30 September 2020

News Flash

रॅकेट इफेड्रिन तस्करीचे…

औषधांच्या मात्रेत कमी-अधिक फरक करून त्यापासून अमली पदार्थ बनवले जाऊ शकतात.

सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चर्चेत आलेला ‘उडता पंजाब’ अमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेने पंजाबमधील तरुणाईला कसा विळखा घातला आहे, हे ठळकपणे मांडतो. या चित्रपटाशी संबंधित वादांच्याच दरम्यान ठाणे पोलिसांनी ‘इफेड्रिन’ या अमली पदार्थाचं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलं. या रॅकेटमध्ये नव्वदीच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या ममता कुलकर्णी या अभिनेत्रीचा सहभाग असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

एकीकडे अमली पदार्थाच्या भीषण वास्तवावर भाष्य करणारे सिनेमे प्रदर्शित होताहेत तर दुसरीकडे समाजातील अशा घटनांमध्ये, गुन्ह्य़ांमध्ये सिनेमा क्षेत्रातील काही व्यक्तींचा संबंध आहे असं वास्तव पुढे आलं आहे. हे सगळं आपल्यापासून लांब आहे, असं मानण्यात काही हशील नाही कारण या अमली पदार्थाच्या व्यसनांच्या ऑक्टोपसने आजच्या तरुणाईला विळखा घातलेला आहे.  या वास्तवाचा आमच्या प्रतिनिधीनी सर्व अंगांनी घेतलेला वेध- चैताली जोशी, अनुराग कांबळे, नीलेश पानमंद

सर्वसाधारणपणे औषधे माणसांची बिघडलेली प्रकृती दुरुस्त करण्यासाठी वापरतात. मात्र त्याच औषधांच्या मात्रेत कमी-अधिक फरक करून त्यापासून अमली पदार्थ बनवले जाऊ शकतात. जगभरात अशा अमली पदार्थाचे मोठे जाळे पसरले असून त्यात अनेक तरुण ओढले गेले आहेत. गेल्याच आठवडय़ात प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात हे दाहक वास्तव मांडण्यात आले आहे. योगायोग म्हणजे एकीकडे ‘उडता पंजाब’ सेन्सॉरच्या कात्रीत अडकून चर्चेत असतानाच ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ‘इफेड्रिन’ नावाच्या अमली पदार्थाचे एक मोठे रॅकेट उघडकीस आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचा तपास सुरू होता. मात्र ठाणे पोलीस या जाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यास यशस्वी झाले आहेत.  व्यसनांच्या या रॅकेटमध्ये बॉलीवूडमधील अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचाही हात असल्याचे निष्पन्न झाले आहे.

रायगड जिल्ह्य़ातील खालापूर तालुक्यामधील रिस गावात मयुर सुरेश सुखदरे (२४) राहातो. त्याचे बी.ए.पर्यंत शिक्षण झाले आहे. तो एका नामांकित औषध कंपनीत चांगल्या हुद्दय़ावर कामाला आहे. याच कंपनीत सागर सुरेश पोवळे (२८) हासुद्धा काम करतो. तोही रायगड जिल्ह्य़ातील पनवेल तालुक्यामधील कराडे गावचा रहिवासी. त्याचे मात्र दहावीपर्यंतच शिक्षण झाले आहे. दोघेही एकाच जिल्ह्य़ातील रहिवासी असल्याने त्यांची मैत्री झाली. दोघांनाही पैशांची चणचण भासत असल्यामुळे ते झटपट पैसा कमविण्याचा मार्ग शोधत होते. मात्र त्यांना मार्ग काही सापडत नव्हता. त्याच वेळी कंपनीतील जुना मित्र अमित (बदललेले नाव) हा त्यांना योगायोगाने भेटला आणि त्याने धानेश्वर स्वामीसोबत त्यांची ओळख करून दिली. याच ओळखीतून पुढे दोघांना ‘इफेड्रिन’ या अमली पदार्थ विक्रीचा मार्ग सापडला. इफेड्रिनचा नशेसाठीही वापर केला जात असल्यामुळे त्याला मोठी मागणी आहे. औषध कंपनीत कामाला असल्यामुळे इफेड्रिनच्या विक्रीतून चांगले पैसे मिळतील, याची दोघांना खात्री होती. त्यामुळे दोघेही त्यासाठी तयार झाले आणि स्वामीनेही त्यांना इफेड्रिनचा साठा पुरविण्याची जबाबदारी घेतली. त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशातील त्यांचे वाटेही ठरले. सोलापूर जिल्ह्य़ातील एव्हॉन सायन्सेस लिमिटेड कंपनीमध्ये स्वामी हा चांगल्या पदावर काम करतो. या कंपनीत उसाच्या मळीपासून इफेड्रिन पावडरची निर्मिती केली जाते आणि श्वसनासंबंधीच्या विकारांवर औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे कंपनीतील इफेड्रिनचा साठा चोरून दोघांना पुरविण्याचे बेत स्वामीने आखले. त्याप्रमाणे त्याने कंपनीतून दोन किलो इफेड्रिन पावडर चोरली आणि दोघांना पुण्यामध्ये बोलावून घेतले. तिथे त्यांच्याकडे पावडरचा साठा देऊन त्याची विक्री करण्यास सांगितले. त्यानंतर पावडरच्या विक्रीसाठी दोघेजण ग्राहक शोधू लागले, मात्र त्यांना ग्राहक मिळत नव्हते. त्याच वेळी ठाणे पोलिसांच्या अमलीविरोधी पथकाला एका खबऱ्याने दोघांची माहिती दिली. या दोघांकडे इफेड्रिन पावडरचा मोठय़ा प्रमाणात साठा असल्याचा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या पथकाने दोघांना पकडण्यासाठी जाळे टाकले. डमी ग्राहक तयार करून त्यांच्यामार्फत दोघांशी संपर्क साधला आणि त्यांना पावडरच्या सौद्यासाठी ठाण्यातील वर्तकनगर भागात बोलावून घेतले. पहिलाच सौदा असल्यामुळे ठरल्याप्रमाणे दोघेही वर्तकनगर भागात पोहोचले. त्याच वेळी पोलिसांनी झडप घालून दोघांना ताब्यात घेतले.

अंगझडतीमध्ये दोघांकडे दोन किलो इफेड्रिन पावडरचा साठा सापडल्याने पोलीसही चक्रावले. याप्रकरणी पोलिसांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. त्यानंतर दोघांची सखोल चौकशी करण्यात आली. या चौकशीत स्वामीचे नाव पुढे आले, मात्र त्याच्याविषयी दोघांना काहीच माहिती नव्हते. कोणताही धागादोरा नसतानाही पोलिसांनी स्वामीचा शोध सुरू केला. त्याचा माग काढत पोलिसांचे पथक सोलापूरमध्ये पोहोचले. तिथेच स्वामी त्यांच्या हाती लागला. त्यावेळी त्याच्याकडेही इफेड्रिनचा साठा सापडला. पोलिसांनी तिथेच त्याची चौकशी सुरू केली. या चौकशीत त्याने चिंचोली एमआयडीसीतील एव्हॉन सायन्सेस लिमिटेड कंपनीतून ही पावडर आणल्याची कबुली दिली. त्याच दिवशी पोलिसांनी एव्हॉन कंपनीत धाड टाकली. सर्वच संशयास्पद असल्यामुळे पोलिसांनी कंपनी सील केली. कंपनीच्या आवारात एक गोदाम असून त्याच्याभोवती भंगार व टाकाऊ वस्तू होत्या. पोलिसांनी गोदामामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कामगारांकडून त्यांना तिथे मोठे साप असल्याचे सांगण्यात आले. तरीही  धाडस दाखवत पोलीस गोदामाच्या दिशेने निघाले. प्रत्यक्षात तिथे त्यांना एकही साप आढळला नाही. या गोदामाच्या आतमध्ये गेल्यानंतर पोलिसांना तिथे इफेड्रिनचा मोठा साठा आढळून आला. या साठय़ाविषयी कुणाला माहिती पडू नये म्हणून सापाची भीती घालण्यात आल्याची बाब कारवाईदरम्यान पोलिसांच्या लक्षात आली. तसेच इफेड्रिनच्या तस्करीत कंपनीतील अनेकांचा सहभाग असणार, अशीरास्त शंका पोलिसांना आली आणि त्यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी स्वामीकडे पुन्हा चौकशी करण्यात आली. कंपनीचा मुख्य संचालक मनोज जैन याने काही महिन्यांपूर्वी कंपनीतील इफेड्रिन पावडरचा साठा अशाच प्रकारे विकला होता आणि त्यातून त्याला सुमारे २३ लाख रुपये मिळाले होते. हा सर्व व्यवहार डोळ्यांदेखतच झाल्यामुळे अशा प्रकारे पैसे कमविण्याची लालूच निर्माण झाल्याची माहिती त्याने चौकशीत दिली. तेव्हापासूनच मनोज पोलिसांच्या रडारावर आला आणि पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली.

ठाणे पोलिसांची एकीकडे इफेड्रिनची कारवाई सुरू असतानाच गुजरात पोलिसांनी इफेड्रिन प्रकरणात नरेंद्र काचा याला अटक केली. त्याच्याकडे सापडलेला इफेड्रिनचा साठा एव्हॉन कंपनीतील असल्याचे गुजरात पोलिसांच्या चौकशीत पुढे आले होते. तसेच एव्हॉन कंपनीत कारवाई केल्याची माहिती मिळताच गुजरात पोलिसांनी ठाणे पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अधिकाऱ्यांना सखोल तपासासाठी मार्गदर्शन केले. तसेच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांचे विशेष पथक तयार केले. या पथकामार्फत कंपनीतील संचालक, अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या औषध विभागाने एका नामांकित औषध कंपनीवर बंदी घातली असून ही कंपनी श्वसनासंबंधी विकारांवर औषध निर्मिती करायची. या कंपनीला एव्हॉन मोठय़ा प्रमाणात इफेड्रिनचा पुरवठा करायची. मात्र ती कंपनी बंद झाल्यामुळे एव्हॉनचे उत्पादन घटले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कंपनी बंद अवस्थेत होती. याच चौकशीदरम्यान कंपनीचा उत्पादन व्यवस्थापक राजेंद्र डिमरी आणि त्यापाठोपाठ कंपनीचा मुख्य संचालक मनोज जैन या दोघांना अटक करण्यात आली. या कारवाईच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेतील अमली प्रतिबंधक प्रशासन विभागाच्या दिल्लीतील अधिकारी डेरेक ओडनेय यांच्या पथकाने ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डेरेक यांनी आयुक्त सिंग यांना एक पत्र दिले. त्यामध्ये कुख्यात ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी, एव्हॉन कंपनीचा संचालक मनोज जैन, किशोर राठोड, जय मुखी आणि पुनीत शृंगी यांचा समावेश होता. गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेचा हा विभाग इफेड्रिनच्या आंतरराष्ट्रीय तस्करांचा शोध घेत असून त्यांच्या तपासादरम्यान ही नावे पुढे आली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तस्करांची एव्हॉन कंपनीसोबत असलेली साखळी उघडकीस आली आणि या प्रकरणात पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली.

आंतरराष्ट्रीय टोळीचे जाळे..

एव्हॉन कंपनीचा मुख्य संचालक मनोज जैन आणि पुनीत शृंगी हे दोघे बालपणीचे मित्र आहेत. पुनीतचा हाँगकाँगमध्ये टाइल्सचा व्यवसाय होता, पण तो काही कारणांमुळे बंद पडला होता. त्यामुळे सध्या तो बेरोजगारच होता. तसेच एव्हॉन कंपनी बंद पडल्यामुळे मनोजही आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे कंपनीतील इफेड्रिन पावडरची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी त्याला विश्वासू साथीदाराची गरज होती. त्यासाठी त्याने पुनीतची निवड केली आणि त्याला कंपनीत कामावर ठेवले. त्याच्यामार्फतच तो कंपनीतून इफेड्रिनचा साठा बाहेर विक्रीसाठी पाठवायचा आणि त्यातून त्याला चांगले पैसे मिळत होते. एव्हॉन कंपनीमध्ये इफेड्रिनच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरविण्याचे काम जय मुखी करीत होता. परंतु कंपनी आर्थिक संकटात सापडल्यामुळे मनोजने त्याचे ६० ते ७० लाख रुपयांचे बिल थकविले होते. या बिलाच्या रकमेसाठी तो मनोजकडे सातत्याने पाठपुरावा करीत होता, पण त्याला बिलाची रक्कम काही केल्या मिळत नव्हती. अखेर त्याने मनोजला धमकवायचे ठरविले आणि त्यासाठी एक योजनाही आखली. मुंबईतील सायन परिसरात जय राहतो. त्याच्या शेजारी एक गुजराती कुटुंब राहात असून त्यांचा नातेवाईक किशोर राठोड हा त्यांच्या घरी नेहमी यायचा. तो गुजरातमधील एका माजी आमदाराचा मुलगा असल्यामुळे त्याची मोठी ओळख आहे. शेजाऱ्यांचा नातेवाईक असल्यामुळे किशोरसोबतही जयची ओळख झाली होती. मुंबईतील एका बडय़ा हॉटेलमध्ये त्याने मनोजला बैठकीच्या निमित्ताने बोलविले आणि तिथे किशोरलाही बोलावून घेतले. या बैठकीमध्ये किशोरमार्फत त्याला धमकावून त्याच्याकडून पैसे काढण्याचा त्याचा बेत होता. परंतु या बैठकीत मनोजची आर्थिक अडचण लक्षात घेऊन किशोरने त्याला आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गुजरात राज्यातील अहमदाबादमधील पालडी गावचा किशोर हा रहिवासी आहे. कुख्यात ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी हासुद्धा याच गावातील रहिवासी आहे. एकाच गावातील रहिवासी असल्यामुळे दोघांची एकमेकांशी ओळख आहे. इफेड्रिनचा वापर नशेसाठी होऊ शकतो, याचा अंदाज किशोरला बैठकीत आला होता. त्यामुळेच त्याने विकीमार्फत आर्थिक मदत मिळवून देण्याची योजना आखली होती. परंतु विकी परदेशात असल्यामुळे त्याला भेटण्यासाठी किशोरपुढे मोठी अडचण होती. किशोरच्या वडिलांना चेन्नईमध्ये अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक झाली होती आणि त्याच कालावधीत बनावट नोटांप्रकरणी किशोरला अटक झाली होती. या कारवाईमुळे त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जप्त होता. पासपोर्ट नसल्यामुळे त्याला परदेशात जाता येत नव्हते. तसेच तोही आर्थिक अडचणीत सापडला होता. दरम्यान, २०१५ मध्ये त्याला पासपोर्ट पुन्हा मिळाला. त्यानंतर त्याने केनियामध्ये विकी गोस्वामीची भेट घेतली. त्याचबरोबर ड्रग्ज माफिया अ‍ॅलेक्सचीही त्याने दुबईत भेट घेतली. गुजरातमधील एक मित्र रोमेलभाईच्या मदतीने तो अ‍ॅलेक्सपर्यंत पोहोचला. या दोन्ही टोळ्यांकडे त्याने इफेड्रिनच्या तस्करीसंबंधी चर्चा केली. विकी आणि अ‍ॅलेक्स या दोन आंतरराष्ट्रीय टोळ्यांसोबत देशातील स्थानिक टोळ्यांमार्फत मनोजने इफेड्रिनच्या विक्रीचे बेत आखले होते. त्यापैकी काही स्थानिक टोळ्यांना त्याने इफेड्रिन विकल्याचा संशय पोलिसांना असून त्या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.  या तस्करी प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीपाठोपाठ बॉलीवूडमधील चार ते पाच जणांची नावे पुढे येत असून त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे या तस्करीच्या निमित्ताने बॉलीवूडही चर्चेत आले आहे.

ममता आणि विकीचा सहभाग

८ जानेवारी २०१६ रोजी इफेड्रिन प्रकरणातील मुख्य आरोपी विकी गोस्वामी याने केनियामध्ये एक बैठक घेतली. त्या बैठकीस एव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीचा संचालक मनोज जैन, अभिनेत्री ममता कुलकर्णी, किशोर राठोड, जय मुखी, डॉ. अब्दुला आणि त्याचे दोन साथीदार उपस्थित होते. टांझानियामध्ये डॉ. अब्दुला याची सबुरी फार्मा नावाची कंपनी असून तो विकीचा व्यावसायिक भागीदार आहे. सोलापूरमधील एव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीतील इफेड्रिन पावडरचा साठा सबुरी फार्मा कंपनीमध्ये पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. प्रत्येक महिन्याला दहा टन इतका पावडरचा साठा पाठविण्याचे ठरले होते. सबुरी फार्मामध्ये इफेड्रिनवर प्रक्रिया करून त्यापासून मेथ अ‍ॅम्फाटामाइन (आइस) हा अमली पदार्थ तयार करण्यात येणार होता आणि त्याची युरोप, अमेरिकासह जगातील विविध देशांमध्ये विक्री करण्याचे बेत आखण्यात आले होते. मेथ अ‍ॅम्फाटामाइन या अमली पदार्थाची ५० हजार डॉलर प्रति किलो दराने विक्री करण्याचे बैठकीत ठरले होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे विकी गोस्वामी याने इफेड्रिन पावडरचा साठा मुंबईमधील मोहमद अली रोड भागातील एका दलालाकडे पाठविण्यास सांगितले. तसेच त्याने जय मुखीकडून दहा रुपयांच्या नोटेचा क्रमांक घेतला होता. एव्हॉन कंपनीतून शंभर किलो इफेड्रिन पावडरचा साठा मोहमद अली रोड भागात पाठविण्यात आला. त्या वेळी जयने सांगितलेल्या दहा रुपयांच्या नोटेचा क्रमांक पाहून पावडरचा साठा ताब्यात घेतला. तीन दिवसांनंतर विकीने फोन करून साठा मिळाल्याचे मनोजला कळविले. त्यामुळे विमानातून हा साठा नेण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. या साठय़ाच्या बदल्यात विकीने मनोजला केनिया ते गुजरात व गुजरात ते मुंबई असे हवालामार्फत करोडो रुपये पाठविले. चार टप्प्यांत हे पैसे देण्यात आले आणि त्यासाठीही दहा रुपयांच्या नोटेचा क्रमांक वापरण्यात आला. त्यानंतरचा पुढील साठा गुजरातमधील एका बंदरातून समुद्रामार्गे परदेशात जाणार होता. त्यासाठी विकीने साखरेची ऑर्डर दिली होती. या साखरेच्या गोणीतून हा साठा जाणार होता, पण त्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी तो जप्त केला.

व्यवसायाची भागीदारी

मेथ अ‍ॅम्फाटामाइन या अमली पदार्थाच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यामध्ये विकी गोस्वामी व डॉ. अब्दुला यांना ३३ टक्के, मनोज जैन व पुनीत शृंगी यांना ३३ टक्के आणि किशोर राठोड आणि जय मुखी यांना ३३ टक्के याप्रमाणे भागीदारी ठरली होती. तसेच इफेड्रिन पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये आणि हा व्यवसाय सुरळीतपणे चालावा म्हणून मनोज जैन, ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी या तिघांनी एक प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावानुसार एव्हॉन कंपनीच्या शेअर्सचा दर ३५ ते ४० रुपये इतका आहे आणि कंपनीचे दोन कोटींपेक्षा जास्त शेअर्स आहेत. या शेअरचा दर २६ रुपये इतका ठरवून ११ लाखांपेक्षा जास्त शेअर्स ममता कुलकर्णीच्या नावे करण्याचे आणि त्याआधारे तिची कंपनीच्या संचालक पदावर नेमणूक करायची. त्यानंतर सोलापूरमधील एव्हॉन कंपनीतून टांझानियामधील सबुरी फार्मा कंपनीला इफेड्रिन पाठवायचे आणि सबुरी फार्मामध्ये त्याचे मेथ अ‍ॅम्फाटामाइन बनविण्याची योजना ठरली होती. ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी या दोघांच्या आदेशाप्रमाणेच हा व्यवसाय चालविण्याचेही ठरले होते.

मेथ अ‍ॅम्फाटामाइनचे प्रशिक्षण

इफेड्रिनपासून मेथ अ‍ॅम्फाटामाइन हा अमली पदार्थ बनविण्याचे ज्ञान डॉ. अब्दुला याच्याकडेच आहे. इफेड्रिनपासून मेथ अ‍ॅम्फाटामाइन बनविण्याचे प्रशिक्षण डॉ. अब्दुला याने केनियामध्ये काहीजणांना दिले. त्यासाठी किशोरने नरेंद्र काचासह आणखी तिघांना पाठविले होते. मात्र, त्या तिघांनी प्रशिक्षण घेतले नाही. नरेंद्रने मात्र त्याचे प्रशिक्षण घेतले. इफेड्रिनच्या पावडरपासून मेथ अ‍ॅम्फाटामाइन हा अमली पदार्थ तयार केला जातो. या प्रक्रियेदरम्यान इफेड्रिनचा ४० टक्के साठा वाया जातो. मेथ अ‍ॅम्फाटामाइन या अमली पदार्थाची एक किलोग्रॅमची किंमत सुमारे ५० हजार डॉलर इतकी आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत २३ टन इफेड्रिनचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे दोन हजार कोटींच्या घरात आहे. या साठय़ापासून मोठय़ा प्रमाणात मेथ अ‍ॅम्फाटामाइन तयार होऊ शकला असता मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे तो साठा वेळीच जप्त झाला.

अटक व फरारी आरोपी..

सागर पोवळे, मयूर सुखदरे, राजेंद्र डिमरी, धानेश्वर स्वामी, पुनीत शृंगी, मनोज जैन, हरदीपसिंग गील, नरेंद्र काचा, बाबासाहेब धोत्रे आणि जय मुखी अशा दहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यापैकी सागर, मयूर, धानेश्वर, राजेंद्र, मनोज, नरेंद्र, बाबासाहेब, पुनीत, हरदीपसिंग या नऊ जणांविरोधात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोन टप्प्यांत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून ते एकूण ३८५ पानांचे आहे. त्यापैकी दोन आरोपींनी न्यायाधीशांपुढे जबाब नोंदविला असून त्यातून आंतरराष्ट्रीय तस्करीसंबंधी महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. त्याच आधारे पोलिसांकडून ही कारवाई सुरू आहे. या दहा आरोपींव्यतिरिक्त सात आरोपी अजूनही फरार असून त्यामध्ये किशोर राठोड, कुख्यात ड्रग्ज माफिया विकी गोस्वामी, अभिनेत्री ममता कुलकर्णी, सुशीलकुमार, डॉ. अब्दुला आणि त्याचे दोन साथीदार यांचा समावेश आहे. यापैकी किशोर हा भारतात तर उर्वरित सहा आरोपी परदेशात असण्याची शक्यता आहे. या सर्वाचा पोलीस शोध घेत आहेत.

ठाणे पोलिसांचे पथक..

पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पराग मणेरे, साहायक पोलीस आयुक्त नागेश लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस आयुक्त भरत शेळके, ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके, साहायक पोलीस निरीक्षक अजय घोसाळकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझडे, मनोहर घाडगे, विजय उपाळे, करंजुले आणि इतर कर्मचारी या पथकाने ही कारवाई केली.

ममता कुलकर्णी कनेक्शन

सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या दोघांच्या अटकेनंतर इफेड्रिनची तस्करी उघडकीस आली. या दोघांपाठोपाठ सोलापूरमधील एव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीचा अधिकारी धानेश्वर स्वामीला अटक झाली. तेथूनच पुढे तस्करीचे रॅकेट उघड होत गेले. या प्रकरणात कंपनीचा मुख्य संचालक मनोज जैनला अटक झाली. त्यानंतर या प्रकरणानंतर फरार झालेल्या कंपनीचा अधिकारी पुनीत शृंगी याला मुंबईतून तर जय मुखीला नेपाळमधून अटक करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीतून आंतरराष्ट्रीय पातळीवर इफेड्रिनची तस्करी होत असल्याची माहिती पुढे आली. तसेच यंदाच्या जानेवारी महिन्यांत केनियामध्ये इफेड्रिन तस्करीसंबंधी एक बैठक झाली होती आणि ही बैठक विकी गोस्वामीने घेतली होती. त्या वेळी तिथे अभिनेत्री ममता कुलकर्णी ही उपस्थित होती. या व्यवसायाकरिता तिला एव्हॉन कंपनीचे संचालक करण्यात येणार होते. अशी माहिती आरोपींच्या चौकशीतून पुढे आल्याने पोलिसांनी तिला या प्रकरणात आरोपी केले आहे.
नीलेश पानमंद – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 1:26 am

Web Title: ephedrine raket
Next Stories
1 डाळींच्या बाजारपेठेत ८ हजार कोटींच्या नफेखोरीसाठी ‘सरकारी कट’!
2 तरुणांचे आर्थिक नियोजन
3 चाळिशी एक ‘अर्थ’पूर्ण सुरुवात!
Just Now!
X