गणेश विशेष
आनंद कानिटकर – response.lokprabha@expressindia.com

सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी आग्नेय आशियातील विविध प्रदेशांतून भारतीय संस्कृती बहरू लागली होती. त्यात सध्याच्या म्यानमार, थायलंड, मलेशिया, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आदी देशांमध्ये इतर भारतीय देवदेवतांसोबत गणेशही लोकप्रिय होता

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Indian seed industry turnover of rs 30 thousand crore
देशातील बियाणे उद्योगाची स्थिती काय? जाणून घ्या. बियाणे उद्योगाची उलाढाल
The number of leopards in India has now reached 13 thousand 874
बाबो, भारतात बिबट्यांची संख्या आता १३ हजार ८७४….
Household Consumption Expenditure Survey report
विश्लेषण : दरडोई घरगुती खर्च किती वाढतो आहे?

भारतातील सर्वात लोकप्रिय देवतेचा म्हणजेच गणेशाचा प्रसार प्राचीन काळातच भारताच्या भौगोलिक सीमा ओलांडून पलीकडे गेलेला होता. खुष्कीच्या मार्गाने प्राचीन भारतीय व्यापारी सध्याच्या पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण तसेच मध्य आशियातील उझबेकिस्तान या भागांतून प्रवास करत. त्यांच्यासोबत भारतीय संस्कृती आणि धर्माचा प्रसार आपसूकच होत होता. सुमारे १८०० वर्षांपूर्वी प्राचीन भारतातील रहिवाशांनी सागरीमार्गाने व्यापारानिमित्त आग्नेय आशियात प्रवेश केला आणि भारतातील बौद्ध धर्म आणि िहदू धर्मातील शैव, वैष्णव, शाक्त पंथदेखील या व्यापाऱ्यांसोबत आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये पोहोचले. तेथील स्थानिक संस्कृतीतील अनेक राजांनी भारतीय धर्म पिढय़ान्पिढय़ा अनुसरले हे तेथील भारतीय मंदिरे, देवी-देवतांच्या मूर्ती आणि अनेक शिलालेख यांवरून लक्षात येते.

अफगाणिस्तानात काबूल तसेच गार्देज येथे तीन प्राचीन गणेशमूर्ती सापडल्या. या मूर्ती किमान १८०० वष्रे जुन्या असाव्यात असा संशोधकांचा कयास आहे. ज्येष्ठ संशोधक जिओवान्नी वेरार्दी यांना १९७४ साली काबूल बाजारात संगमरवराची गणेशमूर्ती आढळून आली. ही मूर्ती नेमकी कुठून काबूलमध्ये आणण्यात आली आणि नंतर त्या मूर्तीचे काय झाले याची माहिती कुठेही उपलब्ध नाही.

या गणेशमूर्तीची मूर्तीची उंची २९ सेंटीमीटर होती तर मूर्तीखालील दगडाच्या भागासमवेत ही मूर्ती ३९ सेंटीमीटर उंचीची होती. हा गणेश ललितासनात बसलेला असून त्याला चार हात होते. मूर्तीची सोंड तुटलेली असून तिच्या उजवीकडील हातात हस्तिदंत दिसतो. मूर्तीच्या मस्तकावर वैशिष्टय़पूर्ण असा मुकुट कोरलेला असून मूर्तीच्या गळ्यात एक साधा हार आहे. मूर्तीच्या शिल्लक राहिलेल्या उजवीकडील वरच्या हातात परशूचा दंड दिसून येतो तर डावीकडील खालच्या हातात मोदकपात्र दाखवलेले आहे. मूर्तीच्या तुटलेल्या दोन हातांत पाश आणि अक्षमाला दाखवलेली असावी. याशिवाय मूर्तीच्या अंगावर सर्पयज्ञोपवीत देखील कोरलेले आहे. या मूर्तीला मागे प्रभावलय दाखवले असून त्याच्या कडेला असणाऱ्या मण्यांच्या नक्षीखेरीज त्यावर कोणतीही नक्षी नाही. नेहेमीप्रमाणे गणेशाच्या मूर्तीत आढळते तसे या गणेशाच्या मूर्तीला धोतर नेसलेले दाखवले नाही तर अफगाणिस्तानातील तत्कालीन वेशभूषेनुसार तो गुढघ्यापर्यंत असलेला पायजमा असावा असे वेरार्दी यांचे मत आहे. हा पायजमा मूर्तीच्या मागील बाजूनेही कोरलेला दिसून येतो. प्राचीन इराण, अफगाणिस्तानात असा पायजमा आणि शिवलेला अर्धा किंवा पूर्ण बाह्यंचा शर्ट घालण्याची पद्धत होती हे तत्कालीन शिल्पांवरून, चित्रांवरून तसेच नाण्यांवरून दिसून येते. ही मूर्ती नवव्या शतकातील असावी, असा डॉ. वेरार्दी यांचा अंदाज आहे.

दक्षिण आशियात तसेच भारताच्या वायव्येकडे जसा भारतीय संस्कृतीचा प्रसार झाला तसाच प्रसार दीड हजार वर्षांपूर्वीपासून आग्नेय आशियात होऊ लागलेला होता. आग्नेय आशियातील विविध प्रदेशांतून भारतीय संस्कृती बहरू लागली होती. सध्याच्या म्यानमार, थायलंड, मलेशिया, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आदी देशांतून भारतीय संस्कृतीचे हे अवशेष आपल्याला त्यांच्या प्रथापरंपरांतून तसेच कला-स्थापत्यातून दिसतात. या सर्वच देशांमध्ये इतर भारतीय देवदेवतांसोबत गणेशही लोकप्रिय होता.

व्हिएतनाम

व्हिएतनाम (प्राचीन नाव चंपा) या देशातील कलास्थापत्याचा अभ्यास एकोणिसाव्या शतकात फ्रेंच संशोधकांनी मोठय़ा प्रमाणावर केला. या देशात झालेल्या उत्खननांत इसवीसनापूर्वी पाचशे वर्षे ते इसवीसनानंतर दोनशे वर्षे या कालखंडातील स्थानिक संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. यानंतरच्या काळात तेथील स्थानिक ‘चाम’ लोकांचे वर्चस्व होते. इसवीसनाच्या चौथ्या व पाचव्या शतकात येथील संस्कृतीवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडण्यास मोठय़ा प्रमाणावर सुरुवात झाली होती हे येथे आढळणाऱ्या विविध शिलालेखांतून दिसून येते. व्हिएतनाममध्ये इसवीसनाच्या पाचव्या ते चौदाव्या शतकातील संस्कृत शिलालेख आढळतात. देवळातील शिलालेख संस्कृतमध्ये तर इतर शिलालेख स्थानिक चाम भाषेत आहेत. व्हिएतनाममध्ये शिविलग, विष्णू, दुर्गा, काíतकेय, गणपती त्याचप्रमाणे बुद्ध, बोधिसत्व यांच्या प्रतिमा आढळल्या आहेत.

व्हिएतनाममधील ‘मी सोन’ (स्थानिक भाषेतील याचा अर्थ सुंदर पर्वत असा होतो) या ठिकाणी इसवी सनाच्या सातव्या शतकातील शिवालयाचे अवशेष सापडले होते. या शिवालयाच्या आवारातील एका मंदिरात उंच पीठावर एक उभी गणेशमूर्ती आढळून आली होती. या मूर्तीची उंची ९६ से.मी. आहे. भारतात आढळणाऱ्या सहाव्या- सातव्या शतकातील गणेशमूर्तीप्रमाणे या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट नाही. तसेच या मूर्तीला त्रिनेत्र दाखविले आहेत. या गणेशाच्या मनगटाला सर्पकंकण व छातीभोवती सर्पबंध दाखवले आहेत.  या गणेशाने नागयज्ञोपवीत घातलेले असून त्या नागाचे शरीर अत्यंत नसíगक दाखवले आहे. मूर्तीचे इतर हात आता तुटलेले असले तरी १९०३ साली टिपलेल्या या मूर्तीच्या छायाचित्रावरून मूर्तीच्या इतर हातांत एक मोठा मुळा, परशू व अक्षमाला होती असे दिसून येते. सध्या या मूर्तीचा मोदकपात्र धरलेला हातच अस्तित्वात असून त्यात मोदकांनी भरलेली वाटी हाती धरलेली आहे. या गणपतीच्या कमरेला व्याघ्रचर्म गुंडालेले असून त्याखाली वस्र नेसलेले आहे. एका छोटय़ा पीठावर ही मूर्ती उभी आहे.

व्हिएतनाम येथे गणेशाच्या अनेक मूर्ती सापडल्या असून त्या ‘दा नांग’ येथील संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

कंबोडिया

व्हिएतनामप्रमाणे कंबोडिया या देशातही प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. येथे साधारणत: इसवीसनाच्या पाचव्या शतकापासून भारतीय संस्कृतीचे अवशेष सापडतात. कंबोडिया येथील अंगकोरवट या प्रसिद्ध मंदिरामुळे येथील भारतीय संस्कृतीचे महत्त्व विशेष जाणवते. कंबोडियातही हरिहर, शिव, दुर्गा, विष्णू, गणेश, स्कंद इत्यादी िहदू देवतांच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. येथील प्राचीन मंदिरांच्या आवारात मंदिर स्थापनेचे शिलालेख सापडतात.

लंडनमधील व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियमच्या संग्रहात कंबोडियातील सर्वात जुन्या गणेशमूर्तीपकी असलेली एक मूर्ती आढळते. ही मूर्ती इसवीसनाच्या सहाव्या शतकाच्या अखेरीस किंवा सातव्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील असावी. भारतातील गुप्तकाळातील गणेशमूर्तीप्रमाणे ही अत्यंत साधी दगडी गणेशमूर्ती आहे. या मूर्तीच्या मस्तकावर मुकुट नाही तसेच अंगावर कोणतेही दागिनेही दाखविलेले नाहीत. या मूर्तीच्या डाव्या हातात मोदकपात्र दाखविलेले असून गणपतीची सोंड मोदकपात्रावर दाखवली आहे, तर या मूर्तीच्या उजव्या हातात मुळा किंवा हस्तिदंत दाखविलेला आहे. कंबोडियात अंगकोरपूर्व काळातील गणेशमूर्ती कमी आढळतात त्यामुळे त्यापकी ही एक महत्त्वाची मूर्ती आहे.

न्यूयॉर्क येथील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या संग्रहात कंबोडियातील इसवीसनाच्या सातव्या शतकातील उभी दगडी गणेशमूर्ती आहे या मूर्तीला दोनच हात  दाखविलेले असून अंगावर कोणताही दागिना नाही. तसेच या गणेशाने कंबोडियातील पारंपरिक कटीवस्त्र संपोत नेसलेले दाखवले आहे.

कंबोडियातील दहाव्या शतकातील वालुकाश्मात घडविलेल्या गणेश आणि काíतकेय यांच्या मूर्ती लॉस एंजलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट येथील संग्रहात आहेत. या मूर्तीसमूहाच्या डाव्या बाजूला हत्तीवर गणेश बसलेला दाखवण्यात आला आहे तर उजव्या बाजूला मोरावर काíतकेय दाखवण्यात आला आहे. या मूर्तीसमूहात मध्यभागी सिंहावर बसलेली मूर्ती ही शंकराची असल्याचा तज्ज्ञांचा कयास आहे. त्यामुळे शंकराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काíतकेय आणि गणेश असे या मूर्तीसमूहात दाखवलेले आहे. या तीनही मूर्तीच्या मस्तकावर ख्मेर शैलीतील मुकुट दाखविलेले असून कर्णभूषणेही स्पष्ट दिसतात.

कंबोडियातील मंदिरांत आग्नेय आशियात आढळणाऱ्या बठय़ा गणेशमूर्तीप्रमाणे मूर्ती दिसून येते. सीएम रिपजवळील अंकोर थोम येथे मिळालेली एक गणेशमूर्ती वैशिष्टय़पूर्ण आहे. कंबोडियातील बायोन शैलीतील ही मूर्ती इसवीसनाच्या बाराव्या किंवा तेराव्या शतकातील असावी असा संशोधकांचा कयास आहे. ही ८२ से.मी. उंचीची चतुर्भुज गणेशमूर्ती एका छोटय़ा पीठावर पद्मासनात बसलेली असून तिचे पुढचे दोन्ही हात गुढघ्यांवर ठेवलेले आहेत. या गणेशाचे मागचे दोन्ही हात तुटलेले आहेत. गणेशाच्या डोक्यावर अर्धमुकुट असून त्यातून त्याचा जटाभार दिसत आहे. या गणेशाच्या गळ्यात यज्ञोपवीत असून त्याच्या दंडावर नागबंध आहे. कंबोडियातील स्थानिक भाषेत सम्पोत असे वर्णन असलेले चुणीदार कटीवस्त्र परिधान केले आहे. हे कटीवस्त्र त्याने बयोन शैलीत आढळणाऱ्या छोटय़ा कंबरपट्टय़ाने बांधले आहे. या गणेशमूर्तीच्या पीठाच्या घडणशैलीवरून हे शिल्प येथील राजा जयवर्मन सातवा याच्या काळात निर्माण झाले असावे, असा अंदाज आहे.

कंबोडियाची राजधानी असलेल्या फ्नोम पेन् येथील राष्ट्रीय संग्रहालयात कंबोडियामध्ये सापडलेल्या विविध गणेशमूर्ती प्रदíशत करण्यात आल्या आहेत. दक्षिण कंबोडिया येथे सापडलेली सातव्या शतकातील द्विभुज गणेशमूर्ती तसेच एक उभी असलेली चतुर्भुज गणेशमूर्ती या संग्रहालयात आहे. येथेच एक मोठी व सुंदर अशी प्रासाद बाक येथील दहाव्या शतकातील मूर्ती, मेबॉन येथील चतुर्भुज गणेशाची दहाव्या शतकातील मूर्ती, बस्सक येथील अकराव्या शतकातील मूर्तीदेखील प्रदíशत केलेल्या आहेत.

थायलंड

लॉस एंजलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट्स यांच्या संग्रहात असलेली थायलंड येथील आठव्या शतकातील तांब्याची गणेशमूर्ती वैशिष्टय़पूर्ण आहे. ही गणेशमूर्ती शंकराच्या शेजारी उभी असलेली दाखवलेली असून या गणेशमूर्तीच्या मागील डाव्या हातात चक्र तर उजव्या हातात शंख दाखवलेला आहे. या मूर्तीच्या पुढील दोन हातांपकी उजव्या हातात हस्तिदंत  दिसून येतो तर डाव्या हातात मोदक दाखवलेला आहे.

मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट, न्यूयॉर्कमधील संग्रहात थायलंड येथील सुमारे इसवीसनाच्या पंधराव्या शतकातील ब्राँझची बठी (१२ इंच उंचीची) गणेशमूर्ती आहे. या मूर्तीच्या मस्तकावर मुकुट दाखवलेला असून या मुकुटाला पुढील आणि मागील बाजूस कदाचित रत्ने जडवलेली होती. या गणेशमूर्तीस नागयज्ञोपवीत दाखवलेले असून हातात व पायात आभूषणे दाखवलेली आहेत. या गणेशाने उजव्या हातात हस्तिदंत घेतलेला असून डाव्या हातात अंकुश घेतलेला आहे.

आग्नेय आशियातील या अनेक देशांतील गणेशमूर्तीचा विचार करता भारतीय संस्कृती आणि धर्माच्या प्रसारामुळे गणेशाची लोकप्रियता या भागात वाढत गेलेली दिसून येते. आग्नेय आशियातील स्थानिक कलाकारांनी गणेशाच्या या द्विभुज, चतुर्भुज मूर्ती मूळच्या भारतीय परंपरा आणि संकेत कायम ठेवून परंतु स्थानिक शैलीत निर्माण केलेल्या आढळून येतात. इतकेच नाही तर येथील विविध प्रदेशांत व विविध काळात स्वतंत्र शिल्पशैलीही निर्माण झाल्या होत्या व त्यांचा प्रसार आजूबाजूच्या देशांमध्ये केला गेला, हेही त्याबरोबर दिसून येते.

इंडोनेशिया

आग्नेय आशियात ज्या द्वीपसमूहाला आपण इंडोनेशिया म्हणून ओळखतो. त्यातील जावा व बाली द्वीपांवर आजही भारतीय संस्कृती जपली गेली आहे. इंडोनेशियाच्या कागदी चलनावरही एका गणेशमूर्तीचे अंकन केले आहे. जावा व बाली येथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव इसवीसनाच्या पाचव्या शतकापासून सुरू झालेला दिसून येतो. येथील मंदिरांमध्ये इंद्र, हरीहर, शिव, भरव, ब्रह्मा, गणेश, महिषासुरमर्दनिी, काíतकेय इत्यादी देवतांच्या मूर्ती आढळून आल्या आहेत.

इंडोनेशियामध्ये प्राचीन काळी शंकरानंतर विशेष लोकप्रिय असलेली देवता म्हणजे गणपती. येथे गणेशाची स्वतंत्र मंदिरे आढळत नाहीत. परंतु प्राचीन शिवमंदिरांमध्ये कोनाडय़ात गणेशप्रतिमा आढळतात. काही डच अधिकाऱ्यांना १९३५ साली बोरोबुदूर भागात बनोन येथे एक विटांचे शिवमंदिर सापडले. इंडोनेशियातील स्थानिक भाषेत मंदिराला चंडी असे म्हणतात. या चंडी बनोन येथील पाच मूर्ती नंतर जाकार्ता येथील राष्ट्रीय संग्रहालयात हलविण्यात आल्या. या प्रतिमांमध्ये आठव्या शतकातील एक गणेशाची सुंदर मूर्ती आहे. जवळपास दीड मीटर उंचीची ही गणेशमूर्ती या संग्रहालयातील एक प्रमुख आकर्षण आहे.

दगडात कोरलेली ही गणेशप्रतिमा कमलासनावर बसलेली दाखवण्यात आली आहे. इंडोनेशियात इतरत्र आढळणाऱ्या चतुर्भुज गणेशमूर्तीप्रमाणेच ही मूर्तीदेखील पायाचे तळवे समोरासमोर ठेवलेली आहे. मूर्तीच्या मस्तकावर अर्धमुकुट असून त्यातून गणेशाचा जटासंभार दिसत आहेत. मूर्तीच्या गळ्यात कंठा असून अंगावर नागयज्ञोपवीतदेखील आहे. या एकदंत चतुर्भुज गणेशाच्या हातांत दात, अक्षमाला, परशु व मोदकाची वाटी आहे. गणेशाच्या चुणीदार कटीवस्त्रावर फुलांची नक्षी आहे. अत्यंत सुंदर व बारीक नक्षीकाम या मूर्तीवर करण्यात आलेले आहे. संशोधकांच्या मते इसवीसनाच्या आठव्या ते दहाव्या शतकात निर्माण झालेली ही मूर्ती म्हणजे इंडोनेशियातील शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. कदाचित यामुळेच जाकार्ता येथील राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देणाऱ्यांमध्ये ही गणेशाची भव्य मूर्ती लोकप्रिय आहे.

गणेशाला इंडोनेशियामध्ये ज्ञानाचा अधिपती मानत असल्यामुळे बांडुंग येथील तंत्रज्ञान केंद्राच्या चिन्हावरही ही गणेशप्रतिमा आढळते तसेच इंडोनेशियाच्या २० हजार रुपयांच्या कागदी चलनावरही गणेशमूर्तीला स्थान मिळाले आहे.

इंडोनेशियातील इसवीसनाच्या नवव्या शतकात निर्माण झालेल्या प्रम्बानन येथील शिवमंदिरात एका गाभाऱ्यात एक गणेशमूर्ती आहे. इंडोनेशियात आढळणाऱ्या गणेशमूर्तीप्रमाणेच ही मूर्ती बठी चतुर्भुज असून पायाचे दोन्ही तळवे एकमेकांना टेकलेल्या स्थितीत दाखवलेली आहे. याशिवाय येथील बाली येथे कोरीव ‘गुहा गज’आढळते, या कोरीव गुहेत एक गणेशाची मूर्ती ठेवलेली असून स्थानिक लोक त्याची पूजा करतात.

इंडोनेशियाच्या पूर्वेला असणाऱ्या बोíनओ बेटावरही गणेशाच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. हा भारतीय गणेशप्रतिमेच्या प्रवासाचा अतिपूर्वेकडील पुरावा आहे.

या लेखात वापरलेली अनेक छायाचित्रे मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट (न्यूयॉर्क), विकिपीडिया), लॉस एंजलिस काउंटी म्युझियम ऑफ आर्ट्स (लॉस एंजेलिस) आणि व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अल्बर्ट म्युझियम (लंडन) यांच्या संग्रहातील असून त्यांच्या सौजन्याने या लेखात वापरण्यात आली आहेत.)