17 January 2019

News Flash

लग्नातील खाद्यसंस्कृती

केरळमध्ये २० व्या शतकापर्यंत लग्नं मुलीच्या गावी मोठय़ा समारंभाने केली जात.

लग्नातील खाद्यसंस्कृती

लग्न म्हटलं की इतर सगळ्याच गोष्टींइतकंच महत्त्वाचं असतं ते जेवण. आपल्या देशातल्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये लग्नाच्या पंगतीत कोणते पदार्थ असतात याची झलक-

‘लग्न’ हा आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांपैकी एक.. ‘शुभमंगल सावधान’ होऊन अक्षता टाकल्यावर आमंत्रितांना वेध लागतात ते लग्नातल्या पंगतीचे. पूर्वीच्या काळी थाटात पंगती बसायच्या. सव्वा हात केळीचे पान, चंदनी पाट, ताटाखाली लाल पाट, मन प्रसन्न करणाऱ्या सुगंधी उदबत्त्या, चांदीची भांडी, निरनिराळय़ा पदार्थानी भरलेले ताट, ताटाभोवतीच्या विविधरंगी सुरेख रांगोळ्या, महिरपी आणि आग्रहाने वाढणे.. पुढे या पाटावर बसलेल्या पंगती जाऊन त्यांची जागा टेबल खुर्चीने घेतली. पण पानातील पदार्थ आणि वाढण्याचे अगत्य तेच होते. पंगतीत बसलेल्या कोणाला काय आवडते याची माहिती असलेले काकू, काका आणि मामा आग्रह करून वाढत असत. भावोजींना जिलेबी वाढण्यापासून आत्याच्या ताटात तुपाची धार कमी पडली आहे इथपर्यंत सर्व मंडळींना यजमानाकडून अगत्याने विचारपूस करून वाढले जायचे. या सर्व वातावरणात पाहुणे मंडळीही अंमळ जास्तच जेवायची. लग्नातल्या जेवणात जिलेबी/लाडू खाण्याच्या पजा लावल्या जायच्या. या पजांची मोजदाद करता करता तात्यांच्या लग्नात १५० जिलेब्या रिचवल्या बर बंडोपंतानी.. अशा गप्पांचा फड रंगायचा. एवढय़ा रंगतदार जेवणाची सांगतादेखील पानसुपारीने व्हायची आणि तोंडामध्ये मधुर पानांचा गिलावा करीत पाहुणे मंडळी घराकडे रवाना व्हायची. अशा सुग्रास भोजनाच्या पंगतीची जागा हळूहळू बुफेने घेतली. कॉस्मोपॉलिटन वातावरणाचा परिणाम हळूहळू शहरी भागापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागाकडे पण झिरपू लागला.   बुफेच्या मेन्यूमध्ये हळूहळू मराठी पदार्थ मागे पडू लागले. वेगवेगळय़ा कुझिनचे स्टॉल्स, चाट कॉर्नर, चायनीज कार्नर, डोसा, पिझ्झा, पंजाबी भाज्या, तवा भाज्या, बाब्रेक्यू काऊंटर, गोडाच्या पदार्थातही रसमलाई, गुलाबजाम, आइसक्रीमचे काऊंटर, निरोपाच्या पानसुपारीची जागा मुखवासाच्या १०-१५ प्रकारांनी घेतली.

लग्नाचा विधी संपल्यावर बुफेच्या रांगेत उभे राहणे, पुन:पुन्हा रांगेत राहायला नको म्हणून निरनिराळय़ा पदार्थाने भरलेले ताट सांभाळत उभे राहून खाण्याची कसरत करणे ही जिकिरीची बाब. टोमॅटोच्या प्युरीमध्ये डुबलेले पनीर, तवा सब्जी आणि बुंदी रायता ताटात एकत्र मिक्स झाल्यावर त्याची नेमकी कोणती चव लागते हेही न समजता बुफेचे जेवण उभ्या उभ्या पोटात ढकलले जाते. या बुफेच्या मेन्यू लिस्टमध्ये मराठी पदार्थ आजकाल अभावाने दिसतात. त्यामुळेच एखाद्या मराठी लग्नात मस्त मराठी मेन्यू दिसला तर ते लग्न आर्वजून  लक्षात राहते.

अर्थात मराठी मेन्यू आपल्याला माहीतच असतो. माहीत नसतात ते इतर प्रांतातील लग्ने आणि त्यांचे मेन्यू. म्हणूनच आज बघू या इतर प्रांतातील लग्नाचे मेन्यू, त्यांतील काही रेसिपीज. हे पदार्थ चाखण्यासाठी वेगवेगळय़ा जातिधर्माच्या, समाजांच्या लग्नांना जरूर हजेरी लावा. त्यामुळे आपली सांस्कृतिक जाणीव तर विस्तारतेच, त्याचबरोबर आपल्या खाद्ययात्रेतही भर पडते.

बंगाली ‘बाबूमोशाय’ मित्र किंवा मत्रीण असेल तर त्यांची लग्नं बिलकूल चुकवू नये. बंगालमध्ये लग्नाला जाऊन आलेल्या माणसाला पहिला प्रश्न ‘काय खेली रे’ -काय जेवण होते हा विचारला जातो. या प्रश्नावरूनच बंगाली लोकांचे खाद्यप्रेम लक्षात येईल. बंगाली लग्नामध्ये प्रवेशद्वाराशी असलेला मंद फुलांचा सुगंध, परंपरागत बंगाली पोशाखात सालंकृत नटलेली बंगाली वधू आणि इतर बंगाली वस्त्रप्रावरणात पैंजणीचा नाजूक आवाज करीत माना वळूवन गोड गोड बंगाली बोलणाऱ्या, गोल बिंदी लावलेल्या टपोऱ्या डोळय़ांच्या बाँग ब्युटीज.. हळदीचा रंग आणि पसरलेला सुवास आणि या सर्वावर कडी करणारे बंगाली भोजन. एकूणच बंगाली लग्नातले वातावरण अनुभवण्यासारखे असते.

आताच्या मल्टी कुझिन बुफेमध्येही बंगाली लग्नातल्या मेन्यूमध्ये बंगाली पदार्थाची रेलचेल टिकून आहे. वृद्धी पूजा, गये हतु, दोदी मंगल, तत्त्वपासून लग्नाच्या आधीचे विधी सुरू होतात. प्रमुख लग्न विधीमध्ये शुभो दृष्टी, माला बदल, सात पाक आणि सम प्रदान हे विधी असतात. तर लग्नानंतर सिर घर, बाशी बिदेन बिदाई बौरन, भात हे विधी असतात आणि अर्थात प्रत्येक दिवशी खाण्यापिण्याची रेलचेल असते. बंगाली लग्नातील महाभोज हा एखाद्या बॉलीवूडच्या मल्टिस्टर्ा फिल्मप्रमाणे असतो. प्रत्येक डिशला वेगळे स्थान असते. बंगाली लग्नातल्या सामिष डिशबरोबर त्यांच्या शाकाहारी डिशदेखील अप्रतिम असतात आणि या सगळय़ांचा गोड शेवट म्हणजे विविध प्रकारच्या बंगाली मिठाया..अशा बंगाली महाभोजनंतर तुम्ही दोन-तीन तास ताणून देणार हे नक्की.

*    मोचेर चोप – म्हणजे केळफुलांचे कटलेट. केळफुलामध्ये, मनुके, आले इत्यादी घालून त्यावर कोटिंग करून डीप फ्राय तळून हे कटलेट तयार केले जाते.

*    माछेर चोप- सामिष खाणाऱ्यांसाठी ही डिश म्हणजे पर्वणी. बटाटय़ाच्या मिश्रणात मसाला घातलेले फिश भरून ते डीप फ्राय करून ही डिश तयार होते. मस्टर्ड सॉसबरोबर हे माशाचे कटलेट तुमच्या जिभेवर बंगाली चव निर्माण करते.

*    बेगुन भाजा- आपल्याकडच्या वांग्याच्या कापांचा हा बंगाली भाऊ. विशिष्ट प्रकारच्या बंगाली मसाल्यामध्ये वांग्याचे काप मुरवून ते डीप फ्राय केले जातात. बेगून भाजा लुची बरोबर (बंगाली पुरी ) खाल्ले जातात.

*    पोटोलेर डोलमा – म्हणजे भरलेल्या पडवळाची भाजी. ही भाजी व्हेज व नॉनव्हेज दोन्ही प्रकारे बनवली जाते. व्हेज प्रकारांमध्ये पडवळामध्ये चीज / पनीरचे व ड्राय फ्रूट्सचे मिश्रण भरले जाते. नॉनव्हेज डोलमामध्ये कोळंबी किंवा माशाचे मिश्रण भरले जाते.

*    ढोकर डालना – चणे रात्रभर भिजवून त्यात विशिष्ट बंगाली मसाले मिसळून त्याचे कोपले बनवले जातात. हे कोपले कांदा, टोमॅटो व नारळाच्या दुधापासून बनवलेले मसाले घालून एक उकळी आणून केले जातात.

*    मिष्टी पुलाव – सर्वच बंगाली समारंभामध्ये मिष्टी पुलाव अग्रस्थानी असतो. केसर, सुकामेवा, युक्त जर्द पिवळ्या रंगातला हा थोडासा गोडसर पुलाव मसालेदार चिकन अथवा मटणाच्या बंगाली करीसोबत अगदी मस्त लागतो.

*    माछेर – हा हिस्सा किंवा बेटकी या गोडय़ा पाण्यातल्या बंगाली माशापासून बनवला जातो. मासे साफ करून मस्टर्ड पेस्ट, दही, आणि खूप साऱ्या माशामध्ये मुरवले जातात. त्यानंतर केळय़ाच्या

पानामध्ये गुंडाळून ते शिजवतात.

*   कोशा मांगशो – म्हणजे खास  बंगाली मटण करी. मटण व बटाटे-कांदा, आले – लसूण पेस्ट, टोमॅटो आणि दही असे मसाल्यासह एकत्र करून मोहरीच्या तेलात शिजवतात.

*  चिंगारी मलाईकरी – नारळाच्या दुधात कोळंबी शिजवून हा पदार्थ तयार करतात. साधा भात किंवा पुलावाबरोबर ही डिश छान लागते.

*   कोलकाता स्टाइल बिर्याणी – ही बिर्याणी खास कोलकात्याची म्हणून ओळखली जाते. मटण व बटाटे बिर्याणीच्या मसाल्यात तांदळासोबत शिजवले जातात. ही बिर्याणी बुऱ्हाणी रायत्याबरोबर सव्‍‌र्ह केली जाते.

*    चिकन चाप – चिकन तंगडीचे पिसेस आठ-दहा तास विशिष्ट प्रकारच्या मसाल्यामध्ये मुरवले जातात. नंतर खसखशीची पेस्ट वापरून हे चाप तयार केले जातात.

*    रोशोगुल्ला – बंगाली लग्नामध्ये मिठायांची रेलचेल असते. यात मानाचे स्थान आहे तो ‘रोशोगुल्ला’ला. काचगुल्ला, संदेश, कमाभोग, सिताभोग, मिष्टी दोही, चमचम, रसमलाई अशा निरनिराळय़ा मिठायांची रेलचेल बंगाली लग्नांमध्ये पाहायला मिळते.

केरळ

‘गॉड्स ओन कंट्री’ असलेल्या, निसर्गसौंदर्याने नटलेल्या केरळमध्ये लग्नाची धामधूम वेगळीच असते. केळीच्या पानांची सजावट, मोगऱ्यांचा फुलांच्या गजऱ्याचा मंद दरवळणारा सुगंध, सोनेरी कसावू साडय़ा किंवा कांचीपुरम सिल्कमध्ये फिरणाऱ्या स्त्रियांचा घोळका आणि मल्याळम् वधू.. असा केरळी लग्नसमारंभ अतिशय देखणा असतो.

केरळमधील हिंदू लग्न असो ख्रिश्चन असो वा मुस्लीम पद्धतीचे, प्रत्येक लग्नात वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखायला मिळतात.

केरळमधील हिंदू लग्नामध्ये सर्वसाधारणपणे शाकाहारी जेवण असते. मुस्लीम लग्नांमध्ये विशेषत: मलबार भागातील लग्नांमध्ये मलबार बिर्याणी खास पद्धतीने बनवली जाते. व्हेज खाणाऱ्यांसाठी मलबार व्हेज बिर्याणी वेगळी बनविण्यात येते. तर ख्रिश्चन पद्धतीच्या लग्नांमध्ये वेगवेगळय़ा प्रकारचे स्टय़ू बनवले जातात. खास अप्पम व रोटीबरोबर ते सव्‍‌र्ह केले जातात. ख्रिश्चन लग्नांमध्ये चिकनकरी, पोर्क चॉप्स, मटण सुक्के, तळलेले मासे असा बेत असतो. त्यातही अलेप्पी किंवा कोट्टायममधील लग्ने असेल तर तुम्हाला करिमन पोलिचट्टू ही खास तिसऱ्या व खेकडे याच्या मिश्रणात बनवलेली अफलातून डिश नक्की खायला मिळेल. शाकाहारींसाठी ४० वेगवेगळय़ा प्रकारच्या शाकाहारी पदार्थाची रेलचेल असते.

केरळमध्ये २० व्या शतकापर्यंत लग्नं मुलीच्या गावी मोठय़ा समारंभाने केली जात. त्यामध्ये आख्खा गाव सहभागी व्हायचा. या लग्नाची तयारी गावात महिनाभर आधी सुरू करीत. हजारो पाहुण्यांसाठीचा स्वयंपाक तिथल्या सुगरणी व लग्नाचे जेवण खास बनवणारे आचारी अगदी लीलया पार पाडत. हिरव्यागार केळीच्या पानावर वाढलेले केरळी पद्धतीचे जेवण ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ स्वरूपाचे असते. लग्नाव्यतिरिक्त ओणम आणि विशू (केरळ नवीन वर्ष) असताना तुम्ही केरळी पद्धतीचे विशेष जेवण चाखू शकता.

*    लोणची – केरळी पद्धतीची दोन लोणची तुमच्या पानात वाढली जातात. त्यातील एक कैरीचे तिखट लोणचे, हे खाताना त्यातील कैरीचा करकरीतपणा मस्त जाणवतो. दुसरे आंबटगोड कैरीचे लोणचे (पुलियांची) यामध्ये हिरव्या मिरच्या, गूळ, आले, यांचे अफलातून मिश्रण असते. कैरीमध्ये या तिन्ही गोष्टींचा मिलाफ झाल्यानंतर एकाच वेळी तिखटगोड, आंबट चवीचा अनुभव जिभेवर रेंगाळतो.

*    कच्च्या केळ्याचे चिप्स – खोबरेल तेलात तळलेल्या केळय़ाचे काप (आपल्याकडे हे केळय़ाचे वेफर्स म्हणून मिळतात) अर्थात खोबरेल तेलात तळलेल्या फ्रेश केळय़ाच्या चिप्सची केरळी चव काही औरच..अगदीच भाग्यवान खवैयांना केळय़ाच्या चिप्सबरोबर फणसाचे चिप्सदेखील खायला मिळतील. ते तळल्यानंतर थंड करून सुंठ पावडर, वेलची, गुळाचे सिरप/पिठीसाखर, जिरे, यांच्या मिश्रणात घोळवून सुकवून वाढले जातात.

*    थोरण- ही कोबी अथवा श्रावणघेवडय़ाची भरपूर खोबरे घालून खोबरेल तेलात कढीपत्ता, जिरे वगरेंची चरचरीत फोडणी देऊन तयार केलेली भाजी चविष्ट असते.

*    ओलन – नारळाच्या दुधात भोपळा किंवा पडवळ घालून ही भाजी बनवली जाते. सर्वसाधारणपणे अप्पमबरोबरही खाल्ली जाते.

*    अवियल – दक्षिण भारतात अवियलचे अनेक प्रकार तुम्हाला चाखायला मिळतील. दही व खोबऱ्यामध्ये भाज्या शिजवून खोबरेल तेलात कढीपत्त्याची जिवंत फोडणी देऊन अवियल तयार केले जाते.

*    कोट्टू करी :- पिवळय़ा भोपळय़ाची नारळाच्या दुधातली स्पेशल करी.

*    पपड्डम – केरळी पापडदेखील वेगळे असतात. खोबरेल तेलात तळलेले पांढरेशुभ्र तांदळाचे पापड झटकन जिभेवर विरघळतात.

*    पचडी  – पचडी हा आपल्याकडच्या कोशिंबिरीचा मल्याळी बंधू. खोबरेल तेलाची फोडणी व खवलेल्या नारळाची पखरण या दोन्ही प्रकारच्या कोशिंबिरीमध्ये केली जाते.

मुख्य जेवणात सांबार भात, त्यानंतर रस्सम भात, त्यानंतर मस्त ताक-भात मनसोक्त ओरपायचे. यानंतर घट्ट जमलेल्या दह्य़ाची वाटी समोर येते. या सर्वामध्ये स्वीट डिशसाठी पोटात खरं तर जागा शिल्लक नसते. पण पायसम् न खाता जेवणावरून उठणे म्हणजे केरळी जेवणावर अन्याय. केरळी बल्लवाचार्य लग्नात दोन प्रकारचे पायसम् बनवतात. उत्तम पायसम् ही खरं तर एक परीक्षाच असते. शेकडो लिटर दूध विशिष्ट गुलाबी रंगावर येईपर्यंत आटवावे लागते. त्यानंतर पारूप्पु (डाळीचे पायझम ) किंवा तांदळाचे पायसम् तयार होते. या पायसम्चे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे लाकडाच्या मोठय़ा धुलाण्यावर बनवलेले पायसम्. लाकडाच्या धुराची विशिष्ट स्मोकी चव त्या पायसम्ला येते. पायसम्ला केरळमध्ये ‘प्रथमन्’ म्हणून ओळखतात. ‘फणसाचे प्रथमन्’ हा अजून एक चविष्ट प्रकार तुम्ही केरळी लग्नात चाखू शकता.

*   राजस्थान

मारवाडी पद्धतीचा लग्नसोहळा अनुभवणे खूप मस्त असते. मारवाडी लग्नाला जाण्याआधी दोन-तीन दिवस उपवास करणे इष्ट आणि डाएटवर असाल तर चुकूनदेखील फिरकू नका. दूध तुपाने माखलेल्या निरनिराळय़ा मिठाया, एक से बढकर एक डिशेस आणि तितक्याच प्रकारचे मुखवास. पिठी दस्तरपासून मारवाडी लग्नाची सुरुवात होते. हा आपल्याकडच्यासारख्या हळदीचा कार्यक्रम असतो. यात हळद आणि चंदनाची पेस्ट लावली जाते. त्यानंतर संगीत, मेहंदी, पल्ला दस्तूर (गौरीहार पुजणे) मुख्य लग्नात बारात, कन्यादान, सप्तपदीपासून ते गृहप्रवेशापर्यंत लग्नसोहळा चालतो.

राजस्थानी लग्नातले पदार्थ

*    दाल बाटी – रव्याच्या खरपूस बाटय़ा भाजून त्या राजस्थानी डाळीबरोबर साजूक तुपाची धार सोडून गरमागरम खाणे. कडाक्याच्या थंडीत दाल-बाटी खायला खूप मस्त लागते.

*    चुरमा – हा दाल-बाटीबरोबर वाढला जाणारा गोड पदार्थ. गव्हाचे पीठ, साजूक तूप, पिठीसाखर आणि ड्रायफ्रूट्स घालून हा चुरमा बनवला जातो.

*    राजस्थानी कढी- दही आणि बेसनाची खास राजस्थानी मसाले घालून राजस्थानी कढी बनवली जाते. यामध्ये पकोडा घालून कढी पण सव्‍‌र्ह केली जाते.

*    दाल तडका – राजस्थानी पद्धतीने बनवलेली डाळ

*    मिक्स व्हेज भाजी – लग्नाच्या सीझनमधली एखादी भाजी, बटाटा घालून मिक्स व्हेज बनवली जाते.

*    कचौरी – बेसन, हिंग, खास राजस्थानी मसाले वापरून सारण बनवले जाते. ते भरून कचौरी बनवली जाते.

*    बाजरा मेथीची रोटी- गव्हाचे पीठ, मेथी, आले, लसूण पेस्ट, आमचूर, धना पावडर, एकत्र करून त्याच्या छोटय़ा छोटय़ा रोटय़ा करून तळल्या जातात.

*    गट्टे का पुलाव – बेसनांमध्ये विविध मसाले घालून त्यांचे गोळे केले जातात. हे गोळे तळून नंतर गट्टे का पुलाव बनवला जातो. राजस्थानमध्ये वाळवंटी भागात भाज्या जास्त पिकत नाहीत. त्यामुळे पिठापासून वेगवेगळय़ा प्रकारचे डिशेस बनवल्या जातात.

*    रायता – दह्य़ामध्ये वेगवेगळय़ा मसाले घालून रायता केला जातो. यामध्ये बुंदी रायता, सब्जी रायता असे वेगवेगळे रायते वेगवेगळय़ा प्रकारे बनवले जातात.

*    हलवा- राजस्थानी लोकांना हलवा खूप प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बदाम हलवा किंवा मुगदाल हलवा स्वीट डिशमध्ये बनवला जातो.

*    घीवर – घीवर ही खास परंपरागत राजस्थानी डिश आहे. घीवर बनवणारे खास बल्लवाचार्य राजस्थानमध्ये पाहायला मिळतात. मकर संक्रात, गणगौर आणि तीज या राजस्थानी सणांना राजस्थानी कुटुंबामध्ये खास घीवर बनवला जातो. घीवर बनवणे ही एक कला आहे. त्यासाठी पीठ, साखर आणि तुपाचे मिश्रण तयार केले जाते. साजूक तूप घातलेल्या कढईत जाळीदार घीवर तळला जातो. तो अख्खा बाहेर काढून पाकात बुडवणे हे फार कौशल्याचे काम आहे. साधा घीवर, मेवा घीवर आणि मलाई घीवर असे घीवरचे प्रकार आहेत.

*    बालूशाही- राजस्थानमधील हा लोकप्रिय पदार्थ. साजूक तुपात मंद आचेवर मदा, दही, दूध, व साखरेत बनवलेली बालूशाही तळली जाते. नंतर ती पाकात घोळवली जाते.

*    मावा कचौरी – मावा आणि ड्रायफ्रूटचे मिश्रण तयार करून मद्यामध्ये भरून ते साजूक तुपात तळले जाते. साखरेच्या एकतारी पाकात बुडवून ड्रायफ्रूट तसंच चांदीचा वर्ख लावून सव्‍‌र्ह केले जाते.

*     छेना मालपुवा – पनीरचा मालपुवा तयार करून साखरेच्या पाकात बुडवून तो गरमागरम वाढला जातो.

असे हे बंगाली, केरळी आणि राजस्थानी पदार्थ. तुम्हाला ते चाखायचे असतील तर या प्रांतातील लोकांच्या लग्नांना आवर्जून जा. नाहीतर या आणि अशाच इतर प्रांतीय मित्रमैत्रिणीच्या घरी आवर्जून जा. त्या घरातली सुगरण तुम्हाला तिच्या खास रेसिपीज नक्कीच खायला घालेल. कारण तिलाही माहीत असेल की कोणाही माणसाच्या हृदयाचा मार्ग शेवटी पोटातूनच जातो.

बंगाली संदेश

सामग्री – एक लिटर फूल क्रीम दूध, १ टेबल चमचा व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, ५ टेबल स्पून पिठीसाखर, अर्धा चमचा गुलाब पाणी, एक टेबल स्पून बारीक कापलेला पिस्ता.

प्रक्रिया –  दूध गरम करावे. नंतर त्यात थोडे थंड पाणी टाकून थंड करावे.

* दुधामध्ये लिंबाचा रस किंवा व्हिनेगर थोडे थोडे मिसळून दूध फाडावे. मग ते कापड घेऊन गाळून घ्यावे. हे पनीर स्वच्छ पाण्याखाली धुऊन घ्यावे. जेणेकरून लिंबाचा आंबटपणा निघून जाईल. आता पनीर एका प्लेटमध्ये काढून घ्यावे.

* आता पनीर हाताने मळून त्यात पिठीसाखर व वेलची पावडर, गुलाबपाणी मिसळावे.

* एका नॉन स्टीक तव्यामध्ये सदरचे मिश्रण घेऊन त्यातील पाणी आटेपर्यंत म्हणजे दोन-तीन मिनिटे परतून घ्यावे.

* सदरचे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर लहान लहान तुकडे करून घ्यावेत. प्रत्येक तुकडय़ास गोल करून एका प्लेटमध्ये घेऊन पिस्त्याने सजवून थंड करण्यास फ्रिजमध्ये ठेवावे व थंड झाल्यानंतर खाण्यास द्यावे.

टीप – * यामध्ये एक व्हॅनिला इसेन्स घातल्यास व्हॅनिला संदेश तयार करता येईल.

* एक चमचा कोको पावडर टाकल्यास चॉकलेट संदेश तयार करता येईल.

चणा डाळीचे पायसम्

साहित्य – अर्धा कप चणा डाळ, अर्धा लिटर दूध, अर्धा कप गूळ, छोटा चमचा वेलची पावडर, काजू आणि तूप.

प्रक्रिया – चण्याची डाळ धुवून घ्यावी. कोरडी करून गुलाबी होईपर्यंत तुपामध्ये भाजावी. त्यानंतर कमीत कमी दोन तास गरम पाण्यामध्ये भिजण्यास ठेवावी. त्यानंतर त्याचे पाणी गाळून घेऊन वाटून घ्यावी. त्यानंतर त्याच्यामध्ये नारळाचे दूध घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी. त्यामध्ये चिरलेला गूळ घालून शिजवावे व नंतर शिजल्यानंतर काजू घालून शिजू द्यावे. त्यानंतर फ्रिजमध्ये दोन ते तीन तास थंड करावे व थंडगार पायसम् काजू व पिस्त्याचे काप घालून द्यावे.

राजस्थानी गट्टा

गट्टा बनविण्यासाठी सामुग्री –

* बेसन एक कप,

* दही – २ ते ३ चमचे

* मीठ चवीनुसार,

* एक छोटा चमचा लाल मिर्ची

* धन एक चमचा

* गरम मसाला १/४ चमचा

* ओवा १/४ छोटा चमचा

* २ मोठे चमचे तेल

पुलाव बनविण्यासाठी सामुग्री –

* १ कप बासमती तांदुळ,

* ०२ ते ०३ चमचे तूप

* कांदे २

* जिरा अर्धा छोटा चमचा  4 हिरवी मिरची मोठी कापलेली 4 हळदी पावडर १/४ छोटा चमचा 4 लवंग ४ 4 काळीमिरी ८ ते १० 4 वेलची २ 4 तेजपत्ता २  4 दालचिनी १ छोटा तकडा  4 मीठ आणि सजावटीसाठी कोथिंबीर

बेसन चाळून घ्या. त्यामध्ये सर्व मसाले, कोिथबीर बारीक कापून, दही आणि तेल टाकून हाताने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.

चपाती बनविण्यासाठी लागते तशी मऊ कणीक तयार करून घ्यावी. ती चार-पाच भागामध्ये विभागून घ्यावी. दोन्ही हाताने लांब लांब रोल बनवून घ्यावेत.

एका भांडय़ामध्ये पाणी घेऊन ते गरम करावे. बेसनाचे रोल त्यामध्ये पूर्णपणे बुडून जातील एवढे पाणी घ्यावे. पाणी उकळल्यानंतर बेसनाचे रोल उकळत्या पाण्यामध्ये टाकावेत. १२ ते १५ मिनिटे गॅसवर पाणी उकळू द्यावे. नंतर गॅस बंद करावा.

पाणी काढून टाकावे आणि रोल थंड होऊ द्यावा. त्यानंतर अर्धा ते एक से.मी.चे पातळ गट्टे कापून घ्यावेत.

लवंग, काळी मिरची आणि वेलचीचे दाणे सोलून बारीक वाटून घ्यावेत.

एका कढईत तूप घेऊन ते गरम करून घ्यावे. तुपामध्ये जिरे टाकावे. जिरे भाजून झाल्यावर त्यामध्ये तेजपत्ता व वरील लवंग, काळीमिरी इत्यादी मसाला घालून  मिनिटभर हलके भाजून घ्यावे. बारीक कापलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर हिरवी मिरची आणि बारीक केलेले आले घालून मिनिटभर भाजून घ्यावे. गट्टे घालून पाच मिनिटांपर्यंत भाजून घ्यावे.

तांदूळ एक तास पाण्यात भिजवावे व नंतर कूकरमध्ये मीठ व पाणी घालून अध्रे शिजवून घ्यावे. या शिजलेल्या तांदळामध्ये तयार केलेले गट्टे घालून मिसळावेत व झाकण ठेवून तांदूळ पूर्ण शिजवून घ्यावा.

राजस्थानी गट्टा पुलाव तयार.

बदामाचा हलवा

साहित्य :- 4 बदाम २५० ग्रॅम 4 दूध ३ ते ४ कप 4 तूप २०० ग्रॅम 4 रवा १ छोटा चमचा 4 साखर २५० ग्रॅम 4 पाणी १२५ मिली 4 साधारण एक कप 4 केशर १० ते १२ पाने व थोडे कापून घेतलेले बदामाचे काप.

कृती- बदाम थोडे धुवून घेऊन ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवावे. त्यानंतर ते पाण्यातून काढून दुसऱ्या स्वच्छ गरम पाण्यामध्ये १० मिनिटांकरिता ठेवावे. गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर बदामाचे साल निघून जाते. बदामाचे साल काढून घ्यावे. हे बदाम दुधात घालून मिक्सरमध्ये घट्ट पेस्ट करून घ्यावी. एका भांडय़ात तूप गरम करून घ्यावे व त्यामध्ये रवा घालून मंद आचेवर एक मिनिटे भाजून घ्यावे. आता त्यामध्ये बदामाची पेस्ट टाकून मंद आचेवर शिजवून घ्यावे. आता एका वेगळय़ा भांडय़ामध्ये  पाणी घेऊन त्यामध्ये २५० ग्रॅम साखर घालून पूर्ण विरघळेपर्यंत गरम करावी. जेव्हा बदाम तूप सोडेल तेव्हा त्यामध्ये केशर व साखरेचे गरम पाणी घालावे. पाणी घालून बदाम तूप सोडेपर्यंत हलवावे. बदामाचा हलवा तयार.

First Published on January 26, 2018 1:11 am

Web Title: lokprabha wedding special issue article 7