गणेश विशेष
विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

कलाकार अनुभवांतून घडतो, समृद्ध होतो. वडिलांचा मूर्तीकलेचा वारसा घेऊन कलाभ्यासाकडे वळलेल्या प्रदीप मादुस्कर यांचेही असेच झाले. अभ्यास सहलीच्या निमित्ताने बेल्लूर, हळेबीडला गेले असता, तेथील शिल्पांच्या वैभवाने त्यांना आकर्षित केले आणि त्याचे प्रतििबब त्यांच्या कलाकृतींतही उमटले. दाक्षिणात्य धाटणीच्या दागिन्यांनी सजवलेला त्यांचा गणपती ‘वैभवसंपन्न गणेश’ म्हणून ओळखला जाऊ लागला.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
washim lok sabha seat, Govinda s Roadshow in Washim, Receives low Response, mahayuti, canidate rajshri patil, election campaign, govinda Disappointed Fans,
गोविंदाचा रोड शो फसला, कारमध्येच बसून असल्याने नागरिकांची नारेबाजी…..
caribbean writer maryse conde profile author maryse conde information zws
व्यक्तिवेध : मारिस कॉण्डे
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

गणेशमूर्ती तयार करणे हा काही प्रदीप मादुस्करांचा परंपरागत व्यवसाय नव्हता. त्यांचे वडील मुंबईत आले, तेव्हा हॉटेलमध्ये नोकरी करत. गणपतीच्या मूर्ती कशा तयार केल्या जातात, हे त्यांनी गावी असताना पाहिले होते. आपणही अशा मूर्ती साकाराव्यात अशी त्यांची इच्छा होती. सुरुवातीला त्यांनी गिरगावातील घरातच १०-१२ मूर्ती तयार केल्या. त्यासाठीचा साचाही त्यांनीच तयार केला होता. पुढे या कामासाठी त्यांनी १९३९ साली झावबावाडीत १० बाय १० ची खोली घेतली आणि मूर्तीचे काम तिथे सुरू केले. त्यांच्याआधी गिरगावात काही प्रसिद्ध कारखाने होते, पण त्यांनी स्वत:ची शैली विकसित केली. पुढे चार-पाच वर्षांत ते हजाराच्या आसपास गणेशमूर्तीची विक्री करू लागले. १९५२-५३च्या सुमारास कारखाना नावारूपाला आला. मूर्तीचे डोळे हे त्यांच्या वडिलांच्या शैलीचे वैशिष्टय़ होते. त्यांच्या मूर्तीची नजर शांत तरीही तीक्ष्ण होती.

बालपणापासूनच वडिलांचे काम पाहिल्यामुळे प्रदीप यांना मूर्तीकलेचे ज्ञान मिळाले. आपली आवड जोपासण्यासाठी त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तेथील शिल्पकला विभागांत शिकताना त्यांचे अनुभवविश्व समृद्ध होत गेले. १९७५ ते ८०च्या दरम्यान दरवर्षी अभ्यास सहलींच्या निमित्ताने विविध ठिकाणची शिल्पकला पाहण्याची, तिचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातून शरीररचनाशास्त्राचाही अभ्यास झाला. आपल्या गणेशमूर्तीतील उणिवा लक्षात आल्या आणि त्यांनी त्या दूरही केल्या.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांचाच व्यवसाय पुढे सुरू ठेवायचा हे त्यांनी निश्चित केले होते. तरीही सुरुवातीला काही स्टुडिओमध्ये काम करून अनुभव घेतला. त्यानंतर मात्र त्यांनी घरच्या कारखान्यावर लक्ष केंद्रित केले. गणपतीचे डोळे हे मादुस्करांचे वैशिष्टय़ होते. ते वगळता अन्य काही बदल करता येतील का, मूर्ती अधिक आकर्षक परिपूर्ण आणि अर्थपूर्ण करता येईल का, याचा विचार ते करू लागले. गणपतीचा आकार अधिक प्रमाणबद्ध केला. त्याची वस्त्रे, त्यावरील चुण्या अधिक आकर्षक आणि वास्तवदर्शी होऊ लागल्या.

जे. जे. मध्ये शिकताना १९७८ मध्ये त्यांची अभ्यास सहल बेल्लूर आणि हळेबीड येथे गेली होती. तेथील दागिन्यांनी सजलेल्या शिल्पांकडे मादुस्कर आकर्षित झाले. हे अलंकार आपल्याही गणेशमूर्तीला घालावेत, असे त्यांना वाटू लागले. त्या मूर्तीवरचे अलंकार काहीसे बोजड होते. ते थोडे नाजूक करावे लागतील, हे त्यांच्या लक्षात आले. जे.जे.तील शिक्षक अब्दुल रहमान आलमेलकर मिनिएचर पेंटिंग करत. त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग दागिने घडवताना झाल्याचे आणि त्यांच्याच कारखान्यातील पांडुरंग चव्हाण या वयोवृद्ध कारागिराकडून दागिन्यांची माहिती घेतल्याचे मादुस्कर आवर्जून सांगतात. हळेबीड येथील मूर्तीचे संदर्भ घेऊन गणेशमूर्ती कशी घडवावी याचा अंदाज बांधण्यात, गणपतीचे शरीर, त्याचे अलंकार याचा अभ्यास करण्यात सुमारे चार-पाच वर्षे गेली. गणेश अथर्वशीर्ष आणि गणेशकोशाचा अभ्यास त्यांनी केला आणि १९८४ साली प्रथमच वैभव गणेश साकारला.

विविध अलंकारांनी सजलेली ही सुबक डौलदार मूर्ती त्यांच्या वडिलांनाही आवडली. गजानन पुंडशास्त्री त्यांच्या कारखान्याला भेट देत. त्यांनी ही मूर्ती पाहिली. ही मूर्ती वैभवसंपन्न असल्याचे ते म्हणाले. त्यावरून मादुस्करांनी आपल्या घरच्या या गणेशमूर्तीला वैभवसंपन्न गणेश असे नाव दिले.

पहिल्याच वर्षी छायाचित्रकार राम गनीराय यांनी टिपलेले या गणेशाचे छायाचित्र ‘लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाले आणि त्यांचा हा सुंदर गणपती घरोघरी पोहोचला. तो पाहून अन्य ग्राहक आम्हालाही असाच गणपती हवा, अशी मागणी करू लागले. तेव्हापासून आजवर गेली ३५ वर्षे वैभवसंपन्न गणेशच त्यांच्या घरी स्थापन केला जात आहे आणि ग्राहकांकडून त्याला असलेली मागणी वाढतच चालली आहे. आता १० इंचांपासून अडीच फुटांपर्यंत वैभवगणेशाच्या मूर्ती साकारल्या जातात.

साधारण १९८२ च्या सुमारास गणेशमूर्ती तयार करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरण्यास सुरुवात झाली. पण मादुस्कर मात्र शाडूच्याच मातीचा वापर करण्यावर ठाम राहिले. पार्वतीचे एक नाव होते पृथा. तिने पृथ्वीवरची माती घेऊन गणेशमूर्ती तयार केल्याचे गणेशपुराणात नमूद आहे. त्यामुळे मूर्तीही मातीचीच असणे आवश्यक आहे, असे मादुस्करांचे म्हणणे आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणे अतिशय सोपे असते. एकदा साचा तयार झाला की मूíतकाराला फारसे काम राहात नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसचे मिश्रण साच्यात ओतले की सर्व अलंकारांसहित सजलेली मूर्ती हाती येते. हात वेगळ्या साच्यात तयार करून जोडले की केवळ रंगकाम उरते. शाडूच्या गणपतींचे असे नाही. यात फक्त शरीर साच्यात तयार होते. त्यावरील सर्व अलंकार हाताने तयार करावे लागतात. माळ असेल, तर प्रत्येक मणी हाताने आकार देऊन चिकटवावा लागतो. त्यामुळे यासाठी खूप वेळही लागतो आणि कलात्मकतेचा कसही लागतो. शाडूच्या मूर्तीसाठी केवळ माती आणि पाण्याचा वापर केला जातो. त्यासाठी आवश्यक असणारी माती सौराष्ट्रातील भावनगर येथून आणली जाते. कोकणातही काही भागांत ही माती मिळते पण तिथे तिची खाण नाही. त्यामुळे ती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होत नाही आणि तिचा दर्जाही गुजरातमधील मातीएवढा उत्तम नसतो, असे मादुस्कर सांगतात. शाडूच्या मूर्तीचे सौंदर्यही आगळेवेगळे असते आणि अवघ्या अध्र्या तासात मूर्ती पाण्यात विरघळते, असे ते सांगतात. ते केवळ माहीम-धारावीतील आणि दादरच्या शिवाजी पार्कातील एकूण तीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती साकारतात.

१९८४ साली साकारलेल्या पहिल्या वैभव गणेशमूर्तीत पुढे अनेक बदल झाले. १९९२ मध्ये मूर्तीच्या बाजूला सिंह लावले गेले. हाती पाश आणि अंकुश दिले गेले. पुढे अलंकारांत मोहनमाळेची भर पडली. गणेशाने सप्तनद्यांचे पाणी आणि नवग्रह कलशात धारण केल्याचे संदर्भ आहेत. त्यामुळे गणेशाच्या सोंडेत मंगलकलश ठेवण्यात आला.

वैभव गणेशाच्या मूर्तीवर अनेक अलंकार आहेत. गणपतीचा सिद्धी आणि बुद्धीशी विवाह झाला तेव्हा ब्रह्मदेवाने गणपतीला मुकुट दिला. तुरा असलेला हा मुकुट वैभव गणेशाच्या मस्तकी आहे. गंडस्थळी (कपाळावर) गंडमाळ आहे. कानांत कर्णफुले आणि भिकबाळी आहे. उजव्या हाती हस्तिदंताच्या रूपातील लेखणी आहे. डाव्या हातात मोदक आहे. उर्वरित दोन हातांत पाश आणि अंकुश ही शस्त्रे आहेत. गळ्यात मोहनमाळ आहे. कमरेभोवती कटिबंध आहे. गणपती कुबेराचे गर्वहरण करण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. त्याला खीर देण्यात आली आणि तो पीतच राहिला. त्यामुळे त्याचे पोट मोठे होत गेले. ते बांधण्यासाठी पोटावर पट्टा बांधल्याचे संदर्भ ग्रथांत आढळतात. हा पट्टा देखील वैभव गणेशाने धारण केला आहे. सोंडेवर कमळांच्या रूपात सोंडपट्टा रेखण्यात आला आहे. गणपतीने कमलाक्ष राक्षसाचा वध केला आणि त्याला सोंडेत धारण करेन असे आश्वासन देऊन उ:शाप दिला. त्यामुळे गणपतीच्या सोंडेवर कमळाच्या पाकळ्यांची नक्षी रेखण्यात आल्याचे मादुस्कर सांगतात. त्याच्या सर्व बोटांत अंगठय़ाही आहेत. पायांत पैंजण आहेत. रक्तवर्णी वस्त्र आहे. एवढय़ा श्रीमंत गणेशाचे वाहन सजलेले नसेल तरच नवल. उंदीरही उपरणे आणि अन्य अलंकारांनी सजलेला आहे.

इतरांच्या घरचे गणपती घडवण्याच्या व्यापामुळे मूर्तिकारांना स्वत:च्या घरचा गणपती घडवण्यासाठी पुरेशी उसंतच मिळत नाही. पण मादुस्करांचे मात्र असे नाही. विक्रीच्या मूर्ती तयार करण्याचे काम वेळेत पूर्ण करून नंतर तब्बल सात-आठ दिवस अतिशय बारकाईने घरची गणेशाची मूर्ती घडवली जाते. चतुर्थीच्या आदल्या रात्री १२ वाजेपर्यंत ग्राहक येत राहतात आणि सकाळी पुन्हा ६ वाजता ग्राहकांची रिघ लागते. आदल्या दिवशी १२ वाजता कारखाना बंद करून घरच्या गणेशाचे उरले-सुरले रंगकाम पूर्ण केले जाते आणि पहाटे चार वाजता वाजत-गाजत मिरवणूक निघते. आधी घरच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना आणि पूजा करून मग सकाळी ६ वाजता कारखाना पुन्हा उघडला जातो. ही परंपरा बाबांच्या काळापासून कायम असल्याचे ते सांगतात.

मादुस्करांप्रमाणेच त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलगे गौरव आणि गणेश देखील या पारंपरिक व्यवसायात आहेत. दोघांनीही जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतले आहे. त्यांच्या सुनांना कलेची पाश्र्वभूमी नाही, तरीही त्यांनी हे काम शिकून घेतले आहे आणि त्या देखील त्यासाठी हातभार लावतात.

वैभव गणेशाव्यतिरिक्त अन्यही काही वैशिष्टय़पूर्ण रचना त्यांच्या कारखान्यात साकार झाल्या आहेत. सध्या पारंपरिक स्वरूपातील मूर्तीनाच अधिक मागणी आहे. मात्र मध्यंतरी  काही वर्षांत चित्रपट, मालिका आणि क्रीडा क्षेत्राचा प्रभाव मूर्तीवर दिसत असे. त्याविषयीची एक वेगळी आठवण मादुस्कर सांगतात.. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला तेव्हा अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कपिलदेवला सोंड लावून मूर्ती तयार केल्या होत्या. लालबागमध्ये तर ११ खेळाडूंचा पूर्ण संघच तयार करण्यात आला होता. त्यावेळी भुलेश्वरचे एक मंडळ मादुस्करांकडे कपिलदेवच्या रूपातील गणपतीची मागणी करण्यासाठी आले होते. त्याऐवजी कृष्णाच्या रूपातील गणपती तयार करून त्याच्या हस्ते कपिलदेव विश्वचषक स्वीकारत आहे, असे दृश्य उभे करण्याची कल्पना मादुस्करांनी मांडली. कृष्णाच्या कथांमध्ये चेंडूचा उल्लेख आढळतो, त्यामुळे गणेशाला कृष्णरूपात साकारण्याचे ठरले. गणपती आणि कपिलदेवच्या प्रत्येकी साडेपाच फुटांच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. ही कल्पना अनेकांना आवडली.

मूर्तीमध्ये केलेल्या प्रयोगांविषयी मादुस्कर सांगतात, ‘एकदा एका ग्राहकाला घरगुती पुजेसाठी जास्वंदाच्या फुलावरील फुलपाखरू अशा रूपातील मूर्ती हवी होती. जास्वंदाच्या नाजूक परागांतून मध शोषून घेणाऱ्या फुलपाखराच्या रूपात गणपती साकारणे हे मोठे आव्हान होते. आम्ही ते पेलले. मूर्ती हलकी राहावी म्हणून पंखांसाठी पुठ्ठय़ाचा वापर करण्यात आला.’ १९८५-९०च्या सुमारास लोकांना रामायण-महाभारताचे वेड लागले होते. त्यावेळी त्यातील पात्रांच्या रूपात गणपती घडवले जात. याव्यतिरिक्त अष्टविनायक, पेशव्यांची पगडी, शिंदेशाही पगडी, फेटा घातलेला गणपती, जय मल्हार, बालगणेश, टिळकांच्या रूपातील गणपती अशा विविध ढंगांतील गणेशमूर्ती घडवल्याचे मादुस्कर सांगतात. त्यांच्या मूर्तीनी भारताच्या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. इंग्लंड, कॅनडा, थायलंड, कंबोडिया येथे त्यांच्या मूर्ती जातात. परदेशांतून मागणी वाढली आहे. तिथे पाठवल्या जाणाऱ्या मूर्ती दीड फुटांपेक्षा जास्त उंच नसतात.

मादुस्करांचा पहिला कारखाना १९४७ मध्ये झावबावाडीत स्थापन झाला. त्यानंतर १९५२ आणि १९८६ मध्ये मुगभाट येथे दोन जागा घेऊन कारखान्याचा विस्तार करण्यात आला. शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी कसलेला कारागीर घडवणे हे मोठे कौशल्याचे काम असते. मादुस्करांकडे मूर्तिकला शिकलेल्या अनेकांनी कोकणातील आपल्या गावीदेखील स्वत:चे कारखाने सुरू केले आहेत. असे कारागीर दसरा ते होळी मादुस्करांकडे मातीकाम करतात. त्यानंतर गावी जातात. स्वत:च्या कारखान्याची आणि शेतीची कामे करतात. त्यामुळे त्यांना रोजगार तर मिळाला आहेच. शिवाय त्यांच्यातील उद्योजकतेलाही खतपाणी मिळत आहे.

अगदी बालपणापासून मातीत माखलेले प्रदीप मादुस्करांचे हात आजही थकलेले, थांबलेले नाहीत. आजही दिवसभर ते मुगभाट येथील आपल्या कारखान्यात हजर असतात. साचे, माती, मूर्तीच्या गर्दीत, रंगांच्या गंधात गणेशाच्या सान्निध्यात मादुस्कर मग्न झालेले असतात.
(छायाचित्र  : अमित चक्रवर्ती)