परदेशी वास्तव्य करत असलेले मराठी मन सतत दोलायमान अवस्थेमध्ये अडकलेले असते. एकीकडे नोकरी, जबाबदारी आणि दुसरीकडे आपल्या आप्त-स्वकीयांचा दुरावा, परंपरा, सण-संस्कृती आणि त्यात या सर्वाचा दुरूनही गंध नसलेली आमची पुढची पिढी. ही पिढी सतत मातृभूमीशी असलेली नाळ अबाधित ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते आणि मग श्रावण महिना संपता संपता भाद्रपदाची चाहूल लागते. अशा मंगलमय वातावरणात गणरायाच्या आगमनाचे वेध आम्हा नेदरलँडवासीयांनाही लागतात.
गेली तीन वर्षे सातत्याने हा गणेश उत्सव मोठय़ा उत्साहाने आणि उत्सवाच्या स्वरूपात इथे साजरा केला जातो. दोन-तीन महिन्यांपासूनच मिरवणुकीच्या तयारीसाठी आणि कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सगळेच अथक परिश्रम घेत असतात. कामांची विभागणी होते. नेमलेली समिती मग कामांची अगदी घरचेच कार्य असल्यासारखे पूर्णत: जबाबदारी घेते.
बाप्पाचे स्वागत हौशी लोकांनी सजवलेल्या पालखीमधून होते. पहिल्या वर्षी छोटय़ा प्रमाणात काढलेली ही मिरवणूक दुसऱ्या वर्षीपासून ढोल, ताशे आणि महाराष्ट्राच्या वाद्यांचे प्रतीक असलेल्या लेझीमच्या गजरात झाली. या वर्षी या लेझीम पथकात पुरुषांबरोबर स्त्रियाही हिरिरीने सहभागी होणार आहेत.
ही मिरवणूक काढण्यासाठी दरवर्षी इथल्या स्थानिक नगरपालिकेची खास परवानगी काढण्यात येते आणि इथले स्थानिक डच लोकसुद्धा या आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये आनंदाने सहभागी होऊन पुरेपूर आस्वाद घेतात. या गणेशाच्या आगमनाप्रीत्यर्थ उत्साही बायका दरवर्षी वेगवेगळ्या, कधी फुलांच्या तर कधी संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढून सभागृहाची शोभा वाढवतात. मखर-आरास नसेल तर बाप्पा बसणार कशात? सगळेच आपली कल्पनाशक्ती पणाला लावतात, मग कधी बाप्पा विराजमान होतो तबला, पेटी, तंबोरा या वाद्यांच्या समवेत तर कधी अॅमस्टडॅमची घरे, बोटी, कालवे, इथल्या प्रसिद्ध पवनचक्क्या, टय़ुलिप्सच्या बागेत. तर कधी चक्क विहीर, शाळा, नदी, गाव याबरोबरच हेमाडपंथी मंदिर, तुळशी वृंदावन, नदीवरचा घाट आणि बुजगावणे आदी सह्य़ाद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या रम्य गावात!
आणि ही सगळी आरास टाकाऊ वस्तूंचा वापर करूनच केलेली असते हे नमूद करण्याजोगे आहे. या अलिखित नियमाचे आम्ही नेदरलँडवासी अगदी पहिल्या वर्षीपासूनच पालन करत आलेलो आहोत. बाप्पाची यथासांग पूजा, दर्शन, तबला-पेटी आणि टाळ्या-चिपळ्यांच्या गजरात आरत्या आणि जोडीला मोदकाचा प्रसाद यात सगळेच भरून पावतात आणि मायदेशापासून दूर असल्याची जाणीव काही अंशी तरी नक्कीच कमी होते.
आम्ही आमच्या मधल्या, खास करून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतोच. पहिल्या वर्षांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर या कार्यक्रमाची रूपरेषा थीम बेस्ड असावी जेणेकरून बदलत्या काळाला अनुसरून नव्या-जुन्याचा संगम दाखवणारे काही पारंपरिक, काही हलकेफुलके विषय हाताळता येतील, अशी कल्पना सांस्कृतिक समितीने मांडली. त्यानुसार एका वर्षी महाराष्ट्राची लोकधारा या थीमद्वारे मांडली गेली.
समाजातल्या अंधश्रद्धेबाबत लोकांना जागरूक करणाऱ्या भारुडाचे विडंबन शैलीतले सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या लोकांना जागरूक करणारे स्वलिखित भारुड, म्हणींवर आधारित नाटय़छटा, लावणीचा ठसका, मंगळागौरीसारखे पारंपरिक खेळ आणि देवीचा गोंधळ, लावणी, गवळण इत्यादींचा समावेश करण्यात आला. या वर्षीही टीम एका नव्या आविष्कारासाठी कार्यमग्न आहेच.
सांस्कृतिक कार्यक्रमानंतर अर्थातच सुग्रास भोजनाची व्यवस्था केली जाते. महाराष्ट्र मंडळ नेदरलँड्सने आयोजित केलेल्या या गणेश उत्सवात पहिल्याच वर्षी सुमारे २०० लोकसहभागी झाले होते, तर मागच्या वर्षीपर्यंत ही संख्या ४००च्या घरात पोहोचली आहे. केवळ मराठी नव्हे तर कित्येक अमराठी, स्थानिक डच लोकही या उत्सवात सहभागी होऊन सर्वाचा उत्साह द्विगुणित करीत आहेत. हे सगळे विविध प्रांतांचे, विविध संस्कृतीचे आणि विविध भाषेचे लोक एका छताखाली येऊन एकत्र गणेश उत्सव साजरा करत आहेत आणि महाराष्ट्र मंडळाचा उपक्रम सार्थ ठरवत आहेत. या सर्वाच्या सहयोगाने आणि सहकार्यानेच आम्हाला अजून वेगवेगळे कार्यक्रम करण्यासाठी कल्पना मिळतात. अशाच स्मृती मनाच्या मंजूषेत जपत आम्ही पुढच्या वर्षीच्या भाद्रपदाचीही वाट पाहू लागतो आणि नव्या जोशात नवीन कार्यक्रमाची आखणी करू लागतो.
पूर्वा – जाईली