प्रभाकर बोकील – response.lokprabha@expressindia.com
चातुर्मास श्रावणापासून सुरू होत असला तरी त्याची लगबग आषाढापासूनच सुरू झालेली असते. नागपंचमीपासून दिवाळीपर्यंत सृष्टीपासून माणसांपर्यंत सगळ्यांनाच जगणं साजरं करायचं असतं.

कुणा अनामिकानं म्हटलेलं, ‘लाइफ इज टू शॉर्ट.. सेलिब्रेट इट!’ हे खरंच आहे. आयुष्य ओझं असल्यासारख्या चेहेऱ्यानं वावरणाऱ्या माणसांसाठी आयुष्य हे कंटाळवाणा, कधी न संपणारा प्रवास असतो. अशा कंटाळवाण्या ‘रूटीन’मध्ये या ना त्या कारणानं, वा अगदी कारणाशिवाय आनंद निर्माण करणं, हा ज्याच्या-त्याच्या मनोवृत्तीचा भाग असतो. आनंदी वृत्तीनं जगणाऱ्यांना आयुष्य कमी पडतं, तेव्हा ‘अनामिका’चं म्हणणं पटतं.. ‘लाइफ इज टू शॉर्ट’! अशा छोटय़ाशा आयुष्यात, रोजच्या जगण्याचादेखील ‘उत्सव’ करणं आपल्याच हाती असतं. अन् सारं आयुष्य असतं काही क्षणांचाच प्रवास..  ‘आनेवाला पल, जानेवाला है, हो सके तो इसमे जिंदगी बीता दो, पल जो ये जानेवाला है..!’  या ‘पलभर’च्या प्रवासात सुखापाठोपाठ दु:खं सावलीसारखं येत असतं. सुखाला सामोरं जाताना दुखाचा विसर पडतो एवढंच. तशीही सुख वा दु:खं ही मनाची अवस्था असते. म्हणूनच जिवाभावाच्या माणसाला सांगितल्यावर आपलं दु:ख हलकं होतं, हा या प्रवासातला ‘सुखद’ अनुभव, आपल्यापुरता तरी ‘उत्सव’च असतो! तसंच आपला आनंद दहा जणांना सांगताना शतगुणित होतो. हा सुखाचा आनंदाचा गुणाकार करणं तर आपल्याच हाती असतं!

आयुष्याचं हे गणित मांडण्यासाठी आपल्या संस्कृतीत सण-उत्सव-समारंभाचं ‘सेलिब्रेशन’ असतं. उत्सव साजरे करताना सामाजिक, आíथक, भेदभाव विसरून सगळ्यांना एकाच पातळीवर आणणारं ‘संगीत’ हे या सेलिब्रेशनचा अविभाज्य भाग असतं! आपल्याकडे घरगुती ओव्या-भक्तिगीतांपासून सामूहिक भजन-भारुडांपर्यंत अशा पारंपरिक संगीताची जुनी परंपरा आहे.. ‘अरे संसार संसार, खीर येलावरचा तोड,  एका तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड!’ अशिक्षित बहिणाबाई जात्यावर बसल्याबसल्या, आयुष्याचं तत्त्वज्ञान साध्या शब्दांत मौखिक काव्यातून सांगतात, अन् या काव्याची पारंपरिक ‘लोकगीतं’ होतात! अशा पारंपरिक लोकगीतांतून अन् आजच्या काळातील भावगीत-चित्रपट संगीतातून आपले सणवार-उत्सव साजरे होतात. चित्रपटांतून कथेला पोषक म्हणून अशा उत्सवांचे प्रसंग, त्यासाठी गाणी लिहिली जातात. आनंदाचं सेलिब्रेशन होताना, कुठं तरी मनाच्या तळघरात दु:ख दडलेलं असतं, ते अशा प्रसंगी हटकून वर येतं..  ‘अपनी अपनी किस्मत है, कोई हंसे कोई रोए, रंगसे कोई अंग भिगोए, कोई असुवनसे नन भिगोए..’  असं म्हणत कुणी रंगोत्सवाच्या ‘सेलिब्रेशन’मध्ये सामील होतं! दु:खं-चिंता विसरत ‘लाइफ इज टू शॉर्ट..’ अधोरेखित करणारं असतं हे सेलिब्रेशन! आपल्याकडे चत्री-पाडव्यापासून फाल्गुन-होळीपर्यंत सणा-उत्सवांचं हे सेलिब्रेशन वर्षभर असतं. त्यातही प्रामुख्यानं आषाढी एकादशीपासून चार महिन्यांचा काळ हा सणासुदीचा, उत्सव-समारंभाचा काळ!

वैशाख वणव्यात होरपळून निघालेल्या धरणीवर ज्येष्ठात वरुणराजाचा वर्षांव झाल्यामुळे बळीराजा आश्वस्त असतो. आषाढ सुरू होताच, सांसारिक विवंचना मागं टाकून, ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस..’ अशा ओढीनं खेडय़ा-पाडय़ातून, गावा-शहरातून मलोनमल पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचा ओघ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दिशेकडे प्रस्थान ठेवतो, तिथूनच ‘उत्सवी’ वातावरणनिर्मिती होते. हा प्रवाह अखेरीस एकादशीला चंद्रभागेच्या वाळवंटी भक्तीसागरात विलीन होतो! ‘माझे माहेर पंढरी, आहे भीवरेच्या तीरी..’ या भावनेतून निर्माण झालेला हा श्रद्धा-भक्तीचा, भजन-कीर्तन-संगीताचा अभूतपूर्व उत्सव हे ईश्वराचं ‘सेलिब्रेशन’ असतं! या भक्ती-सोहोळ्याचा ‘मीडिया’तून जगभर प्रसार झाल्यामुळे, परदेशांतून कुतूहलापोटी आलेल्यांसाठी हा एक प्रकारचा ‘फेथ फेस्टिव्हल’ असतो!

आषाढवारी ओसरताना तिकडे कोकण किनारपट्टीवर श्रावणातल्या नारळीपौर्णिमेचे वेध लागतात. त्या दिवशी उफाळलेल्या समुद्राला शांत व्हावा म्हणून ‘नारळ’ अर्पण करण्यासाठी किनारपट्टीवर जमलेला, ‘मी डोलकर, दर्याचा राजा..’ असलेल्या ‘सारंगांच्या’ कुटुंबीयांचा मेळा, हादेखील पारंपरिक ‘श्रद्धेचा उत्सव’ असतो. त्याच दिवशी असतं ‘रक्षाबंधन’ हे भावाबहिणीच्या नात्याचं ‘सेलिब्रेशन’! जागतिक मदर्स डे, फादर्स डे, वगरे दिवसांच्या पसाऱ्यात, बहीण-भावाच्या नात्याचं असं सेलिब्रेशन जगात इतरत्र क्वचितच आढळतं. या दिवशी हमखास ‘भया मेरे, छोटी बहेनको ना भुलाना..’ ही साठेक वर्षांपूर्वीची हक्काची विनवणी कानावर पडली की ‘वेडय़ा बहिणीची रे वेडी माया..’ आठवून जुन्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात!

श्रावणातली मंगळागौर हा नवविवाहितेपासून साऱ्या सासुरवाशिणींचा, सासर-माहेरच्या नाती-पणती, आजी-पणजीपासून आप्त-मत्रिणींपर्यंत साऱ्यांना सामावून घेणारा स्त्रियांचा खास सोहळा असतो. ‘तुझ्या िपग्यानं मला बोलीवली, मला बोलीवली पोरी िपगा..’, ‘झिम्मा खेळू या गं चला..’, ‘घुमू दे घागर घुमू दे..’ अशा पारंपरिक गाण्यांपासून आजच्या नव्या ‘िपगा ग पोरी िपगा..’ या पडद्यावरच्या नृत्यासह मंगळागौरीच्या रात्री जागवल्या जातात! गंमत म्हणजे या सेलिब्रेशनमध्ये पुरुषांना मज्जाव असतो!

आठ दिवसांनी मध्यरात्री होणाऱ्या कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशीची ‘दहीहंडी’ हा कोकणातून आलेला, आता मुंबईकरांचा झालेला खास ‘गोिवदांचा’ उत्सव! ‘गोिवदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्य़ा बाळा..’ ही या दिवशीची पारंपरिक धून. मात्र मराठी मुलखात लोकप्रिय असलेला हा उत्सव देशभर लोकप्रिय व्हायला कारणीभूत ठरलं ६० वर्षांपूर्वी मुंबईच्या गिरगावातल्या रस्त्यावर शूट झालेलं ‘गोिवदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला..’ हे गाणं! या दहीहंडीच्या गाण्यानं तेव्हा इतकी धूम मचवली होती, की नंतर अशी साताठ गाणी पडद्यावर येऊन गेली, तरी आजही या गाण्याशिवाय दहीहंडी साजरी होत नाही! गल्लीबोळातून, हमरस्त्यांवरून उंचावर बांधलेल्या हंडय़ा एकावर एक मानवी थर लावून ‘गोिवदा’ फोडतात तेव्हा शहराचं गोकुळ होतं! या सेलिब्रेशन दरम्यान श्रावणधारा बरसल्या, तर आनंद द्विगुणित होतो! मात्र या ‘धवल’ दहीहंडीच्या ‘सेलिब्रेशन’ची ‘कृष्ण’ बाजूदेखील आहे. खेळीमेळीच्या या सोहळ्यात आता जनतेच्या खिशात हात घालून लाखो रुपयांच्या ‘राजकीय हंडय़ा’ बांधल्या जातात. ‘गोिवदा पथकांत’ ईर्षां निर्माण होते. मग गोिवदांचे ‘थर’ किती, याचे कायदे कुणी जुमानत नाही, अन् कित्येक ‘गोिवदा’ जखमी होतात, कुणाला प्राण गमवावादेखील लागतो!

भाद्रपदातला ‘गणेशोत्सव’ हा मुळात घरगुती, धार्मिक असलेला दीड-पाच-सात-दहा दिवसांचा उत्सव. लोकमान्य टिळकांमुळे हा सार्वजनिक झाला मुंबईच्या गिरगावात, पण त्याचं प्रस्थ वाढलं पुण्यात! सार्वजनिक गणपतींचं आगमन वाजतगाजत झाल्यावर ‘आधी वंदू तुज मोरया..’ अन् नंतरचे दहा दिवस अनलिमिटेड सेलिब्रेशन! ‘गणराज रंगी नाचतो..’ म्हटल्यावर संगीत-नृत्य-कलेचा आविष्कार होणारच. ‘लोकलनिवासी’ मुंबईकर ‘टाइमटेबल’शी आयुष्यभर बांधलेला, त्यामुळे इथं पूजा-आरत्यांचा ‘शॉर्टकट’ असतो, अन् चतुर्दशीलाच सांगता होणारं मुंबईचं गणपती विसर्जन पुण्याच्या मानाने आटोपशीर असतं. मुंबईत भले ‘स्थानिक राजा-महाराजा’ असला, तरी विसर्जन सोहोळ्यासाठी गाजतो तो पुण्याचा गणपती! बाप्पांना निरोप देणं ही एरवी विरहाची बाब, पण त्याचंदेखील आपल्याकडे ढोल-ताशासह वाजत-गाजत निरोप देण्याचं सेलिब्रेशन असतं! या दिवशी पाऊस नसणं, ही बाप्पांची कृपा असते! अनंत चतुर्दशी उलटून गेल्यावर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत चालणारं, (कधी संपणार बुवा?.. बाप्पा मनातल्या मनात!) हे ऐसपस ‘पुणेरी’ विसर्जन! ‘शास्त्राच्या’ बाबतीत काटेकोर असणाऱ्या पुणेकराला याचादेखील अभिमान, कारण त्या वरचढ असतो त्याचा ‘परंपरेचा अभिमान’!

‘तुम्हाला मुंबईकर, पुणेकर वा नागपूरकर व्हायचं आहे?’ असा प्रश्न पुलं वाचकाला विचारतात, तेव्हा त्यांना कोकणचा विसर पडला असावा! (‘अंतू बर्वा’मधली त्यांची कोकणची खिल्ली आठवा!) हाच प्रश्न खुद्द गणपतीबाप्पांना विचारला तर उत्तर काय असेल? पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या ‘कर्णकर्कश’ वातावरणात (देवा हो देवा, गणपती देवा, तुमसे बढकर कौन..? वगरेसाठी ‘डेसिबल’ मर्यादेहून ‘बढकर’ असणारे ‘जम्बो-स्पीकर्स’!) राहून अन् विसर्जन सोहोळ्याचं रेंगाळलेलं ‘सेलिब्रेशन’ पाहून बाप्पांनी कदाचित कोकणची निवड केली असती! दीड दिवसाचा आटोपशीर उत्सव. नोकरदार मुंबईकर त्या दीड दिवसासाठी पावसापाण्यात ‘बाप्पां’साठी आवर्जून कोकणात जाणार. बाप्पांच्या आरत्यांच्या गजरांत, नाती-गोती, मित्र-मंडळींसह रमणार, ‘दीडच दिवस’ बाप्पा आलेत म्हणून रात्र जागवणार, अन् डोईवरल्या पाटावरून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाप्पांचं विसर्जन झालं, की जड अंत:करणानं मुंबईला परतणार.. बाप्पांसाठी हे खरं ‘सेलिब्रेशन’! पण बाप्पांना विचारतो कोण!

बाप्पांच्या मागोमाग पंधरवडय़ातच येतो नवरात्रोत्सव! आश्विन प्रतिपदेला देवीची ‘घटस्थापना’ झाल्यानंतरच्या दसऱ्यापर्यंतच्या ‘नवरात्री’ हे देशभराचं सेलिब्रेशन! या दिवसातला ‘रास-गरबा’ या संगीत-नृत्याचा सामूहिक आविष्कार म्हणजे आजकालच्या ‘फ्युजन’ जमान्यातला ‘दांडिया’! ‘मैं तो भूल चली बाबुलका देस..’पासून ‘सबसे बडा तेरा नाम, ओ शेरोवाली..’पर्यंत विविधभाषी गीतांचा महापूर या नऊ रात्री संगीत-नृत्याच्या तालावर उसळतो! काही शहरांतून हा उत्सव स्टेडियममध्ये सेलिब्रेट होतो, तेव्हा संगीत-नृत्याबरोबर, खर्चीक ‘लेसर’ प्रकाशकिरणांचं नृत्य आकाशात साजरं होतं! स्थानिक पातळीवर हा धमाका इतका वाढतो की अखेर ‘दांडिया’ला रात्रीची वेळेची मर्यादा ठेवण्यासाठी कायदा करावा लागतो! ‘दांडिया’च्या ठिकाणी मुलींशी होणारे ‘गैरप्रकार’ हा मात्र या सेलिब्रेशन संगीतामधला बदसूर! ‘नवरात्री’नंतर दहाव्या दिवशीचा ‘दसरा’ हा सीमोल्लंघनाचा दिवस. कोकणातल्या जत्रेतले ‘दशावतार’ पंचक्रोशीतल्या लोकांना एकत्र आणतात, तशी उत्तरेकडे नवरात्री ‘रामलीला’ पाहायला आसपासची गावं लोटतात. दसऱ्याच्या दिवशी ‘रावण-दहनाचं’ सेलिब्रेशन असतं! हल्ली हे रावण-दहन आपल्याकडेही रुळत चाललंय. साठेक वर्षांपूर्वीचा पडद्यावरचा ‘छलिया’ रावण-दहनाच्या गर्दीत, फाळणीमुळे ताटातूट झालेल्या मुस्लीम जोडप्याची भेट घडवून आणतो अन् ‘िहदू, मुस्लीम, सीख, इसाई सबको मेरा सलाम..’ गात निघून जातो. आज रावण-दहन ‘सेलिब्रेट’ करताना, जात-पात-धर्माचं सीमोल्लंघन काही आपल्याकडून होत नाही, हे सत्य आपण विसरतो!

आश्विन अखेरीस येणारी ‘दिवाळी’ हा प्रकाशाचा, दिव्यांचा उत्सव. अमंगळावर मांगल्याचा, असत्यावर सत्याचा, अज्ञानावर ज्ञानाचा, अंधकारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचं हे सेलिब्रेशन! िहदू-जैन-शीख-बौद्ध असा सर्व धर्मात साजरा केला जाणारा, खाद्य-पक्वान्न, दिव्यांची आरास, रांगोळ्या, फटाक्यांची आतिषबाजी, अशा गोष्टींमुळे प्रचंड लोकप्रिय असणारा हा दीपोत्सव! या आनंदोत्सवी दिवसात भारत-पाक सीमेवर दोन्ही देशांच्या सनिकांत मिठाईची अन् शुभेच्छांची देवाणघेवाण होते, हे विशेष! देश कुठलाही असो, सनिक हा मूलत: माणूस असतो, अन् हे असतं माणुसकीचं ‘सेलिब्रेशन’! नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, मॉरिशस, त्रिनिदाद वगरे देशातही दिवाळी साजरी होते. दिवाळीच्या दिवसांत दुबई-लंडन-न्यूयॉर्कसारख्या शहरातून प्रसिद्ध इमारती प्रकाशझोतात न्हाऊन निघतात! २००३ साली अमेरिकेत वॉिशग्टनला ‘व्हाइटहाऊस’मध्ये अन् २००९ साली लंडनला ‘बकिंगहॅम पॅलेस’ येथे दिवाळी साजरी झाली, अन् दिवाळीला अधिकृत उत्सवाचा दर्जा मिळाला! जगन्मान्यता मिळालेलं, प्रकाशाच्या उत्सवाचं हे आनंदी ‘सेलिब्रेशन’! मात्र फटाक्यांमुळे होणारं ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, भाजण्याच्या घटना टाळण्यासाठी आपल्याला कायदे करावे लागले, ही या सेलिब्रेशनची अंधारी बाजू!

आनंदाच्या ‘सेलिब्रेशन’मध्ये, जीवनाच्या वास्तवाचं भान आणून देणारा, गणेशोत्सव आणि नवरात्री उत्सवाच्या मध्ये असतो पितृ-पंधरवडा! श्राद्धाचा-तर्पणाचा म्हणून अशुभ मानला गेलेला. या दिवसांत असतं ‘पितरांचं’ स्मरण! आपल्या आधीच्या तीन पितरांचं स्मरण करण्याचा हा काळ. पंधरवडय़ाअखेरीस येणाऱ्या ‘सर्वपित्री अमावास्ये’ला आपले सर्वच पितर इथं भूतलावर येतात ही यामागची कल्पना. हजारो वर्षांची ही परंपरा आजदेखील देशभर पाळली जाते. नाशिक-गयासारख्या तीर्थक्षेत्री या काळात लाखो भाविक जमतात, अन्न-संतर्पण करतात. जपानमधला बौद्धधर्मीयांचा ‘ओबान’ हा तीन दिवसांचा असाच ‘पूर्वजांचा’ उत्सव ‘फेस्टिव्हल ऑफ लँटर्न्‍स’ म्हणून ओळखला जातो. ‘आपल्या पूर्वजांची स्मृती जपणं’ ही या उत्सवामागची भूमिका. दिव्यांची आरास, ‘बॉन-ओदोरी’चं नृत्य-संगीत, हे या ‘सेलिब्रेशन’चा अविभाज्य भाग असतं. मृतात्म्यांच्या आगमनाला दिशा दाखविण्यासाठी तिथल्या ‘क्योटो’ पर्वतावर अग्नी चेतवला जातो. अन् ठिकठिकाणी नद्यांच्या पाण्यावर कागदी कंदिलातून दिवे सोडले जातात, ते क्षितिजापार जाताना पाहताना, या दिव्यांना पाहून सोडून गेलेले आत्मे पुन्हा परततील, ही भावना त्यामागे असते! हे सारं प्रतीकात्मकच पण ‘जीवनोत्तर अवस्थेचं’ सेलिब्रेशन असतं!

एकूणच या ‘पल जो ये जानेवाला है..’ अशा काही क्षणांच्या जीवनातला दु:खाचा अंधार दूर करण्यासाठी, प्रकाशाचं अन् संगीताचं सेलिब्रेशन महत्त्वाचं! हे सेलिब्रेशन सामूहिकच असतं असंदेखील नसतं. व्यक्तिगत पातळीवर, अंधार दूर  करण्यासाठी एखादी पणती लावणं, वा मनाच्या सुखद वा दु:खद अवस्थेत स्वत:शीच गुणगुणणंदेखील सेलिब्रेशनच असतं, बिकॉज..  ‘व्हेन आय सिंग.. आय सेलिब्रेट मायसेल्फ.. आय सेलिब्रेट लाइफ!’