परदेशी वधू-वरांनी इथे येऊन भारतीय पद्धतीने विवाह केला अशा बातम्या अधूनमधून कानावर येतात. या परदेशस्थ जोडप्यांना भारतीय पद्धतीनं लग्न करावं, असं का वाटतं? काय असेल त्यामागची मानसिकता आणि पाश्र्वभूमी?

अलीकडेच एक बातमी वाचली. मदुराईमध्ये चिहारू आणि युटो निआंगा या जपानी जोडप्यानं लग्न केलं. चार वर्षांपूर्वी चिहारू तामिळनाडूमध्ये भाषा संशोधनासाठी आली होती. या संशोधनादरम्यान तिनं तामिळनाडूमधील संस्कृतीविषयी जाणून घेतलं. त्यावेळी तिला मिळालेल्या इथल्या लग्नपद्धतीच्या माहितीमुळे ती खूप प्रभावितही झाली होती. या जोडप्याचं लग्न गेल्या वर्षी जपानमध्ये झालं होतं. पण भारतीय विवाह पद्धतीमुळे प्रभावित झाल्याने त्यांनी पुन्हा भारतीय पद्धतीने विधिवत लग्न करायचं ठरवलं. टोकियोहून आलेल्या मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीतलं हे लग्न काही परिचितांच्या मदतीनं झालं. चिहारूला अस्खलित तामिळ भाषा बोलता येते. त्यांच्या लग्नासाठी तामिळ पद्धतीच्या मंडपात फुलांची आरास केलेली होती. वधूने भरजरी कपडे आणि दागिने घातले होते. सप्तपदीसह कन्यादानाचा विधीही पार पडला. एरवी जपानमध्ये चर्चमध्ये लग्न करण्याची पद्धत आहे, असा त्या बातमीचा तपशील होता. याआधीही अनेक परदेशी जोडप्यांनी, प्रसंगी परदेशी पर्यटकांनी भारतीय विवाह पद्धतीचं कौतुक केलेलं दिसतं.

भारतातली लग्नं जास्त काळ टिकतात, असं दिसतं. त्यामुळं लग्नाच्या वेळी झालेले संस्कार, शपथा आदी गोष्टींमुळं एकत्र राहाणं प्रदीर्घ काळ होतं, अशा प्रकारची भावना या परदेशी जोडप्यांत निर्माण होत असावी. भारतीय लग्नांच्या विधीमधून वधू-वरांवर अनेक प्रकारचे विधी आणि संस्कार केले जातात. या संदर्भात लक्ष्मण पारेकर गुरुजी सांगतात की, विवाह आठ पद्धतींनी होतो. सध्या एकच पद्धत प्रचलित आहे ती म्हणजे ब्राह्मणी विवाह. या विवाहाचे ऋग्वेद आणि यजुर्वेदातील संदर्भ लक्षात घेता त्यातील कन्यादानामुळे वर-वधूच्या काही पिढय़ांचा उद्धार केला जातो. हिंदू धर्मात विवाह संस्कार झाल्यानंतर त्यातून मुक्तता नाही. कायद्यानं घटस्फोट घेतला जात असला तरी संस्कारांनुसार त्यातून मुक्तता नाही. कन्यादानाच्या वेळी धर्म, अर्थ, काम यांचा अतिरेक होऊ  देणार नाही, अशा अर्थाची शपथ वर घेतो. सप्तपदी चालताना वधू-वरांमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण होतं. अनेकदा या मंत्रांचे अर्थ वधू-वरांना नीट समजावून सांगितले जातात. भारतात संशोधनाच्या किंवा अभ्यासाच्या निमित्तानं आलेले परदेशी मुलं-मुली भारतीय संस्कृतीतले संस्कार आणि परंपरा सखोल समजून घ्यायचा प्रयत्न करतात. त्या संदर्भात अधिक वाचन करतात. त्यातून भारतीय पद्धतीच्या लग्नाविषयी त्यांना माहिती मिळते.

या आधीही हिंदू संस्कृतीनं प्रभावित झालेल्या कॅनडाच्या झेवियर आणि जेसिका यांनी भारत भेटीदरम्यान अनेक ठिकाणी हिंदू वैदिक पद्धतीनं होणारे विवाह पाहिले. त्यामुळं प्रभावित झाल्यानं त्यांनीही भारतीय परंपरेनुसार विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुष्करमध्ये स्थानिक मित्र अमित भट्टच्या मदतीनं लग्न केलं. यावेळी कन्यादान अमित आणि त्याची पत्नी श्रुती भट्ट यांनी केलं. वरमाळा घालणं, फेरे घेणं, भांगात कुंकू भरून मंगळसूत्र घालणं असा सगळा सोहळा तेव्हा पार पडला होता. भारतीय लग्न आणि कुटुंब व्यवस्थेबद्दल परदेशी लोकांना खूपच कुतूहल आणि आकर्षण असतं. भारतीयांच्या लग्नात केवळ दोन तरुण जिवांनी एकत्र येणं एवढीच गोष्ट नसते. तर त्यात त्या त्या घरातल्या चालीरीती, रूढी, परंपरांचाही समावेश असतो.

काही वेळा केवळ भारतीय संस्कृती-परंपरेचं आकर्षण किंवा अभ्यास नसतो. तर इथल्या मातीशी आणि इथल्या माणसांशी जडलेल्या ऋणानुबंधांमुळेही भारतीय पद्धतीनं लग्न केलं जातं. त्यानुसार दाखला द्यायचा झाल्यास दोन वर्षांपूर्वी आनंदवनात पोलंडच्या राजघराण्यातील लुसियन टर्नाव्हास्की आणि त्याची पत्नी लिवा यांचा विवाह झाला. लुसियन प्रसिद्ध लेखक ऑर्थर टनरेव्हास्की यांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी ऑर्थर भारतभेटीवर आले असताना बाबा आमटे यांच्या कार्यानं ते प्रभावित झाले. स्वत: पोलिओचे रुग्ण असल्यामुळं त्यांच्यात कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या बाबांविषयी आत्मीयता निर्माण झाली. पुढं ऑर्थर यांच्या पुढाकारामुळं आनंदवनात ‘संधीनिकेतन’ या अपंगासाठीच्या प्रकल्पाची उभारणी झाली. २०१२ मध्ये ऑर्थर यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेनुसार हिंदू पद्धतीनं त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तसंच त्यांच्या अस्थी बाबांच्या समाधीशेजारी पुरून त्यावर आनंदवनातील प्रथेनुसार झाड लावण्यात आलं. त्यानंतरही ऑर्थर यांच्या कुटुंबाचा आनंदवन आणि भारतीय परंपरांशी ऋणानुबंध कायम असल्यानं लुसियन यांनी हिंदू वैदिक पद्धतीनं विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार डॉ. प्रकाश आमटे यांच्या पुढाकारानं लुसियन आणि लिवा यांचा विवाह झाला.

काही वेळा परदेशी सामान्यच नव्हे तर सेलिब्रिटींनाही भारतीय विवाह पद्धतीची भुरळ पडलेली दिसते. अमेरिकन गायिका आणि गीतकार केटी पेरीचं लग्न इंग्लिश कॉमेडियन आणि अभिनेता रसेल ब्रॅण्डशी राजस्थानात थाटामाटात लागलं होतं. जर्मन सुपर मॉडेल आणि अभिनेत्री हैदी कुल्मचं लग्न गायक-गीतकार सील याच्याशी लागलं.  मेक्सिकोत लग्न झाल्यावर लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसाला ते भारतात फिरायला आले होते. वाराणसीतल्या वातारणाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी मेक्सिकोमध्ये मिनि-बनारस तयार करून घेतलं. आपल्याकडच्या पंडितांनी तिथं जाऊन त्यांचं लग्न लावलं होतं. पुढं त्यांनी घटस्फोट घेतला. अमेरिकन अभिनेत्री आणि लेखिका पद्मालक्ष्मी यांनी प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्याशी न्यूयॉर्कमध्ये दाक्षिणात्य पद्धतीनं लग्न केलं होतं. या लग्नातला थाटमाट हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही पद्धतींचा होता. पुढं त्यांनी घटस्फोट घेतला. तर इंग्लिश मॉडेल आणि अभिनेत्री एलिझाबेथ हर्ले आणि भारतीय उद्योगपती अरुण नायर यांचं लग्न हा मोठय़ा चर्चेचा विषय ठरला होता. जोधपूरमध्ये झालेल्या या लग्नसोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता.

खुद्द आपल्याकडच्या लग्नात (मराठी) मात्र अलीकडे अनेकदा मुख्य लग्नसंस्कारांमध्ये काटछाट होताना दिसते. काही मोजकेच विधी होताना दिसतात. अर्थात जे विधी होतात, त्यातल्या किती विधींचा अर्थ किंवा ते संस्कार वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजलेले असतात, ही गोष्ट गुलदस्त्यातच राहते. काही वेळा हे संस्कार आणि विधी जाणून घ्यायची इच्छा असते पण समजावणारे गुरुजी आणि वेळ यांची वानवा असते. मग अनेकदा लग्नातले बाकीचे सोपस्कारच वरचढ होताना दिसतात. या लेखासाठी माहिती गोळा करत असताना भारतात लग्न करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते, याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या काही साइट्सही दिसल्या.. या पाश्र्वभूमीवर अनेक परदेशस्थ जोडपी आपल्या देशात येऊन विधिवत लग्नसोहळा करत आहेत. विधी आणि संस्कारांबद्दल जाणून घेत आहेत. कदाचित हा अर्थ समजून घेतला तर आपलं लग्न भारतीयांप्रमाणं टिकेल, ही भावना त्यामागं असावी. पण केवळ धार्मिक विधी आणि संस्कारांमुळं लग्न टिकतं का? विशेषत: भारतीय लग्न टिकतं का? की प्रेम, परस्पर विश्वास, कुटुंबसंस्थेचा अद्याप बऱ्यापैकी शाबूत असलेला पाया, भावनिक, आर्थिक आणि सामाजिक गुंतवणुकीसह अनेक बाबी यासाठी कारणीभूत ठरतात का याविषयी पुन्हा केव्हातरी..