ढोल पथक म्हणजे आजच्या तरुणाईचा जल्लोषाचा आणि जिव्हाळ्याचा विषय..! त्यात आता मुलीही बाजी मारताहेत. हा सकारात्मक बदल आहे. पथकांमध्ये सहभागी होण्याबाबतचे मुलींचे विचार, मानसिकता, त्यांची क्षमता, गॉसिप, गटबाजी या सगळ्यांवर टाकलेली एक नजर.
इंटरनेटच्या जमान्यात आजच्या तरुण पिढीला सणावारांचं कसलंच अप्रूप नाही, असं म्हणणं आता चुकीचं ठरेल, कारण आता ही तरुण मंडळी आनंदाने, उत्साहाने सगळ्या सणांचं उत्साहात स्वागत करतात, मग त्यामागचा हेतू काहीही असेल. नटूनथटून सेल्फी काढण्याचा असो किंवा ग्रुपने एकत्र जमून वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढत फेसबुक, इन्स्ताग्राम, ट्विटरवर पोस्ट करण्याचा असो. गुढीपाडव्याच्या स्वागतयात्रेला असं चित्र ठिकठिकाणी बघायला मिळतं. स्वागतयात्रेला आलेलं ग्लॅमरस रूप आता थोडं आणखी एका पारंपरिक गोष्टीमध्ये दिसू लागलंय. ढोल-ताशा पथक..! काही वर्षांपूर्वी या पथकांची संख्या कमी होती. तसंच वेगवेगळ्या ठिकाणच्या पथकांची वैशिष्टय़ंही असायची; पण आता हे चित्र काहीसं बदललंय. या पथकांमध्ये मुलींची वाढती संख्या हा यातला मुख्य आणि सकारात्मक बदल आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच मुली आता ढोल पथकांमध्ये मुलांप्रमाणेच ढोल वाजवताना, त्याचा आनंद घेताना दिसू लागल्या आहेत.
सण-समारंभांत आता फक्त रांगोळी काढण्यापुरत्याच मुली दिसत नाहीत, तर प्रामुख्याने मुलांनी करण्याच्या कामांमध्येही त्या दिसून येतात. वास्तविक ढोल फार जड असतो. तो कमरेला घट्ट बांधून तासन्तास वाजवणं म्हणजे कठीण काम. मिरवणुकीत इतक्या वजनाचा ढोल घेऊन वाजवणं हे स्थिरवादनापेक्षा म्हणजे एका जागी उभं राहून वाजवण्यापेक्षा कठीण असतं. हे सगळं करण्यासाठी शारीरिक क्षमता अधिक असावी लागते. मुलींची क्षमता मुलांच्या तुलनेने कमी असली तरी पथकांमध्ये मुलींची सतत वाढणारी संख्या लक्षणीय आहे. या वाढत्या संख्येमागे विविध कारणं आहेत. वादन क्षेत्रात पहिल्यापासूनच मुलांचं प्रमाण अधिक आहे. आता यातही बदल होतोय. पुण्यासह मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी आता ढोल पथकांचे आवाज घुमतात, तर या पथकांमध्ये मुलांसह मुलीही या अनुभवाचा आनंद घेताना दिसतात. फक्त ढोलवादनच नाही, तर काही पथकांमध्ये मुली ताशाही वाजवतात, तर ध्वजपथकातही सहभागी असतात.
नागपूरच्या ‘शिवमुद्रा’ या पथकाच्या अपूर्वा माटेगांवकर सांगतात, ‘‘आमच्या पथकात मी पहिलीच महिला होते. आता पथकातल्या वादकांची संख्या दीडशे इतकी आहे, तर त्यात महिलांची संख्या ४०-४५ इतकी आहे. यामध्ये कॉलेज विद्यार्थिनी, नोकरी करणाऱ्या, गृहिणी अशा सगळ्यांचा समावेश आहे. प्रत्येक जण आपापली कामं करून तालमीसाठी हजर असतात.’’ जवळपास ९ ते १२ किलो वजनाचा ढोल मुली वाजवू शकतील का, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. या प्रश्नासह ढोल उचलता येईल का, कमरेला घट्ट बांधणं जमेल का, चालताना तालात वाजवता येईल का, हेही प्रश्न साहजिक मनात येतात; पण मुली यातही मागे नाहीत. या सगळ्याची तालीम ढोल वाजवण्याच्या तालीमच्या वेळी आपसूकच होत असल्यामुळे या प्रश्नांची उत्तरं सहज मिळू लागतात. याबाबत अपूर्वा सांगतात, ‘‘मुलींमध्ये शिस्त उपजतच असते. त्यामुळे शिस्तबद्ध तालीम करणं, इतरत्र कामं करणं, इतरांना सहकार्य करणं याविषयी आमच्या पथकातल्या मुलींच्या तक्रारी अजिबात येत नाही. तसंच मुलं जी कामं करतात ती मुलीही करतात. ढोल उचलून आणणं, पुन्हा नेऊन ठेवणं, तासन्तास कमरेला बांधून तो वाजवणं अशी सगळी कामं मुलीही करतात.’’ शिवमुद्रामध्ये २० ते ४० या वयोगटातल्या महिला सहभागी आहेत. मुलींच्या क्षमतेबाबतच्या प्रश्नांवर पुण्याच्या ‘मानिनी’ या पथकाच्या प्रमुख स्मिता इंदापूरकरही उत्तर देतात. त्या सांगतात, ‘‘आमचं मुलींचंच पथक असल्यामुळे ढोल उचलण्यापासून तो पुन्हा जागेवर ठेवण्यापर्यंत सगळी कामं करावी लागतात; पण यात कुठेही कोणाचीही तक्रार नसते. ज्या आनंदाने मुली ढोल वाजवतात त्याच आनंदाने इतरही कामं करतात. गृहिणी घरची सगळी कामं करून तालीम करायला येतात.’’
पथकांमध्ये जाण्याची मुलींची वेगवेगळी कारणं असतात. कोणाला आवड असते, कोणी मैत्रिणी आहेत म्हणून जातं तर कोणाला काही वेगळं करू पाहायचं असतं. आवड असलेल्यांना वाजवता येतच असं नाही. पण, ढोलवादनाचा ताल, जोश बघता ते आवडू लागतं. ती मजा, अनुभव घ्यावासा वाटतो. म्हणून पथकात सहभागी होणाऱ्या मुलीही आहेत. चार मैत्रिणींपैकी दोन जणी पथकात आहेत. त्यांना नेहमीच्या कामापेक्षा वेगळा अनुभवही मिळतोय हे पाहता काही मुली पथकाकडे त्यांची पावलं वळवतात. तर काहींना एखाद्या गटात सहभागी होऊन एका उपक्रमाचा अनुभव घ्यायचा असतो म्हणूनही मुलींना पथकात सहभागी व्हायला आवडतं. अशा विविध कारणांनी मुली पथकात येतात, पण ज्यांना खरंच आवड असते त्याच पुढे पथकात स्थिरावतात. तर काहींना एकदाच अनुभव घ्यायचा असतो. कोणत्या तरी एका प्रसंगी वाजवून अशा मुली पथकातून एक्झिट घेतात. अर्थात, यात त्या कोणाचंही नुकसान करत नाहीत. यात एक वेगळं कारण म्हणजे ‘शो-ऑफ करण्यासाठी’ हे होय. ढोल वाजवताना पूर्ण जोशात, उत्साहात वाजवताना आपण फारच छान दिसतो या समजामुळे काही मुली वाजवायला येतात. अशा मुली वाजवण्यात मात्र मागे राहतात.
डोंबिवलीच्या ‘आरंभ’ पथकाची सदस्या चिन्मया घाणेकर तिच्या पथकातल्या सहभागाविषयी सांगते, ‘मी ‘आरंभ’चं वादन सुरुवातीला बाहेरून बघायचे. तेव्हाच मला असं वाटायचं की एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे. असा विचार करुन मी सुरुवातीला पथकात सहभागी झाले. मग, तालीम करत गेले. हळूहळू आवड निर्माण झाली. आता दोन वर्षांपासून मी पथकात वाजवतेय. खूप चांगला अनुभव आहे हा.’ चिन्मया आता पुण्यातून एमएस्सी करतेय. तालमीसाठी ती आठवडय़ाचे दोन दिवस मुंबईत येते. बीकॉमच्या दुसऱ्या वर्षांला असलेली औरंगाबादची अबोली जोशीसुद्धा तिच्या सहभागाविषयी सांगते, ‘मला आधीपासूनच पथकात जाण्याची इच्छा होती. पण, पथकात मुली असण्याचा ट्रेंड दोन वर्षांपूर्वी सुरू झाला नव्हता. माझ्या घरून मला पूर्ण पाठिंबा असला तरी कोणत्याही पथकात मुली नसल्यामुळे मला सहभागी होता येत नव्हतं. नंतर मात्र मी ‘पावन गणेश मंडळ’ या पथकात जाऊ लागले. हळूहळू तिथे मुलींची संख्या वाढत गेली. आता आमच्या पथकात एकूण २०० सदस्य आहेत. त्यापैकी ४२ मुली आहेत.’
नाशिकच्या ‘तालरुद्र’ या पथकाने गेल्याच आठवडय़ात जागतिक विक्रम केला. सलग बारा तास ढोलवादन करून त्यांनी हा विक्रम केला आहे. सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्याचं औचित्य साधून तालरुद्रने हा प्रयोग केला. या रेकॉर्डच्या वेळी पथकातल्या प्रत्येकाला सलग चार ते पाच तास वाजवावं लागलं. या पथकातली रुचा दीक्षित सांगते, ‘आमच्या पथकात असलेल्या मुलींचा वयोगट १४ ते ५० असा आहे. पथकातल्या २१० सदस्यांपैकी ९० मुली आहेत. मुलांप्रमाणेच मुलीही ढोल वाजवतात. नोकरी करणाऱ्या, गृहिणी, विद्यार्थिनी अशा सर्व स्तरावरील मुली पथकात आहेत. मुली आहेत म्हणून लवकर घरी जायचा त्यांचा कधीही हट्ट नसतो. तालीम उशिरापर्यंत चालते त्या वेळी शेवटपर्यंत मुलींकडून सहकार्य मिळत असतं.’
ठाण्याच्या ‘वीरगर्जना’ या पथकाचा हृषीकेश कारेकर सांगतो, ‘आमच्या पथकात मुलींची संख्या जवळपास ७० इतकी आहे. १२ ते ४० या वयोगटातल्या महिलांचा त्यात समावेश आहे. सुरुवातीला मुली गंमत म्हणून येतात, पण नंतर त्यांच्यात आवड निर्माण झाली की, त्यांना याचं गांभीर्य कळत जातं, हा आमचा अनुभव आहे. ढोल वाजवायला मिळावा यासाठीच मुली पथकात नसून पथकातल्या साहित्यांची देखभाल करण्यासाठीही त्या असतात. फक्त शनिवार-रविवार तालीम असल्यामुळे मुळातच वेळ कमी असतो. त्यामुळे ढोलची तालीम झाली की ध्वजपथकाची तालीम करायला पाठवलं जातं. असं एकामागे एक सतत सुरू ठेवतो. त्यामुळे इतर कोणत्याच गोष्टींना वाव मिळत नाही.’ रुचाचंही असंच म्हणणं आहे. ती सांगते, ‘तालीम करण्यासाठी चार मैत्रिणी एकत्र येत असल्या तरी त्या एकाच बॅचमध्ये असतीलच असं अजिबात नाही. तसंच तालीम करताना मोकळा वेळ फारच कमी दिला जातो, त्यामुळे गॉसिप, गटबाजीचा प्रश्नच येत नाही. ज्या गोष्टींमुळे वाद होऊ शकतो अशा गोष्टींना वाव दिला जात नाही.’
सार्वजनिक ठिकाणी एखाद्या स्तुत्य उपक्रमात आपण सहभागी असलो की आपला ‘फोटो येणे’ आता खूप महत्त्वाचं झालंय. फोटो काढून ते सोशल साइट्सवर पोस्ट करणं हे त्याहूनही महत्त्वाचं झालंय. फोटो काढून घेण्याचं फॅड दिवसेंदिवस वाढतंय. यासाठीही काही मुलींचा मोर्चा या ढोलवादनाकडे वळतो. खरंतर ढोलचं वजन इतकं असतं की तो आपल्याला पेलवणार का, झेपणार का, चालताना तो घेऊन वाजवता येणार का हे सगळे प्रश्न मुलींनी स्वत:लाच विचारायला हवेत. पण, तसं न होता, आपल्याला येईलच या अति आत्मविश्वासामुळे पथकाची गाडी काहीशी घसरते. स्वत:पुरता विचार न करता गटात काम करणार आहोत तर संपूर्ण गटाचा विचार करायला हवा. मुलींची अशीही मानसिकता दिसून येते. नागपूरच्या अपूर्वा याबाबत सांगतात, ‘शोऑफ करण्यासाठी काही मुली पथकात प्रवेश घेतात हे खरंय. आम्हालाही हा अनुभव आहे. पण, अशा वेळी आम्ही त्यांचं कौन्सिलिंग करतो. त्यांना पथकाचा मूळ उद्देश काय हेही समजवतो. नेहमी चांगल्या ठिकाणी वादन करूच असं नाही. त्यामुळे ढोलवादन एन्जॉय करताना सभोवतालीही लक्ष देत मुलींनी सतर्क राहायला हवं हेही त्यांना पटवून देतो. दर दहा-एक दिवसांनी असं एक सेशन घ्यावं लागतं. गॉसिपिंग, गटबाजीबाबतही इथे समजावलं जातं.’ तर स्मिता इंदापूरकर यांच्या मते, ‘मुलींमध्ये गॉसिप होणं, गटबाजी करणं, राजकारण असणं हे अगदी खरंय. सगळ्यांना समजून घेताना खूप संयम ठेवावा लागतो. आमच्या पथकात वेगवेगळ्या वयांतल्या महिला असल्यामुळे त्या त्या वयाचा इगो असतो. तो सांभाळून सगळ्यांना समजून घ्यावं लागतं. या सगळ्याचा पथकावर कुठेही परिणाम होऊ नये असा प्रयत्न असतो.’
मिरवणुकांमध्ये वाजवताना ठरावीक मुला-मुलींच्या विशिष्ट बॅच ठरवल्या जातात. त्यानुसार विशिष्ट अंतरात ती ती बॅच ढोलवादन करते. आता यातही अनेकदा राजकारण होत असतं. अमुक ठिकाणी मलाच का दिलं वाजवायला, मला तिथेच वाजवायचं होतं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुसऱ्या कोणालाही न देता एकीनेच ढोल वाजवणं, मी आता चौकातच वाजवणार अशा सगळ्या गोष्टी वादाची सुरुवात करतात. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार पथकातल्या मुला-मुलींची विभागणी केली जाते. पथकप्रमुखांच्या या नियमांचं पालन करत ढोलवादन करायला हवं. पण, अनेकदा या गोष्टींमध्ये वाद होतो. असे वाद मुलांपेक्षा मुलींमध्ये आणि मुलींमुळे होताना दिसतात. ‘आरंभ’ची चिन्मया सांगते, ‘मुलींमध्ये गॉसिप, गटबाजी असे प्रकार बघायला मिळतात हे खरंय. पण, हे प्रकार पथक वादन करायला गेलेल्या ठिकाणी दिसून येत नाही. गॉसिपिंगमध्ये काही वेळा वादन थोडं बाजूला राहतं. पण, याचा परिणाम वादनावर होणार नाही याची काळजीही घेतली जाते. मात्र अशा पद्धतीचं चुकीचं वागणं टाळा असं सगळ्यांनाच समजावणं कठीण असतं.’
पथकांमध्ये मुलींची वाढती संख्या ही सकारात्मक गोष्ट आहे. पण, मुलींनी काही गोष्टींमध्ये विचारमंथन करणं गरजेचं आहे. आपली आवड, क्षमता, इच्छा जाणून मगच यात उतरणं महत्त्वाचं आहे. सहज गंमत म्हणून, शोऑफसाठी यात सहभागी होणं हे चुकीचं आहे. वादनाकडे कल नसेल पण, पथकात सहभागी होण्याची इच्छा असेल तरीही पथकाचा सदस्य होण्याची परवानगी असते. त्यामुळे पथकात सहभागी व्हायचं म्हणजे वाजवायला मिळालंच पाहिजे असा अट्टहास असू नये. मुलींनी नियोजन करून वादन केलं तर निश्चितच मुलींच्या वाढत्या संख्येत आणखी वाढ होईल.