20 January 2019

News Flash

लगीनघाई टिपताना..

आपल्याकडे महाराष्ट्रात सकाळीच लग्नं असतात. विधी सकाळी लवकर सुरू होतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

लग्न कॅमेऱ्यात टिपणं म्हणजे या सुंदर दिवसाच्या आठवणींचा खजिनाच तयार करणं. हा खजिना तयार करणाऱ्या फोटोग्राफरचं मनोगत..

लग्न मराठी असेल तर मराठीत, दिल्लीकडे असेल तर हिंदीत आणि दक्षिण भारतात असेल तर इंग्रजीत, असं कुठल्याही क्लायंटला भेटायला जाताना एक वाक्य हमखास असतं माझ्याकडून, शो-स्टॉपर म्हणतात ना तसंच काहीसं, ‘‘तुम्ही हॉल भारीतला भारी पाहता. कपडे घेताना शेरवानी महागातली महाग घेता. जेवणात विविध प्रकार कसे राहतील तेही पाहता. सगळं करता आणि सर्वात शेवटी वेिडग फोटोग्राफर कुठला याचा विचार करता. हॉल कुठला होता तो विषय लग्नानंतर संपतो, कपडे वर्षभरात जुने होतात, शेरवानी तर परत घालतही नाही. जेवण काय होतं ते मोजके लोक सोडून बाकी सगळे एक आठवडय़ात विसरून गेलेले असतात. बाकी आठवण म्हणून काय राहतं? तर फोटो.. आणि तेच सर्वात नंतर तुम्ही ठरवता.’’

अर्थात बाकी सगळं महत्त्वाचं आहेच, पण फोटो सगळ्यात जास्त महत्त्वाचे. त्यांना टाइम मशीन असंही म्हणतात, कारण पुन्हा जेव्हा केव्हा ते पाहू तेव्हा ते  मनाला त्या काळात घेऊन जातात. मग तेही हॉल, कपडे यासारखं लक्ष देऊन निवडायला नको का? खूपदा हे समोरच्याला पटतंच.

मी गेली पाच वर्ष वेिडग शूट करतोय आणि जवळजवळ २०० पेक्षा जास्त लग्नांचं शूट आणि काही राज्यं सोडली तर संपूर्ण भारतात शूट करून झालंय. सगळीकडे ‘लगीनघाई’ एकसमान. पण बदल होतानाही पाहिलाय. म्हणजे हल्ली फोटाग्राफीवरचा खर्च आणि फोटोग्राफर्सचं मानधनसुद्धा वाढताना दिसतंय. जुन्या पिढीत खूपदा बॅण्डबाजा आणि फोटोग्राफर एकसमान अशीच मानसिकता असायची. आणि सगळेच नाही पण बहुतेक जुने फोटोग्राफर्सही स्वतला कलाकार न समजता ठेविले अनंते तसेची राहत. पण आता हे काही प्रमाणात बदलतं आहे. फोटोग्राफरला द्यायच्या पशाची गोष्ट येते तेव्हा लग्नेच्छू मुलगा आणि मुलगी हा खर्च करायला तयार होतात. कारण एक एक लाख रुपये नुसते फोटो काढायला कसे लागतात, हे बऱ्याचदा घरच्यांना कळत नाही. पण ते या दोघांना नीट माहीत असतं.

ही व्यावसायिक बाब सोडली तर इथे काम करण्यासारखं थ्रिल नाही दुसरं. सीझनमध्ये महिन्याला १५-२० लग्नं असतात. प्रत्येक वेळी नवीन लाइट, नवीन चेहरे, नवीन जागा आणि हो नवीन गुरुजी. गुरुजींवरून आठवलं, त्यांनाही टीममध्ये सामील करत टीमवर्क करावं लागतं. खूपदा मनमिळावू असतात, पण कधी कधी फारच शिष्टही. तरीही आमचा आणि त्यांचा असा दोघांचाही उद्देश लग्न सुरळीत होणे हाच असल्याने कधी त्यांच्या मनाने कधी आपल्या असं करत शूट होऊन जातं. आता तर मीच अर्धा गुरुजी झालोय इतके मंत्र आणि विधी पाठ झालेत.

लग्नात दर वर्षी नवे ट्रेण्ड येत राहतात. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमा आला होता, त्या वर्षी निम्म्या लग्नांत जवळजवळ तशीच साडी आणि दागिने असलेली नवरी असायची.  नवीन सिरियल असेल तर त्यातले दागिने आणि काय काय असतं. नवीन नवीन गोष्टी येतच जातात, पण त्यापैकी एक म्हणजे प्रीवेिडग फोटोग्राफी.

आठ-दहा वर्षांपासून हा नवीन प्रकार  सुरू झाला आहे. म्हणजे पाश्चिमात्य देशांत हे होतं पूर्वीच, पण आपल्याकडे आता आता जास्त सुरू झालं आहे. प्रीवेिडग म्हणजे लग्नाअगोदर जोडपी फोटोशूट करून घेतात. एकदम सिनेमा स्टाइल असतं हे सारं. याचा सर्वात जास्त फायदा होतो आम्हा फोटोग्राफर्सना. म्हणजे होतं काय की आम्ही पूर्ण दिवस त्या जोडप्यासोबत असतो. त्यामुळे ओळखही होते चांगली आणि मुळातच कॅमेरा पाहिला की माणसाचा जो गोंधळून जायचा स्वभाव असतो, त्यामुळे असलेला बुजरेपणा थोडा कमी होतो. कारण प्रीवेडिंग फोटोशूटमध्ये त्यांचा विश्वास जिंकलेला असतो. याचा फायदा लग्नात फोटोशूटला होतोच होतो.

प्रीवेडमध्येही प्रत्येकाची आपआपली पद्धत आहे काम करायची. जोडपं फार बुजरं असेल  तर क्लोजअप न घेता आजूबाजूचा परिसर आणि निसर्गाची मदत घेत फ्रेम सेट कराव्या लागतात. हे थोडं अवघड असतं, कारण नेहमीच निसर्ग साथ देतो असं नाही. पण हेच थ्रिलही आहे. त्यामुळे कधी बॅक लाइट फ्लॅश, तर कधी त्यांच्या नुसत्या सावल्या तर कधी पाण्यातलं प्रतििबब घेत शूट पूर्ण होतं.

लग्नातले संगीत

आम्ही फोटोग्राफर सूरज बडजात्यांचे फार ऋणी आहोत. कारण त्यांच्या चित्रपटातल्या लग्नात जे नाटय़ आणि ग्लॅमर दिसतं तेच आपल्या लग्नातही असावं असं आता सगळ्यांना वाटतं. बरेच जण ते करतातही. संगीत हा प्रकार मारवाडी किंवा उत्तरेकडच्या लग्नात नवीन नाही. पण तो एवढा खासगी असतो की पूर्वी फार कोणाला माहीत नव्हता. पण आता मराठी लग्नांतही संगीत असतंच असतं आणि तेदेखील मोठय़ा पातळीवर. म्हणजे हौशी मंडळी तर दोन दोन महिने तालीम घेतात. लग्नातला कामाचा ताण कमी करणं आणि दोन्हीकडच्या नातेवाईकांची हसत खेळत ओळख होणं हा त्यामागचा मूळ उद्देश असतो. पण यात गमतीजमती एवढय़ा छान असतात की एक से एक फोटो मिळत जातात. हसतानाचे, रडतानाचे, एकमेकांना चिडवतानाचे. सारीच मजा असते.

सगळ्यांचीच लगीनघाई

आपल्याकडे महाराष्ट्रात सकाळीच लग्नं असतात. विधी सकाळी लवकर सुरू होतात. त्यामुळे त्यांच्या बरंच आधी अगोदर तीन जण कामाला लागलेले असतात. तेही सकाळी पाच आणि कधी कधी तर त्याही अगोदरपासून. ते असतात नवरी, मेकअप आर्टस्टि आणि फोटोग्राफर. विधींच्या तीन तास अगोदर मेकअप सुरू असतो.  मेकअपवाले तर जादूगार असतात.  सौंदर्यवतीला आणखी सुंदर करताना फोटोमध्ये मेकअप जाणवणार नाही याची ते आणि आम्ही काळजी घेतो. मेकअप सुरू असतानाचे फोटो घेणं आणि मेकअप सुरू ठेवणं ही दोघांचीही कामं न थांबता सुरू राहू देणं हा न बोलता केलेला करारच असतो. पुण्यात तर काही मेकअप आर्टिस्टनी मेकअप करण्यासाठी खास स्टुडिओच तयार केले आहेत. तिथे फोटो काढणं फोटोग्राफरलासुद्धा बरं पडतं.

लग्न सुरू असताना जोडप्याला ताकीद असते की फोटोग्राफर आणि त्याची टीम  इथे नाहीच आहे, असं समजा. तुम्ही आमच्या कॅमेऱ्याकडे पाहिलं तर दंड भरावा लागेल, असाही त्यांना दम द्यावा लागतो. कारण त्यांनी कॅमेऱ्याकडे बघू नये, सगळं सुरू आहे आणि त्याचे फोटो टिपलेत असे फोटो यावेत. कारण खूपदा असं होतं की विधी सुरू असताना एरवीचे  फोटाग्राफर त्यांना थांबवत, कॅमेऱ्याकडे बघा म्हणून सांगत फोटो काढत असतो. त्यामुळे मग नकळत एक कृत्रिमपणा येतो. तो फोटोमध्ये तर जाणवतोच, शिवाय ज्यांचं लग्न असतं तेही विधींचा आनंद पूर्णपणे घेऊ शकत नाहीत. म्हणून नेहमी असं सांगावं लागतं.

फोटाग्राफरच्या व्यथा

दचकू नका. लग्नाच्या आनंदी गप्पा सुरू असताना कसल्या व्यथा असं तुम्हाला वाटेल. पण तसं नाही. महाराष्ट्राबाहेर लग्न असतं तेव्हा  फार मजा असते. आपल्याकडे सकाळी किंवा दुपारीच लग्नं आटोपतात. पण बंगाली, पंजाबी आणि जवळजवळ सगळ्याच उत्तर भारतात लग्नं रात्री होतात. आणि काही मोजके लोक सोडले तर बाकीचे झोपेत किंवा पेंगतच असतात. अशा वेळी काम जास्तच वाढतं फोटो काढताना. कारण सगळा उत्साह वरमाळेचा कार्यक्रम असतो तेव्हाच असतो. त्यानंतर मोजके पाहुणे (जांभया देणारे) आणि नवरा-नवरी विधींना बसतात. दक्षिण भारतातल्या किंवा मराठी लग्नात होतात तेवढे विधीही तिकडे होत नाहीत. मग आम्हाला जोडप्याचे फोटो आणि संगीत वगैरेवरच जास्त लक्ष द्यावं लागतं.

अजून एक हमखास घडणारी गोष्ट. मुलीचा किंवा मुलाचा दूरचा मामा-मामी किंवा त्यांच्या मुलांना काय राग असतो फोटोग्राफरचा काय माहीत, पण ते हमखास कॅमेरा घेऊन आलेले असतात. तुम्ही काहीही करा ते मध्येमध्ये येणारच. लग्नात फुगून बसणारे नातेवाईकही कधी कधी मध्ये मध्ये फार ये-जा करत फोटोग्राफरवर चिडत असतात. अशा वेळी फोटोग्राफरचा बाजीप्रभू झालेला असतो. सगळीकडून िखड लढवत तो चांगले फोटो काढत असतो.

पण तरीही मजा असते आणि जबाबदारीही. कोणीतरी त्यांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस आणखी सुंदर करण्यासाठी तुम्हाला निवडलेलं असतं. यापेक्षा भारी काय असेल?

First Published on January 26, 2018 1:09 am

Web Title: lokprabha wedding special issue article 8