12 December 2019

News Flash

विदर्भात शेतकरी काळजीत!

यंदा विदर्भात आतापर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजी कायम आहे.

मोहन अटाळकर – response.lokprabha@expressindia.com

यंदा विदर्भात आतापर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही. जून महिना कोरडा गेला. तीन ते चार दिवसच पाऊस आला. जुलैतही सहा ते सात दिवसांच्या वर पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजी कायम आहे.

गेल्या वर्षीच्या दुष्काळाचे चटके सहन करतानाच विदर्भात अत्यल्प पावसामुळे त्यापेक्षाही दाहक अवर्षणाची स्थिती दिसू लागली आहे. पाऊसच नसल्याने २५ ते ३० टक्के क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता आहेच शिवाय मोठय़ा प्रमाणात पेरण्याही उलटल्या आहेत. पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. विहिरी-तलाव आटले आहेत. धरणांमधील जलसाठा अवघा आठ टक्क्यांवर आला आहे. विदर्भातील मोठा भाग पाण्याच्या दुर्भिक्षाने व्याकूळ झाला आहे. १९७२ च्या दुष्काळाची आठवण जुन्या-जाणत्या लोकांना येऊ लागली आहे.

यंदा उन्हाळ्याचे चटके जास्तच जाणवले. पूर्व विदर्भाला टँकरची फारशी गरज भासली नाही, पण पश्चिम विदर्भातील शेकडो गावे विकतच्या पाण्यावर आपली गुजराण करीत होते. पावसाळा सुरू झाल्यावर या गावांना दिलासा मिळेल, टँकरच्या संख्येत घट होईल आणि निदान काही महिने तरी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही, हा समज पावसाने या वेळी खोटा ठरवला. पावसाळ्याचे दोन महिने संपत असताना पश्चिम विदर्भात सुमारे ३२४ टँकर सुरू आहेत. यंदा पाऊस चांगला पडेल, या भावनिक लाटेवर स्वार झालेल्या नियोजनकर्त्यांना निसर्गाने चांगलीच हुलकावणी दिली आहे.

विदर्भातील पूर्व भागात धानाचा पट्टा आहे. धानाच्या रोवणीसाठी शेतात पाणी साचेल, असा पाऊस आवश्यक असतो. यंदा आतापर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही. काही शेतकऱ्यांनी धूळपेरणी केली. जूनच्या अखेरच्या आठवडय़ात पाऊस झाला. त्यानंतर तो बेपत्ता झाला. धानाच्या रोवणीवर मोठे संकट आले आहे. जुलैअखेपर्यंत ५० टक्के रोवण्या आटोपतात. यंदा केवळ ५ टक्के पेरणी झाली आहे. हे चित्र भयसूचक आहे. तूर सरासरी लागवड क्षेत्राच्या ५१ टक्के क्षेत्रात, मूग १२ टक्के, उडीद ११ टक्के, सोयाबीन ३२ टक्के तर कापूस ८२ टक्के क्षेत्रात आहे.

पश्चिम विदर्भात सोयाबीन आणि कापूस ही मुख्य पिके. जून महिन्यात चांगला पाऊस झाल्यास शेतकरी उडीद, मूग यांसारख्या कमी दिवसांच्या पिकांची लागवड करतात. पण, यंदा या पिकांच्या लागवडीसाठी पावसाने शेतकऱ्यांना संधीच दिली नाही. जूनअखेरीस अनेक भागांत दमदार पाऊस झाल्यावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या, पण पाऊस नसल्याने या सर्व क्षेत्रावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीचा कालावधी निघून जात असताना शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक भागांत दुबार पेरणी करणेही शक्य नाही. मुगाचा पेरा ३७ टक्के, उडीद ६१ टक्के, सोयाबीन ७१ टक्के तर कापूस लागवड ८९ टक्के क्षेत्रात झाली असली, तरी बहुतांश भागातील पेरण्या वाया गेल्या आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये पावसाला खंड पडण्यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. पावसाचा खंड किमान १४ ते १६ दिवसांचा असतो. गेल्या वर्षी जून महिन्यात अमरावती विभागात केवळ १८ दिवस तर नागपूर विभागात १५ दिवस पाऊस झाला. जुलैत दोन्ही विभागांमध्ये पावसाने २० दिवस हजेरी लावली खरी, पण ऑगस्टमध्ये अमरावती विभागात केवळ ११ दिवसांचा तर नागपूर विभागात १८ दिवसांचा पाऊस झाला होता. सप्टेंबरमध्ये तर अमरावती विभागात दोनच दिवस पाऊस आला. नागपूर विभागात आठ दिवस होता. गेल्या अनेक वर्षांत पावसाचे वेळापत्रकच असे अनियमित बनले आहे. पावसाचा हा खंड जीवघेणा आहे. तरीही कापूस आणि सोयाबीनसारखे पीक शेतकरी मोठय़ा हिकमतीने टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या वर्षी जून महिना कोरडा गेला. तीन ते चार दिवसच पाऊस आला. जुलैतही सहा ते सात दिवसांच्या वर पाऊस झालेला नाही.

उघडिपीचे दिवस किती आणि पावसाचे दिवस किती याबद्दल हवामान खात्याने पूर्वसूचना देणेही आवश्यक आहे. पावसातील खंड ही अपरिहार्यता शेतकऱ्यांनी गृहीत धरली आहे. पण सरकारी यंत्रणांना त्याचे गांभीर्य अजूनपर्यंत कळलेले नाही. पावसाने आपली रीत बदलली आहे. त्याचा परिणाम पीकरचनेवरही झाला आहे. उडीद, मूग हे पीक जून-जुलैमध्ये घेतले जाते. पण पावसाच्या अनियमिततेमुळे या दोन्ही पिकांचे क्षेत्र कमी झाले आहे. अमरावती विभागात हलक्या प्रतीची जमीन जास्त आहे. पावसाचा खंड वाढत असल्याने पिकांची धारणक्षमता आणि उत्पादन कमी झाले आहे. सद्य:स्थितीत पावसाच्या खंडाला कसे सामोरे जायचे हाच प्रश्न आहे. नक्षत्रांनुसार पाऊस न पडणे ही सर्वात प्रतिकूल बाब ठरली आहे. शेतीच्या कामांसाठी त्या त्या नक्षत्रांना पुरेसा पाऊस पडावा लागतो. परंतु आता पहिल्या पावसावर उगवण झालेली पिके वाळून जाईपर्यंत पाऊस ओढ देतो तर कधी अचानक एकाच दिवसात एवढा पाऊस होतो, की पिके कुजून जाण्याची वेळ येते. हवामान बदलाचे परिणाम म्हणून पावसाळ्याचे दिवस कमी झाले आहेत.

पाऊस विभागून पडण्याची गरज असली, तरी तशी खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळेच पेरण्या उरकल्यानंतर किंवा पिकांची उगवण झाल्यानंतर पावसाची गरज असते, तेव्हा मोठा खंड पडतो. अर्थातच उगवण झालेली पिके वाया जातात. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहते. नंतर गरज कमी असते तेव्हा मोठा पाऊस येतो. नक्षत्राप्रमाणे पाऊस पडणे म्हणजेच पावसाचे योग्य वितरण होणे. गेल्या अनेक वर्षांत विदर्भात हे चित्र पाहायला मिळालेले नाही. उलट गरज नसताना मोठा पाऊस आणि गरज असताना पावसाने दिलेली ओढ, अशीच परिस्थिती दिसून येत आहे. काही भागात कमी दिवसांत जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढल्या आहे. पाऊस पडण्याच्या दिवसांची संख्या कमी असली, तरी पाऊस अनेक ठिकाणी सरासरी गाठताना दिसतो आहे. एक तर सरासरीच्या जवळपास पाऊस पडूनही पिकांचे नुकसान होते आणि भरपाई मिळताना मात्र पावसाची सरासरीच लक्षात घेतली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजी कायम आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही. कर्जमाफीनंतरही आत्महत्यांचा आलेख चढता आहे. पावसाने पाठ फिरवल्यानंतर पेरण्या वाया जातात आणि शेतकरी कर्जात बुडतो. त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नसल्याने अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. कर्जमाफी केल्याने शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याच्या वाटा मोकळ्या झाल्या, असा दावा सरकारने केला असला, तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. अनेक जिल्ह्य़ांमध्ये तर २० ते २५ टक्केच कर्जवितरण होऊ शकले. विदर्भातील फक्त दोन जिल्ह्य़ांमध्ये कर्जवाटप ५० टक्क्यांच्या वर पोहोचू शकले. यंदा जूनपर्यंत विदर्भात ४६० शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे.

निम्माच पाऊस

अमरावती विभागात जून महिन्यात सरासरीच्या ७० टक्के, जुलैमध्ये ६० टक्के पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्य़ात ५३ टक्के, अमरावती ५३, यवतमाळ ५४, वाशीम ६३ तर बुलढाणा जिल्ह्य़ात ८३ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बुलढाणा वगळता सर्व जिल्ह्य़ांनी पावसाची सरासरी ओलांडली होती.

नागपूर विभागात जून महिन्यात सरासरीच्या केवळ ५० टक्के, तर जुलैत आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला आहे. भंडारा जिल्ह्य़ात ५६ टक्के, चंद्रपूर ६६, गडचिरोली ५३, गोंदिया ५८, नागपूर ६२ तर वर्धा जिल्ह्य़ात ४९ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत गोंदिया वगळता सर्व जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता.

धरणे आटली

अमरावती विभागातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक सिंचन प्रकल्प कोरडेच आहेत. मोठय़ा धरणांमध्ये सद्य:स्थितीत २०३ दलघमी (८.२ टक्के), मध्यम प्रकल्पांमध्ये ११५ दलघमी (१७.१३ टक्के), तर लघू प्रकल्पांमध्ये ४८ दलघमी (४.६४ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पांमध्ये सद्य:स्थितीत २४३ दलघमी (७.०२ टक्के), मध्यम प्रकल्पांमध्ये ८७ दलघमी (१३.७१ टक्के), तर लघू प्रकल्पांमध्ये ५२ दलघमी (१०.३१ टक्के) पाणीसाठा झाला आहे.

First Published on July 26, 2019 1:05 am

Web Title: farmers of vidarbha in worried
Just Now!
X