा अन् तेही अपुरे पाणी येत असल्याने नागरिकांची तहान अपुरीच आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या भाळीही असेच भोग आहेत.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता ऐकल्यानंतर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा पारा चढला त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर दंडात्मक कारवाई केली आणि बँक गॅरेंटी जप्त केली म्हणजे, तुमचे काम संपले का? असा सवाल करीत या विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. दररोज करवीरनगरीत १०० एमएलडी सांडपाणी तयार होते त्यातील ९५ टक्के एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते आणि उर्वरित सांडपाणी बिनदिक्कत पंचगंगा नदीत सोडले जाते. हे कमी की काय म्हणून मल्यांचे टँकर नदीत रिते करण्याचा पराक्रम महापालिका प्रशासन करीत आहे. हरित अर्थसंकल्प सादर करणाऱ्या महापालिकेचे नदी प्रदूषणाचे वाभाडे निघाले आहे. कोरडे पडलेले तलावातील गाळ काढून त्यामधील पाणी संचय करण्याची चांगली संधी असतानाही ती दवडली जात आहे. तर दुसरीकडे पाण्याची चणचण जाणवत असतानाही बरेचशे महाभाग पाण्याची उधळण करून आपली बौद्धिक पात्रता दाखवत आहेत. एकूणच पाणीप्रश्नी ना शासनाला गांभीर्य आहे, ना स्थानिक स्वराज्य संस्थेला आणि पाण्यासाठी ओरड करणाऱ्या जनतेलाही. त्यामुळे जलवैभवाचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या कोल्हापूरच्या जनतेला वैशाख वणवा अंगावर घेत पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
दयानंद लिपारे – response.lokprabha@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 1:31 am

Web Title: droughts in maharashtra kolhapur
Next Stories
1 टंचाईच्या गर्तेत… (उत्तर महाराष्ट्र)
2 ११ हजार गावांत दुष्काळी स्थिती (विदर्भ)
3 ‘जलयुक्त’चा उपाय (सोलापूर)
Just Now!
X