सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चर्चेत आलेला ‘उडता पंजाब’ अमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेने पंजाबमधील तरुणाईला कसा विळखा घातला आहे, हे ठळकपणे मांडतो. या चित्रपटाशी संबंधित वादांच्याच दरम्यान ठाणे पोलिसांनी ‘इफेड्रिन’ या अमली पदार्थाचं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलं. या रॅकेटमध्ये नव्वदीच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या ममता कुलकर्णी या अभिनेत्रीचा सहभाग असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

एकीकडे अमली पदार्थाच्या भीषण वास्तवावर भाष्य करणारे सिनेमे प्रदर्शित होताहेत तर दुसरीकडे समाजातील अशा घटनांमध्ये, गुन्ह्य़ांमध्ये सिनेमा क्षेत्रातील काही व्यक्तींचा संबंध आहे असं वास्तव पुढे आलं आहे. हे सगळं आपल्यापासून लांब आहे, असं मानण्यात काही हशील नाही कारण या अमली पदार्थाच्या व्यसनांच्या ऑक्टोपसने आजच्या तरुणाईला विळखा घातलेला आहे.  या वास्तवाचा आमच्या प्रतिनिधीनी सर्व अंगांनी घेतलेला वेध- चैताली जोशी, अनुराग कांबळे, नीलेश पानमंद

आपल्याकडे बॉलीवूडचा प्रचंड पगडा आहे. तिथे जे होतं त्याचं अनुकरण केलं जातं. एखाद्या सिनेमातल्या हिरॉईनचे स्टायलिश कपडे आवडले की तरुण मुली त्याचं अनुकरण करतात. तर हिरोचं कडं, घडय़ाळ, टोपी किंवा तत्सम काही भावलं की मुलांच्या हातात, डोक्यावर तसंच काहीसं दिसू लागतं. हे फक्त आजच्या काळात दिसून येतंय असं अजिबात नाही. ही अनुकरणाची परंपरा फार आधीपासून आहे. म्हणूनच सत्तरीच्या दशकातील बेल बॉटम पॅण्ट्स तेव्हा खऱ्या आयुष्यात आजूबाजूला दिसू लागल्या. अमिताभ, धर्मेद्र, ऋषी कपूर, राजेश खन्नाची हेअरस्टाइल कॉपी होऊ लागली. मुमताज, हेमामालिनी, परवीन बाबी यांच्या कपडय़ांची स्टाइल सर्वत्र दिसू लागली. ही परंपरा आजही सुरू आहेच. अनुकरण करण्याचं प्रमाण आता वाढताना दिसू लागलंय. पण ही सर्वसामान्य लोकांना ‘दिसणारी’ इंडस्ट्री आतून खूप वेगळी आहे. इथे होणारा व्यवसाय, राजकारण वेगळ्या स्वरूपाचं आणि पातळीवरचं आहे. आता बॉलीवूडचा संबंध या ना त्या कारणाने इतर अनेक क्षेत्रांशी लावला जातो. पूर्वीसुद्धा बॉलीवूड आणि स्मगलिंग, ड्रग्जचा व्यवसाय क्षेत्रं यांचा संबंध होता. पण त्याचं स्वरूप थोडं वेगळं होतं. अमुक एक हिरोईन तमुक खेळाडूसोबत लग्न करतेय इथवरच ते नव्हतं. तर हे संबंध अगदी ड्रग्जचं सेवन आणि त्यांचा व्यवसाय इथवर जाऊन पोहोचलेलं होतं. अर्थात या क्षेत्रातले सगळेच तसे होते किंवा आहेत असं नाही. अशा प्रकरणांमध्ये गुंतलेल्या कलाकारांच्या बातम्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी छापूनही आल्या होत्या.

हिंदी सिनेसृष्टी दारूसारख्या व्यसनासाठीही ओळखली जात होती. त्यात पुढे नवनवीन मद्यप्रकार येऊ लागले. कालांतराने सिगरेटचंही प्रस्थ वाढत गेलं. दरम्यान सिनेमांमधून सिगरेट, दारू पिण्याचे प्रसंग दाखवले जात होतेच. त्यामुळे हे अगदी सर्वसाधारण वाटू लागलं. हळूहळू इतर क्षेत्रांतील लोक सिनेमांची निर्मिती करू लागले. आर्थिक साहाय्य पुरवू लागले. याच वेळी स्मगलिंगच्या व्यवसायात असलेले काही जण निर्माते म्हणून सिनेसृष्टीत आले. तेव्हाच ड्रग्जच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायाने बॉलीवूडमध्ये शिरकाव केला. सत्तरच्या दशकात हा ट्रेण्ड सुरू झाला. या क्षेत्रातल्या ज्यांना ड्रग्जचं सेवन करायचं होतं त्यांनी त्यांचा स्वीकार केला. एकाने केलं की ते दुसऱ्यापर्यंत जायला इंडस्ट्रीत वेळ लागत नाही. अशा प्रकारे ही साखळी मोठी होत गेली. ड्रग्जचं सेवन करणाऱ्या आणि त्याचा व्यवसाय करणाऱ्या काही 06-lp-drugsकलाकारांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर काहींचं उत्तमरीत्या सुरू असलेलं करिअर उतरणीला आलं. काहींची प्रकरणं गाजली, काहींची नावं चर्चेत आली तर काहींची नावं गुलदस्त्यातच राहिली.

१९७६ साली मटका किंग रतन खत्री ‘रंगीला रतन’ या सिनेमासाठी आर्थिक साहाय्य केलं होतं. हृषी कपूर, परवीन बाबी हे दोघे या सिनेमात होते. पैसे पुरवणारी व्यक्ती अशा व्यवसायात असल्यामुळे सहाजिकच ड्रग्जसारख्या प्रकारांचा शिरकाव होणं कठीण नाही. याच दरम्यान हाजी मस्तानचे इंडस्ट्रीतले संबंध वाढले. त्यानंतर साधारण पाचेक वर्षांनी ड्रग्ज आणि सिनेसृष्टी हा विषय अधोरेखित झाला. याला कारणीभूत ठरला तो संजय दत्त. सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर याबाबत सांगतात, ‘खरं तर संजय दत्त इंडस्ट्रीत आल्यापासूनच ड्रग्जच्या अधीन होता. १९८१ मध्ये त्याचा ‘रॉकी’ हा सिनेमा आला. त्याच वेळी त्याचं ड्रग्जचं व्यसन शिवाय त्याची संगतही बरी नव्हती. सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा व्यसनाधीन आहे हे कळल्यावर प्रेक्षकांना त्यावेळी आश्चर्य वाटलं होतं. त्याच्या ड्रग्ज अ‍ॅडिक्शनचा संबंध अभिनेत्री आणि त्याची प्रेयसी टीना मुनीम त्याला सोडून गेली याच्याशी लावला गेला. ‘रॉकी’ सिनेमा प्रदर्शित होण्याच्या बरोबर पाच दिवस आधी नर्गिसचा मृत्यू झाला. नंतर संजय दत्तला उपचारांसाठी अमेरिकेला नेलं होतं. तो बरा होऊन पुन्हा भारतात आल्यावर ‘जान की बाजी’ या सिनेमाने त्याने त्याच्या कारकीर्दीला पुन्हा सुरुवात केली. त्यावेळी संजय दत्त पुन्हा सिनेमात येत असल्यामुळे पत्रकार परिषदही घेतली होती. ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर पडून तो पुन्हा काम करायला लागला याचं प्रमोशन करणारी ती परिषद नंतर बराच काळ चर्चेत राहिली होती.’

सिनेक्षेत्रात प्रचंड ताणतणाव आहे. एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धाही आहे. पहिल्या क्रमांकावर टिकून राहण्याची धडपड आहे. यश-अपयश टिकवून ठेवण्याची क्षमता निर्माण करण्याचाही कलाकारांचा आटापिटा असतो. पण करिअरच्या सुरुवातीच्या काळात यशाच्या शिखरावर जाऊन मग खाली उतरणारे कलाकार या ताणतणावाला बळी पडतात. तणावामुळे व्यसनांच्या आहारी जातात. सुरुवातीला ताण हलका व्हावा यासाठी केलेलं अमली पदार्थाचं सेवन नंतर कधी व्यसन होतं हे त्यांनाही कळत नाही. हा तणाव, स्पर्धा, धडपड, आटापिटा सगळंच आधीपासून आहे. पूर्वीच्या काळीही अनेक कलाकार तणावामुळे व्यसनांच्या अधीन झालेले दिसून येतील. त्यात संजय दत्तसोबत मझहर खान हेही नाव येतं. सिने पत्रकार दिलीप ठाकूर मझहरबाबत सांगतात, ‘मझहर हा त्याकाळची प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमानचा नवरा. कामाच्या ताणामुळे तो ड्रग्जच्या प्रचंड आहारी गेला होता. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे झीनतला मानसिक त्रास होऊ लागला. अखेर लग्नानंतर १५-२० वर्षांनी तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. हे जाहीर करण्यासाठी तिने एक पत्रकार परिषदही घेतली होती. त्यात तिने  मझहरविरुद्ध अनेक आरोपही केले होते. ही परिषद गाजली होती.’

साधारण ऐंशीच्या दशकात ड्रग्जचं पेव फुटलं होतं. नव्वदीच्या दशकात अंडरवर्ल्डशी फिल्म इंडस्ट्रीचे नातेसंबंध वाढू लागले. नंतर काही जण फॅशन म्हणून ड्रग्ज घेऊ लागले. ममता कुलकर्णीने सिने इंडस्ट्री तसंच अंडरवर्ल्ड संबंधित विकी गोस्वामीशी लग्न केल्याची चर्चा झाली. नव्वदच्या दशकात इतर क्षेत्रातून आलेल्यांशी सिनेसृष्टीतल्या काही अभिनेत्रींनी लग्न केलं. मंदाकिनी या अभिनेत्रीचे दाऊदशी संबंध होते, ती त्याच्यासोबत दुबईला गेली होती आणि काही वर्षांनी त्याला सोडून ती पुन्हा भारतात परतली, अशी चर्चा झाली होती. १९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्ड आणि सिनेमा इंडस्ट्री ही प्रकरणं गाजली. याचदरम्यान ड्रग्जची प्रकरणंसुद्धा वाढत गेली.

कलाकारांनी सिगरेट ओढणं पूर्वीच्या काळी शान मानली जायची. सिगरेट ओढणं जसं सर्वसाधारण वाटू लागलं तसं अफू गांजा, चरस या सिगरेटच्या पुढच्या गोष्टी आल्या. गांजा, पाइप ओढण्याची पुढची पायरी म्हणजे ड्रग्ज. अंडरवर्ल्ड, ड्रग्ज, स्मगलिंग व्यवसायातील लोक सिनेमांचे निर्माते झाले आणि ड्रग्जच्या व्यवसायाचा शिरकाव वेगाने होत गेला. निर्मात्याचा जो व्यवसाय असेल त्याच्या वस्तू तो कलाकार आणि सिनेमातील इतर लोकांना देतो असं पूर्वी होतं. तसंच बऱ्यापैकी आजही आहे. त्यामुळे त्या काळी निर्माता ड्रग्जच्या व्यवसायातील असेल तर तो सिनेमातील कलाकार आणि इतर लोकांना ड्रग्जचा पुरवठा करत असे. त्यातूनच हे ड्रग्जचं रॅकेट बॉलीवूडमध्ये पसरत जातं, असं इंडस्ट्रीतल्या एकाकडून समजतं.

फिरोज खान, संजय खान यांनी सिनेमाची निर्मिती करायला सुरुवात केली तेव्हा ते आखाती देशांमध्ये शुटिंग करु लागले. दुबई, अबूदाबीला अशा देशांमध्ये त्यांनी शूटिंग केलं. हिंदी सिनेमाच्या शूटिंगसाठी आखाती देशांची मदत मिळतेय हे बघितल्यावर त्याबाबत चर्चा होऊ लागली. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी अशा प्रकारची मदत मिळणं हे लोकांच्या भुवया उंचावणारं होतं. ‘हरे रामा हरे कृष्णा’ या सिनेमातील ‘दम मारो दम’ हे गाणं हिप्पी जमातीचं आयुष्य अधोरेखित करणारं होतं. या सिनेमातून ड्रग्ज, त्याचा व्यवहार याबाबतचं चित्रण प्रेक्षकांना बघायला मिळालं.

शेखर सुमनचा मुलगा अध्ययन सुमन, नासिरुद्दीन शहांचा मुलगा, आदित्य पांचोली, पूजा बत्रा, पूजा भट, राहुल रॉय ही नावं ड्रग्जचे व्यसनाधीन असलेल्यांमध्ये चर्चेत होती, असं सिनेसृष्टीचा कानोसा घेतल्यावर समजतं. फरदीन खानचा ‘प्यार तुने क्या किया’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि चौथ्या-पाचव्या दिवशी त्याच्या गाडीत कोकेन सापडले. याचा दुहेरी अर्थ लावला. त्याने हे प्रसिद्धीसाठी केलं असावं आणि खरंच तो ड्रग्ज घेत होता असे दोन अर्थ लावले. पुढे त्याच्यावर केस दाखल झाली पण पुराव्यांअभावी त्याची निर्दोष सुटका झाली. झायेद खान, विनोद खन्नाच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा साक्षी खन्ना या नावांभोवतीही चर्चा आहे.

इंडस्ट्रीतली अशीही काही नावं आहेत ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही; पण त्यांची नावं चर्चेत मात्र आहेत. त्या चर्चाना शेवट नाही. चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी अनेकांनी त्याबाबत काहीही स्पष्ट वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे ती नावं अजून तरी चर्चेतच आहेत.

हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटाच्या बातम्या, गॉसिप्स गेल्या दोनेक वर्षांपासून नियमितपणे समोर येताहेत. सगळं आलबेल सुरू असताना त्यांच्यात घटस्फोट का होतोय हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. पण त्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी, मुद्दे सध्या समोर येताहेत. सुझान खान कोकेनच्या आहारी गेल्याची चर्चा आहे. त्यांच्या घटस्फोटामागे तिचं व्यसनाधीन असणं एक कारण असल्याचंही बोललं जातंय. पण सुझान याबद्दल अजून काहीही बोललेली नाही. शाहरुख खानची बायको गौरी खानला एकदा बर्लिन विमानतळावर मरीजुआना हे ड्रग तिच्याजवळ सापडल्यामुळे अडवलं होतं. याबाबत माध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली होती. पण याबाबत अद्याप स्पष्ट असं काहीही समोर आलेलं नाही. गौरी खानचं नावं याआधी अशा प्रकारे स्पॉटलाइटमध्ये आलेलं नव्हतं. प्रसिद्ध फॅशन गुरू प्रसाद बिडाप्पाकडे दीड ग्रॅम मरीजुआना सापडल्यामुळे त्यालाही दुबई विमानतळावर अडवलं होतं, असं इंडस्ट्रीतल्या एका सूत्राकडून समजतं. नव्वदीच्या दशकातील मॉडेल गीतांजली नागपाल ड्रग्जचं सेवन करायला मिळावं यासाठी पैसे कमवण्यासाठी वाट्टेल ते करायची, तिच्या या व्यसनाधीनतेमुळे तिचं करिअर, कौटुंबिक जीवन दोन्ही बिघडलं असल्याची कुजबूज सिनेक्षेत्रात आहे. डीजे अकील हा एक्स्टसी या ड्रगच्या आहारी गेला होता, अशीही इंडस्ट्रीत चर्चा आहे. राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव, गुलशन ग्रोव्हर या नावांभोवतीही ड्रग अ‍ॅडिक्शनचा टॅग लागल्याची चर्चा आहे.

दिवगंत भाजपा नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन हा प्रमोद यांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांमध्येच चर्चेत आला. निमित्त ठरलं त्याच्या व्यसनाधीनतेचं. राहुल कोकेनच्या आहारी गेला होता. कोकेनच्या अतिसेवनामुळे त्याला दवाखान्यात दाखल केलं होतं.  दवाखान्यातून सोडल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. हिंदी सिनेमातला ओळखीचा चेहरा म्हणजे विजय राज. तोही अमली पदार्थाचं सेवन करतो. २००५ मध्ये दुबईत त्याला बेकायदेशीरपणे अमली पदार्थ बाळगल्यामुळे अटक करण्यात आली होती. आजचा आघाडीचा अभिनेता रणबीर कपूरही अमली पदार्थाचं सेवन करत असे. फिल्म स्कूलमध्ये असताना त्याने वीड या ड्रगचं सेवन केल्याचं त्याने काही मुलाखतींमधून कबूल केलं आहे.

मराठी इंडस्ट्रीकडेही ड्रग्जचं वारं वाहू लागलंय. आजच्या आघाडीच्या काही अभिनेत्री आणि अभिनेते ड्रग्जच्या आहारी गेल्याची चर्चाही सध्या मराठी सिनेवर्तुळात सुरु आहे.  मराठीतली एक बोल्ड अभिनेत्री, दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नाव कमावल्यावर मराठी सिनेमांमध्ये ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री, चॉकलेट हिरो आणि अ‍ॅक्शन हिरो अशी काहीशी ओळख असणारे अभिनेते यामध्ये आहेत, अशी दबक्या आवाजात चर्चा सध्या सुरु आहे. हिंदी इंडस्ट्रीसारखं मराठी इंडस्ट्रीत अशाप्रकारच्या चर्चा उघडपणे होत नव्हत्या. आता मात्र दबक्या आवाजात, कुजबूजत का होईना ही चर्चा होऊ लागली आहे.  मराठी-हिंदी इंडस्ट्री यातली दरी आता कमी होतेय. मराठीमधले कलाकार हिंदीत आणि हिंदीतले मराठीत असं काम करण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे हिंदूी इंडस्ट्रीतला ड्रग्जचा ट्रेण्ड हळूहळू मराठी सिनेसृष्टीत येतोय. सिनेसृष्टीतलं ड्रग रॅकेट आता एक्सक्लुझिव्ह राहिलेलं नाही, असं दिसून येतंय.

जशी मराठी-हिंदी सिनेसृष्टी ही दरी कमी होतेय तशीच बॉलीवूड आणि हॉलीवूड हे अंतरही कमी होत चाललंय. या तिन्ही इंडस्ट्री एकमेकांशी जोडलेल्या असल्यामुळे अमली पदार्थाचा व्यवसाय विस्तारत जाण्याची शक्यता पोलीस व्यक्त करतात. काळानुरूप त्यातही बदल होत असतील तर त्याचेही नवनवीन प्रकार वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध होईल, या शक्यतेचाही विचार करायला हवा. ड्रग्जचं वारं वेगळ्या दिशेने पुढे सरकतंय, असे मुद्दे पोलीस मांडतात. गेल्या ४०-५० वर्षांपासून ड्रग्ज घेणं, व्यवसाय करणं सुरू आहे. दारू पिण्याला आधी प्रतिष्ठा मिळाली नव्हती, आता मात्र आहे. ड्रग्जही तसंच आहे. ड्रग्जचं सेवन करण्याला आता प्रतिष्ठा नाही. पण येत्या १५-२० वर्षांत मिळाली तर नवल वाटायला नको, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

ग्लॅमरच्या दुनियेतली मंडळी पैसा, व्यवसायातले चढउतार त्यातून येणारं नैराश्य या सगळ्यामुळे अमली पदार्थाकडे वळतात असं एक गृहितक मांडलं जातं. पण ड्रग्जचा तरुणाईला कसा विळखा पडला आहे, ते ठिकठिकाणी रेव्ह पाटर्य़ावर घातलेल्या धाडींमधून वेळोवेळी समोर आलं आहे. विशेषत: मुंबईत तर हे चित्र अधिक भयावह आहे.

करिअर करण्यासाठी मुंबईत येण्याचं स्वप्न अनेकजण उराशी बाळगतात. मुंबईत जगायला मुंबईच शिकवते. मोठाल्या इमारती, सिनेनगरी, नामवंत कंपन्यांची मुख्य कार्यालयं, समुद्र अशा अनेक सुंदर पैलूंमधली मुंबई जगायला अनेकांना आवडतं. पण, नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणेच मुंबईलाही दोन रंग आहेत. चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य. मुंबई या मेट्रो सिटीत अनेक व्यवसायांची उलाढाल होत असते, अर्थकारण बदलत असतं. मुंबईसारख्या मोठय़ा शहरात मोठमोठय़ा गोष्टींचे व्यवहार होत असतात. मोठे व्यवहार म्हणजे अधिकाधिक पैशांची उलाढाल होत असते. यात काही व्यवहार थेट तर काही छुप्या पद्धतीने होतात. भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईला ग्लॅमरही तितकंच आहे. हे ग्लॅमर आहे सिनेसृष्टीचं, उंच इमारतींचं, जुन्या वास्तूंचं, जुन्या ठिकाणांचं, चकचकीत भागांचं आणि अशा ग्लॅमरमध्येच एक छुपा व्यवसाय चालतो ड्रग्जचा.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत सुरू असलेल्या ड्रग्जच्या व्यवसायाला अनेक धागेदोरे आहेत. आता हा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात विस्तारत असून याचं स्वरूपही बदललं आहे. मुंबई-ठाणे परिसरातील ड्रग्जच्या अधीन झालेल्यांची संख्या साधारण साडेपाच लाखांच्या असापास आहे. प्रत्येकजण एका दिवसात एक ग्रॅम इतकं ड्रग्जचं सेवन करतो. म्हणजे मुंबईत एका दिवसात एकूण साडेपाचशे किलो ड्रग्जचं सेवन केलं जातं. याचाच अर्थ एका दिवसात मुंबईमध्ये साडेपाचशे किलोंची विक्री केली जाते, अशी माहिती नार्कोटिक कंट्रोल ब्युरोमधील  (एनसीबी)एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून मिळते. ड्रग्जची किंमतही प्रचंड असल्याने मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते.

पूर्वी ब्राउन शुगरचं प्रमाण खूप होतं. ब्राउन शुगरचं व्यसन अतिशय धोकादायक असतं. पण, आता याचं व्यसन कमी होतंय. कारण आता ड्रग्जमध्ये विविध प्रकार आले आहेत. गांजा, चरस, हेरॉइन, कोकेन, मेफ्रेडॉन, एलएसडी, एक्सटसी, आइस असे ड्रग्जचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. यापैकी काहींचं उत्पादन भारतातील विशिष्ट भागात तर काहींचं परदेशात होतं. आंध्र प्रदेश, मद्रास आणि गुजरातमधून गांजाचं उत्पादन होतं, तर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशातून चरसचा पुरवठा केला जातो. हेरॉइनचं उत्पादन गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टप्प्यात मोठय़ा प्रमाणावर होत असतं. भारताच्या पश्चिमेला असणाऱ्या पाकिस्तान, अफगणिस्तान आणि इराण हा गोल्डन क्रिसेंट भाग आहे तर पूर्वेकडे असणाऱ्या म्यानमार, लाओस आणि कंबोडिया हा गोल्डन ट्रँगल भाग आहे. याच भागातून भारतात ड्रग्जचा शिरकाव होतो, असं एनसीबीच्या एका पोलीस अधिकाऱ्याकडून समजतं. तसंच भारताच्या मार्फत ड्रग्जची देवाणघेवाण होत असल्यामुळे त्या भागातही ड्रग्जची खरेदी केली जात असल्याची माहितीही सूत्र देतो.

मेफ्रेडॉन काही औषधांमध्ये लागणारं केमिकल आहे. मेफ्रेडॉनला कोकेनसारखी नशा येते म्हणून त्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढला होता. लोकांनी त्याचा गैरवापर केला. म्हणून मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यावर बंदी घातली होती, असं अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त जयंत नाईक-नवरे यांनी सांगितले. मेफ्रेडॉनला म्यावम्याव असंही म्हणतात. याचं सेवन केल्यानंतर डोळ्याच्या बाहुल्या विस्फारतात. डोळे मोठे झाल्यामुळे चेहरा मांजरीसारखा दिसतो. म्हणून याला म्याव म्याव असं म्हणतात. राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या गावांतील घराघरात ब्राउन शुगर तयार केली जाते.

कोकेन ड्रग भारतात बनत नाही. दक्षिण अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये कोकेन तयार केलं जातं. तिथून ते नायझेरियात पाठवलं जातं. तिथली तरुण मंडळी भारतात येतात. इथे येऊन ते कपडय़ांचा व्यवसाय करत असल्याचं सांगतात. पण त्या नावाखाली त्यांचा ड्रग्जचा व्यवसाय सुरू असतो. तामिळनाडूच्या आजूबाजूच्या परिसरात ज्याप्रमाणे नायझेरिअन तरुण मंडळी आता मोठय़ा प्रमाणावर राहताना दिसताहेत, तसंच ते आता ठाणे ग्रामीण, दिवा, पडघा, नवी मुंबई या परिसरात दिसून येत आहेत, अशी माहिती पोलीस देतात. एलएसडी हे ड्रग अतिशय भयानक असतं. ‘एलएसडीचे (लिसर्जीक अ‍ॅसिड डेथलॅमाइड) स्टॅम्पसारख्या अगदी छोटय़ा पेपरवर दहा ड्रॉप टाकलेले असतात. या छोटय़ा पेपरचा किंचित एक तुकडा तोडायचा आणि तो जिभेवर ठेवायचा. त्या एका तुकडय़ावर एक ड्रॉप असतो. एका ड्रॉपची ८०० ते १२०० रुपये इतकी किंमत असते. ते हळूहळू रक्तात मिसळतं. रक्तामार्फत मेंदूच्या थर्स्ट सेंटर म्हणजे तहान केंद्रात पोहोचतं. त्यामुळे एलएसडीचं सेवन केलेल्यांना तहान लागलेली कळत नाही. थकवा जाणवत नाही’, अशी माहिती एनसीबीच्या एका अधिकाऱ्याकडून मिळते. परदेशात अशा अनेकघटना घडतात. एलएसडीची नशा उतरल्यानंतर तहान लागते. तहानेची तीव्रता इतकी असते की त्यामुळे पाण्याचं अतिसेवन केलं जातं. या अतिसेवनामुळे तिथल्या काही तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काहींना एलएसडीमुळे दृष्टीभ्रम होत असल्याचंही निदर्शनास आलं आहे. आपल्यामध्ये खूप ताकद आली आहे असंही काहींना वाटतं. असं वाटल्यामुळे परदेशात एकाने धावती ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला होता.

मुंबईत होणाऱ्या ड्रग्जच्या खरेदी-विक्रीमध्ये तरुणांचा मोठय़ा प्रमाणावर सहभाग आहे. कुतूहल, साहस आणि सहवास या मुख्य तीन कारणांमुळे मुख्यत: पौगंडावस्थेतील तरुण पिढी ड्रग्जकडे आकर्षित होते. काही वर्षांपूर्वी ड्रग्जसंदर्भातील केसेस या झोपडपट्टी परिसरातील असायच्या. आता उच्च वर्गातील तरुण मुलांची संख्या यात अधिक आढळून येत असल्याचं एका ज्येष्ठ वकिलांचं म्हणणं आहे. आजच्या पिढीचे विचार बदलले आहेत. काही वर्षांपूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आजच्या पिढीला सहज सोप्या वाटतात. नाइट आऊट्स, पार्टी या सगळ्यापर्यंत पोहोचायचे मार्ग त्यांच्यासाठी अवघड नाहीत. त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्यात ते प्रयोग करू पाहतात. साहस आणि प्रयोगशील वृत्ती यांमुळे तरुण पिढीचं काही वेळा नुकसानच होतंय. मुंबईत महालक्ष्मी, फिनिक्स मिल परिसर, जुहू, वांद्रे हिल रोड, पाली हिल, सांताक्रुझ या भागांमध्ये सर्वाधिक पार्टी होत असतात, असं ड्रग्जची न्यायलयीन प्रकरणे हाताळणारे सुप्रसिद्ध वकील अयाज खान यांनी सांगितलं. मुंबईतल्या या भागांमध्ये सर्वाधिक उच्च वर्गातील लोक राहातात. शिवाय ग्लॅमरचाही मुद्दा इथे येतो, त्यामुळे या भागात होणाऱ्या पार्टीची संख्या जास्त आहे. मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातही पार्टी होत असतात पण त्याचं प्रमाण अजूनतरी कमी आहे. याशिवाय मुंबईबाहेर नाइट आऊट पार्टीचं आयोजन करायचं असेल तर लोणावळा, अलिबाग, पनवेल, कर्जत, खालापूर अशा ठिकाणांना तरुणांची पसंती असते. पण अशा ठिकाणी आपली मुलं गेल्यावर काय करतात याकडे पालकांनीच लक्ष द्यायला हवं, असंही अ‍ॅड. खान सुचवतात. तरुणांना त्यांचा त्यांच्यावर व्यवस्थित ताबा आहे असा भ्रम असतो. ‘माझं आयुष्य आहे. मी मला हवं तसं जगणार’ या अ‍ॅटिटय़ूडमुळे ते त्यांचं आयुष्य बिघडवतात.

आज सोशल माध्यमं वाढली आहेत. त्याचा वेगही जलद आहे. त्याचा वापर अशा पार्टीसाठी आणि अमली पदार्थाच्या उपलब्धतेसाठी केला जातो. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमधील एका सूत्राने सांगितलं, ‘एखाद्या पार्टीबद्दल एकमेकांना सांगण्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. त्यांच्या त्यासंदर्भातल्या खुणा ठरलेल्या असतात. त्यामुळे मेसेज कळणं सोपं जातं. शिवाय अमली पदार्थाची ऑनलाइन खरेदी करता येणाऱ्या काही वेबसाइट्स उपलब्ध आहेत.’ अशी पार्टी दुपारी चार किंवा पाच वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा-सात वाजता किंवा त्यानंतर संपते. म्हणून त्या पार्टीला ‘सनडाउनर’ असं म्हणतात.

काही वेळा अमली पदार्थाच्या सेवनाने काहीजण इतके अधीन जातात की त्यांचे गुन्हे करण्याचे प्रकार सुरू होतात. ‘एखाद्या व्यक्तीला अमली पदार्थाची इतकी सवय झालेली असते की ती त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असते. स्वत:ची नशा पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती चोरी करते. याला स्ट्रीट क्राइम म्हणतात. स्ट्रीट क्राइमच्या घटना अनेकदा घडतात. एखाद्याची एखादी वस्तू उचलणं, पळणं, दुकानाबाहेर ठेवलेल्या वस्तू चोरणं आणि मग त्या दुसरीकडे विकून पैसे मिळवणं असा गुन्हा केला जातो. या मिळालेल्या पैशांमधून ते अमली पदार्थाचं सेवन करतात’, असं अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त जयंत नाईकनवरे सांगतात. अमली पदार्थ सेवन आणि त्याची खरेदी-विक्री या एका गुन्ह्य़ाच्या जोडीला आता स्ट्रीट क्राइमच्याही केसेस होऊ लागल्या आहेत. तसंच या व्यसनामुळे व्यसनाधीन असलेलेही पेडलर्स होऊ लागतात. त्यामुळे एक गुन्हा केला त्यापाठोपाठ दोन गुन्हे अनेकदा त्या व्यक्तीकडून केले जातात. यात आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो. ड्रग्जच्या व्यसनामुळे तरुण मुलं स्वत:च्याच घरात चोरी करतात. पैसे, महागडय़ा वस्तू चोरणं अशी चोऱ्यांची प्रकरणं मधल्या काळात वाढली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी एक मोहीम राबवली होती. विविध कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी आणि तरुणांच्या कुटुंबातील सदस्यांशीही संवाद साधण्याचा उपक्रम मुंबई पोलिसांनी केला होता.

ग्राहकांपेक्षा विक्रेत्यावर अधिक लक्ष दिलं जात असल्याचं पोलीस उपायुक्त जयंत नाईक-नवरे सांगतात. ‘विक्री करणाऱ्याला पुरवठादार आणि ड्रग्ज खरेदी करणाऱ्याला ग्राहक असं म्हणतात. ग्राहक आणि पुरवठादार अशा दोघांवरही कारवाई केली जाते. पण, त्यापैकी ग्राहकांकडे एक रुग्ण म्हणून बघितलं जातं. त्यामुळे ग्राहकांविरुद्ध ज्या केसेस झालेल्या आहेत त्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आहेत. अमली पदार्थविरोधी पथकात नाही. मागच्या वर्षी ग्राहकांविरोधात मुंबईत एकूण १८ हजार केसेस दाखल झाल्या आहेत’, असं नाईकनवरे सांगतात. एनडीपीएस अ‍ॅक्टअंतर्गत डी अ‍ॅडिक्शन कोर्स करण्याची एक तरतूद आहे. डी अ‍ॅडिक्शन म्हणजे नशामुक्ती. ड्रग्ज खरेदी करणाऱ्या व्यक्तीने डी अ‍ॅडिक्शन कोर्स केला तर त्याच्यावर कारवाई होत नाही. एका दिवसात २०० ते २५० ड्रग्ज खरेदी करणाऱ्यांविरुद्ध केसेस दाखल होतात, अशी माहिती सूत्रांकडून समजते. अमली पदार्थाचं सेवन करणारी व्यक्ती पुनर्वसन केंद्रात गेली तर त्या व्यक्तीला शिक्षा होत नाही आणि सोडून दिलं जातं, अशी कायद्यामध्ये तरतूद केली आहे. म्हणूनच रेव्ह पार्टीमध्ये पकडलेली मुलं पुनर्वसन केंद्राचं प्रमाणपत्र आणून दाखवतात, असंही सूत्रांकडून कळतं.

नशामुक्ती आणि पुनर्वसन केंद्र याबाबत एक महत्त्वाची माहिती नार्कोटिक कंट्रोल ब्युरोमधील सूत्र उलगडून सांगतात. ‘सरकारी आणि महापालिकेच्या एकूण दवाखान्यांमध्ये एकूण फक्त १५० ते २०० जागा डी-अ‍ॅडिक्शन म्हणजे नशामुक्ती रुग्णांसाठी आहेत. जागा कमी असल्यामुळे त्यांना एका महिन्यापेक्षा जास्त दिवस ठेवलं जात नाही. नशामुक्ती एका महिन्यात होणं शक्य नसतं. अशा रुग्णांची मानसिक स्थिती वेगळी असते. त्यांना पूर्ण बरं होण्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असतं. त्याचं कौन्सिलिंग होणंही तितकंच गरजेचं असतं. हे उपचार अर्धवट झाले तर असे रुग्ण दवाखान्यातून बाहेर पडल्यावर आणखी व्यसनाधीन होतात. मुंबईच्या आसपास आठ ते दहा खासगी नशामुक्ती केंद्र आहेत. पण त्यांची महिन्याची फी ३० ते ४० हजार इतकी असते. सर्वसामान्यांना ती परवडणारी नाही. महाराष्ट्रात खासगी १२३ पुनर्वसन केंद्रे आहेत. पण त्यातली काही बंद आहेत, काहींची अवस्था अतिशय वाईट आहे तर काही ठिकाणी हिंसक प्रकारे रुग्णांवर उपचार केले जातात.’

कुतूहल, साहस आणि सहवास या तीन कारणांसह आणखी एक कारण काहींना ड्रगच्या विळख्यात खेचून आणतं. त्याबाबत अ‍ॅड. अयाज खान सांगतात, ‘एखाद्या व्यक्तीला विशिष्ट ठिकाणी म्हणजे पब, डिस्को किंवा पार्टीला जायचं असेल, तर तो तिथे जाणाऱ्या एखाद्या ग्रुपला ड्रग्जबद्दल माहिती देतो आणि ते ड्रग्ज तो आणून देऊ शकतो असं सांगतो. ड्रग्ज आणून दिल्यामुळे त्याला त्या ग्रुपसोबत तिथे जायला मिळाल्याची खात्री पटते. त्यामुळे एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी काहीजण ड्रग्जचा वापर करतात आणि मग त्यातच गुरफटतात. टीव्ही, बॉलीवूड, फॅशन या क्षेत्रातील अनेक कलाकार अमली पदार्थाच्या व्यसनाला बळी पडले आहेत. त्यांच्या सभोवताली असलेल्या लोकांचा वावर खूप असतो. त्यात सगळेच चांगले असतात असं नाही. त्यामुळे काही चुकीच्या लोकांच्या संगतीत आल्यामुळे इंडस्ट्रीतल्या कलाकार भरकटतात.’ तसंच एजन्सीजने ड्रग्जची विक्री करणाऱ्यांसह खरेदी करणाऱ्या एखाद्या नामवंत व्यक्तीला पकडलं तर समाजात योग्य तो संदेश पोहोचेल. एजन्सीने हे महत्त्वाचं काम करायला हवं, असंही अ‍ॅड. खान यांचं म्हणणं आहे.

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या प्रमाणावर सिनेमाने प्रकाश टाकला आहे. या सिनेमामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना पंजाबातील या गंभीर प्रश्नाबाबत माहिती मिळाली. पण तिथे ही समस्या फार आधीपासून भेडसावत आहे. पंजाब एकेकाळी सुदृढ आणि सधन राज्य होतं. पण आता तिथे अमली पदार्थाचं व्यसन प्रचंड प्रमाणात वाढलंय. तिथली तरुण पिढी वेगाने त्याकडे वळतेय आणि भरकटतेय. असंच चित्र आपल्या देशात विविध राज्यांतील ठीकठिकाणी दिसून येतंय. अमली पदार्थाचं उत्पादन, विक्री हा एक व्यवसायच झालाय असं म्हणायला हरकत नाही. या व्यवसायात पैसा आहे म्हणून नामवंत लोकही यात छुप्या पद्धतीने उतरतात, पैसे कमवतात पण बळी ठरतो तो तरुण वर्ग. व्यसनाधीनतेची साखळी कधी आणि कशी तुटेल याचा अंदाज लावता येणं थोडं कठीण आहे. पण जोवर खरेदी करणाऱ्यांवरही विक्रेत्यांप्रमाणेच कारवाई होत नाही तोवर ड्रग्ज घेणाऱ्यांचं प्रमाण कमी होणार नाही. हे प्रमाण कमी झालं नाही तर मागणी वाढत जाणार आणि त्यासाठी पुरवठाही होणार. अर्थशास्त्रातील मागणी तसा पुरवठा हा नियम इथेही लागू होणार.

काही वर्षांपूर्वी ड्रग्ज घेणाऱ्यांमध्ये झोपडपट्टी रहिवाशांची संख्या जास्त होती. मधल्या काळात उच्च वर्गामध्ये ड्रग्जच्या अधीन गेलेल्यांची संख्या जास्त दिसून आली. त्यामुळे औषधांप्रमाणे ड्रग्जची विक्री केली जाते. पूर्वी स्मगलर्स, गुंड हे ड्रग्जच्या व्यवसायात होते. बॉलिवुडमधील काही कलाकार सुरुवातीला ड्रग्जचं सेवन करायचे. पण, आता त्यातील काही कलाकार ड्रग्जचा व्यवसायही करु लागले आहेत. तसंच बॉलिवुडला प्रतिष्ठा असल्यामुळे भविष्यातील चित्र अतिशय धोकादायक असल्याची भीती पोलीस व्यक्त करतात. पोलीस विभाग सिनेसृष्टीकडे लक्ष ठेवून आहेत. ममता कुलकर्णीचं नाव आता समोर येत असलं तरी या क्षेत्रातील आणखी काही कलाकारांची नावं भविष्यात पुढे येण्याची शक्यता पोलीस व्यक्त करतात.

ड्रग्ज आणि सिनेमे :

  • हरे रामा हरे कृष्णा
  • चरस
  • फॅशन
  • देव डी
  • शैतान
  • दम मारो दम
  • गो गोवा गॉन
  • उडता पंजाब
  • एम क्रीम (आगामी सिनेमा)

डॉ. आनंद नाडकर्णी, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ

सिनेसृष्टीतील काही कलाकारांवर मी उपचार केले आहेत. सगळ्यांचा एकच पॅटर्न कधीच नसतो. या क्षेत्रातील दोन उदाहरणं सांगतो. एक व्यक्ती माझ्याकडे उपचारांसाठी आली होती. तिचं बालपण खूप त्रासामध्ये गेलं होतं. करिअर करण्यासाठी ती व्यक्ती या इंडस्ट्रीत आली. चांगला ब्रेक मिळाला. यशही मिळालं. पण ती व्यक्ती ते यश पचवू शकली नाही. घरातील अशांतता आणि असुरक्षिततेचा परिणाम तिच्या आयुष्यावर झाला. सिनेसृष्टीत काम करत असताना तिथल्या लाइफ स्टाइलमध्ये ती खूप ओढली गेली. हळूहळू त्याचा परिणाम तिच्या करिअरवरही झाला. ती व्यसनांच्या आहारी गेली. दुसरं थोडं वेगळं उदाहरण. एका यशस्वी कलाकाराला करिअरचा डाउन पॅच पचवता आला नाही. खरंतर त्या व्यक्तीला कौटुंबिक सुरक्षितता चांगली होती. असं असूनही करिअरमधली उतरण स्वीकारता आली नाही. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली आणि व्यसनाधीन झाली. यश आणि अपयश या दोन्हीकडे कसं बघाल, सेलिब्रेटीपण कसं सांभाळणार या सगळ्या गोष्टींचा योग्य विचार व्हायला हवा. एखादी व्यक्ती सेलिब्रेटी होते तेव्हा तिने तिचं स्वत्त्व गमवू नये. स्वत:चं अस्तित्व आणि सेलिब्रेटी असणं हे दोन्ही उत्तमरीत्या सांभाळणारे कलाकार या क्षेत्रात आजही आहेत. या दोन्हीमध्ये समतोल साधता आला पाहिजे. ते जमलं नाही की गोंधळ होतो. याच क्षेत्रात असेही लोक आहेत जे पूर्णपणे निव्र्यसनी आहेत. ताणतणाव प्रत्येक व्यवसायात कमी-जास्त प्रमाणात येतच असतात. अनिश्चितताही सगळीकडे असते. त्याचा सामना कसा करता हे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतं. व्यक्तिमत्त्व हे केंद्रस्थानी आहे. तुमचं व्यक्तिमत्त्व सबल नसलं तर तुम्ही त्याला बळी पडू शकता. व्यसनाधीन लोकांसाठी अमली पदार्थाची उपलब्धता ही अडचण कधीच नसते. महागडी ड्रग्जही त्यांना सहज उपलब्ध होऊ शकतं. पण, काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करणं प्रत्येकाचं काम आहे. यश-अपयश, प्रसिद्धी, स्टारडम हा जीवनाचा भाग आहे. पण, त्यात बुडून कसं जाऊ नये याचा विचार व्हायला हवा. अनेक जणांना व्यसनातून बाहेर पडायचं असतं. पण, ते मदतीसाठी येतात तेव्हा अनेक गोष्टी अवघड होऊन बसलेल्या असतात. शारीरिक आणि मानसिक गुलामीचा विळखा प्रचंड झालेला असतो. त्यांना त्यातून बाहेर पडण्याची इच्छा असली तरी ते कृतीत येत नाही आणि कृतीत आलं तरी ते टिकत नाही. या क्षेत्रातल्या एका व्यक्तीला व्यसनाधीनतेमुळे हे क्षेत्रच सोडावं लागलंय. सुदैवाने त्यानंतर ती व्यसनमुक्त झाली आहे. तसंच खूप प्रयत्न करूनही पूर्णपणे व्यसनमुक्त झाले नाही, असंही काहींच्याबाबबीत झालं आहे. मराठी-हिंदी अशा दोन्ही क्षेत्रांमधल्या कलाकारांचा यात समावेश असतो. साधारण तिशीच्या थोडा आधी आणि नंतरचा वयोगट यात समाविष्ट आहे. तरुण वयात लवकर यश मिळाल्यामुळे ते पचवण्याची, टिकवण्याची प्रगल्भता व्यक्तींमध्ये तितकीशी नसते.

ग्राहक आणि विक्रेत्यासाठी शिक्षा :

१९८५ मध्ये कायदा असा होता की, ड्रग्ज पकडलेल्या व्यक्तीकडे कितीही प्रमाणात ड्रग्ज असले तरी त्याला किमान दहा वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली जायची. यातही वाढ होण्याची शक्यता असायची. म्हणजे दहा वर्षांचा तुरुंगवास वीस वर्षांपर्यंत वाढवला जायचा तर एक लाखाचा दंड दोन लाखांपर्यंत वाढवला जायचा. नंतर २००० साली कायदा बदलला आणि त्यात स्मॉल क्वान्टिटी, नॉन कमर्शिअल म्हणजे मीडिअम क्वान्टिटी आणि कमर्शिअल म्हणजे लार्ज क्वान्टिटी असे प्रकार केले. ड्रग्जच्या प्रमाणानुसार शिक्षा सुनावली जाऊ लागली.

  • अमली पदार्थाची खरेदी करणाऱ्याला एक वर्ष तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंड.
  • अमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला त्याच्याकडे असलेल्या अमली पदार्थाच्या प्रमाणानुसार शिक्षा सुनावली जाते.
  • स्मॉल क्वान्टिटी (कमी प्रमाण), मीडिअम किंवा नॉन कमर्शिअल क्वान्टिटी (मध्यम प्रमाण) आणि लार्ज किंवा कमर्शिअल क्वान्टिटी (जास्त प्रमाण) अशी तीन प्रमाणांमध्ये विभागणी केली आहे.
  • स्मॉल क्वान्टिटी (कमी प्रमाण) मध्ये अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्याला एक वर्ष तुरुंगवास किंवा दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही.
  • मीडिअम किंवा नॉन कमर्शिअल क्वान्टिटी (मध्यम प्रमाण) मध्ये अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्याला दहा वर्षे तुरुंगवास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही.
  • लार्ज किंवा कमर्शिअल क्वान्टिटी (जास्त प्रमाण) मध्ये अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्याला दहा वर्षांपेक्षा जास्त वर्षे तुरुंगवास किंवा दोन लाख रुपये दंड किंवा दोन्ही.
  • गुन्हेगाराला तुरुंगवास, दंड की दोन्ही याबाबतचा निर्णय त्या त्या वेळी न्यायालय घेते.
  • पालकांसाठी..
  • मुलांवर अति बंधनं घालू नका.
  • मुलं घरी आली की त्यांचे हात-पाय-तोंड धुऊन झालं की ज्या टॉवेलला ते पुसतील तो टॉवेल तपासा. त्याला वास किंवा ड्रग्जचा बारीकसा अंश लागला आहे का ते बघा.
  • काही ड्रग्ज घेताना त्याची पावडर एका सरळ रेषेत मांडावी लागते. त्यासाठी मुलं पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर करतात. त्यामुळे मुलांकडे असलेली ही सर्व कार्ड्स तपासा.
  • सगळ्यांनी ठरवून रात्रीचं जेवण तर एकत्र बसून करा. जेणेकरून मुलाचं जेवणात लक्ष आहे का, त्याचं जेवण कमी झालंय का, तंद्रीत आहे का, सैरभैर आहे का, त्याची चिडचिड होतेय का हे सगळ्यावर लक्ष ठेवता येईल.
  • मुलांना स्पेस द्या, पण ते त्या स्पेसमध्ये नेमकं काय करताहेत याची माहिती तुम्हाला असू द्या.
  • एनडीपीएस अ‍ॅक्टमध्ये न येणारी केमिकल्स :
  • (एनडीपीएस-नार्कोटिक ड्रग्स अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस अ‍ॅक्ट)
  • टायपिंगच्या पांढऱ्या शाईत म्हणजे व्हाइटनरमध्ये असणारं अ‍ॅसिडॉन.
  • नेलपेंट काढणारं रिमूव्हर लिक्विड. ते रुमालावर टाकून हुंगण्याचं व्यसन अनेकांना असतं.
  • चांभाराकडे असणारं रबर सोल्युशन
  • डिझेल-पेट्रोलचा वास. काहीजण कारच्या जवळ फक्त डिझेल-पेट्रोलचा वास हुंगतात. हेही एक व्यसन आहे.
  • ज्यांना रात्रभर अभ्यास करायचा असतो ते ब्रेडला आयोडेक्स लावून खातात. त्यात बिब्बा असतो. बिब्बा हे स्टिम्युलंट आहे. त्यामुळे हे खाल्ल्याने झोप येत नाही आणि त्यांचा अभ्यास होतो.
    चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com
    @chaijoshi11