अमेरिकेतील जॉर्जिया राज्याची राजधानी अटलांटा. अमेरिकेतील काही जुन्या आणि सांस्कृतिक व राजकीयदृष्टीने महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर. गांधीजींचे अमेरिकेतील शिष्य आणि वर्णवादविरोधी लढय़ाचे नेते डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांच्या वास्तव्यामुळे अटलांटाची ओळख थोडय़ा प्रमाणात आधी होतीच. पण १९९६मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धामुळे अटलांटाची कीर्ती आणि नाव अगदी जगभर सगळीकडे पसरली. हिरव्यागार झाडीत लपलेलं हे छोटंसं शहर मग वेगाने वाढत गेलं. अमेरिकेतली बरीच मंडळी काम आणि शिक्षणासाठी या शहराकडे धावू लागली आणि बघता बघता अटलांटा एक जागतिक दर्जाचं महानगर झालं.
१९९०च्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रवाहात अनेक भारतीय कुटुंबं अटलांटाला स्थायिक झाली. वायटूकेच्या काळात बरीच तरुण मंडळी आयटीच्या कामानिमित्त भारतातून आली. त्यात अनेक मराठी कुटुंबांचा समावेश होता. कोणी नोकरीसाठी आले, कुणी उत्तरेकडील राज्यातील थंडी आणि बर्फाला कंटाळून आले, तर कुणी दुसऱ्या शहरातील महागाईला कंटाळून आले. पण जे एकदा अटलांटाला आले त्यापैकी फार कमी जण अटलांटा सोडून दुसऱ्या गावी परत स्थायिक झाले. काय होती ती जादू, की इथे आलेला ‘जो आला तो रमला’ या बाण्याप्रमाणे इथेच स्थायिक झाला?
उत्तम हवा, पाणी, निसर्ग आणि भरपूर आर्थिक संधी याशिवाय या जादूमागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे अटलांटातील मराठी लोकांनी, मराठी लोकांसाठी चालवलेलं ‘महाराष्ट्र मंडळ! गेली पंधरा र्वष मी अटलांटाला राहात आहे. अटलांटाच्या महाराष्ट्र मंडळाच्या उत्तरोत्तर प्रगतीचा आलेख बघता खरंच असं वाटतं, की ज्ञानेश्वरांच्या ओवीतली ‘तयाचा वेलू गेला गगनावरी’ ही ओळ अटलांटाच्या मंडळासाठीच लिहिली असावी!
अटलांटाच्या महाराष्ट्र मंडळाची सुरुवात १९८६ साली अगदी छोटय़ा प्रमाणात झाली. त्यावेळी हे मंडळ १५-२० कुटुंबांचं होतं. त्याशिवाय येणारा विद्यार्थीवर्ग, नवीन लग्न होऊन येणारी काही जोडपी आणि त्यांची काही मित्रमंडळी! अनिरुद्ध लोकरे, राजन वेदक आणि मंगला स्वामिनाथन या सुरुवातीच्या मंडळ अध्यक्षांनी खूप कठीण परिस्थितीत कामाला सुरुवात केली. आपापल्या विचाराने आणि आवडीने कार्यक्रम आयोजित केले. त्यात नाटिका, संगीत, नृत्य आणि संक्रांत असे कार्यक्रम असत. प्रामुख्याने संक्रांत, पाडवा, गणेशोत्सव व दिवाळी हे चार सण साजरे केले जात. १९९० साली दादा कारखानीस अध्यक्ष असताना अटलांटा महाराष्ट्र मंडळाची एक ‘नफाविरहित संस्था’ म्हणून नोंद करण्यात आली. सभासदांची संख्या हळूहळू वाढत जात असल्यामुळे येणाऱ्या सर्व पाहुण्यांना सामावून घेण्यासाठी मंडळाचे कार्यक्रम आता छोटय़ा सभागृहाऐवजी स्थानिक शाळेच्या सभागृहात होऊ लागले. १९९८ सालापासून चालू झालेली ही प्रथा अजूनही चालू आहे.
अटलांटा मराठी समाजाचं यापुढचं मोठं पाऊल म्हणजे २००५ साली अटलांटामध्ये आजोजित केलेलं बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन! तीन हजाराहून अधिक उपस्थिती असलेले हे अधिवेशन अनेक कारणांनी अविस्मरणीय ठरलं. दोनशेहून अधिक स्वयंसेवकांनी दोन र्वष अपार मेहेनत घेऊन हे सुंदर स्वप्न साकार केलं. अधिवेशनासाठी एकत्र काम करण्यातून जोडली गेलेली स्नेहाची नाती अजूनही तितकीच दृढ आहेत! आता २०१५ मध्ये नोंदणीकृत सभासदांची संख्या चारशे कुटुंबांपर्यंत पोचली आहे. विद्यार्थी वर्ग आणि तरुण मंडळी धरून सुमारे दोन हजारच्या आसपास मराठी समाज या मंडळाच्या माध्यमातून एकमेकांना धरून आहे, परदेशात राहत असून स्वदेशाच्या आठवणी आणि अभिमान जिवंत ठेवून आहे.
मंडळाचे चार मुख्य कार्यक्रम अजूनही चार सणांना आधारून आयोजित केले जातात. वर्षांची सुरुवात जानेवारीत संक्रांतीच्या कार्यक्रमाने होते. मग एप्रिलच्या सुमारास पाडवा, त्यानंतर गणेश चतुर्थी आणि शेवटी दिवाळी असं साधारण वेळपत्रक असतं. साधारण सात-आठ वर्षांपूर्वी नवरात्र आणि गरबा साजरा करण्यास सुरुवात झाली. सगळ्याच कार्यक्रमांना सातशे-आठशेच्या वर उपस्थिती असते. नाटक, सिनेमा, संगीताचे कार्यक्रम, स्थानिक कलाकारांचे उपक्रम अशी मनोरंजनाची रेलेचेल असते. दिवाळीत लहान मुलांचे कार्यक्रम असतात. त्यानंतर खास मराठी पद्धतीचे भरपेट, सुग्रास जेवण! मग जमलेल्या मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा. काही नवीन ओळखी. नवीन कार्यक्रम आयोजनाचे विचार. भारतातून आलेल्या ज्येष्ठ मंडळींबरोबर संवाद. बघता बघता कार्यक्रमाची वेळ संपते, पण घरी जायची कोणाचीच तयारी नसते!
सांस्कृतिक आणि सणवार साजरे करणाऱ्या या कार्यक्रमाशिवाय महाराष्ट्र मंडळ गेली काही वर्षे इतर कार्यक्रमही आयोजित करत अहे. वर्षांच्या सुरुवातीला अटलांटाला नवीनच आलेल्या कुटुंबांना बाकीच्या सर्व लोकांशी ओळख करून घेण्यासाठी ‘भेटी-गाठी’ नावाचा कार्यक्रम असतो. वर्षांतून एखादी सहल किंवा नेचर वॉक चा कार्यक्रम असतो. युवा आणि शिशू मंडळीसाठी वर्षभर निरनिराळे कार्यक्रम असतात. गेली अनेक वर्षे अटलांटामध्ये इटटचा अभ्यासक्रम शिकवणारी एक सुंदर मराठी शाळा आहे. काही स्वयंसेवकांनी स्वत:च्या स्फूर्तीने चालू केलेली ही छोटीशी शाळा आता मंडळाच्या सहकार्याने वाढत जाऊन शंभराहून अधिक विद्यार्थी असलेली अमेरिकेतील संख्येने सगळ्यात मोठी शाळा झाली आहे.
अटलांटातील सर्व मराठी समाजासाठी अख्ख्या वर्षांत सगळ्यात मोठी आनंदाची पर्वणी असते ती म्हणजे मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव! अनेकदा येत्या वर्षी गणेशोत्सव कसा साजरा करायचा, याचे संयोजन अक्षरश: जानेवारीच्या कडाक्याच्या थंडीपासून चालू होते. बारा-तेराशेच्या संख्येने उपस्थिती असते. वेअरहाऊसच्या आकाराच्या मोठय़ा सभागृहात कार्यक्रम आयोजित करावा लागतो. मराठी समाजाशिवाय कार्यक्रमाला कोंकणी, तेलगू, कानडी, गुजराती, बंगाली आणि पंजाबी तसेच हिंदी भाषकही उपस्थित असतात. पताका, रांगोळ्या, फुले तसेच इतर सामग्री वापरून सभामंडप सजवला जातो. टाळ आणि लेझीम च्या तालावर सकाळी गणरायांच्या मूर्तीचे आगमन होते. सकाळची पूजा आणि आरतीने सुरुवात होते. लहान-मोठे सर्व जण मग अथर्वशीर्षांचे पठाण करतात. त्यानंतर मग महाआरतीची वेळ होते. लहानपणी भारतात ज्या उत्साहाने आरत्या म्हणण्याची सवय होती अगदी तशाच, खास मराठमोळ्या पद्धतीने महाआरती पार पडते.
स्वयंसेवकांनी स्वहस्ताने बनवलेले पेढे आणि इतर प्रसाद वाटला जातो. त्यानंतर मग मंडळी श्रीखंड-पुरी किंवा मोदक सेवनासाठी जेवणाच्या रांगेकडे वळते! जेवणानंतर थोडय़ा गप्पा, आवराआवर झाली की मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होतात. कधी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित संगीतिका, तर कधी मराठीबाणाच्या धर्तीवर नृत्य-नाटय़ाचा कार्यक्रम! दर वर्षी, अतिशय मेहेनतीने सर्व स्वयंसेवक एक सुंदर कार्यक्रम श्री गणेशच्या चरणी सादर करतात. मग विसर्जनाच्या मिरवणुकीची तयारी सुरू होते. २०१४ च्या मिरवणुकीला स्थानिक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि अधिकारी मंडळी उपस्थित होती. परधर्मीय आणि वेगळ्या संस्कृतीचे असूनही गोरी आणि काळी अमेरिकन मंडळी भारतीयांच्या कार्यक्रमात आवडीने सहभागी होतात.
मिरवणुकीची सुरुवात लहान-मोठय़ा मुलांच्या लेझीम पथकाने होते. ढोल ताशे आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या ललकाऱ्यांनी सगळा आसमंत भरून जातो. लहान मुलांच्या नंतर मग तरुण आणि मोठी मंडळी लेझीमनृत्य, दिंडी, पालखी इत्यादी प्रकार सादर करतात. दरवर्षी सीनियर मंडळीसुद्धा झांज किंवा लेझीम पथक बनवून सहभागी होतात. वाजतगाजत निघालेली गणरायांची पालखी मग हळूहळू विसर्जन स्थळाकडे निघते.
स्वयंसेवकांच्या खांद्यावर निघालेली अटलांटाची गणेश विसर्जन मिरवणूक उपस्थितांना परत एकदा थेट पुण्या-मुंबईच्या गणेशोत्सवाची आठवण करून देते. ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या वायद्यावर मग गणरायाला साश्रू निरोप दिला जातो. पुढच्या वर्षीच्या उत्सवाची स्वप्नं रंगवत सर्व मंडळी मग हळूहळू घरी परतते.
अटलांटा महाराष्ट्र मंडळाचे गणेशोत्सवासकट सगळे कार्यक्रम अतिशय खेळीमेळीत, आनंदात आणि शिस्तीने पार पडतात, कारण मंडळातील सर्व सभासद आणि स्वयंसेवक राग-लोभ दूर ठेवून एकदिलाने काम करतात. दर वर्षी उत्साहाने पुढे येणाऱ्या नवीन टीमला आधीच्या वर्षी काम करणाऱ्या सर्व सभासदांचे उत्तम मार्गदर्शन असते. सेवाभावाने आणि आपुलकीने काम करून सर्व जण अमेरिकेतील त्यांच्या या मोठय़ा कुटुंबाचे भाग बनून जातात. या मंडळाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो आणि ‘गगनावरी’ गेलेला हा वेलू असाच वृद्धिंगत होवो हीच त्या गणेशाच्या चरणी मनोकामना आहे. अटलांटाच्या समस्त परिवारातर्फे सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!!

शब्दांकन : चंदन गोखले