पुण्याच्या गणेशोत्सवातील विविध प्रकारच्या वैशिष्टय़पूर्ण देखाव्यांना शिल्पकार खटावकरांचे हात लागलेले असतात आणि विसर्जन मिरवणुकीतील शिस्तबद्ध ढोल-बर्ची पथकांच्या शिस्तीमागे ज्ञानप्रबोधिनीच्या पथकांचा राष्ट्रविचार असतो.
पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपणारा एक मराठमोळा सोहळा. इथले नयनरम्य देखावे, शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुका, चौकाचौकांत काढलेल्या रांगोळ्यांचे गालिचे, डोक्यावर फेटा आणि पेशवाई पगडीसोबत ढोलावर थाप मारत बाप्पाला निरोप देणारी वाद्य पथके ऐतिहासिक पुण्याची साक्ष देतात. याच सगळ्या गोष्टी पुण्याच्या गणेशोत्सवाचे वेगळेपण जपतात आणि वाढवतातही.
दहा दिवसांचा हा सोहळा समाज प्रबोधनासाठी उत्तम माध्यम ठरेल या हेतूने पुण्याच्या गणेशोत्सवात देखावे, मनोरे यांची प्रथा रूढ झाली. हे देखावे प्रत्यक्षात आणण्याचे मुख्य श्रेय जाते आजचे आघाडीचे शिल्पकार विवेक खटावकर यांचे वडील डी. एस. खटावकर यांना. १९५२ साली त्यांनी तुळशीबाग गणपतीसमोर पहिला देखावा सादर केला. राम, लक्ष्मण आणि सीता ही पौराणिक पात्रे त्या देखाव्यातून मांडण्यात आली होती. विविध प्रकारची कारंजी, आरसे अशा मनोरंजनात्मक गोष्टींसोबतच पौराणिक कथा समाज प्रबोधनाचे साधन म्हणून वापरण्यास तेव्हापासून सुरुवात झाली. देखावे आणि मूर्ती बनवण्याची वडिलांची कला पुढे विवेक खटावकरांनीही तशीच जोपासली. शिल्पकलेचे, देखावे आणि मांडव बनवण्याचे विवेक खटावकरांचे कार्य गेले २५ वर्षांहून अधिक काळ अविरतपणे चालू आहे.
पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून कला शाखेतील प्राथमिक पदवी घेतल्यानंतर मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये विवेक खटावकर यांनी शिल्पकला, नक्षीकाम, मूर्तिकला यांचे मुख्य धडे गिरवले. वडील डी. एस. खटावकर हे त्यांचे या क्षेत्रामधील पहिले गुरू. वडिलांच्या काळातले इंग्रजी राजवटीतील १९२७ व १९३२ सालचे कामाचे परवानेही त्यांनी आठवणपूर्ण जपून ठेवलेले आहेत. लहानपणापासूनच वडिलांसोबत वेगवेगळ्या नक्षीकामात त्यांना मदत करणे हा त्यांचा आवडता छंद. पुढे १९८५ नंतर त्यांनी स्वतंत्रपणे कामास सुरुवात केली. २० वर्षांपूर्वीपासून इको-फ्रेंडली गणपतीची संकल्पना त्यांनीच सर्वप्रथम पुण्यात रुजवली होती. त्या काळी स्वत: विविध शाळांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना इको-फ्रेंडली गणपती बनवण्यास शिकवले आणि समाजात त्या विषयीची जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. १९८८ साली तुळशीबाग गणपतीची घडवलेली मूर्ती हे त्यांचे स्वतंत्ररीत्या केलेले पहिले मोठे काम. नंतर पुढली सलग सोळा वर्षे त्यांनी मंडई गणपतीचा मिरवणुकीचा रथ बनवण्याचे काम केले. १९९९ मध्ये शताब्दी वर्षांनिमित्त हत्ती गणपतीचे काम करण्याचा मानही त्यांनाच लाभला होता. तुळशीबाग गणपतीसोबतच गेली सात वर्षे दगडूशेठ गणपतीच्या उत्सव काळातील कलाकुसरीची, मांडवाची तसेच विसर्जन मिरवणुकीच्या रथाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे. थोडक्यात सांगायचे तर पुण्याच्या अनेक मानाच्या नेत्रदीपक गणेशमूर्तीच्या सौंदर्यामागे राबणारे मुख्य हात विवेक खटावकर यांचे आहेत.
कालानुरूप बदल
आपल्या देखाव्यांबद्दल विवेक खटावकर सांगतात, त्या त्या काळात जे समाजात माहीत नसेल किंवा ज्या विषयातील प्रबोधनाची गरज असेल असे विषय लक्षात घेऊन त्यांच्यावर ठरावीक वर्षी देखावे करणे असा दरवर्षी अलिखित नियम असतो. ढोबळमानाने सांगायचे झाले तर दर वर्षी देखाव्यात थोडे बदल होतात, परंतु मोठय़ा बदलांसाठी बारा वर्षांचे तप ठरलेले आहे. प्रत्येकी बारा वर्षांनी काही तरी वेगळी लाट येते आणि नवीन गोष्टीला प्रारंभ होतो आणि असेच पुढेही चालत राहील. उदाहरणच द्यायचे झाले तर सुरुवातीचा काळ हा फक्त साध्या सजावटीचा होता. त्या नंतरच्या काळात विद्युत देखावे आले. पुढील बारा वर्षांनी विद्युत दिव्यांची जागा इंदोरच्या हलत्या देखाव्यांनी घेतली. मधली काही वर्षे मुंबई प्रकारचे फायबरचे देखावे पुण्यामध्ये बनवले जात होते आणि आता पुन्हा इतिहासाला उजाळा देणारी विविध मंदिरे सध्याचे गणेश देखाव्यांचे आकर्षण बनत आहेत. गेल्या सात वर्षांत देशभरातील विविध भागांतील महाल आणि मंदिरांचे प्रतीक दगडूशेठ गणपती देखाव्यासाठी बनवण्यात आले आहेत. त्यामध्ये हवामहाल, गणेश महाल, भाग्योदय महाल, चामुंडेश्वर मंदिर अशा विविध ठिकाणच्या कलाकृतींचा समावेश होता.
खटावकर यांच्या मते प्रत्येक वर्षीचा गणेशोत्सव हा एक वेगळे आव्हान घेऊन येतो. त्यामुळे दरवर्षीच प्रत्येक पायरीवर शंभर टक्के तयारीनिशी उतरावे लागते. या वर्षी आपल्या मंडळाचे गणेशोत्सवाचे स्वरूप काय असेल हे चार ते पाच महिने आधीच ठरलेले असते. त्यानुसार तेवढय़ा आधीपासूनच कामाची सुरुवात होते. ते सांगतात, ज्या वास्तूची प्रतिकृती बनवायची आहे त्या वास्तूच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन महिनाभर राहून स्थापत्य आणि शिल्पकलेचा बारकाईने अभ्यास करणे हा या चार-पाच महिन्यांच्या प्रवासातला सुरुवातीचा प्रमुख टप्पा असतो. यातील बहुतेक विषय हे सामाजिक पातळीवर विविध गटांसाठी भावनिक असू शकतात. त्यामुळे कुठल्याही कलाकृतीमधून कुणाचा अवमान किंवा अनादर होणार नाही ना याची विशेष काळजी घ्यावी लागते.

कायद्याची वाढती बंधने
गेली काही वर्षे पुण्याच्या बराचशा भागात मांडव, देखावे, त्यांचे आकार, ध्वनिवर्धकाचा वापर इत्यादींवर सरकारतर्फे र्निबध लादले जात आहेत. मांडवांसाठी जागेची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. यामुळे कार्यकर्ते आणि सामान्य लोक दोघांचाही हिरमोड होत आहे. या बदलांमुळे लोकांतील उत्साह कमी होईल का काय अशी भीती वाटू लागली आहे. म्हणूनच प्रत्येक मंडळाकडून तसेच समाजातल्या विविध घटकांमधून स्वयंशिस्तीची आता जास्त अपेक्षा आहे. त्याबद्दल खटावकर सांगतात, गणेशोत्सव हा समृद्ध कलेचा उत्सव आहे. त्याचे हेच महत्त्व कमी होत चालले आहे आणि इतर गोष्टींचा अतिरेक वाढत आहे. म्हणूनच जोपर्यंत स्वयंशिस्तीचे महत्त्व विविध मंडळांमध्ये आणि लोकांमध्ये पसरत नाही तोपर्यंत नाइलाजाने का होईना पण अशा कायद्यांची, र्निबधांची गरज आहे.
यंदाचे वेगळेपण
लोकांना माहीत नसणाऱ्या गोष्टी त्यांच्या पर्यंत पोहोचवणे या हेतूने दगडूशेठ गणपतीसमोर यंदा स्वानंदलोक दरबाराचा देखावा करण्यात येत आहे. अमरावतीच्या स्वानंदपुण्य महाराजांच्या आदर्शातून तयार होणाऱ्या या देखाव्यात अनुक्रमे स्वर्गलोक, सत्यलोक, शक्तिपीठे, सूर्यलोक आदींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
विवेक खटावकरांना पुढच्या संत ज्ञानेश्वरांच्या जीवनपटावर काम करायचे आहे. त्याचप्रमाणे २७ नक्षत्रांचे शिल्प बनवण्याचाही त्यांचा मानस आहे. या क्षेत्रांनी इतरांपेक्षा वेगळे काय दिले, या प्रश्नावर येत असतानाच खटावकर अभिमानाने म्हणाले, ‘इथे काम करणारे सगळे महाराष्ट्रीय आहेत. त्यामुळे ७०-८० गरीब कुटुंबांना या मार्फत रोजगार मिळाला आहे. मुख्यत: गणेशोत्सवाबद्दल बोलायचे झाले तर या क्षेत्रामुळे बाप्पाची सेवा करण्यासाठी एक हक्काचे माध्यम मिळाले आहे. एका वाक्यात सांगायचे तर कारागीर आणि कलाकार यांच्यातला फरक इथे समजला आहे. म्हणूनच प्रत्येक कलाकाराने ताकदीचा कारागीर असणेही तितकेच महत्त्वाचे आहे कारण ज्या दिवशी वाटेल की आपल्याला सगळे आले तो दिवस कलाकारातील कलेचा शेवट असेल.
अशाच कलाकारांमुळे पुण्याचा गणेशोत्सव आपले वेगळेपण टिकवून आहे.
वाद्य पथकाच्या संकल्पनेचे बीज पुण्यात रोवणारे ज्ञान प्रबोधिनीचे प्रबोधक :
गणेशोत्सव हा पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. काही तासांच्या बाप्पाच्या मिरवणुकीसाठी इथले अनेक तरुण-तरुणी दोन महिने आधीपासून ढोल-ताशांचे शिक्षण घेत असतात. हे दोन महिने मुळा-मुठेच्या काठावर बहुतांश ठिकाणी विविध वाद्य पथके वाद्यांचा सराव करताना हमखास दिसतात. या पथकांना पुढे एवढी मागणी वाढू लागते की मुंबई, सोलापूर, नागपूर करत थेट परदेशातही वाद्य पथकांच्या तालावर गणेश मिरवणुका निघू लागतात. ढोल, ताशे, लेझीम, बर्ची यांच्या तालावर शेकडो युवक-युवती एकत्रित ताल धरतात. हजारोंच्या संख्येने टिळक रोड, लक्ष्मी रोड भरून गेलेले असतात आणि तरीही त्या प्रत्येक मिरवणुकीला एक शिस्त असते. त्यामुळेच पुण्याच्या गणेशोत्सवातील मिरवणुका इतर शहरांपेक्षा वेगळ्या ठरतात. पुण्यनगरीत शिस्तबद्ध मिरवणुकीची ही प्रथा रुजवण्याचे प्रमुख श्रेय जाते ज्ञान प्रबोधिनीच्या पथकाला. याच पथकाच्या आदर्शाने आज पुणे व परिसरात शेकडो नवीन वाद्यपथके तयार होत आहेत.
सुरुवात आणि विस्तार :
प्रबोधिनीच्या पथकाचे श्रेय जाते या पथकाचे आणि ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे आद्य संस्थापक आप्पा पेंडेसे यांना. १९६३-६४ च्या काळात आप्पा पुण्यातील विद्यार्थासाठी प्रबोध वर्ग चालवत असत. यात पथकाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सवात आपलाही सहभाग हवा या विचारांनी आप्पांनी वाद्य पथक व तालबद्ध बर्ची नृत्याची सुरुवात केली. त्या काळापर्यंत पुढे धारेधार पाते असणारे लाकडी हत्यार एवढीच बर्चीची ओळख होती. गणेशोत्सवातील बर्ची नृत्यामुळे या शस्त्राला एक नवीन ओळख मिळाली. या नृत्य प्रकाराला मग साथ मिळाली ती ढोल आणि ताशा या वाद्यांची. प्रबोध गटांमध्ये तेव्हा तेवढे ढोल असणे शक्य नव्हते. म्हणून शेजारपाजारच्या गावांमधून, राज्यांमधून ढोल जमा करायला सुरुवात झाली. ते बांधायचे कसे हे शिकण्यासाठीही अप्पांनी दुसऱ्या राज्यातील तज्ज्ञांना आमंत्रण दिले. ठरावीक काळानंतर वाढत जाणारा वेग लक्षात घेऊन बर्ची आणि वाद्य पथकाचे प्राथमिक ताल बसवण्यात आले. पुढे हेच सात ताल एकत्रित एक आवर्तन म्हणून ओळखू जाऊ लागले. याचबरोबर पथकाचे अजून एक वेगळेपण म्हणजे वाद्यपथकाच्या जोडीने नाचवण्यात येणारा भगवा ध्वज. वारी संप्रदायातून प्रेरणा मिळालेला हा ध्वज संपूर्ण मिरवणूक होईपर्यंत मानाने नाचवण्यात येतो. प्रत्येक वादनाच्या सुरुवातीला आणि शेवटी ध्वजाची पूजा केली जाते. ध्वज नाचवण्याची प्रथा सध्या बहुतांश मंडळांमध्ये रूढ झाल्याचे दिसते. आप्पांच्या एवढय़ा अथक प्रयत्नांनंतर गणेशोत्सवातील बर्ची आणि वाद्य पथकाचा श्रीगणेशा झाला.
१९६४ साली आप्पांनी पथक सुरू केले खरे पण लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९६५ साली घडलेल्या मंडई हत्याकांडामुळे गणेशोत्सवातील वादनांना बंदी आली. सरकारच्या नजरचुकीमुळे बंदी घालण्यात आलेल्या वाद्यांच्या यादीतून ताशा हे वाद्य मात्र राहिले होते. सुरू केलेले कार्य खंडित करायचे नाही आणि धार्मिक सलोखा टिकला पाहिजे या हेतूने स्वत: गळ्यात ताशा अडकवून आप्पा त्या वर्षी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक गणपतीसमोर ताशा वाजवत होते. नंतर १९६७ साली ज्ञान प्रबोधिनी प्रशाला शाळारूपाने उदयास आली. आणि आप्पांनी प्रबोध गटाला घेऊन सुरू केलेल्या कार्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत गेला. याच मधल्या तीन वर्षांत आप्पांच्या मार्गदर्शनाने गरवारे, नूमवि आणि रमणबाग या शाळांमध्ये वाद्य आणि बर्ची पथकांची सुरुवात झाली. समाजातील सर्व गटांचा यामध्ये सहभाग असावा या हेतूने पुढे १९७५ साली महिलांचे स्वतंत्र पथक सादरीकरणासाठी रस्त्यावर उतरले. या कार्यामागचा मूळ हेतू कायम लक्षात ठेऊन पुढे ग्रामीण भागातील महिला, शाळेमधील कर्मचारी महिला आणि देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांनादेखील या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले.
फक्त गणेशोत्सव काळात लोकांनी वादनासाठी यावे एवढा संकुचित हेतू प्रबोधिनीच्या पथकाचा कधीच नव्हता. त्याचे फलित म्हणून याच गटांतर्फे गेली अनेक वर्षे दुष्काळ निवारण, बंधारे बांधणे, वडारवाडीच्या लोकांसाठी काम करणे असे स्तुत्य उपक्रम राबवले जात आहेत. उत्तरांचल, काश्मीरसारख्या गरजू भागामध्ये ज्ञानसेतूच्या माध्यमातून शालेय विज्ञान तेथील गरजू विद्यार्थापर्यंत पोहोचवले जात आहे. युवक-युवती तसेत इतर समाजाने नाकारलेल्या विविध घटकांना पौरोहित्य शिकवण्याचे धाडसी पाऊलही अनेक प्रबोधकांनी उचललेले आहे. तीन वर्षांपूर्वीचा अजून एक अनुभव सांगायचा तर वध्र्यासारख्या भागात विनादारू आणि विनागुलाल या तत्त्वाने याच प्रबोधिनीच्या पथकाने गणपती मिरवणूक यशस्वी करून दाखवली आहे.
गेली काही र्वष वाद्य पथकांमागचा मूळ हेतू विसरून त्याला वेगळेच रूप प्राप्त होत आहे. अंगातील रग उतरवून काढणे किवा ढोल बडवून आपला पुरुषार्थ दाखवून देणे एवढा संकुचित हेतू काही ठिकाणी रुजत आहे. पर्यायाने दर काही महिन्यांनी जुने मोठे गट फुटून नवीन काही पथके उदयास येत आहेत. अशा पद्धतीने उदयास येणारी पथके कुठल्याही सामाजिक दृष्टिकोनातून मिरवणुका न करता त्यामधून मिळणाऱ्या लाखो रुपयांसाठी करत आहेत. प्रत्येक चौकात, प्रत्येक इमारतीखाली त्यांचा स्वतंत्र गणपती दिसत आहे. मूळ हेतूपासून सध्या बराच समाज खूप भरकटतो आहे. म्हणूनच प्रबोधिनीचे पथक पाहिले आहे म्हणून समाजाला पुन्हा मूळ मार्गावर, मूळ हेतूवर आणण्याचे कर्तव्यही आमचेच आहे हे व्रत प्रबोधिनीच्या पथकाने आता स्वीकारले आहे. विविध पथकांचा मेळावा भरवून तिथे मातृभूमीच्या प्रतिमेचे पूजन करून ५० वर्षांच्या इतिहासाचे कथन केले जात आहे. गणेशोत्सव आणि मिरवणुका यांच्यामागचा मुख्य हेतू सर्वांपर्यंत पोचवण्याचा यामार्फत प्रयत्न केला जात आहे. मंडळांनी एकत्र यावे म्हणून १५० हून अधिक मंडळांना आणि पथकांना मेळाव्यांच्या रूपाने आवाहन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून १३ सप्टेंबर रोजी पुण्यातील सगळ्या पथकांची एकत्र स्वच्छता मोहीम घेण्यात आली होती. या प्रयत्नांनंतर वेगवेगळ्या चार मंडळांनी एकाच रथावरून विसर्जन मिरवणुकीस सहमती दर्शवली आहे. म्हणूनच प्रबोधकांचा हा उपक्रमदेखील स्तुत्यच आहे.
स्वाईन फ्लूच्या काळात प्रबोधिनीच्या पथकाने एकही मिरवणूक न करता युवक गटामार्फत समाजात त्या आजाराविषयी माहिती पोचवण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या काही वर्षांपासून पुण्यात रात्री दहानंतर मोठय़ा आवाजास बंदी आहे. प्रबोधिनीच्या प्रत्येक पथकात हे सर्व नियम काटेकोरपणे पाळलेच जातात. १५०० विद्यार्थाची जरी एकत्रित मिरवणूक असली तरी वेळेचे, रहदारीचे योग्य नियोजन होते.
विवेक खटावकर यांचे समाज प्रबोधन करणारे देखावे असोत किवा सामाजिक कार्याचा व्यापक हेतू समोर ठेऊन कार्य करणारे प्रबोधिनीचे वाद्यपथक असो हे दोन्ही उपक्रम पुण्याच्या गणेशोत्सवाच्या रूपाने देशासमोर आदर्श निर्माण करणारे आहेत. गणेशोत्सवाचा मुख्य हेतू जपत हे दोन घटक पुण्याचा सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपत आहेत, वाढवत आहेत.