‘गणपती बाप्पा मोरया’ अशा जल्लोषात गणपतीची मूर्ती आली. सगळे जण खूप उत्साहात आहेत; लहान मुले-मुली मस्त पारंपरिक धोतरजोडी आणि परकर-पोलके घालून उभी आहेत; बायका नऊवारी साडी, नथ, हिरव्या बांगडय़ा अशा वेशात नटूनथटून उभ्या आहेत; पुरुष मंडळींची भगवे फेटे घालून बाप्पाच्या स्वागताची तयारी चालली आहे, आणि तितक्यात ती बघा वाजतगाजत दिंडी आली.
वरील वर्णन महाराष्ट्रातल्या कुठल्या ठिकाणाचे नसून महाराष्ट्र मंडळ मलेशिया आयोजित गणेशोत्सवाचे आहे. वाटले ना आश्चर्य! मलेशियाच्या महाराष्ट्र मंडळाची तीच तर खासियत आहे. सर्व सण पारंपरिक, मराठमोळ्या पद्धतीने साजरे व्हावेत हा मंडळाचा पहिला प्रयत्न असतो. मुळातच ‘बाप्पा मोरया’ हे शब्द कानावर पडले की आपोआप एक मराठमोळे वातावरण तयार होते, अगदी आमच्या मलेशियातसुद्धा! आणि त्यात भर म्हणजे भरपूर मराठी माणसे गणेशोत्सव साजरा करायला जमली तर दुधात साखरच! अगदी सगळा आनंद सोहळा!!
हा सोहळा मलेशियात सगळ्यात पहिल्यांदा पार पडला तो १९९७ साली. मलेशियात तेव्हा अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी मराठी कुटुंबं होती. जवळपास २०-२५ मराठी परिवारांनी मिळून पन्नासएक लोकांचे महाराष्ट्र मंडळ स्थापन केले. डॉ. वसंत नाडकर्णी, प्रेमा नाडकर्णी, नारायण नायक, मीना नायक, अजित केळकर, शीला केळकर, सतीश दळवी आणि नीलम दळवी अशा सगळ्यांच्या प्रयत्नांतून मलेशियातला महाराष्ट्र मंडळाचा पहिला गणेशोत्सव सोहळा पार पडला.

२००४-२००५च्या दरम्यान मलेशियातील मराठी कुटुंबांची संख्या वाढत गेली आणि त्यासोबतच गणेशोत्सवासाठी हौशी कलाकारांची संख्याही वाढली. २००७-२००८मध्ये त्यातूनच मंडळाला नवीन सभासद मिळाले. अभिजित मुळे, नंदकिशोर सावंत, पंकज हेडाऊ , विवेक परांजपे, नितीन शनवारे यांनी व अजून बऱ्याच जणांनी महाराष्ट्र मंडळ मलेशियाच्या गणेशोत्सवात नवनवीन कल्पनांची वेळोवेळी भर घातली.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरुवात आरत्यांनी केली जाते. सर्व जण मोठय़ा जल्लोषात आरत्या म्हणतात. वेगवेगळ्या आरत्या म्हणण्यावर जास्त भर दिला जातो. तिथेच वातावरण भारावायला सुरुवात होते. बाप्पाचे स्वागत करायला, त्याचे दर्शन घ्यायला तीनशेच्यावर लोक जमतात. त्यात मराठी-अमराठी सगळ्यांचाच समावेश असतो. विशेष लक्ष वेधून घेत असते ती भारतीय उच्चायुक्तांची उपस्थिती!
आरतीनंतर प्रसाद वाटला जातो आणि मग असते अथर्वशीर्ष पठण, तेही लहान मुलांचे. अगदी स्पष्ट, सुरेल आवाजात ही मुले अथर्वशीर्ष म्हणतात. उपस्थितांतील मोठे लोकही त्यात सामील होतात. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक नांदीने होते. दिंडी काढली जाते. मग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात, ज्यात लहान मुलांची नाटके, समूहगायन, पारंपरिक नृत्य; भारतातील पारंपरिक साडय़ांचा फॅशन शो, अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. अशा विविध कार्यक्रमांनी गणेशोत्सवाचा सोहळा झगमगायला लागतो. हे सर्व कार्यक्रम म्हणजे विविध वयोगटातील कलाकारांनी वयाने लहान-मोठय़ा प्रेक्षकांना दिलेली करमणुकीची मेजवानीच असते. सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर स्नेहभोजन आयोजित केले जाते. श्रीखंड-पुरी, मसालेभात, भजी, वडा-पाव यांसारखे पदार्थ ठेवून कार्यक्रमातली मराठी चव कायम ठेवण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो.
गणेशोत्सव, गुढीपाडवा, कोजागिरी असे महाराष्ट्रीय सण मलेशियात तसेच्या तसे साजरे करण्यामागे महाराष्ट्र मंडळाचा एकच हेतू राहिला आहे, की इथे शिकत असलेल्या मराठी मुलांना या सगळ्या सणांची आणि रूढींची माहिती व्हावी. आपल्या देशापासून, संस्कृतीपासून दूर असूनसुद्धा ती मुलं या गोष्टींना पारखी होऊ नयेत. सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हौशी कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळते ते वेगळेच! त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो, दाद मिळते आणि मन कसे तृप्त होऊन जाते! स्वत:च्या गावातले कोणी भेटले, की घरापासून दूर असल्याचे शल्य कुठल्या कुठे पळून जाते आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या चरणी नतमस्तक होताना मलेशियातला मराठी माणूस म्हणतो..
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!!!’
प्राची पाटकर