गणपतीची मूर्ती पाहिली की कोठल्याही भारतीयाचे, विशेषत: मराठी माणसाचे मन मोहरून येते. सुखदाता व विघ्नहर्ता असा हा गजानन कोठल्याही शुभप्रसंगी किंवा कोणत्याही पूजेच्या वेळी प्रथम पुजला जातो. या गणेशाची भक्ती इ. स. पाचव्या ते नवव्या शतकात भारतात सर्वत्र व विशेषत: महाराष्ट्रात प्रचलित झाली. गणेशाच्या कित्येक कथा व पूजाविधाने यांचा विस्तृत संग्रह असलेले गणेश पुराण महाराष्ट्रातच लिहिले गेले.
या गणेशाची भक्ती आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. घरातील रोजची पूजा, विनायकी आणि संकष्टी चतुर्थी आणि वर्षांतून एकदाच येणारी गणेश चतुर्थी. या प्रतिवार्षिक गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण मातीचा गणपती आणून त्याची स्थापना करतो आणि कुळातील रीतिरिवाजाप्रमाणे या मूर्तीची अर्धा, एक, चार, पाच, सात, दहा किंवा ११ दिवस पूजा करतो. आरती व प्रसादाला सर्व कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी जमतात. यानंतर मूर्तीचे नदीत किंवा समुद्रात विसर्जन होते. याच काळात गणपती अथर्वशीर्ष, गणपतीसूक्त, गणपतीमाहात्म्य, गणपतीसंहिता, मुद्गलपुराण इत्यादींचे वाचन आणि पठण होते. लोकमान्य टिळकांनी गणपतीचे सामाजिक महत्त्व अचूकरीत्या ओळखले आणि इंग्रजी राजवटीविरुद्ध पुकारलेल्या बंडात सार्वजनिक गणेशोत्सवांद्वारे व त्यातील विविध मेळ्यांद्वारे क्रांतीचे रणशिंग फुंकले. हिंदूंमध्ये ऐक्य निर्माण करणारी ही मोठीच घटना होती. टिळकांसारख्या पूज्य व्यक्तीने गणेशाची सार्वजनिक पूजा सुरू केल्याने ही प्रथा मराठी मनांत खोलवर रुजली व त्यामुळेच भारतात सर्वात मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मुख्यत: महाराष्ट्रातच होतात.
तसेच मराठी माणूस जगात कोठेही गेला तरी तो गेल्या गेल्या चार मित्रमंडळी जमवून गणेशोत्सव करण्याच्या नादात असतो.
श्वेतवर्णीयांशिवाय इतर कोणाही व्यक्तीला ऑस्ट्रेलियात येऊन स्थायिक व्हावयास १९७०पर्यंत मज्जाव होता. त्यामुळे १९७० पूर्वी फारच थोडे भारतीय येथे येऊ शकले. १९५४ च्या सुमारास कापडाच्या व्यापाराचे निमित्ताने सिडनीमध्ये येऊन स्थायिक झालेले नाना आपटे हे ऑस्ट्रेलियातील पहिले मराठी. १९६५ साली व्हिक्टोरिया राज्यात येऊन स्थायिक झालेला प्रस्तुत लेखक हा ऑस्ट्रेलियातील चौथा मराठी. १९७१ मध्ये व्हिटलॅम हे पंतप्रधान असताना ‘‘केवळ धवलवर्णीयांना प्रवेश’’ ही राजनीती अधिकृतपणे बरखास्त केली गेली. त्यानंतर मात्र भारतीयांची व मराठी मंडळींची संख्या भराभर वाढत गेली. अर्थातच गजाननाचे सार्वजनिक आगमन याच सुमारास सुरू झाले हे सांगावयास नकोच. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे शहर सिडनी. तेथील काही मराठी मंडळींनी एकत्र येऊन गणपती बसवायचे ठरविले. १९७१ साली अरुण ओगले यांच्या घरी (‘रुचिरा’च्या लेखिका कमलाबाई ओगले यांचे चिरंजीव) पटवर्धन, बडवे आणि ताम्हाणे या सहकाऱ्यांच्या मदतीने गणेशाची स्थापना झाली. काही वर्षे हा वार्षिक कार्यक्रम चालला. १९७७ मध्ये बऱ्याच भारतीय मंडळींनी एकत्र येऊन श्रीमंदिर या देवळाची स्थापना केली. ऑस्ट्रेलियातील हे पहिले हिंदू देऊळ. १९७८ पासून गणेशस्थापनेचा वार्षिक कार्यक्रम श्रीमंदिरात होऊ लागला. वाढत्या लोकसंख्येनुसार मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली. आता गणेश चतुर्थीच्या वेळी आरतीसाठी हजाराच्या वर लोक उपस्थित असतात. कित्येक कुटुंबे मोठय़ा प्रमाणावर प्रसादही आणतात. दाक्षिणात्यांनी पुढाकार घेऊन बांधलेले सिडनीजवळचे दुसरे देऊळ म्हणजे हेलेन्सबर्ग येथील व्यंकटेश्वर टेम्पल. आता या देवळातही गणपती बसविला जातो आणि गणेश चतुर्थी मोठय़ा प्रमाणात साजरी होते. त्याचबरोबर कित्येक मराठी मंडळींच्या घरीही मोरया येतो आणि आरती व प्रसादाला मित्रमंडळींची गर्दी होते.

lp50
सिडनीच्या खालोखालचे शहर म्हणजे मेलबर्न. स्वत:च मातीची मूर्ती करून तो घरात बसवायला हेमंत व शुभदा गोखले यांनी १९८१ साली सुरुवात केली. त्याच वर्षी त्यांना समजले की, वेगळा हॉल घेऊनच हा उत्सव साजरा करायला हवा. त्यानुसार १९८२ साली गोखले मंडळींनी त्यांचा जवळचे सीफर्ड कम्युनिटी सेंटर घेतला. प्रथम ४०-५० भाविक मंडळी विसर्जनाच्या दिवशी येत असत. त्यानंतर हळूहळू ही संख्या हजाराच्या पुढे गेली. हॉलपासून समुद्रकिनारा खूपच जवळ असल्याने विसर्जन नेहमीच समुद्रावर होते. बर्फासारख्या थंड पाण्यात प्रथम हेमंत गोखले व स्वयंसेवक ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात श्रीचे विसर्जन करीत. त्यानंतर गेली कित्येक वर्षे त्यांची जागा त्यांचे चिरंजीव डॉ. मंदार गोखले यांनी घेतली आहे. हॉलपासून झांजांच्या नादात व मोरया मोरयाच्या गजरात ही मिरवणूक समुद्रावर जाते. आधी आंग्ल मंडळी मोठय़ा कुतूहलाने ही मिरवणूक पाहात असत. आता त्यांना त्याची सवय झाली आहे. मोदक, वेगवेगळ्या प्रकारचे मिष्ट पदार्थ, लाडू, चिवडा आणि दहीभात अशा सर्व प्रसादांचा स्वाद घेताना प्रत्यक्ष भारतात गेल्याची सुखद जाणीव होते. मंदार गोखले प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित गणेशमूर्ती स्वत: बनवितात. येथील प्रदूषणाविषयीच्या कडक नियमांचे पालन मूर्ती बनविताना अर्थातच केले जाते आणि रंग फक्त नैसर्गिकच वापरले जातात. गेली कित्येक वर्षे गोखल्यांचा गणपती महाराष्ट्र मंडळाचा गणपती म्हणूनच समजला जातो. केवळ एका कुटुंबाने सातत्याने ३५ वर्षे स्वखर्चाने चालविलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. सुमारे १५ वर्षांपूर्वी येथील एका म्युनिसिपालिटीचा एक आंग्ल अधिकारी तीन-चार महिन्यांसाठी मुंबईला गेला होता. त्याने तेथील गणेशोत्सव पाहिला. चौपाटीवरील विसर्जनाच्या सोहळ्याने तो एवढा प्रभावित झाला की, असे काही ऑस्ट्रेलियात का करता येत नाही, असा प्रश्न त्याने परत आल्या आल्या येथील काही भारतीयांना विचारला. रमेश कुमार हा मराठी उत्तम जाणणारा आंध्रातील भारतीय. त्याने स्वत: सर्व कार्यकारिणी स्वीकारली. प्रथम म्हणजे मूर्ती कोण घडवणार? परंतु श्रींच्याच मनात असल्यामुळे केन एव्हन्स हा मूर्तिकार ‘इको-फ्रेंडली’ मूर्ती करायला तयार झाला. गेली १५ वर्षे केन अशी पाच-सहा फूट उंचीची सुंदर मूर्ती बनवितो आहे. दोन वर्षांपूर्वी तो मेलबर्न सोडून १५० किलोमीटर्स दूर असलेल्या एका खेडय़ात राहायला गेला. तरीही नवी मूर्ती स्वखर्चाने बनवून तो छोटय़ा ट्रकमधून मेलबर्नला आणतो. रमेश कुमारने मग मला फोनवर विचारले की, गणेश स्थापना व विसर्जनाच्या पूजा तुम्ही कराल का? गेली ३५ वर्षे मी समाजसेवा म्हणून पौरोहित्य करीत असल्याने मी आनंदाने होकार दिला. डॅरेबिन म्युनिसिपालिटीच्या प्रशस्त हॉलमध्येच स्थापना करण्याचे ठरले. मूर्ती एवढी जड की ती हॉलवर आणायलाच साताठ स्वयंसेवक लागतात. पुढचा मोठा प्रश्न म्हणजे मूर्तीचे विसर्जन कोठे करायचे? तोही प्रश्न लगेचच सुटला. हॉलपासून सहा किलोमीटर्स असलेल्या बंडुरा तलावात विसर्जन करण्याची परवानगी मिळाली. पण एवढी अवजड मूर्ती एवढय़ा लांब नेणार कशी? आम्ही हे प्रश्न विचारण्यापूर्वीच मोरयाने सर्व उत्तरे आमच्यापुढे ठेवली होती. यारा ट्रॅम्स या खासगी ट्रॅम्स चालविणाऱ्या कंपनीने एक संपूर्ण ट्रॅम आम्हाला देऊ केली. मूर्ती घेऊन स्वयंसेवकांना आता फक्त एक किलोमीटर चालायला लागणार होते. सर्व जण त्याला आनंदाने तयार झाले. ही एक किलोमीटरची मिरवणूक रस्त्याने नीट चालते आहे ना, वाटेत कोठला अडथळा नाही ना याची खात्री करण्यासाठी एसईएस (र३ं३ी ऐी१ॠील्लू८ री१५्रूी)चे स्वयंसेवकही मिळाले. अशा प्रकारे गोऱ्या लोकांनी सुरुवात केलेला हा ऑस्ट्रेलियातील एकमेव म्युनिसिपालिटीचा गणपती, गोरे स्वयंसेवक पुढे व मागे असताना एक किलोमीटर मिरवणुकीत प्रवास करून मोठय़ा थाटाने गोऱ्या लोकांनी चालविलेल्या ट्रॅममध्ये बसतो. ट्रॅममध्ये त्याला मुलेबाळे व आमच्यासारखे सेवानिवृत्त झालेले वृद्ध लोक यांची साथ असते. त्यानंतर त्याला थाटामाटाने बंडुरा तलावात समाधी मिळते. सर्वानी आणलेल्या वेगवेगळ्या खिरापती वाटल्यावर हा सोहळा उरकतो. विसर्जनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मुली गणेशासमोर भरतनाटय़म् किंवा तत्सम नृत्य करतात. गेली कित्येक वर्षे भूतानी स्त्री-पुरुष त्यांच्या भाषेत भजने म्हणून देवापुढे नाचतात. डॅरेबिनचा मेयर जातीने येऊन चार शब्द बोलतो. भारतातील सर्व प्रांतांतील लोक येऊन वेगवेगळे प्रसाद आणून वाटतात. डॅरेबिन म्युनिसिपालिटीचा हा गणपती म्हणजे ऑस्ट्रेलियातील संस्कृतिमीलनाचे (े४’३्रू४’३४१ं’्र२े) एक सुंदर उदाहरण आहे.
मेलबर्नमधील मराठी मंडळींकडे आता डझनवारी गणपती बसतात. कित्येक लोकांकडे उभ्या गौरीही बसतात व त्या दिवशी हळदीकुंकवाचा कार्यक्रम मोठय़ा थाटामाटाने साजरा होतो. दर्शनाला येताना प्रसाद, फळे, भेटवस्तू इ. काहीच आणून नका, त्याऐवजी समोर ठेवलेल्या दानपेटीत पैसे टाका असा स्तुत्य आग्रह आता सुरू झाला आहे. जमलेले पैसे येथेच किंवा भारतात गोरगरीबांसाठी पाठवले जातात. स्वाती पळसुले यांनी काही वर्षांपूर्वी पेणचे सुप्रसिद्ध मूर्तिकार देवधर यांच्याकडून प्रतिवर्षी इको फ्रेंडली मूर्ती आणण्यास सुरुवात केली. आता त्या दरवर्षी ५०० मूर्ती आणतात व त्या ऑस्ट्रेलियात सर्वत्र विकल्या जातात. देवधर आता येथे येऊन अशा मूर्ती बनवायचे वर्ग विनामूल्य घेणार आहेत असे ऐकतो.
अॅडिलेड या शहरी दिलीप चिरमुले यांच्या पुढाकाराने १९८५ साली गणपतीचा वार्षिक उत्सव सुरू झाला. तसेच तेथील डॉ. लिमये स्वत:च्या घरी गेली २५ वर्षे गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणावर साजरा करीत आहेत. आता तेथे महाराष्ट्र मंडळातर्फेही मोठा उत्सव होतो. तसेच पर्थ या शहरी २००२ पासून सतीश केळकर यांच्या प्रेरणेने पर्थ मराठी मंडळ गणेशोत्सव साजरा करीत आहे. ऑस्ट्रेलियात मोठी शहरे फक्त पाच. या सर्व शहरांत गणेशाने मानाचे स्थान पटकावले आहे.
आशिया खंडात झालेल्या उत्खननात गणपतीच्या मूर्ती भारतातच नव्हे तर पाकिस्तान, बलुचिस्तान, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी सापडलेल्या आहेत. त्यावरून गणेशपूजेची प्राचीनता दिसून येते. आता अर्वाचीन कालात गणेशाने इंग्लंड, अमेरिका व ऑस्ट्रेलियासारख्या आंग्ल संस्कृतीच्या देशांत मानाचे स्थान पटकावले आहे.