News Flash

गावोगावची देवीस्थाने

लोकप्रिय देवी मंदिरं आणि त्यांच्यामागे असलेल्या आख्यायिका, प्रथा-परंपरा, स्थानमाहात्म्य यातही प्रचंड सांस्कृतिक वैविध्य आहे.

देवी देवस्थान

देवी विशेष
अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, नाशिकची सप्तशृंगी, माहूरची रेणुकामाता या शक्तिपीठांच्या पलीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये भक्तांमध्ये लोकप्रिय असलेली देवी मंदिरं आहेत. त्यांच्यामागे असलेल्या आख्यायिका, प्रथा-परंपरा, स्थानमाहात्म्य यातही प्रचंड सांस्कृतिक वैविध्य आहे.

कोल्हापूरची भुजाईदेवी

कोल्हापूर नैसर्गिक आणि धार्मिकदृष्टय़ा संपन्न आहे. अनेक ऐतिहासिक मंदिरे, त्यांच्या प्रथा-परंपरा, यात्रा-उत्सव यांची एक वेगळी खासियत इथे पाहायला मिळते. येथील देवीच्या वैशिष्टय़पूर्ण मंदिरांच्या यादीमध्ये ‘टिक्केवाडीची भुजाईदेवी’ या मंदिराचा समावेश होतो. कोल्हापूरपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. घनदाट झाडी, वळणावळणाचे रस्ते, डोंगरदऱ्या आणि सभोवताली पसरलेली हिरवाई प्रवास आनंददायी करते. चारही बाजूंनी असलेल्या डोंगरांमध्ये भुजाईदेवीचे मंदिर आहे. भुजाईदेवीची आख्यायिका, प्रथा-परंपरा, यात्रा, नैवेद्य आणि कौल देण्याची विशिष्ट पद्धत महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.  मंदिराच्या विस्तीर्ण पटांगणात दोन दीपमाळा आणि दोन तुळशी वृंदावनं आहेत. मंदिराच्या आवारात काही मूर्तींचे भग्नावशेष ठेवलेले दिसतात.

मंदिराबद्दल पुजारी अनिल गुरव सांगतात,  असे सांगितले जाते की पूर्वी देवी डोंगरावर रहात होती. एक धनगर डोंगरावर जाऊन दररोज देवीची पूजाअर्चा करत असे. मात्र, वृद्ध झाल्यानंतर डोंगरावर जाऊन देवीची सेवा करणे त्याला जमेना. तेव्हा त्याने देवीला विनंती केली की, मला डोंगरावर येऊन पूजा करणे अवघड जात आहे. तेव्हा तूच पायथ्याशी येऊन राहा. देवीने त्याची विनंती मान्य केली आणि सांगितले की, तू पुढे चालत राहा, मी तुझ्या मागून येते; पण मागे वळून पाहू नको. देवीने शेळीचे रूप धारण केले आणि पुजाऱ्याच्या मागे चालू लागली. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर पुजाऱ्याने मागे वळून पाहिले. तेव्हा देवीने त्याच ठिकाणी ठाण मांडले. तेव्हापासून देवीचे मंदिर डोंगराच्या मध्ये आहे. या भुजाईदेवीची मूर्ती किंवा त्या मूर्तीचे छायाचित्र संपूर्ण गावात कुठेच दिसत नाही. कोणाच्याही घरात देवीची मूर्तीही नाही. कारण देवीचे छायाचित्र काढले तर ते काढणाऱ्याला त्रास होतो असे मानले जाते.

पूर्वीचे मंदिर कायम ठेवून त्याच्याच भोवती १९९५ साली मोठे मंदिर उभारण्यात आले. देवीची त्यापूर्वीची मूूर्ती कायम आहे. दसरा तसंच माघ पौर्णिमेला देवीचा उत्सव साजरा केला जातो. यात्रेत देवीला दागिन्यांनी सजविले जाते. सनई-चौघडय़ांच्या गजरात, चांदीच्या रथातून देवीची मिरवणूक काढली जाते. यात्रेमध्ये सासणकाठय़ा नाचविल्या जातात. त्यामध्ये वेळूच्या काठीला देवीचा झेंडा लावतात. हलगीच्या तालावर तो झेंडा नाचविला जातो. लेझीम, दांडपट्टा अशा मैदानी खेळांमधून गावातील युवक शक्तीप्रदर्शन करतात.

नवरात्रीमध्ये गावात प्रत्येक घरात किमान एक किंवा दोघे जण नऊ दिवस उपवास करतात. हे उपवासकर्ते नऊ  दिवस मंदिरातच राहतात. या उपवासात फक्त फलाहार घेतला जातो. अशा कडक उपवासातून देवीची शक्ती आपल्याला मिळते, असा लोकांचा समज आहे. मंदिराच्या बाजूलाच भोंगिराचा डोंगर प्रसिद्ध आहे. तेथील गुहांमध्ये महादेवाची पिंडी आहे.  नवरात्रीमध्ये उपवास करणारे भक्त या पिंडीच्या दर्शनासाठी सातव्या दिवशी हा डोंगर चढतात. मंदिराच्या बाजूला जमिनीवर अंगठय़ाच्या आकाराचा मोठा ठसा उमटलेला आहे. त्याला ‘भीमाचा अंगठा’ असे म्हटले जाते. त्या संदर्भात अशी आख्यायिका सांगितली जाते की, पांडव येथील डोंगरदऱ्यांमधून जात होते तेव्हा भीमाने त्याचा अंगठा कापून इथे टाकला. खरे तर डोंगराची एक उंच बाजू अंगठय़ासारखी वरच्या दिशेला उचलली गेली आहे. या मंदिरातील मूर्तीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तांदळाचे दाणे चिकटवून कौल लावला जातो. मूर्तीच्या डाव्या बाजूचे दाणे खाली पडले तर कौल नकारात्मक आणि उजव्या बाजूचे दाणे पडले तर सकारात्मक असे समजले जाते. गावातील मुलगी लग्न करून सासरी गेली की, मुलीच्या नवऱ्याला तीन वर्षांतून एकदा भुजाई देवीला बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागतो, अशी परंपरा आहे.  गावातील कोणतेही लग्न देवीला कौल लावल्याशिवाय होत नाही. गावचे पोलीस पाटील आणि मंदिराचे पुजारी नेताजी गुरव सांगतात, भुजाईदेवी इथले ग्रामदैवत आहे. टिक्केवाडीचे ग्रामस्थ दर तीन वर्षांनी ‘गुळं’ काढतात. त्या काळात कुणीही घरामध्ये नाही, तर निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे. धनगरांप्रमाणे भटकंती करायची. पशुपक्ष्यांची लहान मुलांना ओळख करून द्यायची. वनौषधींचा शोध घ्यायचा, असे हेतू या प्रथेमागे आहेत. माघवारीनंतर येणाऱ्या पौर्णिमेपासून ही गुळं काढली जातात. या प्रथेच्या निमित्ताने सर्वाचे एकत्र राहणे होते. आपापसातील वाद निवळतात.  लोककलांच्या माध्यमातून मनोरंजन होते.

या प्रथेमध्ये देवीच्या नावाचा जयघोष करत गावकऱ्यांची पहाट उजाडते. राहण्यासाठी शेतशिवारात जी पालं उभारली आहेत त्यालाही मंडळी ‘गुळं’ म्हणतात. सारवलेली जमीन.. दगडाच्या चुलीतील विस्तवावर रटरट फुगणारी भाकरी.. कढईमध्ये शिजणाऱ्या भाजीचा खमंग गंध आणि शिंकाळ्यावर झुलत असलेली दह्य़ाची हंडी हे चित्र प्रत्येक पालामध्ये पाहायला मिळते. दिवसभर शिणलेले जीव रात्री शाहिरी, ओव्या, गीते, भजन आदी कलांमध्ये रमून जातात. विशेष म्हणजे बाहेरचे पाहुणे-नातेवाईक एक-दोन दिवस गुळात राहण्यासाठी आवर्जून येतात. देवीला कौल लावून गावकरी ‘गुळं’ काढतात आणि पुन्हा कौल दिला की, आपापल्या घरी लोक परतात. पूर्वी या प्रथेदरम्यान लोक गावापासून दूर जंगलात असलेल्या बोकाचा वाडा, बसुदेवाचा वाडा, हंडय़ाचा वाडा या धनगर वस्तीवर राहायला जात होते; पण अलीकडे शेतशिवारात राहण्याची प्रथा अवलंबली जात आहे. या प्रथेदम्यान घरात झाडलोट करणे, चूल पेटवणे-जेवण करणे, दिवा पेटवणे आणि घराला कुलूप लावणे अशा गोष्टी वज्र्य मानल्या जातात. तरीही या काळात चोरी अजिबात होत नाही. शिवारात २५-३० कुटुंबांसाठी एकच पाल उभारले जाते. पालातील सगळे लोक रात्री एकाच पंक्तीला बसून वनभोजनाचा आनंद घेतात. अशा या भुजाईदेवीच्या दर्शनासाठी गावाला एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी.

खान्देशी कानबाई

कानबाई चालनी गंगेवरी व माय

साखर पेरत चालनी..

कानबाई चालनी गंगेवरी

कानबाई बैसली चौरंगवरी व माय

हिरवी पैठणी नेसली..

हिरव्या बांगडय़ा हाती व माय

गई सोन्याची बचट.. कानबाई चालनी गंगेवरी

हे अहिराणी भाषेतील गाणं सध्या यू-टय़ूबवर खूप गाजत आहे. अशा गाण्यांच्या माध्यमातून खान्देशातील ‘कानबाई’ देवीची महती महाराष्ट्रभर पसरली आहे. ही ‘कानुबाई किंवा कानबाई’ संपूर्ण खान्देशाचे आराध्यदैवत मानले जाते. श्रावण महिन्यातील नागपंचमीच्या सणाला या देवीचा उत्सव मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो.

स्थानिक नागरिक असे सांगतात की, कानबाई येण्यापूर्वी घराची रंगरंगोटी केली जाते. घरातील भांडी, पडदे, अंथरूण-पांघरूण धुतले जाते. कामानिमित्त बाहेर असेलेले लोक आवर्जून गावी येतात. एखाद्या घरात भांडण होऊन दुरावलेले नातेवाईकदेखील एकत्र येतात. कानबाईचा देश म्हणजेच खानदेश अशी व्युत्पत्ती सांगून कानबाईच्या नावावरूनच खान्देश हे नाव पडले, असेही सांगितले जाते. खान्देशी लोक श्रीकृष्णाला मानतात. त्याच्या कान्हा या नावावरून कानबाई हे नाव घेतले असावे, अशीही शक्यता वर्तवली जाते. खरे तर ही देवी निसर्गदेवता म्हणून प्रचलित आहे. या देवीचे वैशिष्टय़ म्हणजे इतर देवींप्रमाणे कानबाई देवी कोणत्या पाषाणात किंवा मूर्तीमध्ये दिसत नाही, तर नारळाच्या म्हणजेच श्रीफळाच्या रूपात प्रत्येक घरात विराजमान होते. एका कलशामध्ये नारळ ठेवून त्याला पिवळा, लाल आणि गुलाबी पितांबर नेसवला जातो. मोत्याची नथ, मंगळसूत्र, हार, हिरवा चुडा अशा दागिन्यांनी सजवून आंब्याची पानांनी, रानफुलांच्या माळांनी तयार केलेल्या देव्हाऱ्यात कानबाईची स्थापना केली जाते, तर कुठे केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर स्थापना केली जाते. रात्रभर देवीपुढील समई तेवत ठेवली जाते. आणि देवीसमोर अहिरणी भाषेतील कानबाईच्या प्रेमाची गीते गायली जातात. महिला देवीची गाणी गात, नृत्य करत, फुगडय़ा खेळत जागरण करतात. कानबाईच्या नावाने उपवास केला जातो. या काळात वातावरणात उत्साह भरून राहतो.

कानबाईला ‘रोट’चा प्रसाद केला जातो. हे रोट गव्हाचे किंवा तांदळाचे असतात. त्याबरोबर गोड खिरीचा नैवेद्य असतो. रोटांसाठी दळलेले जाडेभरडे पीठ संपेपर्यंत घरामध्ये दुसरा पदार्थ केला जात नाही. साधारणपणे दोन-तीन दिवस हा रोटचा नैवेद्य घरातील लोक खात असतात. एकत्र कुटुंब असेल, तर रोट तयार करण्यासाठी घरातील लहानमोठय़ा सर्व सदस्यांची संख्या मोजून प्रत्येकाची सव्वा मूठ असे धान्य म्हणजेच गहू आणि चण्याची डाळ घेऊन जाडीभरडे दळून आणले जाते. त्यापासून रोट तयार केले जातात. या रोटांसोबत ‘आलन-कालन’ नावाची वेगवेगळ्या पालेभाज्यांची भाजी केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य देवीला दाखविला जातो. सकाळी आणि संध्याकाळी केल्या जाणाऱ्या रोटांना वेगवेगळी नावे आहेत. सकाळच्या रोटांना ‘उगतभानूचे रोट’ म्हणतात. हे रोट तयार करण्यासाठी घरातील स्त्रीला भल्या पहाटे उठावे लागते. कारण, सूर्य उगविण्यापूर्वी रोट तयार करावे, असा संकेत आहे. हे रोट कुणीही खाऊ शकतो. या रोटांवर पुरणाचे दिवे पेटवून देवीची पूजा केली जाते. मात्र, सकाळचे रोट हे दिवसभरात संपवायचे, अशी प्रथा आहे. संध्याकाळी केलेले रोट फक्त कुटुंबातील सदस्यांनी आणि नातेवाईकांनीच खावे, असाही संकेत आहे. ‘रोट’ ही प्रथा सुरू राहण्यासाठी घरात पुत्रप्राप्ती होणं आवश्यक मानलं जातं.

पूर्वी गावचे पाटील आमंत्रणं पाठवत. ज्यांना कापलेले नाही, भाजलेले नाही, अंगावर एकही डाग नाही, अशाच स्त्रियांची त्यातून निवड केली जात असे. स्त्रियांना विविध दागिन्यांनी सजवून त्यांची पूजा केली जात असे. पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखविला जात असे. बैलगाडी भरून भात केला जात असे. हा सर्व स्वयंपाक नदीवरून पाणी आणून केला जात असे. पुजेसाठी निवडलेल्या सुवासिनींनी स्पर्श केलेला नारळ पूजेत वापरला जात असे. कानबाई नव्याने बसवायची आहे, असे लोक चाळीसगावला कानबाईच्या मंदिरात नारळ घेऊन जातात आणि तो तेथील मूर्तीला वाहून परत आणतात. ‘कानबाई’ देवी खरे तर एकच दिवस घरामध्ये असते. दुसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते. या विसर्जन मिरवणुकीत स्त्रिया आपल्या डोक्यावर कानबाईचा चौरंग घेतात. कानबाईची अहिराणी भाषेतील गाणी गात नृत्य करतात. त्यामध्ये पुरुषदेखील आवर्जून सहभागी होतात. रस्त्यावरून ही मिरवणूक निघत असताना घरातील स्त्रिया कानबाईला ओवाळतात. कानबाईच्या विसर्जनानंतर घरामध्ये उरलेले रोट, खीर, पुरणपोळी हा नैवेद्य किंवा प्रसाद पौर्णिमेपर्यंत संपवावा, असा संकेत आहे.

सात वाहनांवरील माढेश्वरी देवी

सोलापूरमध्ये माढय़ाचा किल्ला प्रसिद्ध आहे. किल्ल्याचे बुरूज आजही दणकट आहेत. मात्र, किल्ल्यामध्ये पाहण्यासारखे काहीही शिल्लक राहिलेले नाही. मात्र, सुमारे ३०० मीटर अंतरावर माढेश्वरीचे मंदिर आहे. माढेश्वरी गावचे ग्रामदैवत असल्याने तालुक्याला माढा असे नाव मिळाले, असे येथील ज्येष्ठ नागरिक सांगतात. मंदिराला चारही बाजूंनी मोठी तटबंदी आहे. मोठमोठय़ा दगडी शिळांचे मंदिर उभे केलेले आहे. मंदिराच्या तटबंदीच्या आतील बाजूस छोटय़ा-छोटय़ा कमानी असलेल्या दगडी खोल्या आहेत. त्याही भक्कम बांधलेल्या आहेत. मंदिराच्या आसपास मारुती, गणेश, राम आदी देवांची मंदिरे उभारलेली आहे. कोरीव दगडात ही मंदिरे उंच उभी आहेत. मंदिराच्या उत्तर दिशेच्या दरवाजासमोर रावराजे निंबाळकरांची समाधी आहे. तसेच दक्षिण दिशेला दोन पुजाऱ्यांची समाधी आहे. मात्र, या समाधी अलीकडील काळात बांधलेल्या आहेत, अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली.

मंदिराला तीन शिखरे आहेत. उजव्या सोंडेचा चिंतामणी नावाचा गणपतीदेखील या परिसरात पाहायला मिळतो. तसेच काही दुर्मीळ वीरगळही येथे आढळतात. माढेश्वरी देवीची पूजाअर्चा करणारे बाळू पुजारी सांगतात की, माढेश्वरीचे मंदिर १६६७ साली रावराजे निंबाळकर यांनी बांधले. हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील हे मंदिर आहे. महाराष्ट्रावर चाल करून आलेला अफजल खान रावराजे निंबाळकरांचा पाठलाग करत होता. रावराजे एका छोटय़ाशा मंदिरात लपून बसलेले होते. त्या मंदिरातील देवीला त्यांनी साकडे घातले की, मला या संकटातून वाचव. मी तुझे मंदिर बांधेन. पुढे रावराजे अफजल खानाच्या संकटातून सुखरूप बाहेर पडले. मग त्यांनी माढेश्वरी देवीचे मंदिर उभारले. पूर्वीचे मंदिर छोटे होते. मंदिराच्या बाजूला कल्लोळ (विहीर) आहे. त्यातून देवी प्रकटली आहे. माढय़ाच्या किल्ल्यातून मंदिराकडे जाण्यासाठी एक भुयारी मार्ग होता. तो फक्त स्त्रियांसाठी उपयोगात असे. आता ते भुयार बंद करण्यात आले आहे.

या देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, फार वर्षांपूर्वी माढा गावातील शेतकरी रोज नियमितपणे तुळजापूरच्या भवानी देवीला नैवेद्य घेऊन जात असे. अनेक वर्षे त्याने असे केले. मग तो देवीला म्हणाला की, आता खूप थकलो. इथपर्यंत येऊन तुझी सेवा करणे मला जमणार नाही. देवी प्रकट झाली अन् म्हणाली, आता मीच तुझ्याबरोबर येते. तू चालायला सुरुवात कर; पण मागे वळून पाहू नकोस. शेतकरी ज्या रस्त्याने प्रवास करत होता त्या मार्गात मनकर्णिका नावाची नदी होती. तो शेतकरी चालून-चालून थकल्यामुळे नदीत उतरला. त्याने थंड पाण्याने तोंड, हात-पाय धुतले आणि मग त्याने मागे वळून पाहिले. देवीने घातलेली अट शेतकऱ्याकडून मोडली गेली. तेव्हा देवी अदृश्य झाली. त्यानंतर त्याच ठिकाणी पुजाऱ्याने देवीचे मंदिर बांधले. तेव्हापासून देवी या ठिकाणी वास्तव्य करून गावाचे संरक्षण करत आहे, असे गावकरी सांगतात.

यात्रेची माहिती देताना परमेश्वर पुजारी सांगतात की, कोजागरी पौर्णिमेला माढेश्वरी देवीची यात्रा भरते. या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात. माढेश्वरीची घोडा, हत्ती, सिंह, नंदी, हरीण, मोर, काळवीट अशी सात वाहने आहेत. ही सगळी वाहनं फायबर, भुसा आणि लाकडांपासून तयार केलेली आहेत. रात्री १२ वाजता या वाहनांवरून देवीचा छबिना (मिरवणूक) काढला जातो. प्रत्येक वाहनाचा मान हा विशिष्ट समाजाला दिलेला आहे. त्यामध्ये हत्तीचा मान माळी समाजाला, घोडा, मोर, काळवीटाचा मान मराठा समाजाला, सिंह, नंदी आणि हरिण याचा मान धनगर समाजाला देण्यात आला आहे. हे सर्व जण आपापल्या वाहनात देवीचे प्रतिरूप घेऊन वाजतगाजत, नाचत मातंगाई मंदिरात जातात. माढेश्वरी देवीच्या मंदिराच्या समोरच उत्तरेला शेतामध्ये मातंगाई देवीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथे असलेल्या मातंगाई देवीच्या मूर्तीला देवीला हिरवी साडी नेसवलेली असते. मातंगाई देवी महार-मांग समाजाची देवी आहे. पूर्वी या समाजातील लोकांना मंदिरात प्रवेश नव्हता. या संदर्भात असे सांगितले जाते की, तरीही मातंगाई देवी ही माढेश्वरी देवीला भेटायला जात असे. म्हणून मुख्य मंदिरासमोरच मातंगाई देवीचे मंदिर उभे केलेले आहे. त्यामुळे देवीचा छबिना मातंगाईच्या मंदिरात जाऊन परत येतो. नवरात्रामध्ये देवीची पूजाअर्चा केली जाते. भोगी (देवीची विशिष्ट पूजा) झाल्याशिवाय कोणतेही शुभकार्य किंवा लग्न केले जात नाही. देवीसमोर होमहवन करण्यासाठी कुंड आहे.  देवीचे कपडे धुणे, मंदिराची साफसफाई आणि इतर कामे रत्ना लिंगाप्पा पवार आणि शंकर पंढरीनाथ रणपिसे करतात. त्यांना देवीची सेवा केल्याबद्दल महिन्याला १०० पगार दिला जातो. देवीच्या सेवेबद्दल त्यांना मंदिरात आलेले भक्त बाजरी, ज्वारीचे पीठ, तांदूळ आणि फळे त्यांच्यासमोर असलेल्या परडीत टाकतात. हे त्यांचे वंशपरंपरागत काम आहे.

रत्नाबाईंना सांगतात की, मंगळवारी आणि शुक्रवारी इथे भरपूर भक्त येतात. त्यांच्याकडून जे मिळते, तेच आम्ही खातो. देवीची सेवा करायला मिळते, हे आमचे भाग्य आहे. माझ्यानंतर माझा थोरला मुलगा देवीची सेवा करणार आहे. हे काम वंशपरंपरेनुसार पुढे चालत राहणार आहे.

मंदिराच्या मागील बाजूला दगडावर देवीची पाऊलखूण आहे. यापूर्वी अनेक संशोधकांनी मंदिर, परिसरातील वीरगळ आणि किल्ला पाहण्यासाठी भेटी दिलेल्या आहेत. वेळ काढून माढेश्वरी देवीचे पुरातन मंदिर आणि आसपासची मंदिरे, विशेष म्हणजे माढय़ाचा किल्ला पाहण्यासाठी भेट जरूर द्यावी.

तांबव्याची वज्रेश्वरी देवी

दूरवर पसरलेले माळरान, काटेरी झुडपे, मध्येच कुठेतरी उसाची शेती आणि बाजूलाच वाहणारी निरा नदी पाहत पाहत आपण तांबवे गावात प्रवेश करतो. माळशिरस तालुक्यातील अकलूजपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव साधारणपणे अडीच-तीन हजार लोकसंख्येचे आहे. गावात प्रवेश करताना लक्षात येते की, वाटेत जी छोटी वस्ती लागते, त्या वस्तीमध्ये प्रत्येक घरासमोर देवीचे छोटेसे मंदिर आहे. लाल, पिवळा, हिरवा, केशरी अशा रंगांनी रंगविलेली मंदिरे चटकन प्रवाशांच्या नजरेत भरतात. साधारणपणे सहा फूट उंच आणि सहा फूट लांब असणाऱ्या या मंदिरांमध्ये रेणुकामाता, लक्ष्मीआई, मरीआई आदी देवींच्या मूर्ती पाहायला मिळतात. या मूर्ती दगडाच्या आहेत. यल्लमा, लक्ष्मी, पद्मावती आदी देवींची छायाचित्रे इथे लावलेली दिसून येतात. मूर्तीला हिरवी साडी नेसवलेली असते. तिचा मळवट (कपाळ) कुंकवाने लेपलेला दिसतो. त्रिशूळ, डमरू आदी गोष्टीही त्या मंदिरात दिसून येतात. या वस्तीतून उजवीकडे वळण घेतले की, ५०० मीटर अंतरावर आपल्याला निरा नदीचे मोठे पात्र आणि नदीला लागूनच हेमाडपंथी शैलीतील वज्रेश्वरी देवीचे दगडी मंदिर दिसू लागते.

मंदिराचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे आपल्या देशात वज्रेश्वरी देवीचे मंदिर केवळ दोनच ठिकाणी आढळते. त्यातील एक मुंबईजवळ असणाऱ्या वसईमध्ये तर, दुसरे सोलापूरमधील तांबवे गावात. तांबव्यातील वज्रेश्वरी देवीचे मुख पूर्व दिशेला आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर अखंड मोठय़ा दगडात कोरलेले खांब आहेत. त्या खांबांच्या बाजूने देवीच्या गाभाऱ्यात प्रवेश करता येतो. गाभाऱ्यात गाईच्या चेहऱ्यासारखी देवीची केशरी रंगाची मूर्ती निदर्शनास येते. मंदिराचे पुजारी बबन कोंडिबा नारायण-निंबाळकर देवीची आख्यायिका सांगतात की, देवीची एक गाय होती. ती दररोज एका शेतकऱ्याच्या शेतात चरायला जात असे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत होते. एकदा तो शेतकरी गाईच्या मागून कुंडापर्यंत आला. तिच्यामागोमाग त्या कुंडामध्ये उतरला, तेव्हा देवी प्रकट झाली. देवीने शेतकऱ्याला इथे येण्याचे कारण विचारले असता शेतकऱ्याने सांगितले की, गाईमुळे माझ्या शेतीचे नुकसान होत आहे. तेव्हा देवीने गाईचे शेण घेऊन जाण्यास सांगितले. कुंडाच्या बाहेर येताना त्याच्या हातून थोडे शेण खाली पडले. जेवढे शेण त्याच्या हातात शिल्लक होते तेवढय़ा शेणाचे सोने झाले. तो कुंड आजही निरा नदीच्या मध्यभागी आहे.

गावकरी असे मानतात की, या कुंडात अंघोळ करून भिजलेले केस देवीने झाडले की जे पाणी दगडावर पडायचे, त्याच्यामुळे दगडावर काळे डाग पडलेले आहेत. कडक उन्हाळ्यात निरा नदीतील पाणी आटले तरी कुंडातील पाणी अजिबात आटत नाही. नदीतील दगडांवर बैल, गाय, घोडा, मासा, उंट आणि हत्ती आदी प्राण्यांच्या पाऊलखुणा आढळतात. मंदिराच्या मागील बाजूस भिंतीवर दगडामध्येच माशाची आकृती कोरलेली आहे. याबद्दल गावकरी सांगतात की, देवीच्या कुंडात हत्ती आणि उंटाएवढे मासे  होते. त्यांच्या नाकामध्ये बैलगाडीच्या चाकाएवढी नथ होती. ही देवी बैलाच्या रूपात गावात आली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यासमोर एक दगडी ताट आहे. या ताटाची आख्यायिका अशी सांगितली जाते की, पूर्वी हे ताट सोन्याचे होते. त्यामध्ये स्त्रिया एकत्र जेवत. आजही मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी सात, अकरा, एकवीस अशा स्त्रिया देवीच्या ताटात एकत्र जेवतात. तर, पूर्वी या सोन्याच्या ताटात जेवताना एका स्त्रीने त्या ताटाचा एक तुकडा चोरला, तेव्हापासून ते ताट कायमचेच दगडाचे झाले.

खरेतर एका मोठय़ा चौथऱ्यावर हे वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधलेले आहे. त्याला एक कमान आणि दगडी पायऱ्या आहेत. चौथऱ्यावरून खाली उतरले की, मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनेक छोटे छोटे शेंदूर फासलेले दगड पाहायला मिळतात. संतोष कुदळे या दगडांची आख्यायिका सांगतात की, वज्रेश्वरी देवी आणि दैत्य (राक्षक) यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यामध्ये देवीने राक्षसांचा पराभव केला. राक्षस देवीला शरण आले. त्यांनी एका रात्रीत तांबवे गावात हे देवीचे मंदिर बांधले तेव्हा देवी या गावात वसली. मंदिरासमोरचे शेंदूर फासलेले दगड या दैत्यांचे प्रतीक आहेत. या दगडांच्या गर्दीत चार मोठे दगडी खांब उभे करून त्यावर दगडाचेच छत असलेला आणखी एक छोटा चौथरा तयार केला आहे. त्यात दगडी पादुका आहेत. त्या पादुका वज्रेश्वरी देवीच्या आहेत. मंदिराच्या बाजूलाच फिरते शिवलिंग आहे. देवीचे भक्त शिवलिंगावर कौल लावतात. शिवलिंगाच्या वरच्या बाजूला एक नाणे ठेवून शिवलिंग फिरविले जाते. नाणे उजव्या दिशेला पडले की, तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात ते यशस्वी होणार आणि नाणे डाव्या बाजूला पडले तर तुमचे काम अयशस्वी होणार नाही, असे मानले जाते.

वज्रेश्वरी देवीची यात्रा माघ पौर्णिमेला भरते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ आदी ठिकाणांहून भक्त दर्शनाला येतात. इथे एक वेगळी प्रथा आहे. त्यानुसार निपुत्रिक भक्त ‘मला पहिला मुलगा झाला तर त्याला सज्जावरून खाली टाकेन,’ असा देवीला नवस बोलतात. त्यानुसार मंदिराच्या दगडी छतावरून मुलाला खाली टाकले जाते. आणि खाली चादरीमध्ये झेलले जाते.  यालाच सज्जावरून टाकणे म्हणतात. मध्यंतरी या प्रथेवरून वाद निर्माण झाला होता.

यात्रेमध्ये भूषण राजकुमार इनामदार यांना देवीच्या नैवेद्याचा मान मिळाला आहे. तर, शेजारीच असणाऱ्या सपाटणे गावाला देवीची पालखी बनविण्याचा मान मिळालेला आहे. यात्रेमध्ये देवीच्या समोर असलेल्या पाषाणरूपी दैत्यांना बोकडाचा नैवेद्य दिला जातो. मात्र, तो मांसाहारी नैवेद्य देवीसमोर आणला जात नाही. तिच्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. त्याचबरोबर शेतात पिके चांगली आली, तर देवीच्या कुंडात भात, भाकरी, भाजी, पुरणपोळी टाकतात.

पाटणची लक्ष्मीदेवी

‘कोयनेची सहल’ काढली तर, आपल्याला वाटेत धरणं, धबधबे, हिरवीगार शेती, अखंडपणे वाहणारे पाणी, मोठमोठे डोंगर, गडकिल्ले, वळणावळणाचे रस्ते लागतील. पाटण शहरात वसलेला कोयना हा तालुका आणि पाटण हे शहर ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध आहे. समर्थ रामदासांचा अधिवास असलेले चाफळचे राम मंदिर, सरदार पाटणकरांच्या वाडय़ातील राम मंदिर, नागोजीराव पाटणकर ग्रंथालय, निनाईदेवीचे मंदिर, धारेश्वर दिवशी, समर्थाचा मठ, दक्षिणमुखी मारुतीचे मंदिर, अशा किती तरी धार्मिक स्थळांनी पाटण समृद्ध आहे. अशाच धार्मिक स्थळांमध्ये पाटणची ग्रामदेवता लक्ष्मीआईचा समावेश होतो.

पाटणच्या उत्तरेला निसर्गरम्य परिसरात पाटणची ग्रामदेवता लक्ष्मीदेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागील बाजूस डोंगररांगांतून वेडीवाकडी वळणे घेत केरा नदी वाहते, तर दक्षिणेला कोयना नदी आहे. नेमक्या याच ठिकाणी एका छोटय़ाशा टेकडीवर लक्ष्मीचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात मोठी कोरीव दीपमाळ आहे. शेजारीच छोटेसे शिवलिंग आणि नंदी आहे. नागाचे छोटेसे दगडी मंदिरदेखील उभे करण्यात आलेले आहे. लक्ष्मीदेवी या पार्वतीच्या रूपाची पाटण शहरावर कृपादृष्टी आहे, ती गावाचे रक्षण करते. सगळ्यांचे मंगल करते. तिच्या कृपेने पाऊस पडतो. शेती पिकते, अशा येथील नागरिकांची श्रद्धा आहेत.

मंदिरातील मूळ मूर्ती पाषाणाची असून त्यात राक्षसाला पायदळी तुडविल्याचे दिसून येते. कराड, सातारा, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, पुणे, मुंबईतून लोक लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी येतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुखी ठेव, अशी प्रार्थना करतात आणि मंदिराच्या उंबरठय़ावर माथा टेकवतात. लक्ष्मीदेवी पाटणची ग्रामदेवता असली तरी पहिली पूजा तिची बहीण निनाईदेवीची केली जाते. या निनाईदेवीचे मंदिर लक्ष्मीआईच्या दर्शनाला जाताना पहिल्यांदा लागते. भक्त पहिल्यांदा तिचे दर्शन घेतात आणि नंतर लक्ष्मीदेवीच्या दर्शनाला जातात. निनाईदेवीला भैरवनाथ नावाचा भाऊ आहे. त्याची अशी कथा सांगितली जाते की, पूर्वी हा भैरवनाथ पाटणच्या मुख्य पेठेत होता. मात्र, लोक त्या ठिकाणी कचरा टाकीत होते. त्यामुळे रागाने पाटण शहराच्या पूर्वेकडे असणाऱ्या दातेगडाच्या पायथ्याशी म्हणजेच टोळेवाडी या गावात त्याने आपले बस्तान बसविले. तरीही त्याच्या मूळ ठिकाणी भैरवनाथाचे छोटेसे मंदिर आहे. लक्ष्मीच्या दर्शनाला जाताना भक्त क्षणभर उभे राहून भैरवनाथाचे दर्शन घेतात आणि टोळेवाडीकडे चेहरा करून त्याला नमस्कार करतात.

लक्ष्मीदेवीची यात्रा पाटण तालुक्यातील त्या वर्षांतील शेवटची यात्रा असते. यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आखाडे रंगतात. विविध वस्तूंची दुकाने सजतात. लोकनाटय़ तमाशा भरविला जातो. असे मानले जाते की, देवीची यात्रा झाल्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होते. त्यामुळे पाऊस चांगला व्हावा आणि पिकेही भरभरून यावी, अशी प्रार्थना पाटण शहरातील लोक करतात. यात्रेत देवीचा छबिना शहरात निघतो. त्या वेळी टोळेवाडीहून भैरवनाथाची पालखी देवीच्या भेटीला येते. परंपरेनुसार शेटे (देशमुख) टोळेवाडीकरांना निमंत्रणाचा नारळ दिला जातो. भैरवनाथाची पालखी पाटणच्या वेशीवर आल्यावर देवस्थानचे प्रमुख आणि गावकरी तिचे स्वागत करतात. भैरवनाथाची पालखी मंदिरात आल्यानंतर लक्ष्मीदेवीची पालखी आणि भैरवनाथाची पालखी या दोन पालख्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. ही पालखी मुख्य मंदिरापासून निनाई मंदिर, ब्राह्मणपुरी, लायब्ररी चौक, भैरवनाथ मंदिर, राजवाडा अशी जाते.

या पालखी मिरवणुकीत बारा बलुतेदारांचा समावेश असतो. पुजारी म्हणून गुरव, पालखीचे वाहक म्हणून भोई, पालखीवर छायाछत्र देण्यासाठी माळी, भंडारा-धूर-अगरबत्तीसाठी आत्तार, आंबीलघुगऱ्यासाठी शेटे, अबदागीरसाठी नाभिक, पाणीपुरवठय़ासाठी कोळी, चवरीसाठी चौधरी, गोंधळासाठी कुंभार, सामाधकाठीसाठी मुजुमले, धूप-आरतीसाठी ठाकर, दिवटीसाठी चर्मकार आणि संरक्षणासाठी मातंग यांचा देवीच्या जत्रेत पालखी सोहळ्यात सहभाग असतो. गावाबाहेर स्थलांतरित झालेला वर्ग देवीवरच्या श्रद्धेपोटी जत्रेला आवर्जून जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 1:04 am

Web Title: goddess temples in different places in maharashtra
Next Stories
1 गोव्यातील आठ भावंडे
2 ‘यल्लूबाई’चा जागरूक भक्त
3 अश्मयुग ते २१वे शतक मृत्यूविषयक श्रद्धा-परंपरांचा प्रवास
Just Now!
X