माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे हे मानवतेचे खरे लक्षण. आज हाच गुण दुर्मीळ होत असला तरी जगात अनेक अशी माणसं आहेत की जी वेळप्रसंगी कसलाही मागचा पुढचा विचार न करता संकटात सापडलेल्यां अनोळखी लोकांची मदत करतात. ती मदत छोटी की मोठी, आर्थिक की मानसिक हे मुद्दे गौण आहेत. धर्म, जाती, पंथ, भाषा, वर्ण असे सारे भेद तिथे गळून पडतात. असतो तो केवळ माणुसकीचा धर्म. अनेकदा तर मदत करणाऱ्याचे नावदेखील ठाऊक नसते. तो मदत करतो आणि निघूनही जातो. हाच चांगलुपणा असतो. जगण्यावरील विश्वास वाढवणारा चांगुलपणा. ‘लोकप्रभा’ने ४६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने समाजातील हा चांगुलपणा जगासमोर आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. वाचकांनीही या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यातील काही निवडक उतारेवजा लेख.

माणुसकीचा धर्म

७ डिसेंबरची सकाळ. आम्ही नुकतेच कुल्र्याच्या म्हाडा कॉलनीत राहायला गेलो होतो. घर लावायला आलेली माझी आई गिरगावात तिच्या घरी निघाली तेव्हा मी माझ्या छोटय़ा मुलीला घेऊन तिला सोडायला स्टेशनवर निघाले. वाटेत नातीचा हट्ट पुरवायला म्हणून आई एका दुकानात तिच्यासाठी चॉकलेट घ्यायला वळली. दुकान अगदीच यथातथा होते. पशाची देवाणघेवाण चालू असताना जवळच मोठय़ा आवाजात आरडाओरडा कानी आला आणि काही कळायच्या आत दुकानाची आडवी फळी उघडून त्या म्हाताऱ्या दुकानदाराने चक्क माझा हात खेचून आम्हाला आत येण्यास फर्मावले. निमिषार्धात झालेल्या त्या प्रकाराने भानावर येईस्तोवर मला इतकेच समजले की कडेवरच्या लेकीसह मी आणि आईने एका टीचभर कळकट खोलीत प्रवेश केलाय. पाठोपाठ धाडदिशी दुकानाचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज आला. आईने घामेजलेल्या तळव्याने माझा हात घट्ट घरला होता. ‘काय झालंय?’ हा माझा प्रश्न बाहेरच्या गोंगाटात आणि काचा फुटल्याचा आवाजात विरूनही गेला. लेकीने घाबरून रडायला सुरुवात केल्यावर प्रचंड असहाय वाटू लागले. आम्ही दोघीही लटपटत्या पायाने थरथरत उभ्या होतो. इतका वेळ दुकानाच्या दाराशी कानोसा घेणाऱ्या त्याने मागे वळून ‘बाहर कुछ गडबड हुई है, वहा आपका रूकना ठीक नही इसलिए मने आपको अंदर बुलाया रोना नही. अरे गुडियाको कुछ बिस्कुट वगरे दो. आवो अंदर आवो बेटी’ म्हणत त्याने खोलीत आमच्यासाठी चटई पसरली. त्याच्या बेटी शब्दाने थोडेसे आश्वस्त वाटले. लटपटत्या पायाला थोडा आधार म्हणून काहीशा नाइलाजानेच आम्ही त्यावर बसलो. टीचभर काळोख्या खोलीतला त्याचा संसारही तसाच भुरकटलेला, विटलेला, समोरच्या िभतीवर मक्कायात्रेचा -चाँदताऱ्याचा फोटो मात्र नजरेत भरणारा. इतक्यात बहुधा त्याच्या पत्नीने आमच्या पुढय़ात पाण्याचे ग्लास आणि लेकीसाठी ताटलीत नानकटाई आणून ठेवली. ‘नही हम नाश्ता करके ही निकले है’, या माझ्या सारवासारवीला दुर्लक्षून लेकीने निव्र्याजपणे खायला सुरुवात केलीसुद्धा. आई मात्र खुणेने ‘इथे’ पाणीही न पिण्यासाठी सुचवत होती आणि मधल्या पिढीची मी. कोरडा पडलेला घसा समोरचे पाणी पिऊन ओला केला. आमच्या नवीन घरात अजून पेपर सुरू झाला नव्हता. केबल कनेक्शनच काय, खरे सांगायचे तर शेजारीही जोडले नव्हते. त्यामुळे आजूबाजूच्या घडामोडींची आम्हाला गंधवार्ताही नव्हती. समोरच्या कॅलेंडरवरची ७ डिसेंबर तारीख पाहिली आणि सर्वागातून वीज सळसळत गेली. ऐकिवात असलेला ६ डिसेंबरचा एका राजकीय पक्षाचा अयोध्येत राम मंदिर बांधायचा कार्यक्रम. त्या निमित्ताने देशभरात तापलेले वातावरण. बाप रे. त्याचीच परिणती म्हणून बाहेरची गडबड असेल का? शंकाच नाही, माझी खात्रीच झाली. आणि अशा परिस्थितीत आम्हा तिघींना कुणी आश्रय दिलाय? परिस्थितीची जाणीव झाल्यावर. ‘त्याला’ दंगलीचे कारण विचारायची माझी मलाच लाज वाटली. मात्र त्याच्याशी बोलताना लक्षात आले की ‘लीडर लोग अपने फायदे के लिए जनता को भडकाते है उनकी वजह से अयोध्या में गडबड हुई है’ असे सांगताना झाल्या घटनेचा उल्लेख त्याने टाळला होता. मुद्दामच टाळला असेल का? काय माहीत. पण त्याच्यातील चांगुलपणाचे दर्शन नक्की झाले. वर्षांनुवष्रे नमाज पढल्याने त्याच्या कपाळावरची खूण त्याच्या धार्मिकपणाची साक्ष देत होता. त्याचे प्रार्थनास्थळ पाडणाऱ्या धर्मातील स्त्रियांनाच आश्रय. भडकलेल्या धर्मबांधवांपासून वाचवताना त्याच्या मनात द्वंद्व निर्माण झाले असेल का, की  प्रत्येक धर्माला अपेक्षित असणाऱ्या माणुसकीच्या धर्माचे त्याक्षणी त्याने पालन केले? बहुतेक होय.

दोन-तीन तासांनंतर बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेऊन विश्वासातील रिक्षावाल्याबरोबर चाचाने (होय, आता तो माझा चाचा झाला होता) सावधगिरी बाळगून आम्हाला घरापर्यंत सोडले. पुढे लवकरच आम्ही कुर्ला सोडले. आज ते दुकान, तो चाचा तिथे आहे की नाही, काहीच कल्पना नाही. पण त्या दिवसापासून चाचाच्या वर्तनाने धार्मिकतेची माझी व्याख्याच बदलून गेली. लहानपणापासून ज्या विचारांच्या चौकटीत वाढले ती पार खिळखिळी झाली. पूर्वग्रहांच्या तटबंदीला सुरुंग लागला. मानवनिर्मित धर्माच्या कुंपणांचे तकलादूपण लक्षात आले. खरा धार्मिक कोणाला म्हणावे याचे उत्तर चाचाने त्याच्या वर्तनाने दाखवून दिले.

      – अलकनंदा पाध्ये, मुंबई.

माणुसकी

वेळ कुणासाठी थांबत नाही. ती पुढेच सरकत असते; आणि जाताना आठवणींचे ठसे मागे सोडत असते. या गोष्टीला आज जवळजवळ १६-१७ वर्षे झाली असतील; पण आजही त्या दिवसाची आठवण झाली, की अंगावर भीतीचा शहारा उभा राहतो.

जन्मानंतर मृत्यू हा अटळ आहे; पण या दोघांमधील रेषा फार अस्पष्ट असते. त्याचा प्रत्यय मला आला होता. गोष्ट बारा वर्षे जुनी आहे; पण आजही ती आठवली की वाटते, कालपरवाचीच घटना आहे.

गुजरात, जानेवारी २००१, मी पोरबंदर येथे कामाला होतो. माझ्यासाठी हा प्रदेश एकदम नवीन होता; पण काम व्यवस्थित चालले होते. त्यामुळे माझे मन तेथे रमले होते; पण अचानक पूर्व गुजरातमधील गोध्रा स्टेशनवर झालेल्या हल्ल्याची बातमी आली. अनेक लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी मी टीव्हीवर पाहत होतो. आम्ही सर्व हळहळत होतो. कुणी केले? का केले? हे काहीच कळत नव्हते; पण याचे परिणाम पुढे गंभीर होतील याची पुसटशी कल्पना मला नव्हती. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण गुजरातभर पसरली आणि जातीयतेची ठिणगी उडाली आणि पूर्ण गुजरातमध्ये जातीय दंगे सुरू झाले. सर्व बाजारपेठा बंद झाल्या. १४४ कलम लागू झाले आणि मृत्यूचा सन्नाटा पूर्ण गुजरातभर पसरला.

मी पोरबंर येथे आणि माझे वरिष्ठ वेरावळ येथे काम करीत होते. पोरबंदर येथे एका तीनमजली इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर मी राहत होतो. माझ्या शेजारी एका दुसऱ्या फिश कंपनीचे पर्यवेक्षक अस्लम आणि महम्मद राहत होते. त्यांची आणि आमची कामाची पद्धत एक असल्याने आणि पुरवठादारदेखील एकच असल्याने आमची चांगली ओळख झाली होती. कामाच्या ठिकाणी दिवसभर एकत्र असल्याने जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले होते. त्यांचे मूळ गाव वेरावळ होते.

गोध्रामध्ये जे घडले त्याचे परिणाम गुजरातमध्ये दिसायला लागले होते. हळूहळू जातीय दंगलीचे स्वरूप यायला लागले होते. पोरबंदरमध्ये तो पूर्ण दिवस संशयाच्या वातावरणात गेला; आणि दुसरा दिवस उजाडला तो दोन समाजांतील जातीय दंगल घेऊनच. त्याला कारण असे घडले की, पोरबंदरहून मासे भरलेला एक ट्रक मुंबईला जायला निघाला होता; पण मध्येच अहमदाबाद येथे समाजकंटकांनी तो ट्रक अडवून त्या ट्रक ड्रायव्हरची भीषण हत्या केली. या घटनेची वार्ता पोरबंदर येथे समजताच पोरबंदर जातीय दंगलीच्या स्वाधीन झाले. हल्ले, जाळपोळ, लुटालूट सुरू झाली. पोलिसांनी लगेच शहराचा ताबा घेतला आणि सायरनचे आवाज रस्त्यावर घुमू लागले. पूर्ण पोरबंदर जातीय दंगलीमध्ये जळू लागेल.

माझ्यासाठी हा प्रकार एकदम नवीन होता. याआधी मी असले प्रकार कधीच बघितले नव्हते. साहजिकच मी पूर्णपणे घाबरलो. ज्या इमारतीमध्ये मी राहत होतो त्याच्या आजूबाजूचा परिसर मुस्लीम वस्तीचा होता. त्यामुळे मी एकच हिंदू या परिसरात आणि या इमारतीमध्ये होतो. अशा वातावरणामध्ये मला तिथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्या वरिष्ठांनी मला अन्यत्र हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला दिला. मी लगेच हॉटेलमध्ये फोन केला होता; पण त्यांनी ‘सध्या हॉटेलमध्ये जागा नाही, उद्या सकाळी आम्ही काही तरी व्यवस्था करतो,’ असे सांगितले. त्यामुळे ती एक रात्र मला त्याच इमारतीमध्ये काढणे क्रमप्राप्त होते.

रात्र झाली तसे संपूर्ण पोरबंदर शांत झाले. मला वाटले कदाचित येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता नसेल? रस्त्यावरील लाइटसुद्धा लावला गेला नव्हता. पोलीस गाडय़ांचा सायरनचा आवाज कानी पडे आणि सायरनचा पिवळा प्रकाश फक्त रस्त्यावर दिसत होता. मला काहीच सुचेनासे झाले होते. मला आधार फक्त माझ्याजवळ असणाऱ्या मोबाइलचा होता. त्यावरून मी वरिष्ठांशी बोलून धीर गोळा करीत होतो. मी इमारतीच्या गच्चीवर गेलो. माझ्या मनामध्ये वाईट विचार येत होते. समजा, जर ते लोक या ठिकाणी आले तर काय करायचे? इमारतीला लागूनच सहा ते आठ फुटांवर बाजूच्या इमारतीची गच्ची होती. जर कदाचित लोक आले तर या इमारतीवरून त्या इमारतीच्या गच्चीवर उडी मारण्याचा धाडसी विचार माझ्या मनात आला होता. बराच वेळ विचार करीत मी तेथे उभा होतो.

त्याच वेळी अस्लम आणि महम्मद गच्चीवर आले. माझी अवस्था बघून ते जोरजोरात हसायला लागले. अस्लम म्हणाला, ‘‘क्यों इतनी चिंता करता है? चिंता मत कर. खाना खाके सो जाते है. एक काम कर, आज हम तुम्हारे कमरे मे सो जाते है, तो तुम्हे डर नही लगेगा,’’ अस्लमच्या वाक्याने मला धीर आला.

मला समजावीत तो त्यांच्या खोलीत मला घेऊन गेला. आम्ही सर्व जण जेवलो आणि नंतर गप्पा मारत माझ्या खोलीत परतलो. बराच वेळ गप्पा मारल्यानंतर मला मोकळे वाटले आणि रात्री बाराच्या सुमारास आम्ही झोपी गेलो.

रात्रीच्या अडीचच्या दरम्यान थाप मारल्याच्या आवाजाने आम्ही सर्व दचकून जागे झालो. काळजाचे पाणी होणे म्हणजे काय याचा मला अनुभव आला. ‘‘तुम रुको, मैं देखता हूँ.’’ अस्लम म्हणाला. त्याने लाइट लावला आणि दरवाजा उघडला. दरवाजाबाहेर पंधरा-वीस माणसांचा जमाव उभा होता. प्रत्येकाच्या हातात काही तरी हत्यार होते. त्यांचा रागाचा पारा चढलेला होता. त्यातील एकाने अस्लमचा शर्ट पकडून विचारले, तुम हिंदू है? अस्लम म्हणाला, नही. मेरा नाम अस्लम है आणि अस्लमने आपली पूर्ण माहिती त्यांना दिली; पण तरीही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी दरडावून विचारले, ‘‘लेकिन हमने सुना है यहाँ एक हिंदू लडका रहता है, वह कहाँ है? तेरे साथ यहाँ कौन है?’’ अस्लम म्हणाला, ‘‘ये दोनो दोस्त है. यह महम्मद,’’ आणि माझ्याकडे बोट दाखवीत म्हणाला, ‘‘ये आरिफ भाई है! हम सब मच्छिमे काम करते है.’’ आणि त्याने आमची संपूर्ण माहिती त्या जमावाला दिली. तरी त्यांचे समाधान होत नव्हते. ‘‘तुम सच बोल रहे हो?’’ त्यांच्यातला एकाने विचारले. ‘‘खुदा की कसम, सच.’’ अस्लम म्हणाला.

एवढं संभाषण झाल्यावर त्या माणसाचा राग शांत झाला. ‘‘ठीक है. हम जाते है. हमको खबर मिली की, एक हिंदू लडका यहाँ रहता है. इसलिए हम यहाँ आए थे. ऐसा कोई लडका हो तो हमे खबर कर देना, हम निचेही रहते है. खुदा हफीज!’’ एवढं बोलून तो सर्व जमाव खाली निघून गेला.

अस्लमने दार लावून घेतले. मी एका कोपऱ्यात जाऊन बसलो. समोर उभा असणारा अस्लम मला देवदूतासारखा वाटत होता. त्याचे आभार कसे मानावे हेच मला कळत नव्हते. काळ एवढय़ाजवळ आला होता; पण अस्लमने ती वेळ जवळ येऊ दिली नाही. अस्लम माझ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘‘देख तू सुबह होतेही यहाँ से चला जा. ये रात कैसे भी गुजर जायेगी, लेकिन कल सच्चाई पता चली तो गजब होगा.’ ती पूर्ण रात्र आम्ही तिघांनी इमारतीच्या गच्चीवर बसून काढली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी सर्वाचा निरोप घेऊन हॉटेलमध्ये गेलो. हे हॉटेल पोरबंदरमधील नामांकित पोलीस स्थानकाजवळ होते. त्यानंतर कित्येक दिवस पोरबंदर शहर दंगलीमध्ये जळत होते.

जातीपातीच्या वर जाऊन या घटनेकडे पाहिले तर उरते ती फक्त ‘माणुसकी!’

      – प्रशांत पांडुरंग बापर्डेकर, रत्नागिरी.

‘तो’ अनामिक

या घटनेला खूप र्वष झाली. १९८६ च्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घडलेला तो प्रसंग, आज तीस वर्षांनंतरदेखील कालच घडल्यासारखा आठवतोय.

आम्ही ठाण्याहून नाशिकला आमच्या एका परिचितांकडे जायला निघालो होतो. आदल्या दिवशीच दुचाकी सíव्हसिंग करून आणली होती. सकाळचा छान, मस्त वारा अंगावर घेत आमचा प्रवास सुरू होता. नुकतेच लग्न झालेले, मस्त रोमँटिक मूडमध्ये स्वत:शीच गुणगुणत आसपासचा निसर्ग पाहात चाललो होतो. आजुबाजूचे वातावरण, बिलकुल रहदारी नाही नि मस्त धावणारी दुचाकी. छान वेगात जात होतो.

एवढय़ात काय झाले कळलेच नाही. मला फक्त एवढेच आठवतेय की मी एका सेकंदापूर्वी मस्त दुचाकीवर बसले होते नि आता रस्त्यावर पडलेय. माझ्या नाकातून जणू रक्ताच्या धारा लागल्या आहेत. पण आश्चर्य म्हणजे मुळीच दुखत नव्हते. मी उठून उभी राहिले. तर मानेवर पाठी काही तरी ठिबकतेय, असे वाटले. म्हणून मानेला, पाठी हात लावला तर सर्व भाग रक्ताने माखला होता. माझे पती पुढे पडले होते. तेही उठून उभे राहिले. त्यांना फारशी दुखापत झाली नव्हती. त्यांची जीन्स ढोपरावर फाटली होती त्यामुळे ढोपर रक्ताळले होते. मला किती जास्त लागलेय हे त्यांना दिसत होते. पण मला काहीच दुखत नसल्यामुळे माझ्या जखमेची तीव्रता मला कळत नव्हती. त्यांनी माझी अवस्था पहिली नि ते भांबावून गेले. अशा सुनसान व अपिरिचीत ठिकाणी मला कुठे न्यावे नि कसे न्यावे, हे त्यांना कळत नव्हते. आमची दुचाकी निकामी झाली होती.

अशा वेळी जणू काही परमेश्वराने धाडल्यासारखीच एक फियाट गाडी आम्हाला बघून थांबली. त्यातून तो माणूस उतरला. आधी एकही शब्द न बोलता त्याने आम्हाला प्रथम त्याच्याकडील पाणी पाजले. नंतर आम्हाला गाडीकडे घेऊन गेला. यांना पुढील सीटवर बसवले नि मला पाठी बसवून त्यांनी यांच्याशी अपघात कसा झाला, कुठे झाला वगरे विचारायला सुरुवात केली. त्यांच्या मते आदल्या दिवशी गाडी सíव्हसिंग करताना चाक आणि मडगार्ड जरा जास्त टाइट झाले असावे, त्यामुळे घासून अपघात झाला असावा.

मागच्या सीटवर खूप साऱ्या  फाईल्स पडल्या होत्या. मी रक्ताने माखलेली. या फाईल्स खराब होतील याची काळजी वाटत होती, सीट तर खराब झालीच होती. पण त्या भल्या गृहस्थाने सांगितले की, तुम्ही डोळे बंद करून शांतपणे पडून राहा. फाईल्सची चिंता करू नका.

त्यांनी आम्हाला तिथल्या एका आरोग्य केंद्रात नेले. आम्हाला तिथल्या सिस्टरच्या हवाली केले. यांना फारसे लागले नव्हते. त्यामुळे त्यांना पायावर पट्टी बांधून ड्रेसिंग केले. मला मात्र  ट्रीटमेन्ट देऊन मोठय़ा हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल असे सांगितले.

आपल्याला एवढी मदत करणाऱ्या माणसाचे नाव-गाव विचारून त्यांचे आभार मानावेत म्हणून आम्ही बाहेर पाहू लागलो. तर तिथे कोणीच नव्हते. आम्ही आत असतानाच तो भला माणूस निघूनही गेला. त्या माणसाच्या या मदतीने माझ्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागले. आमच्याकडून साधे दोन आभाराचे शब्ददेखील नाही घेतले त्यांनी. आज मी जिवंत आहे ती त्या माणसामुळेच. मला त्यांची नेहमी आठवण येते. त्या अनोळखी माणसाला माझ्या उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.

– आशा पाटील, ठाणे.

चांगुलपणाचा पुणेरी अनुभव

त्यावेळी मी सकाळी स्पॅनिश भाषा शिकायला जात असे. स्पॅनिशचा वर्ग करायचा आणि मग कार्यालयात हजर व्हायचे असा दिनक्रम होता. कार्यालयीन कामासाठी पुढच्या वर्षांचे बजेट तयार करायचे होते, त्याच तंद्रीत दुचाकीवरून कार्यालयास जावयास निघालो होतो. वळणावरच्या अपघातासाठी कुप्रसिद्ध उतारावर मी एकाएकी घसरून पडलो. दुचाकी घसरत आहे आणि आपण पडतो आहोत एवढंच जाणवत होतं. त्यावेळी तोल सावरता आला नाही.

त्याच रस्त्याने जाणाऱ्या एका सद्गृहस्थाने मला त्याच्या चारचाकी गाडीतून घरी आणून सोडले. त्यांचे नाव प्रवीण चंद्रा. माझी दुचाकी माझ्या पायावर पडली होती. ती दुचाकी उचलून त्यांनी बाजूला लावली. दुचाकी कुलुपबंद करून किल्ली काढून ठेवली. मला उचलून स्वत:च्या चारचाकी गाडीत ठेवले. माझ्या फोनवरून फोन केले. मी बेशुद्ध होतो तर मला थोडे शुद्धीत आणून पत्ता विचारला. सोसायटीत आल्यावर मला आठवणीने दुचाकीची किल्ली, दुचाकी कुठे लावली ते ठिकाण सांगितले, पशाचे पाकीट दिले, पसे बरोबर आहेत का हेही विचारले. मी आठवणीने त्यांचा फोन क्रमांक घेतला.

प्रवीण यांनी त्यावेळी रस्त्यातून उचलून घरी आणले नसते तर आज काय झाले असते या आठवणीने थरकाप उडतो. अपघाताच्या वेळी मी कुणावरही धडकलो नाही, कुणी माझ्यावर धडकले नाही. त्याहून थोर नशीब हे की मला प्रवीण भेटले अगदी देवदूतासारखे. ते भेटले नसते आणि दुसऱ्या एखाद्या वाहनामुळे मला आणखीन मोठय़ा संकटाला तोंड द्यावे लागले असते. प्रवीणचे थोरपण यात आहे की सकाळी कामाच्या वेळी त्यांनी स्वत:चे काम सोडून मला मदत केली. याच पुण्यात एक कॉलेजकन्या वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्यामुळे गतप्राण झाली; त्याच पुण्यात मला वाचवणारा पुण्यात्मा भेटला. कुठलीही ओळख नाही, कुणी आपली स्तुती करावी ही अपेक्षा नाही असे हे गृहस्थ. आता माझ्यावर पण एक नतिक जबाबदारी आहे, अपघातात सापडलेल्यांना मदत करणे.

      – अभिजित मोहिरे, पुणे.

सरदारजींची मदत

त्यावेळी आम्ही विदर्भातील जंगलातून प्रवास करत होतो. माझ्या गाडीत नात्यातल्या सात-आठ महिला होत्या. वाटेत आमच्या गाडीचे टायर पंक्चर झाले. ड्रायव्हर टायर बदलत असतानाच अचानक कुठून कुणास ठाऊक पण सात-आठ गुंड आले. त्यांचा इरादा काही नेक वाटत नव्हता. इतक्यात मागून एक ट्रक आला. त्यात तीन सरदारजी होते. आमची एकंदरीत परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. सरदारजींनी ट्रक थांबवला. आमच्या गाडीचे टायर बदलून झाले. सरदारजी म्हणाले, ‘‘तुमची जीप पुढे जाऊ दे. आम्ही तुमच्या मागून येतो.’’ पुढे नागपूरला आमच्या घरापर्यंत त्यांनी आम्हाला सोबत केली. घर आल्यावर त्यांना म्हटले चहा घेऊन जा. ‘फिर कभी’ म्हणत त्यांनी ट्रक सुरू केला.

– मनोहर जोगळेकर, बोरिवली, मुंबई.

असाही चांगुलपणा

एकदा माझा मित्र राहुल पडवळ एटीएममध्ये गेला असता त्याला एटीएमच्या बाहेरच एक डेबिट कार्ड सापडले. एटीएममध्ये कार्ड वापरण्यासाठी पिन आवश्यक असतो. त्यामुळे तसेही ते कार्ड हरवल्याने धोका नव्हता. पण या कार्डावर जे कव्हर होते त्यावरच त्या कार्डाचा पिन लिहून ठेवला होता. मित्राने सहज म्हणून ते कार्ड वापरून त्यावरील खात्यातील शिल्लक पाहिली. त्या खात्यात ७० हजार रुपये होते. कार्ड ज्याचे आहे त्याच्यापर्यंत पोहचवण्याचा मार्ग आम्हाला सुचत नव्हता. शेवटी राहुलने विचार केला आणि सरळ त्या कार्डाचे तुकडे करून टाकले. जेणेकरून त्या कार्डावरून कोणालाच व्यवहार करता येणार नाही.

– सूरज पाटे

मनाची श्रीमंती

गोष्ट रेल्वेमधलीच. माझ्या समोर घडलेली. मी ७९ ते ८२ साली तारापूर येथे काम करत होतो. एकदा मी कर्जतहून तारापूरला जात होतो. नेहमी मी ९.३५ च्या लोकलने दादरला व १२.३५ ला दादरहून पॅसेंजर पकडत असे. त्याप्रमाणे चाललो होतो. अंधेरीला एक महिला व लहान मुलगा चढले व माझ्या समोरच्या बाकावर बसले. साधारण अंधेरीला सर्व बाके भरत असत. माझे शेजारी मध्यमवयीन चांगले गृहस्थ बसले होते. ब्रीफकेस वगरे बघता, घडय़ाळ, चेन होती म्हणजे सधन असावेत. गाडी सुटली. मुलगा खिडकीजवळ असल्यामुळे खेळत होता. मध्येच बोरिवलीनंतर ती महिला पर्समध्ये काहीतरी शोधत होती. बाहेर काढलेले सामान बाजूला ठेऊन शोधत होती. त्यातच त्यांचे तिकीट होते. ते त्या मुलाच्या हाताला लागले. आई ओरडली तरी तो त्याच्याशी खेळत होता. आणि बघता बघता थोडय़ा वेळाने त्याने ते खिडकीतून बाहेर फेकून दिले. सगळेच जण अवाक् झाले. त्या बाईने मुलाला रट्टे दिले. ती खूप चिडली होती. सर्वानी तिला आवरते घे सांगितले, मुलगा लहान आहे, चालायचेच, असं सांगून समजूत घातली. अखेरीस ती बाई शांत झाली, पण रडत रडत म्हणाली, ‘‘आता टीसी आल्यावर काय करायचे?’’ आम्ही सगळे म्हणालो बघू, सहसा या गाडीला टीसी नसतात.

सर्व शांतता झाली, पण त्या बाईचे दुर्देव, विरारनंतर नेमका टीसी आलाच. व्हायचे तेच झाले, ती घाबरली, टीसी व तिचा वाद सुरू झाला. घडलेली सर्व हकिगत ती त्याला सांगू लागली. आम्ही सर्वानी पण त्याला दुजोरा दिला. तरी तो ऐकेना. अशा स्टोऱ्या बरेचजण रचतात असे म्हणू लागला. आम्ही त्या बाईला सांगितले तो ऐकत नाही, पसे भरून टाक. पण दंड भरण्याएवढे पसे तिच्याकडे बहुतेक नव्हते. अचानक टीसीचा आवाज चढला व तो महिलेला दंडाला धरून अटक करतो, बाकामधून बाहेर या असे ओरडून सांगू लागला.

हे पाहिल्याबरोबर माझ्या शेजारचे गृहस्थ टीसीवर ओरडले, ‘‘अहो सगळे सांगतात तरी तुम्ही तुमचा सभ्यपणा का सोडता व आधीच घाबरलेल्या त्या बाईला का मोठय़ा आवाजात दरडावत आहात?’’

टीसी म्हणाला, ‘‘आम्हाला फक्त कायद्याने दंड व तिकीट भार कळतो. भावना नाही, एवढा पुळका असेल तर तुम्ही द्या दंड.’’ त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ‘‘म्हणून तर मी मध्ये पडलोय. तुमचा आवाज खाली करा.’’ त्या सद्गृहस्थाने दंडाची रक्कम टीसीला दिली. रक्कम जवळ जवळ चारशेच्या वर होती. तिला डहाणूला उतरायचे होते. ती बाई त्यांना म्हणाली, ‘‘काका, तुमचे खूप उपकार झाले, माझ्याकडे खरंच पसे नाहीत तुमचे उपकार कसे फेडू. तुमचा पत्ता द्या. मी पसे पाठवून देईन.’’ तो गृहस्थ म्हणाला, ‘‘काका म्हणालीस ना, माझे पसे मिळाले, आता सर्व विसर.’’ तो माणूस केवळ सधन नाही तर मनाने आणि वृत्तीने श्रीमंत होता.

– माधव भडसावळे, कर्जत.

माऊलीचा आधार

नेहमीच वर्तमान आणि भविष्य आपल्याला पुढे ढकलत असतात. एखाद्या वळणाशी नकळत आपण मागे वळून बघताना हळुवार क्षणी मला ती अमावास्येची रात्र प्रकर्षांने आठवते.

या घटनेस बरीच वर्षे झाली. भटकंतीचा आणि देवदर्शनाचा आनंद घेत आम्ही वेगवेगळी ठिकाणं िहडायचो. लहान मुलगा संजीवला घेऊन आम्ही एकदा सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर कासार-आष्टा म्हणून जैन तिर्थक्षेत्र आहे तेथे जायचे ठरवले.

डिसेंबरमध्ये सुट्टी असल्यामुळे तेथे जाण्याचा बेत निश्चित केला. मुंबई-आचलेर एसटीचे आरक्षण केले. रात्री प्रवासास निघालो. तेथे राहण्याची आणि जेवणाची सोय होती त्यामुळे निर्धास्त  होतो. गाडी सुटताना वाहकाला कासार-आष्टा आल्यानंतर सांगा अशी पूर्वसूचना दिली. प्रवास सुरू झाला. पण कासार-आष्टा येण्याची चिन्हे दिसेनात म्हणून वाहकाकडे चौकशी केली तर तो शांतपणे म्हणाला, ‘‘अहो, कासार-आष्टा गाव गेले. आता आपण फारच पुढे आलो.’’ छातीत धस्स झाले. चालकास बस मागे घेण्याची विनंती केली, पण तो काही तयार नव्हता. अमावास्येची रात्र, सोबत संजीव असल्यामुळे आम्ही काळजीत पडलो, पण इलाज नव्हता. शेवटी मुक्कामास आचलेर गावी एसटी थांबली. गाडीतून उतरताना संजीवची दुधाची बाटली फुटली.

एसटी थांबल्यानंतर सर्व प्रवासी शांतपणे घरी निघून गेले. वाहकाने एसटीतच बसा असा सल्ला दिला. ते शब्द एका माऊलीने ऐकले. ती आमच्याजवळ येऊन विचारपूस करू लागली तिने आम्हाला घरी येण्याविषयी विनंती केली पण मन तयार होईना. त्या माऊलीच्या विनंतीस मान देऊन तिच्या घरी गेलो. उत्तम पाहुणचार केला. संजीवसाठी दूध दिले. तो ओक्साबोक्सी रडू लागला. कसेतरी थोडे दूध प्याला. रात्र संपली. पहाटे सहा वाजता ती बस परत मुंबईस निघणार होती. पहाट झाली, बसमध्ये जाऊन बसलो. ती माऊली निरोप देण्यासाठी आली. अश्रू भरलेल्या नयनांनी निरोप दिल्यानंतर विघ्नहर पाश्र्वनाथाचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी मुंबईस सुखरूप पोहचलो. त्या माऊलीने त्या रात्री आधार दिला नसता तर..

 मंगल दोशी, खारघर, नवी मुंबई.

पेरतो तेच उगवते

१९७६ साली नांदेडला कला महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून झालेल्या नेमणुकीचे पत्र घेऊन मी निघालो होतो. प्रथमच एकटय़ाने प्रवास करत होतो. गाडीने वेग घेतला. वडीलधाऱ्यांच्या प्रेमळ सूचना लक्षात आल्यामुळे खिशातून तिकीट काढून बघत असताना वाऱ्याचा झोत आत आला नि माझ्या हातातील तिकीट उडाले. मी तर ओरडतच उठलो. पाहतो तर काय! दरवाजाजवळ बसलेल्या एका म्हातारीच्या पुढय़ात ते तिकीट पडले. मला बरे वाटले. तिकीट बाहेर तर गेले नाही. मी त्वरित तिच्याकडे धावलो. पण त्या म्हातारीने माझ्याकडे प्रेमाने पाहिले व ते तिकीट उचलून त्याच्या चिंधडय़ा केल्या व हवेत फेकून वर टाळ्या वाजवल्या.

त्या क्षणी माझी काय अवस्था झाली असेल. माझ्या हातापायातले बळच निघून गेले. खिन्नपणे जागेवर आलो. तिकीट नसल्यामुळे कापरेच भरले. आता आपल्याला रेल्वे पोलीस पकडून तुरुंगात डांबतील, अशी दृश्ये डोळ्यांसमोर दिसू लागली. रडायचा बाकी होतो. त्याच वेळी एक सद्गृहस्थ माझ्याकडे आले व काय झाले ते विचारू लागले. तेदेखील शिक्षकच होते. पुढच्या स्टेशनवर मी तुम्हाला तिकीट काढून आणून देतो असे त्यांनी मला आश्वस्त केले. तेवढय़ात इगतपुरी स्टेशन आले तसे ते सद्गृहस्थ उडी मारून माझ्याकडून पसे न घेताच उतरले व गाडी सुटायच्या आत तिकीट घेऊन हजर झाले. मी त्यांचे आभार मानत पसे देण्यासाठी गेलो असताना ते म्हणाले, ‘अहो सर, तुम्ही नवीन जागेत जात आहात. तिकडे ओळखीचे नसणार, पशांची गरज असणार, त्यामुळे तुमचा पगार झाल्यानंतर माझ्या शाळेच्या पत्त्यावर ते पसे पाठवा.’ मी तर स्तब्धच झालो. डोळे पाणावलेले. त्यांचे आभार कसे मानावेत हेच कळेना. जगात अशीही माणसे असतात यावर श्रद्धा बसली.

माझ्या मनात एका गाण्याची ओळी घुमत होत्या. ‘जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर’ आज प्रथमच या गाण्याचे सार समजून आले. चार-पाच महिन्यांपूर्वी मी नांदेडला मुलाखतीसाठी गेलो होतो, तेव्हा लॉजमधील प्रसंग आठवला. लॉजमधून सकाळी निघालो तेव्हा त्या खोलीतील दुसरे गृहस्थ शांतपणे झोपले होते. माझे दिवसभराचे काम आटोपून रात्री परत आल्यावर मॅनेजर एकदम ओरडलाच. मला समजेना. त्याने सांगितले की, माझ्या रूम पार्टनरचे पसे चोरीला गेल्यामुळे त्यांचा माझ्यावर संशय होता. पण मी परत आल्यामुळे संशय दूर झाला.

रात्री उशिरा ते खोलीतले दुसरे गृहस्थ परत आले. घडल्या प्रकाराने मला दडपणच आले होते. पण ते गृहस्थ आत येऊन माझी माफी मागू लागले. बोलताना कळले की, ते औषध विक्रीप्रतिनिधी होते. बाजार बंद असल्याने त्यांची पैशाची व्यवस्थादेखील होत नव्हती. त्यामुळे काहीसे हतबल झाले होते. मला काय वाटले माहीत नाही, उठलो आणि माझ्याजवळचे थोडे पैसे त्यांच्या हातावर ठेवले. त्यांना सांगितले की तुमच्यासारखे कोणीही अडचणीत असेल त्यांना मदत करा, म्हणजे माझे पैसे मिळाले. आपण जे पेरतो तेच उगवते. चांगुलपणाबरोबर चांगुलपणा.

प्रकाश गणेश कब्रे, शिरोडा, जि. सिंधुदुर्ग.

प्रवासातली सोबत

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर थोडय़ाच वेळात लुफ्तान्साच्या काऊंटरवरून लगेज चेक-इनची घोषणा झाली. माझ्या मनात बऱ्यापैकी हुरहूर दाटून आली होती. एकीकडे मरणासन्न आईच्या शेवटच्या दिवसांत आपण जवळ राहू शकणार नाही म्हणून, तर दुसरीकडे सुनेच्या उच्च शिक्षणाच्या निमित्ताने छोटय़ा नातीच्या देखभालीसाठी शिकागोला जाणे अपरिहार्य होते म्हणून! शिवाय एकटीने प्रवास करायचा याचे पण खूप दडपण आले होते.

बॅगेज चेक झाल्यानंतर आम्हाला जेवणासाठी एअरवेजच्या लाऊंजमध्ये नेण्यात आले. टेबलावर समोर फक्त एकच व्यक्ती आहे. गृहस्थ तरुण वयाचा, तरतरीत वाटला पण चेहरा गंभीर होता. हाय-हॅलो करीत आमचा संवाद सुरू झाला. तो चेन्नईहून मुंबईला आला असून शिकागो मार्गे डेट्राईटला जाणार कळल्यावर मला या योगायोगाचे आश्चर्य वाटले. माझ्या प्रवासाचे कारण कळताच आणि एकटीने प्रवास करण्याचे दडपण लक्षात येताच त्याने मला ‘काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत’ म्हणून धीर दिला. साहजिकच थोडय़ा मोकळेपणाने संभाषण सुरू झाले. त्याचे नाव एस. शेखरन् असे असून, तो वडील आजारी म्हणून एक महिन्यापूर्वीच भारतात येऊन गेला होता. आणि लगेचच ते गेल्याचे कळल्यावर पुन्हा येऊन सर्व क्रियाकर्म करून पंधरा दिवसांनी अमेरिकेत परत चालला होता. थोडय़ा फार फरकाने माझ्या आणि त्याच्या मन:स्थितीत पुष्कळच साम्य मला जाणवले.

विमानांत आमच्या सीट्स थोडय़ाफार अंतरावर असूनही त्याने दुरून मला हात करून ‘मी इथे आहे’ अशी खूण केली आणि मी निर्धास्त झाले. फ्रँकफर्टला ब्रेक

होता, तेव्हा तो सोबत होता. गंमत म्हणजे पुढच्या शिकागोपर्यंतच्या प्रवासात आम्हाला नेमक्या शेजारी शजारी सीट्स मिळाल्या. पुन्हा योगायोग! मग बऱ्याच मोकळेपणाने गप्पा झाल्या. त्याचे लग्न झालेले असून त्याला एक लहान मुलगी असल्याचे कळले. तो मोठय़ा कंपनीत वरिष्ठ पदावर असून आई-वडिलांना सोडून एवढय़ा लांब करिअरच्या निमित्ताने रहावे लागते म्हणून होणारी घुसमट त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होती.

शिकागोला पोचल्यावर व्हिसा मिळाल्यावर, सामान घेऊन बाहेर आले तर त्याच वेळी दोन-तीन फ्लाइट्स एका मागोमाग आलेल्या असल्याने झालेली अफाट गर्दी पाहून मी भांबावून गेले. शिकागोचे विमानतळ प्रचंड मोठे आहे. इतके एक्झिट्स पाहून मला कुठून बाहेर पडावे, सुचेना! लोकांचे लोंढेच्या लोंढे निरनिराळ्या मार्गानी भराभर निघून जात होते. तेवढय़ात कुणीतरी हात हलवून लक्ष वेधीत असल्याचे जाणवले. तर शेखरन! त्याला पुढची फ्लाईट पकडायची असूनही केवळ माझ्यासाठी तो उभा दीड तासापेक्षा जास्तच! त्याने मला विशिष्ट एक्झिटने जाण्याची खूण केली. खरे तर त्यावेळेस त्याचे आभार मानून निरोप घ्यायला हवा होता, परंतु झरकन वळून तो निघून गेला!

 स्वाती नाईक, पुणे.

तू माझा सांगाती

‘गाडीच्या इंजिनातून धूर येतो आहे. काहीतरी बिघाड आहे. वाईजवळ आहे. तिथल्या डेपोत ड्रायव्हर गाडी थांबवत थांबवत कशीबशी घेऊन जाईल. तिथे वर्कशॉपमध्ये गाडी दुरुस्तीसाठी नेली जाईल. दुरुस्तीला किती वेळ लागेल सांगता येत नाही.’ आधीच गचके खात इतका वेळ थांबत थांबत चालणारी गाडी जास्तच आचके देऊ लागल्यानं कंडक्टरनं ही घोषणा केली. त्यावेळी आमची एसटी बस पुण्याच्या अध्र्या वाटेवर येऊन रात्रीचे नऊ वाजले होते.

दहा-बारा वर्षांचा मी आणि माझी आई, आता आपण कसे आणि कधी पुण्याला घरी पोहोचणार या विचारानं कावरेबावरे झालो. गाडीत आई आणि एक पन्नाशीच्या बाई एवढय़ा दोघीच बायका. त्यामुळे वाईला रात्री साडेदहाच्या सुमारास, बाकीचे सडे फटिंग बापे लोक आपापल्या गावाची गाडी बघून जाण्याच्या बेतास लागले. पण आम्हाला काही सुचेना. गाडी दुरुस्त होईपर्यंत थांबायचं की दुसरी गाडी पकडून जायचं. मे महिन्याच्या सुटीचे गर्दीचे दिवस. त्यामुळे उभे राहायलाही जागा मिळेल याची शाश्वती नव्हती.

माझ्या आईची आणि त्या बाईंची द्विधा मन:स्थिती त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलेले दोन मध्यमवयीन गृहस्थ आमच्यापाशी आले आणि म्हणाले, ‘‘चला, तिकडं वाई-मुंबई गाडी सुटते आहे. या आपल्या गाडीची काही खात्री नाही. आम्ही तुम्हाला त्या बसमध्ये जागा मिळेल असं बघतो. चला पटकन.’’ विचार करायला फारसा वाव नव्हता. ते दोघेही भले वाटत होते. कोणत्याही बाबतीत साशंक होण्याचं माझं वयच नव्हतं आणि आईचा पदर धरून जाणं एवढंच माझं त्यावेळी कर्तव्य होतं. वाई-मुंबई गाडीत प्रचंड गर्दी होती. त्या दोन माणसांनी मला आणि आईलाही आपापल्या बॅगा देऊन मधल्या जागेत सोयीस्कर ठिकाणी बसायला दिलं. त्या दुसऱ्या बाईंना बसायला सीट मिळाली. ते दोघे मात्र उभेच राहिले. पुण्यात स्वारगेटला पोहोचलो मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास. त्यावेळी रिक्षानं रविवार पेठेत घरी जायचं दिव्य करायचं होतं. पण फारसा विचार करावाच लागला नाही. त्या दोघांनी निर्णय घेऊन टाकला होता. त्यातले एकजण आमच्याबरोबर आले आणि दुसरे त्या बाईंना घेऊन गेले. घरासमोर रिक्षातून उतरताना आईनं द्यायला पसे काढले तर त्या भल्या गृहस्थानं ते देऊ दिले नाहीत. फक्त आईनं मानलेल्या आभाराचा नम्रपणे स्वीकार केला असावा. दरम्यान आम्हाला हे समजलं की त्या दोघांनाही थेट मुंबईला जायचं होतं. परंतु आम्हाला घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी ते पुण्यातच उतरले आणि नंतर लॉजवर राहून सकाळी मुंबईला जाण्याचं त्यांनी ठरवलं होतं. ज्या काळात माणुसकीवरचा विश्वास उडवून लावणाऱ्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडासारख्या घटना घडण्यास सुरुवात झाली होती त्याच वेळी भीषण वाटू लागलेला रस्ता पार करायला देवच जणू सांगाती होऊन आला होता, त्या भल्या गृहस्थांच्या रूपानं.

– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे.

धन्य तो टेलिफोनवाला

माझा सख्खा भाऊ गतिमंद होता. शारीरिकदृष्टय़ा अत्यंत कमजोर, बोलणं स्पष्ट नाही. शिक्षण थोडंसुद्धा नाही. अत्यंत घाबरट, रस्त्याने जाताना फटाके, बँड या गोष्टींना भीत असे. रस्ता क्रॉस करता येत नसे. कष्टाची कामे करू शकत नसे. रस्ता नेहमी चुकायचा, हरवायचा. पैशाचे व्यवहार कळत नसत. तथापि आम्ही या शहरांत बरीच वर्षे राहात असल्यामुळे आणि अनेक ओळखी असल्यामुळे कुणी ना कुणीतरी आम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने त्याला घरी आणून सोडीत असत!

एकदा गायीला नैवेद्य घालण्यासाठी घराच्या बाहेर पडला. वास्तविक पाहता गाय जवळच होती. परंतु भाऊ रस्ताच चुकला आणि घर शोधत शोधत बऱ्याच लांब अंतरावर गेला. आम्ही कुटुंबीय मंडळी आणि अनेक ओळखीचे लोक या सर्वानी मिळून त्याला शोधण्यासाठी अक्षरश: जिवाचे रान केले. परंतु सर्वच प्रयत्न व्यर्थ ठरले. रात्री १०/११ वाजले तरी स्वारी घरी आली नाही. तो फक्त सकाळच्या जेवणावर होता. त्यानंतर पोटात अन्न नाही अशा अवस्थेत घर शोधत फिरत होता. काळजीने अश्रू येणे थांबत नव्हते. अत्यंत निराश झालो होतो.

आणि.. रात्री दोन वाजता फोन खणाणला. एका टेलिफोन बुथवरून माणसाने कळविले की, ‘तुमचा भाऊ रस्ता चुकल्यामुळे इथे आला आहे. भावाने त्याला फक्त माझे नाव सांगितले होते. पत्ता सांगता येत नव्हता. त्या बिचाऱ्या माणसाने टेलिफोन डिरेक्टरीमधून मोठय़ा त्रासाने नाव शोधून मला फोन केला होता. धन्य तो टेलिफोन बुथवाला! त्याला माझे शतश: प्रणाम! या टेलिफोन करणाऱ्या व्यक्तीला आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.

 अरुण भालेराव.

पुणेरी रिक्षावाला

दुपारी बाराच्या आत पुण्यामध्ये एका संस्थेच्या कार्यालयात जाऊन माझ्या पुस्तकाच्या दोन प्रती जमा करायच्या होत्या. म्हणून आम्ही नवरा-बायको रिक्षातून निघालो. बारा वाजायला वीस मिनिटं बाकी होती. मी मोबाइल हातातच धरून बसलो होतो. संस्थेची इमारत दिसली, मात्र रिक्षा नेमकी रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभी राहिली होती. रिक्षा पुढे नेऊन वळवून आणल्यास उशीर झाला असता. म्हणून तेथेच सोडून तो रस्ता पार केला. संस्थेत गेलो, पुस्तकं देण्यासाठी पिशवीत हात घातला तर मोबाइल नाही. मी मोबाइल रिक्षात विसरलो असणार असा मला साक्षात्कार झाला!

एकदमच गोंधळून गेलो. धावत बाहेर जाऊन ती रिक्षा कुठं दिसते का हे बघू लागलो. पण सर्व रिक्षा सारख्याच दिसू लागल्या. रिक्षावाल्याचा चेहरासुद्धा धड आठवेना. बरं हा मोबाइलसुद्धा नुकताच मुलगी व जावयाने अमेरिकेतून वाढदिवसाची भेट म्हणून पाठवलेला. बायकोने तिच्या मोबाइलवरून फोन केला, तर आधी कॉल उचलला गेला नाही. पण नंतर उचलला. पलीकडून रिक्षावालाच बोलत होता. तो म्हणाला, ‘‘तुमचा फोन रिक्षात राहिला होता. तो मला सापडला आहे आणि तो घेऊन, मी तुम्हाला जिथं सोडलं होतं तिथंच येतो आहे. जरा वेळ लागेल. कारण ट्रॅफिक खूप आहे. पण मी पोहोचतोच आहे. काळजी करू नका!’’

अक्षरश: परमेश्वराला पाहून जितका आनंद होईल तितका आनंद मला रिक्षावाला आणि त्याच्या हातातला मोबाइल पाहून झाला. आधी तर मी त्याला कडकडून मिठी मारली. त्याच्या चांगुलपणाचं कौतुक केलं. त्याचा, त्याच्या रिक्षाचा आणि त्याच्यासोबत माझा फोटो काढला आणि त्याचं नाव, पत्ता लिहून घेतलं. रिक्षाचालकाचं नाव आहे भागवत रामराव टेकाळे.

– विकास बलवंत शुक्ल, चाळीसगाव.

भला माणूस

नेहमीप्रमाणे मी माझ्या धाकटय़ा मुलाला शाळेत सोडायला गेले. मुलगा शाळेच्या बसने जातो. बस स्टॉपवर बस येऊन गेल्यावर मुलाला बसने सोडल्यावर घरी आले. घरी आल्यावर काही क्षणांतच माझ्या लक्षात आले की, माझा मोबाइल माझ्याजवळ नाही. मी हवालदिल झाले. परत मुलाच्या बस स्टॉपवर आले. परंतु मोबाइल नव्हता. घरी तपासले. पण व्यर्थ! काही सुचेना. मला खात्री पटली की बस स्टॉपवर असताना तिथल्या बसण्याच्या बाकडय़ांवर मी चुकून मोबाइल ठेवला आणि तो तेथेच राहिला. मोबाइल हरवला आता काही परत मिळणार नाही असेच वाटले. परंतु तासाभरात मी ज्या दुसऱ्या मोबाइलवरून माझ्या मोबाइलवर संपर्क करत होते त्या नंबरवर फोन आला आणि माझा मोबाइल त्यांच्याकडे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्या सद्गृहस्थाने मला नौपाडा पोलीस ठाण्यात माझा मोबाइल ठेवतोय, तुम्ही येऊन घेऊन जा असे सांगितले. मी माझ्या मोठय़ा मुलाला, काकांना घेऊन पोलीस ठाण्यात गेले. तिथे त्या भल्या माणसाने पोलिसांसमोर रीतसर नोंदणी करून मला माझा मोबाइल परत केला. त्या भल्या माणसाने मी दिलेली बक्षिसाची रक्कमही नाकारली. आजही जगात चांगली माणसे आहेत हेच खरे. त्या भल्या माणसाचे नाव दत्तु तुपारे.

 – मानसी वेसावकर, ठाणे.

इस्पितळातील अनोखी मदत

त्यावेळी माझी मुलगी केवळ सात-आठ महिन्यांची होती. ती न्यूमोनिया आणि डायरिया या दोन्हीने अतिशय आजारी होती. तिला इस्पितळात भरती करणे आमच्यासाठी आवश्यक होते. ते इस्पितळ खेरवाडी, वांद्रे येथे होते आणि आम्ही सांताक्रूझ पूर्वेला राहात होतो.

एवढय़ा लहान मुलीबरोबर इस्पितळात २४ तास राहाणे गरजेचे होते. तसेच तिच्या औषधाच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणेसुद्धा आवश्यक होते. त्याच वेळी माझ्या सासूबाई घरी अंथरूणाला खिळून होत्या. या सगळ्यातून मार्ग काढणे मोठे जिकिरीचे काम होते. या सगळ्या धावपळीत माझ्या नणंदेचीही कोणत्याही प्रकारची नाराजी किंवा वैताग नसे. तीची खूपच मदत झाली.

दिवसभराचे बरेचसे वेळापत्रक नीट केले होते. पण सायंकाळी चार-पाच वाजता मुलीला दूध देताना ते गरम करावे लागायचे. त्यासाठी तेथे सोय नव्हती. पहिल्या दिवशी तेथील एका बाईंनी मदत केली. पण पुन्हा प्रश्न होताच. त्या इस्पितळासमोर एक गणपती मंदिर आहे. सकाळचे मुलीचे आवरून झाले की तिला घेऊन बाहेर एखादी फेरी तिच्या हाताला सलाईनसाठी लावलेली पट्टी सांभाळत करीत असे. एकदा तिला फिरवताना एक आजी मंदिरात दर्शनाला आल्या होत्या. त्यांनी आम्हाला पाहिले आणि मुलीची चौकशी केली. बोलता बोलता त्यांना दूध तापवण्याची अडचण समजली. त्या हातोडे आजी जवळ जवळ सत्तरीच्या होत्या. पण नंतर रोज त्या तीन साडेतीन वाजता दूध घेऊन घरी जात, तापवून थंड करून स्वच्छ बाटलीत भरून पुन्हा आणून देत. ही गोष्ट म्हटलं तर अजिबात सोपी नव्हती. पण त्या आजी ते करीत होत्या. त्याशिवाय माझ्यासाठी कधी एखादी भाजी किंवा कधी नाश्ता घेऊन येत. असे आम्ही इस्पितळात असेपर्यंत करीत होत्या. मी तर म्हणते त्या आजींच्या रूपाने देवच धावून आला होता.

त्यानंतर दोन-चार वेळा मुद्दाम हातोडे आजींना भेटूनही आलो. त्यांची ही मदत आम्हाला अत्यंत मोलाची होती. आज जरी हातोडे आजी हयात नसल्या तरी आमच्या मनातील त्यांचे स्थान अढळ आहे.

– जेतश्री मिलिंद गोरे, अंधेरी, मुंबई.

दुर्मीळ सरकारी चांगुलपणा

माझे सासरे हार्ट अ‍ॅटॅकने अचानक गेल्यामुळे आम्हाला मूळ गावी जावे लागले होते. सर्व विधी करून जेव्हा पंधरा-वीस दिवसांनी परत आलो, त्यानंतर दोन दिवसांनी आम्हाला प्रचंड मोठा आकडा असलेले विजेचे बिल आले. पाठोपाठ नोटीस, दोन दिवसांत बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित केला जाईल. मी घाईने जाऊन अधिकाऱ्यांना भेटले त्यांना ही समस्या समजली, पण त्यांची संगणक प्रणाली बंद असल्याने दोन दिवसांनी या असे सांगितले. दोन दिवसांनी गेले तर त्यांनी बिलाची चूक मान्य केली. परंतु तरीही यंत्रणा सुरू करायला अजून दोन दिवस लागतील तरी तुम्ही उद्या बिल भरून टाका, जास्त भरलेले पैसे पुढील बिलात वळते होतील असेही सांगितले.

मी दुसऱ्या दिवशी बिल भरायला गेले असता वाटेत असतानाच मुलीचा रडत रडत फोन आला की, मीटर काढून न्यायला लोक आले आहेत. मी त्यांना फोनवर सर्व वस्तुस्थिती समजावली, त्यांच्या अधिकाऱ्यांशी झालेली चर्चा सांगितली आणि आता पैसे भरायलाच चालले असल्याचे सांगितले. अखेरीस परत घरी आले. घरासमोरच मीटर हातात घेऊन तीन-चार जण उभे होते. परत त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकून घेत नव्हते. त्यात पुन्हा मे महिन्यातील ऊन तापले होते. माझी बिघडलेली तब्येत, मुलीचे रडणे आणि या लोकांचे ऐकून न घेणे या तिरमिरीत मी त्या अधिकाऱ्याला एक चापट मारली. ते लोक निघून गेले.

मला थोडय़ा वेळाने पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले. मी गेले तर हे अधिकारी आणि त्याच्या हाताखालच्या लोकांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. तोपर्यंत मला यातले गांभीर्य आणि परिणाम लक्षात आला नाही.

दोन-तीन वर्षांनंतर केस न्यायालयात सुरू झाली. तेव्हा त्या अधिकाऱ्याने मला न्यायालयात ओळखले नाही आणि माझी निर्दोष मुक्तता झाली. अर्थात बाकीच्या अनेक गोष्टींचे पुरावेही माझ्या बाजूने होते.

आश्चर्य नि चांगुलपणाचा कळस म्हणजे ते अधिकारी बाहेर आले नि मला म्हणाले, ‘केस सुरू झाल्यावर मला तुमचं त्या दिवशीचं विनवणं, फोन करणं, वस्तुस्थिती पटवणं आठवलं, तुमची सगळी परिस्थिती आठवली. तेव्हा वाटलं या जशा वैतागून वागल्या तसेच कदाचित आपणही वागलो असतो. शिवाय कोर्टात तुम्ही मला खरंच ओळखू नाही आल्या, आता वाटतं तेव्हा मी तुमचं म्हणणं समजून घ्यायला हवं होतं, मला माफ करा.’ माझे डोळे भरून आले. मीही माफी मागून म्हटलं, मीही डोकं शांत ठेवायला हवं होतं.

आज आयुष्याच्या या टप्प्यावर वाटतं की जर त्या केसचा निकाल अन्यायकारक लागला असता तर आपल्यासारख्या मध्यमवर्गीय, पापभीरू, पांढरपेशा व्यक्तीच्या आयुष्यावर किती प्रतिकूल आणि दूरगामी परिणाम झाला असता.

भावनिक होऊन चुका करू नये. हा धडा तर मी शिकलेच परंतु त्याचबरोबर सरकारी कार्यालयामध्येही मेंदूपेक्षा हृदयाची भाषा समजणारे, माणुसकी जपणारे, चांगुलपणा जपणारे लोकही आहेत याची जाणीव झाली. त्या अधिकाऱ्याच्या चांगुलपणाची कृतज्ञता नेहमीच मनात राहील.

– माधवी देशमुख, नवी मुंबई.

रिक्षावाल्याचा आधार

या गोष्टीला १२ वर्षे झाली. माझ्या नातलगांचे निधन झाले होते. त्यांच्या नातलगांना भेटायला मी पार्ले येथून त्यांच्या मुलीच्या घरी निघाले. वाटेतच माझ्या मावसभावाने त्याची आई सीरियस असून अ‍ॅडमिट केल्याचा फोन केला. औषधोपचारासंबंधी मी त्याच्याशी बोलत असतानाच एक बाइक माझ्या रिक्षाजवळ आली आणि बाइकवरील तरुणाने सीटवर बाजूला ठेवलेली पर्स उचलली. त्या घटनेने मला प्रचंड धक्का बसला, बोलताच येईना. माझ्या तोंडून विचित्र आवाज निघू लागले, पण रहदारीच्या आवाजात रिक्षाचालकाला ते ऐकूच गेले नाहीत. हा रिक्षावाला त्या बाइकवरील तरुणांचा साथीदार तर नाही ना, असादेखील विचार मनात आला. अखेरीस मी त्याला हलवून काय झाले ते सांगितले. तसा त्याने बाइकचा पाठलाग सुरू केला. चोर चोर असे मी ओरडत होतो, पण आजूबाजूच्या गजबजाटात कोणाचेही आमच्याकडे लक्ष नव्हते. आमच्या डोळ्यादेखत ते बाइकस्वार बाजूच्या गल्लीत पसार झाले.

मी सुन्न झाले. काय करावे ते सुचेना. पर्समध्ये पैसे, चष्मा, चाव्या सर्व काही होते. फक्त मोबाइल माझ्या हातात होता. तोसुद्धा नवीन. त्यावर मला फक्त कॉल घेता येत होते. त्यात कुणाचेही नंबर सेव्ह केलेले नव्हते. ते कसे करायचे हे मला माहीत नव्हते. थोडक्यात काय, तर अडाण्याचा कारभार.

रिक्षावाला आणि मी तेथील ट्रॅफिक पोलिसाला गाठले, पण त्याने वांद्रा पोलीस स्टेशनला जावे लागेल असे सांगितले. काय करावे ते सुचेना. मी काकुळतीला येऊन रिक्षावाल्याला परत पाल्र्याला चलण्यास सांगितले, पण तो कुल्र्याला राहणारा असल्याने परत येण्यास तयार नव्हता. पण त्याच्या पैशाची काळजी करून नका असे त्याने सांगितले. अखेरीस वांदय़्राला नातलगांकडून पैसे घेऊन मग परत जावे म्हणून तेथे पोहोचलो तर त्यांचे घर बंद होते. आत्ता मात्र माझे अवसान गळले. मी रडकुंडीला आले. जवळ एक पैसा नाही. नशिबाने तो रिक्षावाला बाहेर थांबला होता. त्याने माझी अवस्था बघितली. ‘ताई, काळजी करू नका. हे पैसे घ्या.’’ असे म्हणून त्याने मला ४५० रुपये दिले. मी एका कागदावर त्याचे नाव, नंबर, पत्ता लिहून घेतला. भाडय़ाचे पैसे विचारले तर तेदेखील तो सांगायला तयार नव्हता. (तेव्हा मीटरची पद्धत नव्हती.) ‘ताई, मला पैशाची घाई नाही. पाल्र्याचे भाडे मिळेल तेव्हा मी तुमच्याकडे येईन. असे सांगून तो निघून गेला.

पाच-सहा दिवसांनी तो आला. मी त्याचे उसने पैसे, भाडे आणि बक्षीस त्याला देऊ लागले तर त्याने केवळ ४५० रुपयेच घेतले. अखेरीस बळेबळेच सर्व पैसे त्याच्या खिशात कोंबले. आजवर आपल्याला रिक्षावाल्यांचे अनेक बरे-वाईट अनुभव आले असतील. पण असे माणुसकीला जागून मदत करणाऱ्या रिक्षावाल्याचे नाव ‘शशिकांत पाटील’ बैलबाजार, कुर्ला

– अनिता नागले, विलेपार्ले.

परदेशातील माणुसकी

ऑगस्ट २०१८ च्या अखेरीस द्राक्षांची पैदास आणि वाईन निर्मिती या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी युरोपमधील प्रतिष्ठित अशा कॅटोलिका विद्यापीठ, इटली येथे प्रवेश घेतला. कॅम्पस मिलान प्रांतातील पियासेन्झा या ऐतिहासिक टुमदार शहरात आहे. तेथे ओळख झालेल्या इजिप्शियन मैत्रिणीला येथील बऱ्यापैकी माहिती होती. तिच्याबरोबर पहिल्या दिवशी कॉलेजला गेले पण संध्याकाळी येताना नेमकी तिची माझी चुकामुक झाली.

फोनमध्ये नवीन सिमकार्ड नसल्याने तिच्याशी संपर्कही करता येईना. शेवटी मनाचा हिय्या करून अंदाजाने मी माझ्या अपार्टमेंटच्या दिशेने जाणाऱ्या एका बसमध्ये चढले. इथे बस ड्रायव्हरच तिकीट देतो. ती रिंग रूट सव्‍‌र्हिस बस असल्याने त्या बसचे ठरलेले तिकीट दोन युरो होते. परंतु माझ्याकडे थेट २० युरोची नोट होती. ती मी ड्रायव्हरला देऊ केली, परंतु तो ती नोट काही केल्या घेतच नव्हता. मी कळकळीने इंग्लिशमध्ये त्याला सांगत होते की माझ्याकडे सुट्टे नाहीत. तोही तितक्याच कळकळीने इटालियनमध्ये मला काहीतरी सांगत होता, जे मला कळत नव्हते. शेवटी त्याने मला खुणेनेच बसायला सांगितले.

दरम्यान एका स्टॉपवर एक मध्यमवयीन इटालियन महिला चढली. सुदैवाने तिला जुजबी इंग्लिश येत होते. ती म्हणाली की, ड्रायव्हर तुला कधीपासून सांगतोय, मुली तू पैसे दिले नाहीस तरी चालेल. काहीच प्रॉब्लेम नाही. तुला हवे तिथे मी सोडतो. म्हणजेच अडचणीत असलेल्या एका मुलीला तो सरकारी नियमाबाहेर जाऊन केवळ माणुसकीच्या दृष्टीतून मदत करत होता. एव्हाना माझा उतरायचा स्टॉप मागे निघून गेल्याने त्या महिलेने पुढील स्टॉपवर तिच्याबरोबर उतरण्यास सांगितले. नंतर ती मला माझ्या भागात जाणाऱ्या बसमध्ये बसवून देणार होती.

बसमधून उतरल्यावर तिने माझी विचारपूस केली. स्वत:हून दोन युरो बसच्या तिकिटासाठी दिले आणि इटलीमध्ये सतर्कतेने कसे राहावे याच्या काही महत्त्वाच्या टिप्सही. थोडय़ा वेळाने उलट दिशेची बस आली. आणि गंमत म्हणजे पुन्हा तीच बस आणि तोच ड्रायव्हर होता. मग आम्ही तिघेही खूप मनसोक्त हसलो. आता माझ्याकडे दोन युरो असल्याने ते मी ड्रायव्हरला तिकिटासाठी देऊ केले. तर पुन्हा त्याने तेच सांगितले की, तिकीटाची गरज नाही, मी तुला सोडतो.

एकूणच परदेशातल्या पहिल्याच प्रवासात माणुसकीचे असे दोन अनुभव मिळाले.

 – वैष्णवी वखारे, पियासेन्झा, मिलान, इटली.

डोलीवाला

आम्ही चारधाम यात्रेच्या प्रवासाला निघालो होतो. प्रवास झेपेल की नाही याची चिंता होतीच. कारण यजमानांची काही वर्षांपूर्वीच बायपास झाली होती, पण त्यांची इच्छा आणि जिद्द बेफाम होती. त्यांना देवदर्शनापेक्षा हिमालय आणि सृष्टी या निसर्गसौंदर्याची ओढ होती. हनुमानचट्टी ते जानकाबाईचट्टी जीपने प्रवास करून पुढला प्रवास डोली, घोडा किंवा पायी असा करावा लागतो. आम्ही डोली केली होती. यमुनोत्रीला ११ हजार फूट उंचावर एका बाजूला पहाड आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. जीव मुठीत धरून प्रवास सुरू होता. मंदिराच्या आधी एक किलोमीटरवर डोली आणि घोडे थांबतात. पुढचा प्रवास पायीच करावा लागतो. दाट धुके, मधूनच पडणारा पाऊस, थंडगार वाहणारे पाणी यातून मार्ग काढावा लागत होता. बऱ्याच वेळाने त्यांची डोली आली, पण यजमानांना श्वासही धड घेता येत नव्हता. कसेबसे डोलीच्या माणसांच्या आधाराने ते उभे राहिले आणि म्हणाले, देवळापर्यंत मी येऊ शकत नाही. डॉक्टरांनी दिलेले औषध त्यांनी घेतले होते. मग हळूहळू त्यांना कसेबसे मंदिरापर्यंत गेलो. एका चौथऱ्यावर बसलो. डोलीवाले केव्हाच निघून गेले होते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधापैकी काही देता येईल का म्हणून मी त्यांच्याकडे बॅगेबद्दल विचारले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, बॅग डोलीवाल्याला धरायला दिली होती. बॅगेत भरपूर पैसे, औषधे आणि डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन होते. आधीच श्वसनाचा त्रास, त्यात पैशांचे आणि औषधांचे टेन्शन! काय करावे सुचत नव्हते. बरोबरीचे प्रवासीही दिसत नव्हते. पैशांपेक्षाही आता औषधांची जास्त गरज होती. जवळजवळ अर्धा तास गेला. तेवढय़ात एक डोलीवाला एक किलोमीटर अंतर धावत धावत येऊन आम्हाला शोधीत होता. धापा टाकीतच तो आमच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘साब, आपकी बॅग. मैं भूल गया आपको देने के लिय.’ बॅगेतून एक गोळी काढून प्रथम त्यांना दिली. डोलीवाला परत जात होता. बॅगेत पैसे आणि औषधे आणि इतर वस्तू जशाच्या तशा होत्या. मी धावतच जाऊन त्या डोलीवाल्याला हाक मारीत होते. अखेर तो भेटला आणि म्हणाला, ‘क्या हुआ मेमसाब, मैने तो..’ ‘नही नही, कुछ नही हुआ, एक सेकंद ठहरो’ असे म्हणून मी माझ्या पर्समधून काही रुपये काढले आणि त्याला देऊ केले. पण तो घेईना. कारण येण्याजाण्याचे पैसे त्यांना तेथील प्रशासनाने ठरवून दिले होते आणि ते एकदमच घ्यायचे असा नियम होता. मी म्हटले, ‘हे पैसे डोलीचे नाहीत, तर देवाला जे प्रसादासाठी देणार होते ते हे आहेत. कारण माझ्यासाठी तूच माझा देव आहेस.’

– हेमा शशिकांत धोंडे़

दानशूर कोण?

आपल्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात, की त्यांचा आपल्या मनावर कायमचा ठसा उमटतो. ते कायम स्मरणात राहतात, अगदी त्यातल्या लहान लहान बारकाव्यांसह. काही प्रसंग आपण अनुभवलेले नसतात, परंतु ते जे कोणी अनुभवले त्यांनी ते इतक्या सहजतेने व समर्थपणे आपल्याला ऐकवलेले असतात, की ते प्रसंगसुद्धा जणू काही आपणच अनुभवले आहेत असे वाटत राहते. त्यामध्ये जर काही उत्कट, उदात्त भावना असेल तर आपण ऐकताना अक्षरश: स्तंभित होतो – हरतो. जेव्हा कधी ती उत्कट भावना आपण परत अनुभवतो किंवा तिच्या भावनेचं प्रत्यंतर आपणांस वाचावयास, ऐकावयास मिळते तेव्हा आधीच्या ऐकीव प्रसंगानुसार आपलं मन तुलना करू लागतं. असाच एक लहानसा प्रसंग माझ्या वडिलांनी मला सांगितल्याचं आठवतं.

माझे वडील चर्चगेटच्या पश्चिम रेल्वेच्या कार्यालयात नोकरीला होते. दुपारच्या जेवणाच्या सुटीत जेवण झाल्यावर ते व त्यांचे काही मित्र रेल्वेस्थानकाच्या बाहेरच असलेल्या एका केळीविक्रेत्याकडे केळी खाण्यासाठी जात असत. हा त्यांचा नित्याचा परिपाठ होता. जानेवारीचा महिना होता. मुंबईतदेखील थंडी जाणवू लागली होती. अगदी दुपारच्या वेळेससुद्धा हवेत थोडाफार गारवा होता. भरीस भर म्हणून त्या दिवशी बोचरे वारे सुटले होते. रोज जात असल्याने केळीविक्रेता या कर्मचाऱ्यांना ओळखत असे व लगेच त्यांना केळी देत असे. एक दिवस हे कर्मचारी दुपारी तिकडे गेले असता तेथे एक वृद्ध भिकारी आला. तो थंडीने थरथरत होता. त्याच्या अंगावर फक्त एक धोतर किंवा लुंगीवजा कपडा गुंडाळलेला होता. वरच्या अंगावर काहीच नव्हते, त्याने केळीविक्रेता व तिथे उभ्या असलेल्या माणसांकडे भीक मागायला सुरुवात केली. अर्थात सर्वसाधारणपणे घडते तसेच झाले. काही तिथून सटकले व दूर उभे राहून केळी खाऊ लागले. एक-दोघांनी काही सुटे पसे त्या भिकाऱ्याला दिले. भिकारी तिथेच रेंगाळला. एवढय़ात त्या गर्दीतील भिकाऱ्याकडे केळीविक्रेत्याचे लक्ष गेले. केळीविक्रेत्याने भिकाऱ्याला त्याच्या जवळ येण्याची खूण केली. तो जवळ येताच केळीविक्रेत्याने आपल्या अंगातला सदरा काढून तो त्या भिकाऱ्याला दिला, नव्हे तर त्याला तो घालायला लावला. त्याला आपल्याकडची केळी दिली. तो भिकारी तेथून निघून गेला. गर्दीतला प्रत्येक जण स्तंभित झाला होता व काही प्रमाणात ओशाळलादेखील होता. ज्या सहजतेने त्याने आपला सदरा काढून दिला त्याच सहजतेने तो एक तत्त्वज्ञान सांगता झाला. म्हणाला की, तो बिचारा म्हातारा भिकारी थंडीने कापत होता. त्याला मी सदरा दिला त्यात काय विशेष. आज मी उघडा राहून थंडी सहन करू शकतो किंवा माझा आजचा व्यवसाय संपल्यावर मी नवीन सदरा खरेदी करू शकतो. ते मी करणारच आहे; पण त्याच्याकडे ना पसे ना कपडा. तो काय करणार? त्याची त्या क्षणाची गरज मी भागवली एवढंच. कोणत्याही प्रकारचा अहंभाव त्यात नव्हता. प्रचलित दानशूरपणाच्या व्याख्येत कदाचित हा प्रकार मोडणार नाही. माणूस म्हणून तो केळीविक्रेता निम्नस्तरातील असल्याने त्याबद्दल त्याचं कौतुकही झालं नसेल; परंतु त्या गर्दीतील प्रत्येकापुढे त्याने सहजतेने जगण्याचा एक वस्तुपाठ ठेवला होता.

अजूनही हा प्रसंग आठवला की मी हरतो. आपल्या आचरणात आपण हे आणू शकू का, हा प्रश्न राहतोच. यातच त्या केळीविक्रेत्याचा चांगुलपणा व मोठेपण दिसून येतं.

 – डॉ. मिलिंद न. जोशी, विलेपार्ले (पूर्व).

मदतीला सदैव तत्पर

१९९० साली मी कारखानीस मावशींच्या मेसमध्ये जाण्यास सुरुवात केली. राजारामपुरी सातव्या गल्लीत स्वत:च्या हक्काच्या घरात त्या मेस चालवत होत्या. मदतीला घरातील दोन मुली आणि दोन मुले होती. सोबत रशिदा पठाण नावाची स्त्री आपल्या लहान मुलासह त्यांच्याकडे कामाला होती. मावशींच्या बोलण्यात परखडपणा होता. आवाज खणखणीत असल्याने सर्व त्यांना दबकूनच असत, पण मनाने त्या प्रेमळ स्वभावाच्या होत्या. चतुर तशाच व्यवहारदक्ष होत्या. मिळालेल्या पैशाचे त्यांनी योग्य नियोजन केले होते. त्यांच्या अनेक नातेवाइकांनाच नाही, तर मलादेखील अडचणीत मदत केली होती.

पण सर्वात मला त्यांचे भावले ते त्यांच्या कृतज्ञपणाचे दर्शन. त्यांच्याजवळ काम करीत असल्याने रशिदाला त्यांनी शेवटपर्यंत आपल्या नात्यातीलच मानले होते. रशिदा पठाण कामाला वाघ होती तशीच विश्वासू. तिच्यावर मेस सोपवून मावशी एक – दोन दिवस बाहेरगावी जात असत. अशा या रशिदाला अपघात झाला आणि तिला अपंगत्व आले. काठीचा आधार घेऊन ती चालू लागली. तिचा शेवटपर्यंत सांभाळ मावशीनीच केला. दुर्दैवाने तिचे निधन झाले. आणि जणू काही मावशींचा उजवा हात गेला अशी मावशींची स्थिती झाली. त्यावेळी त्या हतबल झाल्यासारख्या मला वाटू लागल्या.

स्वत:च्या मुलींचे योग्यप्रकारे शिक्षण आणि चांगली स्थळ पाहून त्यांची लग्ने त्यांनी करून दिली होती. अशावेळी आता त्यांच्यावर जबाबदारी आली ती म्हणजे रशिदा पठाण हिच्या मुलाची. रशिदाचा मुलगा लहानपणापासूनच मावशींकडे वाढला होता. एकुलता एक म्हणून आईचा आणि मावशींचा लाडका आणि त्यामुळेच जास्तच लाडावलेला. शिक्षणात असातसाच, त्यामुळे मावशी आता त्याला स्वत:च्या पायावर उभा करण्यासाठी धडपडू लागल्या. आपण आईशिवाय आता कोणत्या परिस्थितीत आहोत हेच त्या मुलाच्या लक्षात येत नव्हते. आईनंतर त्याचे  नातलग त्याला सांभाळायला उत्सुक नव्हते. आजारी असताना रशिदा बोलून दाखवी, ‘मला माझ्या सन्याची काळजी नाही, तूच त्याची काळजी घेणार मला खात्री आहे.’

आणि रशिदाची ही इच्छा मावशीनी एकटय़ाने पूर्ण केली. त्याला गॅरेजमध्ये मशीनचे शिक्षण घ्यायला लावले. सन्याला पगार देऊ नका पण शिकवा असे मालकाला सांगून त्यांनी त्याला स्वत:च्या पायावर पूर्ण उभे केले. शिवाय एवढेच करून त्या थांबल्या नाहीत, तर त्याच्या जातीतील मुलगी शोधून त्यांनी त्याचे लग्न लावले. सन्याला शिकलेली बायको मिळाली. आणि अशा या कर्तृत्ववान मावशीनी रशिदाचा त्यांच्यावरचा विश्वास सार्थ ठरवला. आजच्या काळात असे हे मोठे मन क्वचितच कोणाकडे असेल.

 – अनिल ठाकूर, कोल्हापूर. स्थिती झाली.

पर्स परत मिळाली

तेव्हा आम्ही आमदापूरला गेलो होतो. इतकी प्रचंड गर्दी होती की नेमकी त्या गर्दीत माझ्या मोठय़ा पर्समधील छोटी पर्स गायब झाली होती. त्यात आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहनचालक परवाना आणि बँकेची एटीएम कार्ड असं सारं होतं. त्यात भरीस भर म्हणून एटीएम कार्डाचा पिन लिहिलेली डायरीदेखील त्यातच होती. आता चांगलीच धावपळ होणार होती. तसेच परत निघालो. रात्री मला आमच्या चव्हाण सरांचा फोन आला, त्यांनी माझ्या काही वस्तू हरवल्या का ते विचारले आणि आदमापूरच्या वाटेवरील इस्फुर्ली गावच्या सचिन रावण यांचा नंबर दिला. त्यांच्या आईवडिलांना माझी पर्स सापडली होती. त्यांनी डायरीतील नंबरवरून चव्हाण सरांना शोधले होते. हे गृहस्थ कोल्हापूरला पंजाब नॅशनल बँकेत काम करत होते. दुसऱ्या दिवशी कोल्हापुरातील माझ्या बहिणीकडे त्यांनी माझी पर्स दिली. सचिन रावण यांच्या आईवडिलांना ती पर्स सापडली म्हणून सर्व गोष्टी पूर्णपणे सुस्थितीत परत मिळाल्या, त्याबद्दल त्यांचे खूप आभार.

– अनुजा पाटील.

त्याची वृत्ती

अनेकदा लोकांचे पाकीट, कागदपत्रे हरवतात. कधी ती सापडतात, कधी नाही. पण जर योग्य व्यक्तीच्या हाती लागली तर ती पुन्हा परत मिळतातच. माझ्यासमोरच घडलेला प्रसंग पाहून मला लोकांच्या चांगुलपणाबद्दल खात्रीच पटली आहे. सोनू सिंग हा असाच एक चांगुलपणा दाखवणारा गृहस्थ. त्याच्या छोटय़ा भावाला एक पाकीट सापडले. त्यात पैसे फारसे नव्हते, पण वाहनचालक परवाना, एटीएम कार्ड, पॅन कार्ड अशा वस्तू होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एटीएमचा पिन त्या कार्डासोबतच लिहून ठेवलेला होता. त्याने ठरवले असते तर त्याला त्या कार्डाचा वापर करून पैसे काढणे शक्य झाले असते. पण त्या भल्या माणसाने त्या पाकिटातील ओळखपत्र आणि अन्य एका पावतीवरून पाकिटाच्या मूळ मालकाचा नंबर शोधला आणि त्याला फोन करून त्यांना बोलवून ते पाकीट परत दिले. त्यात पैसे किती होते यापेक्षा महत्त्वाची होती ती सोनू सिंगची वृत्ती, त्यामुळेच त्याने चांगुलपणा दाखवून ते पाकीट परत केले.

– विजय घाग, मुलुंड, मुंबई.

ते दोन देवदूत

दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्वजण (गद्रे कुटुंब) गावी म्हणजे कणकवली येथे आमच्या मूळ घरी गौरी-गणपतीसाठी गेलो होतो. एका खासगी बसने अंधेरीहून निघून दुसऱ्या दिवशी गावी पोहोचलो. गणपतीसाठी सर्व नातेवाईक जमल्यामुळे घरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण होते. परतीचा प्रवासदेखील खासगी बसने ठरला होता, पण ते नियतीच्या मनात नव्हते.

आमच्या तेथील एक ओळखीचा माणूस सुमो घेऊन अंधेरीला जात होता, त्याच्या गाडीत जागादेखील होती. लगेचच बसची तिकिटे रद्द करून सुमोने जायचे ठरले. आम्ही सहा जण आणि सुमो चालकांची पत्नी व मुलेदेखील होती. सायंकाळी सहा वाजता प्रवास सुरू केला.

सोमवारी रात्री इंदापूरला आलो. तेथे चालकाच्या नातेवाईकांकडे आराम करून मंगळवारी सकाळी साडेसहा-सात वाजता इंदापूरहून निघालो. पेणच्या वाटेवर असताना पेणच्या थोडे आधी, मागून येणाऱ्या एका ट्रकने ओव्हरटेक करत असताना आमच्या सुमोला जोरदार धडक दिली. ती धडक इतकी जोरदार होती की आमची गाडी दोन-तीन पलटय़ा घेत बाजूच्या शेतात जाऊन कलंडली. क्षणार्धात सर्व चित्र पालटले. मुले ओक्साबोक्शी रडायला लागली, मी तर स्वत: पूर्णपणे गडबडून गेले. गाडीच्या काचा फुटून माझ्या शरीरात घुसल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणांहून रक्त येत होते. मागील बाजूस बसलेले आई-बाबा शेतात असलेल्या पाण्यात, चिखलात पडले होते. बाबांचा चष्मा फुटला होता. अशा अवस्थेत असताना त्यांच्या डोक्यावर सर्व बॅगा पडल्या होत्या. मोबाइल नादुरुस्त झाले होते. बाबांचे फक्त दोन हात वर दिसत होते. कोणाला तरी ते बोलावत असावेत. आईचा हातही पूर्ण निकामी झाल्यामुळे आणि मला माझ्या लहान मुलाच्या काळजीमुळे काहीच करता येत नव्हते. त्यातच रक्ताने मी माखले होते. सगळ्यांचे सामान कपडे भिजले होते. मुले सारखी ‘आजोबा-आजी, वाचवा – वाचवा’ असा हंबरडा फोडीत होती. अशा वेळी माझ्या वडिलांनी जोर एकटवून अंगावरील बॅगा जोराने बाजूला ढकलल्या. ड्रायव्हरने आणि वडिलांनी गाडीच्या काचा फोडल्या, कारण तो एकच मार्ग बाहेर पडण्याचा होता. अतिशय वाईट अवस्थेत एकेक जण बाहेर येऊन शेताच्या काठावर बसलो. सर्वजण भेदरलेले होते.

आजूबाजूने जाणाऱ्या एकाही माणसाने मदतीचा हात पुढे केला नाही. कारण पुढे होणारा पोलिसांचा जाच. मी मनातून खूप संतापले होते. असे कसे काय लोक माणुसकी विसरतात! मधल्या काळात ट्रकवाला पळून गेला होता. ओरडून ओरडून घसा कोरडा पडला तरी मदतीला कोणीच येत नव्हते.

एवढय़ात आमचे नशीब बलवत्तर आणि दैवी कृपा म्हणून की काय एक सुमो येऊन आमच्यासमोर थांबली. सुमो आमच्याजवळ थांबल्यामुळे आम्हाला सर्वाना थोडा धीर आला. त्यातून उतरलेल्या दोन इसमानी आम्हाला खूप धीर दिला आणि एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये जखमींना घेऊन गेले. हॉस्पिटलचे जे बिल झाले (१० हजार रुपये) ते मागचा पुढचा विचार न करता देऊन टाकले. चौकशी करता करता कळले की ते दोन ‘देवदूत’ माणुसकीची चाड असलेले दोन मुस्लीम तरुण होते. त्यांनी आम्हाला कसलीच काळजी करू नका, उलट काही लागले तर फोन करा हेही सांगितले. फोन नंबर देण्यास ते विसरले नाहीत. त्यांच्याच गाडीतून त्यांनी आम्हाला अंधेरी येथील आमच्या घरात संध्याकाळपर्यंत सुखरूप सोडले आणि आम्ही त्यांना धन्यवाद दिले.

ते दोन ‘देवदूत’ भेटले नसते तर आमची काय अवस्था झाली असती? त्यांचे पुन्हा एकदा सर्वानी आभार मानले. ते दोन मोठे व्यापारी आहेत. एक कलंदर आणि दुसरा अश्रफ खान अशी नावे आहेत त्यांची. परवर दिगारने त्या दोघांना निरोगी उदंड आयुष्य द्यावे, कारण ते दोघ ‘देवदूत’ नसते तर आमचे काही खरे नव्हते!

 – दीपाली सावंत, ठाणे.

ट्रॅकवरचा देवदूत

१९६९ सालची गोष्ट आहे. मी ठाण्यात पूर्वेकडे कोपरी गावात राहात होते. राज्य परिवहन महामंडळाच्या वंदना टॉकीजसमोरील कार्यालयात कामाला होते. त्यावेळी महानगरपालिकेची बससेवा उपलब्ध नव्हती. रिक्षाही तुरळक होत्या आणि पूर्वेकडे कोणीही रिक्षावाला यायला तयार नसायचा. त्यामुळे कोपरी गाव ते ठाणे स्टेशन आणि ठाणे स्टेशन ते वंदना टॉकीज हा प्रवास नेहमीच पायी करावा लागत असे. पण तरुण वय असल्याने प्रवास कधी कंटाळवाणा झाला नाही. पण ही गोष्ट घडली त्यावेळी मी सात-आठ महिन्यांची गरोदर होते.

त्यावेळी ठाणे स्टेशनवरून रेल्वे रूळ ओलांडून सर्वजण सर्रास पूर्वेकडे जात असत. मीही त्या दिवशी संध्याकाळी रूळ ओलांडून पलीकडे चाललेली होते. ऑक्टोबर महिना असल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अवघडलेल्या परिस्थितीत चालणे खूप अवघड जात होते. दिवसभरच्या कामाने जीव थकून गेला होता. पायही भरभर पडत नव्हते, घरी दोन वर्षांचा मुलगा आणि त्याला सांभाळणारी बाई होती. तिला वेळेवर घरी जायला पाहिजे या विचाराने पावले जरा भरभर पडू लागली. संध्याकाळच्या वेळी सहा नंबर फलाटावरून लांब पल्ल्याच्या गाडय़ा जातात हे माहीत होते, तरीही मी त्याच रूळांवरून विचारांच्या तंद्रीत बिनधास्त चालत होते. मागे वळून एक-दोन वेळा पाहिले पण गाडी दिसत नव्हती. विचारांच्या तंद्रीत मी चालतच होते अचानक गाडीचा कर्कश हॉर्न वाजला. रेल्वे स्थानकात असे आवाज येणारच असा विचार करून मी काही मागे वळून पाहिले नाही. त्यावेळी त्या रूळावर पुढे कोणीही नव्हते. आणि माझ्या मागून गाडी येत होती. पुढच्या क्षणी मला काही समजले नाही, पण अचानक कोणीतरी मला अलगद उचलून रूळाच्या बाहेर आणले आणि सेकंदात गाडी धाडधाड निघून गेली.

क्षणार्धात झालेल्या त्या अद्भुत प्रकारामुळे मी अवाक् झाले. मृत्यूच्या जबडय़ातून त्या व्यक्तीने मला बाहेर काढले होते. निघून गेलेली गाडी आणि त्या व्यक्तीकडे एकदाच बघितले हातपाय थरथरत होते. आभार मानण्यासाठी तोंडातून शब्दही फुटत नव्हते. कसेतरी हात जोडले. त्याने प्रश्नार्थक मुद्रेने काय म्हणून विचारले आणि तो क्षणात निघून गेला. मी पुरती गोंधळून गेले. सारे अवसान गळाले. चालायला अंगात त्राण उरले नाही. पण चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. काहीतरी विपरीत घडले असते तर डोळ्यांसमोर नको ती चित्रे भरभर तरळू लागली त्या विचारातच मी घर गाठले. छोटय़ा मुलाला घट्ट मिठी मारली.

त्यानंतर दोन दिवस आम्ही त्या माणसाचा शोध घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर त्या ठिकाणी गेलो पण क्षणभरच पाहिलेला चेहरा नीट आठवत नव्हता. कोण होता तो? त्या माणसामुळे मी आणि माझा मुलगा आम्ही दोघे वाचलो. आज वयाची ७५ वर्षे उलटून गेली पण त्या क्षणाची आणि त्या माणसाची मला अजूनही आठवण येते.

– आशा अच्युत देवधर, ठाणे.

त्याने वाचवले प्राण

आयुष्यात आजपर्यंत अशा अनेक व्यक्ती भेटल्या आहेत की जणू काही आम्हाला मदत करण्यासाठीच त्या व्यक्तीआमच्या आयुष्यात आल्या आणि नंतर निघून गेल्या. त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे रेल्वे रुळाजवळचा एक देवदूत.

माझ्या पुतण्याची रेल्वेत नेमणूक झाली. मुंबईत घर नसल्याने तो आमच्याकडे राहत होता. मुंबईची गर्दी, लोकलची धावपळ याची त्याला सवय नव्हती. त्याचे तोपर्यंतचे सारे आयुष्य नागपूरमध्ये गेले होते. तिकडचे वातावरण नेमके मुंबईच्या उलटे. त्यामुळे मुंबईत लोकल पकडताना त्याची नेहमीच धावपळ होत असे. हळूहळू त्याला मुंबईच्या जीवनाची सवय होऊ लागली.

तेव्हा मे महिन्याचे दिवस होते. त्या दिवशी माझे यजमान आणि पुतण्या दोघेही एकत्र प्रवास करीत होते. घामाने ओलाचिंब झालेला म्हणून हवा खाण्यासाठी पुतण्या दाराकडे सरकला, गाडी वेगात होती. सँडहर्स्ट रोडला एका वळणावर काय होते हे कळायच्या आतच वेगाने जाणाऱ्या गाडीतून पुतण्या खाली पडला. तेथे रुळालगतच झोपडपट्टी आहे. त्या झोपडय़ामधून ‘पडला पडला’ असा आवाज आला आणि सगळे लोक धावले. माझे यजमान बोरीबंदरला गाडीतून उतरेपर्यंत काहीच करू शकत नव्हते. दैव बलवत्तर म्हणून पुतण्या गाडीतून पडूनही शुद्धीवर होता. पण त्याचे पाय दुसऱ्या रेल्वे रुळावर होते. त्या झोपडपट्टीतला एक माणूस धावत आला. त्याने त्याचे पाय बाजूला घेतले आणि ताबडतोब त्याला जे.जे. इस्पितळात दाखल केले.

दाखल करून तो निघून न जाता तेथेच बसून राहिला. स्वत:चाच कोणी आप्त-स्नेही असल्याप्रमाणे. पुढील निरोप पटापट मिळाल्याने माझे यजमानही जेजेत पोहोचले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो झोपडपट्टीतील माणूस पुतण्याजवळच होता, त्याला लागेल ती मदत करीत होता. परिस्थितीने गरीब वाटत असूनही काहीही न खातापिता तो पेशंटजवळ बसून होता. तो मनाने खरोखरच श्रीमंत होता. त्याला नाव विचारले तर त्याने नावही सांगितले नाही. त्याला खाण्यापिण्याबद्दल विचारले तर काही खाल्लेदेखील नाही, धावपळ करून मदत केली म्हणून बक्षीस देऊ केले तेही घेतले नाही. पुतण्याला हॉस्पिटलमधून सोडल्यावर टॅक्सीत बसवून देईपर्यंत तो तेथेच होता. पुतण्या आणि यजमान टॅक्सीत बसले आणि तो चालायला लागला. गाडीतून पडून सहीसलामत वाचल्याचे उदाहरण क्वचित घडले असेल. दुसऱ्या रुळावर गाडी आली असती तर? पण तो तेथे होता. एवढी गरिबी असूनही त्याने पुतण्यासाठी धावाधाव केली. कशासाठी? कोण होता तो त्याचा? कोणीही नाही. होता फक्त माणूस.

– राजश्री खरे, ठाकुर्ली

अनोळखी मदत

मे २००७ मध्ये आम्ही एका लग्नानिमित्त कोकणातील परुळे गावी गेलो होतो. लग्न आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मुंबईला येण्याकरिता लवकरच घरातून बाहेर पडलो. तरी निघण्यास दुपार झाली. रात्री आम्ही चिपळूणला जेवण्यासाठी थांबलो. परंतु आम्ही अचानक विचार बदलून परत मुंबईच्या मार्गाला लागलो. रात्री १२-१२.३०च्या दरम्यान आम्ही कशेडी घाटातून प्रवास करीत होतो. त्याच सुमारास समोरून येणाऱ्या एका कंटेनरच्या हेडलाइटमुळे भावाच्या डोळ्यांवर एकदम उजेड आल्याने त्याचे डोळे मिटले गेले व त्या कंटेनरने आमच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. धडक बसल्यावर एक क्षण काय झाले ते कोणाला कळलेच नाही. गाडीच्या काचा फुटून भावाच्या कपाळात व हातात वगरे घुसल्या व तो गाडीतच अडकला. आजूबाजूला बरेच लोक गोळा झाले होते व सर्व गाडय़ा रस्त्यात अडकून पडल्याने दोन्ही बाजूने गर्दी वाढली होती. भावाचा १२ वर्षांचा मुलगा भावाशेजारी पुढे बसला होता. तोही अतिशय घाबरला होता. आम्ही मागे बसलो होतो. अर्धवट झोपेत असल्याने अगोदर काही कळलेच नाही, परंतु सर्व प्रकार कळल्यावर एकदम सुन्न झाले. आजुबाजूच्या गोळा झालेल्या माणसांमधील एका माणसाने वहिनीला महत्त्वाचे कागद, वस्तू, पसे वगरे एका बॅगेत घालून स्वत:च्या जवळ ठेवण्याचा सल्ला दिला. लग्नाला गेल्यामुळे दागिनेदेखील बरोबर होते. त्याच वेळी दुसरे एक गृहस्थ आपल्या आई-वडिलांना त्यांच्या गावी सोडून पुन्हा मुंबईला जात होते. ते गाडीजवळ आले व त्यांनी विचारले की मुलांना मी माझ्या गाडीत बसवू का? त्यावेळी वहिनी लगेच हो म्हणाली, परंतु थोडय़ा वेळाने मुले कोठे आहेत या विचाराने गाळण उडाली. कारण त्या गृहस्थांची गाडी कोठे आहे हेसुद्धा विचारले नव्हते व गाडी व मुले दिसत देखील नव्हती.

मुलांना ते गृहस्थ कोठे घेऊन तर गेले नाही ना, हा विचार मनात घोळत असतानाच ते परत गाडीकडे येऊन म्हणाले की, कोणीतरी गाडीत याल का, मुले घाबरून रडत आहेत. मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीकडे गेले. तोपर्यंत जमलेल्या लोकांनी माझ्या भावाला गाडीतून बाहेर काढले होते. आम्ही पोलीस स्टेशनवर त्या गृहस्थांबरोबर त्यांच्याच गाडीतून गेलो. आम्ही तेथे पोहोचेपर्यंत त्या कंटेनरचा चालक तेथे जाऊन सर्व व्यवस्था करून परत चालला होता. माझ्या भाचीने त्याला ओळखले होते. पोलीस स्टेशनवरून ते गृहस्थ आम्हाला इस्पितळात देखील घेऊन गेले. भाचीच्या डोक्याला खोक पडून रक्त येत होते. वहिनीच्या पायाला देखील लागले होते. ते गृहस्थ रात्रभर आमच्या सोबत इस्पितळातच थांबले होते व सकाळी आमचे नातेवाईक तेथे पोहोचल्यावर त्यांच्याकडे आम्हाला सोपवून मुंबईला जायला निघाले. त्या गृहस्थांचे नाव अनुप केळुस्कर.

अनुप केळुस्कर आम्हाला आमच्या अत्यंत आणीबाणीच्या वेळी मदत केली, त्यांची ही मदत आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही.

 – नीलिमा सुबोध गोरे, अंधेरी, मुंबई.

मला भेटलेला विठ्ठल

२७ जून, २००१; बुधवार, दुपारी साधारण तीन वाजता घरून निघालो. गरोडिया नगर थांब्यावरून ३८५ क्रमांकाच्या डबलडेकर बसमध्ये चढलो. फारशी गर्दी नव्हती. पण चार-पाच जणांचे टोळके बसमध्ये वाट अडवून उभे होते, त्यांना ढकलून आत शिरलो. पुढे जाऊन एका सीटवर बसलो. हातात पाउच आणि छत्री होती. तिकिटाचे पैसे काढून कंडक्टरला दिले आणि तिकीट घेतले. तेवढय़ात माझ्या पाउचला हिसका बसला आणि कोणीतरी तो खेचून घेतला. त्या क्षणीच मी उभा राहून ओरडा केला. कंडक्टरला सांगितले माझा पाउच चोरला गेला आहे. वाटेतल्या दोन-तीन जणांवर नजर टाकत, त्यांना धक्का मारत मी बसच्या दाराशी आलो. बस थोडी थांबली. तेवढय़ात एकजण ओरडला, ‘वो   देखो, वो भाग रहा है।’ ते ऐकून मी बस खाली उतरलो आणि बघू लागलो. बस पुढे निघून गेली. त्या क्षणीच, मी बनवला गेलो हे लक्षात आले. दोन-तीन मिनिटांत मी एक टॅक्सी पकडून त्याच बसचा पाठलाग केला. प्रियदर्शनीच्या स्टॉपला तीच बस पकडली, पहिल्या मजल्यावर जाऊन तपासणी केली, पण व्यर्थ! पाउच मिळाला नाही. पाउचमध्ये चेकबुक्स, पासबुक्स, आमच्या दोघांचे पासपोर्ट होते. अमेरिकेला जाण्यासाठी दोन तिकिटांचे पैसे देण्याकरिता एजंटकडे जायचे होते. अखेरीस रुईयाच्या स्टॉपला उतरलो. तिकीट एजंट अनिताला सर्व कथा सांगतली. अनिताजवळ एक बाई बसल्या होत्या. त्या बाई नवीन पासपोर्ट व्हिसा काढण्यासाठी मदत करतील असे अनिताने सांगितले. मी हो म्हणून ऑफिसबाहेर पडलो. बसने पंत नगर पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तेथे तक्रार नोंदवली. २९ तारखेला शुक्रवारी अमेरिकन कन्स्युलेटमध्ये पासपोर्ट हरवल्याची लेखी माहिती दिली.

३० जून शनिवारी रात्री साडेअकराला एक निनावी फोन आला. त्याने फोनवरून विचारले, ‘तुमचे काही हरवले आहे का?’ मी ‘हो’ म्हटले आणि त्याला नाव विचारले, तो नकार देत म्हणाला, ‘मी एक सोशल वर्कर आहे. बेस्ट घाटकोपर डेपोमधून बोलत आहे.’ त्याने  कागदपत्रे आपलीच आहेत का याची खात्री करण्याकरिता फोनवरच नाव, पत्ता विचारला. ‘कागदपत्रे महत्त्वाची दिसतात. पोलीस स्टेशनमध्ये देऊ का तुमच्या घरी आणून देऊ?’ त्याचा पुढचा प्रश्न. मी त्याला घरीच यायला सांगितले. तो म्हणाला, ‘आज माझी रात्रपाळी आहे. उद्या सकाळी नऊ वाजता तुमच्या दाराबाहेर ठेवून जाईन. तुमचे घर ए ३ सत्कार, नाथ पै नगर. म्हणजे जवळच आहे.’

१ जुलै २००१ रविवार. सकाळचे नऊ वाजले. मी आतुरतेने वाट पाहात होतो. तेवढय़ात बेल वाजली. मी दार उघडले. तीस-बत्तीस वयाचा, सावळा, मध्यम उंचीचा एक तरुण हातात पुडके घेऊन उभा होता. पुडके देत तो म्हणाला, ‘सर्व कागदपत्रे बरोबर आहेत ना ते बघा’ आणि तो जायला निघाला. मी त्याला बसायला सांगितले. सर्व कागद बरोबर होते.

‘आज आषाढी एकादशी! तुमच्या रूपाने विठ्ठलच आला कागदपत्रे घेऊन! आता आम्ही अमेरिकेत आत्ताच जन्मलेल्या नातीला बघायला जाऊ शकतो. तुम्ही आमचे लाख मोलाचे काम केले आहे. आता तरी तुमचे नाव, पत्ता सांगा’ असे म्हणत मी कपाट उघडून पाच हजार रुपये काढले आणि त्याला देऊ केले. ते पाच हजार रुपये घ्यायला त्याने नकार दिला. ‘हे पैसे मी घेतले तर माझे वडील मला ओरडतील’ तो म्हणाला. त्यांचे नाव सावळाराम गं. मांजरेकर, बेस्टमध्ये ते मेकॅनिक म्हणून कार्यरत होते. मग पत्नीने त्यांना शर्टाचे कापड आणि नारळ दिला. त्यांनी ते आनंदाने घेतले.

जगात अशीही माणसे आहेत असा विचार करत मी त्या देवाला – जाणाऱ्या तरुणाला – शतश: नमस्कार केला.

अमेरिकेहून मुलाकडून आल्यावर त्याने दिलेल्या पत्त्यावर मी होळीच्या दिवशी मांजरेकर यांचेकडे मिठाईचा बॉक्स घेऊन गेलो. भांडुपच्या डोंगरावर एका बैठय़ा चाळीत त्यांची दहा बाय आठची एक खोली होती. मिठाईचा बॉक्स दिला तेव्हा दोघांच्या डोळ्यांत पाणी आले. मी कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझ्या नातलगाला मी दीड लाख रुपये उसने दिले होते. ते पैसे तो आज देणार होता, पण अजून दिले नाहीत. त्यामुळे पत्नी नाराज आहे. घरात सण असून काही गोड केले नाही आणि तुम्ही मिठाई आणली त्यामुळेच आमच्या डोळ्यांत पाणी!’’

असा हा डोंगरावरचा देव मला भेटला.

– अरविंद परचुरे, घाटकोपर.

आजीने दिलेला शब्द

ही घटना आहे एका वृद्ध, निरक्षर माउलीची. आपल्या सदाचरणातून तिने प्रत्ययास आणून दिलेल्या नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता अशा आजकाल जवळपास लोप पावलेल्या सद्गुणांची. देव असलाच तर तो प्रसंगी कोणत्याही रूपात आपणांस भेटतो या श्रद्धेची.

शांताबाई बोंगार्डे हे त्या माउलीचे नाव. वय सुमारे ८५ वर्षे. वास्तव्य तासगाव. आजींच्या पतीचा दुधाचा व्यवसाय होता. त्यांनी १९७५ मध्ये स्टेट बँकेतून व्यवसायासाठी १००० रुपयाचे कर्ज घेतले होते, आणि त्याकरिता तारण म्हणून सोन्याचे ६५ ग्रॅम वजनाचे दागिने (आजची बाजारभावाने किंमत सुमारे दोन लाख रुपये) बँकेत गहाण ठेवले होते. कर्ज घेतल्यानंतर वर्षभरातच बोंगार्डे आजींच्या पतीचे अकाली दु:खद निधन झाले. पदरी एकुलती एक कन्या, अन्य कोणाचाही आधार नाही, अशाही परिस्थितीत आजींनी बँकेचे संपूर्ण कर्ज सव्याज फेडले. मात्र निरक्षरता आणि निराधार अवस्थेमुळे पतीचा मृत्यू दाखला आणि त्यांच्या पश्चात वारस दाखला आदी आवश्यक कायदेशीर कागदपत्रे त्या मिळवू शकल्या नाहीत, आणि त्यामुळे बँकेत तारण ठेवलेले दागिने त्यांना परत मिळू शकले नाहीत.

२००९ मध्ये सदरहू शाखेचा व्यवस्थापक म्हणून मी रुजू झाल्यावर बँकेतील कर्ज प्रकरणांची जुनी कागदपत्रे तपासत असताना सदरहू दागिने गेली ३४ वर्षे बँकेत पडून असल्याचे माझ्या निदर्शनास आले. उत्सुकता आणि कर्तव्यापोटी या प्रकरणी सखोल चौकशी केल्यावर वरीलप्रमाणे सर्व वास्तव समोरे आले. मग बँकेला लागणारी सर्व कागदपत्रे आदी सोपस्कार पूर्ण करण्याकरिता आजींना सर्वतोपरी मदत करून दोन-तीन महिन्यांच्या कालावधीनंतर ते दागिने आजींना सुपूर्द केले, आणि या संपूर्ण प्रकरणात बँकेकडून घडलेल्या अक्षम्य बेपर्वाईबद्दल त्यांची क्षमा मागितली. दागिन्यांना स्पर्श करतेवेळी आजींच्या गालावरून ओघळणारे अश्रू आणि डोळ्यांतील कृतज्ञतेचे भाव पाहताना मला नोकरीतील कर्तव्यपूर्तीचे अत्युच्च समाधान लाभले होते.

सन २०११ मध्ये मी बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर नुकताच काही कामानिमित्त तासगांवला गेलो असताना अनपेक्षितपणे आजींची भेट झाली. त्या वेळी आजींच्या तोंडून या घटनेसंदर्भातील नंतरचे वास्तव ऐकून मी सुन्नच झालो.

सदरहू दागिने आजींचे नसून कर्जापोटी बँकेत तारण ठेवण्याकरिता त्यांच्या पतीने कोणा परिचिताकडून उसने घेतले होते. ‘पती निधनानंतर दागिने मिळविण्यात अडचणी येत असून ते मिळाल्याक्षणी मी तुम्हाला परत करीन’ असे आजींनी त्या परिचितांना आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून वचन दिले होते. आपल्या शब्दाला जागून तब्बल ३४ वर्षांनंतर बँकेतून दागिने परत मिळताच आजींनी ते सर्व दागिने मूळ मालकाच्या वारसांना नि:स्पृहपणे परत केले.

आजींच्या तोंडून हे सर्व ऐकत असताना माझा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता. ३४ वर्षांनंतरही दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या आजींविषयीचा आदरभाव हृदयात मावू शकत नसल्याने डोळ्यांतून अश्रुरूपाने पाझरत होता. त्याचबरोबर ३४ वर्षे आजींच्या शब्दावर विश्वास ठेवून दागिन्यांसाठी कोणताही तगादा न लावणाऱ्या त्या अनामिक परिचितांप्रति अपार कृतज्ञताही मनी दाटून येत होती.

माणुसकी आणि विश्वासार्हता म्हणजे काय हे या दोन्ही व्यक्तींनी आपल्या वर्तनातून सप्रमाण सिद्ध करून दाखवले होते. खरे तर ही माणसे नव्हतेच, देवमाणसेच ती.

-संजीव बर्वे