अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या जयंती नाल्याची पूररेषा बदलल्याचे २००५च्या पुरातच स्पष्ट झाले. तरीही प्रशासनाने १९८९चीच पूररेषा कायम ठेवली. त्याआधारे अर्निबध बांधकाम  परवानग्या दिल्या गेल्या. त्याचेच परिणाम या पावसाळ्यात शहराला भोगावे लागले.

महापुराचे पाणी कोल्हापूरच्या नाकातोंडात शिरले आणि जीव गुदमरायला लागला, तेव्हा प्रशासन जागे झाले. परंतु तोपर्यंत वेळ टळून गेली होती. २००५च्या पुरानंतरही जयंती या नाल्याची १९८९चीच पूररेषा कायम ठेवण्यात आली; बदललेल्या पूररेषेकडे दुर्लक्ष करून इमारती, मॉल्स, शोरूम्सना परवानग्या दिल्या गेल्या तेव्हाच यंदाच्या महापुराची तयारी सुरू झाली होती.

कोल्हापूरमध्ये दोन्ही बाजूंनी पाणी शिरले. एका बाजूने पंचगंगेचे तर दुसऱ्या बाजूने जयंती नाल्याचे. खरे तर जयंती नदीचे रूपांतर ‘जयंती नाल्या’मध्ये होण्याला बिल्डर लॉबी जेवढी कारणीभूत आहे तेवढाच जलसंपदा विभागही कारणीभूत आहे. यापूर्वी कोल्हापुरात १९८४, १९८९, २००५ साली महापूर आले. त्यापैकी १९८९ साली आलेल्या महापुराच्या आधारे जलसंपदा विभागाने पूरनियंत्रण रेषा आखली होती. मात्र, १९८९च्या तुलनेत २००५ साली आलेला महापूर मोठा होता. त्याची दखलच प्रशासकीय पातळीवर घेतली गेली नाही. १८८९ सालचीच पूर नियंत्रण रेषा कायम ठेवण्यात आली. त्याच आधारे शहर नियोजन विभाग बांधकाम परवानग्या देत राहिले. परिणामी, शहराच्या मध्य भागी म्हणजेच लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि व्हिनस कॉर्नर आदी ठिकाणी लोकवस्ती वाढली. धान्य बाजारपेठांत इमारती, विविध शोरूम्स आणि मॉल उभे राहिले. त्याचा फटका आर्थिक उलढाल मोठी असलेल्या भागाला बसला.

जुलै २००५ साली आलेल्या महापुरात पंचगंगा तालीम परिसर, लक्षतीर्थ वसाहत, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर, नागाळा पार्क, ओढय़ावरील रेणुका मंदिर परिसर, कसबा बावडा, लाइन बाजार, उलपे मळा, धान्य गोदाम परिसर, रमणमळा, महावीर महाविद्यालय, न्यू पॅलेस परिसर, पोवार मळा, बापट कॅम्प आणि सिद्धार्थनगर अशी सुमारे २६ ठिकाणे जलमय झाली होती. १९८९ मध्येही असाच अनुभव आला होता, असे पूर्वीपासून कोल्हापुरात राहणारे सांगतात. असे दोन फटके कोल्हापूरला बसल्याचा अनुभव गाठीशी असतानादेखील पुन्हा कोल्हापूरच्या घशात पाणी शिरायचे तसे शिरलेच. जेव्हा श्वास गुदमरू लागला तेव्हा आपत्ती व्यवस्थापन, पूरनियंत्रण रेषा आणि बचाव कार्याचे नियोजन अशा गोष्टी आठवू लागल्या.

शहराच्या मध्यवर्ती भागात पाणी शिरण्याचे मुख्य कारण, जयंती नाल्याला आलेला पूर हे आहे. कारण, त्याची पूरनियंत्रण रेषाच निश्चित झालेली नाही. नाल्याचे पात्र ज्या ठिकाणी मोठे होते तिथेच ही रेषा नसल्यामुळे संपूर्ण कुंभार गल्ली, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हीनस कॉर्नर ४१ फुटांचे रेकॉर्ड तोडून ५७ फूट पाण्यामध्ये बुडाले. पूरनियंत्रण रेषाच कालबाह्य़ असेल, तर शहाराच्या नाकातोंडात पाणी शिरणारच. प्रशासकीय पातळीवरील गांभीर्याच्या अभावामुळे सर्वसामान्यांना मात्र मोठा फटका बसला. कोटय़वधी रुपयांचे धान्य पाण्यात कुजत राहिले. संपूर्ण आयुष्यभराची पुंजी खर्च करून उभारलेले घरसंसार मातीमोल झाले. नदीच्या पात्रातच कुंभारांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने उभे केले होते. त्यांनाही लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागला. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या हजारो दुकानांनी जलसमाधी घेतली.

कोल्हापूरच्या तिन्ही दिशांना पंचगंगा वाहते आणि शहराच्या मधून जयंती नाला वाहत जातो. शहराचा विस्तार होत असताना हळूहळू बांधकामांचे केंद्र नदीकाठ, नाल्याच्या अवती भवती सरकू लागले. पुढे, कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त के. एच. गोिवदराज यांनी नियमावली तयार केली आणि ती अडचणीची ठरल्याने गडगंज लॉबीच्या दबावामुळे त्यांची रातोरात बदली झाली. नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सोयीची पूररेषा आखली गेली. पूररेषेचे महत्तम पूर रेषा (लाल), पूर प्रततिबंधक रेषा (निळी), नदीची हद्द ते निळी रेषा प्रतिबंधित क्षेत्र, शेती आणि नाविकास क्षेत्र (हिरवा) असे विभाग/पट्टे तयार करण्यात आले. त्यातून कोणत्या पट्टय़ात कोणती, कशा प्रकारची आणि कोणत्या नियमांआधारे बांधकामे करायची याची पहिली नियमावली तयार करण्यात आली. पूररेषेत अनेक बांधकामे झाली आहेत. काही नियम धाब्यावर बसवून, काही नद्या आणि जयंती नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूरला कुणी बुडवले याचे उत्तर मिळू शकते. पण हे स्पष्टपणे सांगायची तयारी कोणाचीही नाही.

पूरनियंत्रण रेषेबद्दल माहिती सांगताना शहर नियोजन विभागाचे नारायण भोसले सांगतात, २००८ साली जलसंपदा विभागाने नियंत्रण रेषा आखली होती. मात्र, २०१४ साली ही रेषा शास्त्रीयदृष्टय़ा चुकीची असल्याने रद्द झाली. तेव्हापासून जयंती नाल्यासंदर्भात कोणतीही पूरनियंत्रण रेषा अस्तित्वातच नाही. १९८९ साली आलेला महापूर मोठा होता. त्यानुसार उच्चतम पूरनियंत्रण रेषा ठरली होती. त्याच्या आधारवरच महापालिकेने बांधकाम परवानगी दिलेली होती. परंतु, यंदा आलेला महापूर आतापर्यंतचा सर्वात मोठा पूर ठरला. त्यामुळे नवी पूर नियंत्रण रेषा ठरवून देण्याची मागणी प्रशासनाने जलसंपदा विभागाकडे केली आहे.

महापुराचे चार तडाखे बसूनदेखील मध्य शहारतील जयंती नाल्याची पूरनियंत्रण रेषा निश्चित होत नसेल, तर अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासनाची तारांबळ उडणारच आहे. मल्लिनाथ कलशेट्टी यांना आयुक्तपदावर येऊन केवळ पाच महिने झाले आहेत. तरीही त्यांनी कर्मचारीवर्गाला हाताशी धरून कोल्हापूरला महापुराच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न केला आहे. पूरनियंत्रण रेषा निश्चित करणे, अनधिकृत बांधकामे, जयंती नाल्यावरील अतिक्रमणे यावर कारवाई करणे, आपत्ती निवारणासाठी अधिक काटेकोर आराखडा तयार करणे अशी अनेक आव्हाने त्यांना आणि प्रशासनाला  पेलावी लागणार आहेत.