सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, @joshisuhas2
२०१२ पासून सोन्याच्या आयातीवर अनेक र्निबध लादल्यानंतर आयातीवर काही प्रमाणात परिणाम झाला, पण दुसरीकडे सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत गेली आहे. दरवेळी काही तरी नवीन युक्ती योजून होणाऱ्या घटनांमुळे आता तस्करीलाच सोन्याचे दिवस आले आहेत.

सोन्याची तस्करी म्हटली की सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभे राहते ते ८०-९०च्या दशकातील चित्रपटांचे. ‘मोना डार्लिग, सोना कहाँ हैं’ असे संवाद, समुद्रकिनारी विजेरीचे सिग्नल्स देऊन छोटय़ा बोटी आणि मेटाडोअरमधून नेली जाणारी सोन्याच्या बिस्किटांची खोकी. कधीकाळचे हे हमखास दृश्य आता पुरते पालटले असून आज ही  तस्करी विविध मार्गानी होते आहे.  त्यामध्ये इतके वैविध्य आहे की केवळ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच २०१७-१८ या आíथक वर्षांत ४४२ किलो चोरटे सोने पकडण्यात आले आहे. तब्बल ९०७ व्यक्तींनी हे सोने चोरून देशात आणायचा प्रयत्न केला होता. ही आकडेवारी डोळे विस्फारणारी असली तरी नवीन अजिबात नाही. कारण या वाढत्या सोने तस्करीची बीजं ही पाच वर्षांपूर्वीच रोवली गेली आहेत. २०१२-१३ च्या तुलनेत (१२ किलो) २०१७-१८ मधील सोने तस्करीतील ही वाढ कैक पटीने वाढलेली आहे.

सोन्याचा वापर करणाऱ्यांमध्ये जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. पण आपल्या देशात सोन्याची एकही खाण नाही. त्यामुळे अर्थातच हे सर्व सोनं आयातच करावं लागतं. त्याची किंमत परकीय चलनात चुकवावी लागते. परिणामी आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीवर ताण पडतो आणि देशाच्या चालू खात्यातील तूट वाढते. ही तूट रोखण्यासाठी २०१२ पासून आपल्याकडे अनेक प्रयत्न केले गेले. तेव्हा प्रति दहा ग्रॅम ३०० रुपये असणारा आयात कर आज सोन्याच्या एकूण मूल्यावर दहा टक्के इतका आहे. सरकारने जानेवारी २०१३ ते एप्रिल २०१३ या काळात हा दर वाढवत नेला. २०१३ च्या एप्रिलमध्ये सोन्याच्या आयातीवर आणखी एक र्निबध लागू करण्यात आला. त्यानुसार एकूण आयातीच्या २० टक्के सोने हे दागिन्यांच्या स्वरूपात निर्यात करणे बंधनकारक करण्यात आले. तसेच आयात करण्याचे अधिकार केवळ काही ठरावीक सरकारी संस्थानाच देण्यात आले. या सर्व घटनाक्रमाच्या पाश्र्वभूमीवर नियत मार्गाने सोने मिळवणे कठीण तर झालेच पण त्याचबरोबर महागदेखील झाले. त्यामुळे मधल्या काळात कमी झालेल्या सोन्याच्या चोरटय़ा आयातीने पुन्हा उचल खाल्ली. चोरटय़ा सोन्याला वाटा मिळत गेल्या आणि एक समांतर चोरटी बाजारपेठ विस्तारत गेली. ही यंत्रणा अतिशय वैविध्यपूर्ण पद्धतीने कार्यरत असते. एका पद्धतीने आणलेलं चोरटं सोनं पकडलं गेलं की लगेच त्या पद्धतीत बदल केला जातो. एक प्रकारची संघटित टोळीच यामागे कार्यरत असावी असे यातून दिसून येते. २०१३-१४ या वर्षांत सोन्याची तस्करी करणारे लोक ज्या पद्धती वापरायचे त्या पद्धती आता जवळपास कालबा म्हणाव्या लागतील असे प्रकार आज केले जातात. बुटाच्या तळव्यात सोनं दडवणं, बॅगेचं हॅण्डल सोन्याचं करणं, कपडय़ांमध्ये सोनं दडवणं, कमी कलाकुसरीचे दागिने तयार करून ते अंगावर घालणं असे प्रकार सुरुवातीच्या काळात केले जायचे. पण आज त्या पलीकडे हे सारं जाऊन पोहोचलं असल्याचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाचे अधिकारी सांगतात.

चोरटं सोनं आणण्याच्या सध्याच्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या पद्धतीची उकल साधारण सहा महिन्यांपूर्वी मुंबई विमानतळावर करण्यात आली. या पद्धतीत सोन्याची पावडर करून ती एक विशिष्ठ केमिकल बरोबर एकत्र केली जाते. त्यानंतर कणकेसारखा लगदा तयार होतो. हा लगदा मग कोणत्याही प्रकारच्या वस्तूवर लेप दिल्याप्रमाणे थापता येतो. अशा प्रकारचा लेप  पाठीसाठी वापरल्या जाणाऱ्या पट्टय़ांवर देण्यात येतो. किमान एक -दोन किलोचा लेप दिलेला पट्टा एक माणूस सहजपणे घेऊन जाऊ शकतो. सहा महिन्यांपूर्वी हा प्रकार मुंबई विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी संबंधिताला पकडलं. त्यानंतर हा प्रकार फारसा दिसून आला नाही, पण गेल्या पंधरवडय़ातच कोची विमानतळावर पुन्हा अशा प्रकारचा पट्टा वापरून सोन्याची तस्करी पकडण्यात आली. देशातील अन्य काही विमानतळांवरदेखील असाच प्रकार आढळून आला आहे.

तस्करी घडवून आणणाऱ्या संघटनांनी वापरलेला आणखीन एक भन्नाट प्रकार म्हणजे सरबताच्या पावडरींमधून सोन्याची तस्करी करणं हा होय. सोन्याचे अगदी बारीक तुकडे करून ते सरबताच्या पावडरमध्ये एकत्र केले जातात. ते पाकीट पुन्हा पहिल्यासारखं बंद केलं जातं. हा प्रकारदेखील सुरुवातीला काही दिवस निर्धोकपणे सुरू राहिला. पण एकदा या पाकिटाची शंका आल्यामुळे एक्सरेमधून ते पाकीट पास केलं असता त्यातील धातू लक्षात आला.

असाच आणखीन एक प्रकार म्हणजे सोने वितळवून त्याचा वापर सुटकेसच्या अंतर्गत भागातील रॉडसाठी करणं अशी प्रकरणेदेखील गेल्या वर्षभरात घडल्याचे हवाई गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी सांगतात. खाद्यपदार्थाशी निगडीत आणखीन एक प्रकार गेल्या काही वर्षांत होताना दिसून आला आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांकडे चॉकलेट्स हमखास असतात. त्यांचाच वापर तस्करांनी केल्याचे विमानतळावरील अधिकारी सांगतात. या चॉकेलटची आवरणे ही सोन्यापासून तयार केली जातात.

प्रवाशांच्या माध्यमातून ही तस्करी होत असली तरी अनेक वेळा विमानातील कर्मचारी वर्गदेखील या तस्करीसाठी खूप महत्त्वाचा घटक असतो. एकतर हे कर्मचारी नियमितपणे या मार्गावर प्रवास करत असतात. तसेच एकूणच सुरक्षेच्या जाळ्यात त्यांच्याकडे तितके कठोरपणे पाहिले जाण्याची शक्यता नसते. २०१५-१७ या काळात विमान वाहतूक कंपन्यांच्या २८ कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीसाठी पकडण्यात आले होते. याच्या क्लृप्त्यादेखील खूप वेगवेगळ्या असतात. तस्करी करणाऱ्या समूहातील एखादा माणूस त्याने आणलेले सोने विमानातच सोडून देतो (कधी कधी ते विमानातील स्वच्छतागृहातदेखील ठेवले जाते). मग विमान कंपनीचा स्वच्छता कर्मचारी ते सोने तेथून बाहेर काढतो. काही कर्मचारीच हे सोने स्वत:बरोबर घेऊन विमानतळावरून बाहेर आणतात. विमानतळाची सुरक्षा कशी आहे यावर हे बरेचदा अवलंबून असते. मुंबई विमानतळाला बाहेर जाण्यासाठी अनेक वाटा असल्याने त्याचा वापर काही कर्मचाऱ्यांकडून केला जात असल्याची बरीच चर्चा मध्यंतरी झाली होती. त्यावर नंतर काही निष्पन्न झाले नाही. मात्र दोन महिन्यांपूर्वीच विमानतळावरील एका कर्मचाऱ्याने तब्बल २३ किलो सोन्याची तस्करी करण्यात अंशत: यश मिळवले होते. नी कॅपमध्ये, पाठीच्या पट्ट्यामध्ये दडवून त्याने हे सोने आणले होते. त्या सर्व सोन्यासहित तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेरदेखील आला. हे सोने ज्या व्यक्तीस द्यावयाचे होते तिला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये जात असताना तेथील मेटल डिक्टेटरमधून जाताना तो गडबडला. त्याचा संशय आल्यामुळे हॉटेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला थांबवले व स्थानिक पोलिसांकडे सुपूर्द केले.

सोन्याच्या तस्करीसाठी या अभिनव पर्यायांचा वापर होत असला तरी काही पारंपरिक पद्धतींचा वापर आजही केला जाताना दिसत असल्याचे सीमा शुल्क विभागाचे अधिकारी सांगतात. सर्वाधिक वापरली जाणारी पारंपरिक पद्धत म्हणजे शरीराच्या आत सोने दडवून आणणे. मात्र या पद्धतीतदेखील आता अनेक प्रयोग होत असून त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचे समजते. अशा प्रकारे शरीरातून सोन्याची वाहतूक करताना त्या प्रवाशाने काय आणि किती खायचे, पाणी किती प्यायचे अशा सर्व बाबींचे प्रशिक्षण त्यांना दिले जाते. जेणेकरून भारतात आल्यावर ते सोने विनात्रास पुन्हा शरीरातून मिळवता येऊ शकते. गुद्द्वारामध्ये सोने दडवून आणण्याचे काही प्रकार आजही अशाच प्रशिक्षणाच्या माध्यमातून केले जात असल्याचे सांगितले जाते.

या सर्व प्रकारांबरोबरच आणखी एक प्रकार गेल्या काही वर्षांत मूळ धरू लागला आहे. त्याबाबत सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून दुजोरा मिळत नसला तरी ही पद्धत रूढ असल्याचे सूत्रांकडून समजते. आपल्या देशात हवाई वाहतुकीतून चोरटय़ा मार्गाने येणारे बहुतेक सोने हे दुबई आणि हाँगकाँग या ठिकाणाहून येते. गुन्हेगारीची कसलीही पाश्र्वभूमी नसणाऱ्या व्यक्ती हेरून त्यांना या ठिकाणी पाठवणे किंवा त्यांच्या प्रवासाचा वापर सोन्याच्या तस्करीसाठी करणे असे प्रकार सध्या घडत असल्याचे समजते. प्रवास खर्च आणि त्यांच्याकडे सुपूर्द केलेली वस्तू पोहोचवण्याचा खर्च देऊन अशा गोष्टी केल्या जातात.

सीमाशुल्क विभागाचे अधिकारी सांगतात की यामागे एकच एक संघटित टोळी नाही. परदेशात एका वर्षांहून अधिक वास्तव्य केले असेल तर एक किलो सोने विना आयात शुल्क आणण्याची मुभा आहे. पूर्वी अशा व्यक्तींना हेरून त्यांच्याद्वारे हा व्यवसाय केला जात असे. अशा व्यक्तीने आणलेले सोने तिचे स्वत:चे नाही हे जाणवत असते. मात्र अशा प्रवाशांकडे अधिकृत पावती असल्यामुळे त्यांना पकडणे अवघड ठरते. सीमाशुल्क विभागाचे प्रवाशांच्या एकूणच हालचालींवर लक्ष असतेच. पण बहुतेक वेळा तस्करीपूरक देशांमध्ये प्रथम प्रवास करणाऱ्यांकडे फारसे संशयाने पाहिले जात नाही. त्याचाही फायदा उचलला जातो. पण एखाद्या व्यक्तीचे जाणे-येणे वरचेवर होत असेल तर मात्र त्या व्यक्तीकडे नक्कीच लक्ष जाऊ शकते. मग त्या व्यक्तीचा व्यवसाय, तो कशासाठी प्रवास करतो हे सर्व तपासणे शक्य होते.

सोने तस्करीच्या घटनांच्या आकडेवारीकडे पाहिले असता एक लक्षात येते, गेल्या २०१७-१८ मध्ये तस्करी पकडलेली प्रकरणे (९०७)  तुलनेत पकडलेल्या सोन्यापेक्षा खूप जास्त आहेत. याचाच अर्थ तस्करी करवणारे अधिकाधिक प्रवाशांचा वापर करत असतील अशी शक्यता आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात सोन्याची तस्करी पकडली जात असतानादेखील ही संख्या दिवसेंदिवस वाढत का जाते याचे एक सोपे गणित हवाई गुप्तचर विभागातील अधिकारी सांगतात. ते म्हणतात, सोने तस्करी हा या सर्व लोकांचा व्यवसायच असतो. त्यामुळे एकदा पकडले गेले तरी पुढच्या वेळी ते जास्त सोने चोरटय़ा मार्गाने आणून झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करतात. काही महिन्यांपूर्वी या विभागातील लोकांनी मुंबई विमानतळावर तब्बल एक कोटी रुपये किमतीचे चोरटे सोने पकडले होते. सोने आणणाऱ्या या प्रवाशाची हकिकत खूपच रंजक होती. ही व्यक्ती दक्षिण भारतातील होती. या प्रवाशाने सुरुवातीस एकदा कोणत्यातरी तस्करासाठी चोरून सोने आणले. त्यात तो यशस्वी झाला. त्यावेळी त्याला या सोन्याची किंमत आणि महत्त्व लक्षात आले. मग त्याने स्वत:चे घर ५० लाख रुपयांना विकले आणि त्या किमतीचे सोने आणले. त्यातून मिळालेला फायदा पुन्हा अशा चोरटय़ा सोन्यातच गुंतवला. असे करता करता त्याने एक कोटी रुपयांचे सोने आणले तेव्हा नेमका तो सीमाशुल्क विभागाच्या कचाटय़ात सापडला.

चोरटय़ा सोन्याच्या या साऱ्या कथा ऐकून मती गुंग व्हायला होते. पण आपल्या देशात सोन्याला असलेली मागणी पाहता हे सारे अशाच पद्धतीने वाढतच जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांतील सोने तस्करीच्या या घटना काही ठरावीक प्रसंग सोडले तर बहुतांशपणे कमी रकमेच्या आढळतात. त्यामागे आणखीन एक कारण आहे. ते म्हणजे विमानतळावर ग्रीन चॅनल. म्हणजे तुमच्याकडे सीमाशुल्क भरण्याजोगी कोणतीही वस्तू नसेल तर या चॅनलमधून जाता येते. अशा प्रवाशांचा संशय आला तरच सीमाशुल्क विभागाचे अधिकारी अटकाव करतात. या चॅनलमधून जाताना जर सीमाशुल्क विभागाने अडवले आणि काही सापडले तर मात्र तो गुन्हा ठरतो. पण अशा वेळी काही ठरावीक रकमेपर्यंतच्या गुन्ह्य़ांमध्ये अटक न करता मुद्देमाल जप्त केला जातो. त्यावर योग्य तो दंड, सीमाशुल्क भरून मग तो माल सोडवावा लागतो. या सुविधेचा वापर अनेकजण करतात असे सीमाशुल्क विभागातील अधिकारी सांगतात. या मार्गाने अनेक व्यक्ती कमी प्रमाणात भरपूर सोने तस्करी करतात असा अधिकाऱ्यांचा कयास आहे. मात्र यामध्ये तस्करांचा फायदा खूप कमी होतो.

सोने तस्करीच्या वाढत्या घटनांमधून एक लक्षात येते की सध्यातरी आपण केवळ माल वाहून नेणाऱ्यांवरच कारवाई करत आहोत. हे सारे चक्र चालवणारे मुख्ये तस्कर आजही सहीसलामतच आहेत. त्यामागचे गणित खूपच किचकट आहे. सीमाशुल्क विभागाचे अधिकारी सांगतात की सोने तस्करी पकडली तरी ते करणारा प्रवासी (याला कॅरिअर म्हणून संबोधले जाते) हा त्या साखळीतला अगदी खालच्या टप्प्यावरचा घटक असतो. आपण आणलेले सोने पुढे नेमके कुठे जाणार आहे याची त्याला कसलीच माहिती नसते. आणलेला माल सांगितलेल्या माणसाकडे दिला की त्या कॅरिअरची जबाबदारी संपते. आणि बऱ्याचदा त्याला मिळणारा मोबदला हा थेट न देता तो त्याच्या कुटुंबीयांकडे पोहोचलेला असतो. फायद्याचा सौदा नसेल तर पकडलेले सोने सोडवायला त्या साखळीतील अन्य कोणी पुढेदेखील येत नाहीत. तसेच या संपूर्ण चक्रामध्ये ठरावीक एखाद्या जातीसमूहाचा अथवा प्रदेशातील लोकांचा सहभाग आहे असेदेखील आढळून येत नाही, त्यामुळे मूळ तस्कराचा माग काढणे कठीण जाते.

कधी काळी समुद्रमाग्रे किंवा रस्ता माग्रे येणारे हे सोने वाढत्या विमानवाहतुकीचा असा फायदा घेऊन अगदी पद्धतशीरपणे भारतात येताना दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी उत्तर पूर्वेकडील राज्यं सोडता देशात येणारे चोरटे सोने हे हवाई मार्गानेच अधिक प्रमाणात येताना दिसते. किंबहुना हवाई वाहतूक वगळता इतर ठिकाणचे प्रमाण कमीच असल्याचे मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयातील ज्येष्ठ अधिकारी सांगतात. पण त्याच वेळी उत्तर पूर्वेकडील सिक्कीम वगरे राज्यांमध्ये म्यानमारहून थेट रस्तामाग्रे येणाऱ्या सोन्याचे प्रमाणदेखील खूप मोठे असल्याचे ते सांगतात. शिलाँग सीमाशुल्क आयुक्तालयात सोने तस्करीचे गुन्हे मुंबई खालोखाल असल्याचे हे अधिकारी नमूद करतात.

असे असले तरी नोव्हेंबर २०१७ मध्ये मुंबई सीमाशुल्क विभागाने मुंबई गोदीत एका मालवाहू जहाजातून तब्बल ४० किलो सोन्याची तस्करी पकडली होती. गेल्या काही वर्षांतील ही सर्वात मोठी घटना आहे. या प्रकरणामध्ये महसूल गुप्तचर विभागानेदेखील बरीच कारवाई केली होती. महसूल गुप्तचर विभाग हादेखील सोने तस्करीवर गेल्या काही वर्षांत चांगलेच लक्ष ठेवून आहे. एप्रिल २०१८ मध्ये नवी दिल्लीच्या महसूल गुप्तचर विभागाने एका सोने व्यापाऱ्याकडे जवळपास १३ कोटी रुपयांचे चोरटे सोने पकडले होते. या व्यापाऱ्याने तेव्हा महसूल गुप्तचर विभागाच्या कार्यालयाच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

देशभरातील सोन्याच्या तस्करीची आकडेवारी उपलब्ध नसली तरी याबाबतीत मुंबई विमानतळावरील घटनांचा वाटा एकूण देशातील घटनांमध्ये ५० टक्के असतो. त्यातही या साऱ्या घटना पकडलेल्या व नोंद झालेल्या आहेत. पकडू न शकलेले सोने किती असेल यावर सध्यातरी कोणीच काही बोलत नाही.

हे सारे घडण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या देशात असलेले सोन्याचे वेड. गुंतवणूक म्हणून, अडीअडचणीला तत्काळ उपयोगी पडणारी वस्तू म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. आणि इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा बाजारात लगेच किंमत मिळू शकणारी ही वस्तू आहे. पण त्याचमुळे आणखीन एक बाब येथे नमूद करायला हवी, ती म्हणजे काळे पसे गुंतवण्यासाठीदेखील याचाच उपयोग केला जातो. नोव्हेंबर २०१६ मध्ये निश्चलीकरणानंतर रोख पशांपेक्षा सोन्यातील गुंतवणूकीकडे कल वाढल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. विमानतळावरील पकडलेल्या सोन्याची आकडेवारीदेखील याकडेच लक्ष वेधते. निश्चलीकरणानंतरच्या लगेचच्या काळात तुलनेने सोने तस्करीच्या घटना कमी आहेत. कारण त्याकाळात रोख पशांची कमतरता होती. पण नंतरच्या वर्षांत सोने तस्करीचा वेग वाढला आहे. निश्चलीकरणानंतर पाठोपाठ जुल २०१७ मध्ये जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे नियत मार्गाने सोने खरेदीवर तीन टक्के इतका कर लावण्यात आला. या दोहोंचा परिणाम चोरटय़ा सोन्याच्या बाजारपेठेवर झाला असल्याचे दिसते. त्यातूनच गेल्या सहा वर्षांत २०१७-१८ या आíथक वर्षांत सोने तस्करीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.

सोन्याच्या अधिकृत बाजारातील वाढत्या आयातीमुळे निर्माण होणारा परकीय चलन तुटवडा रोखण्यासाठी आणि चालू खात्यातील तूट नियंत्रित राखण्यासाठी सोन्याच्या आयातीवर लादलेले र्निबध अंतिमत: फारसे परिणामकारक न होता चोरटय़ा सोन्याच्या वाढत्या घटनांमुळे विफलच झाले असे म्हणावे लागेल. अशा वेळी अधिकृत आयातीची आकडेवारीदेखील पाहणे गरजेचे ठरेल. २००७-०८ मध्ये आपण २,६४८ दशलक्ष डॉलर इतक्या किमतीचे सोने आयात केले होते, तर २०१६-१७ मध्ये ४,१८१ दशलक्ष डॉलर इतके सोने आयात केले. २०१२-१३ या वर्षांत आपण ११,३०५ दशलक्ष डॉलर इतक्या किमतीचे सोने आयात केले आहे. २००६ मध्ये सोन्याचा दर होता रु. ८,४०० प्रतितोळा, २०११ मध्ये रु. २६,४०० प्रतितोळा आणि २०१६ मध्ये रु. २८,६२३ प्रतितोळा. म्हणजेच मध्यंतरी आपण भरमसाठ सोने नियत मार्गाने खरेदी करत होतो. पण आज हे प्रमाण मर्यादित आहे. वाढत्या आयात करामुळे वगैरे हे होत असले तरी दुसरीकडे तस्करीचे प्रमाण २०११-१२च्या कैक पटीने वाढले आहे.

वाढलेला आयात कर आणि आयातीच्या २० टक्के सोने दागिने स्वरूपात निर्यातीचा निर्णय सुरुवातीला काही प्रमाणात परकीय चलनाला चांगलाच चाप लावणारा होता. मात्र २० टक्के सोने दागिने निर्यातीच्या निर्णयातदेखील आपल्याकडे प्रचंड गोंधळ घातला गेला. २०१३ च्या सुरुवातीला याबद्दल नेमकी स्पष्टताच नव्हती. नंतर २०१४ च्या निवडणुकांच्या तोंडावर सोने आयातीबाबत स्पष्टता आली. प्रीमियम ट्रेडिंग हाऊस आणि स्टार ट्रेडिंग हाऊस यांनादेखील सोने आयातीची मुभा मिळाली. नंतर नोव्हेबर २०१४ मध्ये ही अटच पूर्णपणे काढून टाकण्यात आली. हे सर्व करण्यात अर्थकारण कमी राजकारण अधिक झाले. नीरव मोदी प्रकरणात सुरुवातीला भाजपाने ही अट काँग्रेस काळात शिथिल करण्यात आली असे म्हणत काँग्रेसला दोष देत नीरव मोदीसारख्यांचा फायदा झाल्याचा आरोप केला. या अटीच्या शिथिलीकरणाचा फायदा घेऊन नीरव मोदी यांनी आयात सोने पुन्हा परदेशात आपल्याच कंपनीला विकल्याचे सांगितले. तर नंतर काँग्रेसने भाजपावर आरोप केला की मोदी सरकारने ही अटच पूर्णपणे बाद केल्यामुळे सोने व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे झाले. एकंदरीतच आपण या सर्व बाबींकडे कसे पाहतो हेच यातून दिसून येते.

सुरुवातीला सोन्याच्या आयातीने खर्च होणारे परकीय चलन वाचावे म्हणून रिझव्‍‌र्ह बँकेने सोने खरेदीला चालना देणाऱ्या अनेक बाबींवर र्निबध लादले. २०१२ च्या अखेरीस सोने तारण कर्जाची मर्यादा एकूण किमतीच्या ७५ टक्क्यावरून ६० टक्क्यावर आणण्यात आली होती. तसेच अनेक बँका सोने विक्री करायच्या. त्यासाठी कर्जदेखील द्यायच्या. रिझव्‍‌र्ह बँकेने अशा प्रकारे कर्ज देण्यावरदेखील र्निबध आणले.  २०१२ ते २०१८ या काळातील सर्व घटना पाहता आजही आपल्याकडील सोन्याची मागणी काही कमी झालेली नाही. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याकडे सोने हे खूप मोठय़ा प्रमाणात बंदिस्त होऊन पडलेले आहे. देवस्थानांकडील सोने हा त्यापकी सर्वात महत्त्वाचा भाग. एका अंदाजानुसार देवस्थानांकडे अडकलेले सोने हे जवळपास २५ हजार टन आहे. हे सोने बाजारात आले तर दागिन्यांसाठी आवश्यक असणारी सोने व्यापाऱ्यांची गरज बऱ्यापकी पूर्ण होऊ शकते. त्यासाठी गोल्ड बँक ही योजना जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी फेडरेशनकडून सुचविण्यात आली होती. पण त्यावर आजतागायत काहीही हालचाल झालेली नाही.

मे २०१४ मध्ये ‘लोकप्रभा’ने सोन्याची तस्करीच्या वाढत्या घटनांवर प्रकाश टाकणारी कव्हर स्टोरी प्रकाशित केली होती. सोने तस्करीचा व आयातीवरील र्निबधाचा त्यात आढावा घेण्यात आला होता. २० टक्के निर्यातीबद्दलच्या सकारात्मक निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर अनेक तज्ज्ञांनी यापुढे सोन्याच्या तस्करीला आळा बसेल आणि खरोखरच सोन्याचे दिवस येतील असा विश्वास व्यक्त केला होता. पण आळा बसणे तर दूरच, तस्करीत जवळपास दुपट्टीने वाढच झाली. याचाच अर्थ आपल्या धोरणांमध्ये कुठेतरी चुका आहोत आणि समांतर अशा चोरटय़ा बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्यात आपण कमी पडत आहोत. त्यामुळे तस्करीलाच सोन्याचे दिवस आले आहेत.