गणरायाला वंदन करुनी
जोडुनी दोन्ही कर
कार्यारंभ आता करुया
गणिक सर्व आतुर
२०१५ साल उजाडले. नवीन कमिटीने उत्साहात या वर्षांच्या कार्याची जबाबदारी हाती घेतली. गणेशोत्सव हा आपल्याला नवीन नाही. शिल्पकार मूर्ती घडवतात, रंगवतात, मग आपण या गजाननाच्या आगमनासाठी मखर तयार करतो, सजवतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची स्थापना करतो. षोडशोपचारे पूजा, आरती, नैवेद्य करतो. अनंत चतुर्थीच्या दिवशी ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात थाटामाटात आपण त्याची पाठवणी करतो.
याचाच जरा वेगळा अर्थ लावला तर..
आपणच आपल्या आयुष्यात एखाद्या ध्येयाचे शिल्प घडवतो, त्याचे शिल्पकार असतो- त्या ध्येयापुढे ध्यान लावतो, अगदी पूजा, आरती करताना ध्यानस्थ असतो ना तसेच! त्या क्षणी दुसरा कुठलाही विचार मनात न आणता त्या ध्येयाची परिपूर्ती करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि ते साध्य झाले की, त्याचे विसर्जन करून नवीन ध्येयाची मूर्ती उभारण्याच्या मागे लागतो. इथे अमेरिकेत जसे वार्षिक गोल सेटिंगला महत्त्व असते तेच आपल्या गणेशोत्सवांमधून सांगितले आहे. अशाच ध्येयवादी विचारातून डेलावेअर इथे २००३ साली सामुदायिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. हातावर मोजता येतील इतकेच लोक तेव्हा एकत्र येऊन एकमेकांना पडेल ती मदत व सहकार्य करत छोटय़ाशा जागेत गणेशोत्सव साजरा करत असत. त्या छोटय़ाशा रोपटय़ाचा आता मोठा वटवृक्ष झाला आहे. मंदिराची मोठी जागा, प्रशस्त मोठा गाभारा, आवार आणि मोठा हॉल व कार्यक्रमाची रेलचेल.
२०१५ साली पहिल्यांदाच दहा दिवसांचा कार्यक्रम करायची योजना आखलीच आहे. त्यासाठी कमिटीने मोठा पुढाकार घेतला आहेच. त्याचबरोबर स्थानिक लोकांनीही भरघोस प्रतिसाद दिला आहे. पहिल्या दिवशी इथे वाजतगाजत गणरायाचे आगमन व दर दिवशी हार, प्रसाद, आरती व एखादा छोटा कार्यक्रम सादर होत आहे.
या वर्षी मखर करणे, गणपती कथा, अथर्वशीर्ष आवर्तन असे उपक्रम योजलेले आहेच, त्याचप्रमाणे स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम आखलेले आहेतच. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्व जण आपला खारीसारखा वाटा उचलत आहेत. सातासमुद्राकडून इथे आलेली माणसे आपला गणेशोत्सव आजही तितक्याच उत्साहाने साजरा करत आहेत. योगा, ओंकार याचबरोबर आपला गणेशोत्सव याचे जनमानसात होणारे ज्ञान व महत्त्व नक्कीच आनंददायक आहे.
सतत परिश्रम, एकत्र काम करण्याची, विधायक कामात झोकून देण्याची सवय, सकस आहार यांची महती, मंत्रोच्चारांतून वाढणारी श्रवण, पठण, मनन शक्ती आणि ध्येयपूर्तीचा ध्यान, ध्यास, लाभ हे रुजलेले संस्कार आपण या पुढच्या पिढीला देतो आहोत. संस्कारातून समाजातल्या वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन नवीन पिढीला कठीण परिस्थितीत मार्गदर्शन करत त्यांना दिशा दाखवण्याचे कार्य आपला गणेशोत्सव करत आहे.
डेलावेअर इथे नुसता गणेशोत्सवच नाही, तर वर्षभर कलाकारांच्या कार्यक्रमांची रेलचेल चालू असते. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही काही तरी नवीन असे उपक्रम यंदा योजलेले होते. संक्रांतीला मराठी, हिंदी गम्जम्लबरोबर पतंग करून त्याचे डेकोरेशन, संक्रांतीची मुलांनी वाचलेली माहिती याचबरोबर यंदाच्या वर्षांच्या कार्यक्रमात काय काय करणार यांचा आढावा, जुन्या कमिटीचे आभार, नवीन कमिटीचे स्वागत, गुढीपाडवा, होली, रांगोळी स्पर्धा, गुढी उभारणे याचबरोबर सूर्यनमस्काराचे महत्त्व यांची माहिती व त्याचे प्रात्यक्षिक यात सर्वानी सहभाग घेतला. शिवाय पिकनिक, गाणी, नाच हेही पार पडले. यंदा भेलपुरी, पाणीपुरी, मिसळ, आइस्क्रीम असे स्टॉलही लावले गेले. यंदासुद्धा रोनाल्ड मॅकडोनाल्ड हाऊस या संस्थेसाठी मदतीच्या कार्यातही लोकांनी सक्रिय भाग घेतला. गणेशोत्सव असा आम्हाला भारुन टाकतो.