News Flash

संस्कृतीच्या नावाखाली उन्मादाची बाजारपेठ!

उत्साह, आनंदाचे प्रतीक असलेल्या सणांच्या उत्सवीकरणातून त्यामध्ये उन्मादाचा शिरकाव झाला आहे.

ganesh_utsavदहीहंडी असो, गणपती असो की नवरात्र असो.. उत्साह, आनंदाचे प्रतीक असलेल्या सणांच्या उत्सवीकरणातून त्यामध्ये उन्मादाचा शिरकाव झाला आहे. आज त्याला इव्हेंटीकरणाची जोड मिळाल्यामुळे हे सारेच उत्सव आता बाजारशरण झाले आहेत.
भारतीय समाजाच्या व्यवच्छेदक लक्षणांची यादी केली तर सणांचं उत्सवीकरण हे तिच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झालेलं दिसेल. एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा अशी मारुतीच्या शेपटाप्रमाणे न संपणारी एक लांबलचक यादीच आपल्याकडे असते. आताच्या काळात या ‘सणा’वळीची सुरुवात दहीहंडीने होते आणि गणपती, नवरात्र, दिवाळी असा प्रवास करत नववर्ष स्वागतानेच ही धुंदी उतरते. पुढे गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेनं मधल्या काळातली मरगळ दूर होऊन पुनश्च जान येते.
एकेकाळी एका छोटय़ा समुदायातच साजऱ्या होणाऱ्या सणांचे पाहता पाहता उत्सव झाले, उत्सवाचे इव्हेंट झाले. धार्मिकतेचं आवरण नावापुरतंच राहिलं आणि उरलं ते केवळ उत्सवीकरण. सेलिब्रेशनच्या नावाखाली केली जाणारी सो कॉल्ड ‘एन्जॉयमेंट’. याच उत्सवीकरणाच्या मुलाम्याखाली मग छोटय़ा छोटय़ा घरगुती सणांचेदेखील इव्हेंट होऊ लागले. मग ती राखी पौर्णिमा असो, की कोजागरीची रात्र. सारा सूर आणि नूर उत्सवीकरणाचाच.
सामाजिक अभिसरणाच्या नावाखाली सुरू झालेल्या सार्वजनिक उत्सवांच्या इव्हेंटीकरणाच्या झंझावाताने सणांची व्याख्याच बदलली आहे. घराघरात साजरा होणारा सण रस्त्यावर आला आणि त्याच्याचभोवती सारा समाज फिरू लागला. एकदा का कोणतीही गोष्ट समाजाची म्हटली की मग त्याला ना कसली मर्यादा, ना कसला धरबंद. समूहशक्ती ही जितकी फायदेशीर तितकीच किंबहुना अधिक मारक ठरणारी असते. त्यातूनच उत्सवीकरणात उन्मादाने शिरकाव केला.
साजरीकरणाची कमाल मर्यादा गाठल्याशिवाय साजरंपण येत नाही, म्हटल्यावर मग रस्त्यावर मंडप उभारणी असो की दणदणाटी आवाजातले लाउडस्पीकर्स की डीजेचा धिंगाणा, की पारंपरिक पर्याय म्हणून आलेले ढोलताशे असोत, की थेट मुली नाचवणारा ऑर्केस्ट्रा अशा अनेक गोष्टी इतक्या वेगाने आपल्यावर आदळल्या की इव्हेंटच्या गदारोळात नेमका सण कोणता हेच शोधावं लागेल. समूहशक्तीवर कब्जा करायला सदैव टपून बसलेल्या राजकारण्यांसाठी तर ही पर्वणीच. त्यातूनच मग प्रत्येक गल्लीचा राजा जन्माला आला. चार प्रसिद्धीमाध्यमं हाती धरली, मंडळाच्या सो कॉल्ड कार्यकर्त्यांची ‘सोय’ केली की मार्गदर्शक म्हणून फ्लेक्सवर झळकायला सारेच मोकळे. समाजातल्या चार शहाण्यासुरत्यांना यातील दोष दिसताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली खरी, पण त्यातून झालं इतकंच की न्यायालयाचे निर्णयावर निर्णय येत राहिले आणि मंडळांनी आमच्या पारंपरिक उत्सवावर, संस्कृतीवर घाला म्हणून त्याची हेटाळणी करायची, हेच होत राहिलं.
गेल्या पाच वर्षांत तर या इव्हेंटीकरणाच्या पाश्र्वभूमीवर आवाजाची मर्यादा, वाहतुकीचे नियोजन, मंडपाचा आकार, मूर्तीची उंची, दहीहंडीची उंची, फटाक्याचे आवाज अशा प्रकारचे इतके निर्णय न्यायालयाला द्यावे लागले आहेत की आता ‘आदर्श साजरीकरणा’चा ग्रंथच लिहावा लागेल. हे सारं मंडळांच्या पातळीवर होत असतानाच एक अन्य मोठा सामाजिक बदल या काळात घडला. तो म्हणजे घराघरात या सेलिब्रेशनने शिरकाव केला. मग तो कधी महिलांच्या माध्यमातून झाला तर कधी अगदी तुमच्या घरातल्या लहानग्याचा हात धरून आला. तर कधी स्टेटस सिम्बॉल सांभाळायचा म्हणून हे सणांचं सेलिब्रेशन वाढतच गेलं. महत्त्वाचं म्हणजे यात कसलाही वर्गभेद राहिला नाही. जो तो आपल्या कुवतीप्रमाणे यात भरच घालत गेला. मुंबईसारख्या मल्टी-कल्चर वातावरणाने जातिधर्माच्या भिंती पार करून सर्वच सणांचं उत्सवीकरण आपलंसं केलं. अर्थात हे सारं करताना एकीकडे मंडळांना विविध कारणांसाठी आरोपीच्या कोठडीत उभं करताना दुसरीकडे त्यांचीच री ओढणाऱ्या सर्वसामान्यांची संख्या कमी नाही. फटाक्यांची आतषबाजी असो, की इकोफ्रेंडली गणपतीवर प्लास्टिकच्या फुलांचा भडिमार असो यात सर्वसामान्यदेखील तितकेच दोषी आहेत.
श्रद्धा-अंधश्रद्धेतल्या सीमारेषा पुसट झाल्या. एकूणच समाजात इतक्या खोलवर रुजत जाणाऱ्या या उत्सवीकरणाच्या जाणिवेतून एक वेगळंच चित्र निर्माण झालं, ते म्हणजे सण असाच साजरा करायचा असतो. किंबहुना असं केलं नाही तर तो साजराच होत नाही. असं झालं की मग काही ठोकताळे बनतात. आणि हय़ा साऱ्या ठोकताळ्यांच्या तळाशी असते ती बाजारव्यवस्था.
सध्याच्या आपल्या उत्सवीकरणावर समाज अभ्यासक मुग्धा कर्णिक सांगतात की, बोट धरलं की हात पकडल्यासारखी आजची परिस्थिती आहे. एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं असं हे वाढतच जात आहे. एखाद्या साथीच्या रोगासारखं हे पसरत आहे. एवढय़ाशा श्रद्धेच्या बीजाभोवती रचलेला डोंगर असंच याचं स्वरूप आहे.’’ हे सारं उत्सवीकरण कोणत्या दिशेला जात आहे यावर त्या सांगतात की, चाळीस वर्षांपूर्वी उत्सव झाला की पडदा टाकून त्याच ठिकाणी मद्यप्राशन करणारे आणि आज रात्रंदिवस गणपतीच्या जागरणाच्या नावाखाली जुगार खेळणारे, मिरवणुकीत मद्यधुंद नाचणारे यात फक्त काळ बदलला, मनोवृत्ती तीच राहिली. श्रद्धेच्या नावाखाली धम्माल हाच काय तो या सर्वामागचा हेतू म्हणावा लागेल.’’
ganesh_utsav_traffic_jamआज तरी हे सारं काही संस्कृतीच्या गोंडस नावाखाली होताना दिसतं. मात्र त्यापलीकडे याचा विचार फारसा कोणी करत नाही. एक जण बाजू घेतो, दुसरा विरोध करतो आणि तिसरा मला काय त्याचं म्हणून स्वत:च्या साजरं करणात गर्क होतो.
आज अनेक सण केवळ त्या त्या जातिधर्माच्या समुदायापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. गणपती तर भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा होत आहे. मोठय़ा प्रमाणात गुजराती, पंजाबी, सिंधी समाज याकडे आकृष्ट झालेला दिसून येतो. त्यातील श्रद्धेचा भाग किती हा भाग वेगळा. पण मोठी क्रयशक्ती असणाऱ्या या वर्गाने अनेक संकल्पना बदलल्या आहेत. याचा कधी अभ्यास होणार का? त्यातून बदललेली सामाजिक रचना नेमकी काय आहे, कोठे जाणारी आहे?
मंडळांचा भाग थोडा बाजूला ठेवूया. अत्यंत मर्यादित महत्त्वाकांक्षा असणारा सर्वसामान्यांचा एक मोठा वर्ग हे कशासाठी करतो? समाजातील या घटकाला आनंद साजरा करण्यासाठी, रोजच्या कटकटी, दु:ख विसरण्यासाठी चार घटका विरंगुळा मिळवण्यासाठी निमित्त असणे गरजेचे असते. शहरीकरणाने अशा पूर्वापार निमित्तांचा संकोच केला. काळ-काम-वेगाच्या गणिताची कसरत करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी मग हेच इव्हेंटीकरण पथ्यावर पडलं. चार घटका मोकळीक हाच यामागचा महत्त्वाचा भाग. तशी संधी या इव्हेंट्सनी अनायसे प्राप्त करून दिली. मग हे विरेचन अशा उत्सवी साजरीकरणातून मिळू लागलं. अर्थात मंडळ काय आणि सर्वसामान्य काय दोन्ही ठिकाणी धोका आहे तो साजरीकरणातून वाढत्या उन्मादाचा.
दुसरा मुद्दा आहे तो राजकारण्यांच्या सहभागाचा. आज आपले सारे सण राजकारण्यांनी हायजॅक केले आहेत. गल्ली-गल्लीच्या तोंडावरचे फलक पाहिल्यावर लक्षात येईल. यात तसा भेदाभेद नाही. कारण त्यात अपेक्षित असतो तो मतदारवर्ग. यच्चयावत (काही सन्माननीय अपवाद वगळता) सार्वजनिक मंडळं ही राजकारण्यांच्या दावणीला बाधंली.
दुसरीकडे या वेगाने बदलत जाणाऱ्या घटनांना दिशा देण्याऐवजी माध्यमांनीदेखील यातलं उत्सवीकरणच उचललं. जे जे लोकप्रिय ते ते करायचं हा त्यातला भाग. टीआरपी आणि खपाचे आकडे त्यातूनच तर वाढतात हे त्यामागचं समीकरण. दिवसभर दहीहंडी दाखवणं, मिरवणुकीचा मिनिट न् मिनिट लाइव्ह दाखवणं, गल्लीबोळांच्या राजांच्या फोटोंनी रंगीत पानं सजवणं यातून उत्सवीकरणाला ग्लॅमर प्राप्त झालं. परिणामी सण बाजूला राहिला आणि उत्सवीकरण वरचढ ठरलं.
सुरुवातीच्या काळातील मुद्रित माध्यमांच्या या लोकप्रियकरणाला खरा जोर आला तो दूरचित्रवाणी माध्यमामुळे. त्याला बूस्टर डोस दिला तो चित्रपट आणि मालिकांनी. पूर्वीच्या काळात चित्रपटातील गणपतीची अथवा अन्य सणांची गाणी अगदी मोजकीच दिसायची. आज गणपतीची संधी साधून गणेशोत्सवातच चित्रपटातली गणपतीची गाणी लाँच करण्याचा फंडा दिसून येतो. अगदी ताजंच उदाहरण घ्यायचं तर दोन बिगबजेट चित्रपटांनी गणपतीची गाणी वाजवली आहेत. त्यात गणपतीच्या श्रद्धेपेक्षा अर्थातच चित्रपटाच्या प्रमोशनचा मुद्दा अधिक आहे. तर दुसरीकडे मालिका तर वर्षांतले सारे सण साजरे केल्याशिवाय पूर्णच होत नाहीत. थोडक्यात काय तर सण असेच साजरे करायचे असतात याचा एक परिपाठ यातून दिला जातो.
संस्कृती जोपासण्याच्या नावाखाली हे सारं होत असल्यामुळे सध्या तरी याविरुद्ध बोलणं म्हणजे संस्कृतीभंजकचा शिक्का बसतो. मग याला कसलाच धरबंद राहत नाही. मग रस्त्यावरून जाणारी मुलगी पाहिल्यावर गोविंदा पथकाचा अख्खा ट्रक तिच्याकडेच पाहत राहणं असो, की विसर्जनाच्या दिवशी म्हणजे ड्राय डेला हमखास दारू मिळण्याचं ठिकाण म्हणजे मंडळाच्या मिरवणुकांकडे पाहिलं जाणं असो यात काहीच गैर वाटत नाही. यात कसलं आलंय सामाजिक अभिसरण? सण-उत्सवांकडे आनंदाची, उत्साहाची पर्वणी म्हणून पाहायचं तर होळीच्या दिवशी सर्वसामान्याला घराबाहेर पडायचीदेखील दहशत बसावी असं अघोषित संचारबंदीचे वातावरण असतं.
हे झाले सामाजिक प्रश्न. पण दुसरीकडे या सर्वातून पर्यावरणाचे भीषण प्रश्नदेखील आपण निर्माण करतो आहोत हे तर कोणाच्याच खिजगणतीदेखील नाही. दहीहंडीच्या दिवशी पथकांच्या मार्गावर साचणारे प्लास्टिकच्या प्लेट, कप आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे ढीग, दिवाळीच्या दिवशी थेट तलावात, समुद्रात होणारी फटाक्यांची आतषबाजी, ध्वनिप्रदूषणाचे सारे नियम पायदळी तुडवणे अशी संस्कृतीच्या नावाखाली होणारी ही पर्यावरणाची मोडतोड अगदी सर्रास सुरू असते. किंबहुना पर्यावरणाची संस्कृतीच आपल्याकडे रुजली नसल्याचं हे ‘उत्तम’ उदाहरण म्हणावं लागेल. राहता राहिला प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा. अर्थातच कोणत्याही सामान्य माणसाला यात आपली काही जबाबदारी आहे असे वाटतच नाही. त्यासाठी ऊठसूट सरकारला धारेवर धरलं की काम झालं.
हल्ली दुसराच एक प्रकार वाढत चालला आहे. आम्हाला माहीत आहेत सारे नियम, पण आम्ही पाळणार नाही. काय करायचं ते करा. मग अशा वेळी सरकारी यंत्रणादेखील एखाद्या हतबलतेने हे सारे पाहतात. आणि कोणी नियमांची जाणीव करून देऊ लागला तर तो संस्कृती भंजक ठरतो. त्यामध्ये गेल्या वर्षभरात याला आक्रमक हिंदुत्वाचेदेखील पदरदेखील लाभले आहेत. या पाश्र्वभूमीवर आजच्या आपल्या साऱ्या उन्मादी उत्सवीकरणाचा अन्वयार्थ काढायचा तर तो कसा काढणार. एकीकडे मंडळांची प्रचंड मोठी ताकद, तर दुसरीकडे सर्वसामान्यांचा उत्सवीकरणाकडे वाढता ओढा, स्टेटस सिंबॉलची सोकॉल्ड अपरिहार्यता आणि या सर्वाचे नियंत्रण करणारी बाजारपेठ. आज आपले सारेच उत्सव हे संपूर्णपणे बाजारपेठशरण झाले आहेत. शंभर-दीडशे कोटींची नवरात्रीची बाजारपेठ, त्यापेक्षा कीतीतरी मोठी गणेशोत्सवाची बाजारपेठ, असं असल्यावर उद्या चार शहाण्यासुरत्यांनी इव्हेंटचा पुन्हा सण करायचा म्हटले तरी ते आता अवघड आहे. कारण आता हे उत्सव समाजाचे राहिलेच नाहीत. ते बाजारपेठेला हवे आहेत. त्याचबरोबर या इव्हेंटच्या आधाराने अनेक हेतू साध्य करुन घेणाऱ्या राजकारणी प्रायोजकांनादेखील हवे आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होणंच बाजारपेठेच्या फायद्याचं आहे. सेलिब्रेशनचा उन्माद जितका अधिक तितका बाजारपेठेचा फायदा अधिक हा बाजारपेठेचा नवा नियम रूढ होतोय.
ganesh_utsav_water_pollutioइव्हेंटीकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर ही बाजारपेठ विकसित होत आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक सांगतात, ‘‘उत्सव आणि बाजारपेठेचं नातं पूर्वापार आहे, पण आज त्यातली संख्यात्मक वाढ खूप मोठय़ा प्रमाणात झाली आहे. एकंदरीतच आपल्या अर्थव्यवस्थेत असंघटित क्षेत्राचा वाटा ८५% इतका आहे. आणि या चार-पाच महिन्यांच्या काळातील असंघटित क्षेत्रातील अर्थकारणाला मोठी गती मिळते. त्यातच आज आपल्या उत्सवाचं इव्हेंटीकरण झालेलं आहे. त्यामुळे ज्याचे आर्थिक संबंध यात गुंतले आहेत ते हे सारं टिकवणार. ’’
अर्थव्यवस्थेशी निगडित सामाजिक मुद्दा मांडताना ते सांगतात की, आजचं हे उत्सवीकरण हा संक्रमणकाळ आहे. गेल्या काही वर्षांत नव्याने क्रयशक्ती वाढलेला वर्ग मोठय़ा प्रमाणात आढळतो. पण उत्पन्न वाढलं म्हणून संस्कृती सुधारत नाही. मजेची व्याख्या उत्क्रांत होत नाही. आर्थिक सुबत्तेबरोबर येणारी स्वायत्ततेची भावनादेखील येथे महत्त्वाची ठरते.
थोडक्यात काय तर उत्सवीकरणातून तयार झालेलं उन्मादाचं ओझं आज संस्कृतीच्या खांद्यावर आलं आहे आणि ते बाजारपेठ नियंत्रित असल्यामुळे सध्या तरी उन्मादाची बाजारपेठ तेजीत आहे.

मुखवटे आणि चेहरे
हल्ली मध्यमवर्गीयांमध्ये आम्ही पर्यावरणाचे कसे रक्षण करतो वगैरे दाखविण्याची मोठी चढाओढ लागलेली असते. इको फ्रेंडली या नावाने हे सारं सुरू असतं. त्यातला सर्वात महत्त्वाचा विरोधाभास म्हणजे मूर्ती शाडूची आणि त्यावरचा रंग असतो तो मात्र रसायनमिश्रित. गणपतीच्या सजावटीत प्लास्टिकचा वापर प्रचंड वाढलेला असतो. केवळ शाडूची मूर्ती केली की आपण पर्यावरणरक्षक ठरतो का? गणपतीला वाहण्यासाठी म्हणून रोजच्या रोज दूर्वांचा अपरिमित वापर हेदेखील पर्यावरणात ढवळाढवळ करणारे कृत्य नाही का? कधी काळी खेडय़ांची रचना होती, वनांचं प्रमाण खूप होतं तेव्हाची परिमाणं आज वापरून त्यासाठी निसर्ग ओरबाडणं कितपत योग्य आहे. आपण घरच्या कुंडीत कधी या दूर्वा लावतो का? आपण काय करणार या मध्यमवर्गीय मानसिकतेत अडकल्यावर बाजारपेठ जे करेल तेच तुम्ही स्वीकारता असाच सध्याचा जमाना आहे. पण मग एखाद्याच्या घरी जर परिपूर्ण इको फ्रेंडली गणपती नसेल तर आम्ही दर्शनाला येणार नाही असं तरी आपण सांगू शकतो का?

नियमांचा बडगा
सामाजिक अभिसरण हाच जर सार्वजनिक उत्सवाचा पाया आहे असं म्हटलं तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी न्यायालयाला लक्ष घालावं लागणं हेच मुळी सार्वजनिक उत्सवांचं अपयश म्हणावं लागेल. समाजाला एकत्र आणायचं म्हणजे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, जलप्रदूषण, वाहतूक कोंडी, रस्ता अडवणे, विजेचा गैरवापर, कायदा व सुव्यवस्थेला धोका असे एक ना दोन शेकडो मुद्दे गेल्या काही वर्षांत न्यायालयात गाजले आहेत. ध्वनिप्रदूषणासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर अनेक वर्षांच्या लढय़ानंतर कडक निर्बंध येऊनदेखील आज प्रत्येक र्निबधाला केराची टोपलीच दाखवली आहे. सत्यनारायणाची पूजा संपूर्ण गावाने ऐकलीच पाहिजे असा जणू काही दंडकच असल्याप्रमाणे वर्तणूक दिसून येते. आणि यास केवळ सामाजिक मंडळच नाही तर सर्वसामान्यदेखील तितकेच जबाबदार आहेत. आम्ही काय कॉमन मॅन आहोत, असे म्हणत चढाओढीने फटाके उडविणारे, घरच्या गणपतीचीदेखील दणदणाटी आवाजात मिरवणूक करणारे आणि हजारो टन निर्माल्य तयार करणारी केवळ मंडळच नसतात. आपली स्तोत्रे, आरत्या, भजन याची धर्मशास्त्रीय मीमांसा करणाऱ्या एकालादेखील आवाजाच्या मर्यादेविषयी एक अक्षरदेखील माहीत नसते.

विसर्जनाचे जलप्रदूषण
मुंबईतल्या गणेशमूर्तीची उंची जशी वाढत गेली तसे विसर्जनातले जलप्रदूषणाचे संकट वाढतच चालले आहे. गिरगाव, दादर, जुहू, मालाड अशा विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेला खूप मोठी स्वच्छता मोहीम राबवावी लागते. दहा दिवसांत भक्तिभावाने पुजलेल्या मूर्तीचे असंख्य अवशेष किनाऱ्यावर पसरलेले असतात. त्याचबरोबर निर्माल्य आणि इतर अनेक बाबी भरती- ओहटीबरोबर किनाऱ्याला येत असतात. अनेक स्वयंसेवी संस्थादेखील या कामी मदत करतात. गेली दहा वर्षे गिरगाव चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या ‘स्प्राउट’ या संस्थेचे आनंद पेंढारकर सांगतात की, आम्ही शंभर स्वयंसेवकच किमान पाचएकशे मूर्तीचे अवशेष जमा करतो. या किनाऱ्यावर पाच-सहा फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीच्या अवशेषांची संख्याच सुमारे दहा हजारांपर्यंत असते. छोटय़ा मूर्तीची तर गणती न केलेलीच बरी. या मूर्तीपासून सागरी पर्यावरणाला खूप मोठा धोका टाळण्याचाचा हा एक छोटासा प्रयत्न म्हणावा लागेल. या मूर्तीवर असणारे रासायनिक रंग हा त्यातील सर्वात धोकादायक घटक आहे. शिसं आणि पारा हे दोन्ही घटक सागरी जिवांसाठी थेट मृत्यूचे निमंत्रण ठरू शकतात. बऱ्याच वेळा होते असे की छोटय़ा माशांच्या शरीरात हे घटक जातात, आणि ते मासे जर मोठय़ा माशांनी खाल्ले तर त्यांच्या शरीरातील प्रमाण वाढते. आणि तेच मासे जेव्हा आपण खातो तेव्हा त्यातील घातक विषारी घटकांचं वाढलेलं प्रमाण आपल्या शरीरात जातं. तसेच या अवशेषात खिळे, काचा, लाकडी तुकडे, पीओपी तुटल्यामुळे मूर्तीच्या धारदार कडा असं सगळं सांभाळत हे काम करावं लागतं. आमच्या स्वयंसेवकांमध्ये अनेक लहान मुलंदेखील असतात. अशा वेळी तेथे येणाऱ्या अनोळखी लोकांपासून जपावे लागते. कारण स्वयंघोषित संस्कृतीरक्षक अशा वेळी धोकादायक वर्तन करू शकतात.

सरकारी गोंधळ
दहीहंडीने तर यंदा कमालच केली आहे. निव्वळ राजकीय हितसंबंध जोपासणं हाच उद्देश डोळ्यासमोर असल्यामुळे घडलं ते इतकंच की साहसी खेळ कशाशी खातात याची काडीमात्र कल्पना नसणाऱ्या गोविंदाना चक्क साहसी खेळाचा दर्जा देऊन सरकाराला कृतकृत्य झाल्यासारखं वाटत आहे. मुळात क्रीडा या संकल्पनेची कसलीही परिमाणं नसताना एखाद्या उत्सवी घटनेला क्रीडा प्रकारात बसवणं कितपत योग्य आहे. या उत्सवावर असलेली राजकीय पकडच इतकी जबरदस्त आहे की सरकार कोणाचेही असो सर्वपक्षीय हित साधणं हाच महत्त्वाचा भाग उरतो. मजेशीर बाब म्हणजे क्रीडा खात्यालादेखील हे करताना इतक्या कोलांटउडय़ा माराव्या लागल्या आहेत की येत्या काळात कोलांटउडी हाच साहसी खेळ होईल की काय असं वाटतं.
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:28 am

Web Title: festival celebration 3
टॅग : Cover Story,Coverstory
Next Stories
1 देशोदेशीचा गणेशोत्सव
2 मलेशिया – मराठमोळा उत्साह
3 दुबई – पूर्वेची संस्कृती-पश्चिमेचा थाट
Just Now!
X