‘शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी.. वांग्याचं भरीत.. गणपती बाप्पाची मुक्त आरोळी’ .. पुलंच्या ‘संस्कृतीची’ व्याख्या गणपती बाप्पाच्या आरोळीनेच होते, तशीच शुभकार्याची सुरुवातही. त्या बाप्पाचा जन्मदिवस म्हणजे गणेशचतुर्थी.
मराठी भाषक मंडळ एडमंटनला २०१५ साली जवळजवळ ३० र्वष पूर्ण झाली. या ३० वर्षांत मंडळाने बरीच मोठी वाटचाल केली. एकत्र येण्यासाठी, ओळखी करून घेण्यासाठी आमच्या मंडळातर्फे आम्ही वर्षभर अनेक कार्यक्रम, सण आणि भेटी-गाठी घडवून आणत असतो.
आमच्या गणपती उत्सवाबद्दल बोलण्याआधी थोडी कॅनडामधल्या आमच्या शहराशी ओळख करून घेऊ या. नकाशात पाहून आपल्याला कदाचित अंदाज येणार नाही, की कॅनडा किती प्रचंड मोठा देश आहे. कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यापासून पश्चिमेच्या किनाऱ्याच्या शहराला विमानाने पोचायला सहा-सात तास लागतात. आकाराने एवढा आडवा आणि उभा. भारतात राहणाऱ्या लोकांना या अंतराची कल्पना एवढय़ासाठी मी देत आहे कारण कॅनडाची जास्तीत जास्त लोकसंख्या कॅनडाच्या दक्षिणेला आहे. जिथे हवा थोडी सौम्य आहे. हा सौम्य शब्द कॅनडाच्या सापेक्ष आहे, भारताच्या नाही. ऑक्टोबर ते मे थंडी आणि जून ते सप्टेंबर उन्हाळा असतो. इथलं थंडीमधलं सर्वसाधारण तापमान ऐकून तुम्हाला हुडहुडीच भरेल. खरं तर ‘तापमान’पेक्षा ‘थंडमान’ म्हणायला पाहिजे!!! थंडीचे पाच महिने सर्वसामान्य तापमान -१५ अंश सेल्सिअस ते -२० अंश सेल्सिअस च्या आसपास फिरत राहतं!!
ग्रेटर एडमंटनची एकूण लोकसंख्या १ लाख५९ हजार ८६९. त्यापैकी एकूण १ लाख २५ हजार १०५ भारतीय, त्यात ४९ हजार ९४० पंजाबी, १२ हजार २९० हिंदी, ८ हजार ६७५ गुजराती. फक्त ८५० मराठी. कॅनडाला आलेले भारतीय लोक मुखत्वे शेती आणि उद्योगधंद्यांसाठी आलेले. यामध्ये साहजिकच पंजाबी सगळ्यात पुढे. मराठी लोकांचा कल शिक्षणातून येणाऱ्या नोकरीपेशाकडे जास्त. अल्बर्टा मुख्यत्वे फार्मिगमध्ये अग्रेसर प्रांत. त्यामुळे साहजिकच मराठी लोकांची संख्या कमी. गेल्या पाच-सात वर्षांत जेव्हा इथे पेट्रोलियम आणि क्रूड तेलाच्या उत्पादनाची भरभराट सुरू झाली तेव्हा कुठे भारतातून किंवा दुबई-सौदी इथे काम करणाऱ्या मराठी लोकांचं येणं वाढू लागलं. मुख्य कारण तेल कंपनीमध्ये नोकऱ्यांची उपलब्धी आणि उत्तम शिक्षणाची सोय.
भारतातून येऊन इथे स्थायिक झालेल्या प्रत्येक व्यक्तीचं मन जितकं इथल्या रोजच्या नोकरी, घर, परिवार आणि बाहेरची संस्कृती यात स्थिर होत जातं, तसतसं त्याचं मन आपल्या मायदेशी आणि मायालोकीची ओढ घेऊ लागतं.
एडमंटन मराठी भाषक मंडळ पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करतं. आपली संस्कृती जपून ठेवणं हे या विविध संस्कृतीतून आलेल्या लोकांच्या देशात आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आमची लहान आणि तरुण मुलं यांना यात रस वाटेल, आणि मराठी संस्कृतीशी ओळख राहावी असं इथे स्थायिक झालेल्या आम्हाला नेहमीच वाटत असतं.
इथल्या मराठी भाषकांची संख्या कमी असेल, पण त्यांच्यात प्रतिभेची आणि उत्साहाची कोणतीच कमी नाही. सगळेच कार्यक्रम अतिशय पारंपरिक, पद्धतशीर आणि जोशात पार पडतात. जे जे कार्यक्रम आम्ही करतो त्यासाठी लागणारे विशेष साहित्य, वाद्य, वेशभूषा या सगळ्याच गोष्टींसाठी आम्ही भारतात कोण भेट देतो आहे आणि त्यांच्याकडून कोणकोणते साहित्य मागावे लागेल याची यादी तयारच करून ठेवतो. हो, अगदी नऊवारी साडीपासून ते गणेशमूर्तीपर्यंत!!!
या प्रदेशात उन्हाळा आणि थंडी एवढे दोनच ऋतू आहेत. पावसाळा असा ऋतू इथे नाही. भारतात गणपती उत्सवाच्या वेळेस पावसाळा असतो. इथे तसं नाही. वर्षभरच मधूनमधून थोडा पाऊस पडत असतो. पाऊस पडला की उन्हाळ्यातही लगेच खूप थंड होतं. ऑगस्ट-सप्टेंबर हे तसे इथे उन्हाळ्याचे महिने. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझीम-ढोल आणि ताशाचा सराव करायचा म्हणून वीकएंडला मंदिराच्या पार्किंगपाशी मंडळी जमली होती. नुकताच पाऊस पडून गेल्याने अचानक थंड झालं होतं. तरीही तेवढय़ाच उत्साहात सराव झाला आणि मंडळी आपल्या घरी परतली ती पुढल्या चार दिवसांनंतर घरी येणाऱ्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होण्याकरिता.
इथे सगळे धार्मिक कार्यक्रम बहुदा मंदिरातच होतात. किंबहुना मंदिर हे सांस्कृतिक केंद्रच असतं. कोणतेही भाषिक असोत गुजराथी, पंजाबी, हिंदी, मराठी सगळ्यांचं मंदिर एकच. कॅनडा हा देश स्थलांतरितांचा देश असल्याने इथे सर्व धर्मीयांना समभाव आहे. सर्व धर्मासाठी समान आदर आहे. मंदिरासाठी राखीव जागा आहेत. जिथे अनेक देश आणि धर्माची प्रार्थनास्थानं आहेत. कोणीही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता. मराठी भाषक मंडळाच्या गणपतीची स्थापना १७ सप्टेंबरला मंदिरातच करण्यात येईल. स्थापना आणि आरतीनंतर मंदिरात जेवढे भाविक देवाच्या दर्शनाला येतील त्यांना प्रसाद-भोजन देण्यात येईल. इथे येणाऱ्या लोकांमध्ये भाषा, धर्म किंवा वर्णभेद नाही.
आमच्या गणपतीची मूर्ती नेहमीच इको फ्रेंडली असते आणि ती आमच्या मंडळाचेच एक ज्येष्ठ सभासद स्वत: हाताने बनवतात, ही आमच्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे. चार दिवसांचा पाहुणा असतो आमचा गणपती. या चार दिवसांत सगळी मंडळी मंदिरात पूजा आणि आरतीसाठी तर येतातच. बाप्पासाठी खास मोदकही बनवले जातात. मोदक करण्यासाठी ज्यांना शक्य होईल ती मंडळी मदतीला येतात. इथल्या मराठीजनांचा उत्साह पाहता एखाद्या एकत्र कुटुंबात सण चालू आहे की काय असेच वाटते.
सुमारे १०० ते १५० लोकांसाठी प्रसाद म्हणून प्रीतिभोजनाचा कार्यक्रम असतो. जेवण बहुदा स्वयंसेवकच बनवतात. गणपतीच्या आरतीलाच नाही तर या सगळ्या कामासाठीसुद्धा अतिशय उत्साहाने मंडळी येतात. इथे घरीसुद्धा सगळीच्या सगळी कामं रोज आम्हालाच करायची असतात. तरीही गणपती असो किंवा दुसरा कोणताही सण असो जेवण सामुहिकरीत्या बनवायचे असेल, तर आम्ही १५-२० स्त्रिया झपाझप ४००-६०० पोळ्या तासाभरात बनवतो. पुरुष मंडळीही तितक्याच उत्साहाने बाकीची तयारी करून देतील. मोदक हा खास मराठी प्रकार असल्याने इथल्या पंजाबी, हिंदी आणि अन्य भाषिकांनाही या प्रसादाचे नावीन्य असते. आणि इथल्या ब्रिटिश, अमेरिकन, युरोपहून इथे स्थायिक झालेल्या ज्यांना आपण ‘गोरे’ म्हणतो त्यांना तर पूर्ण गणपती उत्सवाचेच कौतुक वाटते. २०-२५ वर्षांपूर्वी भारतीय, त्यातूनही मराठी संस्कृतीची ओळख इथल्या मूळ लोकांना विशेष नव्हती. तरी आता समोसा, बटर-पनीर, बिर्याणी हे पदार्थ माहीत झाले आहेत, तसंच दिवाळी, इद, चायनीज नवीन वर्ष हे उत्सवही माहीत झाले आहेत. तरी मोदक, पुरणपोळी आणि ‘द लॉर्ड गणेशा’च्या आगळ्या-वेगळ्या ‘लूक’चं आजही कुतूहल आहे!!
वर्षभर विविध वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात. मंदिरात स्वयंपाकाची आणि भोजनाची सगळी भांडी आणि साधनं उपलब्ध असतात. त्यात फक्त मराठीच नाही तर मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निमंत्रण असतं. या वर्षी मंदिरानेच भोजनाच्या सामग्रीची व्यवस्था केली आहे. आम्हाला फक्त कामासाठी आमचा वेळ द्यायचा आहे. वर्षभर झालेल्या उत्तम कार्यक्रमांपैकी काही निवडक कार्यक्रम या वर्षी लॉस एंजिलीस येथे झालेल्या मराठी संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आम्ही गणेश उत्सवाच्या दिवशी पुढील कार्यक्रमाची आखणी करतो तसंच आधीच्या वर्षी झालेल्या कार्यक्रमांचा गौरव. दर वर्षीप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी पार्किंग लॉटमध्ये दोन तासांची मिरवणूक होईल. डोक्याला केशरी फेटा किंवा पगडी, अंगात कुर्ता आणि पायजमा घालून ढोल-ताशे वाजवणारे वादक आणि तालावर झोकदार नऊ वारी नेसून, हातात लेझीम आणि नाकात नथ घालून तालात जाणाऱ्या मुलींना पाहून वाटणार नाही की आपण कॅनडात आहोत. कमीत कमी २० ते २५ सभासद लेझीमच्या झंकारावर ढोल-ताशांच्या तालावर वाजतगाजत जवळच्या पाण्याच्या हौदापर्यंत नेऊन ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या आरोळीत आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या आग्रहात विसर्जन करण्यात येतं.
इथल्या उत्सवात लाऊड स्पीकर किंवा रस्त्यावर मिरवणूक अशा गोष्टींना टाऊन ऑफिस (नगरपालिका) परवानगी देत नाही. आजूबाजूच्या भागातल्या रहिवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी प्रत्येक सार्वजनिक उत्सवांना घ्यावीच लागते. त्यामुळे रस्त्यावर मंडप, आरास, गाणी-आरत्या, दर्शनाच्या रांगा, हे सगळं मंदिराच्या बाहेर कुठेही दिसणार नाही. किंबहुना मंदिरात एखादा उत्सव चालू आहे हे फारफार तर पार्किंगमधल्या गाडय़ांच्या संख्येवरूनच बाहेरून कळू शकेल.
भारतात या गणेशोत्सवात हल्ली खूप व्यावसायिकीकरण झालेलं दिसून येतं. इथे त्याचं अजून तरी तसं काही झालेलं नाही किंवा राजकीयीकरणही झालेलं नाही. असा आमचा साध्या भक्तिभावाने साजरा केला जाणारा गणेश उत्सव. त्यांनी ज्या हेतूने सुरू केला अगदी त्याच हेतूने आमच्याकडे साजरा होताना पाहून टिळकांना आणि गणपती बाप्पालापण आवडेल यात शंका नाही.