18 October 2018

News Flash

gujrat election 2017 : गुजरात – भाजपाच्या नाकात दम!

भाजपाला खरा धोका आहे तो पाटीदार किंवा पटेल समाजाकडून.

गुजरातमध्ये गेली २२ वर्षे सातत्याने सत्तेची उब लाभलेल्या भाजपाला येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकूर या चौघांशी सामना करावा लागत आहे. स्वराज्यात थेट पंतप्रधानांनाच ५०च्या वर सभा घ्याव्या लागणं यावरूनच गुजरात विधानसभेची निवडणूक ही भाजपाच्या नाकात दम आणणारी ठरणार हे निश्चित.

गुजरातमधल्या २००२ पासूनच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आधीच ठरून गेलेला असतो अशा ऑस्ट्रेलिया-केनियामधल्या एकदिवसीय क्रिकेट मॅचसारख्या होत्या, असं म्हणता येईल.

गोध्रा दुर्घटना, त्यानंतरची जातीय दंगली या पाश्र्वभूमीवरही २००२ च्या निवडणुकीत भगव्या रंगात माखून निघालेले आणि मोदींच्या करिश्म्याने अत्यंत प्रभावित झालेले मतदार असं गुजरात हे राज्य भाजपाने सहज खिशात घातलं. गुजरात दंगलींनंतरची मोदींचा करिश्मा ठसठशीतपणे दाखवणारी ती पहिली निवडणूक असं म्हणता येतं. त्यावर्षी इथला मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा पार धुव्वा उडाला होता. काँग्रेस पक्षांतर्गत असलेली भांडणं आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांनी मोदींच्या प्रभावापुढे म्यान केलेली आपली शस्त्र यातून हे घडलं होतं.

आज १५ वर्षांनंतर मात्र येत्या ९ आणि १४ डिसेंबरला सत्ताधारी भाजपा इतक्या वर्षांतल्या सगळ्यात खडतर अशा निवडणूक परीक्षेला सामोरा जात आहे. याचं कारण म्हणजे गुजरातमध्ये गेल्या १५ वर्षांत यावर्षी प्रथमच नरेंद्र मोदी राज्यात सत्तेत नसताना भाजपा निवडणूक लढवत आहे.

२०१२ मधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची एकच चिंता होती ती म्हणजे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी उभारलेली त्यांची स्वत:ची गुजरात परिवर्तन पार्टी. या वेळी मात्र या पार्टीशिवाय इतरही घटकांनी भाजपाच्याच बालेकिल्ल्यात गंभीर धोके निर्माण केले आहेत.

हे वातावरण निर्माण करणारे तिघेही तरुण आहेत. त्यातला एक आहे अवघ्या पाटीदार समाजाला ढवळून काढणारा त्यांचा नवा नेता हार्दिक पटेल. दुसरा आहे ओबीसी नेता अल्पेश ठाकूर आणि तिसरा आहे दलित नेता जिग्नेश मेवानी. या तिघांनीही सध्या गुजरातच्या राजकीय अवकाशात धूम उडवली आहे. आपापल्या विशिष्ट समाजाचं पाठबळ असलेले हे तिघेही गेल्या २२ वर्षांची भाजपाची गुजरातमधली विजयी घोडदौड रोखण्यासाठी आतुर झाले आहेत. या निवडणुकीत गुजरातच्या राजकीय पटलावर उगवलेल्या या तीन तरुण दावेदारांनी तिथली राजकीय समीकरणं बदलवून टाकली आहेत. विकासाच्या मुद्दय़ावर मोदींनी उभी केलेली निवडणुकीची मोट या तिघांनीही जातीय समीकरणांवर आणून ठेवली आहे. गुजरातमध्ये पाटीदारांची संख्या जवळपास १४ टक्के आहे, तर दलित फक्त सात टक्के. इथे ओबीसींची संख्या जवळजवळ ४४ टक्के आहे, पण त्यात अल्पेशशी संबंधित नसलेल्या जातींचाही समावेश आहे.

विजय रुपानी सरकारने दारूविरोधात कोणतीही कारवाई केली नाही म्हणून या सरकारविरोधात उभ्या राहिलेल्या अल्पेशने या निवडणुकीसाठी काँग्रेसशी औपचारिक हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तो सातत्याने राहुल गांधींसोबत प्रचारमोहिमांमधून फिरताना दिसतो.

जिग्नेश मेवानी मूळचा पत्रकार. गुजरातमधल्या गीर सोमनाथ जिल्ह्य़ात उना इथं दलितांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर तो दलितांसाठी पत्रकारिता सोडून रस्त्यावर उतरला. त्याने त्याच्या समाजाला भाजपाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.  आपण राजकारणाशी संबंधित नाही, असा त्याचा दावा असला तरी तो राहुल गांधींशी जोडला गेलेला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना गेल्या आठवडय़ात नवसारी इथे भेटल्यानंतर तो म्हणाला की, ‘‘गेली २२ वर्षे भाजपाने आमच्या वेदनांकडे लक्षही दिलेले नाही, उलट राहुल गांधींनी लगेच आमचं म्हणणं ऐकून घेतलं.’’ ते सांगतात.

पण भाजपाला खरा धोका आहे तो पाटीदार किंवा पटेल समाजाकडून. ऑगस्ट २०१५ मध्ये अहमदाबादमध्ये जीएमडीसी ग्राऊंडवर हार्दिक पटेलला अचानक अटक झाली आणि त्यातून सुरू झालेल्या दंगल-जाळपोळीपासून गुजरातमधला पटेल समाज वेगाने भाजपापासून दूर गेला आहे. या दंगलीच्या वेळी या समाजातल्या लोकांविरुद्ध शेकडो पोलीस केसेस केल्या गेल्या. या समाजाविरोधात कारवाईचं हत्यार उचलणं भाजपाला फारच महागात पडलं आहे. त्याचं प्रत्यंतर भाजपाला आलं ते जिल्हा तसंच तालुका आणि पंचायत पातळीवर झालेल्या निवडणुकांमध्ये. मागच्या वेळच्या निवडणुकीत ३१ पैकी ३० जागा भाजपाच्या ताब्यात होत्या. या निवडणुकीत ३१ मधल्या २३ जागा काँग्रेसने मिळवल्या आहेत.

सध्या भाजपाच्या आमदारांना पाटीदारांना तोंड द्यावं लागत आहे. आरक्षण आंदोलनाचं मुख्य केंद्र असलेल्या मेहसाणामध्ये तर या चिडलेल्या पाटीदार समाजातील लोकांनी भाजपाच्या नेत्यांना सार्वजनिक कार्यक्रमांमधून काढता पाय घ्यायला भाग पाडलं आहे.

गेली तीन दशकं गुजरातमधल्या सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसलासुद्धा विशेषत: ऑगस्टमध्ये अहमद पटेल राज्यसभेची निवडणूक जिंकले तेव्हापासून गुजरातमध्ये सत्ता मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आपल्या तीनदिवसीय नवसर्जन यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी जवळपास सगळा गुजरात पालथा घातला आहे. त्यांनी गुजरातमध्ये झंझावाती प्रचार मोहिमा घेतल्या आहेत. द्वारकेपासून सुरुवात करून त्यांनी गुजरातमधल्या बहुतेक महत्त्वाच्या मंदिरांना भेट दिली आहे. भाजपाच्या हिंदुत्ववादाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने ही सॉफ्ट हिंदुत्वाची कास पकडली आहे. एरवी सोशल मीडियावर राहुल गांधींच्या प्रत्येक शब्दाशब्दावर विनोद तयार करून फिरवले जातात. मात्र या वेळी राहुल गांधींनी त्यांच्या विरोधकांना विनोद निर्माण करता येतील असं काहीही वक्तव्य केलं नाही.

जीएसटीमुळे लोकांना सध्या कसा त्रास सहन करावा लागतो आहे, तसंच निश्चलनीकरणामुळे उत्पादननिर्मिती हाच ज्याचा मुख्य आधार आहे त्या गुजरातमध्ये लाखो लोकांचे रोजगार कसे गेले यावर त्यांनी या वेळी जोरदार भर दिला.

अमित शहा यांचा मुलगा जय शहाचं प्रकरण उघडकीला आल्यानंतर राहुल गांधींनी त्याचा उल्लेख ‘शाह-जादा’ असा करायला सुरुवात केल्यानंतर अमित शहा यांनी राहुल गांधी यांचा ‘शेहजादा’ असा जाणीवपूर्वक उल्लेख करणंदेखील थांबवलं आहे.

भाजपा केंद्रात सत्तेत आल्यानंतर अमित शहा यांचा मुलगा जय शहाच्या कंपनीची उलाढाल १६०० पटींनी वाढली या बातमीच्या संदर्भात राहुल गांधींनी, ‘मित्रों, आता मी शाह-जादाबद्दलही बोलणार नाही आणि इतरही कुणाला बोलू देणार नाही’ असं ट्वीट केलं होतं.

एवढंच नाही तर सोशल मीडियावर ‘विकास गांडो थायो छे’ (विकास वेडा झाला आहे) असे मेमे व्हायरल झाले आणि भाजपाला सोशल मीडियावर उपहासाला तोंड द्यावं लागलं. विकास या भाजपाने सतत लावून धरलेल्या मुद्दय़ांचीही खराब रस्ते, ड्रेनेज समस्या, तुटक्याफुटक्या बसेसचे फोटो टाकून यथेच्छ खिल्ली उडवण्यात आली. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची विजय रुपानी यांची या सगळ्या टिंगलटवाळीला उत्तर द्यायची इच्छा असली तरी भाजपाचे गुजरातचे निवडणूक प्रमुख अरुण जेटली यांनी भाजपा कार्यकर्त्यांना या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला सांगितलं. ‘त्यांच्यासाठी विकास ही विनोदाची बाब आहे, पण आमच्यासाठी मात्र तो वृत्तीचा भाग आहे’, असंही मुख्यमंत्र्यांनी काही सभांमधून सांगितलं. या एका ओळीवरदेखील मेमेंचा महापूर आला आणि त्यातून नाराजी व्यक्त होत राहिली.

माजी पंतप्रधान आणि भारतातल्या आर्थिक सुधारणांचे उद्गाते डॉ. मनमोहन सिंग यांनीही राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळला आणि मोदींच्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयांचा धज्जा उडवत व्यावसायिकांना मधाचं बोट दाखवलं.  ‘फुशारक्याआणि नाटकं हे धैर्य, विश्वासाला आणि कार्यक्षमतेला पर्याय होऊ शकत नाही’ या शब्दांत ८५ वर्षांच्या या वृद्ध नेत्याने अत्यंत मृदूपणे म्हटलं असलं तरी तो नवी दिल्लीत बसलेल्या भाजपा सरकारवर जोरदार प्रहार होता.

गुजरातच्या शहरी भागात काँग्रेसची अवस्था दारुण म्हणावी अशीच होती. पक्षाला ५५ पैकी पाच जागा मिळाल्या होत्या. आता आम्हाला तिथे १५ ते २० जागा मिळाल्या तरी आम्ही सरकार बनवू शकतो, असा राहुल गांधी यांच्या विश्वासातील काही जणांचा दावा आहे.

ही सगळी वस्तुस्थिती असली तरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी १५० हून अधिक जागांचे लक्ष्य ठरवले आहे. ‘‘आपल्याला ९९ सोडाच, १४९ जागा मिळाल्या तरीही कुणीही आनंदोत्सव साजरा करायचा नाही. १५० हून जास्त जागा हेच आपलं लक्ष्य आहे,’’ असंच ते गेले काही दिवस कार्यकर्त्यांना बजावत आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते भाजपाचा पराभव अवघड आहे; पण १८२ जागांच्या या विधानसभेत १०० पेक्षा कमी जागा मिळणं हे भाजपासाठी नुसतेच संख्याबळ असण्यासारखे असून ती नामुष्कीची बाब ठरेल आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवर त्याचा मोठा परिणाम करणारं असेल.

विजय रुपानींना राज्यात सुरू असलेल्या आंदोलनांबद्दल विचारलं जातं तेव्हा ते मोठं अवसान आणून विचारतात, ‘‘तुम्ही याला आंदोलन म्हणता? खरं आंदोलन केलं होतं ते जयप्रकाश नारायण यांनी. तेव्हा सगळ्या गुजरातमधले लोक रस्त्यावर उतरले होते. आता लोक कुठे रस्त्यावर उतरले आहेत ते मला दाखवा. हे आता रस्त्यावर दिसत आहे ते काँग्रेसने भडकवलेले लोक आहेत,’’ असं त्यांनी नुकतंच एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला सांगितलं.

पण भाजपाला बसणारे झटके लपवणं त्यांना अवघड जातं आहे हेही खरं. २५ ऑक्टोबरला निवडणुका जाहीर होण्यापूर्वी रुपानी सरकारने सगळ्या जातींजमाती आणि संबधित घटकांना आकृष्ट करण्यासाठी गोंजारण्याचा प्रयत्न केला. हे यापूर्वी म्हणजे २००२, २००७, २०१२ च्या निवडणुकांमध्ये कधीच झालं नव्हतं. या सगळ्यात लक्ष वेधून घेणारं ठरलं ते २०१५ च्या दंगलींमध्ये पाटीदार समाजातल्या लोकांवर केलेले जवळपास २०० खटले काढून घेतले जाणे.

सौराष्ट्र हा भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला आहे. तिथे ४८ पैकी ३० जागा भाजपाकडे आहेत; पण तिथे पाटीदारांची संख्या लक्षणीय आहे. या वेळी हे पाटीदार भाजपाला सोडून जाऊ शकतात. त्यामुळे भाजपासाठी इथे काही प्रमाणात तरी चिंतेची बाब आहे. क्षत्रिय करादिया राजपूत या समाजातील सरपंचाला जमिनीसंदर्भातील खोटय़ा प्रकरणांमध्ये अडकवल्यामुळे भाजपाचा गुजरात अध्यक्ष जितू वाघानी याच्यावर हा समाज नाराज आहे.

सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधल्या १९ जिल्ह्य़ांमधल्या ९३ जागांच्या निवडणुका ९ डिसेंबर रोजी होणार आहेत, तर मध्य आणि उत्तर गुजरातमधल्या उरलेल्या १४ जिल्ह्य़ांमधल्या ८९ जागांसाठीच्या निवडणुका १४ डिसेंबर रोजी होणार आहेत. निवडणुकांचे निकाल हिमाचल प्रदेशबरोबरच म्हणजे १८ डिसेंबरला जाहीर होतील.

आत्ता तरी असं दिसतं आहे, की हार्दिक, अल्पेश आणि जिग्नेश हे त्रिकूट तसंच राहुल गांधी वेधून घेत असलेलं लक्ष, जीएसटीमुळे निर्माण झालेली नाराजी, नोटाबंदीचा परिणाम तसंच अँटि-इन्कम्बन्सी या घटकांमुळे भाजपाचा रथ रोखला जाऊ शकतो; पण राज्यभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५० सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. या सभांवर बरंच काही अवलंबून आहे. भाजपातले लोक हे मान्य करतात की, गुजरातमध्ये चांगल्या जागा मिळवण्यासाठी ते मोदींच्या करिश्म्यावरच अवलंबून आहेत. नेमकं काय होतंय हे पाहण्यासाठी सगळ्यांचे डोळे १८ डिसेंबर या तारखेकडे लागले आहेत.
जेमिनी राव – response.lokprabha@expressindia.com

First Published on November 17, 2017 1:02 am

Web Title: gujrat election 2017 difficulties in front of bjp