लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो एका राजकीय कारणासाठी. जनमानस अचूक जाणणारे टिळक मराठी माणसाची नस चांगली ओळखून होते. म्हणूनच मराठी माणसाच्या मनामध्ये जी गणेशभक्ती आहे त्याच भक्तीला हाताशी धरून इंग्रजांशी मुकाबला करण्याची शक्ती मिळविण्याचा लोकमान्यांचा हा प्रयत्न कमालीचा यशस्वी झाला. आज त्यांनी लावलेले हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे रोपटे केवळ महाराष्ट्रातच नाही तर जिथे जिथे मराठी माणूस पोहोचला आहे तिथे तिथे रुजले आहे, फोफावले आहे. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की मराठी माणूस वैयक्तिकदृष्टय़ा खूप उंचावर पोहोचला तरी तो सामाजिकदृष्टय़ा एकत्र येण्यात कमी पडतो. आणि म्हणूनच आजही या सार्वजनिक गणेशोत्सवाचं महत्त्व कायम आहे.
आज भारतात बऱ्याच ठिकाणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं रूप कमालीचं बदलत असताना परदेशात मात्र हा गणेशोत्सव खूप वेगळ्या प्रकारे समाजाला बांधून ठेवायला मदत करत आहे. परसत्तेविरुद्ध जनजागृतीची जागा आता सांस्कृतिक जागृतीने घेतली आहे. परदेशात जाऊन पोहोचलेला मराठी माणूस पेहरावाने बदलला, भाषेच्या बाबतीतही बदलला, पण मनातला गणेशोत्सव मात्र नाही विसरला.
अमेरिकेतील पश्चिम किनारपट्टीवरील कॅलिफोर्नियाला लागून असलेल्या अॅरिझोना या राज्यामध्ये आमचे फिनिक्स मेट्रो महाराष्ट्र मंडळ आहे. ३० वर्षांपूर्वी अगदी घरगुती स्वरूपात, १०-१२ जणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ह्य मंडळाचा आता चांगलाच विस्तार झाला आहे. सुरुवातीला गणपती आणि दिवाळी हे दोनच कार्यक्रम करणारे मंडळ आता वर्षां-सहल, मराठी चित्रपट, मराठी शाळा असे नवनवीन उपक्रम जोमाने सादर करत असते. आणि मुख्य म्हणजे जुन्या-नव्या साऱ्या जणांचा या उपक्रमांना चांगलाच प्रतिसाद मिळत असतो.
पण अजूनही सगळ्यात मोठा असा मंडळाचा कार्यक्रम म्हणजे गणेशोत्सवाचाच! साधारणपणे तीनशे-साडेतीनशे जण या वार्षिक कार्यक्रमात सहभागी होतात. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या कालावधीत येणाऱ्या शनिवारी किंवा रविवारी हा वार्षिक उत्सव असतो. इथे परदेशात आपल्या सणांच्या सुट्टय़ा नसल्यामुळे हताश न होता त्यावर क्लृप्ती काढून सुट्टीच्या दिवशी कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा इथे सुरू झाली आहे. दहा दिवसांचा गणेशोत्सव, चार दिवसांची दिवाळी यांच्या वेळेमध्ये काटछाट करून एकेक दिवसामध्ये हे सण साजरे करण्याची आम्हाला वेळेअभावी कसरत करावी लागली तरीही प्रत्यक्षात तो कार्यक्रम साजरा करताना मात्र कुठलीच कसर आम्ही सोडत नाही.
तर आमच्या महाराष्ट्र मंडळाचा फिनिक्समधील गणेशोत्सवाचा कार्यक्रम असतो एका दिवसाचाच, पण असतो मात्र भरगच्च! एक किंवा दोन जोडपी, अमेरिकास्थित गुरुजींच्या हस्ते साग्रसंगीत गणपतीची पूजा करतात. गुरुजी जरी तंत्रज्ञान विशारद वगैरे असले तरी पूजा मात्र पारंपरिक पद्धतीनेच यथासांग सांगतात. बाप्पाला अगदी घरचा नैवेद्य असतो बरं का! आमच्याकडील अलकाताई गणपुले यांचे उकडीचे मोदक खाल्लय़ाशिवाय बाप्पालाही बरे वाटत नाही. गणपतीसाठी आरासदेखील अगदी वैविध्यपूर्ण असते. प्रसादाचे मोदक करणे आणि तेही साधारणपणे ५०० च्या आसपास हे आव्हान मंडळातील कार्यकर्त्यां आणि त्यांच्या मैत्रिणी अतिशय उत्साहाने दर वर्षी पेलतात. मंडळाची कार्यकारिणी आणि हे स्वयंसेवक हा गणेशोत्सव हे घराचे कार्य समजून जी मेहनत घेतात त्याला तोड नाही. यानंतर आरती होते आणि मग सुरुवात होते ती फिनिक्समधील कलाकारांच्या कार्यक्रमाला. लहान, मोठे सारेजण गणेशाच्या चरणी आपली सेवा रुजू करतात. महत्त्वाचं म्हणजे सादर केल्या जाणाऱ्या नृत्यांमध्ये आजकाल आढळणारा सवंगपणा नसतो. त्यांच्या नृत्यामध्ये, गाण्यामध्ये असतो कलेचा आविष्कार. चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून झिरपलेला उथळपणा नाही तर आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणारा कथ्थक, भरतनाटय़म् यांच्या आविष्कारातून आलेला सखोलपणा ह्य कार्यक्रमांची लज्जत वाढवत जातो. लहान मुलांचे श्लोक, अथर्वशीर्षांचे पाठांतर, त्यांची बालगीते ह्यामधून त्यांची आणि त्यांच्या पालकांची नाळ अजूनही आपल्याच मातीशी जुळली आहे याची जाणीव होत असते. कधी आमच्या मंडळाच्या ‘विद्यामंदिर’ मराठी शाळेतल्या मुलांचे तर कधी मोठय़ांचे नाटय़ाविष्कार त्यांच्यातल्या मराठीपणाची साक्ष देत असतात. थोडक्यात स्थानिक कलाकारांच्या कलेला वाव देण्याचे आणि आपली मराठी भाषा जोपासण्याचे महत्त्वाचे कार्य या गणेशोत्सवाच्या निमित्ताने होत असते. या उत्सवात आवर्जून सहभागी होणारे काही अमराठी भाषिक व काही अमेरिकन हेसुद्धा अतिशय आनंदाने या कार्यक्रमांचा रसास्वाद घेतात. विविधतेमध्ये एकता हे जे सूत्र आपण लहानपणापासून पहिले आहे ते या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अधिक व्यापकतेने इथे बघायला व अनुभवायला मिळते. अशा सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सारे जण एकत्र येऊन पुन्हा महाआरती करतात आणि नंतर महाप्रसाद घेऊन घरी जातात. महाप्रसाद म्हणजे येथील स्थानिक बेन यांनी केलेला साग्रसंगीत भारतीय स्वयंपाक. अगदी मसालेभात, श्रीखंड, कढी अशी अस्सल मेजवानी असते ती! नवनव्या ओळखी करून घेण्याची ही एक छान संधी असते. फिनिक्समध्ये दरवर्षी नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने आपल्या मराठी माणसांचे स्थलांतर होत असते. वार्षिक गणेशोत्सव हा या नव्या-जुन्यांचा स्नेहबंध जमवण्याचा उत्तम सेतू होतो व नवीन लोकांना आपण घरापासून दूर आल्याचे विसरायला लावतो. स्त्रियांच्या पैठण्या, पुरुषांचे झब्बे आणि मुलांचे पारंपरिक पोशाख यामुळे एक वेगळा महाराष्ट्रीय माहौल बनून जातो.
तीन वर्षांपासून मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आणखी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे गणपती मूर्ती तयार करण्याचा. शिल्पा आणि अमित उपाध्ये हे फिनिक्समधील दाम्पत्य गणपतीची मूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र मंडळातर्फे इतरांना देतात. इथे दुकानामध्ये चिकणमाती मिळते. त्यापासून मूर्ती तयार करायची, तिची पूजा करायची आणि विसर्जनात पर्यावरणाची हानीही नाही. गणेश चतुर्थीच्या साधारणपणे एक किंवा दोन आठवडे हा मूर्ती बनविण्याचा कार्यक्रम मंडळ आयोजित करते. लहानांना घेऊन मोठय़ा हौसेने पालक मंडळी येतात. दोन-तीन तास खपून मातीची छोटीशी सुबक मूर्ती तयार करतात व आपापल्या घरी हा स्वहस्ते केलेला गणेश स्थानापन्न होतो. गणपतीची मूर्ती कशी करायची, ती तशीच का करायची याची माहिती मुलांना नकळत मिळत जाते आणि मग हा गणपती बाप्पा कुण्या मंडळाचा न राहता त्या मुलांचा आपला बाप्पा बनून जातो.
मंडळाची सुबक ‘इम्पोर्टेड’ मूर्ती ही गणपुले कुटुंबीय भक्तीपूर्वक वर्षांनुवर्षे सांभाळून आणत आहेत.
असा असतो आमच्या फिनिक्समधला गणेशोत्सव. तो अनुभवायला नक्कीच या!