आपल्या हातातले स्मार्टफोन, आपल्या घरातलं वॉशिंग मशीन, एसी ही सगळी कृत्रिम बुद्धिमत्तेची प्राथमिक उदाहरणं आहेत. ही बुद्धिमत्ता येत्या १५-२० वर्षांत एवढी विकसित होईल की अवघं मानवी जीवनच बदलून जाईल. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या बदलांची पायाभरणी या वर्षांत घातली जाणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकांनी ३० ते ४० वर्षांपूर्वी माणसाच्या दररोजच्या जीवनात डोकवायला सुरुवात केली आणि आज त्यांच्याशिवाय जगण्याचा विचार आपण नाही करू शकत. अगदी हीच परिस्थिती येत्या काही काळात ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापरून चालू शकणाऱ्या साधनामुळे निर्माण होणार आहे. या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असणाऱ्या साधनांनी आपल्या आयुष्यात यायला सुरुवात केली आहेच आणि लवकरच त्या साऱ्या  गोष्टी आपल्या दररोजच्या जीवनाचा भाग होऊ पाहताहेत. अनेक प्रगत राष्ट्रं, आणि भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांनी हे तंत्रज्ञान देशभरात राबविण्यासाठी विविधसूत्री कार्यक्रम आखले आहेत. राष्ट्र आणि त्यांच्या तयारीबाबत चर्चा करण्याआधी आपल्या डोक्यात येणाऱ्या टिपिकल मानवी प्रश्नांचं निरसन करून घेऊया. सर्वसामान्यांना या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ चा खरंच फायदा होऊ शकणार आहे का..? याचं उत्तर आहे.. ‘‘हो’’! आता तरी काही प्रमाणात आपण या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत आणि येत्या काळात हे तंत्रज्ञान आपलं आयुष्य व्यापेल यात शंका नाही.

Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली
AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी
UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..

नेमकं काय असतं ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’? या प्रश्नाचं तांत्रिक भाषेत उत्तर देणं फारच कठीण आहे, पण सोप्या भाषेत सांगण्यासाठी एक उदाहरण पाहूयात. आपण एखाद्या लहान मुलाला पहिल्यांदा खायला शिकवतो तेव्हा कसं खायचं, तसंच काय खाण्यास योग्य आणि काय नाही हेदेखील शिकवत असतो. अनेक दिवस शिकविल्यानंतर काही काळाने कोणती गोष्ट खायची आणि ती कशी खायची हे त्या मुलाला पुन:पुन्हा शिकवावं लागत नाही. तो हे सगळे निर्णय आपले आपले घेऊ शकतो, यालाच आपण मानवी बुद्धिमत्ता असं म्हणतो. नेमकी हीच गोष्ट जेव्हा यंत्राबाबत घडते त्यालाच त्या यंत्राचं आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असं म्हणतात. वेगवेगळ्या चालू घडामोडी आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन परिस्थितीनुरूप आपले आपण निर्णय घेऊ शकण्याच्या यंत्राच्या क्षमतेला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लìनग असे म्हणतात. प्रत्येक वेळी अनुभवातून सिद्ध होत जाणारे असे यंत्र बनविण्यासाठी लिहिल्या जाणाऱ्या विशेष प्रोग्रॅमला न्युरल नेटवर्क प्रोग्राम असे म्हणतात. अशा प्रकारचे प्रोग्राम लिहिण्यासाठी विशेष प्रकारचे लॉजिक वापरले जाते त्यातला एक प्रकार म्हणजे ‘‘फझी लॉजिक’’. हेच लॉजिक छोटय़ा स्वरूपात सध्याच्या अनेक ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्समध्ये वापरले जाते, ज्यामध्ये कपडय़ांचे वजन पाहून पाण्याची पातळी, त्याचे तापमान, रोटरचा वेग, लागणारा वेळ या साऱ्या गोष्टी मशीन स्वत:च ठरवते. आपण एकदा का कपडे मशीनमध्ये घातले की मशीन आपले आपण निर्णय घेतं. ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची सुरुवात म्हणता येईल, याच्या पुढचे उदाहरण द्यायचे तर सध्याच्या स्मार्ट होममधील स्मार्ट कूलिंग सिस्टम म्हणजेच एसी. हा विशेष प्रोग्राम्ड एसी स्वत:चे सेन्सर्स वापरून तापमान, हवेतील आद्र्रता, वाऱ्याची दिशा आदी माहिती मिळवतो व त्यानुसार कधी, किती वेळ चालू राहायचे, आपला कूलिंग स्पीड काय असायला हवा, हे आपले आपण ठरवितो. नवीन एसी तर याहीपेक्षा एक पायरी पुढे आहेत. तो घरात उपस्थित असणाऱ्या माणसांची संख्या, त्यांच्या थर्मल ईमेजेस पाहून आपल्या कार्यक्षमतेत बदल करतो. शिवाय घरातील व्यक्ती साधारणपणे रोज कोणत्या विशिष्ट वेळी घरी येतात याचा योग्य ट्रॅक ठेवून रोज त्याच वेळेला स्वत: सुरू होतो. आपण घरी येईपर्यंत आपले घर थंड झालेले असते. याशिवाय रोज तुम्ही पाहत असणाऱ्या टीव्ही मालिकांची वेळ त्याच्या लक्षात आल्यावर तुम्ही कोणताही प्रोग्राम सेट केलेला नसताना, त्या वेळेत आपोआप चालू होऊन तुमचे आवडीचे चॅनेल सेट करणारे टीव्ही हेदेखील फझी लॉजिक प्रोग्रामचे उदाहरण आहे. सर्वच नवीन स्मार्टफोन्समधले, आपल्या हव्या त्या प्रश्नांची चुटकीसरशी उत्तरे शोधणारे सीरी, कोर्टानासारखे पर्सनल असिस्टंट हीसुद्धा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची उदाहरणं झाली.

हे झाले आपल्या रोज दररोजच्या वापरातील गोष्टींबाबत. याशिवाय आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे हवामानाचा अंदाज. हिंदी महासागरात विशिष्ट तापमानाला विशिष्ठ प्रकारचे पाण्याचे ढग निर्माण होतात. भारतातील तापमान जास्त असले की ते पाण्याचे ढग हिंदी महासागरावरून वाहत येत भारताच्या दक्षिण किनाऱ्यावर येऊन पोहचतात आणि आपल्याकडे मान्सूनचा पाऊस येतो असं आपण म्हणतो. आता हिंदी महासागरावर विशिष्ठ ढग निर्माण झाले आहेत ही माहिती आपल्या अवकाशातील उपग्रहांना मिळते. ही माहिती, भारतातील तापमान, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, कमी आणि जास्त दाबाचे वायूपट्टे या साऱ्याचा आढावा घेत वेधशाळेतील प्रोग्राम्स आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्या परिस्थितीचा अभ्यास करून एक अंदाज बांधतो आणि आपल्यापर्यंत खबर पोहचते. ‘सात जून रोजी मान्सून भारतात दाखल होणार..’ हे अंदाज नेहमीच खरे ठरत नाहीत, पण गेल्या काही काळात काही चक्रीवादळांचा, पूर परिस्थितीचा अंदाज मिळाल्यामुळे अनेक जीव आपण वाचवू शकलो आहोत ही आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची कमाल आहे. एवढंच कशाला फोनमधील गुगल मॅप्स ही गोष्ट तर अनेकांनी वापरली असेलच, त्यामध्ये अनेकदा त्या नकाशातील ठरावीक रस्त्यांवर आपल्याला लाल, पिवळा, निळा रंग दिसतो. ते रंग अर्थात त्या ठिकाणचे ट्रॅफिक अपडेट आपल्याला देत असतात, परंतु सॅटेलाइट प्रत्येक वेळी तो रस्ता चेक नाही करत. तो डेटा गेल्या अनेक दिवसांतील त्या रस्त्यावरील त्या वेळेतील वाहतुकीचे, रहदारीचे स्टेट्स घेऊन तयार केलेला असतो, जो सहसा चुकत नाही. अनेक ठिकाणी, गुगल आणि फोन्समध्ये वापरली जाणारी व्हॉइस रेकग्नायझेशन टेक्नोलॉजी ही सारी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची आपत्ये आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आधारित या आणि अशा अनेक गोष्टी आपण आपल्याही नकळतपणे रोज वापरत असतो. अमेरिका, रशिया आणि विशेषत: जपानसारख्या देशांत या तंत्रज्ञानावर मोठय़ा प्रमाणात काम केले जाते. वॉशिंग मशीन, टीव्ही, फ्रिज, बेड यांसोबत तिथल्या टॉयलेट्समध्येही ऑटोमेशन पाहता येते. खरं तर रोबो हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सर्वात महत्त्वाचा प्रकार. माणसासारखी कामं करू शकणारा, निर्णय घेऊ शकणारा रोबो तयार करण्यासाठी त्याला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स असणे अत्यावश्यक आहे. सध्या जगभरात खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोबो तयार केले जाताहेत, उदा. आपल्यासारखे सुंदर एक्स्प्रेशन देऊ शकणारा रोबो, आपल्याशी संवाद साधू शकणारा रोबो, टेबल टेनिस खेळू शकणारा रोबो, अगदी कुत्रा मांजर यांसारखा वागणारा पाळीव रोबो, माणसांसारखी कामे करू शकणारा ह्य़ुमनॉइड, सीमेवर सíव्हलन्स करू शकणारा रोबो, माणसाशी गप्पा मारू शकणारा रोबो.. लेव्ही नावाच्या एका ब्रिटिश शास्त्रज्ञाच्या सांगण्यानुसार २०५० सालापर्यंत रोबो माणसाला इतक्या प्रमाणात पर्याय निर्माण करतील की माणसं रोबोशी लग्न करतील. अर्थात सगळं गपगुमान ऐकून घेणारा नवरा आणि शॉपिंगची अजिबात लालसा नसलेली बायको साऱ्यांनाच हवी असली तरी यात जरा अतिशयोक्ती वाटू शकते. परंतु लेव्हीच्या वाक्याला दुजोरा म्हणून की काय. नुकताच जपानमध्ये दोन रोबोंचा’ विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर उपस्थित तज्ज्ञांनी लेव्हीच्या वाक्यांचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे येत्या काळात माणसांची स्पर्धा रोबोंशी असेल आणि वधू-वर परीक्षा ही प्रोसेसिंग स्पीड आणि किती स्टोरेज मेमरी आहे या प्रश्नावर होऊ शकते. अर्थात हा लेख वाचत असणाऱ्या साऱ्यांची तोवर लग्नं उरकलेली असतील अशी आशा करू आणि सध्या तरी सुटकेचा नि:श्वास सोडूयात. पण मस्करीचा भाग सोडला तर आर्टिफिशिअल टेक्नोलॉजी येत्या काळात खूप अजब गोष्टी आपल्याला दाखवेल यात शंका नाही.

नजीकच्या काळात म्हणजेच  इन्फोम्रेशन टेक्नोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टी प्रत्येक दिवसागणिक प्रचंड वेगाने प्रगती करीत आहेत. त्याचसोबत आर्टिफिशीअल इंटेलिजन्स क्षेत्रातही सध्या मोठी उलाढाल होत आहे. २०१६ मध्ये ‘टेस्ला’ ही अप्रतिम कार बाजारात आली. या कारचे विशेष म्हणजे ही कार चालविण्यासाठी ड्रायव्हरची गरज नाही. यातील संगणकीय व्यवस्था रस्त्यावरील ट्रॅफिक, गुगल मॅप्स, रस्त्यावरील मार्किंग आणि इतर सगळ्या बाबींचा आढावा घेत अतिशय सुरक्षितरीत्या रस्त्यांवरून विनाचालक फिरविता येते. तोच ट्रेण्ड पुढे सरकताना येत्या काळात जगभरातील अनेक मोठय़ा कंपन्या अशा सेल्फ ड्रिव्हन कार्स बाजारात आणतील. याशिवाय होम ऑटोमेटेड सिस्टम या वर्षभरात अधिक स्मार्ट होऊ शकेल. म्हणजे ही सिस्टीम घरातील व्यक्ती आणि त्यांच्या वेळा ट्रॅक करून त्यानुसार घरातील उपकरणे ऑपरेट करू शकेल. कन्व्हस्रेशनल इंटरॅअ‍ॅक्शन म्हणजेच यंत्राशी आपल्या भाषेत होणारे संभाषण ही सुविधा कोर्टाना सीरी या स्वरूपात उपलब्ध असली तरी अजूनही सहज सुलभ रीतीने ती वापरता येत नाही. या इंटरफेसची सुधारित आवृत्ती येत्या वर्षभरात उपलब्ध होणे अपेक्षित आहे आणि आता ती फक्त फोनसाठी मर्यादित न राहता इतरही अनेक उपकरणांत वापरता येऊ शकेल. सध्या आपल्याकडे अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. परंतु येत्या काळात ही सगळी अ‍ॅप्लिकेशन्स एका व्हच्र्युअल असिस्टंटने रिप्लेस केली जातील. चॅट बॉट्स म्हणजेच तुमच्याशी संवाद साधू शकणारे, तुमच्या समस्या सोडवू शकणारे रोबो कॉलसेंटर इंडस्ट्रीमध्ये मोठी क्रांती आणू शकतात. काही बँकांनी या प्रकारातील प्राथमिक सुविधा आधीच स्वीकारलेली आहे. यशिवाय व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी क्षेत्रातही मोठी उलाढाल पाहायला मिळू शकते. फेसबुक आणि गुगलसारख्या कंपन्यांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे येत्या काळात तुम्हाला एखाद्याच्या प्रोफाइलमधून शब्दश: फेरफटका मारता येऊ शकेल, याची फेसबुकने घोषणा केलेली नसली तरी असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे तर्कवितर्क आहेत. जपान अमेरिकेनंतर येत्या वर्षभरात चीनसारख्या देशाचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रात मोठा सहभाग दिसेल. कारण २०१६ पासूनच चीनने या क्षेत्रातील देशाची एकूण गुंतवणूक जवळपास दुपटीने वाढविली आहे.

भारतही स्मार्ट सिटी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून या क्षेत्रातील सहभाग वाढवीत आहे. याचे उदाहरण म्हणून स्मार्ट सिग्नल यंत्रणेचे उदाहरण देता येईल. सध्या गर्दीच्या वेळी रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणेत आवश्यक असणारे बदल म्हणजेच सिग्नलची वेळ वाढविणे, कमी करणे आणि खोळंबलेली वाहतूक सुरळीत करणे हे उपस्थित पोलीस आणि मुख्य कंट्रोल रूम यांच्या मार्फत केले जाते. पण या सिग्नल यंत्रणेला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बहाल केला तर सॅटेलाइट्स, मॅप्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि रोज दररोजची परिस्थिती यांचं योग्य अवलोकन करून सिग्नल्स परिस्थितीनुरूप स्वत:त योग्य ते बदल करून वाहतूक नियंत्रित करू शकेल. यामुळे होणारे प्रदूषण आणि कार्बन क्रेडिट्सही कमी करता येऊ शकतील. हे झाले फक्त ट्रॅफिकबाबत. अगदी सारख्याच पद्धतीने शहरातील एखाद्या परिसरातील वीज आणि पाणी यांची वेळ, गरजा, वापर या मुद्दय़ांवरून अवलोकन करून त्या परिसरात उपलब्ध करून दिली जाणारी वीज, पाणी, गॅस यांचा दाब आणि पुरवठा नियंत्रित करता येऊ शकतो. ज्यामुळे उपलब्ध रिसोस्रेसचा वापर आपण योग्य प्रकारे जास्त काळ करू शकू. याखेरीज वैद्यकीय क्षेत्रातही मोठय़ा प्रमाणावर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्याचे मनसुबे आहेत. मोतिबिंदू, रूटकॅनल, किडनी स्टोन्स यांची रोज जगभरात अनेक ऑपरेशन्स होत असतात. तर या हजारो लाखो ऑपरेशन्सचा डेटा एकत्रित करून ही ऑपरेशन्स रोबोच्या माध्यमातून करता येऊ शकतात का, असे प्रयत्न  जगभर केले जात आहेत. भारताचाही यामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. शिवाय औषध क्षेत्रातही विविध औषधांचा माणसाच्या शरीरावर होणारा परिणाम तपासण्यासाठीही या तंत्रज्ञानाचे साहाय्य घेतले जाणार आहे. म्हणजेच येत्या काळात किंवा येत्या वर्षभरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स साऱ्याच क्षेत्रात रूढ होऊन माणसाचे जीवन आणि राहणीमान उंचावू शकते.

अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना गेली अनेक वर्षे वापरात असल्यामुळे तिचा या लेखात त्याच नावाने उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात आज मात्र या संकल्पनेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. ते म्हणजे ही सगळी यांत्रिक प्रगती निव्वळ यांत्रिक राहणार नाहीत, तर यंत्रांना भावना प्रदान केल्या जातील. आणि भावना आणि प्रतिसाद ही तर सजीवाची अत्यंत नैसर्गिक गोष्ट. मग तिला कृत्रिम बुद्धिमत्ता कसं म्हणायचं? म्हणजे उलट यंत्रांना नैसर्गिक बुद्धिमत्ता मिळणार असं म्हणायला हवं. म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना हळूहळू बाजूला पडून यंत्रांबाबतही नैसर्गिक बुद्धिमत्ता असंच म्हटलं जाऊ शकतं.

आज या प्रकाराची उजळ बाजू दिसत असली तरी याबाबतची खूप मोठी चिंता जगभरातील शास्त्रज्ञांना सध्या सतावत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अगर मशीन इंटेलिजन्स म्हणजे एखाद्या लहान मुलावर ठरावीक बाबींचे संस्कार करण्यासारखे आहे. संस्कार उत्तम असतील तर ते मूल उत्तम माणूस बनते, परंतु संस्कार चुकीचे केले गेले तर समाजविघातक प्रवृत्तींचा जन्म होतो.  अगदी तीच बाब आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बाबतीतही सांगितली जाऊ शकते आणि असे झाल्यास त्याचा सामना करणे हे मोठे आव्हान आपल्यासमोर असेल. ही एक बाब झाली, परंतु याशिवायही अनेक गोष्टी आहेत. त्यातली सर्वात मोठी समस्या म्हणजे माणसाच्या कामाला पर्यायी ठरणारे यंत्र निर्माण झाल्यास माणसांची गरज संपेल. याचे पर्यवसान वाढत्या बेरोजगारीमध्ये होईल. आत्ताच न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वाढत्या कक्षांमुळे अमेरिकेत २०२० पर्यंत बेरोजगारी २० टक्यांनी वाढलेली असेल, जी अतिशय भयावह बाब असेल. चॅटबॉट्सच्या तंत्रज्ञानामुळे कॉलसेंटर इंडस्ट्रीजचे भवितव्यही येत्या काळात धोक्यात येऊ शकते. अर्थात जेवढे प्रश्न असतात तेवढीच त्यांची उत्तरेही असतात. येत्या काळात ती सापडतील अशी आशा करू या आणि सध्या तरी तंत्रज्ञानाची ही आर्टििफशिअल झेप साजरी करू या.

प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com