News Flash

गोव्यातील आठ भावंडे

लाइराई, मोरजाई, केळबाई, महामाया, मीराबाई, माहळसा, अजादीपा या सात बहिणी आणि त्यांचा भाऊ खेतोबा हे गोव्याच्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत.

हिंदू संस्कृतीत सप्तमातृकांचे संदर्भ अनेक ठिकाणी आढळतात. देशात ठिकठिकाणी त्यांची मंदिरेही आहेत.

देवी विशेष
विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

लाइराई, मोरजाई, केळबाई, महामाया, मीराबाई, माहळसा, अजादीपा या सात बहिणी आणि त्यांचा भाऊ खेतोबा हे गोव्याच्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. ही दक्षिणेतील उग्र देवतांचीच काळाच्या ओघात सौम्य होत गेलेली रूपे असावीत, असे त्यांच्याशी संबंधित प्रथापरंपरांमधून जाणवते.

हिंदू संस्कृतीत सप्तमातृकांचे संदर्भ अनेक ठिकाणी आढळतात. देशात ठिकठिकाणी त्यांची मंदिरेही आहेत. गोव्यातील लाईराई, मोरजाई, केळबाई, महामाया, मीराबाई, महाळसा, अजादीपा या या सात देवी मात्र या सप्तमातृकांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांना खेतोबा नावाचा भाऊदेखील आहे. घाट ओलांडून पुढे आल्यावर ही भावंडे गोव्यात बिचोलीम येथे पोहोचली. तिथे आधीपासूनच शांतादुर्गेचे वास्तव्य होते. तिने त्यांना जवळच्या मायेम या ठिकाणी पाठवले. ही भावंडे तिथे राहू लागली. एकदा या बहिणींनी खेतोबाला स्वयंपाकासाठी चूल पेटवण्यास सांगितले मात्र खेळात मग्न खेतोबाने बराच वेळ झाला तरी चूल पेटवली नाही हे पाहून लाइराई संतापली आणि तिने त्याला लाथ मारली, त्यामुळे खेतोबाचा तोल गेला, अशी आख्यायिका आहे. आजही वायंगणमधील मंदिरातील खेतोबाची मूर्ती अशाच तोल गेलेल्या तिरक्या स्थितीत दिसते.

आज लाइराई शिरगावात, महामाया मायेममध्ये, मोरजाई मोरजीत, केळबाई मुळगावात, महाळसा माडरेल आणि मीराबाई (मिलाग्रेस सायबिणी) म्हापसा येथे दिसते. गोव्याच्या विविध भागांत राहणाऱ्यांच्या रक्षणासाठी आणि दुष्प्रवृत्तींच्या निर्दालनासाठी ही सर्व भावंडे गोव्याच्या विविध भागांत विखुरली असली, तरी ती वर्षांतील ठरावीक दिवशी एकमेकांना भेटायला येतात. त्यांच्या भेटीगाठी हे गोवेकरांसाठी मोठे उत्सव असतात. या सर्व देवतांविषयीच्या प्रथा-परंपरा,  व्रतवैकल्ये काहीशी आदिम आणि इतर देवतांपेक्षा फारच वेगळी आहेत.

लाइराई

लाइराई म्हणजे मोगरा. मातेच्या उदराचे प्रतीक म्हणून कलश, गर्भजलाच्या रूपातील पाणी आणि त्यात जन्म घेणाऱ्या नव्या जीवांच्या रूपातील मोगऱ्याच्या कळ्या.. मातृदेवतेचेच हे एक रूप. या देवतेचे भक्त धोंड म्हणून ओळखले जातात. देवीला खूश करण्यासाठी त्यांना खूपच कडक व्रताचे पालन करावे लागते. देवीच्या उत्सवाच्या आधीचे आठ दिवस घरापासून दूर रानावनात राहायचे, कंदमुळे-फळे इत्यादींचे सेवन करायचे असते. ते उपलब्ध नसल्यास शाकाहार करणे अपेक्षित असते. काहीही खाण्यापूर्वी अगदी पाणी पिण्यापूर्वीही स्नान करणे आणि ओलेत्यानेच अन्नग्रहण करणे आवश्यक असते. पूजेच्या दिवशी विविध भागांतील धोंड रोत नावाचं शस्त्र घेऊन शिरवागात येतात. गोव्याबरोबरच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातही लाइराईचे भक्त आहेत.  धोंड व्रतस्थ असतात. त्या काळात मंदिरासमोर मध्यवर्ती भागात मांडावळ केली जाते. तिथे पूजा केली, गाऱ्हाणे घातले, की पुढचे काही दिवस ग्रामस्थ लाकडाच्या मोळ्या तिथे आणून ठेवत राहतात. पूजेच्या दिवसापर्यंत सुमारे आठ-दहा ट्रक भरतील एवढी लाकडे गोळा होतात.

पूजेच्या दिवशी देवीच्या कलशातील पाणी शिरगावातील घरांत शिंपडले जाते. सकाळी मंदिरातील चिरा म्हणजेच देवीची दगडी मूर्ती वाजतगाजत बाहेर आणली जाते आणि मुड्डी येथील आदिस्थानी नेली जाते. वाटेतील गावांतून फिरून रात्री आठच्या सुमारास मूर्ती पुन्हा मंदिरात आणली जाते. मंदिरातील देवीचा कलश होमखंडाजवळ आणला जातो. रंगीत कापड गुंडाळून सजवलेल्या वेताच्या काठय़ा नाचवल्या जातात. धोंड तलावात स्नान करून कलशात तीन ओंजळी पाणी भरतात. या पाण्यात परिसरातील सगळ्या मोगऱ्याच्या कळ्या सोडल्या जातात. या पाण्यातील कळ्या पुढच्या उत्सवापर्यंत कोमेजत नाहीत, अशी श्रद्धा आहे. नंतर सर्व धोंड स्नान करून कलशातील मोगऱ्याची कळी तोंडात घेऊन अग्निदिव्य करतात. ते पाहण्यासाठी गर्दी होते. होमखंडातील जळत्या निखाऱ्यांवरून धोंड धावत जातात. कलश घेतलेल्या धोंडांसह सर्व धोंडांनी अग्निदिव्य पार केले की धोंडाच्या व्रताची आणि लाइराईच्या पूजेचीही सांगता होते. भक्त देवीला मोगऱ्याच्या माळा घालतात. या काळात शिरगावात मोगऱ्याची विक्री लाखो रुपयांच्या घरात जाते. केळबाई लाइराईच्या भेटीला येते, तेव्हा मोठा उत्सव साजरा केला जातो.

मिलाग्रेस सायबिणी (मीराबाई)

गोव्यातील सांस्कृतिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण म्हणजे मिलाग्रे सायबीण. पूर्वी मीराबाई म्हणून ओळखली जाणारी ही देवी पोर्तुगिजांच्या काळात मिलाग्रेस सायबिणी झाली. गोव्यातील हिंदू आणि कॅथलिकही तिची भक्तिभावाने पूजा करतात. मिलाग्रेस सायबिणी आणि तिची बहीण लाइराईचा उत्सव यात अवघ्या काही दिवसांचेच अंतर असते. पूर्वी लाइराईच्या उत्सवासाठी मिलाग्रेस फुले पाठवत असे आणि मिलाग्रेसच्या उत्सवासाठी लाइराई तेल पाठवत असे. काळाच्या ओघात ही प्रथा मागे पडली. मीराबाईचे मंदिर पोर्तुगीज आक्रमणांच्या काळात नष्ट झाले पण भक्तांच्या मनातील तिचे स्थान कायम आहे.

महामाया आणि केळबाई

खेतोबा आणि त्याच्या आठ बहिणींनी गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत राहण्याचे ठरवले, तेव्हा महामायेच्या वाटणीला मायेम परिसर आला. पण तिथे वेताळाने धुडगूस घातला होता. त्यामुळे महामायेची मदत करण्यासाठी केळबाईही तिच्यासह मायेमला गेली, अशी आख्यायिका आहे. त्याचेच प्रतीक म्हणून मुळगावातील केळबाई दरवर्षी मायेममधील महामायेला भेटायला जाते. त्यांच्या भेटीचा हा उत्सव मोठय़ा जल्लोषात साजरा केला जातो.

भारतीय संस्कृतीत केळी हे मांगल्याचे आणि सृजनाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळेच कोणत्याही धार्मिक कार्यात केळीच्या खांबांचा, पानांचा, फळांचा मान मोठा असतो. केळबाई हे केळीचे म्हणजेच सृजनाचे प्रतीक मानले गेले आहे. केळबाईची पाषाणमूर्ती मंदिराबाहेर नेण्याऐवजी चार देवतांचे मुखवटे ठेवलेला वेताचा एक पेटारा मायेमला नेला जातो. केळबाई, सातेरी, रवळनाथ आणि महादेवाचे मुखवटे ठेवलेल्या या पेटाऱ्याला पेठ म्हटले जाते.

चौगुले हे या उत्सवाचे मानकरी असतात. यात मुळगाव, बिचोलीम, वायंगण आणि मायेममधील रहिवाशांचा समावेश असतो. ४००-५०० धोंड स्नान करून, पारंपरिक वेशभूषेत व अबोलीच्या माळा गळ्यात घालून मानकऱ्यांचे स्वागत करतात. चौगुले चारही पवित्र मुखवटे फुलांनी सजवलेल्या पेटाऱ्यात ठेवतात. धोंड सजवलेल्या काठय़ा हाती घेऊन मंदिरात ढोलांच्या तालावर नृत्य करतात. मंदिरात शेकडो रंगीत वेतकाठय़ांच्या गराडय़ात फुलांनी सजलेला पेटारा नाचवताना पाहणे हा आनंददायी अनुभव ठरतो.

वाटेत व्हाळशी, बोर्डेम, बिचोलीम या गावांत भक्त दर्शनासाठी थांबलेले असतात. त्यांना दर्शन देत केळबाई साधारण सकाळी पाचच्या सुमारास मायेमला पोहोचते. मायेममधील जत्रा चैत्र शुद्ध अष्टमीला होते. त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच महामायेची भेट घेऊन केळबाई परतली की शिरगावात तिचा उत्सव साजरा केला जातो.

लायराईच्या आराधनेत जे महत्त्व मोगऱ्याच्या कळ्यांना आहे तेच महत्त्व महामायेच्या पूजेत अबोलीच्या फुलांना आहे.  गोव्याच्या संस्कृतीतही अबोलीच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. महामायेचा कलश या फुलांच्या माळांनी सजलेला असतो. जत्रेच्या आधी हा कलश मंदिरातून बाहेर काढला जातो आणि डोक्यावर घेऊन गावात सर्वत्र फिरवला जातो. ठिकठिकाणी जाऊन देवी भक्तांना दर्शन देते. ती जिथे जाते तिथे तिच्या बरोबर भक्तांची मांदियाळी असतेच.

महाळसा

माडरेल येथील महाळसेच्या हातात त्रिशूळ, तलवार, राक्षसाचे मुंडके आणि वाटी आहे. तिच्या हातातील मुंडक्यातून सांडणारे रक्त वाघ चाटत आहे. विशेष म्हणजे या देवीने यज्ञोपवितही घातलेले दिसते. पूर्वी ही देवी वेरणे येथे होती. १५६७ मध्ये पोर्तुगिजांच्या आक्रमणात तिचे मंदिर नष्ट झाले, मात्र मूर्ती शिल्लक राहिली. भक्तांनी ती माडरेल येथे आणली. १७व्या शतकात तिथेच तिचे मंदिर उभारून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या देवीचा उत्सव नवरात्रात साजरा केला जातो. दर रविवारी तिची पालखीही काढली जाते. भरपूर फुलांनी सजवलेली ही पालखी गावात सर्वत्र फिरवली जाते. त्या वेळी महाळसेच्या दर्शनासाठी ग्रामस्थ गर्दी करतात.

मोरजाई

असे म्हणतात की श्रावण कृष्ण त्रयोदशीला मोरजीममधील मच्छीमारांच्या जाळ्यात मोरजाईची मूर्ती आली. त्यामुळे या देवीची जत्रा दरवर्षी श्रावण कृष्ण त्रयोदशीला होते. या दिवशी तिच्या सहाही बहिणी तिला विविध भेटवस्तू पाठवतात. कलश उत्सव हा या मंदिराचा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवात ग्रामपुरुष कलशाची पूजा केली जाते. यात मातीच्या कलशात पाणी आणि आंब्याच्या डहाळ्या ठेवल्या जातात. यातील पाण्याला कार्तिकेयाचे प्रतीक मानले जाते आणि कार्तिकेय हा मोरजाईचा पुत्र मानला जातो. कलश उत्सवात कार्तिकेय आपल्या मातेची भेट घेण्यासाठी तिच्या मंदिरात जातो आणि मातेच्या मांडीवर बसतो, अशी श्रद्धा आहे. त्याचाच एक भाग म्हणून कलश उत्सवाच्या दिवशी मातीचा कलश मोरजाईच्या मंदिरात नेऊन तिच्या मांडीवर ठेवला जातो. हा उत्सव दर तीन वर्षांनी साजरा केला जातो.

मोरजाईचे मंदिर कावी या कलेने सजवलेले आहे. यात लाल रंगाचा लेप भिंतीवर लावला जातो. कागदावर चितारलेले चित्र या लेपावर उमटवले जाते आणि लाल रंग कोरून काढला की चित्र दिसू लागते. अशा लाल पांढऱ्या रंगांतील नक्षीने या मंदिराच्या बाह्य़ भिंती सजवलेल्या आहेत. देवी प्राचीन असली, तरी मंदिर मात्र १९३६ साली उभारण्यात आले आहे. मंदिराच्या वरील भागात सज्जा आहे.

अजादीपा

या सर्व भावंडांच्या तुलनेत अजादीपाबाबत मात्र कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तिचे स्थान अजीदिव येथे असल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. मात्र तिच्याविषयीच्या आख्यायिका, संबंधित उत्सव यांची माहिती मिळत नाही. गोव्यातील देवी अभ्यासक जयंती नायक सांगतात ‘या सर्व खरेतर अनार्याच्या देवता. दक्षिण भारतात तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात अनेक उग्र देवता आहेत. गोवा देशाच्या पश्चिम भागात असला, तरी त्याची दक्षिणेकडील राज्यांशी जवळीक आहेच. त्यामुळे इथे आढळणाऱ्या देवता हे त्या उग्र देवतांचेच रूप असावे. आदिम काळातील या देवतांचे भक्त जसजसे नागरी संस्कृतीत रुळू लागले, तसे त्यांच्या देवताही सौम्य होत गेल्या असाव्यात. असे असले तरी त्यांच्या सण-उत्सवांत, प्रथा-परंपरांत आणि व्रतवैकल्यांत आजही कोंबडय़ाचा बळी देणे, मद्याचा नैवेद्य दाखवणे, जळत्या निखाऱ्यावरून चालणे अशा प्रथा आदिम समाजातील काहीशा अघोरी प्रथांची झाक आजही दिसते. पूर्वी अगदी साधी आणि लहान असलेली या देवतांची मंदिरे आता प्रशस्त झाली आहेत. लायराई देवीचे मंदिर पूर्वी अतिशय लहान आणि साधे होते, पण आता तिथे मोठे मंदिर उभारण्यात आले आहे.’

या देवतांचे भक्त कडक व्रतांचे पालन करतात. बदलत्या काळाबरोबर आणि बदलत्या समाजाबरोबर श्रद्धास्थानेही कशी बदलत जातात, याचे मोठे उदाहरण म्हणजे मीराबाई. पूर्वी गोव्यातील हिंदूंपुरती मर्यादित असलेली ही देवी मिलाग्रे सायबिणीच्या रूपात आता ख्रिश्चन समाजानेही स्वीकारली आहे. मंदिरातील ही देवी आता चर्चमध्ये विराजमान झाली आहे. लायराई ही या सात देवतांची सर्वात मोठी बहीण मानली जाते. अजादीपा अदृश्य झाली, असे मानले जाते.

या सात देवी नेमक्या कुठून आल्या, कुठे निघाल्या होत्या, गोव्यातच का थांबल्या ही न उलगडलेली कोडी आहेत. पण त्या आणि त्यांचा भाऊ खेतोबा हे आता गोव्याच्या संस्कृतीचे अविभाज्य घटक झाले आहेत. त्यांच्यातील नात्यांचे बंध आजही कायम आहेत. त्यांच्या भक्तांनी ते जपले आहेत. या सप्तमातृका नाहीत, तरीही मातृत्वाची प्रतीके त्यांच्याशी जोडलेली दिसतात. संततीप्राप्ती, सुबत्ता यांसाठीही त्यांची आराधना केली जाते. बदलत्या समाजाबरोबर त्या समाजाच्या श्रद्धास्थानांचे रूपही कसे बदलत जाते याचे हे उदाहरण!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 1:03 am

Web Title: goa seven sister goddess and their brother
Next Stories
1 ‘यल्लूबाई’चा जागरूक भक्त
2 अश्मयुग ते २१वे शतक मृत्यूविषयक श्रद्धा-परंपरांचा प्रवास
3 हुकले ‘विक्रम’ तरीही…
Just Now!
X