07 August 2020

News Flash

सजणार मी आज..

लग्न आणि लग्नाशी संबंधित वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे नटण्या-मुरडण्याची संधी.

लग्नासमारंभांसाठी वापरले दागिने

लग्न आणि लग्नाशी संबंधित वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे नटण्या-मुरडण्याची संधी. ती कधीही सोडू तर नयेच, पण त्याचबरोबर आपले दागिने सगळ्यांमध्ये उठूनही दिसले पाहिजेत..

लग्नसराई ही हल्ली केवळ एखाद-दोन दिवसांपुरती मर्यादित राहिलेली नाही. लग्न म्हणजे आजकाल चार-पाच दिवस चालणारा मोठा कार्यक्रम झालेला आहे. कॉकटेल पार्टी, संगीत, हळद, मेहेंदी हे सगळे समारंभही लग्नाएवढेच महत्त्वाचे झालेले आहेत. त्यानंतर लग्नाचा दिवस, आणि रिसेप्शन असं लग्न भारतात साजरं केलं जातं. प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे कपडे आणि दागिने घ्यायचे असतात. या सगळ्या लग्नाच्या समारंभांमध्ये भरजरी किंवा डिझायनर कपडे आणि मेकअपच्या बरोबरीनेच दागिने हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. लग्नासमारंभांसाठी हल्ली कशा प्रकारचे दागिने वापरले जातात, जुने दागिने कशा पद्धतीचे होते, त्यांचं मॉडर्न रूप कसं आहे या सगळ्यांबद्दल सांगणारा हा लेख.

कॉकटेल पार्टी

कॉकटेल पार्टी हा लग्न-समारंभांमधील पहिला कार्यक्रम. कॉकटेल पार्टी हा रात्रीचा कार्यक्रम. यावेळी पार्टी गाऊन, साडी ड्रेस असे वेस्टर्न आऊट फिट्स वापरले जातात. कॉकटेल पार्टीसाठी हिऱ्यांचे नेकपिस, कानातले, ब्रेसलेट अशा अ‍ॅक्सेसरीज वापरल्या जात. अजूनही हिऱ्याचे दागिने वापरले जातात. परंतु हल्ली हिऱ्याच्या दागिन्यांबरोबर पाचू, नीलम, माणिक, मोती यांचे प्रेशियस किंवा सेमी प्रेशियस दागिने ट्रेण्डमध्ये आहेत. कॉकटेल ड्रेसबरोबर ते खूप शोभून दिसतात. यामध्ये चोकर, लांब गळ्यातलं, आकाराला मोठेपण कानालगत असलेले कानातले, भरगच्च पण मोठे कानातले, हातफुल, ब्रेसलेट असे दागिने वापरले जातात. या सगळ्याच्या बरोबरीने सध्या कॉकटेल पार्टीमध्ये बोहेमियन म्हणजेच बोहो ज्वेलरीसुद्धा खूप मोठय़ा प्रमाणावर वापरली जाते. बोहेमियन ज्वेलरीमध्ये वेगवेगळ्या रंगांचे दगड, रंगीत गोंडे, दोऱ्यांचा गुच्छ, वेगवेगळ्या साखळ्या, पोवळ, टरक्वाइज स्टोन अशा सगळ्याचा वापर होतो. कॉकटेल पार्टीतील कपडय़ांच्या रंगपटलाबरोबर असे दागिने खूप चांगले दिसतात. एकदम क्लासि आणि एलिगंट लुक त्यामुळे मिळतो. ओव्हर साईज अंगठय़ासुद्धा सध्या ट्रेण्डमध्ये आहेत.

संगीत

संगीत हा लग्न-समारंभामधला दुसरा कार्यक्रम. त्यात एका जागेवर उभं राहून फोटो काढायचे नसतात. नृत्य करायचे असते. गाणी गायची असतात त्यामुळे या कार्यक्रमात भरगच्च दागिने वापरले जात नाहीत. तसेच संगीत समारंभासाठी असलेलं कपडय़ांचं रंगपटल हे ब्राइट किंवा भडक असतं. या दोन्हीचा मध्य साधून दागिने वापरले जातात. संगीतसाठी हेड अ‍ॅक्सेसरीज ट्रेण्डमध्ये आहेत. मोठी बिंदी, माथा पट्टी असे प्रकार खूप वापरले जातात. यामध्ये वन सीडेड मांग टीका, ओव्हर साइज मांग टीका, लेयर्स माथा पट्टी, छल्ला इत्यादी प्रकार बघायला मिळतात. हल्ली मांग टिका सेट बाजारात मिळतो. यामध्ये ओव्हरसाइज मांग टिका आणि कानातले असतात. काही वेळा मांग टिका आणि गळ्यातलं त्या सेटमध्ये मिळतं. मग टीकाच्या बरोबरीने संगीतसाठी चेन, तसंच नोज रिंग वापरली जाते. हिरे, जडाऊ कुंदन, मोती यांचा वापर अशा प्रकारच्या दागिन्यांमध्ये जास्त होतो.

हळद

हळदीच्या दिवशी पिवळ्या रंगपटलातील आऊटफिट मोठय़ा प्रमाणावर वापरले जातात. हळदीच्या दिवशी वापरण्यासाठी गोंडेदार ज्वेलरी ट्रेण्डमध्ये आहे. रंगीबेरंगी गोंडय़ाची ज्वेलरी हळदीच्या कपडय़ांबरोबर खूप शोभून दिसते. गोंडय़ाच्या ज्वेलरीच्या बरोबरीने, हळदीसाठी ओव्हरसीज ऑक्सिडाइज कानातले वापरले जातात. ते खूप ट्रेिण्डग आहेत. झुमके, चांदबाली, घुंगरांचे कानातले असे प्रकार त्यात उपलब्ध असतात. बरोबर ऑक्सिडाइज मांग टीकासुद्धा वापरला जातो. हळदीसाठी मिरर ज्वेलरी वापरली जाते. मिरर वर्क रिंग, इयिरग, हेड एस्केसरी खूप ट्रेण्ड इन आहेत.

मेहेंदी

सध्या मेहेंदी हा खूप मोठा समारंभ पार पडला जातो. त्या दिवसासाठी खास कपडे आणि ज्वेलरी बनवून घेण्याचा ट्रेण्ड आहे. मेहेंदीच्या दिवशी ग्रीन कलरस्कीम शक्यतो वापरतात. किंवा रेड, पिंक, ऑरेंज असे रंगही वापरले जातात. मेहंदीच्या दिवशी फुलांची ज्वेलरी घालण्याचा सध्या ट्रेण्ड आहे. खास फुलांनी बनवलेली ज्वेलरी मेहेंदीसाठी बनवून घेतली जाते. मोगरा, गुलाब, ब्लू ऑर्किड इत्यादी फुलांचा वापर केला जातो. काही वेळा फुलांच्या आकारातील कागदी ज्वेलरीही बनविली जाते. मांग टीका, कानातले, गळ्यातलं बाजूबंद, पैंजण इत्यादी फुलांचे दागिने बनवून मिळतात.

लग्न

सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे लग्न. लग्नातील कपडय़ांना साजेसे पारंपरिक दागिने हे सोन्याचेच असतात. हल्ली इमिटेशन ज्वेलरी वापरण्याचा ट्रेण्ड आहे. त्यामुळे कपडय़ांवर शोभून दिसतील अशी इमिटेशन ज्वेलरी वापरली जाते. काही वेळा ब्रायडल ज्वेलरी सेट भाडय़ानेसुद्धा मिळतो. त्यामध्ये गळ्यालगतचं एक गळ्यातलं, मध्यम आकाराचं एक गळ्यातलं, लांब गळ्यातलं, कानातले, मांग टीका, चेन, नोजिरग इत्यादी प्रकार त्या सेटमध्ये मिळतात.

मराठी लग्नांमध्ये ठुशी, कोल्हापुरी साज, चपलाहार, शाहीहार, चिंचपेटी, तोडे, गोठ, नथ इत्यादी दागिने वापरले जातात. हल्ली त्यातलेच नवनवीन प्रकार बाजारात बघायला मिळतात. मोत्याची ठुशी, सोन्याची चिंचपेटी सध्या बाजारात उपलब्ध आहे. म्हाळसा झुमके, सोन्याचे कान, काशी नथ असे जुन्या दागिन्यांचे नवीन अवतार सध्या बाजारात उपलब्ध आहेत. असे दागिने लग्नामध्ये खूप वापरले जातात. साऊथ इंडियन टेम्पल ज्वेलरीसुद्धा हल्ली ट्रेण्डमध्ये आहे.

पुरुषांचे दागिने

पुरुषांचे दागिने तसे कमीच पाहायला मिळतात. हल्ली लग्न किंवा उत्सवी सीझन्समध्ये पुरुष वापरू शकतात, असे काही दागिने आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ‘कलगी’. कलगी हा विविध गोष्टींसाठी वापरला जाणारा दागिना आहे. लग्न समारंभात, उत्सवी सीझनमध्ये  पुरुषांच्या फेटय़ाला किंवा पगडीला ही कलगी लावली जाते. त्यानंतर ब्रोच म्हणून ती वापरली जाऊ शकते. तसेच स्त्रिया पेंडण्ट म्हणून किंवा साडीला ब्रोच म्हणूनही ती वापरू शकतात. अनेक डिझायनर्सनी अशा प्रकारच्या अनेक कलगी डिझाइन केल्या आहेत.

पुरुषांच्या दागिन्यातील सगळ्यात छान आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी सुंदर अंगठी. खडे, चांदी, सोने अशी कोणत्याही प्रकारची अंगठी पुरुष वापरू शकतात. पुरुषांसाठी ज्वेलरी डिझाइन करताना डिझायनर्सना लक्षपूर्वक काम करावं लागतं कारण स्त्रियांसाठीची ज्वेलरी आणि पुरुषांसाठी असलेली माचो ज्वेलरी यात अगदी कमी फरक असतो. त्याचबरोबर ज्वेलरी घालण्यासाठी पुरुषांचं व्यक्तिमत्त्वदेखील तेवढंच महत्त्वाचं ठरतं. हे दागिने योग्य पद्धतीने कॅरी करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. जॅकेट्स, ब्लेझर्स, सूट्स याबरोबर ब्रोचेस खूप छान दिसतात. सध्या ते ट्रेण्डमध्ये आहेत.

पुरुषांच्या दागिन्यांमध्ये ब्रेसलेट्स हासुद्धा खूप चांगला पर्याय आहे. पुरुषांना शोभतील अशा पद्धतीची जडाऊ ब्रोचेस, रिंग्ज लग्नातल्या कपडय़ांवर खूपच छान दिसतात. काही पुरुष कान टोचून घेतात. सण समारंभांमध्ये ब्रोचेस, रिंग्ज, चेन्स, ब्रेसलेट्स, इयिरग्स हे खूप चांगले पर्याय आहेत. पण या सगळ्यात व्यक्तिमत्त्व आणि कॅरी करण्याची पद्धत या गोष्टी लक्षात घेणे खूपच महत्त्वाचे आहे.

लग्नातले दागिने वापरण्याच्या काही टिप्स

*    सोन्याव्यतिरिक्त वेगळे दागिने नक्की ट्राय करून बघा.

*    तुम्हाला कितपत जड दागिने सहन होतात त्याचा अंदाज घेऊनच दागिने घाला.

*    रॅम्पवर दागिने खूप सुंदर दिसतात. पण तेच आपण घातले की कधी कधी खूप मोठे किंवा भरभक्कम दिसतात असं वाटतं. त्यांचं योग्य लेयिरग केलं गेलं तर तेच दागिने फार सुंदर दिसतील. त्यामुळे दागिन्यांचं लेयिरग अवश्य ट्राय करा.

*    कधी कधी अति दागिने घातल्याने थकवा येऊ शकतो, त्यामुळे प्रमाणातच दागिने असू द्यावेत. त्यामुळे दागिन्यांचं वजनही जास्त होणार नाही आणि प्रत्येक दागिना उठून दिसेल.

*    दागिने सोन्याचे घालणार असाल तरीही लेयिरग करूनच ते घाला. ठुशी, त्याहून मोठं गळ्यातलं, शाही हार अशा पद्धतीचा क्रम असू द्यावा. मंगळसूत्रसुद्धा लेयिरग मध्येच समाविष्ट करावं. जेणेकरून फोटो काढताना प्रत्येक दागिना वेगळा उठून दिसेल.

संगीत, मेहेंदीसाठी दागिने वापरण्याच्या टिप्स

* आपल्या आऊटफिटला साजेसेच दागिने घाला.

*    भरीव आऊटफिट असेल तर कमीतकमी दागिने वापरा.

*    मोठे हेवी झुमके, कुंदन वर्कचे इयरिरग्ज घातले तर नेकलेस घालणे टाळा किंवा नाजूक नेकलेस घाला.

*    सध्या चेन, नोज रिंग्ज ट्रेण्डमध्ये आहेत. त्या अशा कार्यक्रमात नक्कीच वापरून बघा. त्या वेळी कानातल्यांऐवजी नेकलेस घालण्याला प्राधान्य द्या.

*    हेवी डिझायनर दुपट्टा घेणार असाल तर शक्यतो नेकलेस घालू नका. दुपट्टाच नेकलेसचं काम करेल. मात्र त्यासाठी दुपट्टा छान सेट करा.

*    कधी कधी मॅचिंगपेक्षा कॉण्ट्रास्ट रंगसंगती खूप सुंदर दिसते. दागिने घेताना त्याचा विचार जरूर करा.

*    आपल्या चेहऱ्याला शोभून दिसेल तेवढय़ाच आकाराची ज्वेलरी घाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 1:30 am

Web Title: lokprabha wedding special issue article 2
Next Stories
1 लग्नाच्या पेहरावातला बदलता ट्रेण्ड
2 ऑनलाइन सनईचौघडे
3 परदेशी जोडप्यांची ‘भारतीय’ लग्नं!
Just Now!
X