सेंट लुईस हे अमेरिकेच्या मिड वेस्ट भागातील ना फार मोठे ना फार छोटे असे एक शहर. हे शहर येथील ‘गेट-वे आर्च’करिता प्रसिद्ध आहे. या कमानीला पाश्चिमात्य विस्ताराचे प्रवेशद्वार म्हणून अमेरिकेच्या इतिहासात गणले जाते. अशा या छोटय़ा पण प्रसिद्ध शहरातील मराठी लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी बांधून ठेवणारे आमचे छोटेसे मंडळ म्हणजे ‘सेंट लुइस मराठी मंडळ’. १९७० च्या दशकाच्या शेवटी येथील मराठी कुटुंबीयांनी अनौपचारिकरीत्या या मंडळाची स्थापना केली. मागच्या वर्षी या मंडळाची नोंदणी ‘नॉन-प्रॉफिट’ संस्था म्हणून करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. तेव्हापासून आजतागायत मंडळ या दालनामार्फत मराठी संस्कृती व कला जोपासून ठेवण्यात आणि नवीन पिढीला आपल्या सण-वार, प्रथा तसेच भाषेचा परिचय करून देण्यात कार्यरत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे ‘श्री गणेश’. श्री गणेशाला आवाहन करून आणि त्याची पूजा प्रथम करूनच आपण प्रत्येक शुभकार्याची सुरुवात करतो. ही परंपरा लक्षात घेऊन, सेंट लुईस मराठी मंडळ दरवर्षी वार्षिक कार्यकारिणीची सुरुवात गणेश उत्सव साजरा करून करते. जवळपास ४५ वर्षांपूर्वी जेव्हा मंडळाची स्थापना झाली त्या वेळी सदस्य संख्या अगदी एका हाताच्या बोटांवर मोजण्याएवढी होती. या उत्सवाची सुरुवात हौशी सदस्यांनी कुणाच्या तरी तळघरात एकदंताची स्थापना करून केली. सगळा प्रसाद, जेवणाचा बेत आनंदाने सगळ्यांनी घरून बनवून आणला. मातृभूमीपासून व कुटुंबीयांपासून हजारो मैल दूर पण येथील मित्रपरिवारासोबत हा सण पहिल्यांदा साजरा केला गेला तो क्षण अवर्णनीयच असावा! त्या क्षणाचा आनंद आणि समाधान शब्दात मांडणे शक्य नाही. त्या दिवसापासून ते आजपर्यंतचा मंडळाचा प्रवास अव्याहत व वाखाणण्याजोगा आहे.
जसा काळ लोटला, तसे सदस्यही वाढत गेले. बरेच मराठी भाषिक सेंट लुईसमध्ये स्थायिक झालेत. मराठी माणूस आधीच उत्सवप्रिय! नवीन सदस्य नवनवीन कल्पना घेऊन आलेत व हळूहळू कार्यक्रमाचे स्वरूप बदलू लागले आणि उत्तरोत्तर नवीन कार्यक्रमांची भर पडत गेली. गणेश उत्सव हा मंडळाचा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून ओळखला जाऊ लागला. आजूबाजूच्या छोटय़ा भागातील भारतीय कुटुंब सेंट लुईस मराठी मंडळाच्या कुटुंबाचा हिस्सा बनलेत. आजही लांबून अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि केवळ मराठीच नव्हेत तर इतर भाषिक लोकही या कार्यक्रमाला आवर्जून येतात.
तसं पाहिलं तर अमेरिकेतील इतर मंडळांच्या तुलनेत आमचे मंडळ अजूनही लहानच, पण लहान असले तरीही उत्साह मात्र दांडगा! आजच्या कार्यक्रमाच्या या मोठय़ा स्वरूपाला हा दांडगा उत्साहच कारणीभूत आहे. हा सोहळा आमच्याकडे एक दिवसाचा असतो आणि हिंदू मंदिराच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधी सेंटरमध्ये याचे आयोजन केले जाते. सगळेच बाप्पाच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत असतात. गणरायाच्या स्वागताची तयारी दोन महिने आधीपासूनच सुरू होते. कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यासाठी चर्चा सुरू होतात. अमेरिकेत एक विशेष म्हणजे सगळे कार्यक्रम, वाढदिवस असो वा कुठली साधी पार्टी, सगळं सोयीनुसार म्हणजे शनिवार/ रविवारी साजरे केले जाते. उत्सव कमिटी महात्मा गांधी सेंटरचे बुकिंग एक वर्षांआधीच करून ठेवते. या मागचा उद्देश असा की, गणेश उत्सव दहा दिवसांमध्ये येणाऱ्या शनिवार/ रविवारी साजरा करता यावा. मंडळाच्या वेबसाइटवर, तसेच फेसबुक पेजवर कार्यक्रमाचा तपशील टाकला जातो आणि कोणकोण येणार याचे अंकगणित सुरू होते! म्हणता म्हणता तयारीचे दिवस कधी निघून जातात ते कळतसुद्धा नाही, आणि मग प्रत्यक्षात बाप्पांचा दिवस उजाडतो.
गणपती बाप्पाची उपस्थिती आणि उकडीच्या मोदकांचा प्रसाद ही विशेष परंपरा मंडळाने कायम जपलेली आहे. प्रसाद आणि जेवण स्वत: बनवून आणण्याचा वारसा आजही कायम आहे. कार्यक्रमाच्या दिवशी अगदी पहाटे उत्सव समितीचे सदस्य, तसेच इतर भक्तगण मोदक बनवायला बागवे मावशीकडे गेल्या चार दशकांपासून जमतात. २५०-३०० मोदक बनविण्याची कामगिरी या सुगरण मावशींच्या नेतृत्वाखाली अगदी हसतहसत पार पाडतात. यात नवशिक्यांचाही समावेश असतो! मग पूजेच्या ऐन वेळेस वाफाळलेल्या गरमा-गरम मोदकांचा नैवेद्य बाप्पासाठी येतो. याबरोबरच दुसरा एक गट सजावटीच्या कामगिरीवर लागलेला असतो. मखर, रोषणाई करून बाप्पासाठी आसन बनवले जाते. सगळे भक्तगण आले की, सुमारे अकराच्या आसपास लेझीम, टाळ वाजवत बाप्पाची मिरवणूक निघते. लहानथोर सगळेच ‘गणपती बाप्पा, मोरया’च्या जल्लोषात बाप्पाचे स्वागत करतात. पारंपरिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करून विघ्नहर्त्यांची स्थापना केली जाते. श्रीची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर आरती, मंत्रपुष्पांजली व अथर्वशीर्षांचे पठण होते. यानंतर सगळे भक्तगण आस्वाद घेतात तो मराठमोळ्या थाटाच्या जेवणाचा! श्रीखंड, पुरी, मसाले भात, मटकीच्या उसळीबरोबर प्रत्येक ताटात मोदक वाढला जातो तो साजूक तुपाचा मुकुट घालूनच! नंतर विविध सांस्कृतिक मनोरंजनाने व स्थानिक कलाकारांच्या कलाप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होते.
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या घोषात श्रीला भावपूर्ण निरोप दिला जातो.
असा हा एक दिवसाचा सोहळा थाटात पार पडल्यावर कार्यकारिणी पुढील मोहिमेसाठी सज्ज होते. दिवाळी, मकरसंक्रांत आणि गुढीपाडवा हे मराठमोळे सण विशेषत: साजरे केले जातात आणि प्रत्येक कार्यक्रमाचे स्वरूप हे अगदी वेगळे पण मराठी संस्कृतीशी निगडित असते. मंडळाचा आणखी सांगण्याजोगा उपक्रम म्हणजे मराठी शाळा. अमेरिकेतच जन्मलेल्या मराठी कुटुंबातील मुलांना मराठी भाषा शिकवण्याचं काम ही शाळा करते. मंडळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित तर करतेच, पण त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात पण पुढे आहे. भूकंप, त्सुनामी अशा आपत्ती काळात आर्थिक मदत आणि सेंट लुइसमधील गरजूंची मदत यात तत्पर राहून आम्ही आमचा खारीचा वाटा उचलतो. याचबरोबर मंडळ महाराष्ट्रातील विविध कलाकारांनासुद्धा आमंत्रित करण्यास नेहमीच उत्सुक असते. या वर्षी ११ ऑक्टोबरला पंडित राहुल देशपांडेंचा असाच एक कार्यक्रम मंडळ सादर करणार आहे. शिरीष कणेकर, सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे, द्वारकानाथ संझगिरी अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे कार्यक्रम यापूर्वी मंडळाने आयोजित केले आहेत.
तर असं हे आमचं भारताबाहेरचं एक विशाल भारतीय कुटुंब! एकजुटीने आणि जिव्हाळ्याने बांधलेलं!

Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
student using mobile
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूला ब्लू व्हेल चॅलेंज कारणीभूत?
Ecuadorian police break the Mexican embassy and arrested former vice president of Ecuador Jorge Glas
इक्वेडोरकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन; लॅटिन अमेरिकेतील राष्ट्रे संतापली…
US Ambassador to India recalls meeting Shah Rukh Khan
“मी शाहरूखला भेटलो हे कळल्यावर सहकाऱ्यांनी…”, अमेरिकेच्या राजदुतानं सांगितला ‘तो’ अनुभव