lp04कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना गणेशपूजन करण्याची प्रथा आहे. याचा अर्थ अग्रपूजेचा मान गणेशाचा. सर्व दैवतांमध्ये गणरायालाच एवढे महत्त्व का आले, त्यामागची कारणे मांडण्याचा प्रयत्न-
भारतवर्षांत अनेक देवदेवतांच्या उपासना आहेत. अनेक धर्माची वेगवेगळी दैवते आहेत. हिंदू धर्मही त्याला अपवाद नाही. या धर्मात संप्रदाय असून प्रत्येक संप्रदायाची दैवते, मंदिरे व उपासनेचे प्रकार ठरलेले आहेत. सर्व धर्मामध्ये उपासना आहेच. माणसाने जेव्हा त्याच्या बुद्धी, बल, प्रयत्न यांनी एखादे कार्य सिद्ध होत नसे तेव्हा आपल्या या सर्व गुणांच्या, बुद्धीच्या, ज्ञानाच्यापेक्षाही मोठी शक्ती आहे, तिला ईश्वर, ईश्वररूप वा ईशशक्ती समजून त्यांची उपासना सुरू केली. ही उपासना सर्वसामान्यत: दोन प्रकारांत असते. १) सकाम २) निष्काम. सकाम उपासना ही विशिष्ट कार्य साध्य करण्यासाठी (आधिदैविक, आधिभौतिक या संकटावर मात); तर निष्काम उपासना ही आध्यात्मिक उन्नतीसाठी असते. उपासना कोणत्याही दैवताची असो, हिंदू धर्मात प्रथम श्रीगणेशाचे पूजन करूनच केली जाते. याचा अर्थ एकच आहे की श्रीगणेश हे दैवत अग्रपूजेचेच आहे, म्हणून प्रथम श्रीगणेश हे दैवत सर्वश्रेष्ठ आहे हे लक्षात येईल.
‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा। मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा॥’ हे समर्थ रामदासांचे काव्य वा ‘ॐनमोजी आद्या। वेदप्रतिपाद्या। जय जय स्वसंवेद्या। आत्मरूपा॥’ हे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे गणेशवंदनेतील चरण/ओवी हेच दाखविते की श्रीगणेश हे दैवतच अनादिअनंत आहे.
मुळात गणपतीचे रूप, आकार, गुण कसे होते याचा शोध घेतला तर असे लक्षात येते की, आजचे गणपतीचे जे रूप आहे, त्याला जे विविध गुणाविष्कारांनी मंडित केले आहे ते सर्व मानवाचा जसजशी बौद्धिक प्रगती होत गेली व त्याला पुढे जसजसे अनुभव येत गेले त्यातून निर्माण झाले आहे.
श्रीगणेश देवता ही निर्गुण निराकार होती. निर्गुणाचा मुळारंभ होती. सगुण साकार हे नंतरचे आविष्करण झाले. वेदांमध्ये सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद आहे. त्यात निसर्गशक्तीच्या प्रार्थना, पुढे औपनिषदिक (उपनिषदिक) ज्ञानचर्चा या चर्चेतून विश्वरहस्य उकलले. नंतर योगशास्त्रातून प्रत्यक्ष अनुभूती व साक्षात्कार अशा क्रमाने निगुर्ण निराकार सत्याचे परिपूर्ण ज्ञान जनसामान्यांपर्यंत जावे, त्याचा त्यांना लाभ व्हावा म्हणून योगी ऋषीमुनींनी प्रतीकांची निर्मिती केली. रूपककथा, कहाण्या रचल्या, पुराणे लिहिली व त्यातून दैवत प्रतीके, त्यांची पूजा, फलश्रुती सांगून प्रचार केला. हाच शुद्ध भारतीय दैवत कल्पनेचा ऐतिहासिक क्रम होय.
सर्व श्रुती, स्मृती, पुराणे अभ्यासली तर असे दिसून येते की ब्रह्मा, विष्णू, महेश, देवी, आदी अनेक देवदेवतांनी त्यांच्यावरील कठीण समस्यांप्रसंगी श्रीगणेशपूजन करून त्यांची स्तुती करून कार्ये सिद्धीस नेली आहेत, पण श्रीगणेशांनी कोणाचे स्तवन उपासना केल्याचे उदाहरण नाही म्हणजे ते दैवत सर्वश्रेष्ठ आहे हे मानावे लागेल. शिवभक्त श्रीशंकरास, वैष्णव श्रीविष्णूस, देवीभक्त देवीस प्रतीक मानतात तर गणेशभक्त गणेशास ॐकार प्रतीक मानतात. म्हणजेच ॐकार व श्रीगणेश यांचा अन्योन्यसंबंध आहे. आद्य उपाधी म्हणजे ॐकार. श्री ज्ञानेश्वर माऊलींनीही गणेशवंदनेत श्रीगणेशाचे उपनिषद प्रतिपादित शुद्ध एकरस, जगत्कारण, स्वसंवेद्य, प्राणस्वरूप असेच रूप प्रथम सांगितले आहे. कोणत्याही देवस्वरूप वर्णनाचे दोन भाग असतात- वाच्य व लक्ष्य. यातील वाच्य हा भाग अमर्यादित असतो व लक्ष्य हा भाग व्यापक, अमर्यादित व त्रिकालाबाधित असतो. उपनिषदांतून प्रथम लक्ष्य या निर्गुण निराकार श्रीगणेशाचे वर्णन केले आहे.
ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि। त्वं सच्चिदानंदोऽ द्वितीयोसि। त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि। त्वं साक्षादात्मासि नित्यम।…इ. इ. (गणपती अथर्वशीर्ष), निर्गुण, निराकार, निर्विशेष परब्रह्म स्वरूपाचे प्रतीक ॐकार, प्रणव असे श्रुती सांगते. ज्ञानेश्वरीत अध्याय १७ ओवी ४०२ सांगते की ‘ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म ते नव निर्विशिष्ट। परब्रह्म चोखट। तयाचे हे आंतुवट। व्यंजक नाम॥’ मांडुक्य उपनिषद, प्रश्नोपनिषद, मांडुक्यकारिका, गीता अध्याय १७ यातून ॐकारमाहात्म्य अनेकविध प्रकारे वर्णन केले आहे. श्रीगणपती अथर्वशीर्षांत त्वं आत्मासि व त्याच अनुरोधाने श्री ज्ञानेश्वरांनी ‘ॐ नमोजी आद्या।… आत्मरूपा॥१॥’ अशी ओवी लिहून प्रथम प्रणव निर्देश करून आद्या, आत्मरूपा, स्वसंवेद्या या विशेषणांनी त्यासवे मंडित केले आहे व त्याद्वारे ॐकार प्रथम आहे हे सांगितले जे उपनिषदांशी सयुक्तिकच ठरते.
पुढे त्यांनी ‘देवा तूंचि गणेशु। सकलार्थमतिप्रकाशु।’ असे वर्णन केले आहे. देव हा स्वयंप्रकाशीच असतो व तोच सर्वाच्या बुद्धीला प्रकाश देतो. गणेश ही बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे. हे वर्णन श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या देवविषयक व्यापक विशाल भावनेचे प्रतीक मर्यादा असलेली वस्तू ‘देव’ या संज्ञेस प्राप्त नसते. या श्रीज्ञानेश्वर माऊली लिखित गणेश वंदनेत श्रीगणेशाचे लक्ष्य स्वरूपवर्णन व नमन करून नंतर त्याच्या वाच्य स्वरूपाचे वर्णन आहे. श्रीगणेश अथर्वशीर्षांतही प्रथम ‘त्वं सच्चिदानंदाऽ द्वितीयोऽसि’ अशा वर्णनानंतरच साकार रूप वर्णन ‘एकदन्त चतुर्हस्तं पाशंअकुशधारणम्’ असे आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांनीही गणेशाचे मूर्तीरूप ‘अ कार चरणयुगुल। उ कार उदरविशाल। म कार मस्तकाकारे॥’ असे श्री गणेशवंदनेच्या १९ व्या ओवीत केले आहे, ते शब्दब्रह्म वाङ्मय म्हणजे प्रणवोत्पन्न असे गणेशमूर्त रूप. अर्थात ॐ या शब्दाचे ‘अ’, ‘उ’ व ‘म’ हे तीन स्वर असल्याने त्यांनी त्यातून हे मूर्तीरूप वर्णन केले आहे.
ॐकार हे गणेशाचे निर्गुण निर्विशेष स्वरूप प्रतीक आहे. ते मुळातच ध्वनीरूप होते व पुढे लेखनशास्त्र विकास पावल्यावर वर्णमाला निर्माण होऊन त्याचे अक्षररूप साकार झाले. आपण ॐकाराच्या लेखन पद्धतीत जर बघितले तर प्रत्येक भाषेत त्याचे अक्षररूप वेगवेगळे साकारलेले दिसेल, तरी पण उच्चार मात्र ‘अ’, ‘उ’, ‘म’ याच तीन अक्षरांचा एकत्रित केलेला ध्वनी सर्वत्र सारखाच आहे. सगुण साकार व निर्गुण निराकारात हाच फरक आहे. निर्गुण निराकार हे सदा त्रिकालाबाधित सत्य असते ते याचमुळे. या ॐकाराचे काही अक्षरप्रकार वेगवेगळ्या
लिपीतले येथे देणे योग्य ठरेल ते याचसाठी की गणेशाचे ॐ हे ध्वनीरूप निर्गुण निराकार आहे, मग सगुण साकार कसे का असेना म्हणजेच अविनाशी ब्रह्म ॐ म्हणजेच गणेश हे लक्षात येईल.
lp02म्हणजे ‘ॐ’च होतो हे लक्षात घेणे.
ॠ ग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेचा जो उल्लेख आहे तो ब्रह्मणस्पती हाच जगाचे आदीकरण मूळ निर्गुण व ब्रह्म गणपती हे प्रतीकात्मक सगुण ब्रह्म तेव्हा निर्गुण निराकार, सगुण साकार हे दोन्ही एकच आहेत- जो फरक दिसतो तो व्यावहारिक वा काल्पनिक. तेव्हा ‘ब्रह्मणस्पती सूक्त’ जे वैदिक मंत्राचे आहे व ॠ ग्वेदात आहे तेच गणपतीचे अतिप्रिय असणारच. कारण तेच प्रथम आविष्करण आहे, गणपतीच्या स्तुतीचे म्हणजे गणेशमहिम्याचे म्हणजे वेदकाळातही गणेश उपासना होती तर गणेश दैवत त्याही आधीचे असणारच. किती आधी हा प्रश्नच येत नाही. कारण ध्वनीरूप ॐहे गणेशाचे निर्गुण निराकार रूपच आद्य, त्यास आदी नाही अंतही नाही. हे गणेशाचे अधिष्ठान सर्व देवांच्याही आधीचे म्हणजे ज्येष्ठ होय तेव्हा ज्येष्ठराज या संज्ञेस प्राप्त श्रीगणेश हेच सर्वप्रथम पूजनीय. कारण तेच मूळ स्रोत. श्रीगणपती अथर्वशीर्ष हे तर गाणपत्य संप्रदायाची अंतिम चरण सीमा व मानवतेची असीम मान्यरेखा होय. शीर्ष याचा अर्थ श्रेष्ठ. अथर्वण ऋषींनी शब्दरूप दिलेले व सर्व सूक्तांमध्ये श्रेष्ठत्तम ठरलेले म्हणजेच अथर्वशीर्ष. अथर्व यात थर्व हा जो धातू आहे त्याचा अर्थ मनाची गती हा होय. मनाच्या पलीकडे गेले तरच मनाची गती थांबेल. ‘अ’ म्हणजे नाही. म्हणजे ज्याची गती थांबली तो अथर्व, पण ही शरीराची गती नसून मनाची आहे व असंप्रज्ञात समाधीशिवाय मनापलीकडे जाता येत नाही. तेव्हा मनापलीकडे जाऊन मनाचे संपूर्ण उन्मनीकरण झाल्यानंतर विशुद्ध आत्मस्फुरणातून प्रकट झालेले हे सूक्त हे परमात्म्याएवढेच व्यापक, सर्वश्रेष्ठ व शाश्वत ठरते म्हणूनच हे सूक्त अजरामर झाले. हे अथर्वशीर्ष म्हणजे तत्त्वज्ञान व अध्यात्म असलेलेच नव्हे तर ते राष्ट्रीय, सांस्कृतिक व वैचारिक आहे. राष्ट्रीय एकात्मता/तत्त्वज्ञान/अध्यात्माची गंगा, उपासनेची यमुना व ज्ञानाची सरस्वती असा त्रिवेणी संगम आहे यात. गणपतीस या अथर्वशीर्षांत ‘‘त्वमेव् केवलं कर्तासि। त्वमेव् केवलं हर्तासि। त्वं साक्षात आत्मासि नित्यम्।, त्वमेव केवलं तत्त्वमसि।, त्वमेव केवलं खल्विदं ब्रह्मासि।, त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मय:।, त्वमानंदमय त्वं ब्रह्ममया।, त्वं सच्चिदानंदाद्वितीयोसि।, त्वं ज्ञानमयोविज्ञान मयोऽ सि.।, र्सव जगदिदंतत्त्वोजायते।, इ. इ. जे वर्णन आले आहे ते गणेशाचे मूळ स्वरूप व तोच सर्वाचा उत्पत्तीकारक आहे हे दर्शविते.
तेव्हा गणपती उपासना ही मूळची वैदिकच आहे. पुराणोक्त नाही. पुराणांनी त्यात पदरची भर घातली एवढेच. वेदांनी गणपतीचे श्रेष्ठत्व मानले आहे. ‘न ॠ ते त्वक्रियते किं च नारे’ म्हणजे तुझ्यावाचून आम्ही काहीही करू शकत नाही. म्हणूनच देवादिकांनीसुद्धा कार्यारंभी गणेशपूजन केलेले आहे. कार्य मग ते कोणतेही असो- पारमार्थिक असो वा व्यावहारिक त्याचे निर्विघ्नपणे फळ मिळावे, त्यात निर्विघ्नपणे यश मिळावे म्हणून गणपतीपूजन केले जाते. कारण तो जसा विघ्नहर्ता आहे तसाच विघ्नकर्ताही आहे. दुष्टांचे हेतू सफल न होण्यासाठी तो विघ्न निर्माण करून त्यांचे दुष्ट मनोरथ तोच धुळीस मिळवतो तर सज्जनांचे कार्य सफल होण्यासाठी तो विघ्ने येऊच देत नाही म्हणजेच त्याच्यापाशी या दोन्ही शक्ती आहेत ज्या इतर दैवतांमध्ये नाहीत, त्यामुळे त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.
गणपती अथर्वशीर्षांत ‘त्वं मूलाधारस्थितोऽ सि नित्यम्।’ हा उल्लेख फार महत्त्वाचा आहे. मानवी देहात जी षट्चक्रे आहेत त्यातील मूलाधारचक्रात गणेश ही नित्य स्थित देवता आहे. या मूलाधारावरच सर्व सजीव-निर्जीव पदार्थ आपला गुरुत्वमध्य पकडतात वा तो तेथे असतो त्यामुळेच ते स्थिर राहू शकतात. हा पाया आहे. तेव्हा त्याचा आधार महत्त्वाचाच नव्हे तर अत्यावश्यक. सर्व सजीव-निर्जीवांचा समतोल राखणारी ही एकमेव शक्ती आहे व तिलाच गणपती म्हणतात. तेव्हा विश्वाची मूलाधारशक्ती गणपतीच आहे. म्हणूनच ती सर्वश्रेष्ठ. मूलापासूनच सर्व डोलारा उभा राहतो, हे आपण वृक्षाचे उदाहरण घेतले तर सहज लक्षात येईल. तोच अर्थ अधिक व्यापक स्वरूपात येथे आहे. अथर्वशीर्षांत गणेशमूर्ती संकल्पना ॐ स्वरूपच आहे. त्यात गणेशाचा एकाक्षर मंत्र आहे, जो सर्व सारस्वत नद्यांचे जणू उगमस्थानच आहे. ‘‘ॐ गं’’ हा तो मंत्र. याचे मंत्र- सामथ्र्य अनाकलनीय, अतुल्य व कल्पनातीत वेगाचे असते.
गणपतीचे खरे रूप ॐकार. बाकीची सर्व काल्पनिक वा पुराणोक्त. तेव्हा ॐ कार ध्वनीरूप, वेदांच्याही आधीचा म्हणूनच गणपती आद्य, ज्येष्ठतम व प्रथमपूजनीय सर्वश्रेष्ठ. श्रुतीमध्ये ॐकार रूप हेच गणेशरूप वैज्ञानिक आहे असे सांगितले आहे. ती श्रुती अशी आहे- ‘ततश्चोमितिध्वनिरभूत। सवै गजाकार:। अनिर्वचनीया सैव माया। जगद्वीजमित्याह सैब प्रकृतिरिति गणेश इति प्रधानमितिच मायाशबलमिनिच।’ व हे ध्वनीरूप एकाक्षर मंत्रजपाने साक्षात्कार देऊ शकते.
शिवपुराणात जी कथा आहे ती येथे संक्षेपाने देत आहे. ती श्रीगणेश जो ॐकार रूप आहे तोच सर्वश्रेष्ठ आहे याच्या पुष्टय़र्थ. सर्वसामान्यपणे जी कथा जनमानसात रूढ आहे ती सांगते की पार्वतीने उटण्याची सजीव मूर्ती बनवली. तिला द्वारपाल नेमून कोणासही आत न सोडण्याची आज्ञा देवून ती स्नानास गेली. त्या गणाने प्रत्यक्ष शंकरासच मज्जाव केल्याने त्यांनी त्याचा मस्तकछेद केला व हे वृत्त कळल्यावर पार्वतीने आकांत मांडून त्रिभुवन भस्म करण्याचा निर्धार केला व्यक्त, तेव्हा श्रीविष्णूंनी गजवदन सुदर्शनाने छेदून/छाटून आणून त्या धडास लावले व शंकराने ते शरीर जिवंत केले म्हणून तो गजमुख झाला व शिवपुत्र असे त्यास म्हणू लागले. पण खरी कथा शिवपुराणात वेगळीच आहे. गजवदन लावूनही तो द्वारपाल जिवंत होईना म्हणून शंकर, विष्णू चिंतित झाले. सूर्याने आत्मशक्ती प्रकट केली, चंद्राने अमृत अर्पिले, lp03मुनींनी अन्नप्राणादींची शक्ती दिली, शंकरांनी सर्व विद्या कला खर्ची घातल्या, सर्व मंत्रशास्त्र सोहळा केला, पण सर्व व्यर्थ. तेव्हा देवांनी दीनवाणे होऊन ब्रह्माचे स्तवन केले. तेव्हा अकस्मात आकाशवाणी झाली ‘ॐकारास आवाहन करा’ त्याप्रमाणे ॐकाराचे आवाहन करताच तो बाळ जिवंत झाला. ही मूळ कथा आहे- रजोरूपी ब्रह्मा, सात्त्विक व रमारमण विष्णू आणि उग्र तमरूपी शंकर. पंचम नावाचे जे शुद्ध तत्त्व आहे तेच विनायकाचे स्वरूप असे ब्रह्मवैवर्त पुराण सांगते. स्मृतीचे वचन स्पष्ट आहे ‘जेथे ॐकार आकृती धारणा तोच गजानन जाणा’ वेदांची माता गायत्री, त्यांचा पिता प्रणव तोच हा तत्त्वमसि सगुणरूपी साकार गजानन. ऋषींच्याच्याही मते सर्वात मुख्य व श्रेष्ठ ॐकार. त्याहून/त्याच्यापेक्षा अन्य कोणी मोठे नाही. तोच हा श्रीगणेश सर्वश्रेष्ठ. त्यामुळे या अग्रपूजिताची उपासना, प्रार्थना केल्यानंतरच आणि तीही श्रद्धा भक्तीने, तरच कोणतीही गोष्ट/कार्य सिद्ध होते अन्यथा नाही. इतर कोणत्याही दैवताची कामनासिद्धय़र्थ केलेली उपासना गणेशपूजन केल्याशिवाय फळ देणार नाहीच हे लक्षात ठेवावे. अशा या श्रीगणेशाचा लोक ‘स्वानंदलोक’ म्हणून ओळखला जातो. महालयामध्ये त्रिगुणमय शिवादी लोक पूर्ण लय पावले तरी ‘स्वानंदलोक’ एकटाच उरतो कारण त्याची देवता श्रीगणेश ॐकार रूपी अक्षय व सर्वकारक आहे. श्रीगणेशाचा नाममहिमा अपार आहे. त्याच्या नामात सविकार व निर्विकार गणांचे अधिष्ठान व स्वामित्व आहे. तो पाता व पालयिता ब्रह्मणस्पती आहे. या नामात बुद्धी स्थिर व निश्चल होते. त्याचा महिमा असीम आहे. कारण श्रीगणेश ॐकाररूपी असीम आहे. संन्यास घेतल्यावर गायत्री मंत्र त्यागला जातो पण ॐ कार जपच चालू ठेवतात कारण त्याने स्वानंदपणाचा अनुभव येतो म्हणून ॐ कार जप सर्वात आद्य व त्याची देवता श्रीगणेश आद्य व सर्वश्रेष्ठ. गायत्रीत परोक्ष सत्ता असली तरी अपरोक्ष सत्ता ॐकोरातच असते त्यामुळेच मंत्रसिद्धी होते व त्याच्या या सामर्थ्यांमुळेच प्रत्येक मंत्र ॐने सुरू होतो. श्री गणेशपूजनाशिवाय कोणतीही देवता प्रसन्न होत नाही व ॐकार लावल्याशिवाय कोणताही मंत्र व्यर्थ जातो. गणेशगीतेत तर स्पष्ट सांगितले आहे की गणेशनाम जर अंत:काळी स्मरले तर पुनर्जन्म नाही. जन्ममरणफेरा चुकविला जातो.
ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य व शक्ती या पंचदेवता प्रमुख असून इतर देवदेवता हे त्यांचेच अंशावतार आहेत, पण या पाच प्रमुख देवता श्रीगणेशापासूनच उत्पन्न झाल्या आहेत असे श्रीमद् गणेशगीतेत वचन आहे. प्रत्यक्ष श्रीगणेशांनीच त्यांचा शिष्य राजवरेण्य यास श्रीगणेशगीता श्रीक्षेत्र राजूर येथे प्रतिपादली त्यात ते सांगतात की, ‘‘मत्त एव महाबाहो जाता विष्ण्वाद्य सुरा:। मय्यैव च लयं यान्ति प्रलयेषु युगे युगे॥ (अध्याय ३-७.) म्हणजे विष्णु आदि युगायुगातील देव मजपासूनच उत्पन्न होतात व होणाऱ्या प्रलयात ते माझ्यातच लय पावतात. पुढे अध्याय ९-१९ मध्ये ‘‘इन्द्राद्या लोकपालश्च मनैवांऽश समुदभव:॥’’ म्हणजे इन्द्रादी लोकपालही माझीच उत्पत्ती आहे. माझ्याच अंशापासून ते निर्माण झाले आहेत.
‘‘मत्तोऽग्निरापो धरणी मत्त आकाशमारुती। ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च लोकपाल दिशो दश.’’ म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभुते व ब्रह्मा, विष्णू, महेश, अष्ट लोकपाल व दश दिशाही माझ्याचपासून उत्पन्न झाल्या आहेत.
‘‘मयुरायानाथ: त्वमसिच मयुरेश भगवान।
अतत्सां संध्यायै शिव हरिखी ब्रह्म जनकम॥’’
म्हणजे शिव, विष्णू व ब्रह्मदेव यांचा जनक मयुरेश हाच आहे. ब्रह्मपुराणात विष्णू शिवास सांगतात की, ‘‘तूं-मी जरी स्वयंभू असलो तरी आपण दोघेही श्रीगणेशापासून उत्पन्न झालो आहोत, म्हणून त्याचे पुत्र आहोत.’’ तो श्लोक असा :-
‘‘अहं त्वं च स्वयंभूश्च हिरण्य पुरुष शिवा गणनाथत्समुत्पन्ना गणेशतनया वरा:।’’
गणेश आद्य आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांचे पूजन करतात. तेच सृष्टीचा हेतू व सर्व कारणांचे कारण आहेत. त्याचेच योजनेप्रमाणे व आज्ञेने ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, विष्णू पालन करतो व शंकर संहार करतो. व सूर्य गगनात संचार करतो. म्हणजेच सर्वकारक श्रीगणेशच आहेत. इतर देवदेवतांची उपासना करून भक्त त्या त्या लोकी गेले तरी त्यांना परत यावे लागते. कारण ते लोक मोक्षस्थान नव्हेत. पण गणेशभक्तांना जो गणपतीचा ‘‘स्वानंद लोक’’ मिळतो, तो मोक्षलोक त्यापासून ते परत येत नाहीत. श्रीमद् गणेशगीतेत अध्याय ६-१९ मध्ये यासंबंधी खालील श्लोक आहे :-
‘‘ब्रह्माविष्णुमहेन्द्राधरेल्लोकान्प्राप्त पुन:पतेत।
यो मामुपैत्यसन्दिग्धं पतनं तस्य क्वचित॥’’
वरील सर्व विवेचनावरून हे स्पष्ट होते की श्रीगणेश स्वयंभू आदिअंत नसलेले मूळ दैवत आहे. तेच अक्षय अविनाशी ॐकार रूप आहे. तेच सर्व जगाचे, देवांचे, ज्ञानांचे व इतर सर्व गोष्टींचे कारक आहेत, पालक आहेत, तारक आहेत व लयकर्ते आहेत. या सर्वाचा प्रारंभ गणेशापासून व लय गणेशातच होतो, म्हणूनच श्रीगणेश हे स्वयंभू सर्वश्रेष्ठ आहेत.
श्रीगणेश उपासना सर्वश्रेष्ठ का? याचे कारण गणेश हेच सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची उपासना ही सर्वश्रेष्ठत्वाची उपासना आहे, म्हणूनच ती सर्वश्रेष्ठ आहे.
निगुर्ण, निराकार, सगुण साकार, सर्व जगनिर्माता, सर्व देवनिर्माता, सर्व शास्त्रांचा निर्माता, सर्वजगचालक, सर्वजगलयकर्ता, सर्वापेक्षा वेगळा व श्रेष्ठतम असा देव म्हणजेच गणेश. वेदांनाही अगोचर महायोग्यांनाही थांग न लागणारा, स्वयंभू ॐकार प्रणवरूप श्रीगणेशच मूलकारक म्हणूनच श्रेष्ठतम त्याहून कोण मोठे, शक्ती, ज्ञान याचे कारक नाहीतच. आदीबीज म्हणजेच गणेश.
श्रीगणेश उपासना करण्याचे विविध प्रकार आहेत. नामस्मरण हीसुद्धा पूजाच आहे. नवविधा भक्ती प्रकारातील हा सर्वात सोपा, कसलेही बंधन नसलेला. कोणासही करता येणारा सोपा मार्ग आहे. त्याशिवाय षोडशोपचार पूजा, यंत्रपूजा इ.इ. अनेक प्रकार आहेत. जसे ज्याला जमेल तो प्रकार त्याने अवलंबावा. यज्ञ, याग, सत्यविनायक पूजा, व्रत, वैकल्ये, मंत्रजप इ. इ.
उपासना ही अशी गोष्ट आहे की, जी मानवास ऐहिक, पारमार्थिक, लौकिक, बौद्धिक, शारीरिक,आंतरिक सुख व आनंद देते. ही दिवस-रात्रीतील संकटांना मुक्त करण्याची दिव्य किल्ली आहे व ती जसजशी वृद्धिंगत होईल तसतसे परमेश्वरसान्निध्य अनुभवता येईल.
‘‘आदरेण यथा स्तौति धनवन्तं धनेच्छया।
तथा स्तुवीत विघ्नेश सर्वन्कामाम् आवान्पुयात॥’’
ज्याप्रमाणे द्रव्य लाभ इच्छेने धनवानाची माणूस स्तुती करतो, त्याचप्रमाणे जो परमेश्वराची स्तुती करील त्याचे मनोरथ श्रीगणेश निर्विघ्नपणे पूर्ण करतो.
नूरपूर गणेश (या लेखातील सर्व छायाचित्रे- सौजन्य- विकिमीडिया)
आचार्य वसंत गोडबोले – response.lokprabha@expressindia.com

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

wardha, Akhil Bharatiya Andhashraddha Nirmulan Samiti, Cremation Holikotsav, Remove Superstitions, Associated with Graveyard, terav movie, Harish Ithape,
आज पौर्णिमेस स्मशानभूमीत ‘तेरवं, काय आहे प्रकार जाणून घ्या