News Flash

सजल्या बाजारपेठा

गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने ओसंडून वाहत आहेत.

गणपती बाप्पाला सजविण्यात कोणतीही कसर राहू द्यायची नाही, या ग्राहकांच्या इच्छापूर्तीसाठी बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत.

गणेश विशेष
अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने ओसंडून वाहत आहेत. गडकिल्ल्यांचे आणि वनराईचे मखर हे यावेळचे वेगळेपण आहे. गणपतीच्या दागिन्यांमध्ये ‘हिऱ्यांची माळ’ नव्याने दाखल झालेली आहे. नवी आकर्षक मखरे तसेच दागिने घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.

गणपती बाप्पाला सजविण्यात कोणतीही कसर राहू द्यायची नाही, या ग्राहकांच्या इच्छापूर्तीसाठी बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत. विविध प्रकारची मखरे, सोन्या-चांदीचे दागिने, चिनी बनावटीचे प्रकाशदिवे, फुलापानांचे हार अशा किती तरी वस्तूंनी बाजारपेठा नटलेल्या दिसत आहेत. मागील वर्षी शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे बाजारपेठांमधून थर्माकोलची मखरे हद्दपार झाली. त्यांना पर्याय म्हणून विविध दुकानांमध्ये प्लायवूड, लाकूड, फोम, चटई, सनबोर्ड, पडदे, कागद, पुठ्ठे अशा साहित्यापासून तयार केलेली मखरे पाहायला मिळत आहेत. मखरांबद्दल अधिक माहिती सांगताना ‘उत्सवी मखर आर्टस्’चे श्याम शेंडकर म्हणतात की, मागील वर्षी शासनाने घेतलेल्या प्लास्टिक तसेच थर्माकोलबंदीच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांचा पर्यावरणस्नेही साहित्यापासून तयार केलेल्या मखरांची खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. यंदा उत्सवी आर्टस्ने कागदापासून तयार केलेली गडकिल्ल्यांची मखरे बाजारात आणली आहेत. समाजामध्ये गडकिल्ल्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, लहान मुलांना त्याविषयी माहिती मिळावी आणि  दिवाळीमध्ये लहानग्यांना किल्ल्यासाठी वापरता यावीत हा या मखरांमागचा उद्देश आहे. या मखरांमध्ये कागदी तटबंदी, वेगवेगळ्या गडकिल्ल्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कॉपर टेंपल, थ्रीडी गणेश महल, सिद्धिविनायक मखर, नवरंग मखर, कोकण मखर, सूर्य मखर, जयपूर तीन जाळी सेट, डायमंड मखर, वनराई, राजसिंहासन, महल सेंटर, सुवर्ण मखर, झुला, जयपूर १६ जाळी, फ्लोरासन आदी प्रकारची मखरे उपलब्ध आहेत. ३५० रुपयांपासून अगदी सव्वालाखापर्यंत या मखरांच्या किमती आहेत. ही मखरे फोल्ड करून घेऊन जाणे सोपे असल्यामुळे ग्राहक कागदी मखरे पसंत करत आहेत. सध्या झुला, वनराई आणि जयपूर तीन जाळी ही मखरे विकत घेणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण अधिक आहे.

कागदी मखरांबरोबर बाजारात वेगवेगळ्या लाकडांपासून आणि पुठ्ठय़ांपासून तयार केलेली मखरेदेखील पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या रंगांनी सजविलेल्या या मखरांची खरेदी करायला ग्राहकांची गर्दी होत आहे. हरदेव आर्ट्सच्या रूणा दबडे म्हणतात की, पर्यावरणाबद्दल पुरेशी जागृती झालेली असल्यामुळे ग्राहक स्वत: पर्यावरणपूरक मखरांची मागणी करत आहेत. त्यामुळे प्लायवूड, फोम, स्पंज, चटई, सनबोर्ड, पडदे आणि लाकूड यांच्यापासून तयार केलेली मखरे विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये मोर मखर, झुला मखर आणि फ्लोरासन मखर जास्त प्रमाणात विकले जात आहे. यंदा मोठी, पसरट तसेच विविध रंगांची मखरे आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून आहे. प्लास्टिकच्या पाइपचा वापर करत पडद्यांचा मांडव तयार करून वेगळ्या प्रकारचे मखर आणण्यात आले आहे. त्याची किंमत अडीच हजारांपर्यंत आहे. या मखराला लोकांची मागणी जास्त आहे. कारण याचे साहित्य उत्सवानंतरही वापरता येते. निसर्गचित्रांनी रंगविलेल्या, काचेच्या तुकडय़ांनी सजविलेल्या तसेच चिनी बनावटीच्या फुलांनी तयार केलेल्या मखरांनाही मागणी आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचा फटका यंदाच्या गणेशोत्सवाच्या बाजारपेठेलाही बसला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्य़ांतील तरुण रोजगारासाठी आणि नोकरीनिमित्ताने मुंबईत आलेले असतात. यातील अनेक तरुण गावाकडील सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते असतात. गावाकडील गणपती आकर्षक व्हावा, यासाठी हे तरुण गणपतीच्या सजावटीचे साहित्य घेण्यासाठी लालबाग, दादर अशा बाजारपेठांमध्ये मोठय़ा संख्येने गर्दी करतात. मात्र, यावर्षी आलेल्या महापुरामुळे ग्राहकांची गर्दी कमी दिसत असल्याची खंत अनेक दुकानदार व्यक्त करत आहेत. याबद्दल अधिक बोलताना पडद्यांचे होलसेल व्यापारी अंकुश जैन म्हणतात की, आमच्याकडे विविध रंगांचे पडदे, झुंबर आणि मंडप होलसेल दरात विकले जातात. सातारा, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ, गडचिरोली येथून स्थानिक दुकानदारांकडून आणि सार्वजनिक मंडळांकडून लाखो रुपयांच्या पडद्यांची मागणी करण्यात आलेली होती. मात्र, नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे या मागण्या रद्द करण्यात आल्या. परिणामी, लाखो रुपयांचा माल तसाच पडून राहिला आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून सध्या धूम टिकली, चेक्स, लायकरी, मोरपंखी, भगवा, गुलाबी रंगांच्या पडद्यांना थोडय़ाफार प्रमाणात मागणी आहे. निशांत राणे सांगतात की, माझे लालबागमध्ये सजावटींच्या साहित्याचे दुकान आहे. गणेश चतुर्थीच्या १५-२० दिवस आधी ग्राहकांची बाजारात तुफान गर्दी होते. मात्र, यंदा अगदी जवळ गणेश चतुर्थी आली तरीही बाजारात गर्दी म्हणावी अशी झालेली नाही. दरवर्षीचा अनुभव गाठीशी असणाऱ्या व्यापाऱ्यांनी दुकानात भरगच्च माल भरलेला होता. मुंबईहून गावाकडे गणेशाचे साहित्य घेऊन जाणारा ग्राहकवर्ग कमी झाला. कारण हा ग्राहकवर्ग पश्चिम महाराष्ट्रातील अधिक होता. सध्या महापुरातून सावरणे, हेच त्यांच्यापुढे मोठे आव्हान असल्यामुळे त्यांनी गणेशोत्सवासाठीच्या सजावटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महापुराचा फटका गणेशोत्सवाशी संबंधित बाजारपेठेला बसण्याची शक्यता आहे.

सध्या बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत नसली तरी शेवटच्या दिवशी ती वाढेल या आशेने गणेशमूर्तीच्या दागिन्यांनी दुकाने गच्च भरलेली आहेत. यामध्ये बाजूबंद, कंबरपट्टा, मुकुट, सोंडपट्टी, तोडे, भिकबाळी, उंदीर, त्रिशूळ, परशू, जास्वंदाची कंठी, सोन्याच्या दुर्वा, मोदक, जास्वंदाची फुले, छत्र, अष्टविनायकांनी नक्षीकाम केलेली पाने, कर्णभूषण, पूजेचा पाय, आशीर्वाद हात, सुदर्शन चक्र, कलश, पूजेचे ताट आदी वस्तूंनी सोन्या-चांदीची दुकाने चमकू लागलेली आहेत. त्याचबरोबर मोत्यांच्या माळा, रुद्राक्ष माळा, गणपतीचे रुमाल, शेला, गणपतीचे वेगवेगळे आकर्षक फेटे, स्टोन माळा, चिनी बनावटीच्या पानाफुलांनी तयार केलेले हार यांनी तर संपूर्ण बाजारपेठ काबीज केलेली आहे. यंदा गणपतीच्या माळांमध्ये नव्याने दाखल झालेल्या हिऱ्यांच्या माळांनी ग्राहकांची गर्दी खेचली आहे. सोने-चांदी दागिन्यांचे किरकोळ विक्रेते राजू फणसगावकर म्हणतात की, सध्या बाजारात सोन्याचे भाव वाढल्यामुळे चांदीच्या तसेच एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांना जास्त मागणी आहे. त्यामध्ये चांदीचे जास्वंदीचे फूल, जास्वंदीची कंठी, मुकुट आणि वेगवेगळ्या माळा, पूजेचे ताट, या वस्तूंना मागणी आहे. एक ग्रॅम ज्वेलरीमध्ये विविध प्रकारचे हार, तोडे, भिकबाळी, मोदक, कर्णभूषण आदी वस्तूंना मागणी वाढलेली आहे. इमिटेशन ज्वेलरीसंदर्भात सचिन वाघमारे सांगतात की, पूजेचे ताट, कलश, त्रिशूल, परशू, वेगवेगळ्या आकारांचे मोदक, उंदीर, गणपतीच्या मूर्ती, सोंडपट्टी, हार, कंबरपट्टा आदी इमिटेशन ज्वेलरींची ग्राहक मागणी करत आहेत. तसेच जास्वंदीचे फूल आणि कंठीही लोकांच्या मागणीचा अंदाज घेत उपलब्ध करण्यात आले. एक फुटापासून २१ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तीसाठी ग्राहकांकडून सर्व प्रकारचे दागिने खरेदी केले जात आहेत.

गणेश चतुर्थीच्या पाश्र्वभूमीवर बाजारापेठा सजलेल्या आहेत. वेगवेगळ्या गावांमध्ये, गल्ल्यांमध्ये, घरांमध्ये गणपतीच्या सजावटीकरिता जणू स्पर्धा असते. त्यासाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांपासून घरातील आबालवृद्धांपर्यंत सर्वजण कामाला लागलेले असतात. त्यामुळे मखरांचा, फुलांचा, पडद्यांचा बाजार, दागिन्यांची दुकाने, रांगोळ्यांचे स्टॉल, धूप-अगरबत्तींच्या टपऱ्या विविध रंगांच्या प्रकाशदिव्यांनी चमकत आहेत. सगळीकडच्याच बाजारपेठा उत्साहात बुडून गेलेल्या दिसत आहेत.

पर्यावरणस्नेही प्रयत्न

मी २० वर्षांपूर्वीच थर्माकोलच्या मखरांचा व्यवसाय बंद केला आणि पर्यावरणाचा विचार करून पुठ्ठय़ांचे मखर तयार करण्याचा प्रयत्न केला. आज त्याचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला आहे, हे पाहून समाधान वाटत आहे. मात्र बाजारपेठांमध्ये ‘पर्यावरणस्नेही मखर’ अशी जाहिरात करून नष्ट न होणाऱ्या घटकांपासून तयार केलेली मखरे विकली जात आहेत, हे चुकीचे आहे. सध्या बाजारात पर्यावरणपूरक आणि पर्यावरणघातक मखरांबद्दल ग्राहकांचा गोंधळ उडालेला आहे. हा गोंधळ उडू नये म्हणून आम्ही हे मखर इतर व्यापाऱ्यांना विक्रीस न देता स्वत:ची विक्री केंद्रे उभी केलेली आहेत. २० वर्षांपूर्वी लोक याकडे दुर्लक्ष करत होते. आता मात्र, घराघरांमध्ये पुठ्ठय़ांच्या मखरांची चर्चा आहे. परदेशामध्ये आज या मखरांना सर्वात जास्त मागणी आहे. ती वजनाने हलकी असल्याने ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. हे सर्व पर्यावरणाविषयी केलेल्या प्रबोधनामुळे शक्य झाले आहे.

– नानासाहेब शेंडकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2019 1:02 am

Web Title: ganeshutsav special issue 2019 market status
Next Stories
1 घाटमाथ्यावरच्या हवामान इशाऱ्याकडे दुर्लक्ष महापुराचे महाकारण
2 अनियंत्रित विकासाचा पूर
3 अतिक्रमणांचा गळफास
Just Now!
X