09 August 2020

News Flash

उत्सव विशेष : उपवास म्हणजे उपासना

चातुर्मासाच्या काळात वेगवेगळी व्रतवैकल्ये आणि त्याबरोबर उपवास केले जातात.

उपवास नेमका कशासाठी करायचा असतो, त्याचे शरीराला, मनाला कोणते फायदे होतात हे लक्षात घेतले तर उपवासाकडे बघण्याचा आपला दृष्टिोकन बदलून जाईल.

डॉ. विनिता देशपांडे – response.lokprabha@expressindia.com

चातुर्मासाच्या काळात वेगवेगळी व्रतवैकल्ये आणि त्याबरोबर उपवास केले जातात. उपवास नेमका कशासाठी करायचा असतो, त्याचे शरीराला, मनाला कोणते फायदे होतात हे लक्षात घेतले तर उपवासाकडे बघण्याचा आपला दृष्टिोकन बदलून जाईल.

उपवास हा शब्द उच्चारला की ‘बटाटय़ाची चाळ’ आठवते. वजन कमी करण्यासाठी सुरू केलेल्या उपवासाचे अत्यंत खुसखुशीत वर्णन यात पुलंनी केले आहे. आपल्या संस्कृतीने आपल्याला उपवास शिकवला; पण आपण त्याचे स्वरूप कसे बदलले याचे उत्तम दाखले यात पुलंनी दिले आहेत. उपवासाच्या नावाखाली शरीराला अपाय करणारे पदार्थ खाणे, ‘एकादशी दुप्पट खाशी’ असे म्हणून नेहमीच्या पदार्थापेक्षा जास्त पदार्थाचे सेवन क रणे हे आपण सर्रास करतो; पण उपवास म्हणजे नक्की काय, हे समजूनच घेत नाही. उपवास जगभरातील विविध संस्कृतींत सामावलेला आहे.

आपल्या संस्कृतीत ‘उपवास’ म्हणजे आपल्याला आदर्श असलेल्या शक्तीच्या सान्निध्यात वेळ व्यतीत करणे. या उपवासाच्या माध्यमातून केवळ आध्यात्मिक उन्नती हाच उद्देश नसून शरीर आणि मन यांची शुद्धी हा प्रमुख उद्देश असतो. कारण धर्म म्हणजे केवळ पाप-पुण्य सांगणे नसून आदर्श जीवनशैली सांगण्याचे, रुजविण्याचे माध्यम आहे.

विविध धर्मामध्ये उपवास सांगितले आहेत. िहदू धर्मात देवाच्या उपासनेचा दिवस आणि स्वनियंत्रण म्हणजे उपवास. मुस्लीम धर्मीय ‘रमजान’- ‘रमादान’ म्हणजे आत्यंतिक तृष्णेचा (उष्म्याचा) अनुभव घेणे. स्वत:मधील ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी उपवास सांगितले आहेत, तर ‘फास्टिंग इज द मेथड ऑफ क्लिनिंग रिन्युइंग सोल’. म्हणजेच नवीन ऊर्जा घेण्यासाठी स्वत:च्या शरीराला आणि आत्म्याला तयार करणे, असे ख्रिश्चन धर्मात सांगितले गेले आहे. बहाईमध्ये उपवास हे अत्यंत उच्चतम औषध मानले गेले आहे. एवढेच नाही तर ते स्वत:ला आजारमुक्त करण्याचे साधन मानले गेले आहे. धार्मिक उपवास ही संकल्पना पारशी धर्म मानत नाही; पण शरीराच्या मागणीनुसार अन्न ग्रहण करण्याचे स्वातंत्र्य ही संकल्पना मांडतो. तर जैन धर्मात उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्युषण काळात स्वत:च्या शुद्धीबरोबर निसर्गातील सूक्ष्म जीवांप्रति सहिष्णुता दाखवली जाते. त्याचबरोबर ‘प्रतिक्रमण’ म्हणजे आत्मपरीक्षण करून नव्याने वाटचाल सुरू केली जाते.

यावरून लक्षात येते की, केवळ िहदूच नव्हे तर प्रत्येक धर्माने उपवास हा उपासनेशी जोडला आहे. याला काही शास्त्रीय करणे आहेत. उप+आसन आपल्या इच्छित शक्तीसमवेत बसणे असा अर्थ उपनिषदांमध्ये सांगितल्याचे आढळते. म्हणजे केवळ एका ठिकाणी बसणे नाही, तर शरीर आणि मन एकात्म करून, निर्वकिार तसेच अंतर्मुख होण्याची प्रक्रिया.

आपल्या शरीरात असंख्य पेशी कार्यरत असतात. या पेशींना लागणारी ऊर्जा ही मुख्यत: ‘साखर’ (Blood Glucose) या इंधनाच्या स्वरूपात असते. आपण घेत असलेल्या अन्नाचे रूपांतर साखरेत होते आणि पेशींना ऊर्जा मिळते. पेशी समूह काम करतात, पर्यायाने शरीर कार्य करते. ऊर्जा तयार होताना अनेक निरुपयोगी पदार्थही शरीर निर्माण करते. त्यांचे उत्सर्जन, निचरा होणे आवश्यक असते. काही काळासाठी आपण ठरवून अन्न घेत नाही त्या काळात शरीरात प्रत्येक पेशीत अशी व्यवस्था असते, की जे काही निरुपयोगी अवशेष आहेत त्यावर पुन:प्रक्रिया करून ऊर्जा निर्माण होते. शिवाय आपण एरवी जे खातो ते अध्रे शरीरात संचयित होते.  आदिमानवाच्या संदर्भात विचार केला तर या गोष्टीला पुष्टी देता येते. आदिमानवाच्या काळात ‘हवे तेव्हा अन्न’ तसेच विविध पदार्थ २४ तास पुरवणारी ठिकाणे ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. मुबलक अन्नाची उपलब्धता नसल्यामुळे आधी सकाळी उठून शिकार किंवा अन्नशोध ही दिनचर्या होती. अन्न म्हणजे देखील कंदमुळे, फळे, फार फार तर मांसाहार आणि संध्याकाळी या पदार्थाचा आस्वाद हा दिनक्रम असे. कधी कधी नसíगक आपत्तींमुळे अन्न मिळत नसे. त्या काळी शरीरात साठवलेली चरबी म्हणजेच ऊर्जा वापरण्यात येत असे.

आजही मानवाचे शरीर त्याच पद्धतीने बेगमी करते. उपवास काळात शरीर साखरेऐवजी ‘चरबी’ इंधन म्हणून वापरते. त्यातून निर्माण होणारी ऊर्जा पेशी वापरतात. तसेच ‘कीटोन्स’ नावाचे कार्बनयुक्त पदार्थही काही प्रमाणात निर्माण होतात. हे ‘कीटोन्स’ काही प्रमाणात आपल्या मेंदूसाठी उपयुक्त असतात. ते मेंदूची कार्यक्षमता, उत्साह वाढवत असल्यामुळे ते मेंदूचे आवडते अन्न मानले जाते. त्यामुळे चित्त एकाग्र होते, आपसूकच ‘उपासना’ साध्य होते. स्थर्य निर्माण होते, शरीरशुद्धी तर होतेच पर्यायाने विचारशुद्धीसुद्धा होते. कारण विचार ही जगण्यासाठी ऊर्जाच नव्हे का?

लंघनं परमौषधम्॥

हे सुभाषित सगळ्यांना परिचित आहे. अपचन झाले, असे कोणी म्हणाले तर पूर्वी दोन मिनिटांत सुटका होईल अशा औषधांपेक्षा लंघन करण्याचा सल्ला दिला जाई. लंघन म्हणजे काही काळासाठी अन्नग्रहण टाळणे. ही गोष्ट औषधाप्रमाणे परिणाम करते. अपचन झाले की, अमुक औषध, चूर्ण, गोळी घ्या आणि लगेच खा असे आजकालच्या जाहिरातीमध्ये दाखवले जाते; पण असे सतत केल्याने पचनसंस्थेवर विपरीत परिणाम तर होतातच, पण काही काळाने औषधेसुद्धा परिणाम करत नाहीत. त्यामुळे अपचनावर सगळ्यात परिणामकारक औषध म्हणजे लंघन होय.

फादर ऑफ मेडिसिन (ख्रिस्तपूर्व ४६० ते ख्रिस्तपूर्व ३६०) हिप्पोक्रॅट्स यांनीसुद्धा सांगितले होते की, ‘चरबीरहित व्यक्तींपेक्षा वाजवीपेक्षा स्थूल व्यक्तींमध्ये अचानक मृत्यू आढळून येतो.’ त्यामुळे त्यांनीसुद्धा व्यायाम, चांगल्या प्रतीचा समतोल आहार आणि काही काळ लंघन किंवा उपवास ही प्रणाली मान्य केली. ते म्हणतात, उपवास शरीराला बरे करण्यासाठी मदत करतो.

पॅरासेल्सस (१४९३ ते १५४१) हे विष विज्ञानाचे जनक तसेच स्वीस-जर्मन फिजिशिअन म्हणतात, ‘द डोस मेक्स द पॉयझन’.  म्हणजे काय? तर ‘अति तेथे माती’. अन्न हे इंधन असले तरी जास्त प्रमाणात घेतले तर ते अपायकारक व आजारास कारणीभूत ठरते. त्यामुळे ते योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. ‘फास्टिंग इज द ग्रेटेस्ट रेमेडी- द फिजिशियन विदिन’.

अनेक ग्रीक विचारवंतांनीसुद्धा उपवासाला पुष्टी दिली आहे. महात्मा गांधींनी तर आपल्यासमोर उपवास, अिहसा, शक्ती यांचे ज्वलंत उदाहरण ठेवले आहे. २१ दिवस उपवास करूनही वेगाने चालणारे गांधीजी असोत वा सध्या अस्तित्वात असणारे जैन, िहदू, बौद्ध धर्मगुरू असोत हे सगळे ऊर्जेचे प्रतीक आहेत.

उपवासाने काय साध्य होते याचा विचार केला तर स्थूलता तसेच वजन आटोक्यात राहण्यासाठी निसर्गत: मदत होते. शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहून इन्शुलिन योग्य प्रमाणात स्रवते. पर्यायाने इन्शुलिन प्रतिरोध होत नाही. शरीरात ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन फ्री रॅडिकल्स कमी प्रमाणात तयार होतात.  त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने विषारी घटकांचा निचरा होण्याचे काम उपवासाने साध्य होते. शरीरातील ‘ट्रॉयग्लिसेराइड्स’ या अनावश्यक कोलेस्टेरॉलला अटकाव होतो. कॅन्सर, मेटाबोलिक सिंड्रोमपासून बचाव होतो. नियंत्रण आणण्याचे तंत्र साध्य होते. त्यामुळे आनंदी राहण्याचे सहजसोपे निसर्गाने दिलेले साधन म्हणजे उपवास.

‘अतीव बलहीनं हि लंङघनं नव कारयेत्।

ये गुणालंङघनं प्रोकास्ते गुणा लघुभोजने॥’

वरील सुभाषितानुसार अत्यंत दुर्बल, कुपोषित व्यक्तींनी उपवास करणे योग्य नाही. त्यांनी उपवास न करता हलका आहार घ्यावा. उपवास हा ठरावीक काळासाठी तसेच आवश्यकतेनुसार करावा. त्याची योग्य पद्धत जाणून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावा. उपासमार ही एक आत्यंतिक कुपोषित अवस्था आहे, ज्यात शरीरास आवश्यक पोषण मिळत नाही आणि ते अशक्त होते. तर उपवास मनास आणि शरीरास योग्य पोषण देतो, म्हणून उपवास म्हणजे निसर्गाने देऊ केलेली संजीवनी आहे!

(शब्दांकन – पियू शिरवाडकर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2019 1:04 am

Web Title: lokprabha festival special 2019 importance fasting
Next Stories
1 उत्सव विशेष : सणांचा आरोग्यदायी आहार
2 उत्सव विशेष : चातुर्मास आरोग्याचा राजमार्ग
3 अनुच्छेद ३७० : विशेषाधिकार रद्द पुढे काय?
Just Now!
X