16 December 2017

News Flash

फुटबॉलसम्राट पेले

फुटबॉलचं नाव घेतलं की कुणाच्याही ओठांवर येणारं अपरिहार्य नाव म्हणजे पेले.

दत्ता जाधव | Updated: September 22, 2017 1:03 AM

फुटबॉलचं नाव घेतलं की कुणाच्याही ओठांवर येणारं अपरिहार्य नाव म्हणजे पेले. भारतात सहा ऑक्टोबरपासून होऊ घातलेल्या ज्युनिअर विश्वचषक फूटबॉल स्पर्धाच्या निमित्ताने पेलेंविषयी-

साऱ्या जगाने ज्याला सम्राट मानले तो फुटबॉल किंग पेले २४ सप्टेंबर १९७७ ला भारताचे फुटबॉलचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या कोलकत्ता शहरात येऊन गेला. तो दिवस भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. हा फुटबॉलसम्राट कोलकत्त्याच्या ‘इडन गार्डन’ मैदानावर न्यूयॉर्क कॉसमॉस संघाकडून मोहन बगानविरुद्ध फुटबॉलचा प्रदर्शनीय सामना खेळण्यासाठी भारतात येऊन गेला.

२३ सप्टेंबर १९७७ रात्रौ ११.४५ ची वेळ. म्हणजे जवळजवळ मध्यरात्रच, परंतु कोलकत्त्याच्या डमडम विमानतळावर ४० हजार फुटबॉल शौकिनांचा अफाट जनसागर लोटला होता. त्याच्या बंदोबस्तासाठी पाच हजार पोलीस सज्ज होते. कशासाठी एवढी अफाट गर्दी! तर फुटबॉलसम्राट पेलेच्या स्वागतासाठी. ज्या रस्त्याने पेलेची मोटर जाणार होती त्याच्या दुतर्फा लोक ही गर्दी करून उभे होते.

ब्राझीलचा ‘पेले’ जागतिक क्रीडाक्षेत्रातील फुटबॉल खेळाचा बादशहा मानला जातो. क्रीडाक्षेत्रातील त्याच्या नैपुण्याविषयी जगातील सर्वच क्रीडारसिकांचे एकमत आहे की, कोणीही असा फुटबॉलचा खेळ खेळूच शकत नाही.

ब्राझील ही पेलेची जन्मभूमी, २३ ऑक्टोबर १९४० मध्ये ट्रेस कोराकोसा या खेडेगावात एका गरीब कृष्णवर्णीय घराण्यात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील दाँनडि न्हो हे एका स्थानिक क्लबच्या वतीने फुटबॉल खेळत, त्यांना जे पैसे मिळत त्यावर या कुटुंबाची उपजीविका चालत असे. एकदा अशाच एका फुटबॉलच्या चुरशीच्या सामन्यात त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली होती. त्या वेळी पायावर वैद्यकीय उपचार करण्यासाठीदेखील त्याच्याजवळ पैसे नव्हते. पेले त्या वेळी फक्त सहा वर्षांचा होता.

पेलेचे खरे नाव एडसन अ‍ॅरान्टेसडी नेस्कोमेटो. हा लहानपणी गावातील इतर मुलांच्या संगतीने चिंध्या आणि कागदाचे तुकडे एका मोज्यात घालून तयार केलेला चेंडू वापरून अनवाणी पायांनी दिवसभर फुटबॉल खेळत असे. शेवटी संध्याकाळी त्या चेंडूच्या चिंधडय़ा होऊन तो चेंडू निकामी होत असे. त्या वेळी त्याचे मित्र त्याला पेले.. पेले.. पेले कुचकामाचा (निरुपयोगी) अशा हाका मारून त्याला चिडवत. पेले हे नाव त्याला आवडत नसे, परंतु त्याच्या पुढील आयुष्यात हेच नाव त्याला कायम चिकटले.

फुटबॉलचे पेलेचे वेड पाहून आणि खेळातील कौशल्य पाहून, ब्राझीलचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू वाल्डीमारा डी ब्रिटो याने पेलेस अनेक संघांतून खेळण्याची संधी दिली. परंतु पेलेच्या आईची इच्छा वेगळीच होती. पेलेने उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनीअर किंवा प्राध्यापक होऊन घरची आर्थिक परिस्थिती सुधारावी असे तिला सदैव वाटत असे. पण फुटबॉलच्या वेडामुळे चौथीनंतर म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी पेलेने शाळेला कायमचा रामराम ठोकला. त्या वेळी तो म्हणत असे की आपण फक्त फुटबॉलसाठीच जन्म घेतला आहे.

घरची आर्थिक बाजू लंगडी असल्याने पैसे मिळविण्यासाठी वयाच्या १५ व्या वर्षीपासूनच पेले व्यावसायिक फुटबॉलमध्ये भाग घेऊ लागला. व्यावसायिक फुटबॉल स्पर्धात खेळताना पहिल्या वर्षी ६६ गोल, दुसऱ्या वर्षी १०१ गोल तर तिसऱ्या वर्षी १२७ गोल करून त्याने सुरुवातीच्या काळातच अविस्मरणीय उच्चांक केले. पेले नेहमी १० नंबरचा शर्ट घालून मैदानावर खेळत असे. सन १९७० साली पेलेच्या फुटबॉल खेळातील निवृत्तीनंतर पेलेच्या सन्मानार्थ ब्राझीलवासीयांनी आणि सॅन्टोस क्लबच्या सदस्यांनी एकमताने ठरविले आणि जाहीर केले की यापुढे १० नंबरचा शर्ट घालून देशात कुणीही फुटबॉल खेळायचा नाही.

पाच फूट दहा इंच उंचीचा पेले अतिशय लवचीक आणि चपळ आहे. तो मैदानावर असतो तेव्हा त्याचे पाय व हालचाली इतक्या जिवंत असतात की चेंडू हा जणू त्याच्या पायाचाच एक भाग आहे असे पाहाणारास वाटते. चेंडू पळवताना अत्यंत  सहजता त्याच्या पायात असते, इतकेच नव्हे तर चेंडू त्याच्या पायाबरोबर नाचत असतो. मैदानावर त्याला काही अशक्य नाही, त्याच्या खेळाला कोणत्याही मर्यादा नाहीत. मैदानावर सगळीकडे त्याचे लक्ष असते. मैदानावरील त्याच्या हालचाली पाहून असे वाटते की ईश्वराने पेलेला चार डोळे दिले आहेत.

सन १९५८ ते १९७० हा काळ जागतिक फुटबॉल इतिहासात ‘पेले युग’ म्हणून प्रसिद्ध आहे. या अवधीत पेलेच्या खेळामुळे ब्राझीलच्या संघाने १९५८, १९६२ व १९७० अशा तीन वेळा फुटबॉलचा विश्वचषक (जुलीस – रिमेट) जिंकून कायमचा ब्राझीलच्या ताब्यात दिला. विश्वचषक कायमचा जिंकणारा ब्राझील हा जगातला एकमेव देश आहे आणि फक्त पेलेमुळेच हे झाले असे जग म्हणते. पेलेच्या आजपर्यंतच्या एक हजार ३५६ व्यावसायिक फुटबॉल सामन्यांत एकटय़ा पेलेने एक हजार २७८  फील्ड गोल मारले आहेत. हा जागतिक फुटबॉल इतिहासातील अजोड उच्चांक आहे. प्रत्येक  वेळी गोल मारल्यानंतर पेले आभाळाच्या दिशेने उडी मारतो, ही अजब उडी, ‘गोल सॅल्युट’ त्याचा ट्रेडमार्क म्हणून ओळखली जाते.

आजपर्यंत त्याला मिळालेल्या पारितोषिकांमध्ये तीन विश्वचषक, चार ब्राझील चषक व पाच साओलो प्रांतीय चॅम्पियनशिपसाठी दिले गेलेले चषक आहेत.  इटलीच्या जुबेण्डास् क्लबने त्याला ९५ लाख रुपये देऊन आपल्या संघात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच स्पेनच्या माद्रिदने त्याच्यापुढे कोरे चेकबुक ठेवून इच्छेनुसार रक्कम टाका असे म्हटले होते, परंतु अशा प्रलोभनाला पेले बळी पडला नाही. पेलेला ब्राझीलच्या बाहेर काढण्याचे हे प्रकार बंद करण्यासाठी सन १९६० साली ब्राझीलने पेले ही निर्यात होऊच शकत नाही अशी राष्ट्रीय संपत्ती आहे, असे जाहीर केले. पेलेला तोपर्यंत अनेक राष्ट्रांनी, राजे, राण्यांनी, पोपसारख्या मान्यवर व्यक्तींनी पारितेषिके देऊन त्याचा सन्मान केला होता. व्यावसायिक फुटबॉल क्षेत्रात आजतागायत पेलेएवढा पैसा, सन्मान व नाव आजपर्यंत कोणाही खेळाडूला मिळविता आले नाही.

परदेशात लेखकांनी व कवींनी पेलेला गायक, कवी व अभिनेता कल्पून त्याच्यावर अनेक पुस्तके लिहून भरमसाट पैसा कमावला आहे.  पेलेवर ‘ब्लॅक पर्ल’, ‘ब्लॅक पँथर’, ‘जगलिंग’, ‘मस्केटियर’, ‘क्रोगिंग क्रिसेंडो’, ‘साऊथ अमेरिकन गॉड’, ‘रबर लिन्ड मिस्ट्रो’, ‘पोएट्री इन मोशन’ इत्यादी पुस्तके लिहिली गेली आहेत.

ब्राझील हा देश पेलेच्या नावामुळे ओळखला जाऊ लागला. दर दिवशी त्याच्या अगणित चाहत्यांकडून त्याला अनेक पत्रे येतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे पत्राच्या पत्त्याच्या जागेवर फक्त एकच शब्द लिहिलेला असतो ‘पेले’, बाकी पत्ता लिहिलेलाच नसतो. कधी कधी देशाचे नावही लिहिलेले नसते. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ब्राझीलमधील कोराकोसा या गावी रस्त्यावर भुईमुगाच्या शेंगा विकणारा पेले आजमितीला ब्राझीलमधील पंधरा मोठय़ा करोडपतींपैकी एक गणला जातो. ही अमाप दौलत त्याने आपल्या पायाच्या ठोकरीने मिळविली आहे.

पेले सध्या अनेक मार्गांनी लाखो रुपये मिळवत आहे. तो एका खूप मोठय़ा प्लास्टिक कंपनीचा भागीदार आहे. तो एका बँकेचा संचालक आहे. शिवाय जगातील अनेक कंपन्या आपल्या उत्पादनाचा खप वाढविण्यासाठी पेलेचे नाव व फोटो लावून जाहिरात करतात. जसे ‘पेले कॉफी’, ‘पेले फुटबॉल शूज’, ‘पेले टीव्ही’, ‘पेले एअर बॅग’ इत्यादी अनेक जाहिरातींचा भरमसाट पैसा पेलेला मिळतो. वयाच्या १७ व्या वर्षांपासून सन १९७४ अखेपर्यंत ‘पेले’ ब्राझिलच्या सॅन्टोस क्लबसाठीच खेळला आणि त्याने आपल्या संघाला जगातला सवरेत्कृष्ट फुटबॉल संघ म्हणून मान्यता मिळवून दिली.

सन १९६३ मध्ये राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलिप यांनी ब्राझीलला भेट दिली तेव्हा त्यांनी पेलेचा खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. खेळ संपल्यानंतर डय़ूकना पेलेचे अभिनंदन करायचे होते तेव्हा मोठा पेच निर्माण झाला की आता प्रिन्सनी स्वत: मैदानावर जावे, की फुटबॉलसम्राटाने प्रिन्सपुढे यावे? पण प्रिन्स फिलिपनी सर्व राजशिष्टाचार बाजूला ठेवून स्वत: मैदानावर जाऊन पेलेचे अभिनंदन केले.

ब्राझीलमध्ये त्याला ‘ब्लॅक पर्ल’ असे म्हणतात. इटली व भारतात लोक त्याला ‘पेले’ म्हणून ओळखतात तर चीन व चिलीमध्ये एल- पेलिग्रा हे नाव त्याला देण्यात आले आहे.  फ्रान्सवासीयांनी ‘ब्लॅक टलिप’ असे नाव त्याला सन्मानपूर्वक दिले आहे. याशिवाय ‘दि नाव्हेल्टी’, ‘सॉकर किंग’, ‘दि किंग’, ‘ब्लू पार्क’, ‘ब्लॅक सीजर’, ‘फॅबुलस’, ‘डिव्हाइन’ अशा अनेक नावांनी त्याला संबोधिले जाते.

सन १९७४ साली पेलेच्या निवृत्तीनंतर न्यूयॉर्क कॉसमस क्लबने बोलावले म्हणून फुटबॉलच्या प्रसारासाठी तो अमेरिकेत न्यूयॉर्कला आला. त्यासाठी न्यूयॉर्क कॉसमॉसने त्याला सव्वाचार कोटी रुपये (करमुक्त) देऊन दोन वर्षांचा करार केला होता. शिवाय न्यूयॉर्कमध्ये राहण्यासाठी एक अत्याधुनिक घर, नौकानयनसाठी एक नौका, एक भव्य ऑफिस आणि जेट विमान दिले होते. त्या काळात असा होता पेलेचा थाट.

पेले अमेरिकेत आला तेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांना भेटण्यासाठी व्हाइट हाऊसवर गेला होता. ही बातमी बाहेर फुटली. आणि फुटबॉलप्रेमींनी व्हाइट हाऊससमोर खूप गर्दी केली. त्या गर्दीतून एकच मागणी होत होती, ‘‘आम्हाला पेलेला पाहायचे आहे.’’ शेवटी फोर्ड यांना पेलेला लोकांच्या समोर आणावे लागले. लोकांनी पेलेचे हस्ताक्षर घेण्यासाठी ही गर्दी केली. तेव्हा फोर्ड पेलेला म्हणाले, ‘‘मी अमेरिकेचा अध्यक्ष आहे परंतु लोकप्रियतेत मात्र तुम्ही माझ्या खूपच पुढे आहात.’’

सर्व जगात ‘पेले’एवढी लोकप्रियता कुठल्याच खेळाडूला मिळाली नाही. ब्राझिलची सारी जनता पेलेला साक्षात दुसरा परमेश्वर समजते. सन १९७० साली पेले फुटबॉलमधून निवृत्त होणार हे जाहीर होताच त्याच्या सन्मानार्थ आयोजित केलेला फुटबॉल सामना पाहण्यासाठी दोन लाख फुटबॉलशौकीन मैदानावर जमले होते. सामन्याच्या मध्यांतरानंतर हा अफाट जनसमूह अक्षरश: ढसाढसा रडत होता. रडता रडता सगळीकडून एकच मागणी होती. ‘‘कारिडो पेले पिका ना, पिका ना.’’ (लाडक्या पेले तू जाऊ नकोस, जाऊ नकोस) ब्राझीलमध्ये ट्रेस कोराकोसा या त्याच्या जन्मगावी जिवंतपणीच त्याचा पुतळा उभारण्यात आला आहे. रिओ डि जानेरो शहराच्या एका प्रसिद्ध चौकातही त्याचा असाच पुतळा उभारण्यात आला आहे. ब्राझील पोस्ट खात्याने त्याच्या नावाचे तिकीट काढले आहे.

अपार धनदौलत, अमाप प्रेम व देदीप्यमान कीर्ती मिळविलेला हा जगप्रसिद्ध खेळाडू तंबाखूचे जगप्रसिद्ध केंद्र सँटोस येथे राहातो. पण तो विडी, तंबाखू, सिगरेट किंवा दारूला स्पर्श करत नाही. आपल्या नावाचा व संपत्तीचा त्याला गर्व झाला नाही. तो म्हणतो, ‘‘मैदानावर अशक्य वाटणारे गोल मला करता येतात ही ईश्वरी लीलाच आहे. मला जे लाभलं ते परमेश्वराचं देणं म्हणावं लागेल. ईश्वरानंच मला घडवलं, मोठं केलं.’’

पेलेला पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. खेळाशिवाय मासे मारणे, गिटार वाजविणे आणि बिन्स (घेवडा) घालून मटण बिर्याणी तयार करणे हे त्याचे छंद आहेत.

जाग्तिक क्रीडा क्षेत्रात अद्भुत समजला जाणारा पेले फक्त क्रीडांगणाचाच ‘राजा’ आहे असे नव्हे, तर तो उत्तम चित्रकारसुद्धा आहे. ‘फुटबॉल मैदानावरील तेजस्वी सूर्य’ हे त्याचे चित्र त्या काळात सात हजार ३५०/- रुपयांस विकले गेले होते. नंतर हे चित्र एका प्रदर्शनातून चोरीस गेले.

शनिवार एक ऑक्टोबर १९७७ हा दिवस जागतिक फुटबॉलच्या इतिहासातील एक दु:खद दिवस होता. या दिवशी पेलेने न्यूजर्सी येथे त्याच्या आयुष्यातील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. त्याचा आयुष्यातला हा शेवटचा सामना अत्यंत अद्भुत व आश्चर्यकारक होता. फुटबॉलच्या इतिहासात असा सामना झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही, अशी या सामन्याची नोंद आहे. या सामन्यात पेले खेळाच्या सुरुवातीला (पूर्वार्धात) न्यूयॉर्क कॉसमॉस संघाकडून खेळला आणि विश्रांतीनंतर (उत्तरार्धात) ब्राझीलच्या सँटोस संघाकडून खेळला. या सामन्यात पूर्वार्धात कॉसमॉसकडून खेळताना त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील एक हजार २७८ वा शेवटचा गोल करून आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम ठोकला.  याच दिवशी पेलेला साऱ्या जगाचे नागरिकत्व बहाल करण्यात आले.
दत्ता जाधव – response.lokprabha@expressindia.com

First Published on September 22, 2017 1:03 am

Web Title: great football player pele