News Flash

रत्नजडित मूर्ती

गिरगावातील जुन्या-जाणत्या मूर्तिकारांपैकी एक महत्त्वाचे नाव आहे, प्रफुल्ल बिलये.

प्रफुल्ल बिलये यांच्या कारखान्यातील आगळ्यावेगळ्या रंगांच्या, रत्नजडित मूर्ती नजर खिळवून ठेवतात.

गणेश विशेष
विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

गिरगावातील जुन्या-जाणत्या मूर्तिकारांपैकी एक महत्त्वाचे नाव आहे, प्रफुल्ल बिलये. त्यांच्या कारखान्यात आगळ्यावेगळ्या रंगांच्या, रत्नजडित मूर्ती नजर खिळवून ठेवतात. सातव्या वर्षांपासून मूर्तीकलेची आराधना करणारे बिलये आज ७३व्या वर्षीही मूर्तीच्या गर्दीत मग्न झालेले दिसतात.

गिरगावातील जितेकरवाडी गेल्यावर वैशिष्टय़पूर्ण रंगांत रंगलेल्या आणि हिऱ्यांचे नेत्रदीपक नक्षीकाम केलेल्या मूर्तीच्या गर्दीत आपण हरवून जातो. कारागीर कामात गढून गेलेले दिसतात आणि प्रफुल्ल बिलयेंची पारखी नजर मूर्तीवर, कारागिरांवर फिरत असते. आजोबांचा वसा पुढे नेणाऱ्या बिलयेंनी आता  कारखान्याची धुरा कन्या निकिता पडवळकडे सोपवली आहे. एरव्ही घरोघरी प्राणप्रतिष्ठा केले जाणारे गणपती गोरेच दिसतात, पण बिलयेंच्या कारखान्यात मात्र गोऱ्या गणपतींबरोबरच काळा, निळा, मातकट, करडा अशा रंगांतील गणपतीही दिमाखात विराजमान झालेले दिसतात. एकाच रंगाच्या विविध छटांमध्ये रंगवलेले हे गणपती नजर खिळवून ठेवतात. येथील जवळपास प्रत्येक गणपती अनेक हिरेजडित दागिन्यांनी सजलेला दिसतो. काही मूर्तीचा पृष्ठभाग तर पूर्णपणे हिऱ्यांचाच असतो. एकही खाचखळगा नसलेला पृष्ठभाग, त्यावर अतिशय सफाईदार रंगकाम, शांत, प्रसन्न चेहरा आणि झळाळते अलंकार ही तेथील मूर्तीची वैशिष्टय़े!

एवढय़ा सफाईदार कामाविषयी बिलयेंना विचारले असता ते सांगतात, ‘आम्ही कामात कधीही घाई, तडजोड करत नाही. त्यासाठी दिवाळीच्या सुमारास नवीन ऑर्डर घेण्यास सुरुवात केली जाते. आम्ही फक्त २८० मूर्तीच तयार करतो. एवढी वर्षे हेच काम केल्यामुळे आणि सतत प्रयोग करत राहिल्यामुळे आमच्याकडे आता तब्बल ४५० साचे तयार आहेत. दरवर्षी त्यापैकी २०-२२ डिझाइन्स आम्ही उपलब्ध करतो. त्यापैकी ग्राहकांनी निवडलेली मूर्ती जशीच्या तशी तयार व्हायलाच हवी, असा माझा आग्रह असतो. त्यासाठी कारागीर घडवणे हे मोठे कौशल्याचे काम आहे. सोने गाळावे त्याप्रमाणे निवडलेले सर्वोत्तम कारागीर आमच्या कारखान्यात आहेत,’ असे बिलये अभिमानाने सांगतात.

बिलयेंकडचे एक कारागीर- रमेश राजपूत तर असे आहेत, जे पूर्वी केटररकडे काम करत आणि बिलयेंकडे मूर्तीचा पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी तो घासण्याचे काम करण्यापुरते काही दिवस येत. त्यांनी विचारले, ‘मी गणपतीचा साचा तयार करून पाहू का?’ बिलयेंनी त्यांना मूर्तीकाम करण्याची संधी दिली आणि त्यांनी त्याचे सोने केले. आज ३०-३२ वर्षे झाली तरी तो बिलयेंकडेच काम करत आहे.

बिलयेंच्या कारखान्यातील बहुतेक गणेशमूर्ती शाडूच्या मातीच्या आहेत. त्याबद्दल बिलये सांगतात, ‘शाडूची एक मूर्ती तयार करण्यासाठी चार-चार दिवस लागतात. कारागिरांना मी ‘लवकर काम करा,’ असे कधीच म्हणत नाही. कारण त्यामुळे दर्जा ढासळेल. आमच्या कारखान्यात येणारे ग्राहक किमतीवरून कधीही घासाघीस करत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना १०० टक्के उत्तम मूर्ती देणे ही आमची जबाबदारी असते. अनेक वर्षांपासून याच कारखान्यात काम करणारे कसबी कारागीर आहेत. पण नव्या पिढीकडे ती एकाग्रता नाही. मोबाइल फोन, समाजमाध्यमांमुळे त्यांचे लक्ष सहज विचलित होते.’

या क्षेत्रासाठी कोणताही अभ्यासक्रम नाही. आर्टशी संबंधित शिक्षण घेतलेले विद्यार्थी या क्षेत्रात येतात. एखादी उत्तम कलाकृती तयारही करतात, मात्र त्यांच्या कल्पना सर्वसामान्यांना कळतातच असे नाही. त्यामुळे यात प्रत्यक्ष कारखान्यात काम करण्याशिवाय पर्याय नसतो. शिवाय कलेचा अभ्यास करून इथे येणाऱ्यांच्या कामाविषयीच्या अपेक्षा फारच मोठय़ा असतात. त्यामुळे त्यांना इथे टिकून राहणे कठीण जाते, असे निरीक्षण बिलये नोंदवतात.

प्रफुल्ल बिलयेंचे वडील पोलीस अधिकारी होत. आजोबांचा गिरगावात गणपतीचा कारखाना होता. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांच्या नकळत त्यांनी मूर्तिकलेचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. आजोबांच्या कारखान्यात सगळीकडे गणपतीच गणपती असत. त्यामुळे आजोबा नेमके कोणत्या गणपतीविषयी बोलत आहेत, हे समजावे म्हणून त्यांनी गणपतींना वेगवेगळी नावे दिली होती. खुंटीच्या वरच्या फळ्यांवरील गणपतींना आजोबा खुंटीवरील मुकुटाचा गणपती असे म्हणत. एका प्रकारच्या मूर्तीला बैठकीच्या मागच्या बाजूला वीट असे, तिला विटेवरील मुकुटाचा असे नाव दिले होते. कमळाच्या आसनावरील गणपतीला कमळावरील मुकुटाचा गणपती म्हणत, अशी आठवण बिलये सांगतात. आजोबांच्या मार्गदर्शनाखाली ते घडत गेले, कला आत्मसात करत राहिले.

पुढे याच व्यवसायात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी पायलट होण्याची चालून आलेली संधी त्यांनी धुडकावली. त्यांच्या या निर्णयाला वडिलांचा ठाम विरोध होता; पण अगदी सुरुवातीच्याच काळात एका वर्षी १२-१३ वृत्तपत्रांत त्यांनी साकारलेल्या मूर्तीविषयीच्या बातम्या, लेख प्रसिद्ध झाले आणि वडिलांचा विरोध मावळला. मूर्तिकलेचे क्षेत्र त्यांच्यापुढे खुले झाले. १९६१ मध्ये आजोबांचे निधन झाले. त्यानंतर बिलयेंच्या मावसभावाने एक वर्ष कारखाना चालवला. आजोबांच्या दोन मुली होत्या. दोघींनी एका वर्षांआड ही जबाबदारी घ्यावी, असे ठरले होते; पण मावसभावाला फार आवड नसल्याने हे काम बिलयेंकडेच आले आणि आजवर ते हे काम समरसून करत आहेत.

आजोबांच्या काळात साधारण पाच हजार मूर्ती साकारल्या जात; पण त्या सर्व छोटय़ा आकारांतील होत्या. त्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी फार मोठय़ा मूर्ती तयार करण्याची पद्धत रुळली नव्हती. लालबाग परिसरातच एखाददोन मंडळे मोठी मूर्ती आणत. तीसुद्धा फार तर सात-आठ फूट असे. बिलयेंनी कारखान्याची जबाबदारी स्वीकारली त्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवासाठी वैविध्यपूर्ण आणि उंच मूर्ती साकारण्यास सुरुवात झाली. या मूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरले जाऊ लागले. मातीच्या एवढय़ा मोठय़ा मूर्ती साकारणे हे कौशल्याचे काम होते. १२ फुटांपर्यंतच्या मातीच्या मूर्ती साकारल्याचे बिलये सांगतात. ‘‘त्या काळात वर्षांनुवर्षांपासून जोडलेले विश्वास ठेवणारे ग्राहक होते. मातीच्या मोठय़ा मूर्ती केवळ ट्रॉलीवरच तयार केल्या जात. त्या उचलणे शक्य नसे. एक तर त्यांचे वजन अधिक असे आणि उचलल्यास मूर्ती भंग पावण्याची भीती असे. शाडूच्या मोठय़ा मूर्ती साकारणे हे धाडसच होते. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये ही समस्या नव्हती. फुलगल्लीच्या नाक्यावरील गणेशोत्सव मंडळासाठी जिवंत घोडय़ांएवढे मोठे सात घोडे लावलेल्या रथात बसलेल्या गणपतीची मूर्ती साकारली होती. ती प्लास्टर ऑफ पॅरिसची होती, मात्र तरीही घोडय़ाचा पाय तुटला तर काय याची भीती होतीच. १२-१३ दिवस काम करून मातीचे घोडे आणि रथ तयार केला. नेवाळकर नावाचे कारागीर होते, त्यांनी साचा तयार करून दिला. ३०-३२ वर्षांपूर्वीच्या त्या काळात त्या भव्य मूर्तीची किंमत साधारण १२-१३ हजार रुपये होती. आज तीच मूर्ती अडीच-तीन लाखांना विकली गेली असती. त्या मूर्तीने मला खूप प्रसिद्धी मिळवून दिली,’’ अशी आठवण बिलये सांगतात. पूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनेक मूर्ती ते साकारत. जितेकरवाडीच्या आवारात मोठाले मंडप घालून काम केले जाई. आता मोठय़ा मूर्तीचे काम त्यांनी बंद केले आहे. पूर्वी ७०० मूर्ती तयार करणारे बिलये आता फक्त २८० मूर्तीचेच काम घेतात. व्यवसायाची धुरा आणि कलेचा वारसा त्यांनी पुढच्या पिढीच्या हाती सोपवला आहे. वाढते वय आणि आरोग्याच्या तक्रारींमुळे कुटुंबीय आता काम करू देत नाहीत; पण कारखान्याला, कलेला एवढी र्वष दिल्यानंतर आता तिथून बाहेर पडणे त्यांना शक्य नसल्याचे स्पष्ट जाणवते. कारागीर घडवण्याचे त्यांचे काम आजही सुरूच असल्याचे दिसते. वाडीत राहणाऱ्या लहान मुलांना या कामाविषयी उत्सुकता असते. अशी मुले त्यांच्या कारखान्यात येऊन उंदीर रंगवतात. ज्या हक्काने आपण आजोबांकडे मूर्ती रंगवण्याचा हट्ट करत होतो, त्याच हक्काने आपली नात आज रंगकामाचा हट्ट करत असल्याचे बिलये कौतुकाने सांगतात. एक चक्र पूर्ण झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते.
(छायाचित्रे : गणेश शिर्सेकर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:03 am

Web Title: ganeshutsav special issue 2019 diamond studded ganesha artist prafulla bilaye
Next Stories
1 सजल्या बाजारपेठा
2 घाटमाथ्यावरच्या हवामान इशाऱ्याकडे दुर्लक्ष महापुराचे महाकारण
3 अनियंत्रित विकासाचा पूर
Just Now!
X