17 January 2019

News Flash

ऑनलाइन सनईचौघडे

ऑनलाइन सनईचौघडय़ांचा आज बोलबाला असला तरी आज तरी ऑनलाइन हीच प्राथमिकता आहे

मुला-मुलींच्या मतांना अधिक वाव मिळणारी ही ऑनलाइन सोयरीक वेगाने लोकप्रिय होत आहे.

सध्याचा जमाना हा ऑनलाइनचा आहे, त्याचेच प्रत्यंतर आता लग्न जुळवण्यामध्ये देखील उमटताना दिसते. इतकेच नाही तर मुला-मुलींच्या मतांना अधिक वाव मिळणारी ही ऑनलाइन सोयरीक वेगाने लोकप्रिय होत आहे.

तुमचं लग्न कसं जुळलं? काही वर्षांपूर्वी याची उत्तरं अगदी ठरलेली असायची. कधी कोणा नातेवाईकाच्या ओळखीतून, कधी मित्रपरिवारातून आलेलं स्थळ, वगैरे. मधल्या काळात भर पडली ती विवाह जुळवणाऱ्या संस्था आणि वर्तमानपत्रांतील जाहिरातींची. पण आजच्या काळात हा प्रश्न विचारला तर ज्या ग्रुपमध्ये चर्चा सुरू असेल त्यापैकी एखाद्याचं तरी लग्न हे मॅट्रिमोनी वेबसाइटवरून ठरलेलं असतं किंवा तो किमान त्या प्रक्रियेमध्ये तरी असतोच. ऑनलाइन हा आजच्या काळाचा आबालवृद्धांपासून अगदी हमखास वापरला जाणारा फंडा आहे. गेल्या पाचेक वर्षांत इंटरनेटचा वाढलेला वापर आणि त्यातच मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांमधील गळेकापू स्पर्धा यामुळे कोणालाही इंटरनेट वापरणे अगदी सहजसाध्य झाले आहे. मग एक अख्खी पिढीच, जी सतत ऑनलाइन असते त्यांच्याकडून लग्नासाठी देखील हाच फंडा वापरला गेला तर त्यात नवल काहीच नाही. म्हणूनच काळाबरोबर होणारे हे बदल टिपणं आणि असे बदल विवाह संस्थेवरदेखील काही परिणाम करतात हे पाहणं सयुक्तिक ठरतं.

ऑनलाइन सनईचौघडय़ांचा आज बोलबाला असला तरी आज तरी ऑनलाइन हीच प्राथमिकता आहे असं ठामपणे सांगणं मात्र कठीण आहे. बहुतांश वेळा घरची मंडळी काही ना काही प्रयत्न करीत असतात आणि त्याच्या जोडीला मुलगा-मुलगी स्वतंत्रपणेदेखील प्रयत्न करतात. मात्र मुला-मुलींचे स्वतंत्रपणे होणारे प्रयत्न हे ऑनलाइनच्या माध्यमातून होतात असे मॅट्रिमोनी वेबसाइट वापरणाऱ्यांशी चर्चा केल्यावर कळते. या ऑनलाइनच्या विश्वात समोरच्याला (मुलाला किंवा मुलीला) थेट ओळख (म्हणजे फोटो, फोन नंबर, ई-मेल आयडी इ.) द्यावीच लागते असं नाही. त्यामुळे मला लग्न करायचं आहे असं ज्यांना जगाला सांगायचं नाही, कळू द्यायचं नाही त्यांच्यासाठीदेखील ही एक उत्तम सोय झाल्याचं जाणवतं. इतकंच नाही तर काही मॅट्रिमोनी वेबसाइटवर अगदी चाळिशी-पन्नाशी ओलांडलेल्यांच्या नोंदी सापडतात. थोडक्यात काय, तर वयाच्या सर्वच टप्प्यांवरील लग्नेच्छूकांना ही घरबसल्या सोय झाली हे नक्की.

लग्न म्हणजे दोन कुटंबांना जोडणारा सोहळा अशीच आपली आजवरची समजूत आहे. म्हणूनच लग्न ठरवताना तुम्हा मुलांना काही कळत नाही असं ज्येष्ठांनी दामटवण्याची पद्धतदेखील त्यातूनच रूढ झाली. या परिस्थितीत फार मोठा क्रांतिकारी बदल झालाय असं आता तरी म्हणता येणार नाही. पण एक चांगला मोठा बदल मात्र झाला हे मात्र येथे नमूद करावं लागेल आणि त्याला ऑनलाइन सोयरिकीचे पाठबळ आहे असं म्हणता येईल. शादी डॉट कॉम या आघाडीच्या पोर्टलने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या एका सर्वेक्षणातून हा बदल दिसून येतो. २०-३५ वयोगटातील सात हजार ३९८ संभावित वधुवरांनी यात आपली मतं नोंदवली होती. अर्थातच हे सर्व अ‍ॅरेंज मॅरेज पद्धतीनुसार जाणारे आहेत. त्यामध्ये सुमारे ६९ टक्के जणांनी लग्नासाठी ‘आम्हीच पुढाकार घेतो’ असं मत नोंदवलं आहे. तर लग्न कसं करायचं याबद्दल ५९ टक्के जणांनी ‘स्वत: पुढाकार घेऊन आणि त्याला घरच्यांची संमती घेऊन लग्न व्हावे’ असं सांगितलं. तर २३ टक्के जणांनी ‘स्वत:ला जो जोडीदार योग्य वाटेल त्याच्याशी लग्न करेन’ आणि १९ टक्के जणांनी मात्र ‘घरच्यांनी सर्व करावे’ अशी अपेक्षा नोंदवली. अर्थात ही संख्या आपल्या अवाढव्य लोकसंख्येच्या मानाने कमीच म्हणावी लागेल. पण अ‍ॅरेज मॅरेज पद्धतीत होत असलेल्या बदलाची ही नांदी आहे हेच यातील कल पाहून दिसते.

भारत मॅट्रिमोनी या आणखीन एका पोर्टलने एकूणच आजच्या काळानुसारच्या अपेक्षांवर मागील महिन्यातच एक सर्वेक्षण केले आहे. त्यातून त्यांना असे जाणवले की मुलींनी भावी जोडीदाराची तुलना आपल्या वडिलांशी करणे ६८ टक्के मुलांना रुचत नाही. हादेखील लग्नाच्या अपेक्षांमधील एक बदल म्हणता येईल.

असे छोटेमोठे बदल या ऑनलाइन सोयरिकींमध्ये दिसत असले तरी काही बाबतींत अजूनही पारंपरिक दबाव टिकून असल्याचे दिसते. त्यामध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो जातीचा. जातीतच लग्न झाले पाहिजे हा पगडा आजही अनेक पोर्टल्सवरदेखील स्पष्टपणे जाणवतो. शादी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव रक्षित सांगतात, ‘‘काही प्रमाणात हा पगडा कमी होत आहे. अनेकजण जातीपातींचे बंधन नाही असे नोंदवतात. तर अनेकजण जातीतील वधू-वराची अपेक्षा करत असले तरी ते त्या अपेक्षा सोडायलादेखील तयार होताना दिसतात.’’ पण असे जरी असले तरी त्याच वेळी बहुतांश सर्वच पोर्टल्स ही जातीनुसार वर्गीकरण करण्यावर भर देताना दिसतात. काही पोर्टल्स तर थेट जातीनुसार स्वतंत्र पोर्टलच विकसित करतात. अर्थातच त्याचा फायदा त्यांना होत असेल यात काहीच शंका नाही.

मॅट्रिमोनी पोर्टल्सच्या वाढत्या वापराने काही नवे प्रश्नदेखील निर्माण होतात, पण आपण त्याकडे पुरेशा गांभीर्याने आजही पाहत नसल्याचे लक्षात येते. इंटरनेटवर जे जे दिसतं ते सगळं खरंच असतं अशी आजही बहुतांश लोकांची गोड गैरसमजूत असते. त्यामुळे एखादी गोष्ट नेमकी कोणकोणत्या निकषानंतर एखाद्या वेबसाइटवर प्रसिद्ध होते याची फारशी माहिती आपल्याला नसते आणि ती करून घेण्याची आपली मानसिकता नसते. मग त्यातून संबंधित वेबसाइटचे फावते आणि आपली मात्र दिशाभूल होऊ शकते. लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा विषय असल्यामुळे अशा वेळी तेथे माहितीची शहानिशा आणि माहितीची सुरक्षा या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. पण त्याबाबतीत सध्या तरी सर्वच साइट्स खूप मेहनत वगैरे घेताना दिसत नाहीत. एखादे अकाउंट सुरू करतानाच्या टप्प्यावरच अशा बाबींची शहानिशा होणं गरजेचं असतं. मॅट्रिमोनी वेबसाइट वापरणाऱ्यांशी चर्चा केल्यावर लक्षात येतं की सध्या तरी अनेक साइट्स या केवळ फोन नंबर अथवा ईमेलद्वारे व्हेरिफिकेशन करण्यावर भर देतात.

अनुरूप विवाह डॉट कॉम या पोर्टलवर मात्र तुमच्याकडून ओळखपत्राची मागणी केली जाते. पण जेथे अशा प्रकारे शहानिशा होत नसेल तेथे विनाकारण वेळकाढूपणा करणाऱ्यांची, उगाचच घिरटय़ा घालणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असल्याचे विविध पोर्टल्सचे वापरकत्रे सांगतात. याबाबत केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये मॅट्रिमोनिअल साइटच्या नियमनासाठी एक समिती नेमली होती. त्याबाबतचा अहवाल जून २०१६ मध्ये सरकारला सादर करण्यात आला होता. तो आजही पूर्णपणे जाहीर करण्यात आलेला नाही. पण या शिफारसींनुसार प्रत्येक सभासदाची ओळखीची शहानिशा करणं पोर्टलवर बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच वापरकर्त्यांच्या आयपी अ‍ॅड्रेसचा ट्रॅक ठेवणं बंधनकारक आहे. तसेच आपली वेबसाइट ही लग्न जुळवणारी आहे डेटिंगसाठी नाही हे स्पष्ट करणं बंधनकारक केलं आहे. अर्थात या शिफारसींबद्दल आजही पोर्टल्समध्ये संदिग्धता दिसून येते.

काही त्रुटी असल्या तरी मॅट्रिमोनी वेबसाइट हा लग्न जुळवण्याचा महत्त्वाचा मार्ग असणार आहे हे नक्की. याची व्याप्ती मांडताना शादी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव रक्षित सांगतात, ‘‘२०१० नंतर या क्षेत्राला खऱ्या अर्थाने ऊर्जतिावस्था मिळाली. त्यात इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराचा वाटा मोठा आहे. आज शहरी भागातील किमान ३० टक्के मुलंमुली मॅट्रिमोनी साइटचा वापर करतात. तुलनेत ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर वाढला असला तरी अजून मॅट्रिमोनी साइटचा तेवढा वापर होत नाही. किंबहुना त्यासाठी स्वतंत्र प्रारूप विकसित करावे लागेल. आणि हे प्रारूप नजीकच्या भविष्यात निश्चितपणे येईल.’’ ते एक व्यावसायिक म्हणून या अपेक्षा मांडत असले तरी त्यांच्याच सांगण्यानुसार या क्षेत्राची आजची उलाढाल दोन हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. थोडक्यात काय तर येणाऱ्या काळात ऑनलाइन सनई -चौघडय़ांचा बोलबालाच अधिक वाढणार आहे.

लग्न नको, पण पॅकेजेस आवर

मॅट्रिमोनी वेबसाइटची सुविधा ही केवळ काही मर्यादित सुविधांसहच मोफत वापरता येते. पण तुम्हाला एखाद्या आवडलेल्या प्रोफाइलशी बोलायचे असेल, किंवा भेटायचे असेल तर मात्र त्यासाठी विविध पॅकेजेस घ्यावी लागतात. तरच तसे अ‍ॅक्सेस मिळू शकतात. एक व्यवसाय म्हणून हे ठीक असले तरी ही पॅकेजेस विकण्यासाठी या वेबसाइट संभावित ग्राहकांना फोन करून भंडावून सोडतात अशी तक्रार मॅट्रिमोनी वेबसाइटची वापरकर्ती सांगते. त्यातच ही पॅकेजेस बऱ्यापैकी महागडी (अगदी २५ हजार रुपयांपर्यंत) असतात आणि त्यासाठी पुन्हा मर्यादित कालावधीचे बंधन असते. मग त्या विविक्षित कालावधीत तुम्हाला जणू काही मोहीम काढल्यासारखे त्या पोर्टलचा वापर करावा लागेल, अन्यथा फुकाचा खर्च होऊ शकतो.

सुहास जोशी response.lokprabha@expressindia.com @joshisuhas2

First Published on January 26, 2018 1:20 am

Web Title: lokprabha wedding special issue article 4