‘गणपती’ हे हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत. समाजात एकजूट निर्माण व्हावी व स्वातंत्र्याची ज्योत मनात तेवत राहावी यासाठी लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा सुरू केली. या प्रथेचा वटवृक्ष आज सातासमुद्रापलीकडे अमेरिकेतसुद्धा जोमाने वाढला आहे. हुस्टनचे महाराष्ट्र मंडळ त्यात आघाडीवर आहे.
‘ुस्टन महाराष्ट्र मंडळा’ची स्थापना १९७६ साली झाली व आज साडेतीनशेपेक्षा जास्त कुटुंब मंडळाचे सदस्य आहेत. मराठी संस्कृती अमेरिकेत जपण्यासाठी व आपले सणवार, परंपरा, चालीरीती, संगीत आणि भाषा हे पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मंडळ सातत्याने प्रयत्न करत आहे. यासाठी दरवर्षी विविध सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. १९९५ मध्ये इटट चे अधिवेशन भरविण्याचा मान ‘हुस्टन महाराष्ट्र मंडळा’ला मिळाला होता आणि यात जगभरातून जवळजवळ तीन हजार लोक सामील झाले होते. तसेच २०१३ मध्ये मंडळाने मराठी शाळा सुरू करून एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. यात कांचन अकोलकर, शर्मिला मोहरीर, वैशाली खांडेकर, इत्यादींचा महत्त्वाचा सहभाग आहे. दोन वर्षांतच मराठी शाळेत जवळजवळ साठ मुले मराठी शिकत आहेत. यात काही अमेरिकन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २०१४ मध्ये वास्तू विभाग स्थापन करून मंडळाची वास्तू उभारण्याचाही मानस आहे.
मंडळातर्फे मकरसंक्रांत, गुढीपाडवा, मंगळागौर, गणपती, दिवाळी असे सण तर मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. त्याचबरोबर अनेक सांस्कृतिक, मनोरंजनाचे उपक्रमदेखील केले जातात. या वर्षी मराठी चित्रपट विटीदांडू व लोकमान्य एक युगपुरुष, मराठी नाटक ‘कहानी मे ट्विस्ट’, संगीत मैफील, सहल असे कार्यक्रम केले आहेत. अर्थातच या सर्वामध्ये सर्वाधिक जल्लोष असतो तो गणेशोत्सवाचा. पाच-सहा महिन्यांपासूनच उत्सवाची तयारी सुरू झालेली असते.
गणेशोत्सव हा हुस्टन महाराष्ट्र मंडळाचा सर्वात मोठा सण आहे. त्या वेळी सर्वाच्याच उत्साहाला उधाण आलेले असते. स्त्रिया, मुली नऊवारी साडी नेसून महाराष्ट्रीय पद्धतीचे दागिने लेवून सहभागी होतात. तर धोतर, पगडी अशा पारंपरिक पोशाखात पुरुष मंडळी मोठय़ा दिमाखात वावरत असतात. बुद्धिदेवतेच्या या उत्सवाच्या मंगलमय वातावरणात सारे हुस्टनवासीय एकरूप होतात.
गणेशोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे ढोल-ताशांचा गजर, झांजांचा नाद, तालबद्ध लेझीम, भगवे झेंडे झेलत व फुगडय़ा घालत काढलेली बाप्पाची मिरवणूक. ढोल-ताशांचे दिग्दर्शन स्वप्निल सराफ करतात, तर लेझीमचे आयोजन शर्मिला मोहरीर करतात. पुरोहिता अचला बापट या नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते बाप्पाची साग्रसंगीत पूजा करवून घेतात. मंडळातर्फे सर्वाचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात होते. त्यानंतर स्थानिक कलाकारांना घेऊन करमणुकीचे विविध कार्यक्रम सादर केले जातात.
आतापर्यंत मंडळाने गणपती उत्सवानिमित्त काही नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर केलेले आहेत. त्यातील काही निवडक कार्यक्रम म्हणजे ‘शिवचरित्र दर्शन’ हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आणि भारतीय स्वातंत्र्यवीरांचा इतिहास हे समीर करंदीकर यांनी लिहिलेले व जवळजवळ ५० लहान मुलांना घेऊन दिग्दर्शित केलेले कार्यक्रम २००६ व २००७ मध्ये सादर केले होते. तर ‘ऌटट सा रे ग म प’ हा आगळावेगळा स्थानिक मुलांकरता गायनाच्या स्पर्धेचा कार्यक्रम २००९ मध्ये झाला होता. याची संकल्पना विवेक चितळे यांची होती. तर या वर्षी ‘गणपती-गौरी-पंढरी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शनसुद्धा विवेक चितळे यांचे आहे व नृत्यदिग्दर्शिका मधुरा स्वादी या आहेत. गणपती, गौरी आणि पंढरीचा विठ्ठल या तीन देवतांभोवती उत्सवप्रिय मराठी संस्कृती विकसित झाली आहे. शब्द, ताल व लय यांच्या त्रिवेणी संगमातून आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची ओळख अमेरिकेत वाढत असलेल्या पिढीस व्हावी व स्थानिक कलाकारांना आपले कलागुण सादर करता यावेत हा यामागचा उद्देश आहे. हा कार्यक्रम २००५ च्या गणपती उत्सवात सर्वप्रथम सादर केला होता. त्या कार्यक्रमाची लोकप्रियता व उद्देश लक्षात घेऊन दहा वर्षांनी नव्याने हा कार्यक्रम मंडळ करत आहे. या कार्यक्रमात जवळजवळ लहान-मोठय़ा १०० स्थानिक कलाकारांचा यात सहभाग आहे व हुस्टनमधील मंडळी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून यात रंगत आणणार आहेत. मिरवणूक, पूजा आणि विविध करमणुकीच्या कार्यक्रमानंतर आरती, अथर्वशीर्षांचा जप, गणेश दर्शन असते. कार्यक्रमाची सांगता होते ती उकडीच्या मोदकांच्या सुग्रास भोजनाने. कौतुकाची बाब म्हणजे दरवर्षी जवळपास एक हजार उकडीचे मोदक तयार करण्याचं काम हुस्टनमधल्या सुगरणी करतात. प्राची मालपेकर, मनीषा शेळके, सारा बिलवरकर, मेघा ओझरकर, ईशा आमटे या व इतर काही गृहिणी चविष्ट व सुबक मोदक करण्यामध्ये माहीर आहेत.
२००३ पासून दर दोन वर्षांनी ‘स्नेह’ हे मासिक गणपतीच्या निमित्ताने प्रकाशित केले जाते. यात हुस्टनमधील लोकांनी लिहिलेल्या साहित्याचा समावेश असतो. हुस्टन महाराष्ट्र मंडळाला अनेक लोक दरवर्षी आर्थिक साहाय्य करतात, त्यांचा मंडळातर्फे मानचिन्ह देऊन आदर केला जातो. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी करून अभिमानास्पद यश मिळवले आहे त्यांचाही सत्कार दरवर्षी नियमितपणे केला जातो. सर्वात शेवटी सुपारीचे विसर्जन करून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात हुस्टन महाराष्ट्र मंडळाच्या एकदिवसीय गणपती उत्सवाची सांगता होते.